पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कौटुंबिक मूल्यांचा पगडा

 शशीताईंच्या जीवनावर त्यांच्या कुटुंबातील मूल्यांचा पगडा दिसून येतो. शशीताईंनी स्वतः कुटुंबातील मूल्यांविषयी लिहिले आहे.

 त्या लिहितात, “आम्ही लहान असताना कोणाचीही अवास्तव स्तुती केली तर आप्पा रागवायचे. कोणाचे कौतुक करण्यास त्यांची हरकत नसायची, परंतु एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणे त्यांना आवडत नसे. आम्ही शाळेत चमकलो नाही तर आईला खूप वाईट वाटे.

 आम्ही आजोबा (आईचे वडील) आणि माझे वडील यांच्या अवतीभवती फिरत असू. आम्हाला आईवडिलांनी कधी असे सांगितले नाही की, उद्या तुमची लग्नं व्हायची आहेत, त्यामुळे तुम्ही असे वागायला हवे, किंवा असे वागायचे नाही. आम्हाला त्यांचे असे सांगणे असे की 'तुम्हाला एक दिवस तुमच्या पायावर उभे राहायचे आहे,' आणि त्यासाठी स्वत:ची तयारी तुम्ही स्वतःच करायची आहे.'  आप्पा अभिमानाने सांगायचे की, 'त्यांच्या मुली स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. त्यामुळे कोणाला हुंडा देण्याची गरज नाही' आणि झालेही तसेच. त्यांच्या तीनही मुलींची लग्नं अशा व्यक्तींशी झाली, ज्याना हुंडा घेणे योग्य वाटले नाही आणि त्यांच्या मुलानेही तसेच लग्न केले.

 त्यांना खोटे बोलणे नापसंत होते. तुम्ही काही चुकीचे केले, (जसे शाळेला उगीचच दांडी मारली) तर तुम्ही त्याची जबाबदारी स्वीकारायला हवी. त्यासाठी तुम्हाला घरून सुट्टीसाठी पत्र मिळणार नाही. कपड्यांवर आणि चांगले दिसण्यासाठी खर्च करणे या गोष्टी आप्पांना न सुटणाऱ्या कोड्यासारख्या वाटत!"

❖❖❖
११
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन