पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/6

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बहुआयामी व्यक्तिमत्त्व

 बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले या उक्तीला साजेसे असे शशीताईंचे व्यक्तिमत्त्व होते. कोणत्याही कामाची पद्धत कशी बसवावी हे अगदी सहजरीत्या त्यांना जमत असे. त्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या विचार, वाणी आणि कृतीमध्ये एकवाक्यता होती. कोणतेही काम करताना कामाचे पूर्वनियोजन, शिस्तबध्दता, वेळेचे व्यवस्थापन या गोष्टींवर त्यांचा सातत्याने भर होता. कोणतेही काम करताना ते प्रामाणिकपणे करणे, दुसऱ्याचे म्हणणे समजून घेणे ह्याला त्या प्राधान्याक्रम देत. त्यांना सामान्य माणसाबद्दल आत्मीयता, आस्था आणि समतेची भावना असायची जी त्यांच्या प्रत्येक कृतीतून लक्षात यायची. एखादी गोष्ट समजून घेताना वरवर लक्ष न देता ती मुळापर्यंत जाऊन समजून घेणे हा त्यांचा स्वभाव होता.

समाजऋण

 समाजाकडून आपल्याला जे काही मिळत असते ते आपण समाजाला परत करावे हा त्यांचा विचार असे. म्हणूनच त्यांनी स्वत:ची संपत्ती समाजाला परत देण्याचे ठरविले. तसे इच्छापत्र त्यांनी २०११ साली तयार केले. चैतन्य संस्थेला पण ह्यातला हिस्सा मिळाला.

उर्जेचा शाश्वत झरा

 एखाद्या व्यक्तीने आपले पूर्ण कौशल्य वापरून काम कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शशीताई. विविध गुणांचा संगम असणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्याने आपणही असेच घडत जावे अशी प्रेरणा आपल्याला मिळते.

 चैतन्य संस्थेने आयोजित केलेल्या विविध प्रशिक्षणे व क्षमता बांधणी कार्यशाळा तसेच नॅशनल कॉन्फरन्समध्ये त्यांचा सहभाग होता. चैतन्य संस्थेच्या कार्यात त्यांचे योगदान ही आपल्याला मिळालेली मोठी भेट आहे.

'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन