कोणत्याही संस्थेच्या वाटचालीमध्ये अनेक ज्ञात अज्ञात लोकांचा, संस्थांचा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतो, योगदान असते. एखादी संस्था समजून घेताना संस्थेचा इतिहास समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. संस्थेची ध्येये, उद्दिष्टे, मूल्ये ही वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदानातून विकसित होत असतात. चैतन्य संस्थेची वाटचाल समजून घेताना संस्थेच्या उभारणीत, विकासात आणि विस्तारात अशा अनेक व्यक्तींचे योगदान आहे. या व्यक्तींनी अंगीकारलेली मूल्ये, विचार व तत्त्वे समजून घेणे हेही महत्वाचे आहे. या व्यक्ती आपल्यासाठी तसेच संस्थेसाठी प्रेरणादायी आणि वाटाड्या असतात. आपण त्यांच्याकडून शिकलेली आणि अंगीकारलेली मूल्ये, विचार आणि तत्त्वे हीच आपली आणि संस्थेची ओळख असते.
चैतन्य संस्थेच्या उभारणीमध्ये, विकासामध्ये आणि विस्तारामध्ये योगदान देणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींना समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजेच संस्थेची वाटचाल समजून घेणे होय. हे पुस्तक म्हणजे चैतन्य संस्थेची वाटचाल समजून घेण्याच्या प्रक्रियेची सुरुवात आहे. पुढे जाऊन 'चैतन्य' वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून समजून घेण्याच्या प्रयत्नांमधला हा एक भाग आहे.
जीवनात आपल्याला अनेक लोकांकडून प्रेरणा मिळते. त्यांच्याकडून आपण शिकत असतो. माझ्या आणि 'चैतन्य'च्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शशी रेखा राजगोपालन. शशीताईंचे व्यक्तिमत्त्व सर्वांना प्रेरणादायी होते आणि अजुनही आहे. त्यांनी लोकसंस्थांची उभारणी, सहकारी कायद्यात विधायक बदल घडवून आणणे आणि स्वयंसेवी संस्था आत्मनिर्भर होणे या तीन क्षेत्रांत बहुमोल कार्य केले.