चंद्रभागेच्या वाळवंटी
श्याभा ॥…061485
रुपये २
चंद्रभागेच्या वाळवंटीं
साने गुरुजी
चंद्रभागेच्या वाळवंटी
साने गुरुजी
प्रथमावृत्ति
११ जून, १९७१
किंमत
दोन रुपये
प्रकाशक
हरिभाऊ लिमये
९६८, सदाशिव पेठ,
पुणे ३०.
मुद्रक
गोपाळ मोकाशी
रचना मुद्रणालय, ५६५ शनिवार पेठ, पुणे ३०.
प्रमुख वितरक
आजचा युगधर्म
काया हे पंढरी आत्मा हा विठ्ठल
चिंता करितो विश्वाची
विवेकानंदांचा धर्म
संत तुकाराम
मनोगत
क्षेत्र पंढरपूरचे सुप्रसिद्ध विठ्ठल मंदीर हरिजनांचेसाठी खुले व्हावे म्हणून स्व. सानेगुरुजींनी १९४७ साली आमरण उपोषण सुरू केले होते. प्रत्यक्ष उपोषण सुरू करण्यापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटावरील प्रचंड जाहीर सभेत गुरुजींनी पुन्हां आपली भूमिका विस्ताराने मांडली. विठ्ठल मंदीर प्रवेशासाठी त्यांनी केलेल्या या प्रचार दौऱ्यामुळे सर्व महाराष्ट्र ढवळून निघाला. ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखोबा या सर्वांनी समानतेने पंढरीच्या वाळवंटावर सर्वांना एकत्रित केले म्हणून स्व. गुरुजींना विठ्ठल मंदीरापेक्षां चंद्रभागेचे वाळवंट अधिक श्रेष्ठ वाटत होते. जेथे भेदाभेद नाहीत व सर्व समान आहेत अशा त्या वाळवंटाचा महिमा त्यांना अगाध वाटत असे. आपल्या सर्व भाषणांत धर्मांतील समानतेचा महान आशय त्यांनी महाराष्ट्रीय जनतेला अत्यंत सोप्या भाषेत सांगितला आहे. दंभाने व अहंकाराने भ्रष्ट झालेल्या धर्मावर त्यांनी कोरडे ओढले आहेत. अस्पृश्यतेविरुद्ध बंड करून उठलेल्या त्यांच्या भावनांचे दर्शन या अनेक भाषणांत दिसून येते.
१५ ऑगस्ट १९४८ ते १० जून १९५० या कालांत संतांचे कार्यावर स्व. सानेगुरुजींनी साधना साप्ताहिकांत व इतरत्र जे लिखाण केले आहे ते सर्व एकत्रित करून वाचकांना हे पुस्तक उपलब्ध करून दिले आहे. धर्मासारख्या गंभीर विषयावर लिहितांना गुरुजींनी आपल्या सोप्या, साध्या व सरळ भाषेत आजचा युगधर्म विशद् करून सांगितला आहे. तो अत्यंत हृदयस्पर्शी असून वाचकांना तो आवडेल अशी मला आशा आहे. महाराष्ट्रांतील सुप्रसिद्ध विचारवंत श्री. दि. के. बेडेकर यांनी या पुस्तकास प्रस्तावना लिहून दिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.
गुरुजींच्या या पुस्तकासाठी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांनी पुरस्कारार्थ चार शब्द लिहून दिले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
गुरुजींचे विचारवाङ्मय प्रसिद्ध करण्यासाठी साधना साप्ताहिकांतील मजकूर वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल मी साधनाकारांचे आभार मानतो.
पुस्तकाच्या अंतरंग-बहिरंग छपाईची जबाबदारी माझे मित्र गोपाळ मोकाशी, सर्जेराव घोरपडे व श्रीपाद केळकर यांनी घेतली. त्याचप्रमाणे लिखाणाचे कामी श्री. नीलकंठ काळे, बापू वैद्य व श्री. पूरकर या मित्रांनी सतत श्रम घेतले. त्यामुळे माझे कामाचा बराचसा भार कमी झाला. "समता मंडळा" च्या सभासदांनी या कार्यात रस घेऊन सदैव सहकार्य दिले. १९४२ च्या चळवळीतील माझे मित्र श्री. बापू साळवी, बाबुराव चव्हाण, अनंतराव मेमाणे, विनायक राजगुरु, मुरलीधर गंधे यांचे तर मला सदैव सहकार्य आहे. या सर्व मित्रांचे त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल व मदतीबद्दल मनःपूर्वक आभार मानून माझे मनोगत संपवतो.
बंड : एका खऱ्या धर्मश्रद्धेचे
सानेगुरुजींच्या पांच लेखांचा संग्रह या लहानशा पुस्तकात आहे. गतवर्षी त्यांच्या काही लेखांचा संग्रह 'स्वप्न आणि सत्य' या पुस्तकात श्री. लिमये यांनी केला होता. गुरुजींनी लिहिलेले सारे लेख अशा लहान- लहान पुस्तिकांतून आज वाचकांना मिळायला हवेत. श्री. लिमये यांनी म्हणूनच हा उपक्रम हाती घेतला आहे.
या पुस्तिकेतील पांचही लेख धर्मावर आहेत. ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, तुकाराम प्रभृती संतांनी कोणता धर्म सांगितला? आधुनिक संत स्वामी विवेकानंद यांनी कोणती शिकवण दिली? आजचा युगधर्म कोणता? यावर गुरुजींनी आपल्या विशिष्ट शैलीत केलेले निवेदन वाचताना ते आपल्याशी बोलत आहेत असे वाटते. माणसे माणसासारखी वागत नाहीत, खोटाच धर्म मानून दंभाने व अहंकाराने स्वतःला व इतरांना दुःखी करतात. गुरुजींना हे पाहवत नाही. त्यांचे मन बंड करून उठते. एका प्रेमळ मनाचे हे हळवे बंड आहे. अस्पृश्यतेच्या अन्यायाने होरपळलेल्या व दारिद्याने गांजलेल्या माणसांच्या मनांत आज आग धुमसत आहे. यांतील तरुणांची मने आतील धगीने तापली आहेत, आणि बाहेरील वाढत्या दंभाने व हिंसेमुळे पेटत आहेत. अशा वेळी गुरुजींचे मन व्यथित झाले असते, कदाचित धर्ममार्तंडांना मानवतेच्या धर्माची जाणीव करून देण्याच्या प्रयत्नाबद्दल निराश होऊन ते तरुणांशी मोकळ्या मनाने बोलू लागले असते.
धर्मासंबंधीचे हे पाच लेख तरुणांनी वाचावे आणि त्यांचे मनन करावे. पण गुरुजींनी ते लिहिले आहेत ते वयस्क माणसांसाठी. धर्माचा अर्थ त्यांना कळेनासा झाला आहे असे वाटून त्यांच्या धर्मविषयक जडतेला गुरुजी धक्का देऊ पाहात आहेत. मंदिराची दारे उघडी करा, अस्पृश्यांना माणसे म्हणून वागवा, अशी आळवणी ते या लोकांना करीत आहेत. यांची जडता या धक्क्याने हादरेल का? गेल्या शंभर वर्षात हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती धर्ममार्तंडांची जडता हलली आहे का? खेड्यापाड्यांतून राहणारा ग्रामीण समाज आपले दुराग्रह व अंधश्रद्धा टाकून देत आहे का? या साऱ्या प्रश्नांनी गुरुजींचे अंतःकरण केवढे दुःखी झाले असते, याची मला कल्पनाही करवत नाही.
माणसाने मनुष्यत्वाची जाणीव अंगी बाणवावी, हे सांगणे सोपे आहे. पण जितके सोपे आहे तितके इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा प्रत्यक्ष आचरणात आणायला अवघड आहे. गुरुजींचे लेख वाचताना एकसारखी हीच व्यथा मनाला जाळीत राहते. प्राचीन ऋषी, इतिहासकाळातील संतमहात्मे आणि अलीकडचे थोर पुरुष जे सांगत आले ते उघड व सोपे असून संस्कृतीच्या, सभ्यतेच्या व रूढ आचारांच्या असह्य भाराखाली दडपून निष्प्रभ होते. गुरुजींनी दिलेली जुनीनवी वचने वाचून मानवतेचा धर्म कळतो, पण खोट्या धर्माची प्रचंड बाधक शक्तीही जाणवते.
आज असा अंधार आहे. गुरुजींच्या अंतःकरणातून प्रकाशणाऱ्या मानवधर्माचे किरण या अंधाराला जास्तच भीषण रूप देतात; पण एक दिलासा मिळतो की काही हृदयांचे स्पंदन मानवतेच्या करुणेने होत राहते. त्या स्पंदनाची चाहूल या पुस्तिकेतून उत्कटतेने लागते. गुरुजींचे वाङमय अशा पुस्तिकांच्या द्वारे उपलब्ध करून देण्याच्या ह्या उपक्रमाबद्दल श्री. लिमये यांचे अभिनंदन.
- दि. के. बेडेकर
आजचा युगधर्म
हिंदुधर्मं आहे तोवर मंदिर राहणार. या मंदिराला मंदिरपणा यायला हवें असेल, तेथील मूर्तीला देवपण हवें असेल, तर देवाच्या सर्व लेकरांना तेथे जायला वाव हवा. देवाचा प्रकाश सर्वांसाठी, त्याची हवा सर्वांसाठी, त्याचा पाऊस सर्वांसाठीं, त्याप्रमाणें देवाचें मंदिरहि सर्वांसाठी. देवाची मूर्ति सर्वांसाठी. जेथें सर्वांना जातां येत नाहीं, ती देवाची मूर्ति नसून आपल्या अहंकाराची, वर्णाभिमानाची ती मूर्ति आहे. गीतेच्या सोळाव्या अध्यायांत म्हटलें आहे कीं, "आढयो ऽ भिजनवानस्मि" म्हणणारा आसुरी वृत्तीचा समजावा. जो कोणी म्हणेल कीं, मी "अभिजतवान्" मोठ्या कुळांतील, तो आसुरी वृत्तीचा. कोणी तुच्छ नाहीं, उच्च नाहीं. समाजसेवेची सारी कर्मे करणारेहि पवित्र आहेत. आणि तीं कमें न करणारेहि पवित्र आहेत. हिंदुधर्माची ही खरी थोरवी. हा मोठेपणा. म्हणून समाजाच्या सेवेचीं अनेक कर्मे करून लोक मुक्त झाले.
निर्गुण निराकाराला आम्ही सगुण रूप दिलें. मूर्तीसमोर उभे राहून तिच्यांत विश्वंभर बघायचा. आणि मूर्तीत देव बघायला शिकून सर्व मानवी मूर्तीत, सर्व चराचरांत देव बघायला शिकायचें. सर्वात तुच्छ वस्तु म्हणजे दगड, त्या दगडांतही आम्ही परमेश्वराचें पावित्र्य नि सौंदर्य बघायला शिकायचे हे यांतील रहस्य. दगडाच्या मूर्तीतही देव बघणारे अधिक चैतन्यमय माणसांत नाहीं का बघणार? तुकाराम महाराज म्हणतात -
"जिकडे तिकडे देखें उभा ।
अवघा चैतन्याचा गाभा"
मूर्तिपूजा करून शेवटी या अनुभवाकडे यावयाचें, तर त्या मूर्तीजवळहि आम्ही सर्वांना येऊ देत नाहीं. अरे, ती विश्वंभराची ना मूर्ति? का तुझ्या अहंकाराची मूर्ति? मूर्तिपूजेतील थोर गोडी आम्ही विसरलों, आणि तेथेंहि भेद उभे केले. परमेश्वराची स्तुति करतांना म्हणावयाचें 'त्वमेव माता पिता त्वमेव!' आणि त्या आईजवळ तिची लेकरें जाऊ लागली म्हणजे त्यांना दूर लोटावयाचें! हा कां धर्म? त्या जगाच्या आईजवळ तिची लेकरें कां जाऊं शकत नाहीत? याचा अर्थ आपणांजवळ खरा धर्म राहिला नाहीं! निव्वळ थोतांड शिल्लक राहिलें आहे. अस्पृश्यांचा हा प्रश्न हजारों वर्षांचा जुना आहे. आमच्या धर्मामध्यें उच्चनीच अशा प्रकारचे भेद नाहींत. गीता तर म्हणते, 'जो दुसऱ्याला नीच समजतो, तुच्छ समजतो तो स्वतःच राक्षस आहे. "आढ्योपि जनवानस्मि कोन्योस्ति सदृशोमया." 'माझ्या सारखा मोठा कोण?' असें म्हणणारे राक्षस आहेत. असे गीता सांगते.
संतांनीही हेंच सांगितले. इतरत्र तुम्ही तुमचा अहंकार ठेवा; पण परमेश्वराजवळ तरी जातपात विसरून एकरूप होऊन जा, असा संतांचा संदेश आहे. वारकरी पंथ सहाशें वर्षांचा जुना आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखोबा यांनी सर्वांना समानतेनें या पंढरीच्या वाळवंटावर आणलें. म्हणून त्या विठ्ठल मंदिरापेक्षाही हें चंद्रभागेचें वाळवंट मला श्रेष्ठ वाटतें. कारण येथे भेदाभेद नाही. येथें हरिजन असो, मराठा असो, ब्राह्मण असो, कोणी असो, या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सर्व समान. म्हणूनच या वाळवंटाचा महिमा अगाध आहे. आजपर्यंत आमच्या धर्मातील संत अन्यायाविरुद्ध झगडत आले आहेत.
अशा या पुण्यवान नगरीमध्ये संतांनी सर्वांना एकत्र आणले. प्रत्येक वेळेला बंड करूनच संतांनी मार्ग काढला आहे. ज्ञानेश्वरांनी संस्कृतांतील गीता प्राकृतांत आणली. यावेळी सनातन्यांनी त्यांना विरोध केला. धर्माचें सार, 'आबाल सुबोध' असें करण्याचा ज्ञानेश्वरांनी प्रयत्न केला. "स्त्री शूद्र प्रतिभे सामावलें." असें ज्ञानेश्वरीत म्हटलें आहे. माणसाला जगण्यासाठी भाकरी पाहिजे. त्याप्रमाणें ज्ञानाची व विचारांची भाकरीही मिळाली पाहिजे.
नारदमुनींनी त्यांच्या स्मृतीमध्यें म्हटलें आहे, "श्रृण्वन्तु सर्वे अमृतस्य पुत्राः" याचा अर्थ असा कीं कोणी तुच्छ नाही, कोणी उच्च नाहीं. धर्माच्या दृष्टीने सर्व एकसारखे आहेत. अहंकाराचा पडदा आपल्या डोळ्यापुढून दूर केलात तर
खऱ्या धर्माचा आत्मा तुम्हाला सांपडेल असे वेद म्हणतो.
"अनहं वेदनं सिद्धि अहंवेदनमापदः" असें म्हटले आहे. वेद
सर्व धर्मांना ईश्वराजवळ नम्र होण्यासाठी सांगतो. हे सर्व
वारकरी पंथाने प्रचारात आणले.
"सतु निरतिशयः प्रेममय" असे परमेश्वराविषयीं
म्हणतात. ईश्वर प्रेमाचा सागर आहे. तुम्हाला परमेश्वर
भेटावा असे वाटत असेल तर प्रेमळ बना. दुस-याला प्रेम
द्या. प्रेमाला कृतीत प्रकट व्हावयाची इच्छा असते. प्रेमाचे
काहीतरी प्रतीक हवे. मग ते रुक्मिणीचे तुलसीदल असो,
द्रौपदीचे भाजीचे पान असो, शबरीची बोरे असोत, सुदाम्याचे
पोहे असोत. काही तरी बाह्य चिन्ह हवे. प्रेम सर्वस्वदाना-
साठी अधीर असते. दिव्याशिवाय प्रेमाला चैनच पडत नाही.
परमेश्वर सच्चिदानंद स्वरूपी आहे. सत् म्हणजे प्रेम
आणि चित् म्हणजे सत्य, आणि आनंद म्हणजे जीवनामध्ये
प्रेमभाव, ज्ञान आणा, आनंद आणा. सर्वत्र आत्मा बघायला
शिका हेंच ज्ञान आणि हेच ब्रह्मज्ञान हे जाणा.
लहान मुलांना हे ब्रह्मज्ञान उपजतच असते. त्यांची सर्व
प्राणीमात्रावर माया असते; पण आपण त्यांना मागें खेचतों.
सर्व प्राणीमात्रांवर दया करणें; सर्वांना सारखें लेखणें हा
ब्रह्मज्ञानाचा आत्मा आहे. बृहन् म्हणजे मोठा. ब्रह्मज्ञान
म्हणजे मोठी दृष्टी. अशा या ब्रह्मज्ञानाच्या आधारावर
हरिजनांना जवळ घेणें हें आपले धर्मकर्तव्य आहे. कोट्यवधि
भावांना दूर ठेवण्यात स्वधर्म नाही आणि स्वराज्य तर
नाहींच नाहीं ! "प्रभवार्थाय भूतानां" ही धर्माची व्याख्या आहे. त्या दृष्टीनें सात कोटी भावांना दूर ठेवून आनंदप्राप्ति होणार नाहीं. संध्येमध्यें आपण म्हणतो, "सर्वेषामविरोधेन ब्रह्मकर्मसमारभंत" सर्वांना श्रेष्ठ समजणे हाच आजचा युगधर्म आहे. धर्माचा आत्मा बदलणार नाहीं; पण रूढी, आचारविचार, चालीरिती बदलाव्याच लागतात. कालमाना- प्रमाणें चालीरितींत बदल केला नाहीत तर नष्ट व्हाल.
आम्ही गोलंकार करतो आहोंत, असें सनातनी म्हणतात. पण या सबगोलंकाराचा अर्थ सर्वांना एकत्र घेणें असाच आहे. वर्णाश्रमधर्माप्रमाणें चाला असें आजचे आमचे विरोधी शास्त्री कधीं कधीं आम्हाला सांगतात; पण वर्णाश्रम राहीलाय कोठें? सर्वांनी आपापले व्यवहार सोडले आहेत. ब्राह्मणांनी वैश्याचें कर्म करण्यास सुरुवात केली आहे. शाळेमध्ये हरिजन शिक्षकाचें काम करतात. कोठें राहिला वर्णाश्रम? पण वर्णाश्रमाचा अर्थच वेगळा आहे. वर्ण म्हणजे रंग. आपापल्या बुद्धीचा रंग बघून काम करणें म्हणजे वर्णाश्रम पाळणें असें आहे. हाच त्याचा खरा अर्थ आहे. सबगोलंकार आजच्या जगांत आम्ही करतो आहोत, ही जी सनातन्यांची कल्पना आहे ती चुकीची आहे. यंत्रयुगानें सबगोलंकार केला, आम्ही नाही.
आज आपण सर्व गिरणींचा कपडा वापरतों. कोठें गेले विणकर? घरांचे वर पत्रे घालतो. राहील का कुंभारांची जात? अशा परिस्थितीमध्यें वर्णाश्रम राहूच शकत नाहीं. परंतु याहि गोष्टी आपल्या धर्माला मान्य आहेत. धर्माचें सर्वांत मोठें तत्त्व हेंच आहे की, कोणतेहि समाजसेवेचे काम करणारा पुरुष कधींही अपवित्र नसतो. आजपर्यंतचा इतिहास हा त्याचा दाखला आहे. सेना न्हावी न्हाव्याचा धंदा करून पावन झाला. चोखोबाची बाग प्रत्यक्ष विठोबा राखी. सजन कसायाची घडी धरण्यासाठीं परमेश्वर धांवला. सर्वांना परमेश्वर मुक्त करण्यासाठीं धांवला आहे. हाच आमच्या धर्माचा महीमा आहे. परमेश्वर आपल्या सर्व भक्तांसाठीं धावतो. जनाबाईबरोबर दळण दळतो, नामदेवाच्या शिंपीकामात मदत करतो, कबीराबरोबर शेले विणतो, तो परमात्मा सर्वत्र आहे. सर्वत्र परमात्मा पहाणे हेंच धर्माचें खरें तत्वज्ञान आहे. आपल्या देवीला अठरा हात आहेत. अष्टदशभुजा म्हणतात तिला. त्यायोगें परमेश्वरानें असें दाखवून दिले आहे कीं, अठरा पगड जाती या जणूं परमेश्वराचे हातच आहेत. आणि म्हणून समाजसेवेचें काम पवित्र आहे. फक्त अंतःकरण ओतून ते करा म्हणजे झाले. परंतु आम्ही धर्माप्रमाणें वागतच नाही. आम्हांला धर्माचा अर्थ मुळीं कळतच नाही.
सर्वांना हृदयाशी धरावयास शिकणे यांतच धर्माचा आत्मा आहे. यांतच स्वराज्याचा अर्थ सामावलेला आहे. "सर्वेऽ अपि सुखिनः संतु सर्वे संतु निरामयाः" अशी आपल्या धर्माची इच्छा आहे, ही आपल्या धर्माची शिकवण आहे; पण आपण आजपर्यंत आपल्या धर्मबांधवांना दूर ठेवत आलों आहोंत. लहानपणी आमचेकडे समसू नांवाचा एक माझे वडलांचा मुसलमान मित्र येई. त्याला मीच सुपारी कातरून देत असे. पण गांवचा महार आला तर त्याची सावलीही घेणें आम्ही पाप समजूं. या गोष्टींची आता आठवण झाली म्हणजे असे वाटते की, मी शंभर वेळां जरी मेलों तरीही तें पाप नाहीसे होणार नाहीं. आपल्या धर्मबांधवांना दूर ठेवण्यांत धर्म नाहीं. तो निव्वळ माणूसघाणेपणा आहे. आम्ही ब्राह्मण, वैश्य, क्षत्रीय या वर्णांच्या लोकांनी धर्मं सोडला. पण शद्रांनी अजूनही सोडला नाहीं. त्यांनी आपला प्राचीन धर्म चालूंच ठेवला आहे. ब्राह्मण नोक-या करूं लागले. त्यांनी ब्रह्मकर्म टाकलें, वैश्यांनी विलायती माल विकायला सुरुवात करून राष्ट्राची राखरांगोळी करून टाकली. क्षत्रीयांनी तलवार धार लावून तयार ठेवावयाचे ऐवजी बोथट करून घेतली. पण सेवेचें काम ज्या हरिजन बांधवांचेकडे आपण प्राचीन काळापासून सोपवून ठेवलें आहे, तें आजतागायत करीत आले आहेत. सत्यार्थानें तेच खरे हिंदुधर्माचे आहेत. आणि याबद्दल त्यांना बक्षीस काय, तर आम्ही त्यांना दूर ठेवायचें? आम्ही आमची कर्मे टाकून दिलीं, पण आम्हा धर्मभ्रष्टांना मंदिरात प्रवेश आहे. परंतु धर्माप्रमाणे चालणाऱ्या हरिजनबंधूंना मंदिरांत प्रवेश कां नसावा? लोकमान्यांनी तर आपल्या मुलाला सांगितलें कीं, "बाबारे, तूं चांभाराचें दुकान घाल, पण नेकीनें व्यवहार कर." त्यांना कधीं चांभाराचा धंदा अपवित्र वाटला नाहीं. कारण तोही एक समाजसेवेचाच धंदा आहे. गुणधर्म विभागशः म्हणजे वृत्तीप्रमाणे काम करणें, हें लक्षांत आणल्यास आपणांस आपल्या धर्माचा उदारपणा दिसून येईल.
पूर्वी काशीयात्रेला जायचें म्हणजे मृत्युपत्र करून ठेवावे लागे. आतां आठ हजार मैलांवरचा माणूस अडीच दिवसांमध्यें येतो इथें. जगांतली कोणतीही बातमी सर्वत्र अर्ध्या मिनिटांत कळविता येते. काळ बदलत चालला आहे याची जाणीव ठेवा. आम्ही सप्तश्रृंगीला गेलो होतो. तेथें हजारो पाय-या. त्या पाय-यांना भाविक नमस्कार करीत पण पुढे जाण्यासाठी, ध्येयाकडे जाण्यासाठी तिच्यावरच पाय ठेवून पुढे जात. त्याप्रमाणे मागल्या पिढ्यांना वंदन करून आपण पुढला मार्ग आक्रमू. नदी जर थांबली तर तिचें डबके बनेल. आपली संस्कृतीही आघाता प्रत्याघाताने पवित्र बनत आली आहे, सोने जाळून जसा त्याचा कस वाढतो. एका काळांत स्मृतींच्या सम्मतीने मुलींच्या मुंजी होत असत. आज होतात कां?
चौऱ्यांशी लक्ष योनींनंतर श्रेष्ठ मानव जन्म प्राप्त होतो असें म्हणतात. त्या सर्व चौऱ्यांशी लक्ष योनी तुम्हाला घरा-दारांत, देवळांत चालतात. पण ज्याला श्रेष्ठ मानवजन्म प्राप्त झाला आहे असा एखादा हरिजन तुमच्या घरांत किंवा देवळांत आला कीं, देऊळ किंवा घर बाटते. कुत्र्यामांजरावर प्रेम करणाऱ्या तुमच्या हृदयांत माणसाविषयी प्रेमभाव नाहीं का निर्माण होत? गीतेमध्यें म्हटलें आहे -
"अवजानन्ति मांमूढाः
मानुषि तनुमाश्रितम्"
केवढी विशाल दृष्टि - परमेश्वर म्हणजे प्रेमसागर. परमेश्वराला पाहणे म्हणजे प्रेममय होणें. प्रेममय होणें म्हणजेच भक्ति. ज्ञानेश्वर महाराज म्हणत -
तै पाविसी अव्यंगधाम-
नौखालींत हत्त्याकांड सुरू झाले. महाराष्ट्रांत कोणी म्हणू लागले, "बदला घ्या". मी मनांत म्हणे, नौखालीचा हा धडा नव्हे. द्वेषाची लाट आणण्याऐवजी प्रेमाची लाट आणून हरिजनांस जवळ घेणें हा या हत्याकांडाचा धडा आहे. बंगालनेंहि तोच धडा घेतला. तिकडील सव्वीस शास्त्री-पंडितांनी अस्पृश्यता निवारण करा म्हणून पत्रक काढलें. टाइम्सनेंहि लिहिलें कीं, बंगालमध्यें आज अस्पृश्यता नाही. हा नौखालीचा धडा आहे. अस्पृश्य वस्तींतील किंकाळी ऐकून स्पृश्य धांवले नाहींत. स्पृश्यांची किंकाळी ऐकून अस्पृश्य धावले नाहींत. दोघे अलग राहीले. दोघे मेले. अलग राहणें म्हणजे मरणें ही गोष्ट पूर्व बंगालमधील हिंदु समजले, आणि त्यांनी अस्पृश्यता आज नष्ट केली.
थोर पंडित अस्पृश्यतेला आधार नाहीं असें सांगत आहेत. आणि त्या त्या काळाला अनुरूप स्मृति लिहिल्या जात. एका ऋषीचें मत दुसऱ्या ऋषीच्या मतास मिळत नाहीं. कारण त्या त्या स्मृति त्या त्या विशिष्ट काळच्या. गेलीं हजार दीड हजार वर्षे आम्ही नवीन विचार केला नाहीं. नवीन स्मृति लिहिली नाहीं. जुन्या स्मृति पढत बसलों. भाष्यांवर भाष्ये रचीत बसलों स्वतंत्र बुद्धि जणूं मेली. डॉ. केतकर लिहितात, "स्वतंत्रबुद्धि असती तर मुसलमानांसहि आम्ही आमच्यांत घेऊन त्यांचा एक सांप्रदाय मान्य केला असता," परंतु संग्राहक व कालानुसार फरक करणारी बुद्धीच गेली. लोकमान्य टिळक म्हणाले होते, "मला एक स्मृति लिहायची आहे." त्या महापुरुषाला वेळ मिळाला नाहीं. त्यांनी लिहिली असती तर का तींत शिवाशिव त्यांनी घातली असती? काळाप्रमाणें बदल करणें यांत धर्मता आहे. ही धर्मताच मेली. म्हणून तुम्हां आम्हांला मरणकळा आली. आणि शेवटीं स्मृतीपेक्षां श्रुतीलाच महत्व. या श्रुतीसुद्धां "अग्नि थंड आहे म्हणून म्हण तील, तर मी मानणार नाहीं." असें आद्य शंकराचार्य म्हणतात. म्हणून शेवटी "आत्मा सर्वत्र आहे तो पहा. तुझ्या प्रमाणे सर्वांना सुखदुःख आहे, मान आहे, स्वाभिमान आहे. कोणाला हिडीसफिडीस करूं नको. सर्वांची प्रतिष्ठा सांभाळ."- यांतच धर्मसार येऊन जातें. कारण हा "प्रत्यक्षावगम धर्म" आहे. शेवटी समर्थहि म्हणतात:-
"आपणांस चिमोटा घेतला ।
तेणें जीव कासावीस झाला ।
आपणावरून दुसऱ्याला । ओळखीत जावे."
गीतेंतील शास्त्रप्रामाण्य कोणतें? "इति गुहयतमशास्त्रमिद मुक्त मयावद्य" अरे, तुला मी हें शास्त्र सांगत आहे असें भगवान म्हणतात. भगवंतांनी सांगितलेलें हें शास्त्र शिवाशिवीचें नव्हे. सर्वांना मोक्ष देणारें हें शास्त्र. आपापली कामें नीट करा नि मुक्त व्हा, असें सांगणारें हें शास्त्र. आपापल्या गुणाप्रमाणें कर्मे करा. सेवेची सर्व कर्मे पवित्र. इतर सटरफटर सर्व धर्म भगवंतांनी त्याज्य मानले. पहिल्या अध्यायांत अर्जुन "कुलधर्म, जातिधर्म" सतरा धर्म पुढें मांडतो. माझ्या मतें {{center|"सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज"
या चरणात या सर्वांना उत्तर आहे. हे सारे क्षुद्र धर्म, बुरसटलेले धर्म, अहंकारजन्य धर्म फेंकून, मी सांगतो तो धर्म मान असें भगवान सांगत आहे. आणि तो धर्म म्हणजे-
विन्दति मानवः"
रूढी म्हणजे माझा धर्म नव्हे. सहानुभूति म्हणजे माझा धर्म. मी प्रेमधर्माचा उपासक आहे. खरी धर्मवृत्ति सर्वांतच असते. रशियांतहि या महायुद्धांत लाखो लोक चर्चमध्यें जाऊन प्रार्थना करीत. मानव प्राणी जोंवर आहे तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपांत धर्म राहणारच. तो उत्तरोत्तर उदात्त होत जाईल.
एका विचारवंतानें फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्र्यास विचारले, "तुम्ही धर्म अफू म्हणतां; परंतु मनुष्य प्राणी लाखों स्थित्यंतरातून आला. सृष्टीच्या क्रांति-उत्क्रांतीचें परिणत फळ म्हणजे मनुष्य. पाणी, झाडें-माडें, पशुपक्षी यांतूनच मनुष्य आला. लाखों योनींचे हे ठसे मानवी मनावर आहेत. विशाल सहानुभूतीच्या माणसास या विश्वाविषयीं प्रेम वाटतें. कारण या सर्वांतून तो आला आहे. एकेकाळीं तो तृणांत होता, फुलांत होता; पांखरांत होता, पशूंत होता, ताऱ्यांत होता, वाऱ्यांत होता. तो विश्वांत उभा राहतो. सर्वत्र त्याला स्वतःचें रूप दिसते. ही सारी माझी. "वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें" असे त्याला वाटतें. हा अनुभव शास्त्रीय आहे. ते अनंत ठसे जागे होतात. आणि हे विश्वप्रेमाचें संगीत सुरू होतें. ही भावना भ्रम नव्हे, अफू नव्हे. ही भावना म्हणजे धर्म." फ्राईड लिहितो, "या दृष्टीनें मी धर्माचा विचारच केला नाहीं." खरी गोष्ट हीच आहे. धर्माची अनुभूति म्हणजे सर्वत्र एकतेचा थोर अनुभव. या धर्माचा मी पुजारी आहे. आणि हिंदुधर्माची थोरवी यांतच आहे. अद्वैत, भेदांमध्यें अभेद पाहण्याची दृष्टी, सर्वत्र आत्मा बघ, जळीस्थळीं परमात्मा आहे, असें घोषणारा हा हिंदुधर्म आहे. अनेक साधुसंतांनी हे अनुभव घेतले. हा प्रेमधर्म त्यांनी शिकवला. हिंदुधर्माचें हे खरें विशुद्ध स्वरूप, ते प्रकट व्हावें असें मला वाटते. हिंदुधर्म म्हणजे का शिवाशिवी, रूढींचें गांठोडें? माझ्या या सातसात कोटी भावांनी कंटाळून कंटाळून सोडून जातो हिंदुधर्म म्हणावें आणि आम्हांला त्याचे दुःख वाटू नये? स्वामी विवेकानंद, रामतीर्थ यांनी हिंदुधर्माची थोरवी जगास पटविली. ती कशाच्या जोरावर? हिंदुधर्माचीं उदारता प्रकट व्हावी म्हणून. धर्म म्हणजे समुद्रात आंघोळ करणे नव्हे, वडावर जाणे नव्हे. धर्मं म्हणजे दुसऱ्याच्या भावना ओळखायला शिकणे, इतरांचें सुखदुःख पाहाणे, त्यांच्याशी एकरूप होणे.
+ + +
'काया हे पंढरी आत्मा हा विठ्ठल'
पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचे हृदय. महाराष्ट्राच्या जीवनाची ही किल्ली. पंढरपूरची कळ दाबली तर महाराष्ट्रभर प्रकाश पडेल.
पंढरपूर म्हणजे दक्षिणची काशी. येथील पांडुरंगाचे मंदिर अति प्राचीन. जवळ जवळ अडीच हजार वर्षाचे. बडवे मंडळी तेथे येऊनच दोन हजार वर्षे झाली. बडवे मंडळी कर्नाटकातून आली. पंढरीचे वारकरी तिकडेही आहेत. कानांत मकरकुंडले घालण्याची दक्षिणेकडचीच पद्धती. आद्य शंकराचार्य पांडुरंगाच्या दर्शनार्थं आले होते. त्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र केले आहे. "देवा, कमरेवर हात ठेवून माझ्या भक्तांना संसारसागर कमरेइतकाच खोल आहे असे का तू दाखवीत आहेस?" असे त्यांनी त्यांत म्हटले आहे. पंढरपूर, बार्शी म्हणजे प्राचीन धर्मसंस्कृतीचा वसौटा. धर्मसंस्कृतीचे माहेरघर. अंबरीष राजा बार्शीचाच. अंबरीषासाठी भगवान आला, पुन्डलीकासाठी पंढरपूरचे परब्रह्म आलें. असे हे प्राचीन पवित्र मंदीरच देवाच्या सर्व लेकरांना मोकळें व्हावे म्हणून मी उपवास सुरू केला होता.
वारकरी पंथ सुरू होण्यापूर्वी जवळजवळ हजार वर्षे हे मंदिर प्रसिद्ध होते. पुढे संतांनी आणखी महिमा वाढवला. नामदेव-ज्ञानदेव उत्तरेची यात्रा करून आले. इस्लामी धर्म येत होता. मलबार किनाऱ्यावर तो कधीपासून आलेला होता. इस्लामी धर्मांतील समतेचा परिणाम संतांच्या मनावर झाल्याशिवाय राहणार नाही. हिंदुधर्म उदार न होईल तर टिकणार नाही असे त्यांना वाटले असावे. मशिदीत सारे समान. हिंदू मंदीरात असे केव्हा होईल? असे विचार त्यांच्या डोक्यात आले असतील, तेव्हा पंढरपूरच्या वाळवंटात तरी भेदभाव, शिवाशिव नको असे त्यांनी ठरविले असावे. साऱ्या महाराष्ट्रातून विठ्ठलनामाचा गजर करीत येथे या. या वाळवंटात एकत्त्व अनुभवा, येथे परस्परांस भेटा. क्षेमलिंगने द्या. आणि नवीन प्रथा सुरू झाली, वाळवंट दणाणले, गजबजले. तुकारामांच्या अभंगात वाळवंटाचा अपार महिमा आहे.
"एकमेकां लोटांगणी येती रे
कठोर हृदये मृदु नवनीते
पाषाणा पाझर फुटती रे,"
असे उचंबळून तुकोबा म्हणतात.
संत बंडखोर होते. संस्कृतातील ज्ञान त्यांनी मराठीत आणले. संत कारुण्यसागर होते. झोपडी झोपडीत त्यांना ज्ञान न्यायचे होते. खरा धर्म न्यायचा होता. त्यांचा छळ झाला. ज्ञानेश्वरांदिकांवर बहिष्कार. कुंभाराचे मडकेही त्यांना मिळू दिले नाही. तुकारामाचे अभंग इंद्रायणीत फेकण्यात आले. एकनाथी भागवत काशीच्या पंडितांनी गंगेत फेकले. संत मेळ्यावर त्यांच्या पालख्या आपण उचलतो, परंतु ते जिवंत असताना त्यांचे आपण छळच केले, परंतु ते डगमगले नाहीत. वाळवंटांत तरी त्यांनी भेदभाव नष्ट केला.
त्याच्या पुढचे पाऊल आपण नको का टाकायला? समाज पुढे जात असतो. नदी थबकली की संपली समुद्राला मिळेपर्यंत ती पुढे जाणार. आपणही अवघाची संसार सुखाचा होईपर्यंत पुढे गेले पाहिजे, परंतु आपण पुढे गेलो नाही. पंढरपूरच्या वाळवंटात एकमेकांना भेटू, परंतु देवाजवळ अजूनही हरिजनांना जाता येत नाही. वारी करून घरी आल्यावर गावात शिवाशिव आहे ती आहेच. शेवटी पंढरपूर स्वतःजवळ आणायचे असते. एकनाथ म्हणतात,
शेवटी स्वतःच्या जीवनात सारे आणायचे असते. परंतु आपण संतांचा मागोवा घेत पुढे गेलो नाही. एखाद्या आईचे मूल पहिले पाऊल टाकते. ती शेजारणीला आनंदाने म्हणते, "बाळ्याने आज पहिले पाऊल टाकले." परंतु चार महिने झाले तरी बाळ्या जर दुसरे पाऊल टाकीत नसेल तर मातेला का आनंद होईल? आपण सहाशे वर्षात दुसरे पाऊल टाकले नाही. संतांनी वाळवंटात सर्वांना जवळ घेतले. आपण मंदिरांत सर्वांना घेऊ या. आपले हे वंशज असे कसे गतीहीन करंटे, असे मनात येऊन संत तडफडत असतील, दुःखाने सुस्कारे सोडीत असतील.
आपण का पूर्वजांच्या पेक्षा अधिक शहाणे असे कोणी विचारतात. आपण पुढच्या काळात असल्यामुळे आपणास पुढचे दिसते. बापाने लहान मुलाला खांद्यावर घेतले तर त्या लहान मुलाला बापापेक्षा अधिक दूरचे दिसेल. मुलगा जर बापाला म्हणेल, "बाबा, ती तिकडून लॉरी येत आहे, दूर व्हा. मला दिसते आहे." तर बाप का असे म्हणेल, "गाढवा, मला शिकवतोस? मला दिसत नाही. तुला कशी दिसेल?" आपण मागच्या पिढ्यांच्या खांद्यावर आहोत. आपण पुढचे पाहू शकतो. यात मागील पिढ्यांचा अनादर नाही. उलट पुढे न जाण्यात त्यांचा अनादर आहे. पायरीला नमस्कार करायचा, परंतु तिच्यावर पाय ठेवूनच पुढे जायचे, उंच चढायचे. तेथेच घुटमळत नाही बसायचे. ती ती पिढी एकेक पायरी वर जात असावी. ध्येयमंदिराकडे जात असावी.
आपण काळाप्रमाणे बदल करायला हवा. आजूबाजूची हवा पाहून वागावे लागतें. तसे न करू तर मरूं. थंडीचे दिवस आले तर आपण गरम पांघरू. उन्हाळयाचे दिवस आले तर पातळ कपडे पेहरू. थंडीत उघडे बसू तर गारठून मरू. उन्हाळ्यात घोंगड्या पांघरू तर घामाघूम होऊन गुदमरून मरू.
थंडीच्या दिवसांत कढत चहाचा घोट घ्याल. उन्हाळयाचे दिवसांत थंड सरबताचा घोट घ्याल. हवा बघून आपण कपड्यालत्यात बदल करतो, मग डोक्यात नको का बदल करायला? १९४७ सालात वावरायचे आणि डोके का त्रेता युगातील ठेवायचे? आज जगात नवीन विचारांची वादळे आहेत. समाजवादी क्रांतीचे नगारे वाजत आहेत. इन्किलाबची गर्जना होत आहे. समतेचा घोष होत आहे. अशा वेळेस तुम्ही आम्ही शिवू नकोची तुणतुणी वाजवीत बसायचे? जरा काळ वेळ पाहा. सारी दुनिया जवळ जवळ येत आहे. सारे जग जणू तिमजली घर झालें आहे. अमेरिकेत काय बोलले जाते, काय होते, ते मुंबईत लगेच वर्तमानपत्राच्या कचेरीत आपोआप यंत्राने लिहिले जाते. बंधूंनो, दूर राहायचे हे दिवस नाहीत. डबकी करून बसण्याचे हे दिवस नाहीत. मोठी दृष्टी घ्या. विचारांत, आचारांत उदार दृष्टी आणा.
धर्मांत दोन भाग असतात. यम नि नियम. यम म्हणजे कधी न बदलणारी शाश्वत सत्ये. खरे बोलावे, आत्मा अमर आहे, सर्वत्र आत्मतत्व पहा- या तत्वांना यम म्हणतात. ही तत्वे त्रिकालाबाधीत असतात. प्रभु रामचंद्र, हरिश्चंद्र यांचा काळ असो, महात्माजींचा असो. सत्याला सोडू नये हा निरपवाद सिद्धान्त आहे. यमात फरक कधी होत नाही. परंतु नियमांत होत असतो. त्या त्या काळी समाजाला फरक करावे लागतात. चालीरिती बदलतात. लहानपणचे कपडे मोठेपणी अंगास येणार नाहीत. असे फरक आपण सदैव करीत होतो. म्हणून तर नाना स्मृति.
पूर्वज फरक करणारे, बदल करणारे होते. स्वतंत्र बुद्धि वापरणारे होते. एकदा एक शास्त्री मला म्हणाले, "गीतेत तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते' असे म्हणले आहे. शास्त्राने सांगितल्यामुळे आम्ही अस्पृश्यता मानतो. दुष्टपणामुळे नव्हे. परंतु मी त्यांना म्हटले, "भगवान जे शास्त्र प्रमाण सांगत आहेत ते तुमचे शिवाशिवीचे शास्त्र नव्हे. ते म्हणतात, 'मया प्रोक्तं शास्त्रम् ' मी जे शास्त्र तुला सांगितले ते प्रमाण मान. ते तर सारे बुरसटलेले धर्म झुगारून द्यायला सांगत होते."
"सोडून सगळे धर्म एका शरण ये मज"– सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, असे ते म्हणत आहेत. ते वेदवादांचे धर्म त्यांना नको होते. श्रेष्ठ, कनिष्ठपणाचे धर्म त्यांना नको होते. समाजाच्या सेवेचे कोणतेही कर्म करणारा मुक्त आहे अशी त्यांची महान शिकवण आहे. "स्वकर्म कुसुमी त्यास पूजूनी मोक्ष मेळवी." सेवेचे कोणतेही कर्म म्हणजे प्रभूची पूजा. श्रीकृष्णाच्या काळी ब्राह्मण क्षत्रियांना वरचे स्थान होते. स्त्रियांना कमी मानू लागले होते. श्रीकृष्ण म्हणतात,
समाजाची सेवा करणाऱ्या सर्वांना ऋषी उचंबळून प्रणाम करीत आहे. रूद्रसूक्तात ऋषी म्हणतो, "कुंभारा तुला प्रणाम; सुतारा तुला प्रणाम; चांभारा तुला प्रणाम." मी लहानपणी हे मंत्र शिकलो. मोठेपणी अर्थ कळू लागला. मी सुटीत गांवी जाऊन शंकराच्या देवळात बसत असे. वेद शिकवणारे भटजी 'चर्माकरेभ्यो नमो'- चांभारा तुला प्रणाम असे म्हणत शंकरावर अभिषेक करीत असत. मीं त्यांना म्हणे, "तुम्ही चांभाराला प्रणाम करीत आहात. पंड्या चांभाराला आणू का मंदिरात?" ते रागावत. म्हणत, "तुला शिंगे फुटली." मी म्हणे, "तुम्ही म्हणता त्याचा असा अर्थ आहे." अर्थरूप होणे म्हणजे धर्म.
बंधूंनो, आपण मोठमोठी तत्वे बडबडतो, परंतु कृती मात्र उफराटी असते. ओठावरचा घास पोटात गेला नाही तर शरीर धष्टपुष्ट होईल का? त्याप्रमाणे जी तत्वे आपण बडबडतो ती कृतीत न आणू, जीवनात न आणू तर समाज समृद्ध होईल का? भगवान श्रीकृष्णाच्या या भूमीत आज सर्वत्र दुःख, दैन्य, दास्य आहे. त्यांच्या गोकुळात तर अपार आनंद होता.
गोकुळांत प्रेमाचा पाऊस पडत होता. "यारे यारे अवघेजण" अशी भगवंतांची हाक होती. तेथे भेदाभेदांचीं भुते नव्हती. वणवे भेदाचे श्रीकृष्णाने गिळून टाकले होते. नवीन पिढीच्या सर्व मुलांना त्याने एकत्र जेवायला बसवलें. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र मिसळून काला केला. त्याने अलग पंक्ति नाही बसवल्या. याचा पाट असा, त्याचा तिरका असला चावटपणा गोकुळात नव्हता. तेथे पेंद्याची भाकरी नी श्रीमंताची पोळी एकत्र मिसळण्यात आली होती. तो गोकुळातील काला आठवा. आकाशातील देवांना त्याचा हेवा वाटला.
आपापल्या बंगल्यात बसून अमृत ओरपून ते कंटाळले होते. ते वैभवाला, एकांडे शिलेदारपणाला कंटाळले. ते यमुनेच्या पाण्यातील मासे बनले. गोपाळकृष्णाच्या हातचे शितकण यमुनेच्या पाण्यात पडत. ते मटकावून ते कृतार्थ होत. त्या एकेका कणात प्रेमाचा सागर होता. मधुरतेचा सिंधू होता. सर्वांसह एकत्र जेवणारा कोठे तो गोपाळकृष्ण आणि अमक्यातमक्याकडे जेवला म्हणून बहिष्कार घालणारे आपण करंटे कोठे? कशाला रामकृष्णाची आपण नावे घ्यावीत? कशाला ती पवित्र मानता? मुलाबाळांना ठेवता?
तो प्रभु रामचंद्र गुह कोळ्याला हृदयाशी धरी. शबरीची उष्टी बोरे खाई. जटायू पक्ष्याचे श्राद्ध करी. वानरांना, अस्वलांना जवळ घेई. आपण रामजन्म करतो. गोकुळ अष्टमीस कृष्णजन्म करतो, परंतु देव जन्मताच मरतो. आज भारत वर्षात देव नाही. जेथे भाऊ भावाची उपेक्षा करीत आहे, भाऊ भावाला शिवू नको म्हणत आहे, भाऊ भावाला जवळ घेत नाही, प्रेमाने कवळा देत नाही, पाणी देत नाही, तेथे कोठला धर्म?
आणि शंकराची मूर्ती म्हणजे मला जणू अंत्यजाची मूर्ती वाटते. त्याच्या नेसू कातडे, हातात कपालपात्र, हाडाचे भांडे, अंगाला धूळ, रक्षा. कोणाचे आहे हे रूप? कोणाची मूर्ती म्हणून महिम्न स्तोत्रात म्हटले आहे की देवा अमंगल स्वरूपातच मांगल्य आहे. महिम्न स्तोत्र रचणाऱ्याला ते दिसले, परंतु तुम्हा आम्हाला ते दिसले नाही. हरिजनांचा, सेवा करणाऱ्यांचा महिमा कळला नाही.
आणि दत्ताची मूर्ती बघा! बरोबर कुत्री आहेत. कधी भणंग वेषाने हिंडत आहेत, त्यातील भावार्थ लक्षात घ्या. देव सर्वत्र आहे. सर्व स्वरूपात आहे. तो बघा. माणसाला दूर नका करू, परंतु आपण सारे माणूसघाणे झालो.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवाची भक्ती मनात असेल तर जाती- व्यक्तिच्या नावाने शून्य करा- "तेथ जाति व्यक्ति पडे बिंदुले." परंतु देवासमोरही आपण जातींचे अहंकार मिरवतो. मुंबईहून मुलगा सुटाबुटात घरी यावा व एकदम आईला भेटायला जावा. आई म्हणेल, "तुझे खोगीर उतरून ये. तो जामानिमा ओटीवर काढून आत ये." त्याप्रमाणे ती जगन्माता म्हणेल, "अरे, मी ब्राह्मण, मी मराठा, मी साळी, मी माळी हे बिल्ले छातीवर लावून माझ्याकडे येऊ नका. सारे विसरून या."
जेथे आपण सारा अहंकार विसरू असे एकतरी स्थान जगात असूदे. बैठकीत, बाजारात, कचेरीत तुझी ऐट आहे. घमेंड आहे, परंतु प्रभुसमोर तरी ती नको. तेथे धुळीतील कण हो. विरघळून जाणारे मातीचे ठिपळ हो. तेथेही अहंकार नेशील तर कसे होईल?
तुकाराम महाराज म्हणतात, "जाळीन मी भेंद । येथे प्रणाम तो वेद- मी सारे भेद झुगारीन. वेदांचा मला आधार आहे." आणि वेदांचा आत्मा त्यांच्याजवळ होता,
"वेदांचा अर्थ तो आम्हासची ठावा ।
येरांनी वहावा भार माथां॥"
'छळीत जो खळ । त्याचा धरावा विटाळ' जो कोणी दुष्ट छळ करीत असेल त्याला दूर उभे करा, परंतु त्याचा तर आम्ही उदोउदो करतो.
समानता हा तर धर्माचा आत्मा. ख्रिस्ती मंदिरात सारे ख्रिस्ती जातात. मशिदीत सारे मुसलमान जातात परंतु आपल्या मंदिरात सारे हिंदू जमू शकत नाहीत. ते का देवाचे मंदिर? देवाजवळ सारे समान. ना कोणी बडा ना छोटा; ना श्रेष्ठ ना कनिष्ठ.
औरंगजेब एकदा शुक्रवारी नमाज पढायला उशीरा गेला. मशिदीत हजारो मुसलमान आधी आले होते. बादशहास पाहून सारे हटो हटो, करून जागा द्या म्हणून बोलू लागले. औरंगजेब संतापून म्हणाला, "कोणी हटू नका. जागच्या जागी बसा. येथे मी बादशहा नाही. तुम्ही प्रजा नाही. एका अल्लासमोर आपण आहोत. मी उशीरा आलो आहे, दारात बसेन."
मुसलमानी धर्मात ही समानता आहे. बाहेर कोणी अमीर असेल, फकीर असेल परंतु मशिदीत तरी सारे समान. आपल्या देवळात आहे का ही स्थिती? तेथेही आपली भांडणे, श्रेष्ठ-कनिष्ठपणाचे वाद. तेथेही सर्वांना प्रवेश नाही. माणसाला दूर करणाऱ्याजवळ देव नसतो. थोर कवी रविन्द्रनाथ यांनी एक सुन्दर गोष्ट कवितेत लिहिली आहे. एक पुजारी देवपूजेसाठी जात असतो. सोवळा आहे तो. हातात पूजेचे ताट आहे. धूपदीप, फुले, उदबत्त्या, कापूर सारे आहे. आपल्या पाठोपाठ कोणीतरी येत आहे असे त्याला वाटले. तो मागे वळून बघतो, "कोण रे तू? हो दूर. शिवशील, सावली पडेल. हो दूर. मी सोवळा आहे. हो दूर. तिकडे चालता हो." असे म्हणत तो मंदिरात येतो, परंतु त्याला मंदिरात देवाची मूर्ती दिसत नाही.
करा रे, वाजवा रे नगारे, देवाची मूर्ती कोणी चोरली. धावा, धावा,' असे तो ओरडतो. चारी दिशांनी लोक येतात, धावतात. त्या पुजाऱ्याने ज्याला हिडीस फिडीस करून घालवलेले असते त्याच्याजवळ सर्वांना मूर्ती दिसते. "पकडा त्या हरामखोराला तो मूर्ती घेऊन जात आहे. केव्हा गेला मंदिरात? पकडा," असे म्हणून सारे धावतात. तो चोर सापडत नाही. ते थकतात. इतक्यात चोर अदृश्य होतो. कोठे गेला? पाताळात गेला की आकाशात? सारे वर खाली चोहोबाजूला टकमक बघू लागतात. इतक्यात समोर चतुर्भुज सावळी मूर्ति त्यांना दिसते. ते लोटांगण घालतात. देवा, "तू इकडे कोठे होतास?' ते विचारतात.
"मी तुमच्या मंदिरातून चाललो. त्या माणसाला हो दूर, हो दूर, असे हा पुजारी म्हणत होता. त्या माणसात का मी नव्हतो? माणसाला दूर हो म्हणणारा देवालाच दूर हो म्हणत असतो. म्हणून मी चाललो."
बंधूंनो, सर्वांत तुच्छ वस्तू म्हणजे माती, दगडधोंडा. त्या मातीची मंगलमूर्ति बनवून तिच्यात आपण प्रभूचे सौन्दर्य बघतो. दगडाची मूर्ति बघून तिच्यात प्रभूला पाहतो. मग चैतन्यमय माणसात तो का पाहात नाही? वडपिंपळ, उंबर पाहून नमस्कार करता, परंतु माणसाला का दूर करता? माणसाचा अव्हेर करणाऱ्याला कोठला देव?
धर्म हा जोडणारा असतो. तोडण्यासाठी तो नसतो. समाजाची धारणा ज्याने होते तो धर्म. कोकणात घराचा जो आधारभूत खांब, आधारभूत तुळई, त्याला धारण म्हणतात. धारणाची पूजा करतात. आंब्याचे डहाळे बांधतात, कारण सारे घर त्यावर आधारलेले. धर्म म्हणजे सर्वांचा आधार परंतु ज्या समाजात कोट्यावधी लोक दूर फेकले आहेत, तेथे का धारणाप्रधान धर्म शिल्लक आहे? तो समाज धर्महीन आहे. शतखंड झालेला तो असणार.
विवेकानंदांहून गेल्या शतकात हिंदू धर्मांचा थोर उपासक दुसरा कोण असेल? अमेरिकेत त्यांनी हिंदुधर्मांचा विजयध्वज फडकावला. तो इतिहास वाचून आमच्या अंगावर मूठभर मांस चढते. परंतु तुमची शिवाशिवी का त्यांनी जगासमोर मांडली?
तुमच्या धर्मातील उदात्त तत्त्वे त्यांनी दुनियेसमोर ठेवली. परंतु हिंदुधर्मातील दिव्यता सांगणारे विवेकानंद हिंदुधर्मांतील अनुदारता पाहून एके दिवशी रडले. मित्रांनी विचारले, "स्वामीजी कां रडता?" ते म्हणाले, "हिंदु लोकांनी आपल्याच बंधूंना पशूंच्या स्थितीत नेऊन ठेवले आहे. त्या पार्थसारथीच्या या देशात केवढे हे पाप? या लोकांना मी कसे वर आणू म्हणून मी रडत आहे."
बंधूनो, विवेकानंदांची ही वेदना तुम्हाला कळते का? रामतीर्थ एकदा म्हणाले, "आमच्या धर्माला शिवू नको हे नांव द्यावे.' या रामतीर्थांच्या उद्गारांतील तीव्र दुःख तुम्हाला कळते का?
वाईच्या प्राज्ञपाठ शाळेतील थोर आचार्य नारायणशास्त्री मराठे. आज त्यांनी केवलानंद नाव घेतलेले आहे. थोर ब्रह्मचारी, विनोबाजी त्यांच्या पायाजवळ शिकले. माझा एक मित्र बाबा फाटक त्यांच्याजवळ शिकत होता. तो त्यांना म्हणाला, "देव मिळावा म्हणून हिमालयात जावे असे वाटते." ते म्हणाले, "हरिजनांची सेवा कर. त्यांच्या मुलांची ढुंगणे धू, तुला देव भेटेल." त्यांना का धर्म कळत नाही? धर्मासाठी, राष्ट्रासाठी, त्यांना निदिध्यास. १९३१ मध्ये वाटोळया परिषदेच्या वेळी लंडनमध्ये आमच्या पुढाऱ्यांचे आपसांत जमेना. जगासमोर या देशाचे धिंडवडे होत होते. एके दिवशी नारायणशास्त्री जेवताना रडत होते. मुलांनी विचारले, "आचार्य, अश्रू का?" ते म्हणाले, "भारताचे लंडन येथे चाललेले धिंडवडे वाचून डोळे भरून येतात. सुचत नाही."
अशा नारायणशास्त्र्यांना का धर्म कळत नाही? आणि महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री, म. म. काणे सांगतात की अस्पृश्यता दूर करा.
अस्पृश्यता धर्माविरुद्ध आहे. श्री संत तुकडोजी महाराज अस्पृश्यता दूर करा सांगतात.
श्री तुकडोजी महाराज म्हणाले, "हरिजनांना मंदिर उघडेपर्यंत मी मंदिरात जाणार नाही." अरे, तुम्हाला कोण धर्म शिकवणार? महात्माजींहून सत्याचा पुजारी कोणता आणायचा? त्यांचे श्वासोच्छास म्हणजे वेद. त्यांचे बोलणे-चालणे म्हणजे शास्त्र; म्हणजे गीता. थोर महात्मे तुम्हाला हरिजनांना जवळ घ्या सांगत आहेत. आता अंत पाहू नका. अंत बघाल तर तुमचा अंत होईल.
तो थोर भक्त चोखोबा देवाच्या दर्शनासाठी तळमळणारा. ध्यानी-मनी त्याला देव दिसतो. त्याला स्वप्न पडते. विठाई माऊलीने आपल्याला जवळ घेतले आहे. प्रभु आपल्या गळयातील तुळशीचा हार आपल्या गळ्यात घालीत आहे असे त्याला दिसते. सासरहून मुलगी माहेरी यावी. आईने तिला जवळ घेऊन स्वतःच्या गळ्यातील हार तिच्या गळ्यात घालावा, तसे चोखोबाला दिसते. "माझ्या देवाने हार घातला," असे आनंदाने मस्त होऊन तो सांगत सुटतो. बडवे त्याला मारतात. त्या चोखोबाची वेदना कोण जाणणार
"ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा
काय भुललासी वरलिया अंगा"
असे तो पुकारतो. परंतु आम्ही सारे बहिर्दृष्टि. हृदयाची श्रीमंती कोण ओळखणार?
एका भांडखोर माणसाने एकदा एकनाथांस विचारले, "तुम्ही कसे शांत असता? आमच्याजवळ तिळभरही शांति नसते." नाथ म्हणाले, "ते सारे जाऊं दे. तू आठ दिवसांनी कदाचित् देवाघरी जाशील." "काय मी मरणार? आठ दिवसच राहिले?" असे म्हणून तो मनुष्य घरी गेला. शेजाऱ्या पाजाऱ्यांची तो क्षमा मागू लागला. ज्यांच्या ज्यांच्याजवळ तो भांडला होता, ज्यांना ज्यांना त्याने तुच्छ मानले होते त्या सर्वांची त्याने क्षमा मागितली. बायकोची क्षमा मागतो. उगीच मारले म्हणून मुलांच्याजवळही क्षमा मागतो. एके दिवशी नाथ त्याच्याकडे आले. त्या माणसाने विचारले, "आली का वेळ? भरली का घटका?" नाथ म्हणाले, "ते काय मला माहीत? परंतु हे तुझे आठ दिवस कसे गेले? किती जणांजवळ भांडलास?" तो म्हणाला, "नाथ, कसले भांडण नि काय? समोर सारखे मरण होते. सर्वांची क्षमा मागत होतो." नाथ म्हणाले, "आम्ही नेहमी मरणाचे स्मरण ठेवतो. सर्वांना प्रेम देतो. कशाला अहंकार? भांडणे?" बंधूंनो, हरिजनांना दूर ठेवून का तुम्हाला मोक्ष मिळणार आहे? स्वतःला उच्च मानता; परंतु दुसऱ्यास तुच्छ मानून स्वतःला उच्च समजणाऱ्यास गीतेने आसुरी म्हटले आहे.
आपण बंधुभाव ओळखीत नाही. धर्मांचा आत्मा जाणत नाही. मानवतेशी आपण पारखे झालो आहोत. आपण सत्ता ओळखतो. दंडुक्यासमोर मान लववितो. मुसलमान बंधू तुमच्या विहिरीवर पाणी भरू शकतात. तुमच्या ओटीवर बसतात. तुम्ही त्यांना प्रेमाने सुपारी, पान देता. परंतु हरिजन मात्र तुम्हाला चालत नाही. तुम्ही मुसलमानास येऊ देता हे चांगले आहे. परंतु त्यांनाही हा हक्क तुम्ही प्रेमाने दिलेला नाही. मुसलमान येथे शेकडो वर्षे राज्यकर्ते होते. त्यांनी तो हक्क मिळविला. सत्तेसमोर तुम्ही वाकलेत.
नदी सारे प्रवाह घेऊन मोठी झाली. हा समुद्र अनंत प्रवाह घेऊन अमर झाला; सारखा उचंबळत आहे, असा विचार डोक्यात येऊन सारे मानवी प्रवाह जवळ घ्यायला आपण तडफडावे. या भारतात एक मानवी प्रवाहांचे तीर्थक्षेत्र होवो असे रविंद्रनाथ म्हणत. आपण या देशाला शतखंड केले आहे. हिंदू-मुसलमान दूर राहिले. हिंदु-हिंदूत किती डबकी. ब्राह्मण, मराठे, साळी, माळी शेकडो प्रकार. जातीच्या पलिकडे पाहण्याची दृष्टीच नाही. तू कोठे पाणी प्यायलास, याहून महत्त्वाची जणू जगांत दुसरी वस्तु नाही. ही सारी डबकी फोडा. डबकी झाली तर हिवताप, डास, मरण. या देशांत भेदांची डबकी माजवली. राष्ट्रावर प्रेतकळा आली. ज्या देशातील लोक एकमेकांवर डोळे वटारतात, शिंगे उगारतात, त्यांच्या पाठीवर मृत्युदेव बसतो. यमाचे वाहन रेडा आहे याचा हाच अर्थ. फोडा डबकी. एक विशाल मानवी प्रवाह करा. जातिभेदाचे बुजबुजाट पुरे.
एक शास्त्री म्हणाले, "अहो गुरुजी, सर्वत्र एक ब्रह्म आहे, एक आत्मा आहे हे खरे असले तरी सर्वत्र भेद आहेत. या शरीरात पाहा. उजवा हात पवित्र डावा हात अपवित्र. तसेच समाजांत." मी त्यांना म्हटले, "डावा हात अपवित्र म्हणून का कापून फेकून दिलात? डावा हात सकाळी गंमत करतो, परंतु माती लावून, साबण लावून धुतला की झाले. त्या हातांवर राखुंडी घेऊन दात घासता. त्या हातावर चुन्याचे बोट फासून तंबाखू चोळता. त्या हातानेच जेवताना पाणी पिता. डावा हात दुखू लागला तर उजवा हात धावतो. डाव्या हाताला दुःख झाले तर दूरचे वरचे डोळे रडू लागतात. सर्व शरीरात एक प्राण आहे. एका नाडीचे ठोके पडत आहेत. राष्ट्रातील सर्व जातीप्रजाती म्हणजे राष्ट्रपुरुषाचे अवयव. सर्वांमध्ये एक प्राण हवा. एक नाडी हवी. हरिजनांना पाणी मिळत नसेल तर तुमचे डोळे ओले व्हायला हवेत. हरिजनांना घरे नसतील तर तुमच्या हृदयाला घरे पडायला हवीत. उगीच काही तरी बोलू नका. धर्माची टिंगल नका करू. व्यर्थ कोट्या करून लोकांना झुलवू नका, फसवू नका. तुमचा होतो खेळ, राष्ट्राचा जातो प्राण. तुम्ही हसाल परंतु तुमच्या धर्माचेही हसे होते."
बंधूंनो, जगाला जवळ घ्याल तर देव तुमच्याजवळ येईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
"येथ विद्वत्त पन्हां सांडिजे । तेथ व्युत्पुत्ती आवघी बिसरिजे ॥
जे जगा धाकुटे होई जे । ते जवळीक माझी" तुमचे विद्वत्त्व; तुमचे पांडित्य विसरून जगाजवळ जा. साऱ्या जगासमोर नम्र व्हाल तर देव तुमच्याजवळ आहे.
तुकाराम महाराज म्हणतात,
तै झडझडून राहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग॥
तै पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥
तुकाराम महाराज म्हणतात,
घरोघर अवघे झाले ब्रह्मज्ञान
द्या रे एक कण जरी नीरें!
चिंता करितो विश्वाची
रामदास स्वामींनी महाराष्ट्रभर मारुतीची उपासना रूढ केली म्हणतात. असें एकहि गांव नसेल जेथें मारुतीचें लहानसे मंदीर नाही. आधीं रामाचा जन्म, नंतर मारुतीचा. आधीं ध्येय व मग त्यासाठी धडपडणारा जीव. हनुमंताचा केवढा महान आदर्श! शरीरानें बलवान आणि बुद्धीनेंही समर्थ. पुन्हां हें सारें कायिक व बौद्धिक बळ त्यानें रामसेवेसाठीं दिलें. आपले जीवन थोर ध्येयासाठी देणें म्हणजे मारुतीची उपासना. हनुमान जन्मला तोच लाल सूर्यबिंबाला मिठी मारायला उड्डाण करिता झाला. मारुतीचे उपासक समर्थ रामदास स्वामी लिहीतात:
{gap}} "अंदर राम बाहर राम । जहाँ देखो वहाँ राम ही राम ॥ आंतबाहेर राम, जेथें बघेन तेथें रामच राम." मारुतीला त्याची आई अंजनी भेटली. ती म्हणाली, "अरे, तुझी स्तुति जो तो करतो, परंतु मी नाहीं करणार तुझी स्तुति. शेवटी रावणाचा संहार करायला रामरायांना यावें लागलें. रामाला श्रमवलेंस. तूंच कां नाहीं रामाचें सारें काम करून टाकलेंस," अशी अंजनी माता.
माघ महिन्यांत वद्य नवमीला सज्जनगडावर दासनवमीला मोठा उत्सव होतो. नऊ दिवस उत्सव चालतो. समर्थ रामदास स्वामी माघ वद्य नवमीस निजधामास गेले. सज्जनगडावर समर्थांची कुबडी आहे. त्यांचा शिष्य कल्याण पाण्याचा जो हंडा भरून आणीत असे तो हंडा तेथें आहे. समर्थांचा तांब्या तेथें आहे. गडाच्या पायथ्याशीं उरमोडी नदी आहे. मराठीचे थोर ह.भ.प. लक्ष्मणराव पांगारकर सज्जनगडला दासनवमीच्या वेळेस जायचे, कीर्तन करायचे, रंगायचे. "कुस्ना थमाल ले थमाल अपुल्या गायी । आम्ही आमुच्या घलासि जातो ले भाई" हें गाणें रसिक पांगारकर पुन्हा पुन्हां म्हणायचे. हल्लीं तेथें उत्सवाची मजा येते कीं नाही मला माहीत नाही. नऊ दिवस तेथें सर्वांना मुक्तद्वार जेवण असे. गादीवर असणारे महाराज दिवसभर सर्वांची वास्तपुस्त घेऊन रात्रीं जेवत. मी एक गोष्ट एकदा ऐकली होती. एकदां सज्जनगडावर असाच उत्सव होता, आणि गादीवर जे महाराज होते त्यांचे रात्री एकाएकी पोट दुखूं लागलें. गडावर कोणी उपाशी नाही ना, म्हणून शोध सुरू झाला. तों कोणी एक गरीब मनुष्य भुकेलेला आढळला. त्याला जेवण देण्यात आलें. लगेच महाराजांचे पोट थांबले. आज आपल्या देशांत लाखों लोक अर्धपोटी असतील. परंतु त्यासाठी कोणाचें पोट दुखतें कां? गरीबांच्या जीवनाशीं समरस होणें सोपें नाहीं.
समर्थांचें चरित्र किती उदात्त! वयाच्या १० व्या वर्षीच आईला म्हणाले, "आई चिंता करितो विश्वाची. त्यांना सर्व समाजाची काळजी. मिळमिळीत जीवनाची त्यांना मनस्वी चीड. संसार करायचा तर नीट करा. भिकारड्यासारखा नका करुं. त्यांची एक प्रसिद्ध ओवी आहे,
घालून अकलेचा पवाड
व्हावे ब्रह्मांडाहूनी जाड
तेथें कैचें आणलें द्वाड । करंटेपणा ॥
पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्रीय जनसंघटनेचा मुका अध्यक्ष. तेथे सर्वांनी यायचें भेटायचें. आणि तेथील गोष्टी ऐकल्या म्हणजे अश्रु येतात. बडवे पुजारी पांडुरंगासमोर टाकलेले मोजतात, तेव्हा त्यांना कधी कधी कागद आढळतात. आशेने लिफाफे फोडावेत तों त्यात "देवा पांडुरंगा, सासू छळते, नणंदा त्रास देतात, त्यांचेही प्रेम नाही. तुला दया. कोणाजवळ दु.ख सांगावे? तू मायबाप म्हणून तुला सांगते." असे मजकूर आढळतात. तर एखाद्या पत्रात "भाऊबंदांनी नाडले, का रे देवा असे व्हावे? मी काय पूर्वजन्मीं पाप केलें की, मीं अन्नाला मोताद व्हावें नि माझ्या भाऊबंदांनी माड्यातून राहावे. माझी अब्रू तू राख. तुला चाड," असे दिसते. दुसऱ्यांजवळ आपली दुःखे उगाळीत बसण्यापेक्षा कोणीतरी विश्वशक्ति आहे तिच्याजवळ दुःख सांगावे, ही वृत्ती का क्षुद्र?
आषाढी एकादशी. पंढरपूरला मोठा सोहळा. लाखो लोकांची यात्रा. अनेक संतांच्या पालख्या येथे येतात. आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची. अनेक पालख्या पंढरपूरला जातात. यंदा सज्जनगडाहून पालखी येणार आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी जो पंथ सुरू केला त्याला वारकरी पंथ म्हणतात. समर्थांच्या संप्रदायाला धारकरी म्हणतात, परंतु हे दोघे पंथ परस्पराला पूरकच होते. वारकरी पंथाने महाराष्ट्रात एकता निर्माण करावयास अपार मदत केली. पंढरपूरच्या वाळवंटात तरी भेदभाव दूर केला. महाराष्ट्रातून लाखो लोक एकत्र यायचे, पायी यायचे, नामघोष करीत यायचे. आपण सारे एक, एका राष्ट्राचे ही भावना बळावे. पुण्याहून या पालख्या जातात. केवढा सोहळा. लोक आंबे, केळी यांचा पालख्यांवर वर्षांव करतात. लहान मुले पालख्या करून ग्यानबा-तुकाराम करीत या मिरवणुकीत सामील होतात. न्यायमूर्ती रानडे माहित आहेत ना? पुण्याच्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या इमारतीतून न्यायमूर्ति रानडे ती श्रद्धा, तो त्याग, तें भक्तिप्रेम पाहून सद्गदित झाले. त्यांचे डोळे भरून आले. ज्यांनी ही निष्ठा दिली ते किती थोर!
नवीन निष्ठा द्यावयाची असेल तर ती त्यागानेच देता येईल. पंढरपूरला एकदा एक वेश्याकन्या आली. बादशहाचे तिच्यावर प्रेम. ती म्हणाली, "पांडुरंगाला भेटून येते" आणि देवाच्या चरणावर डोके ठेवले. असा त्याग पंढरपूरला ओतला गेलेला आहे. परंपरा उगीच नाही सुरू होत. कुत्र्यासही तूप देऊ पाहणारे नामदेव, कोठारे लुटवणारे दामाजी, विष्णुमय जगत पाहाणारे तुकाराम, शांतिसागर एकनाथ आणि ती ज्ञान वैराग्याची मूर्ति ज्ञानदेव सर्वांची पुण्याई पंढरपूरला ओतलेली. लाखो लोक तेथे जमतात. त्यांच्या श्रद्धेला हसू नका. तुम्ही त्यांच्यात मिसळा, नवीन विचार द्या. परंतु ते मानवधर्माने द्या. मारामारी, कत्तलीने नका देऊ. संतांनी हा मानवधर्म दिला. म्हणून ग्यानबा, तुकाराम हीच महाराष्ट्राची दैवते राहिली. हेच राष्ट्रपुरुष म्हणून महाराष्ट्र ओळखतो. कारण त्यांचा संदेश सकळ मानवांना सुखी करण्यासाठी होता. भेदांना दूर करून सर्वांमधील दिव्यता दाखविणारा त्यांचा संदेश होता. संतांची शिकवण आज अधिकच आवश्यक आहे.
+ + +
विवेकानंदाचा धर्म
४ जुलै ही स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथी. १९०४ मध्ये स्वामी निजधामास गेले. चाळिसी संपली ना संपली तोच हा महापुरुष आपला दिव्य संदेश सांगून पडद्याआड गेला. विवेकानंदांचे मूळचे नाव नरेन्द्र. विवेकानंद हे नाव त्यांनी पुढे घेतले. ते लहानपणापासून विरक्त वृत्तीचे. नवीन धोतर भिकाऱ्याला त्यांनी दिले. अति बुद्धिमान नि खेळकर. तालीम करायचे, कुस्ती करायचे. उत्कृष्ट गाणारे नि वाजवणारेही. तरुणांचे पुढारी असावयाचे. कॉलेजमध्ये सारे ग्रंथ वाचून काढले. त्या वेळेस केशवचंद्र सेन, रविन्द्रनाथांचे वडील देवेन्द्रनाथ वगैरे प्रसिद्ध धार्मिक मंडळी होती. त्यांची व्याख्याने विवेकानंद ऐकत.
त्यांनी या दोघांना, "तुम्ही देव पाहिला आहे का?" म्हणून विचारले. दोघांनी नकार दिला आणि याच वेळेस स्वामी रामकृष्ण परमहंसांची नि त्यांची गाठ पडली. नरेन्द्राला बघताच रामकृष्णांची जणू समाधी लागली. "तुम्ही देव पाहिला आहे?" या प्रश्नाला, "हो पाहिला आहे. मी तुझ्याजवळ बोलत आहे त्याहूनही अधिक आपलेपणाने मी त्याच्याजवळ बोलतो" असे रामकृष्णांनी उत्तर दिले.
विवेकानंद आरंभी पक्के नास्तिक. "Let Mr. God come and stand before me. तो राजश्री ईश्वर कोठे असेल तर त्याने यावे माझ्यासमोर," असे ते म्हणायचे. परंतु रामकृष्णांनी त्यांच्या जीवनात क्रांती केली. निराळी साधना सुरू झाली. पुढे रामकृष्ण परमहंस देवाघरी गेले. मरावयाच्या आधी ते विवेकानंदांस म्हणाले, "माझी सारी साधना मी तुला देत आहे!" महापुरुषाने जणु मृत्युपत्र केले! रामकृष्णांच्या साधनेला तुलना नाही, देव मिळावा म्हणून त्यांची केवढी धडपड! अहंकार जावा म्हणून भंगी बनले. स्त्री-पुरुष भेद जावा म्हणून स्त्रीचा पोषाख करून वावरले. एक दिवस गेला की देवाला रडत रडत म्हणावयाचे, "एक एक दिवस गेला नि तू आला नाहीस." धनाची आसक्ती जावी म्हणून एका हातात माती नि एका हातात पैसे घेत नि म्हणत, "हीही मातीच आहे" नि गंगेत फेकीत. अशी ही अद्भूत साधना! अनेक वर्षांची. परमेश्वराचा साक्षात्कार सर्व धर्मांच्याद्वारा त्यांनी करून घेतला. मशिदीतही त्यांना प्रभू भेटला. चर्चमध्येही भेटला. सर्वधर्मसमन्वय त्यांनी केला. सर्व धर्म सत्य आहेत, ईश्वराकडे नेणारे आहेत असे त्यांनी अनभवून सांगितले. श्री रामकृष्ण परमहंस यांचा जन्म ही एक ऐतिहासिक आवश्यकता होती. सारे जग जवळ येत होते. अशा वेळेस सर्व धर्माचे ऐक्य शिकविणारा महापुरुष हवा होता. भारताला आणि जगाला अशा पुरुषाची जरुरी होती. भारतातही नाना धर्म. जोपर्यंत भारत विविधतेतील एकता ओळखून तद्नुरुप वागणार नाही तोवर त्याचे नष्टचर्य संपणार नाही. स्वतः हे अनुभवून भारताने जगाला शिकवायचे आहे. भारताचे हे ईश्वरी कार्य आहे. श्री रामकृष्णांनी तो संदेश दिला. विवेकानंदांनी तो अनुभविला, शिकविला. गांधीजींनी त्याचा आणखी विस्तार केला. ते कार्य आणखी पुढे नेले.
स्वामी विवेकानंद रामनवमी, गोकुळष्टमी या दिवशी उपवास करीत. त्याचप्रमाणे पैगंबराची जयन्ती, पुण्यतिथी या दिवशीही उपवास करीत. हिंदुधर्म सर्व धर्मांना आदरील. अमेरिकेतील सर्वधर्मपरिषदेत विवेकानंद म्हणाले, 'हिंदू धर्म विश्वधर्म होऊ शकेल, कारण तो माझ्यातच सत्य असे मानीत नाही. इस्लाम, ख्रिश्चनधर्म, सर्वांमध्ये सत्य आहे असे तो मानतो. सत्याचे बाह्य अविष्कार निराळे. आतील गाभा एकच. 'एकः सत् विप्रा बहुधा वदन्ति' हे महान् ऐक्यसूत्र हिंदुधर्माने शिकविले आहे.
जगात सर्वत्र द्वेषमत्सर. एकिकडे दुनिया जवळ येत आहे, तर हृदये मात्र दूर जात आहेत. अशावेळेस तुमचा सर्वांचा आत्मा एकच आहे, अशी घोषणा करणारा प्रबळ पुरुष हवा होता. ही घोषणा अमेरिकेत शिकागो येथे स्वामींनी केली. या सर्वधर्मपरिषदेत स्वामींची आधी दादच लागेना. परंतु एके दिवशी त्यांना संधी मिळाली. भगव्या वस्त्रातील ती भारतीय मूर्ती उभी राहिली आणि 'माझ्या बंधू-भगिनींनो' असे पहिलेच शब्द त्या महापुरुषाने उच्चारले आणि टाळयांचा गजर थांबेना. का बरे? त्या दोन शब्दात कोणती जादू होती? त्यांच्या आधी जे जे व्याख्याते बोलून गेले ते सारे 'Ladies and Gentlemen- सभ्य स्त्रीपुरुषहो' अशा शब्दांनी आरंभ करीत, परंतु ही विश्वैक्याची मूर्ती उभी राहिली. सर्वत्र एकता अनुभवणारे ते डोळे, आपलीच आत्मरूपे पाहणारे ते डोळे, प्रेमसिंधूतून बुचकळून वर आलेले ते शब्द! त्या दोन शब्दांनी अमेरिकन हृदय जिंकून घेतले आणि मग ते अपूर्व व्याख्यान झाले. स्वामीजी विश्वविख्यात झाले आणि भारताचा विजयी सुपुत्र घरी आला. मायभूमीने अपूर्वं स्वागत केले. विवेकानंद धर्ममूर्ति होते, परंतु त्यांचा धर्म रानावनात जा सांगणारा नव्हता. सभोवती दुर्दशा असताना हिमालयात कोठे जायचे?
महान फ्रेंच साहित्यिक रोमा रोलां याने विवेकानंदांवर एक उद्बोधक ग्रंथ लिहिला आहे. त्यात तो म्हणतो- 'Vivekananda was first a nation-builder then a religious reformer' विवेकानंद हे आधी राष्ट्र निर्माते होते, मग धर्मसुधारक होते. विवेकानंदांचा धर्म राष्ट्राची उभारणी हा होता. भारतावर त्यांचे अपार प्रेम. ते म्हणतात, 'माझ्या बाळपणाचा पाळणा म्हणजे ही भारतभूमी; आणि माझ्या उतार वयातील मोक्षाची वाराणसी म्हणजे हीच भारतमाता. तिचे सारे सारे मला प्रिय आहे. ये पंडिता, तू मला प्रिय आहेस, कारण तू भारताचा आहेस आणि ये अज्ञानी बंधू, तूही मला प्रिय आहेस, कारण तू भारताचाच. सुष्ट वा दुष्ट, ब्राह्मण वा चांडाळ, सारे मला प्रिय, सर्वांना मी हृदयाशी धरीन, सर्वांवर प्रेम करीन"
भारताची दुर्दशा पाहून ते कासावीस होत. एकदा एका अमेरिकन कोट्याधीश कुबेराकडे ते होते. रात्री सुंदर पलंगावर ते निजले होते. तेथले तें वैभव, तो थाटमाट स्वामीजींना झोप येईना. त्यांना सारखे रडू येत होते. उशी भिजून गेली. तो पलंग त्यांना निखा-याप्रमाणे वाटू लागला. ते जमिनीवर झोपले. सकाळी मित्राने विचारले, "उशी ओलीचिंब कशाने?" "मी रात्रभर रडत होतो. अमेरिकेत केवढे वैभव आणि भारतात पोटभर खायलाही नाहीं." ते एका पत्रात लिहितात, "आपण हिंदुस्तानात पाप केले. त्या पार्थसारथी गोपाळकृष्णाच्या भूमीत स्त्रियांची, अस्पृश्यांची पशूहूनही वाईट स्थिती आपण केली आहे." अमेरिकेतील लोकांना ते म्हणायचे, "कृपा करून हिंदुस्थानला मिशनरी नका पाठवू. मोठी मोठी धर्मतत्त्वे आईच्या दुधाबरोबर तेथे मुलांना मिळतात. रस्त्यातील भिकारी महान धर्मतत्त्वे सांगणारी गाणी म्हणत जातात. मूठभर भिक्षा घेऊन संबंध हिंदुस्थानभर ते उदारधर्मं पसरवीत असतात. भारताला तुम्ही संसार सुखी करणारे विज्ञान, पोटभर जगता येईल येईल असे धंदेशिक्षण द्या."
मार्गरेट इ नोबल या इंग्रजीबाई विवेकानंदांना लंडनमध्ये भेटल्या. "मी तुमच्या देशासाठी काय करू शकेन" असे त्या ब्रह्मचारी विदुषीनें विचारले. विवेकानंद म्हणाले, "माझ्या देशातील मायभगिनीस शिकवायला या. कलकत्त्यात एखादी स्त्रियांची शाळा काढा." आणि निवेदितादेवींनी कलकत्त्यात येऊन शाळा काढली. विवेकानंदांनी १८९९ मध्ये रामकृष्ण मिशन संस्था काढली. "आत्मनो मोक्षार्थ जगद्धितायच" स्वतःसाठी, मोक्षासाठी व जगाच्या हितासाठी ही संस्था होती. किंबहुना जगाच्या हितातच स्वतःचा मोक्ष असे ही संस्था सांगत असते. विवेकानंद एकदा बेलूर मठात संन्यास धर्मावर बोलताना म्हणाले, "संन्यास म्हणजे मरणावर प्रेम. रोज परसेवेत झिजायचे, तिळतिळ मरायचे. अशा मरणात मोक्ष असतो. देहाची आसक्ति नष्ट करणे, बारीक-सारीक कामातसुद्धा त्यागाची भावना जागृत ठेवणे म्हणजे संन्यास. एखाद्या क्षणी अत्युच्च विचारात रममाण होऊन सारे वैभव तृणवत दूर फेकाल तर दुसऱ्या क्षणी कचऱ्याची टोपली उचलून सारे स्वच्छ कराल."
सेवेच्या द्वारा त्यांना मोक्ष हवा होता. निरपेक्ष, निहंकारी सेवा. एकदा एक मुमुक्षु त्यांच्याकडे येऊन म्हणाला, "मी दारे, खिडक्या बंद करतो. जप करतो. तरी देव भेटत नाही." तेव्हा म्हणाले, "दारे, खिडक्या सताड उघडी टाक. तुझ्या खिडकी खालून रोज शेकडो प्रेते जात आहेत बघ. शहरात साथी आहेत. त्यांची सेवा करायला जा. औषध दे. रस्ते, गटारें स्वच्छ कर." स्वतः स्वामी प्लेगच्या नि कॉलऱ्याच्या दिवसांत कलकत्त्यात मित्रांसह सेवा करीत होते.
कोणी विचारले, "पैसे खुंटले तर?" स्वामी म्हणाले, "बेलूरचा मठ विकीन, तेथील जमीन विकोन." त्यांना आसक्ति कसलीच नसे. महात्माजींनी हरिजन आश्रम नाही देऊन टाकला? महापुरुष वृत्तीने मुक्त असतात, अनासक्त असतात.
दरिद्र नारायण हा महाशब्द प्रथम विवेकानंदांनीच उच्चारला. "नारायण हवा असेल तर दरिद्री बांधवांची सेवा कर. आज नारायण दरिद्री आहे. जा त्याला सुखी कर." महात्माजींनी हा शब्द सर्वत्र नेला. ते जेव्हा दानार्थ मला हात पसरीत तेव्हा "दरिद्री नारायणके वास्ते" असे म्हणत.
विवेकानंदांना रडगाणे माहीत नव्हते. ज्ञानवैराग्याचा, अगाध ब्रह्मचार्याचा तो अद्भुत पुतळा! सामर्थ्याचे ते सिंधू होते. ते सिंहाच्या छातीचे होते. ते नेहमी म्हणत, "एक हजार माणसे द्या, तीं सिंहाच्या छातीची मात्र असू द्यात, मग भारताचा मी कायापालट करीन. वेदान्त तुम्हाला सांगतो की तुमच्यात परमात्मा आहे. त्याची चित्कळा, त्याचा अंश तुमच्यात आहे, मग तुम्ही खाली मान घालून का बसता? उठा नि पराक्रम करा. हिंदुधर्मात नाना भ्रष्ट गोष्टी शिरल्या. आपण पापी पापी म्हणत बसलो. हिंदुधर्माने हे दुबळेपणाचे तुणतुणे कोठून आणले? ते मोडून तोडून फेका. 'चिदानंदरूपः शिवोऽहम्' ही तुमची घोषणा असू दे. 'नायमात्मा बलहीनेन लभ्यः' - दुबळयाला कोठला आत्मा?
"उपनिषदांचा अभ्यास तेजस्वी बनवितो. नेभळट नाही बनवीत. तुमचा स्वतःवर विश्वास आहे की नाही बोला. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही त्याचा देवावर तरी कोठून बसणार? रडक्या दुबळया आस्तिकापेक्षा स्वतःच्या कर्मशक्तिवर, विश्वास असणारा नास्तिक बरा."
स्वामींची अशी जळजळीत वाणी आहे. ते एकदा बंगाली तरुणांना म्हणाले, 'तुम्हाला देव पाहिजे? जा फूटबॉल खेळा. हसू नका. बलवान बना. उत्साही बना. लाथ मारीन तेथे पाणी काढीन ही शक्ति हवी.'
स्वामीजींनी मृतवत् पडलेल्या राष्ट्राला वीरवाणी ऐकविली. एकदा एका मिशनऱ्याजवळ वाद चालला होता. स्वामींनी त्याचे सारे मुद्दे खोडून काढले. तरी तो हट्ट सोडीना. तेव्हा म्हणाले, 'आता हा सोटा पाठीत घालतो म्हणजे ऐकशील.' अशी ती मूर्ती होती.
त्यांची कीर्ती जगभर गेली. कलकत्त्यात त्यांचे अपार स्वागत झाले. हत्तीवरून मिरवणूक. तों गर्दीत त्यांना बाळपणाचा लंगोटीमित्र दिसला. त्यांनी एकदम खाली उडी मारली नि कडाडून भेटले.
विवेकानंदांच्या अशा शतस्मृति आहेत. ते महान् जीवन आहे. त्यातून भारताला सदैव स्फूर्ती मिळेल. आज देश स्वतंत्र झाला आहे, परंतु फुटीर वृत्ती बळावत चालली आहे. अशावेळी सर्व धर्मांच्या ऐक्याची मूर्ती जे विवेकानंद त्यांच्यापासून आपणास अमर संदेश मिळत आहेत. भारताचा मोठेपणा कशात यासंबंधी ते म्हणतात, 'या देशाने कधी कोणावर आक्रमण केले नाही. हा या देशाचा मोठेपणा असे मला विचार करता करता वाटू लागते. सर्व धर्मांचा, संस्कृतींचा मेळ घालणे, जगाला प्रेमधर्माने राहायला शिकविणे हे भारताचे कर्तव्य आहे; परंतु आधी स्वतःच्या देशात हे अनुभवू या. देशात एकमेकांची काळजी घेऊ या.'
विवेकानंद म्हणतात, 'समता उत्पन्न करायची असेल तर विशेष हक्क नाहिसे व्हायला हवेत. हे विशेष हक्क नष्ट व्हावेत म्हणून व्यक्तीनेच नव्हे, एखाद्या राष्ट्रानेच नव्हे तर साऱ्या जगाने खटपट केली पाहिजे. पैशाचे दोन पैसे कसे करावे ही अक्कल एखाद्याच्या अंगी उपजतच असणे स्वाभाविक आहे, परंतु तेवढ्यानेच गोरगरिबांना तुडविण्याचा हक्क त्याला प्राप्त होतो की काय?
श्रीमंत आणि गरीब यांच्यातील तेढ विकोपास जाऊ पाहात आहे. आपल्या अंगातील विशेष गुणांचा उपयोग दुसऱ्याला नाडण्याकडे करणे ह्यालाच विशिष्ट हक्क म्हणतात. हे राक्षसी हक्क नष्ट करण्यासाठी त्या त्या काळातील लोक लढत असतात. नीतीशास्त्राचा हाच रोख असतो. आपणही हे विशेष हक्क नष्ट करू तर विविधता राहूनही ऐक्य प्रवृत्ती वाढेल, साम्यावस्था वाढेल.
महात्माजींनी सर्वोदयाचा हाच मार्ग दाखविला. विशेष हक्क नष्ट केल्याशिवाय समता कोठून येणार ? विवेकानंद हेच सांगत आहेत. हा गुणधर्मच आहे. याने जाऊ तर कल्याण आहे नाहीतर हा देश रक्ताळ वातचक्रात सापडल्याशिवाय राहणार नाही.
+ +
संत तुकाराम
श्री तुकाराम महाराजांची फाल्गुन वद्य द्वितीयेस पुण्यतिथि असते. या वर्षी त्यांची त्रिशत् सांवत्सरिक पुण्यतिथि आहे. सर्वत्र सोहळा होणार आहे. मुंबई सरकार तुकारामांच्या गाथेचे स्वस्त प्रकाशन करणार आहे. द्वितीयेस तुकारामांची पुण्यतिथि आणि षष्ठीस नाथांची पुण्यतिथि. चार दिवसांच्या अंतराने दोन थोर संतांच्या पुण्यतिथि प्रतिवर्षी आपण पाळीत असतो.
'ग्यानबा तुकाराम' हा जयघोष शेकडो वर्षे आपण घुमवीत आलो व जोंवर मराठी भाषा आहे, महाराष्ट्र आहे, तोंवर हा घोष घुमत राहील. विनोबाजी म्हणायचे, "ज्ञानेश्वर गुरुप्रमाणे वाटतात, एकनाथ वडिलांप्रमाणे तर तुकाराम आईप्रमाणे." त्यांची गाथा म्हणजे महाराष्ट्राला अखंड बोधामृत पाजणारी कामधेनुच होय. संतांची जीवने म्हणजे मानवतेचा मोठा आधार. तुकारामाचे जीवन म्हणजे अखंड प्रयत्नवाद. रात्रंदिवस धडपड करून त्यांनीं आपले जीवन प्रभुमय केले. गाथेतील अभंग निरनिराळ्या मनोवृत्तींचे दर्शक आहेत. तुकारामांना एकच वेड होतें, एकच ध्यास होता.
ऐसे भाग्य कै लाहता होईन
अवघे देखे जन ब्रह्मरूप
{{gap}'अवगुणा हातीं आहे अवघीची फजीती' असे ते म्हणतात. ही गुणसंपदा जीवनात यावी म्हणून तुकाराम रात्रंदिवस रडले, धडपडले.
इंद्रयांची दीनें
आम्ही केलों नारायणे
धीर माझ्या मना
नाही आतां नारायणा
असे ते करुण स्वराने म्हणतात. जीवन अजून शुद्ध होत नाही म्हणून त्यांची कासाविशी होत असे. जीवनाचे सार काय? कशासाठी हे जीवन?
जन्मा आलियाचे फळ
अंगी लागो नेदी मळ
सर्वांगे निर्मळ
चित्त जैसे गंगाजळ
ओलें मूळ भेदी खडकाचे अंग
उद्योगास सांग कार्यसिद्धी
याचसाठी केला होता अट्टाहास
शेवटचा दीस गोड व्हावा.
त्याचे हात सेवेत सदैव आनंद मानतील.
तुकारामांना खरी आत्मस्थिति हवी होती. शब्दज्ञानाचा त्यांना कंटाळा होता.
घरोघर अवघे आले ब्रह्मज्ञान
द्या रे एक कण जरी नीरें
बोलाचीच कढी बोलाचाच भात ।
जेऊनियां तृप्त कोण झाला ॥
बरे झाले कुणबी केलो
नाही तर दंभे असतो मेलो
अवघाची संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तिन्ही लोक
दुरितांचे तिमिर जावो
विश्व स्वधर्मसूर्ये पाहो
विधीनें सेवन
धर्माचे पालन
धर्माऽविरुद्धो भूतेषु
कामोऽस्मि भरतर्षम
संसार सोडून नको जायला. संसारच सुखाचा करायचा आहे. उद्योगधंदे करा, संपत्तिही मिळवा, परंतु संचय नको.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारें
उदास विचारें व्यय करी
तुझ्या नामाची आवडी
आम्ही विठो तुझी वेडी
तीर्थी धोंडा पाणी
देव रोकडा सज्जनीं
जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा
ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकारामादि संतांनी पंढरपूरची वारी सुरू केली. साऱ्या महाराष्ट्रातून तेथे स्त्री-पुरुष येऊ लागले. प्रक प्रकारची एकता, मानवता फुलू लागली. तुकाराम महाराज पंढरपूरच्या वाळवंटातील सोहळ्याचे वर्णन करताना उचंबळून म्हणतात,
कठोर हृदये मृदु नवनीते
पाषाणां पाझर फुटती रे
एकमेकां लोटांगणी येती रे ॥
सर्वधर्मान् परित्यज्य
मामेकं शरणं व्रज
तुकारामांचे अभंग म्हणजे-तुमचे आमचे वेद, ते स्वतःच गर्जना करून सांगतात,
वेदांचा तो अर्थ आम्हांसीस ठावा
येरांनी वहावा भार माथां
कोणहि जीवाचा न घडो मत्सर
वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥
संसाराची आग लावूनिया हाते
मागुतें परौतें पाहूं नये
तुका म्हणे व्हावी प्राणांसवे ताटी
नाही तरी गोष्टी बोलू नये
रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग
अंतर्बाहय जग आणि मन
विष्णुवीर गाढे
कळिकाळ पाया पडे
आपुले मरण पाहिले म्यां डोळां
तो सुखसोहळा अनुपम
तुका म्हणे आतां
उरलों उपकारापुरता
आणिकांचे कानी, गुणदोष मना नाणी
बोले ते वचन, जेणे राहें समाधान
तुका म्हणे फार थोडा करी उपकार ॥
परंतु हजारो अभंगांतून निवडानिवड काय करायची? तुकारामांच्या अभंगावर आणि ज्ञानेश्वरांच्या ओवीवर सारा महाराष्ट्र पोसला गेला आहे. ज्याला तुकारामाचे चार अभंग येत नाहीत असा मनुष्य महाराष्ट्रात आढळणार नाही. महाराष्ट्रात हजारो ठिकाणी भजने होतात. 'रूप पाहतां लोचनी' वगैरे शेकडो अभंग तेथे गायिले जातात. संतांनी महाराष्ट्राला संस्कृतीच्या समान पातळीवर आणिले. उच्च विचार सोप्या भाषेत घरोघर नेले. ग्यानबा-तुकाराम हे महाराष्ट्राचे हृदयसम्राट आहेत. त्यांचे वाङ्मय हे खरे राष्ट्रीय वाङ्मय, कारण ते सर्व थरथरांत गेले. मोरोपंतांची आर्या व वामनी श्लोक पांढरपेशी लोकांत व हरदासात, परंतु आम जनतेत तुकोबांची वाणी गेली. न्यायमूर्ति रानडे, डॉ. भांडारकर यांच्यासारखे नव विद्वान प्रार्थना समाजात तुकारामाचे अभंग घेऊनच कीर्तन करीत व खेड्यातील कीर्तनकार तेच अभंग घेऊन विवरण करतात.
तुकारामांच्या अभंगात प्रसाद आहे, कळकळ आहे. स्वानुभाव आहे. ते रोकडे बोल आहेत. ते चावट बोल नाहीत. त्यांच्या अभंगात परिचयाचे दाखले, रोजच्या व्यवहारातील उपमा नि दृष्टान्त. कधी कधी त्यांची वाणी कठोर वाटते. ती वाणी क्वचित् शिवराळ होते. विनोबा म्हणाले, "तुकारामांचा आईचा गुण अशा वेळेस प्रगट होतो." आईच मुलावर रागावते. त्यांच्या त्या कठोर, कधी शिवराळ वाटणाऱ्या वाणीत त्यांची अपार करुणा आहे, त्यांचे वात्सल्य आहे.
ज्या समाजात ज्ञानेश्वर, तुकाराम झाले, तो समाज शतखंड का? समाजात द्वेषमत्सराचा बुजबुजाट का ? ज्याला त्याला आपली जात, आपला प्रांत, आपला धर्म श्रेष्ठ वाटून तो दुसऱ्यांचे निसंतान करायला निघतो. तुकाराम म्हणतात,
देह आणि देहसंबंधि निंदावीं
आणिक वंदावीं श्वानसूकरें
काही निवडक
प्रकाशने
● ● ●
राममनोहर लोहिया
इंदुमती केळकर
सफ्रेजेट आंदोलन
इंदुमती केळकर
विधान सभा:परिचय
के. टी. गिरमे
भारतीय न्याय व्यवस्था
बॅ. वि. न. गाडगीळ
दारुबंदीची नशा
हरिभाऊ लिमये
स्वप्न आणि सत्य
साने गुरुजी
संकेत
मधु मंगेश कर्णिक
त्याचं काय आहे
वि. आ. बुवा
रॉबिन्सन मंडळी
भा. रा. भागवत
साने गुरुजींची
नवी पुस्तके
हिमालयाची शिखरें
मेंग चियांग व
इतर गोष्टी