पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८. शशीताई आणि मी

 मी म्हणजे सुधा शारदा कोठारी. चैतन्य संस्था सुरू करणारी एक कार्यकर्ती. शशीताईबरोबर माझी आपुलकी होती. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात त्या कर्करोगाने आजारी होत्या त्यावेळी त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक पत्र लिहिले.

२७ मार्च २०११ रोजी शशीताईंनी त्यांच्या मैत्रिणींना पाठवलेले पत्र -

    माझ्या प्रिय सुधा, श्यामला, जिनी, वसुंधरा, 
    इंदिरा, जयाप्रदा, जमुना, रीना आणि शुभी,

 माझ्यासाठी तुमच्यापैकी प्रत्येक जण एक तत्वनिष्ठ, मूल्यनिष्ठ आणि उच्च नैतिक मापदंड समोर ठेवून काम करणाऱ्या असाधारण महिला आहात. उच्च मूल्यांचे अधिष्ठान हे गुणवत्तापूर्ण कामामध्ये व्यक्त होतं. मला तुमच्या प्रत्येकी बरोबर काम करता आले आणि हा मला विशेष अधिकार मिळाला. सुभी, तुझ्या कामातून मला बरेच काही शिकायला मिळाले. तुमच्या सहवासाच्या आठवणी मी हृदयात जपून ठेवलेल्या आहेत.

 आज मी माझ्या बहिणीकडे जात आहे. अजून काही दिवस फोनला प्रतिसाद देऊ शकेन.

आपली स्नेहांकित आणि कौतुकाने भरलेली,

शशी

 मी त्यांना दिलेले उत्तर -

 माझ्या प्रिय शशीताई,

 तुम्हाला सांगण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. प्रचंड विधायक शक्ती तुमच्या रोमारोमात आहे. तुम्ही मला माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या कालखंडात भेटलात याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श व्यक्ती आहात आणि तुम्ही केलेलं काम माझ्यासाठी खूप प्रेरणादायक आहे, ते कामच माझ्या आयुष्याचा एक ध्यास झाला आहे.

३४
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन