३. शशीताईंचे बालपण
“बाळाचे पाय पाळण्यात दिसतात," असे म्हणतात. शशीताईंच्या बाबतीत हे म्हणणे खरे आहे. शशीताई या लहानपणापासूनच शिस्तबद्ध, स्वावलंबी, स्वतंत्र, आत्मनिर्भर आणि सडेतोड होत्या. त्यांच्या बालपणीच्या
आठवणी त्यांच्या आप्तस्वकीयानी जपून ठेवलेल्या आहेत.
शशी रेखा राजगोपालन असे त्यांचे पूर्ण नाव. ताईंचा जन्म २१ जुलै १९५१ रोजी तामिळनाडूतील मदुराई येथे झाला. कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी गणित विषयात बी.एस्.सी.ची पदवी घेतली. ताईंना इंग्रजी, हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषा अवगत होत्या. सफेद स्टार्च केलेला युनिफॉर्म, पायात कडक पॉलिश केलेले बूट, अशा वेशात तिला स्वतःला पाहायला आवडायचे. ती शाळेत जाताना कोणाची मदत न घेता शाळेत जायची. शशी प्रत्येक बारीकसारीक गोष्ट लक्षपूर्वक करत असे. स्वावलंबी आणि सडेतोड बोलण्यासाठी ती सर्वांना परिचित होती. शशीताईंच्या बालपणामध्ये रमताना, त्यांच्या काकू, वल्लीताई शेषन (वय ८६) लिहितात. “शशी, माझा नवरा शेषनच्या मोठ्या भावाची मुलगी आहे. आमचे मोठे कुटुंब होते. आमच्या कुटुंबात एकूण सहा भाऊ व तीन बहिणी. त्यांचे कुटुंब पुरोगामी विचारांचे होते. ६० वर्षांपूर्वी शशीताईच्या आजी, सर्व तरुण सुनांना पाळीच्या वेळी बाहेर बसण्याची गरज नाही असे सांगत.' प्रथा बदलण्याबद्दल त्यांचा एवढा आग्रह होता. अशा कुटुंबात शशीताई वाढल्या.
शशीताईंच्या मोठ्या भगिनी सबीताने शशीताईंबद्दल लिहिले होते- “आम्ही दोघी एकसारख्या दिसत असल्यामुळे बऱ्याचदा एकीच्या ऐवजी दुसरी समजली जायचो. आमची अदलाबदल व्हायची. वयाच्या ११ व्या वर्षी ती तर स्वावलंबी झाली होती. बरीच स्टायलिश, देखणी आणि लोकप्रिय. कुटुंबासाठी सर्व खरेदी तीच करे. शाळेत ती खेळांमध्ये कणर्धार होती. ती आंतरशालेय कार्यक्रमांत सहभागी होऊन बक्षिसे मिळवत असे."