आनंदाची गोष्ट आहे आणि त्याहून अधिक आनंद म्हणजे शशीताईंची मैत्रीण होण्याचे भाग्य मला लाभले. अजून असं वाटतं की शशीताईंना मी खूप कमी ओळखते. त्यामुळे या पुस्तकाच्या निमित्तानं शशीताई अजून जवळ आल्या आणि अजून उमलत, उमगत गेल्या. या पुस्तकाच्या निमित्तानं झालेला आठवणींचा प्रवास माझ्यासाठी एक अनोखा आनंद देणारा आहे.
शशीताई तिच्या आईची खूप काळजी घेत. त्यांनी स्वतःचं घर केलं तेव्हा आईच्या खोलीतून सर्व दिसेल अशी घराची रचना केली होती. आई घरी एकटी असल्यामुळे, शशीताई कुठलाही कार्यक्रम असला तरी घरी रात्री पोहोचण्याचा प्रयत्न करीत असत.
शशीताईंना त्यांचा शेवट माहीत होता का ? मृत्यूच्या अगोदरच त्यांनी सर्व मित्र परिवाराला एकत्र जेवायला बोलावलं. त्यामध्ये मला पण निमंत्रित केलं होतं. ती त्यांची आणि माझी शेवटची भेट. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची बहीण सविताताई यांची भेट घेतली. शशीताईंची सर्व पुस्तके पाहिली. काही मी स्वतः इकडे आणली आणि असं लक्षात आलं की शेवटी शेवटी कबीर आणि मीरा यांची पण पुस्तकं शशीताई वाचत असत.
शशीताई फार प्रेरणादायी वारसा आपल्यासाठी ठेवून गेलेल्या आहेत. विचारांचा, गुणांचा आणि कृतीचा वारसा. प्रत्यक्षात कृती करून दाखवली आहे. चैतन्यदायी कार्यासाठी, मूल्यांवरचा विश्वास, संस्था बांधणीसाठी आवशयक क्षमता बांधणी आणि त्यांची १८ स्वनियंत्रण पुस्तिकांची मालिका आहे. त्याप्रमाणे स्वयंसहाय्य गटाच्या कार्यकर्त्या आणि प्रतिनिधींनी प्रत्यक्षात काम करणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांचा वारसा नीट जपणं आणि पुढच्या पिढीला तो सोपवणं, ही आपली जबाबदारी आहे.