पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपयोगी आणि कायम आठवणीत राहणारे आहे. या प्रशिक्षणातील प्रशिक्षण साहाय्यक रश्मी म्हणतात,

 “शशीताई राजगोपालन यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीपूर्वी मी त्यांच्या कार्याबद्दल अनभिज्ञ होते. चैतन्य संस्थेमध्ये नवोदित स्वयंसहाय्य गट संघ पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यायचे आहे आणि या प्रशिक्षणासाठी 'शशीताई राजगोपालन' नावाच्या कोणीतरी प्रशिक्षक येणार आहेत, एवढंच मला माहीत होतं.

 शशीताई आल्या. त्यांच्या पहिल्या भेटीतच मी भारावून गेले. किरकोळ अंगयष्टी, पांढरेशुभ्र बॉयकट असलेले केस, कपाळाला मोठी टिकली, बारीक डिझाईन असलेली कॉटनची कुर्ती, चुडीदार, ओढणी दोन्ही खांद्यांवर व्यवस्थित लावलेली. चेहरा मात्र तेजस्वी, बोलण्यात स्पष्टता आणि ठामपणा. शशीताईंची प्रशिक्षण सहाय्यक म्हणून दोन स्वयंसहाय्य गट संघांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहा दिवस त्यांच्या सहवासात राहण्याचे भाग्य मला मिळाले."

 रश्मीताई पुढे सांगतात, “शशीताई म्हणजे उत्साहाचा मूर्तिमंत झरा. त्यांच्या हालचालींमधली तत्परता, लवचिकता आणि वेग पकडताना खरं तर माझी दमछाकच व्हायची. मग त्या थोडंस रागवायच्या. थोड्या वेळानंतर म्हणायच्या, 'तू कशी काय इतकी शांत राहू शकतेस? तू घरी पण इतकीच शांत असतेस का? मी नाही राहू शकत इतकी शांत.' हे विचारतानाची त्यांची निरागसता मनाला भिडून जायची आणि मग आम्ही दोघीही हसायचो.

 शशीताईंच्या वागण्याबोलण्यात एक तेज होते. जगण्याची स्पष्टता हे त्यांच्या तेजाचे कारण असावे असा माझ्यापुरता मी निष्कर्ष काढला."

 प्रशिक्षक कसा असावा, याचा धडा आम्हाला शशीताईंकडूनच मिळाला. चैतन्य संस्थेनं घेतलेल्या दोन प्रशिक्षण कार्यक्रमाची तयारी एक महिना आधीपासूनच झाली होती. प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर एक महिना आधीच प्रशिक्षण कार्यक्रमाचं वेळापत्रक, प्रशिक्षण साहित्याची यादी, प्रशिक्षणासाठी घेण्यात येणारे असाईनमेंट (पाठ-प्रात्यक्षिके) सर्व प्रात्यक्षिकांची

४२
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन