पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मला वाटते की जगात दोन महत्त्वाच्या व मौल्यवान जागा आहेत. कोणाच्या विचारात असणं ही सर्वात छान जागा आणि कुणाच्या प्रार्थनेत असणं ही सर्वात सुरक्षित जागा. आम्ही तुमच्या विचारात आहोत याचा आनंद आहे आणि आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करतो.

आपली स्नेहांकित

सुधा.

 शशीताईं मला अशा एका काळामध्ये भेटल्या जेव्हा मी आयुष्यात काय करायचं, कसं करायचं, कसं जगायचं, हे ठरवत होते.

 १९८६ साली प्रिया संस्थेतर्फे सिमांतिनी खोत यांनी तेव्हाच्या MCCA (Multipurpose Cooperative and Thrift Cooperative Association) हैदराबाद, येथे एक प्रेरणादायी अभ्यास दौरा आयोजित केला होता. महाराष्ट्रातील विविध संस्थांच्या १७ प्रतिनिधी त्यात सहभागी झाल्या होत्या. त्यात 'चेतना विकास' वर्ध्याच्या सुमनताई बंग, आताच्या 'स्वयम शिक्षा प्रयोगा'च्या संस्थेच्या प्रेमाताई गोपालन, ‘प्रोग्रेसिव फ्रेंड सर्कल, नांदेड' येथून कलावती पाटील आणि मी पण सहभागी होते.

 MCCA संस्थांच्या भेटीमुळे सहकार क्षेत्रातील कामांचे एक प्रारूप पाहता आले. MCCA ने नंतर समाख्या संस्थेच्या स्थापनेस प्रोत्साहन दिले. आज सहविकास/ सी. डी एफ. (Cooperative Development Foundation) म्हणून ओळखली जाते.

 ग्रामीण भागात काम करायचं हे नक्की ठरलं होतं. काय करायचं, कसं करायचं या शोधात मी होते. एकूण माझ्या कॉलेज जीवनात मी असा विचार केला होता की त्यामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी उपचारात्मक कामापेक्षा प्रतिबंधात्मक काम करावे. बाहेरच्या मदतीवर अवलंबून न राहता स्थानिक नेतृत्व विकास व स्थानिक सहयोग हे कामाचे केंद्रबिंदू असावेत. मला असंही वाटत होतं की निर्धाराबरोबरच काम असं असलं पाहिजे की, ते निरंतरपणे स्वतःहून चालू शकेल.

३५
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन