पंचतंत्र

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

महिलारोप्य शहरावर राज्य करणार्‍या अमर शक्ति नावाच्या राजास बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती नावाचे तीन पुत्र होते. या तीनही पुत्रांना व्यवहारज्ञान अजिबात नव्हते, त्यामुळे आपल्या पश्चात राज्यकारभार कसा चालेल, याबाबत राजा चिंतीत होता. त्याने आपल्या मंत्रीमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे दवंडी देऊन एखाद्या असामान्य, हुशार गुरूचा शोध करविला. त्या दवंडीला प्रतिसाद म्हणून विष्णु शर्मा नावाचा एक ब्राह्मण राजाच्या दरबारी आला. विष्णु शर्माच्या मते राजपुत्रांना अल्पावधीत व्यवहार कुशल करायचे असेल, तर पारंपारिक ज्ञान उपयोगाचे नव्हते कारण अध्ययनामध्येच किमान १० वर्षे व्यतित झाली असती. म्हणून त्याने पशू, पक्ष्यांच्या मनोरंजक पण बोधपूर्ण गोष्टी सांगून राजपुत्रांना अल्पावधीत हुशार व व्यवहार कुशल बनविण्याचे ठरवले. या गोष्टींनाच पंचतंत्र कथा असे म्हणतात.

पंचतंत्र कथा या मूळ संस्कृत भाषेत आहेत. या कथा पुढीलप्रमाणे पाच तंत्रामधे विभागल्या गेल्या आहेत:

  1. मित्र भेद - मित्रांमधे फाटाफूट
  2. मित्र सम्प्रप्ति - मित्र मिळविणे
  3. काकोलुकीयम - कावळा व घुबड यांच्यासंबंधीचे
  4. लब्धप्राणाशम - मिळविलेले घालवणे
  5. अपरीक्षितकारम - नीट समजून न घेतल्याने होणारे परिणाम

पाच चातुर्यपूर्ण तंत्र किंवा प्रकरणांमुळेच या कथांना पंचतंत्र असे म्हटले जाते. एका कथेतून दुसरी कथा, दुसर्‍या कथेमधून तिसरी कथा अशाप्रकारे कथांची गुंफण पंचतंत्रामधे केलेली आहे.

पंचतंत्र[संपादन]

दक्षिण भारतातील महिला रोप्य शहराचा राजा अमरशक्ति अत्यंत चिंतेत पडला होता. त्याला एक नव्हे तर तीन-तीन पुत्र होते पण तिघेही पुत्र राज्यकारभाराबाबत अत्यंत उदासीन होते. त्यांचा दिवस क्रिडा व मौज मजेत जाई, त्यांना व्यवहार ज्ञान अजिबात नव्हते. एके दिवशी राजाने ही चिंता आपल्या मंत्रीमंडळाजवळ व्यक्त केली.

अजातमृतमूर्खेभ्यो मृताजातौ सुतौ वरम्‌ ।
यतस्तौ स्वल्पदु:खाय यावञ्जीव जडो दहेत्‌ ॥