पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. अस्तित्व धोक्यात आलेल्या प्राण्यांचे- पक्ष्यांचे अधिवास जोपासून त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांचे आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या मानवी समुदायाचे हितसंबंध जपणे, इथली हवा, पाणी जमीन आणि सजीव सृष्टी यांच्यातील परस्परसंबंध दृढ करणे यासाठी गुरुकुल प्रयत्नशील आहे. जमिनीची मशागत आणि जंगलांचे पुनरुज्जीवन याचे हे प्रायोगिक अभिरूप आहे. यासाठी त्यांचे बहुविध कार्यक्रम आहेत. स्थानिक स्त्रियांना उद्यानविद्या देणे, त्यांना काम आणि मोबदला देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, जंगलशेती आणि अन्नोत्पादन करणे, निवासी निसर्ग शिबिरे घेऊन निसर्ग संवेदना जागी करणे आणि स्थानिक आदिवासींशी संवाद राखणे. वनशेतीचे उत्पन्न दरवर्षी वाढते आहे. 'गुरुकुल'ची दुध डेअरी आहे, गोबर गॅस आहे. भात आणि मसाल्याचे पदार्थ, फळ, भाजीपाला उत्पादन यामुळे गुरुकुल स्वयंपूर्ण आहे. जंगल पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नामुळे इथे आता दोन हजार विविध जाती-प्रजातींच्या विपुल वनस्पती नांदत आहेत. पक्ष्यांचे गुंजन, कीटकांचा गुंजारव, वाऱ्याचा नाद आणि ओढ्याच्या झुळुझुळीने इथले वातावरण भरलेले आणि भारलेले असते.

 'गुरुकुल' सर्व सृष्टीला, पृथ्वी, तिच्यावरील पर्वत, जंगल, नद्या, जमीन, सागर यांना पवित्र मानते. स्थानिक लोकांच्या पारंपरिक ज्ञानाचा आदर ठेवते. 'इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्व्हेशन ऑफ नेचर' यांच्या जैवविविधतापूर्ण २५ ठिकाणांमध्ये 'गुरुकुल'चा समावेश आहे.

 २५ वर्षांपूर्वी सुप्रभा शेषन या ‘गुरुकुल'मध्ये आल्या. त्या तिथे संचालक असल्या तरी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतात. इथे लहानमोठा असा भेद नाही. संगीताने नादावून जाणाऱ्या सुप्रभा इथल्या निसर्गनादावर लुब्ध आहेत.

 निसर्गप्रणालीऐवजी सुप्रभा ‘जीवसृष्टी समूह' - 'कम्युनिटी' असा शब्द वापरते. “समूहात वाटून घेणे असते, देण्याचे औदार्य असते, उत्साह असतो. लहानथोर असा भेद नसतो. असमानता नसते. इथे आदिवासी आणि अन्य जीवसृष्टीबरोबर जगणं किती आनंदाचे, समृद्ध करणारे असते. असे जगणे जैवविविधतेलाही पोषक असते.

 निसर्गसंगतीत जगण्याची एक वेगळी वाट गुरुकुलात आहे हे नक्की.

सुधा कोठारी आणि चैतन्य

 चैतन्य संस्था २७ वर्षापासून महिला सक्षमीकरणासाठी काम करणारी समाजसेवी संस्था आहे. महिलांना स्वयंसहाय्य गट व त्यांच्या संघामार्फत महिला आपल्या

३१
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन