चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न/चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न

विकिस्रोत कडून

एक

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न



 १. शेतकरी स्त्रीचा आंदोलनातील सहभाग

 १९८० साली शेतकऱ्यांच्या नव्या आंदोलनाला सुरुवात झाली, त्यानंतर सहा वर्षांनी शेतकरी स्त्रियांची सशक्त आघाडी उभी राहिली. अगदी १७६३ पासूनच्या सर्व शेतकरी आंदोलनांत स्त्रियांचा सहभाग होता आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीतही स्त्रियांनी उत्साहाने भाग घेतला होता. पण या नव्या आंदोलनात ग्रामीण भागातील स्त्री अर्थवादी चळवळीसाठी पहिल्यांदाच घराबाहेर आली. यापूर्वी, एक भक्तिमार्गाचा अपवाद सोडला तर, एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी स्त्री घराबाहेर पडलेली नव्हती. १९८० सालच्या शेतकरी आंदोलनात चाकण, खेरवाडी, कसबेसुकेणे, चांदवड, साक्री, देरडे अशा अनेक ठिकाणी पोलिसांनी स्त्रियांना तुरुंगात न नेता सोडून देण्याची तयारी दाखविली. पण स्त्री-सत्याग्रहींनी आपल्याला तुरुंगात जायचेच आहे असा आग्रह धरला. साक्री तालुक्यातील स्त्रियांवर लाठीहल्लाही झाला. निपाणीच्या तंबाखू आंदोलनात पाच ते सात हजार शेतकरी, विडीकामगार, तंबाखू कामगार स्त्रिया हजर होत्या. दिवसभर कारखानावखारीतले काम सांभाळूनसुद्धा कामगारस्त्रियांनी सत्याग्रहाच्या ठिकाणी २३ दिवस हजेरी लावली. २० जुलै १९८४ रोजी महाराष्ट्रातील शेतकरी सत्याग्रहींना चंदीगढ येथे अटक झाली तेव्हा विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या सुटकेसाठी जी निदर्शने झाली ती प्रामुख्याने स्त्रियांच्या सहभागानेच झाली.
 निपाणीच्या गोळीबारानंतर सत्याग्रहातील शेकडो स्त्रीसत्याग्रहींना फक्त नेसत्या वस्त्रांवर शेकडो मैल दूरच्या बल्लारी व गुलबर्गा येथील तुरुंगांत पंधरा पंधरा दिवस नेऊन टाकले. तक्रार तर केली नाहीच उलट "माहेरीसुद्धा आम्हाला एवढा आराम भेटत नाही" असं कौतुक सांगितलं. एका म्हाताऱ्या बाईची दोन मुलं पोलीस गोळीबारात ठार झाली. तिचं सांत्वन करायला जाणाऱ्यांना ती खंबीरपणे उत्तर देई, "संघटनेने आदेश दिला तर मी तिसऱ्या मुलालाही सत्याग्रहाला पाठवायला तयार आहे." स्त्रियांच्या धैर्याच्या अशा अनेक हकीकती आंदोलनात घडल्या.
 अगदी नेहमीच्या दिवसांतसुद्धा एक नवा चमत्कार डोळ्यांसमोर उलगडत होता. एरवीचं चित्र म्हणजे गावातल्या सभांना राजकीय पक्षांचे पुढारी आले की माय-बहिणी दारं बंद करून घरातच थांबायच्या. कुतुहलाने काही काळ कानावर येऊन आदळणारी भाषणे ऐकायच्या. पण त्यात काहीच अर्थ नाही हे लवकरच लक्षात आलं की कानझाक करून आपापल्या कामाला लागायच्या. संघटनेने काय नवी फुंकर घातली! गावागावात निःशंकपणे, निर्भयपणे महिला सभेला येऊन बसू लागल्या. पहिल्यांदा सभेपासून थोडं लांब उभं राहून किंवा बसून ऐकायच्या. नंतर हळूहळू हक्काने पुढे येऊन बरोबरीने बसू लागल्या, भाषणं ऐकू लागल्या. जे कानावर पडतं आहे ते झटकून टाकण्यासारखं नाही, त्यात नाटक नाही, आवेश नाही पण जो अर्थ आहे तो आपल्या गाडग्या- मडक्यात उरलेल्या दाण्यांपर्यंत पोहोचणारा आहे याची साक्ष त्यांना कुठेतरी पटत असावी.
 स्त्रीच्या प्रश्नाची तोंडओळख
 खरं म्हणजे शेतकारी संघटनेने शेतकरी स्त्रियांकरिता असा काहीच वेगळा कार्यक्रम ठेवला नव्हता. ३ जानेवारी १९८२ ला सटाण्याच्या अधिवेशनामध्ये शेतकरी स्त्रियांच्या प्रश्नाची चर्चा वेगळी ठेवली होती. त्या वेळी आंदोलनातील शेतकरी महिलांच्या सहभागाची गरज, त्यांच्यामध्ये या प्रश्नाची जाणीव तयार करायची आवश्यकता म्हणजे थोडक्यात, शेतकरी आंदोलनाची ताकद वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना मायबहिणींनीही हातभार लावायचा यापलीकडे, निदान पुरुष कार्यकर्त्यांच्या मनाततरी, फारशी स्पष्ट जाणीव नसावी. अधिवेशनात त्या स्त्रियांचा उत्साहही 'शेतकरी' या भूमिकेतून होता. स्त्रियांच्या प्रश्नावर यातून काही तोड निघेल असे त्यांनाही वाटले नसावे.
 शेतकऱ्यांतील स्त्रियांचे म्हणून काही वेगळे प्रश्न आहेत काय? ते प्रश्न कसे तयार झाले ? त्या प्रश्नांची सुटका काय? संघटनेतील सभांच्या भाषणांत उल्लेख येत...
 * शेतकऱ्याच्या घरी मुलगी म्हणून जन्माला येण्यासारखं पाप नाही. पायावर उभी राहायला लागते ना लागते तो एखादं धाकटं भावंड सांभाळायची जबाबदारी.  * त्या कोवळ्या वयातही आईनं सांगितलं नाही तरी तिला मदत करायची जरूर असल्याची जाणीव पोरींना कशी होते कोणास ठाऊक?
 * पाच, सहा वर्षांची झाली - ज्या वयात शहरातली मुलं थंडीच्या दिवसात ऊबदार पांघरुणात उशिरापर्यंत शांतपणे झोपून राहतात आणि त्यांना झोपलेले पाहून त्यांचे आई-बाप जोडीने उभे राहून कौतुक करतात त्या वयात ही शेतकऱ्याची पोर आईनं नाहीतर बापानं गोधडीतून उचकटून टाकल्यामुळे डोळे चोळीत चोळीत शेण गोळा करायला धावते.
 * दिवसभर गुरांच्या मागे धाव धाव धावून संध्याकाळी अंग धुळीने भरलेले, केस धुळीने माखलेले आणि हातापायावर काट्याफांद्यांचे ओरखडे अशी पोटाशी पाय घेऊन झोपी पडते.
 * चौदापंधरा वर्षांची व्हायच्या आत लग्न, सासर. लग्नाच्या दिवशी अंगावर फुलं चढतील तीच. त्यानंतर चढायची ती सरणावर चढतानाच. सासरी सगळं गोड असलं तरी कधी हौस नाही, मौज नाही. बाजारात गेली तर दुकानात एखाद्या कपाटांत बरी कापडं दिसली तर तिथं नजर टिकवायची नाही - उगच मनात कधी पुरी होऊ न शकणारी इच्छा उभी राहील या भीतीनं. पण आई म्हणून लहानग्याला अंगडं, टोपडं चढवावं, तीट लावावी, काजळ घालावं, बाळाचं आपण कौतुक करावं, इतरांनी कौतुक करावं, त्याच्या बापानंही करावं एवढी साधी इच्छासुद्धा कधी पुरी व्हायची नाही.
 * आणि जर का सासरचं दूध फाटलं व भावाकडे येऊन तुकडे मोडायला लागले तर मग सगळा आनंदच.
 इत्यादी...
 एककलमी कार्यक्रम
 पण, या अवस्थेत शेतकरी बाई पडलीच कशी? 'उत्तम व्यवहार, शेतीतली लक्ष्मी अशी पायतळी आली कशी? ती या नरकातून सुटणार कशी?
 देशातल्या गरिबीच्या समस्येवर संघटनेने "शेतीमालाला रास्त भाव" हा एककलमी कार्यक्रम सांगितला. देशातील गरिबी एकूण मुळात शेतीतली गरिबी आणि शेतीच्या गरिबीचे कारण शेती तोट्यात राहावी याचे पराकाष्ठेचे नियोजन. 'शेती तोट्यात राहावी म्हणून जे भगीरथ प्रयत्न चालतात ते बंद केले तर गरिबी आपोआप हटेल कारण गरिबी ही विकृती आहे, गरिबी नाहीशी होणे ही निसर्गसिद्ध गोष्ट आहे' असे संघटनेने मांडले. मग शेतकरी बाईची विपन्नावस्था ही विकृती का निसर्गसिद्ध रचना? या एककलमी कार्यक्रमात स्त्रियांच्या प्रश्नाचीही सोडवणूक आहे का?  "शेतमालाच्या रास्त भावाचा फायदा शेतमजुराला मिळतो याबद्दल आमची खात्री आहे पण त्याचा फायदा शेतकऱ्याच्या घरच्या मायबहिणींना मिळेल याबद्दल जबरदस्त शंका आहे. कालचा साधा शेतकरी आज सोसायटीचा चेअरमन, कारखान्याचा चेअरमन झाला, मुंबई-दिल्लीला गाडी-विमानाने फेऱ्या घालू लागला तरी त्याच्या बायकोची डोईवरची भाकरीची टोपली नशिबी कायम ती कायम."
 आणि समजा, रास्त भावाचा फायदा शेतकऱ्याच्या कारभारणीपर्यंत पोहोचला तरी केवळ तेवढ्यानेच तिचे स्त्री म्हणून सगळे प्रश्न सुटतात काय?
 स्त्रियांतही 'इंडिया', 'भारत' ?
 मग एककलमी कार्यक्रमाच्या पलीकडे शेतकरी स्त्रियांसाठी संघटनेचा कार्यक्रम कोणता? का शेतकरी संघटना एकूण शेतकरी समाजाच्या फक्त निम्म्या भागाची म्हणजे पुरुष शेतकऱ्यांचीच संघटना होणार?
 शेतकरी संघटनेने भारत-इंडिया ही संदर्भरेषा मांडली. "भारत" – "इंडिया" म्हणजे खेडे-शहर नाही. संघटनेने खेड्यातील पुढारी शेतकरी आणि त्यांची गोतावळ हे इंडियाचे भारतातील 'रावसाहेब', 'रावबहादूर' म्हणून मानले; शहरातले झोपडपट्टीतील, फूटपाथवरील शोषित ही भारतातून इंडियात आलेली निर्वासित मंडळी म्हटले. शहरातील स्त्रियांची अवस्था काय आहे ? त्याही गुलामगिरीत नाहीत काय? त्यांचेही शोषण होत असेल तर मग त्यांना इंडियात धरायचे का भारतात? भारतातील शेतकरी स्त्रीची इंडियातील पांढरपेशी गुलाम स्त्री "सखी" का "शत्रू" ?
 मूलगामी विचाराची आवश्यकता
 स्त्रियांच्या हलाखीची सुरुवात मनुष्यजातीच्या इतिहासापासून म्हणजे अनादि कालापासून झाली नसेल तर ती झाली तरी केव्हापासून ? आजपर्यंतचा इतिहास हा शेतीच्या शोषणाच्या साधनांतील उत्क्रांतीचा इतिहास आहे. दरोडेखोरांची लुटालूट, लुटारूंनी तयार केलेली राजसत्ता, महसूल, गुलामगिरी, वेठबिगारी, जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था, सावकारी, जमीनदारी, वसाहतवाद - पहिल्यांदा गोरा आणि मग काळा अशा टप्प्यांनी मनुष्यजातीच्या इतिहासाचा आलेख संघटनेने मांडला. यातील कोणत्या टप्प्यात स्त्रीच्या पायात साखळ्या पडल्या आणि तिच्या दुर्दैवाचे फेरे चालू झाले, असे का घडले, कसे घडले याची उत्तरे देण्याची जबाबदारी संघटनेवर आहे.
 शेतकरी संघटना हा एक विचार आहे, एवढेच नव्हे तर ती एक नवी विचारपद्धती आहे असा आग्रह संघटनेने वारंवार धरला आहे. यापूर्वी असा आग्रह धरणाऱ्या मार्क्सवादाने आपल्या दृष्टिकोनातून स्त्रियांच्या प्रश्नाचा इतिहास मांडला. सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळीवर मार्क्सवादाची स्त्री-प्रश्नाची उकल आज कोलमडली आहे. काही काळात कामगार चळवळीला स्त्री- कार्यकर्त्यांचा लाभलेला सहभाग एवढीच त्याची फलश्रुती राहिली. दुसऱ्या महायुद्धानंतर उभ्या राहिलेल्या स्त्री-वादी चळवळीला या प्रश्नाच्या हाताळणीबद्दल स्पष्ट असमाधान होते. या नवीन स्त्री-कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा, झेप दांडगी पण जागरणाचा आवाका कुठे खोलवर पोहोचताना दिसत नाही. त्यात मार्क्सवादी लगबगीने सामील होऊन, मार्क्सवादी सिद्धांताचे अर्धे-मुर्धे समर्थन करून स्त्री-आंदोलनाच्या ताकदीचा प्रभाव आपल्या ताटात पुन्हा ओढून घेण्याची घाई करत आहेत. पण या प्रश्नाविषयी अडाण्यातल्या अडाण्यापासून सुशिक्षित सुसंपन्न स्त्रीपर्यंतच्या स्त्रीच्या मनातील सार्वत्रिक असंतोषाला तोंड फोडण्याची ताकद उभी राहताना दिसत नाही.
 याउलट, संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांच्या साध्या साध्या सभांना हजारोंनी स्त्री-पुरुष जमतात. अगदी छपरांवर गर्दी करून बसतात आणि ऐकतात. कालपर्यंत चार भिंतींच्या आत तोंड उघडायला घाबरणाऱ्या बायाबापड्या लाउडस्पीकरसमोर येऊन जिभेवर साक्षात सरस्वती प्रकटली असावी तसे बोलतात. पंडितांनी दिलेला विचार स्त्री-मुक्तीला अपुरा पडला. आता शेतकरी स्त्री स्वत:च आपला झेंडा आणि विचार घेऊन पुढे येत आहे. संघटनेच्या विचाराने ही दबलेली वाफ बाहेर पडायला मार्ग झाला हे संघटनेचे भाग्य. संघटनेच्या विचाराचा महिलाप्रश्नाशी संबंध महाराष्ट्रातल्या शेतकरी महिलांनी जोडून दाखविला. सामुदायिक विचारमंथनाचा एक अपूर्व प्रयोग गमभन सुद्धा न शिकलेल्या, महाराष्ट्रातील शेतकरी स्त्रियांनी करून दाखविला. म्हाताऱ्या- कोताऱ्यांपासून चिरडीतल्या पोरींपर्यंत, काही शिकलेल्या, काहींच्या घरी पाटी- पेन्सिल अजून आलेली नाही; काही बऱ्या घरच्या, जरा तुकतुकीत शरीराच्या, तर काहींचं पोट हातावर आणि हातापायांवर भेगा पण या सामुदायिक विचारमंथनात सहभाग सगळ्यांचा. संघटनेचा महिलाप्रश्नावरचा विचार आणि 'चांदवडचा जाहीरनामा' याच्या खऱ्या लेखिका या शेकडो शेतकरी आया- बहिणी आहेत.


 २. स्त्रियांची अवस्था


 स्त्री आर्थिकदृष्ट्या परावलंबी आहे, चूल आणि मूल याला बांधली आहे, त्याबाहेर पडली तर ती श्रमाच्या कामात आणखीनच भरडली जाते वगैरे कल्पना वारंवार मांडल्या जातात. पण या शब्दांनी आणि वाक्यांनी स्त्रियांच्या अवस्थेची फार अस्पष्ट जाणीव होते.
 काही दिवसांपूर्वी "नैरोबी" येथे संपूर्ण जगातल्या स्त्रियांच्या संस्थांची एक परिषद झाली. या निमित्ताने काही आकडेवारी दिली गेली. जगाच्या लोकसंख्येच्या ५० टक्के स्त्रिया आहेत. पण त्या एकूण कामाच्या २/३ काम करतात. तरीही कामाच्या एकूण मोबदल्यापैकी फक्त १० टक्के स्त्रियांच्या वाट्याला येतो. म्हणजे १/३ काम करणाऱ्या पुरुषांना ९० टक्के मिळकत. शेतीकडे पाहायचे झाले तर निम्मी जमीन स्त्रिया कसतात. पण स्त्रियांच्या मालकीची अशी जमीन रुपयात पैसासुद्धा नाही.
 जितका देश गरीब तितकी बायकांची परिस्थिती आणखीनच बिकट. भारतासारख्या देशात अनेकांना पोटाला पुरेसे नाही. मग त्यात स्त्रियांच्या वाट्याला आणखी कमी. केवळ पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे रातांधळेपणासारखे रोग जास्त करून मुलींना आणि बायकांनाच झालेले आढळतात. कायमचा मतिमंदपणा यावा इथपर्यंत स्त्रियाचं कुपोषण होते. अगदी साधा आजार झाला तर मुलगा किंवा पुरुष असला तर त्याला इस्पितळात नेण्यात येते. शेतकऱ्याच्या घरच्या बाईला इस्पितळात नेले म्हणजे ते शेवटच्या अवस्थेत. मुंबईतले सरकारी इस्पितळातील आकडेवारी लक्षात घेता, ग्रामीण भागातून भरती झालेल्या फारच थोड्या स्त्रिया वाचविण्याच्या अवस्थेतल्या असतात. हे आकडे आणि अहवाल खूप बोलके आहेत. पण खऱ्या परिस्थितीची दाहकता ही शेतकरी स्त्रियांच्या तोंडूनच ऐकायला पाहिजे. संघटनेच्या वेगवेगळ्या शिबिरांत अनेक महिलांनी आपले अनुभव सांगितले.
 *  पोरगी जन्मली तर आईला धड कोणी विश्रांतीही घेऊ देत नाही. पोरगा जन्मला तर बाईला त्यातले त्यात चांगलंचुंगलं खायला देतात. पोरगी झालेली आई दिवसा-दोन-दिवसांत उठते आणि कामाला लागते. पोरींचा पिंड पक्का म्हणून जगतात.
 * मुलां-मुलींत उजवं डावं फार. जरा काही वेगळं खायला असलं तर पोरग्याला उजव्या हाताने. तूप दुर्मिळ ; पण उजव्या हातानं चमचा पोराच्याच भाकरीवर. अगदी एका भांड्यातलं दही वाढायचं झालं तर वरचं सायीचं दही पोराला आणि खालचं पोरीच्या नशिबी.
 * पोरींना बिचाऱ्यांना आपलं भाग्य लगेच समजतं. त्यांचे भाऊ बाहेर हुंदडायला गेले तरी त्या निमूटपणे आईच्या मदतीला लागतात. आई आजारी पडली तर ७ वीतली मुलगी शाळेतून काढून घरकामाला घरी बसवतात. २१ वर्षाचा तिचा भाऊ धाकट्या बहिणीला मदतसुद्धा करत नाही.
 * पोरींना आयांचा दुःस्वास फार. पोरीची जात. दुसऱ्या घरी जायची, धडपणे जाऊ दे या चिंतेने आयाही जळत राहतात आणि पोरींचं बालपणही करपवून टाकतात.
 * जरा मोठी झाली की शाळा बंदच. १८ वर्षांनंतर लग्न हा केवळ पुस्तकी कायदा. कोणाच्या पदरी जायचं हे मुलींना विचारायची गरजसुद्धा वाटत नाही.
 * लग्नाच्या दिवसाच्या आसपासच भाऊ बहिणींकडून संमती लिहून घेतात आणि तिचा जमिनीचा वाटा हडप करतात. बिचारी माहेरच्यांना लग्नाच्या निमित्ताने आलेला खर्च पाहून दबून गेलेली असते, सही/अंगठा देऊन टाकते.
 * शहरातल्या मुली जाळून घेऊन जीव देतात किंवा जाळून मारल्या जातात त्याचा वर्तमानपत्रात गवगवा होतो, खटले होतात. ग्रामीण भागात घासलेट महाग, पण ज्या आडात "पाय घसरून" पोरी पडल्या नाहीत असा आड दुर्मिळ आणि पडणाऱ्या सर्व बायाच. पुरुष माणसं क्वचितच.
 * सगळं काही ठीक चाललं तरी दारूची ब्याद कधी उपटेल आणि ज्याच्या आधाराने माहेर सोडलं तोच हाणायला, मारायला सुरुवात करील हे सांगणं कठीण. कुठं बोलायची सोय नाही. पुरुष माणूस आपल्याच बायकोला मारतो आहे म्हटलं की मधे कुणी पडतसुद्धा नाही.
 * घरातून काढून लावणं अगदी सोपं. तीनदा 'तलाक' म्हणायचीसुद्धा गरज नाही. बहुतेक वेळा फक्त नेसत्या वस्त्रांवरच बाहेर पडायचं. परतायला दुसरी जागाच नाही, भावा-भावजयीच्याच दारात उभं राहायला पाहिजे.
 * भाऊ मायेचा म्हणून पोटाला तरी भेटतंय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबते तरी चार पैसे गाठीला जमले नाहीत. भावाचं वय झालं, त्याच्या पाठीमागं माझं काय व्हायचं?
 कोणत्याही आकडेवारीपेक्षा हे अनुभव खरं चित्र दाखवून जातात. पिढ्यान् पिढ्या शेतकरी बायांनी आपली दुःखं जात्याला सांगितली-

  "अस्तुरी जलमा नको घालू शिरीहारी
 रान ना दिस परायाना ताबेदारी।"


 विकासातूनही बंधने
 शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्याची जी काही थोडी उदाहरणे उपलब्ध आहेत. तेथेही घरातील स्त्रियांना सुखाचे दिवस आलेले दिसत नाहीत.
 १) पंजाबमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार शेतकऱ्यांच्या हाती पैसा खेळू लागल्यानंतर गावातील दारू पिण्याचे प्रमाण वाढले, अंधार पडल्यानंतर गावात इतके असुरक्षितेचे वातावरण तयार झाले की संध्याकाळनंतर आता बायका, कर्फ्यू असल्याप्रमाणे, घरात बसून राहतात.
 २) पतियाळातील दलित स्त्रीचा अनुभव असा की आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर त्यांची पूर्वीची मजूर म्हणून असलेली स्वायत्तता गेली आणि पुरुषवर्गाने मध्यमवर्गीयांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या स्त्रियांवर नवीन बंधने लादली.
 ३) पंजाबमध्ये आता मध्य प्रदेश व बिहारमधील शेतमजूर कामाला जातात. त्याचे एक कारण, आता तेथील स्त्रियांना घरची मंडळी कामावर जाऊ देत नाहीत.
 ४) संथाळ परगण्यात आदिवासी जमातीतील स्त्रियांना पुष्कळ स्वातंत्र्य असे. वेगवेगळे कारखाने आणि खाणकाम सुरू झाल्यानंतर त्या निमित्ताने आलेल्या बाहेरच्या पुरुषांच्या विकृत दृष्टीमुळे या जमातीत स्त्रियांना पडद्यात ठेवण्याची पद्धत सुरू होते आहे.
 ५) शहरातील मध्यम, अगदी उच्चमध्यम वर्गातील स्त्रियांचाही, आसपासची वाढती असुरक्षितता आणि चौकोनी कुटुंबाची मर्यादा यामुळे, असह्य कोंडमारा होतो.

 महामनुंचे कारस्थान
 स्त्रीची ही कुत्र्यासारखी अवस्था का?
 "स्त्री म्हणजे खोटेपणा, साहस, माया यांचे रूप. लहानपणी बाप, तरुणपणी नवरा, म्हातारपणी मुलगा यांच्यावर स्त्री अवलंबून असावी. स्वतंत्रपणे जगण्याची तिची पात्रताच नाही." असे भलेभले महामनु सांगून गेले. संतांनीही स्त्री म्हणजे पाप, स्वर्गाच्या मार्गातील धोंड, पुरुषाला सन्मार्गापासून दूर नेणारी मायावी शक्ती अशी तिची हेटाळणी केली.
 प्राणिमात्रात श्रेष्ठ जन्म मनुष्याचा. पण मनुष्याचा म्हणजे पुरुषाचा. स्त्री ही वेगळी, कमी प्रतीची. अगदी भगवद्गीतेतही स्त्री, वैश्य आणि शूद्र यांना कृष्णाने एका माळेत गुंफले आहे. अगदी मार्क्सवाद्यांनासुद्धा स्त्री आणि पुरुष यातील फरक महत्त्वाचा वाटतो. या सगळ्यात एक महत्त्वाचा अपवाद म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. युरोपसारख्या पुढारलेल्या खंडातील मोठमोठ्या शास्त्रज्ञांना जी गोष्ट अलीकडे, अलीकडे समजू लागली ती ज्योतिबांनी १८८९ साली स्पष्टपणे सांगितली, "स्त्री आणि पुरुष... या उभयतांमध्ये जास्त श्रेष्ठ स्त्रीच आहे."
 श्रेष्ठतेचा वाद
 या प्रश्नावर खरीखुरी परिस्थिती काय आहे? स्त्री पुरुषापेक्षा निसर्गानेच कमी प्रतीची केली आहे असे गृहीत धरले तरीसुद्धा आज तिला मिळणारी वागणूक ही दुष्टपणाची ठरेल. दैवाने अपंग झालेल्यावर निदान करुणेने दया दाखविली जाते. स्त्री पुरुषाच्या तुलनेने कोणत्याही बाबतीत अपंग असेल तर तिच्याबद्दल विशेष सहानुभूतीने विचार करणे माणुसकीचे झाले असते.
 पण, वस्तुस्थिती याच्या नेमकी उलटीच आहे. ही वस्तुस्थिती स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. अगदी सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या किंवा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या स्त्रिया शेवटी "आपण बायामाणसं, आपण पुरुषांची बरोबरी कशी करणार?" असं सहजपणे बोलून जातात. लहानपणी आईच्या मांडीपासून 'मुलगी ही कमी आहे, मुलगा हा भारी आहे' हे इतक्या प्रकारांनी सुचविले, सांगितले, दाखविले आणि पढविले जाते की त्याबद्दल आता मुलांच्याही मनात शंका येत नाही आणि मुलींच्या तर नाहीच नाही. कधी चुकून एखादी मुलगी थोडे खोडकरपणे किंवा उद्दामपणे वागली तर तिला कायमची आठवण राहील अशी शिक्षा ताबडतोब दिली जाते. एखाद्या मुलाने मनाची जरा ऋजुता दाखविली तर त्याचीही लगेच "बायक्या" म्हणून हेटाळणी होते. यामुळे, हा धडा पक्का गिरविला गेला आहे की बायका म्हणजे पुरुषांपेक्षा कमीच.
 जीवशास्त्रीय संशोधन
 आजपर्यंतचे संशोधन या विषयावर काय सांगते ते पाहू.
 (१) लिंग निश्चितीचे जीवशास्त्रीय सूत्र :
 मुलगे आणि मुली दोन्ही एकाच आईबापांच्या पोटी जन्म घेतात. आईच्या शरीरातील गुणसूत्रां (क्रोमोझोम्स्) च्या २३ जोड्यांपैकी प्रत्येकी एक अशी २३ गुणसूत्रे आणि बापाच्या शरीरातील गुणसूत्रांच्या २३ जोड्यांपैकी प्रत्येकी एक अशी २३ गुणसूत्रे एकत्र येतात. ही दोन्ही मिळून मुलाच्या शरीरातील गुणसूत्राच्या २३ जोड्या तयार होतात. प्रत्येक गुणसूत्राचे काही विशेष काम आहे. काही डोळ्यांचा रंग ठरवितात तर काही केसांचा. माणसाच्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे रूप ही गुणसूत्रे ठरवितात. स्त्रियांच्या शरीरातील गुणसूत्रांच्या २३ जोड्यांपैकी प्रत्येक जोडीतील दोन्ही गुणसूत्रे एकाच प्रकारची असतात. पुरुषांच्या बाबतीतही फारसा फरक नाही. गुणसूत्रांच्या २३ जोड्यांपैकी २२ जोड्यांतील प्रत्येक जोडीतील दोन्ही गुणसूत्रे, स्त्रियांप्रमाणेच, एकाच प्रकारची असतात. म्हणजे २३ पैकी २२ गुणात स्त्री आणि पुरुष यांत काहीच फरक नाही. फक्त स्त्रियांमधील २३व्या जोडीतील गुणसूत्रे (x, X) असतील, तर पुरुषाच्या २३व्या जोडीतील (x, Y) असतात. गर्भबांधणीच्या वेळी स्त्रीच्या प्रत्येक जोडीतील एक आणि पुरुषाच्या प्रत्येक जोडीतील एक गुणसूत्र एकत्र येऊन गर्भपेशीच्या २३ जोड्या तयार होतात. त्यातील २३ वी जोडी बनताना पुरुषाच्या २३व्या जोडीतील X गुणसूत्राची निवड झाली तर स्त्रीलिंगी गर्भपेशी बनते आणि Y गुणसूत्राची निवड झाली तर पुल्लिंगी गर्भपेशी बनते. म्हणजे गर्भाच्या बांधणीकरिता जी ४६ गुणसूत्रे एकत्र येतात त्यापैकी लिंग ठरविण्यासाठी केवळ एकच गुणसूत्र कामाला येते. म्हणजे स्त्री-पुरुषांतील फरक हा जास्तीत जास्त दोन अडीच टक्क्यांचा आहे.
 (२) आधी स्त्री का आधी पुरुष
 मनुष्यजातीत मुख्य काय तो पुरुष, स्त्री म्हणजे त्यापासून वेगळी तयार झालेली, प्रथम पुरुष जन्माला आला आणि मग स्त्री तयार झाली अशा समजुती अनेक धर्मांतील भाकडकथांनी सांगितल्या आहेत. मनुने ईलाला तयार केले किंवा पुरुषाच्या डाव्या बरगडीचे हाड घेऊन ईश्वराने स्त्री तयार केली अश्या अजागळ कथा परंपरेने सांगितल्या जातात. पण वस्तुतः स्त्री ही मूळ मनुष्य आहे. पुरुषत्व देणारे गुणसूत्र Y असल्याशिवाय मानवप्राणी बनू शकतो. परंतु X गुणसूत्राखेरीज मानवप्राणी असूच शकत नाही. गमतीची गोष्ट म्हणजे सर्वच प्राण्यांत असे असते असे नाही. उदाहरणार्थ, पक्ष्यांमध्ये याच्या उलट आहे. नरपक्षी हा एकाच पद्धतीच्या गुणसूत्रांच्या जोड्यांनी बनतो तर मादीमध्ये एका जोडीतील एक गुणसूत्र वेगळ्या पद्धतीचे असते.
 (३) संप्रेरके
 जन्मणारे मूल मुलगा का मुलगी हे गर्भधारणेच्या वेळीच निश्चित होत असले तरी गर्भावस्थेच्या पहिल्या सहा आठवड्यांत दोन्ही गर्भात काहीच फरक नसतो. त्यानंतर लिंगव्यवस्थेतील बदल हळूहळू होऊ लागतात. म्हणजे काय? मानवाच्या शरीरात काही संप्रेरक द्राव (हार्मोन्स) तयार होत असतात. त्यांचे दोन प्रकार असतात. एक पुंसंप्रेरके (मेल हार्मोन्स) आणि दुसरा स्त्रीसंप्रेरके (फीमेल हार्मोन्स) ही दोन्ही प्रकारची संप्रेरके स्त्री व पुरुष दोघांच्याही शरीरांत तयार होत असतात. फक्त पुरुषांच्या शरीरात तयार होणाऱ्या पुं-संप्रेरकांचे प्रमाण स्त्री-संप्रेरकांपेक्षा जास्त तर स्त्रीच्या शरीरात तयार होणाऱ्या स्त्री-संप्रेरकांचे प्रमाण पुं-संप्रेरकांपेक्षा जास्त इतकाच फरक. म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यातील फरक परत टक्केवारीचाच आहे.
 हा विषय तसा शास्त्रीय आणि गुंतागुंतीचा आहे. पण एवढी माहिती आणखी लक्षात ठेवायला हवी की उत्क्रांतीच्या प्रवाहात मनुष्य प्राणी हा काही त्याच्या शरीरातील रसायनांचा गुलाम राहत नाही. शरीरातील संप्रेरके बदलली की माकडाची वर्तणूक आपोआप बदलते. तसे मनुष्यप्राण्याचे होत नाही. समाजात वावरणारे स्त्री-पुरुष हे संप्रेरकांच्या प्रेरणांवर आवश्यकतेनुसार मातही करू शकतात. म्हणजे थोडक्यात, जीवशास्त्राने स्त्री-पुरुषांत केलेला फरक हा किरकोळ आहे.
 आकारमानातील फरक
 स्त्री ही अबला आहे, कमकुवत आहे; पुरुष हा सशक्त आहे, स्त्रीरूपी वेलीला पुरुषरूपी वृक्षाची गरज आहे असा समजही सार्वत्रिक आहे. स्त्रिया आणि पुरुष यांच्या उंचीत आणि आकारमानात फरक असतो. १९व्या वर्षी सुखवस्तू घरातील मुलामुलींच्या उंचीत १२ सें.मी. चा तर वजनात ७ किलोचा फरक आपल्या देशातील एका पाहणीत १९७२ साली आढळला. अगदीच जन्मताही मुली त्यांच्या भावांपेक्षा उंचीने थोड्या कमी असतात. त्यानंतर, वयात येण्याच्या आधी काही काळ त्या मुलग्यांच्या तुलनेने जास्त उंच होतात. पंधरा वर्षांच्या वयानंतर मुले उंचीच्या बाबतीत पुन्हा पुढे सरकतात. एक गंमत अशी की आजही काही भटक्या जमातीत स्त्रिया उंचीने आणि आकारमानाने त्याच जमातीतील पुरुषांपेक्षा वरचढ असतात. सर्वसाधारपणे, आदिवासी टोळ्यांतील स्त्री-पुरुषांच्या आकारमानात तफावत खूपच कमी आढळते. याउलट, नागरी संस्कृतीत ही तफावत सर्वात जास्त आढळते. एक तर्क असाही मांडला जातो की इतिहासाच्या एका काळात वन्य पशुंच्या टोळीतल्याप्रमाणे दांडगट पुरुष आपला हक्क प्राधान्याने बजावून घेत असल्यामुळे लहान आकामानांच्या पुरुषांची संतती संख्येने कमी राहिली. परिणामतः पुरुषसंततीचं आकारमान स्त्रियांच्या तुलनेने वाढते राहिले. वेगवेगळ्या कारणांमुळे स्त्रियाच आपल्यापेक्षा आकारमानाने वरचढ जोडीदार पसंत करीत असल्यामुळे आकारमानातील पुरुषांचे श्रेष्ठत्व आजही टिकून आहे. पण, यदाकदाचित एखाद्या समाजातील तमाम स्त्रियांनी आपल्यापेक्षा लहान आकारमानाचे जोडीदार स्वीकाराचे ठरविले आणि तो निर्णय अंमलात आणता आला तर दोनअडीचशे वर्षांच्या कालावधीत पुरुषांचे आकारमान स्त्रियांपेक्षा लहानखोर होऊन जाईल.
 आकारमानाचा संबंध प्रत्यक्षात लिंगभेदापेक्षा पोषणाच्या सकसतेवर अवलंबून दिसतो. उदाहरणार्थ, वर उल्लेख केलेल्या १९७२ सालच्या अभ्यासात अत्यंत गरीब वर्गातील मुलांची आणि मुलींची सरसरी उंची वयाच्या चौथ्या वर्षी अनुक्रमे ९३.६ आणि ९३.१ सेंमी होती. अत्यंत संपन्न गटात हेच प्रमाण १००.५ आणि ९८.९ सेंमी होते. थोडक्यात, संपन्न गटातील मुली विपन्न गटातील मुलांपेक्षा चांगल्या ५ सेंमी ने अधिक उंच होत्या. अश्याच तऱ्हेची प्रवृत्ती वजनाच्या बाबतीतही दिसते. पण वयात आल्यानंतर संपन्न गटातील मुली उंचीने आणि वजनाने गरीब गटातील मुलांच्या तुलनेने मोठ्या असल्या तरी संपन्न गटातील मुलांपेक्षा आकारमानाने लहानच राहिल्या.
 शारीरिक सामर्थ्य
 पुरुषाचे हृदय आणि फुफ्फुसे आकाराने जास्त मोठी असतात. त्यामुळे, सर्वसाधारण पुरुषाची कार्यशक्ती ही सर्वसाधारण स्त्रीच्या तुलनेने जास्त असते. पण याचा अर्थ सर्व पुरुषांची कार्यशक्ती सर्व स्त्रियांच्या कार्यशक्तीपेक्षा उजवी असते असे नाही. कित्येक स्त्रिया या बाबतीत बहुतेक पुरुषांना वरचढ असतात. १९८२ साली दिल्लीत झालेल्या एशियाड क्रीडा स्पर्धेतील पुरुषांचे उच्चांक ऑलिंपिक स्पर्धेतील स्त्रियांच्या उच्चांकापेक्षा कमी प्रतीचेच होते. स्त्रिया क्रीडा क्षेत्रात येऊन फार थोडी वर्षे झाली तरी ही स्थिती आहे. आणखी काही कालानंतर स्त्रिया क्रीडाक्षेत्रातही पुरुषांच्या फारश्या मागे राहणार नाहीत.
 ताकद आणि कार्यशक्ती याबाबत पुरुषांना जो काही लाभ निसर्गाकडून मिळाला असेल तो असो. पण याउलट, भूक सहन करणे, सोशिकता, चिकाटी, रोगाची प्रतिकारशक्ती, शांतपणा या अनेक गुणांत स्त्रिया सरस भरतात. परिणामतः, ससा आणि कासवाच्या शर्यतीच्या गोष्टीप्रमाणे आयुष्याची शर्यत जिंकण्यात स्त्रियाच यशस्वी होतात. अगदी गर्भावस्थेपासून पुरुष-गर्भ हा नाजूक असतो. एका अभ्यासानुसार, गर्भधारणेच्या वेळी मुली व मुलगे यांचे प्रमाण १००:१२४ असे असते. वेगवेगळ्या कारणांनी गर्भावस्थेत आणि जन्मानंतर मुलांचे मृत्यूचे प्रमाण जास्त राहाते आणि त्यामुळे ३५व्या वर्षांपर्यंत स्त्रिया आणि पुरुष यांची संख्या समसमान होते. ७० वर्षांपर्यंत जगण्याची शक्यता स्त्रियांच्याबाबतीत ७५ टक्के आहे तर पुरुषांच्या बाबतीत ती ५७ टक्के आहे.
 मातृत्व - वरदान आणि शापही
 निसर्गाने स्त्रीवर टाकलेल्या मातृत्वाच्या जबाबदारीमुळे तर स्त्री ही वंशसातत्याच्या दृष्टीने श्रेष्ठच राहते. कोणत्याही पशुपालनात मादीचे महत्त्व अधिक असते हे उघडच आहे. निसर्गाच्या या देणगीमुळे स्त्री काहीशी अडचणीतही सापडते. मासिक पाळी, गर्भारपण, बाळंतपण, मुलांची जोपासना या अवस्थांत तिची हालचाल मंदावते आणि स्वसंरक्षणाची शक्ती मर्यादित होते. साहजिकच, या काळात निवारा आणि संरक्षण यांची तिला विशेष आवश्यकता असते.
 बौद्धिक ताकद
 शारीरिक सामर्थ्याबाबत जी गोष्ट तीच मेंदूच्या कामाबाबत म्हणजे बुद्धीबाबत. शारीरिक वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांत मुली मुलांपेक्षा वरचढ ठरतात. असामान्य बुद्धिमत्तेमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त, पण त्याबरोबर अतिमंद बुद्धीतही स्त्रियांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त. सर्वसाधारणपणे, स्त्रिया बुद्धिमत्तेच्या सरासरी पातळीच्या जवळपास राहतात. याचाच अर्थ असा की बहुसंख्य स्त्रिया या अर्ध्याअधिक पुरुषांपेक्षा बुद्धिमत्तेने श्रेष्ठ असतात. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आजपर्यंत सर्वोच्च बुद्धिनिर्देशांक नोंदवलेल्या दोनही व्यक्ती मुली होत्या.
 बालपणात अगदी आरंभीच्या काळात शब्दाने अर्थ व्यक्त करण्याची प्रतिभा मुली सहज संपादन करतात. मुलांना हे सहसा जमत नाही. पण एक दोन वर्षांच्या अवधीनंतर मुलांना मूर्त स्वरूपातील वस्तू हाताळण्याचे कौशल्य चांगले जमून जाते. हे मितिज्ञान संपादन करण्याच्या भानगडीत मुली फारशा पडत नाहीत कारण शब्दप्रतिभेने त्यांच्या सर्व गरजा पुऱ्या होत असतात. कोणत्याही कारणाने का होईना, काही प्रमाणात मुले मितिज्ञानात उजवी, तर मुली शब्दसामर्थ्यात उजव्या ठरू शकतात. घरची किंवा समाजातील परिस्थिती संपन्न असली तर मितिज्ञानातील ही तफावत कमी होते. याउलट, हिंदुस्थानसारख्या दरिद्री देशात मितिज्ञानाच्या बाबतीत मुली विशेष मागासलेल्या असतात. पोषण आणि शिक्षण यांनी भरून काढण्यासारखी ही त्रुटी आहे.
 हिंसाचार
 एका क्षेत्रात मात्र पुरुषांची बरोबरी करण्याचे स्त्रियांनी फारसे प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत. प्रत्येक देशाच्या इतिहासामध्ये समरागंणावर शौर्य गाजविलेल्या अनेक रणरागिणींची नावे नोंदली गेली आहेत पण तरीही हालचालींमधील चपलता, कार्यशक्ती, आक्रमकता आणि एक प्रकारची बेफिकीरी यामुळे हाणामारी आणि हिंसाचाराच्या कामात पुरुष जास्त सुलभतेने भाग घेऊ शकतात. स्त्रिया याबाबतीत, विशेषतः प्रजननाच्या जबाबदारीच्या काळात, मागे पडतात. एवढेच नव्हे तर, या काळात मागे म्हटल्याप्रमाणे, त्यांना निवारा आणि संरक्षण यांची गरज असल्यामुळे पुरुषांवर अवलंबून राहणे, विशेषतः धामधुमीच्या काळात त्यांना आवश्यक वाटते.
 ३. स्त्रीचे समाजातील दुय्यम स्थान
 निसर्गाची योजना पाहिली तर स्त्रियांना आजची हलाखीची स्थिती प्राप्त होण्याचे काहीच कारण दिसत नाही. पुरुषांत आणि स्त्रियांत शेवटी फरक दिसले कोणते?
 (१) स्त्रियांवर गर्भधारणा आणि नव्या पिढीला जन्म देणे व तिची जोपासना करणे या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या अनुषंगाने तिची शारीरिक आणि मानसिक रचना आहे. आक्रमकता, हिंसाचार यात ती सहज भाग घेत नाही. पण प्रसंगी स्वत: झीज सोसूनही गर्भाची जोपासना करणे, काटकपणा, सोशिकता, धीरगंभीरता, ममता हे गुण स्त्रियांमध्ये सहजपणे आढळतात.
 (२) स्त्रियांमध्ये शाब्दिक अभिव्यक्तीचे सामर्थ्य आहे तर पुरुषांच्या तुलनेने मितिज्ञान काही प्रमाणात कमी पडते.
 (३) मुली वयात लवकर येतात त्यामुळे त्यांच्या जोडीदाराशी त्यांचे संबंध सहजपणे असमानतेचे असतात. याच कारणाने मुलींना शिक्षणासाठी अवधी थोडा कमी मिळतो. उंची, आकारमान आणि शारीरिक सामर्थ्य यात त्यांचे कमीपण ही वस्तुतः गंभीर बाब नाही. (ॲम्बॅसेडर गाडी आणि फियाटगाडी यांची तुलना केली तर आकाराने मोठी, जास्त धावू शकणारी, म्हणजे ॲम्बॅसेडर गाडीच जास्त श्रेष्ठ असे म्हणता येणार नाही. या उलट लहान आकाराची, जास्त टिकणारी, कमी पेट्रोल खाणारी अशी फियाट गाडी अनेकांना पसंत असते.) थोडक्यात, जीवशास्त्रीय कारणासाठी स्त्रीला आजची अवस्था प्राप्त होण्याचे काहीही कारण नाही.
 निसर्गाने स्त्री-पुरुषांची योजना ही एकमेकांशी संघर्ष करण्यासाठी किंवा एकमेकांवर मात करण्यासाठी केली असावी हेही शक्य नाही. निसर्गामध्ये कोणत्याही योनीत अशा संघर्षाची योजना दिसत नाही. प्रजनन हा निसर्गाचा प्रधान हेतू सर्वत्र दिसतो. स्त्री-पुरुष तत्त्वे एकत्र यावीत आणि त्यातून निर्मिती व्हावी यासाठी निसर्ग अद्भुत वाटावा असा खटाटोप सातत्याने चालवत असतो. मनुष्यजात नष्टच व्हावी अशी निसर्गाची योजना नसेल तर स्त्री-पुरुष निसर्गाने परस्पर पूरक म्हणूनच योजले असले पाहिजेत. १८८२ साली ताराबाई शिंदे यांनी त्यांच्या 'स्त्री-पुरुष तुलना' या प्रसिद्ध पुस्तिकेत म्हटल्याप्रमाणे
 "ईश्वराने हा जोडा स्वेच्छेनेच नेमिला आहे. पाहा, पक्ष्यांपासून तो निर्जीव झाडाझुडपांतदेखील त्याने स्त्रीजाती निर्माण केलेली आहेच. प्रत्येक गोष्टीला, जिनसेला, दुसरा त्याच जोडीचा मुकाबला असतो. त्यावाचून शोभा येतच नाही."
 भूमिकेतील फेरफार
 मग पुन्हा प्रश्न शिल्लक राहतो तो हा की स्त्रीपुरुषांचे समाजातील परस्पर संबंध ठरतात तरी कोणत्या कारणाने ?
 (१) काही जीवशास्त्रीय बदल घडले तर स्त्रिया व पुरुष यांचे समाजातील परस्पर स्थान बदलल्याखेरीज राहणार नाही. अगदी विज्ञानकथांच्या जगात जायचे तर माणसांच्या पिलांचा जन्म हा स्त्रीला गर्भभार वाहावा न लागता होऊ शकला तर स्त्रियांच्या परिस्थितीत केवढा तरी फरक पडेल. अल्डस हॅक्सले याच्या 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड' मध्ये अशा समाजाचे तपशीलाने वर्णन केले आहे. पाळीपाळीने गर्भधारणाची जबाबदारी पुरुषांवर येत असती तरी समाजाचे चित्र वेगळे दिसले असते.
 (२) इतके आमूलाग्र बदल सोडून दिले तरी काही छोट्या बदलांनीसुद्धा स्त्रियांची परिस्थिती बदलू शकते. उदाहरणार्थ, स्त्रीपुरुष हे केवळ गर्भधारणेकरिता एकत्र येत नाहीत. चतुष्पाद प्राण्यांप्रमाणे मादीची शारीरिक तयारी स्त्रीपुरुषांना एकत्र येण्याकरिता आवश्यक नाही. त्यांची कामभावना सर्व ऋतुंत जागी असते. प्राण्यांप्रमाणेच स्त्री-पुरुषांची कामवासना काही ऋतुतच जागृत होत असती तरी समाजाची रचना अगदी वेगळी झाली असती. दोन ऋतुंमधील काळात स्त्री पुरुष एकत्र संसारात राहणे असंभव झाले असते.
 (३) मानवजातीत स्त्रीपुरुषांच्या शारीरिक ठेवणींमुळे लैंगिक बळजबरीचा प्रयोग होऊ शकतो. बलात्काराची शक्यता व धोका आणि त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम लक्षात घेऊन समाजातील अनेक रचना तयार झाल्या आहेत.
 (४) गर्भधारणेवर इतिहासाच्या बहुतेक काळात स्त्रियांचे काहीच नियंत्रण राहिलेले नाही. कुटुंबनियोजनाची तांत्रिक शक्यता आणि हे तंत्र व्यवहारात वापरण्याची संभाव्यता जितकी वाढेल तितकी स्त्री स्वत:च्या भवितव्याची स्वामिनी बनू शकेल.
 (५) निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या आदिवासी स्त्रिया आणि त्यांची सहजसुलभ प्रसूती याबद्दल पुष्कळ लिहिले गेले आहे. पण बाळंतपणे, विशेषतः पहिली बाळंतपणे परवापरवापर्यंत जीवावरची दुखणीच होती. प्रसूती ही अगदी अलीकडे आधुनिक वैद्यकाच्या सोयी सवलती उपलब्ध असलेल्या थोड्या भाग्यवंतांकरिता सुलभ झालेली आहे. या सोयीसवलती जितक्या दूरवर आणि सर्वसामान्य स्त्रीला उपलब्ध होतील, त्या प्रमाणात बाळंतपण आणि गर्भारपण हे दोन्ही कसोटीचे काळ स्त्रियांच्या दृष्टीने कमी कठीण होतील.
 (६) अगदी निर्बुद्ध म्हटल्या जाणाऱ्या म्हशीची रेडकेसुद्धा जन्मत:च चारही पायांवर बागडण्याइतकी बुद्धी घेऊन जन्मतात. बुद्धिमान माणसांची पोरे जन्माच्या वेळी निव्वळ गोळे, त्यांना पायावर उभे करण्यातच वर्ष निघून जाते. चालते- बोलते करेपर्यंत काही वर्षे आणि व्यावहारिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे करीपर्यंत आई-वडिलांचे निम्मे आयुष्य निघून जाते. मुलांच्या जोपासनेचा हा काळ अनेक दृष्टींनी निर्णायक महत्त्वाचा आहे.
 (७) युद्धासारख्या एखाद्या कारणाने स्त्रीपुरुषांचे समाजातील समसमान प्रमाण बिघडले तर त्यामुळे सर्व समाजातील आर्थिक, सामाजिक, अगदी नैतिक घडीसुद्धा बिघडून जाईल. उदाहरणार्थ, पुरुषांचे प्रमाण बदलले तर त्यांचे स्थान अजून उंचावेल.
 कामजीवनातील बदल
 मनुष्यप्राण्याचे कामजीवन म्हणजे अगदी जगाच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत जसेच्या तसे राहाते असे नाही. बदल ही एकच गोष्ट कायम आहे. स्त्री असणे किंवा पुरुष असणे हा संप्रेरकांच्या टक्केवारीचा प्रश्न आहे असे एकदा मान्य केले की या टक्केवारीचे परस्परप्रमाण इतिहासात सदासर्वकाळ तेच ते राहिले असे समजण्यास काही कारण नाही. वन्यपशुंशी दररोज सामना पडणाऱ्या शिकाऱ्याच्या शरीरातील पुरुष संप्रेरांचे प्रमाण, सकाळी १० ते ५ कचेरीत खर्डेघाशी करणाऱ्या त्याच्या वंशजांशी जुळण्याचे काहीच कारण नाही. हिंसाचाराच्या दडपणाखाली दररोज जगणाऱ्या प्राचीन महिलेच्या आणि आधुनिक पुरंध्रीच्या शरीरातील संप्रेरके एकच असणे संभव नाही. किंबहुना, मानववंशाचा इतिहास हा स्त्रियांच्या वाढत्या पुरुषीकरणाचा आणि पुरुषांच्या वाढत्या स्त्रीकरणाचा इतिहास आहे असेही काहीजण मानतात. कदाचित इतिहासाची गती स्त्री-पुरुषांच्या समानतेच्या दिशेनेच असेल असे नाही. चक्रनेमिक्रमाने स्त्री-पुरुष काही काळात एकमेकांपासून प्रवृत्तीने विभक्त होत जातात आणि परत काही काळानंतर प्रवृत्तीने एकमेकांच्या जवळ येतात असेही मानता येईल. अर्धनारीनटेश्वर आळीपाळीने दोन्ही प्रवृत्तींचे धृवीकरण आणि विलीनीकरण करतो असेही मानता येईल. बदलाचे स्वरूप काही असो, बदल होत राहतो हे निश्चित.
 कालपरिस्थितीनुसार वेगवेगळ्या वंशांत, राष्ट्रांत कामजीवनाचाही आविष्कार वेगवेगळ्या तऱ्हेने होतो. आग्नेय आशियातील समाजसंस्थांविषयी आणि तेथील स्त्रियांविषयी "सॉमरसेट मॉम"ने केलेले लिखाण या दृष्टीने अभ्यासनीय आहे. अगदी स्त्री स्त्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींतही हे प्रमाण सारखे नसते आणि एकत्र काम करणाऱ्या दोन भावांतही.
 या वेगवेगळ्या जीवशास्त्रीय किंवा जीवशास्त्रांशी संबंधित घटकांपेक्षाही समाज-अर्थशास्त्रीय घटक हे जास्त निर्णायक महत्त्वाचे ठरतात. जीवसृष्टीतील खालच्या पायरीत शरीररचना आणि भोवतालची परिस्थितीच प्राण्याचे भवितव्य बहुतांशी ठरवते. मनुष्यासारख्या उत्क्रांत योनीत आनुवंशिक उपलब्धींपेक्षा जन्मानंतरची परिस्थिती आणि प्रयत्न यांचा परिणाम अनेक पटींनी जास्त मोठा.
 श्रमविभागणी
 समाजातील कामांची श्रमविभागणी कशी होते? आजपर्यंतच्या बहुतेक समाजातील स्त्री आणि पुरुष यांच्यामधील श्रमविभागणी ही व्यक्तीव्यक्तींच्या गुणवत्तेनुसार न होता ठोकळेबाजपणे, लिंगभेदाच्या आधारे झाली. स्त्री- पुरुषांत मूलतः फरक थोडा. जे गुण पुरुषाचे म्हणून मानले जातात त्या गुणांतही अनेक स्त्रिया बहुतेक पुरुषांना वरचढ असतात. हे लक्षात घेऊनही सरसकट सर्व स्त्रियांची एकाच प्रकारच्या कामावर योजना करण्याची अशास्त्रीय, अकार्यक्षम पद्धती बहुतेक समाजांनी अवलंबली आहे. अनेक गबाळ पुरुष जबाबदारीच्या जागेवर जातात आणि कर्तबगार स्त्रिया आयुष्यात कधीतरी येणाऱ्या बाळंपणाच्या कारणाने 'चूल व मूल' यात अडकून जातात. ही परिस्थिती आजपर्यंतच्या अजागळ समाजाला परवडली, उद्याच्या वैज्ञानिक समाजाला न परवडणारी आहे.
 समाजात वापरली जाणारी उत्पादनाची साधने कोणत्या प्रकारची? ती हाताळण्याला शारीरिक ताकदीचा कितपत उपयोग? आर्थिक प्रगती कितपत झालेली? समाजातील सर्वसाधारण पोषणाची पातळी काय? राहणीमानाचा दर्जा काय? आणि समाजातील सर्वसाधारण व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या कक्षांची लांबी, रुंदी काय? यावरूनही स्त्रीचे समाजातील स्थान ठरू शकेल. प्रत्येक स्त्रीचे स्थान तिचे व्यक्तिगत गुण आणि आवडीनिवडीनुसार ठरले तर अन्यायाला आणि तक्रारींना वाव राहणारच नाही. सरसकट सर्व स्त्रियांना लागू होणारा नियम त्यांच्यावर अन्याय करणाराच ठरेल.


 ४. स्त्री चळवळीची विविध रूपे
 पाश्चिमात्य देशांतील स्त्रियांची चळवळ ही प्रामुख्याने स्त्रियांनीच उभी केली. अमेरिकेतील गुलामगिरीच्या विरोधातील आंदोलन उभे करण्यात स्त्रियांचा फार मोठा सहभाग होता. १९२० साली स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा याकरिता अमेरिकेत एक व्यापक आंदोलन झाले. इंग्लंडसारख्या लोकशाहीच्या माहेरघरात मतांचा हक्क मागणाऱ्या स्त्रियांवर पोलिसांनी लाठ्याही चालविल्या होत्या. आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या या देशांत, जेथे सर्व स्त्रिया किमान साक्षरतरी होत्या अशा देशांत ही स्थिती.
 भारतातील करुणावाद
 गेल्या शतकाच्या शेवटाला आपल्या देशात इंग्रजांचा अंमल स्थिर झाला. त्या वेळी देशातील यच्चयावत् स्त्रियांची स्थिती जितकी हलाखीची आणि करुणास्पद होती तितकी ती इतर कोठे वा कधी झाली नसेल. बाकी कोणाला असो नसो, स्त्रियांना मात्र इंग्रजी राज्य हे ईश्वराचे परम वरदान ठरले. आजही शरीयतसारख्या प्रश्नावर जी खळखळ माजते ती पाहता, इंग्रजी अमलात एका मागोमाग एक झपाट्याने झालेले कायदे पाहिले तर कौतुक वाटल्याखेरीज राहत नाही. १८२९ मध्ये सती-बंदीचा कायदा झाला आणि विधवांना सक्तीने जाळण्याला बंदी घातली गेली. १८५६ साली हिंदू विधवांच्या पुनर्विवाहासाठी आवश्यक तो कायदा अमलात आला. १८७२ साली घटस्फोटाची तरतूद करण्यात आली. १९२९ साली 'शारदा' कायदा मंजूर होऊन बालविवाह हा गुन्हा ठरविण्यात आला.
 या सर्व काळात राजा राममोहन रॉय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळराव आगरकर, हरविलास सारडा, बाबा पदमनजी अश्या मंडळींनी स्त्रियांचे प्रश्न पुढे मांडले. पण स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याकरिता एका मागोमाग एक कायदे होत गेले तसतसे नवनवीन प्रश्नही समोर येऊ लागले किंवा जुन्या प्रश्नांचे स्वरूप नव्या गंभीरतेने पुढे येऊ लागले. १९४६ साली द्विभार्याप्रतिबंधक कायदा झाला. स्वातंत्र्यानंतरही विवाहाची नोंदणी, हुंडाप्रतिबंध, हिंदू वारसा कायदा आणि हिंदू कोड बिलाच्या संबंधाने अनेक कायदेशीर तरतुदी कायद्याच्या पुस्तकात तयार झाल्या. घटनेने स्त्रियांना समान हक्क दिले. देशाच्या पंतप्रधानपदीसुद्धा एक स्त्री विराजमान झाली. पण व्यवहारात सर्वसामान्य स्त्रीच्या दृष्टीने फरक काहीच न पडल्यासारखा आहे. विधवा आता सती सर्रास जात नाहीत पण अजूनही सतीच्या घटना वर्तमानपत्रात अधूनमधून ऐकू येतात आणि सतीच्या स्थळी हजारो, लाखो लोक भक्तिभावाने जमतात. बालविवाहाचा कायदा होऊन ६० वर्षे झाली पण अजूनही ग्रामीण भागातील जवळजवळ सर्व लग्ने हा कायदा मोडून होतात. स्त्रियांना मालमत्तेचा हक्क मिळाला पण परिणाम एवढाच झाला की लग्नाच्या वेळी प्रत्येक मुलीकडून बापाच्या मालमत्तेवरील हक्क सोडून दिल्याचे कागदोपत्री लिहून घेतले जाऊ लागले. जिल्हापातळीपर्यंत वर्तमानपत्रे कायद्याच्या दृष्टीने अर्थहीन असलेल्या एकतर्फी काडीमोडीच्या नोटिसांनी भरलेली असतात. गावोगाव, सासरी नांदविल्या न जाणाऱ्या मुली माहेरी दिवस कंठतात, पण नवऱ्याकडून कायद्याप्रमाणे पोटगी कोर्टातून मिळवल्याची उदाहरणे दुर्मिळ आणि पोटगीची रक्कम प्रत्यक्षात नियमितपणे मिळत असल्याची उदाहरणे तर उंबराच्या फुलाइतकी दुर्मिळ. कागदोपत्री सुधारणांत काही कोठे कमी नाही. कायद्याच्या पुस्तकात समान मानली गेलेली आणि धर्मग्रथांत देवता म्हणून वंद्य मानलेली आणि साहित्यात माता, भगिनी इत्यादी भूमिकांबद्दल नावाजली गेलेली स्त्री प्रत्यक्षात हलाखीने जगते. याचा अर्थ, स्वातंत्र्य कागदोपत्री तरतुदींनी मिळत नाही; प्रश्न करुणेने सुटत नाहीत. त्यासाठी अधिक व्यापक विश्लेषणाची व समर्थ प्रयत्नांची आवश्यकता असते. असे प्रयत्न करणारे थोडे नव्हते. या विषयांवर अनेकांनी वेगवेगळी मतेही मांडली आहेत. सर्वच मतांचा परामर्श घेणे कठीण आहे. पण स्थूलमानाने दोन मतप्रवाहांचा विचार केला पाहिजे. (अ) मार्क्सवादी आणि (ब) आधुनिक स्त्रीवादी.


 (अ) मार्क्सवादी मतप्रवाह
 समाजातील सर्व विचार आणि व्यवस्था आर्थिक घटकांमुळे ठरतात. प्रत्येक समाजात उत्पादनाची जी साधने वापरली जातात त्या साधनांमुळेच समाजातील घटकांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे संबंध तयार होतात. उत्पादनाच्या साधनांतील फरक आणि त्यामुळे तयार होणारे वर्गसंघर्ष यावरून इतिहासाचा खरा अर्थ समजतो. एवढी व्यापक भूमिका प्रथम मार्क्सवादाने घेतली. शिकारी, रानटी टोळ्यांपासून पशुपालन आणि शेती, खाणकाम, हस्तोद्योग आणि औद्योगिकीकरण या टप्प्यांत मनुष्यसमाजातील संबंधांत बदल घडत आले. त्याचा सुसंगत अर्थ मार्क्सवादी विचारवंतांनी मांडला. उत्पादनांच्या साधनांची खासगी मालकी प्रस्थापित करणाऱ्या भांडवलदारी व्यवस्थेने या प्रगतीत मोठी मोलाची कामगिरी बजावली आणि जुनाट व्यवस्था व प्रतिगामी विचार मोडून उत्पादकता आणि परखड विचार यांचे युग सुरू केले. पण ही व्यवस्था कामगारांच्या शोषणावर अवलंबून होती. उत्पादनांच्या नव्या साधनांसाठी लागणाऱ्या भांडवलाची निर्मिती ही कामगारांच्या शोषणातून या व्यवस्थेत तयार होते. कामगाराला मिळणारे वेतन हे त्याला जगण्याकरिता आणि नवीन पिढी तयार करण्याकरिता लागणाऱ्या वस्तूंइतके असते, तर त्यांच्या श्रमातून त्यापेक्षा कितीतरी अधिक वस्तू तयार होतात. या शोषणाचा परिणाम म्हणून एका बाजूला मंदीच्या लाटा अपरिहार्यपणे तयार होतात, तर दुसऱ्या बाजूला पिळल्या जाणाऱ्या सर्वहारा कामगारवर्गात जागृती तयार होऊन भांडवली व्यवस्था व खाजगी मालमत्ता यांचा अंत होतो आणि वर्गविहीन, शोषणरहित समाज तयार होतो अशी मार्क्सवादाची थोडक्यात मांडणी आहे.
 अगदी सुरुवातीच्या काळापासून मार्क्स आणि एंगल्स इतकेच नव्हे तर लेनिनपर्यंत विचारवंतांनी स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी मते मांडली. त्या सगळ्या मतांमध्ये एकसूत्रता सापडतेच असे नाही. आधुनिक स्त्री-मुक्ती आंदोलनातील अनेक कार्यकर्त्यांनी मार्क्सवाद हीही एक पुरुषी विचारपद्धती आहे आणि कामगारांच्या कोणत्याही क्रांतीपेक्षा सर्व जगातील, लोकसंख्येने अर्ध्या असलेल्या स्त्रियांची क्रांती ही जास्त व्यापक आणि महत्त्वाची आहे असे आग्रहाने मांडले. स्त्री-मुक्ती आंदोलनाचे एक श्रेय विरोधकांनाही मान्य करावे लागेल. मार्क्सवाद्यांना त्यांच्या मूल ग्रंथातील विचारांच्या अचूकपणाबद्दल आणि शास्त्रीयतेबद्दल कडवा अभिमान असतो. वेदोपनिषदांचे आधार सांगणाऱ्या ब्राह्मण पंडितांपेक्षाही त्यांचे ग्रंथप्रामाण्य मजबूत असते. पण मार्क्सवादी विचारात स्त्री-प्रश्नाबाबतीत काही कमतरता कदाचित असू शकेल असा बचावात्मक पवित्रा घेणे त्यांना आधुनिक स्त्रीवाद्यांमुळे भाग पडले आहे.
 साम्यवादी जाहीरनामा
 साम्यवाद्यांच्या जाहीरनाम्यात स्त्रियांच्या प्रश्नाचा उल्लेख पहिल्यांदा सापडतो. मार्क्सने आपल्या जळजळीत उपहासाच्या शैलीत भांडवलशाही कुटुंबव्यवस्थेतील दांभिकता आणि अमानुषता यावर आसूड ओढले आहेत. कुटुंबव्यवस्था ही फक्त "आहे रे" (संपन्नां)ची मक्तेदारी आहे. याउलट, कामगारांना हे भाग्य जवळपास नाही आणि त्याउलट, खुले आम वेश्यव्यवसाय पसरलाय. या व्यवस्थेत पालक मुलांचे शोषण करतात आणि स्त्रिया या केवळ उत्पादनाची साधने बनतात आणि "आहे रे" मंडळी केवळ "नाही रे" च्या स्त्रियांवर अत्याचार करतात एवढेच नव्हे तर एकमेकांच्या स्त्रियांबरोबर व्यभिचार करतात असा त्यांनी आरोप केला आहे. भांडवल नष्ट झाले म्हणजे "नाही रे" ची कुटुंबहीनता व वेश्याव्यवसाय नष्ट होईल आणि त्याचबरोबर "आहे रे" ची कुटुंबव्यवस्था अपरिहार्यपणे नष्ट होईल. मार्क्सवादी व्यवस्थेत स्त्रियांवर सामायिक मालकी प्रस्थापित होईल या कल्पनेची मार्क्स खिल्ली उडवतो आणि भांडवली व्यवस्थेतच अशा तऱ्हेची सामायिक मालकी असल्याचे प्रतिपादन करतो.
 एंगल्सकृत मांडणी
 स्त्रीप्रश्नावरची सुसंगत मांडणी एंगल्सने केली. आदिमानवाच्या समाजातील व्यवस्था ही अनेक जोडप्यांची साम्यवादी व्यवस्थाच होती. स्त्रियांकडे त्यांच्या नैसर्गिक गुणधर्माप्रमाणे "घरकाम" आले हा श्रमविभागणीचा भाग होता. पण घरकामाचे स्वरूप सामाजिक गरज भागविणाऱ्या सार्वजनिक उद्योगाचे होते. पुढे जोडप्यांची कुटुंबव्यवस्था तयार झाली त्या वेळी घरकाम एक खासगी सेवा बनली आणि आपली मालमत्ता आपल्याच जैव वारसाकडे जावी याकरिता स्त्रियांवर लैंगिक आणि आर्थिक-सामाजिक बंधने घालण्यात आली. म्हणजे, खासगी मालमत्ता हे स्त्रीच्या गुलामगिरीचे प्रथम कारण. प्रत्येक पुरुष, बाहेरच्या जगात तो मालक असो का मजूर, चार भिंतीच्या आत "सुलतान" बनला आणि त्याची स्त्री त्याची "गुलाम". स्त्रीची मुक्तता केव्हा होईल? एंगल्स म्हणतो, "सर्व स्त्रीजात जेव्हा घराबाहेर पडून पुन्हा एकदा सार्वजनिक उत्पादनात सहभागी होईल त्यावेळी आजच्या कुटुंबाचे 'आर्थिक घटक' हे स्थान नष्ट होईल."
 कामगार चळवळीची सोय
 स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी मार्क्सवादाने मांडलेल्या भूमिकेचा फार मोठा प्रभाव स्त्रीकार्यकर्त्यांवर राहिलेला आहे. किंबहुना, स्त्रियांची चळवळ ही प्रामुख्याने डाव्या चळवळीचे एक अंग या स्वरूपातच दिसते.
 स्त्रीकार्यकर्त्यांनी कामगार चळवळीत मोठ्या हिरीरीने भाग घेतला. तत्कालिक कायद्याच्या अर्थवादी मागण्यांच्या यादीत स्त्री-प्रश्नांच्या जाणिवेने काही भर पडली. समान काम समान वेतन, बाळंतपणाची रजा, पाळणाघरे, स्त्री- कामगारांसाठी वेगळी विश्रामगृहे, कामाच्या जागी अल्पखर्चात भोजनाची सोय इत्यादी मागण्याही आता कामगारांच्या मागण्यांच्या यादीत सामील होऊ लागल्या. कामगार चळवळीच्या अंतिम यशातच म्हणजे भांडवली व्यवस्था आणि खासगी मालमत्ता यांच्या नाशातूनच स्त्री-स्वातंत्र्याचा मार्ग जातो असे म्हटल्यानंतर स्त्रीकार्यकर्त्यांची पलटण कामगार लढ्याच्या दिमतीला उभी राहू लागली आणि स्त्रियांनी कामगार म्हणून केलेल्या चळवळीच स्त्री-मुक्ती चळवळी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
 (१) घरकाम = स्त्री?
 घरकाम स्त्रियांकडे त्यांच्या जीवशास्त्रीय गुणधर्माप्रमाणे झालेल्या श्रमविभागणीने आले हे म्हणणे आता जीवशास्त्रालाही मान्य होणार नाही आणि प्राग्मानवसमाजशास्त्रातील पुराव्यांचाही त्याला पाठिंबा नाही. घरकाम प्रत्येक समाजात सर्व काळी अपरिहार्यपणे स्त्रियांकडेच राहावे असे समजण्याचे काहीही कारण नाही. मार्गारेट मीड इत्यादिनी केलेल्या संशोधनात, वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये कामाची अगदी वेगवेगळ्या पद्धतीची विभागणी आढळून आलेली आहे. काही स्त्रियांमध्ये किंवा बहुतांश स्त्रियांमध्ये कदाचित् घरकामाची आवड असेलही. प्रजजनासंबंधी जबाबदाऱ्या लक्षात घेता व त्यामुळे हालचाल करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता काही काळ स्त्रियांना निवारा व संरक्षण यांची गरज आहे असे मानले तरी त्यामुळे सगळ्या स्त्रियांना सर्व काळ घरकामातच ठेवण्याची व्यवस्था का निघाली? किंवा स्त्रीपुरुषांची जीवशास्त्रीय वैशिष्ट्ये लक्षात घेताही, सरसकट लिंगभेदावर आधारित श्रमविभागणी का व्हावी या प्रश्नाचे एंगल्सचे उत्तर अपुरे आहे.
 (२) स्त्री आणि वर्ग
 मार्क्सवादी विचार हा वर्गसंघर्षाचा विचार आहे. वर्गाची निश्चित व्याख्या देण्याचे मार्क्सनेही टाळले आहे आणि एंगल्सही सुस्पष्ट व्याख्या देत नाही.
 "मिळकतींच्या उगमांची आणि स्वरूपांची समानता" या पलीकडे जास्त स्पष्टता नाही. "आहे रे" वर्गाची व्याख्या त्या मानाने सोपी आहे. उत्पादनांच्या साधनांवरील मालकीचा आणि अतिरिक्त मूल्यांचा लाभ घेण्याची ताकद ज्या वर्गाजवळ असेल तो "आहे रे". पण क्रांतिप्रवण वर्गाची खूण मिळकतीच्या स्वरूपावरून ठरवणे कठीण आहे. आधुनिक मार्क्सवादी समान हितसंबंधांची जाणीव आणि एकजूट करण्याची प्रवृत्ती व ताकद हीच वर्गाच्या व्याख्येची महत्त्वाची अंगे समजतात. या व्याख्येने तपासता वर्गविग्रह इतिहासात कधी दृष्टोत्पत्तीस आला किंवा नाही याबद्दलही शंका घेण्यास जागा आहे. वर्गाचे अस्तित्व मानले तरी एकाच घरातील स्त्रीपुरुष एकाच वर्गाचे घटक आहेत हे म्हणणे कोणत्याही व्याख्येने कठीण आहे. एकीकडे चार भिंतींच्या आतील उत्पादनांच्या साधनांचा मालक आणि अतिरिक्त मूल्याचा स्वामी तर दुसरीकडे सर्वार्थाने सर्वहारा, गुलामांची गुलाम स्त्री. पण या दोघांत बाहेरच्या संघर्षाला तोंड द्यायचे झाले तर एकजुटीने लढण्याची प्रवृत्ती. ही कुटुंबाची रचना वर्गाच्या संकल्पनेचा पायाच उखडणारी आहे. राष्ट्राराष्ट्रांमध्ये शोषकांच्या फायद्यासाठी लढाया होतात. पण प्रत्येक राष्ट्रातले सर्वहारा शोषित आपापल्या देशातील शोषकांच्या बाजूनेच ठामपणे उभे राहतात. त्याप्रमाणे सर्व संकटांना तोंड देण्याकरिता पतीपत्नींची होणारी एकजूट ही आर्थिक वर्गाच्या कल्पनेलाच नाकारणारी आहे.
 (३) घरकामाचे श्रममूल्य
 स्त्रीच्या घरकामाचे स्थान काय? घरातील तिचे श्रम उत्पादक आहेत किंवा नाहीत? या प्रश्नावरही मार्क्सवादी अर्थशास्त्र कोलमडून पडते. भांडवलदार वर्गाकडून होणाऱ्या शोषणाच्या क्षेत्रात घरकामाचे श्रम मोडत नाहीत असे म्हटले तर स्त्रियांची स्त्रिया या नात्याने होणारी दडपणूक किंवा शोषण हे भांडवली शोषणाचा अंगभूत भाग असणार नाही. मग स्त्रियांची पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे होणारी दडपणूक भांडवली चौकटीमध्येच संपू शकते असा किंवा भांडवली व्यवस्था नष्ट झाल्यानंतरही संपत नाही असा निष्कर्ष निघतो.
 घरकामाचे श्रम उत्पादक असतात आणि म्हणून भांडवली शोषणाचा भाग असतात असे धरले तरी अडचणी संपत नाहीत. कामगारांच्या श्रमशक्तीचे मूल्य हे त्याच्या जीवनासाठी आणि पुनरुत्पादनासाठी लागणाऱ्या सर्व क्रयवस्तूंच्या मूल्याइतके असते हा मार्क्सचा मूलभूत सिद्धांत आहे. कामगार खानावळीत जेवले तर खानावळीचे पैसे - ज्यांत स्वयंपाक्याचे, मोलकरणीचे, वाढप्याचे वेतन अंतर्भूत असते या मूल्यात मोजता येतात; पण घरकाम करणाऱ्या बायकोला वेतन नसल्यामुळे तिच्या श्रमाचे मूल्य त्यात धरता येत नाही. मार्क्सची मूल्यमीमांसा ही किती अजागळ आहे याबद्दल अर्थशास्त्र्यांचे फार काळापासून एकमत आहे. स्त्री-चळवळीच्या संबंधाने ही गोष्ट आणखीनच स्पष्ट झाली. एरवी हा भाग विनोदाचाच.
 (४) घरकामाचे सार्वजनिकीकरण
 आर्थिक घटक म्हणून कुटुंबाचे अस्तित्व साम्यवादी व्यवस्थेत नष्ट होईल पण त्याच वेळी युगुलसंबंधांचे आदर्श रूप म्हणून कुटुंब साकार होईल या दोन कल्पना परस्परविरोधी आहेत. घरकाम समजल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आणि कामे ही एक अर्थाने विस्तारित कामक्रीडेचाच भाग असतात. गृहव्यवस्थेतील आर्थिक क्षेत्र आणि लैंगिक अंगे यांना वेगळे करणे अशक्यप्राय आहे. स्त्री-मुक्ती ही सर्व घरकामाचे सार्वजनिकीकरण करण्याने येणार असेल तर रोगापेक्षाही औषध भयानक असा प्रकार होईल. स्त्री सार्वजनिक उत्पादनक्षेत्रात आल्यामुळे तिचे प्रश्न सुटतात असे म्हणणे म्हणजे गेल्या क्रांतीनंतरच्या सत्तर वर्षांत सोव्हिएट स्त्रीचे सर्व प्रश्न सुटले आहेत असे म्हणण्यासारखे आहे.
 सार्वजनिकीकरणाने स्त्री-मुक्तीचा मार्ग मोकळा होईल असे एका बाजूला मार्क्सवादी सांगत असताना दुसऱ्या बाजूला साम्यवादी म्हणवणाऱ्या देशांत उत्पादनक्षेत्रात वाढते खासगीकरण करण्याची प्रवृत्ती अधिकृतपणे बळावत आहे. सत्तर वर्षांच्या साम्यवादी नियोजनानंतर सार्वजनिकीकरणाचा मार्ग सोडून देणे साम्यवादी नियोजकांना अपरिहार्य वाटू लागले असेल तर "सार्वजनिकीकरणातून स्त्री-मुक्ती" हे एक मृगजळ होते असे मानावे लागेल.
 (५) अतिरिक्त मूल्य
 मार्क्सवादाची गेल्या शतकातील पीछेहाट ही प्रामुख्याने त्या विचारसरणीतील अतिरिक्त मूल्याच्या चुकीच्या सिद्धांतामुळे झाली आहे हा विचार शेतकरी संघटनेने तपशीलवार मांडलेला आहे. पुढील शतकांचे काही सांगता येणार नाही, पण आजपर्यंतच्या इतिहासात भांडवलनिर्मिती ही कामगारांच्या श्रमशक्तीपेक्षा शेतीतील श्रमशक्ती आणि असमान विनिमय यामुळे झाली हे स्पष्ट आहे. भांडवलदाराने कामगारांचे शोषण केले एवढ्याच कारणास्तव केवळ कामगाराच्या स्त्रीला तिच्या नवऱ्याची ताबेदारी पत्करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. कामगारांच्या वेतनाच्या हिशोबातील फेरफारीनेच शोषणाची चाके फिरत असती तर स्त्रियांना चार भिंतींच्या आत दुय्यम दर्जा स्वीकारण्याची सक्ती झालीच नसती. पुरुषांना आपली खासगी मालमत्ता आपल्याच वारसाकडे जावी अशी इच्छा उत्पन्न झाली म्हणून हजारो वर्षे समान हक्क बजावणाऱ्या स्त्रियांना विनातक्रार बंधने स्वीकारण्याची गरजही पडली नसती.
 मातृसत्ताक किंवा स्त्री-वर्चस्व असलेल्या समाजांतील स्त्रिया केवळ पुरुषांच्या हाती वरकड निर्मिती झाली आणि शुद्ध वारसाची गरज त्यांना वाटू लागली म्हणून सुखासुखी, विनाप्रतिकार किंवा स्वखुशीने आणि आंनदाने पुरुषसत्ताक व्यवस्था स्वीकारतील हे असंभव आहे. देशभर प्रस्थापित झालेली बौद्धांची राजकीय आणि धार्मिक सत्ता शंकराचार्यांनी केवळ वादविवादाने काही वर्षांतच समूळ नष्ट करून टाकली, या भाकडकथेइतकेच हे असंभाव्य. किंवा गुणक्रमविभागशः चातुवर्ण्यकर्त्याने व्यवस्था तयार केली आणि अंत्यवर्णीयांनी ती विनातक्रार मान्य केली असे समजण्याइतके ते बाष्कळ आहे.
 अश्या तऱ्हेची उलथापालथ शांततामय रीतीने मतपरिवर्तनाने, परस्पर सौहार्दाने घडून येत नाही. रूप एवढे बदलण्यासाठी सगळी वस्तूच वितळवून टाकण्याइतक्या धगीची भट्टी आणि मूस असावीच लागले. कोठेतरी ताकदीचा, अगदी पाशवी ताकदीचा, सैन्याचा, शस्त्रांचा उपयोग निर्णायक पद्धतीने घडला असला पाहिजे. वरकड उत्पादनाच्या पहिल्या उपयोगात अवजारांबरोबर हत्यारेही तयार झाली. या हत्यारांचा उपयोग पुरुषांनी एका काळी स्त्रियांविरुद्ध केला असेल हे असंभाव्य नाही, पण ते पुरुषांच्याच हितसंबंधांना हानिकारक आणि मारक ठरले असते. अगदी स्त्रियांनासुद्धा निसर्गसिद्ध वाटावी अशी पुरुषप्रधान कुटुंबरचना केवळ पाशवी बळाच्या जोरावर प्रस्थापित करता आली नसती. सुप्त प्रतिकाराच्या ठिणग्या दीर्घकाळपर्यंत धुमसत राहिल्या असत्या.
 स्त्रियांच्या दास्याचे मार्क्सवादी विश्लेषण हे अपुरे आहे. असह्य अशी बंधने इतिहासाच्या एका अवस्थेत स्त्रियांनी का स्वीकारावी याचे समाधानकारक विश्लेषण मार्क्सवादात मिळत नाही. स्त्री-स्वातंत्र्याचा विचार हे मार्क्सवादाने लावून घेतलेले मातीचे कुल्ले आहेत. ते टिकून राहण्यासारखे नाहीत आणि मार्क्सवादाची आर्थिक क्षेत्रात पीछेहाट होत असताना या बुडत्या जहाजात चढण्याची स्त्री-आंदोलनाला काही आवश्यकताही नाही.


 (ब) आधुनिक स्त्रीवाद्यांचा मतप्रवाह
 स्त्रियांच्या सद्य:स्थितीचे आणि समाजातील दुय्यम दर्जाचे कारण काय? आणि वेगवेगळ्या समाजातील स्त्रियांच्या दर्जातील फरकाचा अर्थ कसा लावायचा? आणि याहून शेवटी, स्त्रियांच्या समस्येचे उत्तर काय? हे प्रश्न गेल्या वीस एक वर्षांतच आग्रही स्वरूपात मांडले जाऊ लागले. स्त्रियांची चळवळ सुरुवातीच्या काही काळात सुधारणवादी पुरुषांच्या हाती होती. दयाबुद्धीने आणि करुणेने प्रेरित होऊन अभागी अबलांची परिस्थिती सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. १९६५ सालापासून स्त्री-मुक्ती चळवळीचे नवीन युग सुरू झाले असे समजले पाहिजे. इथपासून चळवळ प्रामुख्याने स्त्रियांनी स्वत:च हाती घेतली आणि अनेक वर्षे कोंडून ठेवलेली वाफ बाहेर उफाळून यावी त्याप्रमाणे या काळात स्त्रियांनी स्त्री म्हणून अत्यंत मोकळेपणे स्त्रियांच्या प्रश्नाची अनेक अंगे व विश्लेषणे विस्ताराने आणि अभ्यासपूर्वक मांडली. मार्क्सवादाची चौकट स्त्रियांच्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकत नाही हे त्या चळवळीच्या नवीन प्रवर्तकांनी अगदी ठामपणे मांडले आणि आपले नवे सिद्धांत पुढे ठेवले.
 एका अर्थाने मार्क्सवादाच्या आधीच्या "आदर्शवादी" किंवा "विधायक" साम्यवादी चळवळींशी १९६५ च्या आधीच्या चळवळींची तुलना करता येईल. १९६५ पासून शास्त्रीय स्त्री-मुक्तीचा विचार उमलू लागला आहे. हा विचार पुढे मांडणारांमध्ये शुलामिथ फायरस्टोन यांचा क्रमांक खूपच वरचा लागेल. मार्क्सवादाला समांतर अशा अनेक संकल्पना तिने मांडल्या. उदाहरणार्थ, आर्थिक वर्गाप्रमाणे लिंगवर्ग, ऐतिहासिक वस्तुवादाचाही अर्थ, लिंग विभागणीच्या आधारावर इतिहासाचा अर्थ समजून घेणारी विचारपद्धती इत्यादी.
 १९७० साली केट मिलेटने एका शब्दाचा प्रयोग केला आणि तो लवकरच रूढ झाला. "पितृसत्ताक". पितृसत्ता म्हणजे लष्करी, औद्योगिक, तांत्रिक, वैज्ञानिक, शैक्षणिक, राजकीय, वित्तीय या सत्तांच्या सर्व स्रोतांचे पुरुषांच्या हाती एकवटणे. पितृसत्ता म्हणजे वडिलांची किंवा बापाची सत्ता-
 जिच्यात समाजाची, कुटुंबाची सैद्धांतिक आणि राजकीय व्यवस्था ही दमनशक्ती, दबाव, रूढी, परंपरा, कायदा, भाषा, शिष्टाचार, शिक्षण आणि श्रमविभागणी यांचा वापर करून स्त्रियांचे समाजातील स्थान दुय्यम ठरवते. (ॲड्रीयन रिच.)
 जन्मजात लिंगभेद आणि स्त्रीला देण्यात आलेली समाजातील भूमिका यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. सर्व पुरुषांनी मिळून सर्व स्त्रियांवर लादलेली ही एक प्रकारची गुलामगिरी आहे. समाजातील हरएक साधनाचा उपयोग करून पुरुषी प्रचाराने आणि फितूर झालेल्या वयस्कर स्त्रियांच्या साहाय्याने ही व्यवस्था राबविली जाते. (एलिझाबेथ जेन्वे).
 शुलामिथ फायरस्टोनने पितृसत्ताक व्यवस्थेची उपपत्ती वस्तुवादाच्या आधाराने सांगितली. पण हा मार्क्सएंगल्स्चा आर्थिक वस्तुवाद नाही तर स्त्री-पुरुष यांच्या शरीरशास्त्रीय वास्तवावर आधारलेला वेगळाच वास्तववाद आहे.
 स्त्री-पुरुषांच्या जन्मजात फरकाने नव्हे तर प्रजननसंबंधी जबाबदाऱ्यांच्या वेगळेपणामुळे लिंगवर्ग आणि स्त्रियांचे शोषण उद्भवले. जीवशास्त्रीय कुटुंबाचे घटक चार- १. स्त्रियांचे पुरुषांवर परावलंबित्व. २. माणसाची पोरे स्वतंत्र होण्याकरिता लागणारा दीर्घ काळ. ३. आईबाळाच्या खास नात्यामुळे होणारे मानसिक परिणाम. आणि ४. स्त्री-पुरुषांतील श्रमविभागणी. स्त्री-मुक्ती ही जीवशास्त्रीय कुटुंब नष्ट केल्यानेच होऊ शकेल. कृत्रिम प्रजोत्पादन, मुलांच्या जोपासनेसाठी सार्वजनिक व्यवस्था प्रस्थापित केल्यानेच स्त्री स्वतंत्र होऊ शकेल हा विचार एकांगी आहे.
 स्त्री-मुक्तीसाठी किमान चार आघाड्यांवर बदल घडवून आणावा लागेल. १. आर्थिक उत्पादनातील स्त्रीची भूमिका. २. प्रजोत्पादन ३. लैंगिकता आणि ४. मुलांची सार्वजनिक देखभाल (ज्युलिएट मिचेल).
 मिशेल रोझाल्डाचे मत थोडे वेगळे आहे.
 बाळंतपणाच्या जबादारीपेक्षा मुले वाढविण्याची जबाबदारी नैसर्गिक रितीने स्त्रियांवर पडते आणि त्यामुळे इतिहासातील यच्चयावत् समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान मिळाले आहे. याउलट, पुरुषांची घरकामापासून आणि मुलांपासून दूर राहू शकण्याची ताकद हे त्यांचे महत्त्वाचे सामर्थ्य आहे.
 प्रजनन किंवा मुलांची जोपासना यामुळे स्त्रीवर बंधने पडतात या विचारापेक्षा अगदी वेगळा विचार सुसान ब्राऊनमिलर हिने मांडला.
 पुरुषी सत्तेचे खरे रहस्य पुरुषांची पाशवी शक्ती हेच आहे. सर्व प्राणीजगतात मनुष्य प्राण्यातच बलात्कार शक्य होतो. कामपूर्तीसाठी त्यांना कोणत्याही ऋतूची आवश्यकता नसते हे पुरुषांच्या एकदा ध्यानात आल्यानंतर शत्रूचा आणि स्त्रियांचा मानसिकदृष्ट्या बीमोड करण्यासाठी या हत्याराचा वापर करण्यात आला. आधुनिक समाजात बलात्कारी गुन्हेगार संख्येने थोडे पण त्यांनी निर्माण केलेल्या धोक्याचा फायदा प्रत्येक पुरुष घेतो. बाहेरच्या बलात्काराला तोंड देण्यापेक्षा घरचे अत्याचार निमूटपणे सोसून घ्यायची प्रवृत्ती स्त्रीत तयार होते.
 बलात्काराचे तंत्र एका अर्थाने देशच्या देश नामोहरम करणाऱ्या साम्राज्यवाद्यांचेच आहे. (सुसान ग्रेफीन)
 बलात्कारासंबंधीच्या या मांडणीमुळे मार्क्सवाद आणि त्यातील वर्गविग्रहाची मध्यवर्ती कल्पना यापासून स्त्री-मुक्ती चळवळ दूर सरकली. त्याचबरोबर वंशभेदाच्या सर्व वादांपासूनही ती दूर झाली. बलात्काराला वर्गाच्या मर्यादा नाहीत आणि वंशाच्याही नाहीत.
 स्त्री-मुक्तीच्या संकल्पना सुचवतानासुद्धा अगदी निर्भीड नि:संकोचपणे काही अतिरेकी कल्पनासुद्धा चर्चेसाठी मांडल्या गेल्या.
 कामगारांच्या चळवळीत साम्यवादाचे जे स्थान आहे तेच स्थान स्त्री-चळवळीत स्त्रियांतील समसंभोगाचे आहे. (टाय्-ग्रेस ॲट्किन्सन)
 ही संकल्पना अतिरेकी तर खरीच आणि स्त्री-चळवळीतही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फाटाफूट झाली, पण स्त्रियांना पुरुषनिरपेक्ष जगता आले पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा त्यामुळे पुढे मांडला गेलाच.
 अगदी मानसशास्त्रासारख्या शास्त्रानेदेखील स्त्रीविरुद्ध भाकडकथा रचल्या आहेत. स्त्रीने कसे वागले पाहिजे, स्त्रीची निरोगी वर्तणूक कोणती याच्या पुरुषी संकल्पना मनोविकारतज्ज्ञही वापरतात. एखादी कर्तबगार बुद्धिमान स्त्री आयुष्यात जरा कोठे नवीन वाट शोधू लागली की, "तुझे वागणे स्त्रीत्वाला धरून नाही, यामुळे तुला मानसिक ताण सहन करावे लागतील." असा इतका धाक दाखविला जातो की ती खरोखरच मनोरुग्ण व्हावी. एखाद्या मुलाने जरा कुठे ऋजुता, ममता, नाजूकपणा दाखविला तर त्याचीही हेटाळणी व्हायला आणि त्याच्या पौरुषाविषयी शंका घ्यायला वेळ लागत नाही. स्त्री-पुरुष यांच्या आदर्शात पुरुषसत्ताक व्यवस्थेने अनैसर्गिक ध्रुवीकरण घडवून आणले आहे. अशा ध्रुवीकरणाला जीवशास्त्रीय आधार काही नाही. जीवशास्त्राच्या दृष्टीने स्त्री व पुरुष हा फरक काही टक्केवारीचा आहे. फिलीस चेझलर, कॅरोलिन हेलब्रून, आर्ना सॅण्डा बेम यांनी संतुलित व्यक्तिमत्त्वाची नवी संकल्पना मांडली. पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या मानसिक परीक्षा करण्यासाठी हा नटेश्वराचा आदर्श होता. स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही शौर्य, धैर्य, पराक्रम तसेच ममता, प्रेम, सहनशीलता हे गुणही दाखविण्यास ही नवीन संकल्पना वाव देते. पुरुषनिरपेक्ष जग हे हास्यास्पद आहे हे नक्की. पण निदान, पुरुषार्थाच्या आक्राळविक्राळ विपरीत कल्पनांपासून तरी केवळ स्त्रियांचीच नव्हे तर पुरुषांचीही सोडवणूक करणे आवश्यक आहे.
 ही कल्पना सर्वांनाच मान्य होण्यासारखी नव्हती.
 मालक आणि गुलाम यांच्या गुणांचे मिश्रण म्हणजे नवा आदर्श होऊ शकत नाही (जेनिस् रेमंड)
 पुरुषांचे दुर्गुण पुरुषांनाच लखलाभ असोत. गेल्या कित्येक शतकांच्या दास्यातून स्त्रियांना दुर्दैवाने का होईना काही गुण अंगी बाणून घ्यावे लागले आहेत. पराधीनांना भावनाशीलता सहजच येते. स्वामीश्रेष्ठांचे रागलोभ त्यांना काही वेगळ्याच इंद्रियाने चटकन जाणवतात. या भावनाशीलतेच्या आधारावरच येणाऱ्या जगात स्त्री पुरुषापेक्षा श्रेष्ठ ठरेल.(जीन बेकर मिलर)
 मातृत्वाची जबाबदारी आणि त्याचे परिणाम हा सर्व स्त्री-चळवळीत वारंवार आढळणारा विषय आहे. मातृत्व स्वयंसिद्ध उदात्त अनुभव आहे. पुरुषी राजकीय आणि आर्थिक प्राबल्यामुळे मातृत्व हा शाप झाला आहे. (ॲड्रीयन रिच)
 स्त्रियांनी अजून स्वत:च्या शरीराचा आणि व्यक्तिमत्त्वाचा, मानसिक ताकदीचा, संवेदनक्षमतेचा, असाधारण बुद्धिमत्तेचा, सोशिकतेचा आणि विविधरम्य शारीरिकतेचा विचारही करायला सुरुवात केलेली नाही. या त्यांच्या सुप्त शक्तींचा थोडा तरी उपयोग झाला तरी जी ऐतिहासिक जगड्व्याळ क्रांती होईल तिच्यापुढे कोणत्याही समाजवादी क्रांतीची काहीच मातबरी राहणार नाही. स्त्रियांची स्वशरीरावरील सत्ता परत येणे हे कामगारांच्या हाती उत्पादनांच्या साधनांची मालकी येण्यापेक्षा समाज बदलण्यासाठी अधिक आवश्यक आहे. (ॲड्रियन रिच)
 आधुनिक स्त्री-मुक्ती आंदोलनाच्या वेगवेगळ्या प्रवर्तकांनी आपापल्या देशात गाजविलेली कामगिरी पाहिली म्हणजे केवढी कर्तबगारी, बुद्धिमत्ता समाजात न फुलताच कोमेजून जात असेल याची कल्पना येते. स्त्री-आंदोलनाच्या पहिल्या स्फोटात शास्त्रीयतेच्या कठोर परिसीमा थोड्याफार उल्लंघिल्या जाव्यात हे समजण्यासारखे आहे. पाश्चिमात्य देशांच्या आजच्या परिस्थितीत स्त्री विरुद्ध पुरुष असा मूलगामी संघर्ष आहे अशी कोणी मांडणी केली तर तेही समजण्यासारखे आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भांडवशाहीतील प्रमुख संघर्षाबद्दल मार्क्सही असाच चकला होता. पण यापुढे स्त्री-मुक्ती विचाराला दुसऱ्या कोणत्या विचाराशी किंवा सिद्धांताशी जुळवून घेणे आवश्यक नाही. आजपर्यंतचे विचार मनुष्यजातीपैकी निम्मे लोकच डोळ्यासमोर ठेवून शिजवण्यात आले किंवा निम्म्या लोकांपैकी म्हणजे पुरुषांपैकी काही गट पुढे ठेवून मांडण्यात आले. आता उरलेल्या निम्म्या मनुष्यप्राण्यांची कैफियत मांडली जात आहे. तिच्या प्रकाशात बाकीच्या सगळ्या विचारधारांनी आपली शास्त्रीयता तपासून पाहण्याची आवश्यकता आहे.


 ५. स्त्रीप्रश्नाचा इतिहास


 स्त्रीप्रश्नावर दोन प्रमुख मतप्रवाह, एक "मार्क्सवादी" तर दुसरा "स्त्रीवादी", हे आपण पाहिले. मार्क्सवाद्यांच्या म्हणण्याप्रमाणे मनुष्यजातीच्या सुरुवातीला जेव्हा समाज निसर्गावस्थेच्या निकट होता त्या वेळी बहुतेक समाजांत स्त्रियांचे प्राबल्य होते किंवा निदान त्यांना दुय्यम स्थानतरी नव्हते. इतिहासाच्या ओघात मधे एके काळी दररोजच्या गरजा पुरून वस्तू उरू लागल्या, टिकाऊ वस्तू तयार होऊ लागल्या तेव्हा त्यांच्या मालकीचा प्रश्न उपस्थित झाला आणि स्त्रीवरच्या बंधनांना सुरुवात झाली. काही काळानंतर साम्यवादी क्रांतीनंतर ही बंधने दूर होऊन पुन्हा एकदा स्त्री मुक्त होईल असे त्यांचे मत आहे.
 याउलट, स्त्रीच्या शरीरशास्त्रीय वैशिष्ट्यामुळेच तिच्यावर परावलंबी जीवन जगण्याची पाळी आहे, मनुष्यजातीच्या सर्व इतिहासात स्त्रियांची परिस्थिती हीच राहिली आहे आणि प्रजनन व मुलांची जोपासना यांच्या कचाट्यातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगिकीकरण यांच्या आधाराने सुटल्याखेरीज स्त्रीला मुक्तपणे जगण्याची आशा ठेवायला फारशी जागा नाही असा "स्त्रीवादी" विचार प्रवाह.
 मानव समाजाचा इतिहास
 मानव समाजाच्या इतिहासाचा अभ्यास म्हणजे प्राग्मानवसमाजशास्त्र. हे शास्त्र अजूनही एक बाल्यावस्थेतील शास्त्र आहे. निश्चित पुरावे मिळवण्यातील अडचणी आणि मिळालेल्या पुराव्यांचे लावता येण्यासारखे निरनिराळे, एवढेच नव्हे तर काही वेळा परस्परविरोधी अर्थ यामुळे आजही या शास्त्राच्या आधाराने अमुक-अमुक पद्धतीने समाजांचा विकास झाला असे ठामपणे सांगणे अशक्य आहे. पण आजपर्यंतच्या इतिहासाचे तीन भाग पाडणे सर्वच शास्त्रज्ञांना मान्य आहे.
 (१) पहिला जंगलातील जवळजवळ रानटी अवस्थेतील मानवसमाजाचा. यालाच "अरण्ययुग" किंवा "पूर्वपाषाणयुग" आणि काही वेळा "मृगया अन्नचयनयुग" असेही ओळखले जाते. जंगलात राहणारा समाज, दगडांच्या हत्याराची प्राथमिक ओळख होऊ लागलेला आणि शिकार किंवा अन्न गोळा करून जगणाऱ्या मानवांचा समाज.
 (२) दुसऱ्या युगात माणसाने जनावरे पाळण्याला आणि शेतीला सुरुवात केली. गरजेपेक्षा जास्त उत्पादन, त्यांचा व्यापार आणि शेती-व्यतिरिक्त कामांची सुरुवात व व्यापारी देवघेव या काळात झाली. याला "रानटी युग", "बर्बरतायुग" किंवा "पाषाणयुग" अशी शास्त्रीय पारिभाषिक नावे आहेत.
 (३) तिसऱ्या कालखंडाची सुरुवात नांगराच्या वापराने शेतीकामाला सुरुवात झाली तेव्हापासून धरण्यात येते. यालाच "संस्कृतियुग" म्हटले जाते.
 या प्रत्येक कालखंडाचे, बारकाव्याने अभ्यास करण्यासाठी आणखी पोटभाग पाडले जातात. पण कुटुंबव्यवस्थेच्या दृष्टीने या प्रत्येक कालखंडाची काही वैशिष्ट्ये आहेत.
 पोट भरणे आणि प्रजोत्पादन म्हणजे, अर्थ आणि काम या मनुष्यमात्रांच्या प्रेरणा आहेत. पण प्रजोत्पादन म्हणजे केवळ मुलांना जन्म देणे नाही. त्यांची योग्य तऱ्हेने वाढ करणे हेही त्यात सामावलेले आहे. योग्य तऱ्हेने वाढ म्हणजे पुन्हा नवीन पिढीला चांगल्या तऱ्हेने अर्थ आणि काम साधेल अशा पद्धतीने म्हणजे समाजातील उत्पादनाच्या व्यवस्थेला आवश्यक त्या प्रकारची आणि तितकी माणसे तयार करणे हे कुटुंबव्यवस्थेचे उद्दिष्ट असते.
 स्त्रीची दुय्यम भूमिकेकडे ढकलणूक
 पूर्वपाषण युगामध्ये सुरुवातीच्या काळाततरी लैंगिक संबंधावर कोणतीच बंधने नसावीत. पण हळूहळू वयोमानाप्रमाणे गट तयार होणे साहजिकच होते. त्याबरोबर, अगदी सहोदरांचे म्हणजे एकाच आईपोटी जन्मलेल्या भावा-बहिणींचे संबंध आणि त्यानंतर जवळपासच्या रक्ताच्या नातेवाईकांशी संबंध हे निकृष्ट, अवांछनीय, निंद्य मानले गेले आणि त्यांचा संततीवरचा दुष्परिणाम पाहता सर्वच समाजातून ते नष्ट झाले.
 स्वैर संबंधाची जागा आता समूहविवाहाने घेतली. म्हणजे, रक्ताच्या नात्याच्या पुरुषांचा एक गटच्या गट, रक्ताच्या नात्याच्या स्त्रियांच्या एका गटाशी संबंध ठेवू लागला. अशा गटाला कुल म्हणत. काही कुलांच्या ज्ञाती आणि ज्ञातींचे गण बनत. पण दिवसेंदिवस निरोगी अपत्य संभवाकरिता योग्य गोत्रीय जोडीदार मिळणे दुरापास्त होऊ लागल्यावर गटांचे संबंध दुर्मिळ होऊ लागले आणि एकएकट्या स्त्री-पुरुषांच्या मिथुनकुटुंबांना सुरुवात झाली.
 पूर्वपाषाण युगात आणि नवपाषाणयुगात, निदान गरजेपेक्षा जास्त वरकड उत्पादन हाती येईपर्यंत स्त्रियांची अवस्था काय होती याबद्दलही काही मतभेद आहेत. स्त्रीवाद्यांतील एक गट याही काळात स्त्रीची पराधीनता अपरिहार्य होती असे मानतो. मार्क्सवाद्यांतील एक गट या काळात स्त्रियांचे प्राधान्य असलेली कुटुंबपद्धती किंवा मातृअधिकार अस्तित्वात होता असे मानतात तर काही जण त्यापलीकडे जाऊन त्या काळात स्त्री-सत्ताक समाज होते आणि पुरुषांची अवस्था दुय्यम दर्जाची होती असे मानतात. मार्क्सवाद्यांतील दोन्ही गटांच्या मताप्रमाणे मिथुनकुटुंबात स्त्रीचे वर्चस्व चालू राहिले. पुरुषांचे काम - शिकार करणे, जनावरे पाळणे आणि शेती पिकवणे हे - दुय्यम समजले जाई. मुलांना जन्म देणे, जोपासना करणे आणि आणलेल्या अन्नाची वाटणी व वासलात लावणे ही स्त्रियांची कामे जास्त महत्त्वाची समजली जात. पण हळूहळू मांस, दूध-दुभते आणि अन्नधान्ये यांची मुबलकता तयार होऊ लागली, आवश्यकतेपेक्षा अधिक होऊ लागली तसतसे निर्वाहसाधनांची वरकड हाती आल्यामुळे वस्त्रे, निवारा, अवजारे आणि त्याहूनही महत्त्वाचे, हत्यारे यांचे उत्पादन करण्यास आवश्यक ती सवड आणि श्रमशक्ती मिळू लागली. या भांडवली वस्तू खाऊन, वापरून संपत नाहीत; दीर्घकाळ चालतात. त्या निर्माण करणारा मरून गेला तरी मागे उरतात. साहजिकच, त्यांची मालकी हा एक महत्त्वाचा प्रश्न बनतो. आपण तयार केलेली साधने आपल्या हाती राहावीत, एवढेच नव्हे तर आपल्यानंतर ती आपल्या खऱ्याखुऱ्या, रक्ताच्या वारसाकडे जावीत, भलत्यासलत्या लुंग्या-सुंग्याच्या हाती ती लागू नयेत अशा प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू झाली आणि वारस मुलाच्या पितृत्वाची बिनधास्त खात्री ठेवता यावी यासाठी पुरुषांनी स्त्रियांवर बंधने लादायला सुरुवात केली. हळूहळू मातृसत्ता, मातृअधिकार, मातृप्राधान्य आणि मातृवंशकता संपुष्टात येत पितृवंशकता, पितृप्राधान्य, पितृअधिकार आणि पितृसत्ता अशी व्यवस्था टप्प्याटप्प्यांनी प्रस्थापित झाली.
 स्त्रीवाद्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुरुवातीपासून जीवशास्त्रीय कारणांमुळेच पुरुषसत्ता प्रस्थापित झाली. बळजोरीने, घरगुती व शैक्षणिक संस्काराने आणि "फितुर" वयस्कर स्त्रियांच्या मदतीने पुरुषांनी सत्ता टिकवून धरली हे किमानपक्षी संभाव्य तरी वाटते ; स्त्री-पुरुषांत अशा तऱ्हेची विद्वेषभावना असावी हे गृहीततत्त्व मुळातच विकृत आहे ही गोष्ट अलाहिदा. पण, स्त्री-पुरुषांत नैसर्गिक वितुष्ट आहे हे जर मान्य केले तर जहाल स्त्रीवाद्यांची सैद्धांतिक बैठक निदान व्यावहारिक शक्यतेच्या कसोटीला उतरते.


 ६. शेतकरी संघटनेची स्त्रीप्रश्नाची मांडणी
   खासगी मालमत्तेच्या वारसाबद्दलच्या पुरुषी चिंतेने गुलामगिरी निर्माण झाली ही मार्क्सवादी कल्पना अगदी बाळबोध तर्कालाही न पटणारी आहे. अतिरिक्त निर्मितीचे शोषण हे जवळपास शिस्तशीरपणे, शांततेने झाले; या शोषणाचे स्वरूप औद्योगिक क्रांतीनंतर बदलून त्याला श्रमशक्तीच्या शोषणाचे रूप आले आहे या मार्क्सवादी कल्पनेला इतिहासात आधार नाही. श्रमशक्तीची उत्पादकता, श्रमशक्तीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या क्रयवस्तूंचे मूल्य असल्या कीर्दखतावणींच्या खेळींनी भांडवलनिर्मिती इतिहासात घडलीच नाही. वरकड उत्पादन जन्माला आले ते शस्त्रास्त्रांना बरोबर घेऊनच. औद्योगिक क्रांतीच्या व्यवस्थांमुळे काहीसा बदल येईपर्यंत या वरकड उत्पादनांच्या नियंत्रणासाठी जगभर नासधूस, बलात्कार, जाळपोळ, रक्तपात यांचा एकच हलकल्लोळ उडून गेला. मध्ययुगातील सर्व राष्ट्रांचे इतिहास या हलकल्लोळीने भरले. या हलकल्लोळीत जगूनवाचून टिकण्याकरिता सर्व स्थिर समाजांना आपापल्या व्यवस्था बदलून टाकाव्या लागल्या. या उत्पातांचा अर्थ समजल्याखेरीज स्त्रियांच्या प्रश्नाचे मूळ समजणे शक्य नाही.
 स्त्रीवाद्यातील जहालांचा जीवशास्त्रीय वस्तुवाद निर्णायक ठरला असेल हे तर्कसुसंगत नाही. उत्क्रांत मनुष्यप्राण्यात जन्मजात शारीरिकतेपेक्षा जन्मानंतर कमावलेल्या गुणांचेच प्राबल्य असते. जन्मतः स्त्री दुर्बल नाही हे आता जीवशास्त्राने स्पष्ट केले आहे. पण ती तशी असती तरीसुद्धा तेवढ्याच कारणाने ती अनंतकालपर्यंत दुय्यम दर्जाची राहिली नसती. मार्क्सवादी वस्तुवाद इतिहासाचा अर्थ समजण्यासाठी आजही अधिक उपयुक्त आहे. पण मार्क्सवादी तत्त्वज्ञान रास्त असले तरी मार्क्सवादी जीवशास्त्र चुकीचे सिद्ध झाले आहे आणि अर्थशास्त्र इतिहासाच्या कसोटीला उतरलेले नाही.
 शेतकरी संघटनेच्या विचारपद्धतीची विशेषता ही की मार्क्सवादाचे निष्कर्ष चुकीचे आहेत असे दिसून आल्यानंतर स्त्रीवाद्यांतील जहालांप्रमाणे गडबडून जाऊन संघटनेने मार्क्सवादातील ग्राह्य भागाचाही त्याग केला नाही. वस्तुवाद मान्य करून संसिद्ध जीवशास्त्र आणि इतिहासात दिसून आलेल्या अतिरिक्त उत्पादनाच्या शोषणाच्या पद्धती यांच्या आधारे एक व्यापक आणि सुसंगत स्पष्टीकरण पुढे ठेवले.
 स्त्री जन्मतः श्रेष्ठ, कनिष्ठ नाही. काही प्रमाणात मितिज्ञान, प्रतिभा आणि हिंसकता यात काय फरक असेल तेवढाच. इतिहासात वेगवेगळ्या समाजांत स्त्री-पुरुषांची श्रमविभागणी वेगवेगळ्या प्रकारे झालेली आढळते. मानव-समाजातील स्त्रियांच्या प्रश्नाचे मूळ आर्थिक घडामोडीतच असले पाहिजे आणि परिणामतः स्त्रियांवरील या अन्यायाच्या अंधाराचा शेवट अपरिहार्यपणे झालाच पाहिजे.
 ही संघटनेच्या विचाराची शास्त्रशुद्ध मांडणी आहे.
 प्राग्मानवसमाजशास्त्राने सांगितलेल्या पहिल्या कालखंडात मानवसमाजांची अर्थ आणि कामव्यवस्था नेमकी कशी राहिली असेल याबद्दलचे पांडित्यपूर्ण वादविवाद स्त्री-प्रश्नाच्या चर्चेसाठी अनावश्यक आहेत. शास्त्राच्या आजच्या अवस्थेत असे वादविवाद निर्णायक ठरण्याची काहीही शक्यता नाही.
 वरकड उत्पादन ही प्रचंड क्रांतिकारी घटना होती. पृथ्वीवरील सर्व प्राण्यांत गरजेपलीकडचे उत्पादन करणारा मनुष्य हा पहिला प्राणी झाला. या उत्पादनामुळेच त्याच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावू लागल्या आणि निसर्गाच्या दास्यातून मनुष्यप्राणी पहिल्यांदा सुटका करून घेऊ लागला. पशुपालन आणि शेती यातून तयार झालेले पहिले वरकड उत्पादन आपल्या पश्चात कोणाकडे जाईल याची चिंता करायला त्या काळच्या समाजाला फारसा वेळ मिळाला असण्याची शक्यता नाही. वरकड उत्पादनाच्या आधाराने काहींनी नांगर, औते, औजारे बनवली आणि उत्पादन आणखी वाढविण्याची कास धरली.
 लुटीच्या अनेक तऱ्हा
 शिकारीसाठी आणि पशुपालनासाठी तयार केलेली आणि परजलेली हत्यारे माणसांविरुद्धही वापरता येतात हे काही त्याला माहीत नव्हते असे नाही. त्या वेळेपर्यंत मनाला आवडलेली एखादी स्त्री मिळवण्याकरिता शस्त्रांचा त्याने तसा वापरही केला होता. पण त्या शस्त्रांच्या साहाय्याने आता साधनसंपत्ती हस्तगत करण्याची नवीनच शक्यता तयार झाली. नांगर, बैल लावून शेतीतून जास्त उत्पादन काढण्यापेक्षा हा मार्ग अधिक सोपा आणि किफायतीशीर. लुटालूट ही वरकड उत्पादनाची जवळजवळ जुळी बहीणच. शेतीत पिकलेल्या अन्नधान्याची लूट सुरुवातीस काही भुरट्या चोरलुटारूंनी केली असेल. नंतर हे काम दरोडेखोरांच्या टोळ्यांनी केले. काही काळानंतर या टोळ्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि राजकीय सत्तेची स्थापना झाली. राजकीय व्यवस्थेची सुरुवात सज्जनपणे पशुपालनाने व शेती करणाऱ्या मानवांनी केली नाही. राजकारण हे पहिल्यापासूनच दुसऱ्यांच्या श्रमावर मौज मारू इच्छिणाऱ्या ऐतखाऊंचे कुरण होते.
 लहान लहान टोळ्यांत प्रदेशाच्या विभागणीसाठी लढाया होत. त्यात कोणीही जिंको कोणीही हरो, शेतकऱ्यांची लुटालूट होतच असे. यातूनच राज्ये, साम्राज्ये उभी राहिली. युद्धकैद्यांची गुलामगिरी, वेठबिगारी, जातिव्यवस्था, महसूल या मार्गांनी वरकड उत्पादनाचे शोषण होतच राहिले. व्यापारी आणि औद्योगिक क्रांतीनंतर सावकारी, जमीनदारी आणि अपुरे भाव ही शोषणाची नवीन हत्यारे तयार झाली.
 वरकड उत्पादनाच्या पहिल्या कालखंडात सगळीकडे एकच धुमाकूळ सुरू झाला. पावसाळा संपला की लुटारू बाहेर पडायचे. ते पुन्हा शेतीचा हंगाम चालू होईपर्यंत कार्यक्रम लढायांचा आणि लूटमारीचा. हिंदुस्थानसारख्या देशात तर बाहेरून येणाऱ्या आक्रमकांची त्यात भर. या लढायांमध्ये पुरुष माणसे अतोनात मारली जायची. त्यामुळे स्वाऱ्यांचा हेतू वरकड उत्पादन लुटण्यापुरताच मर्यादित न राहता लोकसंख्यावाढीच्या दृष्टीने स्त्रियांचे अपहरण हाही झाला. असुरक्षिततेचे आणि हिंसाचाराचे वातावरण आणि स्त्रियांची अशा परिस्थितीत निवाऱ्याची आणि संरक्षणाची गरज ही एकच गोष्ट कुटुंब आणि समाजव्यवस्थेत बदल घडवून आणायला पुरेशी होती. नटेश्वर प्रकृतीचे विभाजन आणि ध्रुवीकरण मध्ययुगातील गदारोळात अपरिहार्य होते.
 पुरुषांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असल्याने समाजातील पुरुषांचे प्रमाण सांभाळणे हा सुसंस्कृत समाजाच्या चिंतेचा विषय झाला. प्रत्येक घर हल्ल्याच्या प्रतिकारासाठी सज्ज तटबंदीसारखे दिसू लागले. स्त्रियांना अधिकाधिक सुरक्षित जागी दडवण्याचे प्रयत्न झाले असले पाहिजेत. परिणामतः, जितकी संपन्नता अधिक तितकी त्या कुटुंबातील स्त्रियांची गुलामगिरी अधिक. ज्यांच्याकडे लुटण्यासारखे काही नव्हते आणि ज्यांच्या स्त्रिया काबाडकष्टात रुतलेल्या होत्या त्यांना या संरक्षणाची गरजही कमी आणि शक्यताही कमी. जास्तीत जास्त मुलगे जन्मावेत, त्यांना बालपणापासून संरक्षणाच्या आणि आक्रमणाच्या कामासाठी मनाने व शरीराने तयार करावे ही समाजाची प्राथमिक गरज बनली. त्यासाठी जी काही झीज सोसायची ती साहजिकच स्त्रियांच्या माथी आली. जगून, वाचून राहणे हेच उद्दिष्ट झालेल्या समाजात स्त्रियांची हालचाल, शिक्षण, स्वातंत्र्य व सुख यांची चिंता पुरुषांनी केली नाही आणि भीतीने भारलेल्या त्या काळात स्त्रियाही सर्व काही सोसून या संरक्षणप्रयत्नांच्या मागे उभ्या राहिल्या.
 ज्या समाजांचा एकामागोमाग एक सतत पराभवच होत गेला त्यातील स्त्रियांची त्या प्रमाणात पीछेहाट झाली. पुरुष गेल्यावर संरक्षक नावालाही नाही अश्या परिस्थितीत सतीसारख्या अमानुष प्रथेलाही समर्थन आणि प्रतिष्ठा मिळू शकली.
 मध्ययुगातील लढायांत हरो, जिंको कोणीही, शेतकरी लुटलाच गेला. तसेच हरले, जिंकले कोणीही, तरी स्त्रियांची सदैव पीछेहाटच झाली. जेती समाजातील पुरुषांना काही लाभ मिळाला असेल आणि त्या अनुषंगाने स्त्रियांच्या अंगावर काय लुटीतले अलंकार आणि वस्त्रे चढली असतील ती असोत, जेते राष्ट्रेही असुरक्षिततेच्या वातावरणाचे बळी झाली. जेत्या राष्ट्रांतही पुरुषांचे प्रमाण कमीच झाले. जेते आणि जित दोन्हीपक्षी हिंसाचाराला तोंड देण्याची तयारी एकाच पद्धतीची. त्यामुळे दोन्ही समाजांतील स्त्रियांचा प्रत्येक लढाईत पराभवच होत गेला.


 स्त्रियांचा प्रश्न
 वरकड उत्पादनाच्या सुरुवातीपासूनच मनुष्यसंस्कृतीला ग्रहण लागल्यासारखे झाले. पशुंनासुद्धा लाजवतील अशा तऱ्हेच्या लक्षावधी क्रूर कथांनी आणि शेकडो स्त्रियांच्या अश्रूंनी हा काळ भरलेला आहे. यथावकाश लुटारूही राज्ये, साम्राज्ये स्थापून स्थिर झाले. वरकड उत्पादनाच्या उपलब्धीमुळे आणखी एका चमत्काराला सुरुवात झाली. शास्त्र आणि विज्ञान यांच्या प्रगतीमुळे तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होऊ लागला. पहिल्या औद्योगिकीकरणापेक्षा दुसऱ्या औद्योगिकीकरणाचे तंत्रज्ञान वेगळे आणि तिसऱ्या पिढीतील त्याहून वरचे अशा झपाट्याने तंत्रज्ञानाची प्रगती होऊ लागली. एका काळी मँचेस्टरच्या कापडगिरण्यांना संरक्षण मिळावे म्हणून विणकारांचे अंगठे क्रूरतेने कापणारे आता कापड तयार करण्याबद्दल उदासीन झाले. त्यापेक्षा कापड बनविण्याची यंत्रे तयार करणे त्यांना जास्त आकर्षक वाटू लागले. आता त्यांना गरज होती, कापड विकत घेणाऱ्यांची नव्हे तर कापड तयार करणारी यंत्रे विकत घेणाऱ्यांची. जुन्या वसाहतवादाची उपयुक्तता संपली. त्यामुळे गोऱ्या वसाहतवादाचा अंत झाला. प्रत्येक वसाहतीतील साम्राज्याच्या काळात परकीयांशी सहकार्य करणाऱ्या मंडळींच्या हाती सत्ता जाऊन देशोदेशी स्वातंत्र्याचे नवे झेंडे लागले आणि काळ्या वसाहतवादाची सुरुवात झाली. नव्या सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रीय नियोजन, समाजवाद, आर्थिक विकास, 'गरिबी हटाव', शास्त्र आणि विज्ञान, एकविसावे शतक अशा फसव्या नावाखाली परदेशातील नवी यंत्रसामग्री आणि वरकड उत्पादन यांची खरेदी पूर्वीपेक्षाही मोठ्या प्रमाणावर सुरू केली. मँचेस्टरची धन चालूच राहिली वर मुंबईकलकत्त्याची भर पडली. शेतीतील वरकड उत्पादनाची लूट करणारे आता लुटल्या जाणाऱ्यांच्याच रंग रूपाचे आहेत एवढाच काय तो फरक. जित आणि जेते यांचे स्वरूप आता 'भारत' आणि 'इंडिया' असे झाले.
 असुरक्षिततेचे जनक फक्त बदलले
 इंग्रजांच्या आमदानीपासूनच व्यावसायिक ठग, दरोडेखोर आणि लुटारू यांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त झाला होता. त्याआधी राजकीय वर्चस्व गाजविलेले मुसलमान गावात काय आणि शहरात काय, वस्तीमोहल्ल्यात कसाबसा जीव तगवून राहत होते. तेराव्या शतकापासूनच हिंसाचाराचे थैमान घालणारे दोन्ही घटक आता थंड झाले आणि त्याबरोबर १३व्या शतकापर्यंत ज्यांनी शेतकऱ्यांना लुटण्याचा व्यवसाय केला होता त्यांच्या हातीच पुन्हा एकदा आर्थिकच नव्हे तर राजकीय सत्ताही आली. शासकीय प्रकल्पांच्या व सहकाराच्या साम्राज्यातून गावोगाव गुंडगिरीच तयार झाली. आर्थिक प्रगती आणि स्त्रियांची मुक्ती यांचा संबंध किती किरकोळ आहे हे कोणत्याही साखर कारखान्याच्या परिसरात पाहायला मिळेल. कारखाना झाला, नव्या डांबरी सडका आल्या, ट्रॅक्टर दिसू लागले, मळे हिरवेगार दिसू लागले, कर्जबाजारीपणा वाढला तरी, उचलीचे का होई ना, चार पैसे हातात खेळू लागले, तरीही या भागात स्त्रियांच्या परिस्थितीत पडलेला फरक अगदी अत्यल्प. कारण वातावरणातील असुरक्षितता कायम राहिली, तिचे जनक फक्त बदलले !
 शेतीच्या जीवावर पोसलेल्या इंडिया समाजातसुद्धा हीच परिस्थिती. उंच उंच मजल्यांच्या इमारती चढल्या. काही निवडक लोकांच्या हाती अगदी पाश्चिमात्य देशांतील अद्ययावत उपभोगाची साधने खेळू लागली. स्त्रिया मोठ्या प्रमाणावर घराबाहेरील कामही करू लागल्या आणि तरीही स्त्रीच्या दर्जामध्ये कोठे फरक पडतो आहे असे दिसले नाही.
 शहरांच्या वाढीबरोबरच उद्ध्वस्त झालेल्या खेड्यांतून लक्षावधी निर्वासितांचे लोंढे शहरांकडे जात आहेत. मोठ्या शहरांत झोपडपट्ट्यांत व फूटपाथवर राहणाऱ्यांची संख्या निम्म्याहून अधिक झाली. शेतीच्या भोवऱ्यात सापडलेली ही मंडळी खाली खेचली जात असताना इतक्या कठीण अनुभवातून जाऊन एक दिवस गावातील घरदार, चीजवस्तू फुकून शहरात दाखल झाली. त्यातील बहुसंख्यांचा आता कोणत्याही संस्कृतीशी संबंध राहिलेला नाही. शहरातील अठरापगड जमातींच्या गलिच्छ वस्त्यांमध्ये काही काळ जीव घुसमटला तरी दिवसातून निदान एकदा पोट भरण्याची शाश्वती असण्याचे समाधान काही थोडे नसते. आपण कोठे होतो, कोण होतो, कोठे आलो, काय करतो आहोत हा विचार अशक्य झाला आहे. हातभट्टी, मटका, गुंडगिरी, गुन्हेगारी, तस्करी येथून ते इमारत बांधणी आणि आयातनिर्यातीचा व्यवसाय इथपर्यंत काळ्या व्यवसायांची साम्राज्ये चालविणाऱ्यांची दादागिरी शहरांत प्रस्थापित झाली. अमेरिकेतल्या अनेक शहरांत अंधार झाला म्हणजे बाहेर पडण्याची कोणाची छातीसुद्धा होत नाही. घराच्या दरवाजाला आतून चार चार कड्या लावून माणसं स्वत:ला बंद करून घेतात. इथल्या शहरांत ही अवस्था फारशी दूर नाही. मध्ययुगीन असुरक्षिततेचे वातावरण कायम राहिले, फक्त असुरक्षितेचे जनक बदलले.
 १९७५ सालानंतर या देशातील स्त्री-मुक्तीच्या प्रामुख्याने शहरी उद्गात्यांच्या दुःखाचे मूळ कारण हे आहे. सुसान ब्राऊन मिलरने मांडलेली कल्पना "चार भिंतीच्या बाहेरच्या अत्याचारापेक्षा आतले अत्याचार स्त्री पत्करते", इथे साकार झालेली दिसते. आर्थिक शोषणाच्या लढाईतील जेत्यांच्या घरच्या गुलामांचे हे दुःख आहे. कागदोपत्री आणि कायद्यांच्या पुस्तकात काहीही तरतुदी मिळवल्या तरी असुरक्षिततेच्या वातावरणात स्त्री-मुक्ती हे मृगजवळच राहणार.
 जेत्या इंडियातील स्त्रियांनी जसे आपल्या प्रश्नाकडे व्यापक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे तसेच जित भारतातील स्त्रियांनाही या प्रश्नाकडे केवळ आर्थिक शोषणाच्या दृष्टीतून पाहून चालणार नाही. वरकड उत्पादनाच्या निर्मितीपासून तयार झालेला हा जुना रोग आहे. त्याच्या आर्थिक आघाडीवर पुरुष मंडळी लढाईची जमवाजमव करत आहेत. त्याच वेळी भारतातील स्त्रियांना तिहेरी लढाई द्यावी लागणार आहे.
 (१) शेतीत राबणाऱ्या कामकरी, कष्टकरी म्हणून त्या कष्टाचा मोबदला मिळविण्याचा लढा.
 (२) स्त्री म्हणून सहन कराव्या लागणाऱ्या अनेक अन्यायांविरुद्धचा लढा.
 (३) समाजातील असुरक्षितता दूर करून तंत्रज्ञान उघडून देत असलेल्या नवीन दालनात शांततेच्या काळातील स्त्रीच्या सर्वश्रेष्ठ अशा देणग्यांचा उपयोग करणे.
 या तीनही आघाड्यांवर सर्व स्त्रियांची एकजूट होऊ शकते. शेतीचे शोषण कायमचे बंद करण्यात प्रत्येक स्त्रीला स्वारस्य आहे, अगदी त्या शोषणातून आर्थिक लाभ मिळणाऱ्या स्त्रियांनासुद्धा.
 "कामकरी स्त्रियांची आघाडी"
 उत्पादक श्रमात पूर्णपणे भाग घेत असताना त्याबरोबरच सगळ्या घरकामाचाही गाडा वाहायचा हे सुशिक्षित स्त्रियांचे आजकालचे दुःख शेतकरी स्त्री पिढ्यान्पिढ्या वाहत असते. पंधरा, सोळा तास रोज काम. त्यात सुटी नाही, अगदी आजारपणातसुद्धा नाही. बाळंतपणाची सुटी नाही. लहान पोरसुद्धा पाठुंगळी बांधून नाहीतर झुडुपाच्या सावलीला झोपवून काम ओढलंच पाहिजे. मजुरीवर असेल तर वेतन अपुरे. घरची शेती असेल तर फक्त नेसूची लुगडी आणि भाकरीवरच बोळवण. शेतीमालाच्या भावाच्या मागणीला स्त्रियांचा पाठिंबा राहीलच पण या मागणीत बाळंतपण, लहान मुलांना सांभाळायची सोय एवढेच नव्हे तर हातपाय चालेनासे झाल्यानंतर काही पोटापाण्याची तरतूद यांची सोय असली पाहिजे. या योजना नोकरशाहीच्या माध्यमातून येता कामा नयेत. नाहीतर सगळ्या सरकारी योजनांप्रमाणे शेतकऱ्यांच्या डोक्यावर त्यातून आणखी काही साहेबांचीच भर पडेल. स्वतंत्रपणे, कार्यक्षमपणे व व्यावसायिक पातळीवर या सेवा उपलब्ध होतील आणि त्या परवडतील अशी परिस्थिती तयार झाली पाहिजे.
 शेतीवर बहुसंख्येने स्त्रियाच मजुरी करतात. प्रत्येक वर्षातून निदान निम्मे दिवस मजुरीची काहीच शक्यता नसते. रोजगार हमी योजनेच्या कामांवर बहुसंख्येने स्त्रिया जातात, मातीकाम करतात, दगड फोडतात. ही स्त्रीत्वाची कुचेष्टा आहे. ती थांबली पाहिजे. स्त्रीला तिच्या घराजवळ शेतात, तिच्या सवयीचे आणि मगदुराचे काम मिळाले पाहिजे. शेतीतून तयार होणाऱ्या भांडवलातून ग्रामीण भागात रोजगार निर्माण होण्याची स्वयंभू प्रक्रिया जोपर्यंत शासन अटकावून धरीत आहे तोपर्यंत शासनाला ही जबाबदारी घ्यायला लावणे भाग पाडले पाहिजे.
 ग्रामीण स्त्रियांची आघाडी
 स्त्रीचे आर्थिक स्थान काहीही असो, ती कुटुंबाचे ओझे बनली आहे. मुलाला हुंडा द्यावा लागणाऱ्या समाजातही ती ओझे आहे आणि मुलीला हुंडा मिळत असला तरी मुलीचे स्थान तेच. मुलीच्या जन्मापासून घडोघडी आणि पदोपदी तिला मिळणाऱ्या सापत्न वागणुकीचे कारण समाजातील असुरक्षितता हे आहे. या काळात बाहेरच्या जगात मार खाणाऱ्या पुरुष मंडळींनी घरातल्या गुलामांवर काही कमी अन्याय लादलेले नाहीत. एकवेळ दहीवाटीतील तिचा वाटा तिला सहज मिळू लागेल, पण तिचे शिक्षण मध्येच बंद पडू नये यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील. माहेरच्या मालमत्तेतील स्त्रीचा हक्क प्रत्यक्षात आणणे अनेक कुटुंबांत अत्यंत कठीण होईल. जमिनीची वाटणी करत राहिल्याने तुकडेमोड वाढत जाईल आणि सासरी नांदणाऱ्या मुलीचा त्यात अर्थाअर्थी काही फायदाही होणार नाही. शेतकरी स्त्रीला माहेरच्या मालमत्तेत हक्क मिळावयास पाहिजे असेल तर शेतीतून वरकड उत्पन्नाची योग्य प्रमाणात निर्मिती आवश्यक आहे. स्वित्झर्लंडसारख्या देशात जमिनीची वाटणी करण्याला बंदी आहे. पण शेतीत निर्माण होणाऱ्या वरकड उत्पन्नामुळे इतर मुलांना जमिनीच्या तोलामोलाची दुसरी वाटणी शेतकरी बाप देऊ शकतो.
 शेतकरी स्त्रीच्या मालमत्तेचा प्रश्न खरा गंभीर होतो तो सासरचा संसार नासल्यावर. विधवा स्त्रीस कायद्याने दिलेले हक्क क्वचितच पदरात पाडून घेता येतात. तिची रवानगी माहेरी झाली तर माहेरच्या मालमत्तेवरचा हक्क तिने आधीच सोडून दिलेला असतो आणि एरवीही तिला तो मिळण्यासारखा नसतो. स्वतंत्रपणे राहून मोलमजुरी करणे समाजात अशक्य. मग माहेरच्या आधाराने काढता येतील तितके दिवस काढायचे हा एकच पर्याय. काडीमोड कायद्याने दिल्याच्या गोष्टी विरळच. सासरहून काढून लावले म्हणजे काम भागते. कायदेशीर घटस्फोट मिळाला आणि पोटगीचा हुकूम झाला तरी महिन्यामहिन्याला पोटगी प्रत्यक्ष हातात पडणे दुरापास्तच. पोटगीसाठी महिन्या-महिन्याला खेटे घालताना त्या दादल्याची लाचारी नको, पोटगी नसली तरी चालेल असं शंभरदा मनात येऊन जातं. पण पोटाची लाचारी पर्याय ठेवत नाही. महिन्या-महिन्याला पोटगी देण्याची तरतूद ही नोकरमान्या पांढरपेशा समाजाची आहे. शेतकरी समाजाला योग्य अशा व्यवस्थेकरिता वेगळा लढा द्यावा लागेल. बापाच्या घरून जाताना मालमत्तेचा हिस्सा घेऊन सासरी जावे आणि लग्नाची भागीदारी जमली नाही आणि त्यातून बाहेर पडावे लागले तर त्या दिवशी सासरच्या असलेल्या मालमत्तेची वारसा-कायद्याप्रमाणे विभागणी व्हावी हे अगदी तर्कसंगत आणि आवश्यक आहे; बेजबाबदार काडीमोडांना निर्बंध घालण्यासाठी हे आवश्यक आहे.
 पण, शेतकऱ्यांचा लढा शेतकरी संघटनेने जसा शेतीमालाच्या केंद्रस्थानाभोवती बांधलेला आहे तसा शेतकरी स्त्रियांचा लढा असुरक्षितता दूर करण्याभोवती बांधला गेला पाहिजे. एका स्त्रीवरचा हल्ला हा शेतकरी संघटनेच्या प्रत्येक स्त्रीवरचा हल्ला समजून त्याचा प्रतिकार झाला पाहिजे. यासाठी सरकारी यंत्रणा आणि पोलिस व्यवस्था सुधारण्याची वाट पाहणे व्यर्थ आहे. ही कुंपणे मोडत चालली आहेत आणि शेते खाण्याकरिताच त्यांची प्रसिद्धी जास्त. संघटनेचा बिल्ला लावणाऱ्या स्त्रीवर वाकडी नजर टाकण्याची कोणाची हिंमत होऊ नये असे वातावरण संघटनेला तयार करावे लागेल. कोणा गुंडाची हिंमत झाली तर त्याला शासन करण्याकरिता कायद्याने होणाऱ्या शिक्षेचा धोका पत्करूनही संघटनेचे पाईक तयार झाले पाहिजेत. स्त्री-स्वातंत्र्यासाठी लढ्याचे हत्यार सत्याग्रहच राहील. पण कायदेभंगाच्या साधनाला एक नवी विधायक दिशा द्यावी लागेल.
 शेतकरी स्त्रीचा कामगार म्हणून लढा आणि स्त्री म्हणून लढा यशस्वी होणे ही काळाची गरज आहे. पण हे घडवून आणण्यासाठी स्त्रिया जितक्या निर्धाराने उठतील आणि आघाडी बांधतील तितका त्यांचा विजय सहज सुलभ होणार आहे. कारण त्यांचे शत्रू समाजातील असुरक्षितता, भीती हे आहेत.
 स्त्री-मुक्ती म्हणजेच भीतीवर मात. ही मात केल्यानंतरच विज्ञानतंत्रज्ञानाच्या नव्या युगात स्त्री स्वतःच्या अधिकाराने पाऊल टाकू शकेल.
 नवी पहाट
 शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने स्त्रियांच्या दास्याच्या मूळ कारणाविरुद्ध एका बाजूला आघाडी उघडली जात आहे. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला एका नव्या तंत्रज्ञानाच्या युगाची पहाट होत आहे. पाशवी शक्तीच्या जोरावर चालणारी आर्थिक व्यवस्था आणि तंत्रज्ञान दोन्ही मागे पडत आहेत आणि नव्या युगाला लागणारे सर्व गुण, हजारो वर्षांच्या गुलामगिरीची किंमत मोजून, कमावलेली स्त्री पुढे येत आहे. "इंडिया"तील स्त्रियांसमवेत आघाडी बांधून या नव्या युगाचे पाईक होण्याची संधी साधणे हे आजच्या महिला आघाडीचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट असेल.

(प्रथम प्रकाशन : नोव्हेंबर १९८६)

■ ■

 स्त्री म्हणून जन्मल्याचा आनंद
 आयुष्यात एकदाही वाटला नाही.
 या प्रश्नावर
 आजपर्यंत बोलले महाजन बुद्धिजीवी.
 आता आपलं म्हणणं मांडणार आहेत
 लाख लाख शेतकरी स्त्रिया


 शेतकऱ्याच्या घरात मुलगी म्हणून जन्माला
 येण्यासारखं पाप नाही.


 बाईपण कडीकुलुपात ठेवून दोन क्षण मोकळं
 फिरता आलं असतं तर......


 लूटमारीच्या व्यवस्थेत जिंको कोणी, हरो कोणी
 खऱ्या हरतात दोन्ही बाजूच्या स्त्रिया.


 महिला अधिवेशन
 चांदवड,९-१० नोव्हेंबर १९८६