पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूर्वतयारी करण्यात आली. त्यानंतरही शशीताईंच्या एपिमास मधल्या साहाय्यकांनी फोन करून बारीकसारीक सूचना आम्हाला दिल्या. खरं पाहता प्रशिक्षणार्थी हे मराठी होते आणि मुख्य प्रशिक्षक हा इंग्रजी व हिंदीतून शिकवणारा होता. त्यामुळे मनात थोडी धाकधूक होतीच.

 प्रशिक्षकाने पूर्वतयारी केली पाहिजे असा शशीताईंचा कटाक्ष असायचा. त्यामुळे प्रशिक्षणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी सर्व प्रशिक्षण सत्राची, असाईनमेंट (पाठ-प्रात्यक्षिके) आणि साहित्य, दिलेल्या यादीनुसार आहे की नाही हे सर्व पडताळून पाहिलं.

 प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात झाली त्यावेळी मात्र प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांच्यातला भाषेतला अडसर कधी दूर झाला हे कळलंच नाही. शशीताईंना मराठी कळत नाही असंही वाटलं नाही पण अल्पशिक्षित प्रशिक्षणार्थीना हिंदी अवघड जातंय असंही वाटलं नाही. शशीताईंनी घेतलेला विषय “स्वयंसाहाय्य गटातील व्यवस्थापन व हिशोब" असा होता. पूर्णत: किचकट व तांत्रिक विषयामध्ये सुध्दा शशीताईंचे प्रत्येक सत्र हे अभ्यासपूर्ण होते. प्रशिक्षणार्थी महिला अल्पशिक्षित होत्या. आमच्यासारख्या वाणिज्य शिकलेल्या विद्यार्थ्यांनाही अवघड वाटणारा हिशोब व हिशोब तपासणी हा विषय त्यांनी अगदी सहजतेनं सोप्या भाषेत समजावून दिला. अकाऊंटिंग आम्हाला खऱ्या अर्थाने त्या दिवशी कळले अशी कबुली द्यायला आम्हाला वावगे वाटत नाही.

 एका प्रशिक्षकाकडे शिकवण्याचे विविध मार्ग असायला हवेत. त्यामध्ये काही भौतिक साहित्याचा वापर प्रसंगानुरूप अवलंबायला हवा. गरजेनुसार तो बदलायला हवा. आपण मांडलेले विषय लोकांना कळलेत का याची चाचपणी घेतली पाहिजे, यावर शशीताईंचा विशेष कटाक्ष असायचा. त्यामुळेच प्रत्येक सत्राच्या शेवटी एक अंताक्षरीची फेरी व्हायची. यात एका शब्दात उत्तरे द्या असा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेतला जायचा. 'फीडबॅक फॉर्म' या संकल्पनेला छेद देत प्रशिक्षणाचा आढावा घेण्याची ही पद्धत फारच प्रभावी होती.

मतांचा आदर

 आपली मतं दुसऱ्यावर न लादता ती सर्वांनुमते मान्य केली गेली पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. आपली मते मांडून त्यांची तोडमोड करून ती सुधारण्याची

४३
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन