पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी २८ वर्षे केलेल्या कामाचा आणि १२ वर्षापेक्षा थोडा अधिक काळ मी सल्लागार म्हणून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मला काही कमाई झाली, मला मनापासून असे वाटते की पैसे खरे तर वन्यजीव; स्त्रिया आणि पुरुष; नैसर्गिक स्त्रोत इ. च्या मालकीची आहे. पण पृथ्वीवर असलेल्या या स्त्रोतांना, त्यांच्या मालकीच्या जागेवरून हटवले जात आहे. माझ्या हाती असलेली मर्यादित रक्कम आणि माझ्या मर्यादा लक्षात घेऊन मला असे वाटते की माझ्या मृत्युपत्रात नमूद केल्यानुसार माझ्या मालकीच्या गोष्टींची विक्री करून ती रक्कम या चार संस्थांकडे जावी. या चारही संस्था अशा चार स्त्रियांनी चालवलेल्या आहेत ज्यांची वित्तीय गोष्टींबाबतची सचोटी आणि प्रामाणिकपणा वादातीत आहे. तसेच त्यांची उच्च बौद्धिक निष्ठा आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात कामाची परिणामकारकता व दिसणारा प्रभाव सर्वश्रुत आहे.

 तरी हे पत्र पाठवण्याचे कारण हेच की तुम्ही चौघींनीही तुमचे १२ ए आणि ८० जी प्रमाणपत्र अद्ययावत आहे की नाही हे तपासून घ्यावे, जेणेकरून गरजेनुसार त्याचा उपयोग होईल.

 माझ्या मृत्युनंतर माझी बहीण सविता गोपाल तुमच्या संपर्कात असेल. तोपर्यंत ही माहिती तुम्ही गोपनीय ठेवाल अशी आशा व्यक्त करते.

धन्यवाद.

शशी राजगोपालन,

प्लॉट न. १०, सकेल, फेज २, कपरो, हैद्राबाद - ५०० ०६२.

 आता आपण चाही व्यक्ती आणि त्यांनी कार्य केलेल्या संस्थांची माहिती घेऊया.

जिनी श्रीवास्तव आणि एकल नारी शक्ती संघटन

 जिनी श्रीवास्तव या कॅनडातील एक महिला भारतात चार दशकांपेक्षा जास्त काळ आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी, निःस्वार्थीपणे काम करत आहेत. खास करून राजस्थानच्या महिलांमध्ये स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची ताकद उभी करत आहेत.

 मानवी आत्मसन्मानासाठी महिलांमध्ये शिक्षण आणि सक्षमता वाढावी, ह्यासाठी राजस्थानमध्ये त्यांनी एकल नारी शक्ती संघटनेची स्थापना केली. पतीच्या अपघाती निधनानंतर २००३ साली जिनी श्रीवास्तव या स्वतः एकल जीवन जगत होत्या.

२८
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन