पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/15

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शकते, सद्यस्थितीत बदल घडवून आणू शकते. म्हणूनच मी २१ वर्ष या क्षेत्रात पूर्ण वेळ काम करू शकले. औद्योगिक क्षेत्रात तुमच्या यशाचे श्रेय तुम्हीच घेऊ शकता. पण सहकारी क्षेत्रात चांगले बदल घडण्यासाठी बरेच लोक जबाबदार असतात. म्हणूनच तुमच्या अपयशाची जबाबदारी सर्वस्वी तुमची असली तरी तुमच्या यशाचे मानकरी तुम्ही एकटे नसता. तुमच्या यशात अनेक लोक सहभागी असतात. जेव्हा मी वारांगल आणि करीमनगरमधल्या ग्रामीण महिला व पुरुषांसाठी काम करत होते तेव्हा आमच्या सहकारी संस्थेमधल्या महिलांची पारदर्शक आणि रास्त मार्गाने काम करण्याची इच्छाशक्ती मला प्रेरित करायची. मला व्यवस्थापन क्षेत्रातील कौशल्य चांगलं अवगत होतं. लोकशाही नियंत्रित व्यवसायांचं नियंत्रण आणि व्यवस्थापनातही पारदर्शकता महत्त्वाची असते. अशी पारदर्शकता जपण्याचे काम करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांनी मला व गटाला ऊर्जा दिली.

 आम्ही सुरू केलेल्या सहकारी संस्था या कायदेशीर आणि टिकावू आहेत ही वस्तुस्थिती मला खूप आनंद देऊन जाते. एकीकडे आम्ही उभ्या केलेल्या संस्थांची बांधणी जशी मजबूत होती तसेच आमची कायदेशीर बाजूसुद्धा मजबूत होती. फक्त आपले म्हणणे मांडणं म्हणजे वकिली असे नाही, तर आपल्याला हव्या असलेल्या तरतुदी आणि धोरणात्मक बदल घडवून आणणे म्हणजे वकिली. अशाप्रकारे योग्य बदल घडवून आणणे यावरच आमचे लक्ष केंद्रित राहिले. समांतर सहकार कायद्याची अनेक राज्यांमध्ये झालेली अंमलबजावणी आमच्यासाठी फारच उत्साहवर्धक होती. सतत कार्यक्षम राहण्यासाठी तुमच्या आजूबाजूला त्याच प्रकारची किंवा तुमच्याहून अधिक क्षमतेची लोक असायला हवीत, नाही तर तुम्हाला आव्हानं मिळत नाहीत आणि लवकरच तुम्ही स्थिरावता.

 सी.डी.एफ. ही छोट्या विश्वस्त मंडळाकडून चालवली जाणारी एक संस्था आहे. तिचे प्रमुख काम आहे, सहकारी संस्थेला पोषक वातावरण तयार करणे ज्यामुळे सोसायट्या विकसित होऊन भरभराटीस चालना मिळेल. व्यावसायिक तत्त्वावर त्या चालतील आणि त्यांच्यावर सभासदांची मालकी आणि नियंत्रण असेल. सभासदांच्या फायद्यासाठीच त्या काम करतील अशा सहकारी संस्था निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे हे सी. डी. एफ. चे काम होते. या संस्थेची तीन प्रमुख कामे म्हणजे :

१५
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन