पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 इतर देशात घेतलेल्या सहभागाबाबत शशीताई लिहितात, "MCA, सी.डी.एफ.चे काम करताना मला युनायटेड किंगडम येथील सहकारी संस्थांचा अभ्यास करण्यासाठी प्लुन्केट फौडेशनतर्फे शिष्यवृत्ती देऊन बोलवण्यात आले. कॅनडाच्या सहकारी युनियनतर्फे भारतातील सहकारी संस्था या विषयाची मांडणी करण्यासाठी मला बोलावले. तसेच वॉशिंग्टनमध्ये व्हिक्टोरिया विद्यापीठ, कॅनडा, आय.आय.एम. बंगळूरू, नाबार्ड अशा विविध संस्थांनी अभ्यासक्रमाची मांडणी करण्यासाठी मला कार्यशाळांमध्ये बोलवले. थायलंड, दक्षिण आफ्रिका, यु.एस.ए., यु.के., पाकिस्तान, नेपाळ, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांतूनही मला निमंत्रित करण्यात आले."

 शशीताईंचे सहकार क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांनी बचत आणि पत सहकारी संस्था उभ्या केल्या, त्या आत्मनिर्भर व स्वावलंबी होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्षम केल्या. या सहकारी संस्था लोकांच्या मालकीच्या असाव्यात, त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप असू नये यासाठीचे को-ओपरेटिव्ह डेव्हलपमेंट फौंडेशन सहविकास (CDF) आणि मुच्युअल एडेड को-ओपरेटिव्ह सोसायटीज (MACS) कायद्याच्या अंमलबजावणीतील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

 त्या २१ वर्षे सहकारी क्षेत्रात कशा टिकल्या, त्याचे श्रेय कोणाला द्याल असे विचारल्यावर त्या म्हणतात, “कदाचित माझ्यामधला ‘माणूस घडवता येतो' या संदर्भात असलेला अहंकार किंवा तुम्ही धमक म्हणा यामुळेच मी इतकी वर्ष यशस्वी काम करू शकले.'

❖❖❖
१७
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन