पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४. स्वयंसेविकेच्या भूमिकेत

 शशीताई १९७० साली, 'सर्विस सिव्हील इंटरनॅशनल (एस.सी.आय.)' या शांततेसाठी कायर्रत असणाऱ्या संस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी झाल्या. या कामाचा त्यांच्या पुढच्या आयुष्यात, विविध मुद्यांवर भूमिका घेण्यासंदर्भात मोठा प्रभाव दिसून येतो.
 शशीताईंनी त्यांच्या स्वयंसेवी कामाची सुरुवात स्वयंसेवक म्हणून केली. त्यांनी स्वत:ची जडणघडण स्वयंसेवक म्हणून करताना रोजंदारीइतकी मजुरी घेऊन स्वत:ची गुजराण केली.

 त्या सांगतात “ह्या सर्विस सिव्हील इंटरनॅशनल संस्थेशी जेव्हा जोडले गेले, त्यावेळेस बहुदा सेवेच्या विचारांनीच मला घेरले होते. मी पूर्ण वेळ स्वयंसेवक म्हणून या समाजासाठी कार्य करतेय. तेव्हा त्यांच्यासारखंच राहायचंय आणि रोजंदारीच्या मिळणाऱ्या मजुरीवरच गुजराण करायची असा माझा विश्वास होता. माझं सगळ्यात पहिलं काम म्हणाल तर दिल्लीमधल्या शाहदरा येथील कुष्ठरोग वस्तीत मी केलेले कार्य आणि त्यानंतर जवळजवळ पुढची पाच वर्ष मी भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संस्थाबरोबर काम करत राहिले. समाजातील वंचित घटकांबरोबर काम करण्यामुळे माझी त्यांच्या आयुष्याबद्दलची समज वाढली. ते माझे शेजारी, सगेसोयरे होते. त्यामुळे त्यांच्यासारख्याच प्रश्नाला मलाही सामोरं जावं लागायचं. अगदी सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या वापरापासून ते वीज आणि पाणी पुरवठा नसतानाही राहणं या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या. हे करताना माझ्या हेही लक्षात आलं की बऱ्याचदा महिन्याच्या अखेरीला मजुरी करणाऱ्या मजुरासारखे, जेवणासाठीसुद्धा पैसे शिल्लक राहायचे नाहीत. साखरेसारखी आपल्या रोजच्या वापरातली वस्तूसुद्धा, तेव्हा चैनीची वाटायची. परिणामतः मी लोकांचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि कोणत्याही परिस्थितीत तग धरून राहणाऱ्या त्यांच्या जीवनशैलीचा आदर करायला शिकले. याचा परिणाम म्हणून मी स्वतःला कोणापेक्षाही वरचढ, किंवा अनाहूत हितचिंतक होण्यापासून थांबवू शकले."

१२
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन