Jump to content

पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९८१ च्या पूर्वी श्री. नारायण गुरू या अध्यात्म मार्गातील भारतीय गुरूंच्या शिकवणीकडे ते आकर्षिले गेले आणि भारत ही त्यांनी आपली कर्मभूमी केली. त्यांनी केरळी स्त्रीशी लग्न केले. जमीन विकत घेतली आणि १९८१ मध्ये त्यांनी त्या ५५ एकर जागेवर लहान आश्रम सुरू करून वृक्षसंवर्धनाचे काम, खरं तर 'साधना' सुरू केली. या साधकाला आसपासचे लोक स्वामी म्हणू लागले. या साधनेचे फळ म्हणजे 'गुरुकुल वनश्री अभयारण्य'.

 'गुरुकुला'च्या जागेवर या आधी चहाचे मळे होते, ते अर्थातच जंगल तोडून केलेले होते. त्यांनी प्राधान्य दिले ते जंगलाच्या पुनरुज्जीवनाला. पश्चिम घाटातील हजारो प्रकारच्या जाती-प्रजाती त्यांनी इथे लावल्या, आणि जोपासल्या, त्याही बाह्य मदतीशिवाय. अवघ्या १०-१५ वर्षांत तिथे झुडपं, वेली आणि स्थानिक वृक्ष यांची चांगली वाढ झाली. स्थानिक लोक, त्यांची मुले, शालेय मुले यांच्यासाठी निसर्गशिक्षणाची शिबिरेही त्यांनी सुरू केली. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पती वाढवणे, जोपासणे, जंगलाचे संवर्धन, याच्या जोडीला सेंद्रिय भातशेती, मसाल्याचे पदार्थ उत्पादन, पर्यायी ऊर्जानिर्मिती, शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, गोबर गॅस प्रकल्प अशी स्वयंपूर्ण व्यवस्था त्यांनी निर्माण केली. त्यांच्या केरळी पत्नीची त्यांना साथ होती. स्थानिक आदिवासींना मदतीला घ्यायचे, कारण आदिवासींमध्ये जंगलाचे, निसर्गाचे ज्ञान परंपरेने आलेले असते.

 'गुरुकुल' सुरू झाल्यावर काही वर्षांनी सुप्रभा शेषन गुरुकुल परिवारात सामील झाल्या. त्या संचालक पदावर आहेत; पण तिथल्या सर्व उपक्रमांत त्या सहभागी आहेत. बाग आणि उद्यान, रोपवाटिका, वनश्री संवर्धन, निसर्ग शिबिरातून शिकवणे, आसपासच्या आदिवासींशी संवाद आणि मित्रभाव जोपासणे, ‘गुरुकुल'च्या कामात त्यांची मदत घेणे आणि त्यांचा, त्यांच्या ज्ञानाचा आदर ठेवणे हे सर्व काही गेली २५ वर्षे त्या करीत आहेत. 'जंगलातील शाळा' ही कल्पना इथे साकार झाली आहे. रोजच्या सर्व कामांसाठी स्थानिक स्त्रियांची टीम सुप्रभा शेषन यांनी तयार केली. ही टीम पर्जन्य जंगलाची जोपासना करते. झाडे, प्राणी, कीटक, बुरशी, नेचे, सगळे पर्जन्य जंगलचे रहिवासी. या जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी पाणी हवे. जंगले टिकली तर पाणी मिळणार. सजीव सृष्टीतील सर्व घटकांमध्ये प्रेम आणि जीवनाचा उल्हास भरून राहिलेला आहे. गुरुकुल अभयारण्य पश्चिम घाटातील वनस्पतीसृष्टीला वाहिलेले आहे. अशा राखीव पर्जन्य जंगलाच्या शेजारी ५५ एकरांत हे मानवनिर्मित अभयारण्य

३०
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन