Jump to content

काशीयात्रा

विकिस्रोत कडून



काशीयात्रा.


हे पुस्तक
हरी गणेश पटवर्धन
याणीं
तयार केले


पुणे येथे
बल्लाजी कृष्ण गोखले यांच्या
ज्ञानप्रकाश छापखान्यात छापले


ता० १ माहे नोवेंबर सन १८७२

वे. शा. रा. रा. कृष्णशास्त्री चिपळुणकर,


रिपोर्टर आन दी नेटिव प्रेस


फेलो आफ दी बांबे यूनिवर्सिटी.


यांस


हे लहानसे पुस्तक


ग्रंथ कर्त्याने


परम प्रीतीनें, आदरानें, व मित्रत्व बुद्धीने


नजर केले आहे.


प्रस्तावना.

 मी जेव्हां यात्रेस निघालो त्या वेळी ती संबंधों हकीकत लिहिण्याची कल्पना सुद्धां माझे मनांत नव्हती. परंतु प्रवासास आरंभ केल्यावर ज्या गोष्टी मला घडल्या व माझ्या पाहण्यां. त आल्या त्यांपैकी काहींची हकीकत लिहून वर्तमानपत्रांत छापविली असतां त्याचे वाचणारास क्षणभर कर्मणूक होईल. अशा समजुतीने मी एक दोन पत्रे ज्ञानप्रकाशास पाठविली व ती पत्रे त्या पत्राच्या कर्त्याने साद्यंत छापली व त्यांचे उतारेही दुसऱ्या वर्तमानपत्रांनी घेतलेले माझ्या पाहण्यांत आले. त्यावरून हीं पत्रे वाचणारांस कांहींशी रुचतात असा ग्रह होऊन मी तसाच क्रम पुढे चालविला. व हिंदुस्थानांत मथुरा, वृंदावन, गोकूळ, आग्रा, अमृतसर, लाहोर, मुलतान वगैरे जी नामांकित मोठ मोठी शहरे पाहण्यांत आली त्यांचे अल्प स्वरूप वर्णन करून ते ज्ञानप्रकाशास पाठवीत गेलो. पुढे पुण्यास आल्यावर कितीएक माझ्या मित्रांचे सांगणे पडले कीं, हीं पत्रे एकत्र करून त्यांचा ग्रंथ केल्यास तो बराच कर्मणुकीचा होईल. व वर सांगितलेल्या जुन्या शहरांची माहिती लोकांत प्रसृत होण्यास कारण होईल. ही कल्पना मलाही पसंत वाटून हा लहानसा ग्रंथ सुज्ञ वाचक जनास विनयपूर्वक सादर केला आहे तर त्यांतील गुणलेश ग्रहण करून दोषांकडे दुर्लक्ष करतील अशी आशा आहे.
पुणे ता० १ नोवेंबर सन १८७२

ग्रंथकर्ता.





काशीयात्रा


पुण्याहून प्रयाग - तेथील यात्रा.

 ज्ञानप्रकाशकर्ते महाराज -

 वि०वि०. आम्ही ३०/३५ असामी तारीख ३१ आक्टोबर रोजी सकाळी श्री काशी यात्रेस निघालों तो प्रथमतः पुण्याच्या स्टेशनावर आमच्या कांहीं नौकर लोकांस थर्ड क्लास टिकिटे घेण्याचा प्रसंग आला, तेव्हां त्यांनी तीन चार कल्याणचीं टिकिटें घेण्याकरितां पैसे दिले आणि सुमारें घटका दीड घटका रात्र होती म्हणून घाईने टिकिटे न तपासतां ते गाडींत बसले. नंतर नऊ वाजण्याच्या सुमारास गाडी कर्जतच्या स्टेशनावर आली, तेव्हां आम्ही सदहू इसम कोठें बसले आहेत व त्यांनी टिकिटास किती पैसे खर्च केले ह्याची चौकशी केली. तेव्हां एक असामीस कल्याणचे टिकिट आणि बाकीच्यांस बदलापुरची टिकिटे मिळाली असे कळले. तेव्हां कदाचित हस्तदोषानें टिकिटें देणारानें ही चुकी केली असेल असे समजून प्रत्येकाने भाडयाचे पैसे काय दिले ह्याची चौकशी केली तो पुण्यापासून कल्याणचे टिकिटास भाडें रु० २ साडे दहा आणे प्रमाणे एकेकाने दिले असे आढळले. सदर भाड्याचा आकार दर टिकिटाचा म्हटला म्हणजे दोन रुपये पावणेआठ आणे होतो असे असून येथेही पुनः नजर चुकीनेच त्या गरीबांस ज्यास्त भाडे पडले, तर एडिटर महाराज, क्षणोक्षणी स्टेशनावरील लोक अशा चुका करतील तर गरीब लोकांची फार बुडवणूक होणार आहे. पहा, एकादा गरीब कंगाल मिक्षा मागून काही पैसे जमा करून एकाद्या गांव रेल्वेने जाईल आणि जर त्यास अपुरे टिकिट स्टेशनावरून मिळेल तर उतरण्याचे वेळी त्यांचे टिकीट अपुरे सबब त्यास रेल्वे कंपनीच्या कायद्याप्रमाणे शिक्षा मिळेल; कारण त्याने थोडे पैसे देऊन ज्यास्त लांब सदर कंपनीस फसवून जाण्याचा गुन्हा केला असे होईल. बरे कदाचित मेहेरबानी करून रेल्वेकडील लोकांनी त्यास गुन्ह्यांत न धरितां सोडिलें तरी जवळ ज्यास्त भाडे देण्यास पैसा नसल्यामुळेही आटकेंत बसण्याचा प्रसंग त्याजवर गुदरणारच. ह्याकरितां माझी त्यांस अशी विनंती आहे की, बाबाहो तुम्ही अशा चुका करूं नका आणि परमुलखांत गरीबाच्या गळ्यास रसायन लावू नका.
 नंतर आम्ही सर्व मंडळी कल्याणास उतरलो. आणि मुंबईहून जी गाडी १० वाजतां जबलपुरास जाण्याकरितां निघते तीत सुमारे १२ वाजतां बसलो. नंतर ५ वाजण्याच्या सुमारास नाशिकास आलो, तो तेथें प्रयागाकडे जाण्याऱ्या लोकांची गर्दी बरीच होती. ती इतकी की, तेथे बिलकूल नवीन पासेंजर घालण्यास अवकाश नव्हता, तरी मेहेरबान गार्ड साहेबानी एकेक गाडीत बुटांच्या लातांचा प्रहार करून सुमारें नेटिव बकरी सत्तर सत्तर कोंडली आणि जेव्हां त्यांसच कंटाळा आला तेव्हां उरलेल्या प्यासेंजरास जावे म्हणून सांगितले. तेव्हां काय विचारतां, एडिटर साहेब बायकांच्या गाडीत एकच हलकल्होळ उठल; कारण गार्ड साहेबानी स्टेशनावर टिकिटे घेऊन आलेल्या एकंदर बायकांस पहिल्यानेंच कोंडिले होते, आणि मग जेव्हां पुरुष मंडळी पैकी काहींस गाडीत कोंडून बाकीच्यांस तुम जाव म्हणून आज्ञा केली तेव्हां त्यांत कोणाचे नवरे, कोणाचे भाऊ, कोणाचे बाप असे होते. अशा ज्या सर्व बायका होत्या त्यांनी गार्ड साहेबांस विनंती केली की, आम्ही पुढे जात नाही. आम्हास बाहेर काढा, तेव्हा त्यांस जबाब मिळाला की, नौ. आतां अशा कृतीने त्यांची काय अवस्था आणि दुर्दशा झाली असेल ह्याचा विचार वाचकानींच करावा.
 नंतर आमची गाडी पुढें हाकली आणि सुमारें मध्यरात्रीच्या समयास भोसावळेस आली. तेथें तिसऱ्या क्लासाच्या प्यासेंजराच्या गाड्यांत जागा नव्हती, सबब ज्यानी तिसऱ्या क्लासाची टिकिटे घेतली होती त्यांस सेकंड क्लासांत घातले. परंतु महाराज काय विचारतां त्या लोकांस ज्यांत नेटिव सेकंड क्लास प्यासेंजर होते त्यांत मात्र भरले आणि आम्ही जरी सगळा दिवस लांबून प्रवास केला होता तरी आम्हास रात्रीही विश्रांतीस जागा नाहीशी झाली. आमची स्थिति चौथे क्लासच्या लोकांप्रमाणे झाली. आम्ही रेल्वेकडील लोकांस पुष्कळ सांगितले की, आम्हास दुसऱ्या सेकंड क्लासांत बसवा आणि मग आमच्या गाडीत तिसऱ्या क्लासचे प्यासेंजर भरा पण पडलो नेटिव तेव्हां आमचे ऐकतो कोण! आमच्या फजितीस पारावार नाहीसा झाला. रुपयांपरी रुपयेही गेले आणि शेवटी चौथ्या क्लासच्या प्यासेंजराची दशा प्राप्त झाली. नंतर आम्ही सकाळ हर्द्यास उतरलो तेव्हां सुमारे सहा वाजले होते. तेव्हां गाडीतून बाहेर पडण्याची मुष्किल पडली व स्टेशनमास्तर धक्के मारूं लागले. तेव्हां आम्ही त्यांस विचारले की, असे करण्याचे कारण काय? तेव्हां त्यांनी उत्तर दिले की, "This is the way in which native passangers should be treated." आम्ही बरे म्हणून मुकाट्याने गांवांत चालते झालो. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जबलपुरास आलो.
 बऱ्हाणपुराच्या पुढे आपल्या तिकडील रीती भाती सर्व पालटतात. इकडे हिंदुस्थानीची झांक दिसूं लागते. माळवा, नमाड आणि गोद्रवण हे प्रांत लागतात. तापी, तवा आणि नर्मदा ह्या मोठ्या नद्या वाटेने लागतात. बहाणपुरापासून सातपुडयाचा डोंगर लागतो. ह्या प्रांतांत आगगाडीचा रस्ता तयार करण्याच्या कामांत इंजनेरी कामाची खूपच अक्कल लढिवलेली आहे असे स्पष्ट दिसतें. सगळ्या सातपुड्यांत फक्त एके ठिकाणी मात्र बोगदा पाडावा लागला आहे. बाकी एकंदर रस्ता सपाट मैदानांतून नेला आहे. इकडे लोक पाहिले तो उर्दू भाषा बोलतात. इकडे यंदा दक्षिणेपेक्षां पाऊस बरा झाला आहे. धारण स्वस्त आहे. गव्हाच्या शेतांची पटांगणे कोसोगणित आढळतात.

 ईस्ट इंडियन रेल्वे जबलपुरापासून सुरू होते. त्यांत पहिला दुसरा, इंटर मिडियेट, आणि तिसरा असे क्लास आहेत. ह्यांत इंटर मिडियेट आणि तिसऱ्या क्लासाच्या गाड्यांचे भाग रिजर्ब मिळतात. येणेकरून उतारू लोकांची फार सोय होते. प्रयागचें स्टेशन फार चांगले बांधलेले आहे. इकडील मातीच्या विटा फारच चांगल्या होतात. तशा दक्षिणेत होत नाहीत. मुंबईंत जसे तांबडे कुजे मिळतात तसे इकडच्या मातीचे कुजे फार चांगले बनतात. प्रयागांत पाहण्यासारिख्या जागा हायकोर्ट, कौन्सिल हाल, रेविन्यु बोर्ड कचेरी, चीफ इंजनेरचे हपीस, पादशाई बाग, आणि यमुनेचा रेल्वेचा पूल हे आहेत. प्रयागास यात्रा म्हटली म्हणजे त्रिवेणीचे स्थान, तत्प्रयुक्त श्राद्ध, वेणीनाद आणि

त्रिवेणि माधवं सोमं भारद्वाजंच वासुकिं ॥
वंदे अक्षय वटं शेषं प्रयागं तीर्थ नायकं ॥१॥

 ह्या श्लोकाप्रमाणे देवदर्शन इतकी आहेत. येथे गौरीचे लाखेचे दागिने चमत्कारिक मिळतात व त्याप्रमाणे सुती गालीचे सफेत रंगाचे फार नामी मिळतात. लोभकरावा हे विनंती.
 मुक्काम प्रयाग, तारीख ९ नवंबर १८७९.

एडिटराचा स्नेही.




मथुरा, वृंदावन, गोकूळ.
 ज्ञानप्रकाशकर्ते यांस.
 वि०वि०. आपणाकडे श्री मथुरा क्षेत्रीच्या यात्रेची हकीकत लिहून पाठवितों, तिजला कृपा करून आपण आपल्या सुंदर पत्री जागा द्याल अशी आशा बाळगतो.
 महाराज, अलाहाबादेस आम्ही रेल गाडीत स्वार झालो तो हात्रोज रस्त्याच्या स्टेशनावर (त्या स्टेशनास नेटिव लोक मेंडूचे स्टेशन म्हणतात) उतरलो. ह्याचे भाडे तिसऱ्या क्लासाचें ४ रुपये ९ आणे ३ पै पडतें. तेथून हात्रोज गांव ६ मैल आहे व तेथून मथुरा २३ मैल आहे. इकडे सर्व रांगड्या लोकांची वस्ती व ते सर्व वृज भाषा बोलतात. हिंदूचे पेराव पुरुषाचे मुसलमान पुरुषाच्या पेरावासारखेच आहेत. फक्त बायकांच्या पेरावांत, हिंदूंच्या बायका घागरा नेसतात व काचोळी घालितात आणि आंगावरून चादर अगर छिटाची पासोडी पांघरतात आणि मुसलमाननी पायजमा घालून आंगांत कफणी घालतात आणि वरून एक लुंगी पांघरतात. हा काय तो फरक आहे.
 बायकांच्या वेण्या बिलकूल घालीत नाहीत म्हटले तरी चालेल. ह्या मुलखांत आम्हास हात्रोजेपासून तो तहत मथुरे पर्यंत एकसारखी पांढरी माती लागली. देश अगदीं सपाट मैदान आहे. एकंदर २९ मैलाच्या प्रदेशांत फक्त दोन मोऱ्यांस मात्र पूल बांधलेले आढळले. बाकी रस्ता सपाट. देश फार सुपीक असून इकडे स्वस्ताईही बरीच आहे. हात्रोजेपासून मथुरेस जाण्यास बैल गाड्या, घोड्याचे शिग्राम वगैरे चांगले सोईवार मिळतात. मथुरेस जाण्यास ३ रुपये एका शिग्रामास भाडे पडते. मथुरेस यमुना नदी आहे तिला नावेचा पूल आहे. तो उतरून गांवांत जावे लागते. पुलावरून माणसास जाण्यास एक पैसा हशील पडतें.
 मथुरा क्षेत्र फार रमणीय आम्हास वाटले. हें विशेष करून दक्षिणोत्तर यमुनेच्या तटाकी वसले आहे. येथे इमारती फारच चांगल्या आहेत. त्याप्रमाणे दक्षिणेत कोठेही इमारती आढळत नाहींत. येथे सर्व इमारती दगडी असून कोरीव काम फार. येथे चार मजले उंच व महिरपदार कामे करण्याचा प्रचार फार. यमद्वितीयेच्या दिवशी विश्रांती घाटावर स्नान करण्याकरितां लाखो मनुष्यांचा मेळा जमतो. इकडे कृष्णभक्त लोक फार आहेत. सर्व गुजराथेंतील, मारवाडांतील, काठेवाडांतील वगैरे आसमंतांतील प्रदेशांतले लोक येथे दरसाल यात्रेस येतात. येथे मुख्य ब्राम्हण यमुनेचा तीर्थसंबंधी विधी करविण्याकरितां म्हटले म्हणजे चौबे म्हणजे चाहूवदी हे आहेत. त्यांचेच काय तें मुख्य प्राबल्य, हे सुमारे चार हजार आहेत. एकंदर वस्ती सुमारे सवालाख पासून दीड लाख आहे. त्यांत मोठा भरणा मारवाड्यांचाच आहे. हे लोक कोट्याधीश सावकार आहेत. येथे सुमारे २५ देवळें एकेकास दहा पासून वीस लक्ष रुपये खर्च झालेले अशा प्रकारची आहेत. येथें लक्ष्मीचंद म्हणून एक मोठा सावकार होऊन गेला. त्याने येथे कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. व धर्मशाळा आणि देवालये बांधलेली आहेत. हल्ली ह्याचा मुलगा आहे. त्याची ही पेढी मोठी आहे. दानधर्म मोठा आहे. येथील ज्या इमारती बांधलेल्या आहेत त्या सर्वांस धोंडे भरतपूर आणि जयपूर ह्या प्रांतांतून आणिलेले आहेत. हे धोंडे कुरंदाच्या जातीचे असून कोरीव काम करण्यास फार मऊ लांकडापेक्षां ह्या धोंडयावर येथे कोरीव काम फार सफैदार होतें. संगमरवरी दगडाची कामेही इकडे पाहण्यासारखी आहेत.
 येथून तीन कोसावर उत्तरेस वृंदावन आहे. ते राधेचे सासर होतें. तेथे श्रीकृष्ण विहारास गोकुळांतून जात होते. वृंदावनास सुमारे हजार पंधराशे देवळे आहेत. त्या सर्वांची तऱ्हा मथुरेच्या देवळाप्रमाणेच आहे. येथे मथुरेतील लक्ष्मीचंदानी एक देवालय बांधिले आहे. त्यास सुमारे पन्नास लाख रुपये लागले असावे असे वाटते. त्याप्रमाणेच बाबूलाल बिहारी म्हणून एक बंगाली बाबू आहेत. त्यांनी सुमारे चाळीस लाख रुपये खर्च करून एक संगमरवरी दगडाचें कृष्ण मंदीर बांधिले आहे. हे पाहण्यासारिखें आहे. ह्या देवालयांतून मोठ मोठाले बगीचे फार चांगले आहेत. व तलावही मोठे आहेत. आंत नावेतून विहार करितां येतो. ही मंदिरें पाहून चित्तास जो आनंद होतो त्याचे कथन अनिर्वाच्य आहे. मुंबईकडील व पुण्याकडील हवेल्या ह्यापुढे तृणप्राय आहेत.

 येथे जयाजीराव शिंदे अलीजा बहादूर ग्वाल्हेर ह्यानी एक कृष्ण मंदीर बांधण्याचे काम चालविले आहे. त्यास हल्ली दहा लाख रुपये खर्च झाले आहेत. त्या शिवाय येथें पुष्कळ मंदिरें व इमारती भरतपूरचे राजाच्या, झिंदचे राजाच्या, नाभाचे राजाच्या वगैरे पुष्कळ आहेत.
 वृंदावनास कृष्णाच्या वेळचे कुंजवन आहे. तसेच निधिवन आहे. जेथे कृष्णानी गोपीचे वस्त्र हरण केले तो चीरघांट आहे. व त्यावर कदंब वृक्ष आहे. केशी दानवाचा वध केला तो केशी- घांट आहे. राधा गुप्त झाली तें ठिकाण आहे. अशी जुनी अनेक ठिकाणे आहेत. मथुरेस ज्या ठिकाणी कंसाचा वाडा होता तें ठिकाण आहे. श्री कृष्णानी कंस वध करून विसावा घेतला आहे त्या स्थलास विश्रांतघांट म्हणतात, तेथे पादुका आहेत व वर देवालय आहे.
 गोकूळ मथुरेपासून दक्षिणेस तीन कोस आहे तेही यमुना तटाकी आहे. गोकुळ हा गांव पुजाऱ्यास जहागीर आहे. येथे मांकडांचा सुकाळ आहे. गोकुळांत नंदाच्या वाड्याची जागा आहे. रमण रेती आहे. कृष्णानी बाळलीला केल्यापैकी पुष्कळ जागा आहेत. गोकुळापासून अर्ध कोसावर महावन आहे. तेथेही कृष्ण लीलेची पुष्कळ स्थले आहेत.
 इकडे लोक साधारणतः गरीब आहेत. इंग्रजी अमलास फार भितात. परंतु अमलामध्ये बरीच अंदाधुंदी आढळते. मथुरेच्या पेढ्याचा मोठा लौकिक आहे. येथे पितळेची भांडी तऱ्हेतऱ्हेचीं मिळतात त्यांत पितळेच्या गाई फार सुबक होतात.

एडिटराचा मित्र फिरस्ता.





दिल्ली.

 ज्ञानप्रकाशकर्ते यासः -

 वि० वि०. गेल्या पत्री आपणाकडे श्री मथुरा क्षेत्राची हकीकत लिहून पाठविली त्या वेळीच तिकडील पोलिसाची वगैरे व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे याबद्दल पुढे लिहू म्हणून लिहिले होतें, परंतु त्याजबदल एकंदर हकीकत पुढे लिहून कळवीन. आतां आपणाकडे दिल्ली शहरची हकीकत लिहून पाठवितों ती कृपा करून छापाल अशी आशा आहे.
 दिल्ली शहरांत आम्ही ईस्ट इंडिया रेल्वेच्या स्टेशनावर किल्यांत उतरलो. हें स्टेशन फार मोठे आहे. इकडील स्टेशनाप्रमाणे स्टेशनें मुंबई इलाक्यांत नाहीत. विटेबंदी काम असून स्टेशने उंच उंच बांधिलेली आहेत. व सगळ्याकडे कमानीदार दरवाजे व खुल्या मोठमोठाल्या कमानी आढळतात. रेल्वे स्टेशनाजवळच एक मोठी धर्मशाळा आहे. तिला मुरची सराई म्हणतात. ह्या सराईत मुशाफर लोकांस उतरण्याची सोय चांगली आहे. खालच्या मजल्यांत ज्या कोठडया आहेत त्यांत उतरल्यास दर माणसी एक पैसा दररोजचें भाडे पडते व वरील मजल्याच्या कोठडीत उतरले तर दर कोठडीस दररोज आठ आणे भाडे पडतें. ह्या धर्मशाळेत एक कुवा आहे त्यांचे पाणी फारच चांगले आहे. धर्मशाळेच्या मागच्या अंगास यमुनेचा नहर बांधून आणिलेला आहे. ह्याप्रमाणे मुशाफराच्या सोयी फार चांगल्या आहेत.
 हे शहर दिल्लीच्या पादशहाच्या वेळी फारच नांदतें असावे असे अनुमान होतें. हल्ली ते अगदी मोडकळीस आले आहे तरी मुंबईच्या जवळ जवळ बरोबरीचे आहे. आम्ही सुमारे सहा रस्ते मोठ मोठाले दक्षिणोत्तर व तितकेच पूर्व पश्चिम फिरलो. तितक्यांतून दुमजला तीन मजला अशा हवेल्या आढळल्या. व तितक्या हवेल्यांतून दुकानें व बिहाडे गच्च भरलेली आढळली.

 दिल्ली पासून सुमारे सहा मैलांवर मनसूरशा वजीर ह्याची कबर आहे. तिचे काम फार सुरेख. चोहो बाजूंनी चार हौद सुमारे १२५ फूट लांब आणि ३० फूट रुंद असे असून आंत कारंजी आहेत. व भोवताली मोठा बगीच्या आहे. मधील इमारतीस चारीकडून चार मोठे सोपे आहेत व मध्ये मनसूरची कबर आहे. कबरेचा जो हाल आहे ह्यांत सर्व काम संगमरवरी दगडाचे नक्षीदार असून रंगामेजी आहे. मधील कबरेचा चबुत्रा सुमारे तीन मजला एक गज रुंद आणि पाऊण गज उंचीचा आहे. ह्या चबुत्र्याचे काम फारच नक्षीदार छांदार आहे. ह्या कबरेपासून पुढे सुमारे सहा मैलांवर कुतुबुदीन पादशहाने बांधिलेला मनोरा (लाट) आहे. ह्याचा घेर ५२ गज आहे आणि त्यास एकेक फूट उंचीच्या ३७९ पायऱ्या आहेत. ह्यास पांच मजले आहेत व पायऱ्या वर्तुळाकार जिन्याप्रमाणे बांधिल्या आहेत. हे काम दगडी आहे. ही लाट पूर्वी पृथु राजाची इमारत होती त्या जाग्यांत बांधलेली आहे. येथे पृथु राजाच्या वेळची इमारत जी मोडून राहिली आहे तीही दगडाची असून कोरीव आहे. येथे जवळच योगमायेचें स्थान आहे. तेथे हिंदु लोक दर्शनास जातात. कुतुबाच्या वंशजांच्या कबरी इकडे जवळ आसपास आहेत.
 मनसूरच्या कबरेपासून सुमारे ३ मैलांवर हुमेयूनची कबर आहे. तिचे काम सगळे संगमरवरी दगडाचें नक्षीदार आहे. ह्याचे कबरे सभोवती मोठा सुंदर बाग आहे व तळ मजल्याला चोही बाजूनी सुमारें २५ फूट रुंद आणि दर एक अंगाने २०० फूट लांब ओटा दगडी फरसबंदीचा आहे. मध्ये तीन मजली संगमरवरीची जाळीदार काम केलेली कबरेची इमारत आहे.
 ह्या कबरेपासून दिल्लीकडे परत येतांना वाटेवर एक मैलाच्या अंतरावर बेबरच्या वंशजांच्या कबरा आहेत. ह्यांतील कामे पाहून अक्कल गुंग होते. त्याचे वर्णन आतां मी फारसे करीत नाही. इतकेच कळवितों कीं, जसा हस्तिदंत कोरून बारीक नक्षीदार काम सांवतवाडीकडे लोक करतात त्याप्रमाणे संगमरवरी दगड कोरून मोठ मोठाले दरवाजे, खिडक्या, भिंती वगैरेची कामे केली आहेत. अशा मोठ मोठाल्या कबरी ह्या ठिकाणी दहा वीस आहेत. येथे कोट्यावधी रुपये खर्च झाला आहे.
 दिल्ली शहरांत जम्मा महजीद म्हणून एक मोठी इमारत तांबडया कुरूंदाच्या दगडाची बांधलेली आहे. ह्या महजिदीस तीन अंगानी मुंबईतील टाऊनहालाला बांधलेल्या पायऱ्याप्रमाणे पायऱ्या आहेत. ह्याप्रमाणे येथे प्राचीन इमारती पाहण्यासारख्या आहेत. हल्ली सरकारानी शहरांत एक म्युजियम केले आहे. त्यांत वाघ, चित्ते वगैरे चमत्कारिक पशु पक्षि पाहण्यासारखे आहेत.
येथे अत्तरें व सुगंधी तेले स्वस्ती मिळून उंच्या प्रतीची मिळतात. ह्याप्रमागेच कलाबतूच्या कामाच्या टोप्या व जोडे फार चांगले मिळतात. येथे पांढरी पागोटी चंदेरी तऱ्हेची उंच्या प्रतीची लाखो रुपयांची होतात आणि ती दक्षिणेत आणि गुजरात विकण्यास जातात.
 येथील हवा आपल्या तिकडील देशाप्रमाणेच आहे. आतां मला झोप येते म्हणून पुरे करतो हीच विनंती.

एडिटराचा मित्र
एक फिरस्ता.





मायापुरी अथवा हरिद्वार.
ता० १७ दिसेंबर १८७१.
मुक्काम० श्री क्षेत्र वाराणसी.
 ज्ञानप्रकाशकर्ते महाराज:-
 वि०वि०. गेल्या पत्री आपणास श्री क्षेत्र मथुरा व शहर दिल्ली येथील माहिती लिहून पाठविली ती आपण आपल्या सुंदर पत्री छापून प्रसिद्ध केली, हे पाहून मला पुढे आणखी वायव्येकडील प्रांतांतील शहरांची व पंजाबांतील शहरांची माहिती लिहून पाठविण्यास उमेद आली आहे. ती यथामती लिहितो. तिला कृपा करून आपल्या येत्या अंकी जागा द्यावी.
 हरिद्वार हे गांव म्हटले म्हणजे लहान आहे खरें, परंतु येथेही इमारती मोठ मोठाल्या आहेत. हें गंगेच्या काठी वसलेले आहे. हे सुमारे २ मेल लांब असून एक मैल रुंद आहे. येथे मोठ मोठ्या राजे रजवाड्यांनी लाखो रुपये खर्चून धर्मशाळा बांधिल्या आहेत. येथे हरिद्वार म्हणजे बद्रिनारायणास जाण्याची वाट अथवा हरिद्वार म्हणजे बद्रिकेदारास जाण्याची वाट अथवा गंगाद्वार म्हणजे गंगोत्रीस जाण्याची वाट अथवा मोक्षद्वार म्हणजे ह्या मार्गाने पांडवांनी स्वर्गारोहण केले म्हणजे स्वर्गास जाण्याची वाट अशी ह्या गांवास वेगळाली नावे आहेत.
 येथे आम्ही हिवाळ्यांतच आलो म्हणून थंडी आम्हास बरीच लागली. काय सांगावें एडिटरराव, आम्ही बर्फ पुष्कळ वेळां खाल्ले आहे व ते अतिशय थंड असते खरे, परंतु लंवडीचें तें पानचट लागतें आणि येथील गंगोदक त्यापेक्षांही गार असून अत्यंत रुचकर आणि पाचक असे आमच्या अनुभवास आले. येथून तीन मैलांवर सप्तश्रौत म्हणजे सात ऋषीनी अनुष्ठान केले ती जागा गंगेच्या काठीच आहे. तेथें गंगेचे पाट काढण्याकरितां इंग्रजांनी पाहिले धरण बांधिले आहे. त्या नंतर दुसरा बंधारा हरिद्वारास बांधिला आहे. येथून सुमारे २५ मैल पश्चिमेस रुडकी म्हणून एक मोठे शहर आहे. तेथे गंगेच्या पाटांत चक्रे लाविली आहेत आणि त्यावरून हजारों यांत्रिक कारखाने सुरू ठेविले आहेत. गंगेचे शेकडो कालवे काढले आहेत. त्यास जेथे जेये मोठा गांव किंवा शहर लागले म्हणजे चांगले घाट बांधिले आहेत व त्यावरून पूलही केले आहेत. सारांश सांगावयाचा इतकाच की, प्रति गंगौघ करून प्रांतांतील लोकांस गंगास्नान व पान ह्याचा लाभ इंग्रज सरकारानी दिला आहे असे म्हटले तरी चालेल.

 काय एडिटर साहेब सांगावयाचे. सदरील जो फायदा मी सांगितला तो हिंदुधर्म दृष्टीने पाहून सांगितला, परंतु ह्या कालव्यापासून देशांत बागाइताची गर्दी झाली आणि पिकाची सुबत्ता होत चालली आहे. भात, वरण, पांढरी पोळी, एक भाजी, ताकाची कढी अगर दही आणि तूप, साकर इतके नित्य खाणारास इकडे दरमहा रुपये ३ बस होतात. इतकी तर स्वस्ताई ह्या कालव्यामुळे झाली आहे.
 हरिद्वार हे गांव पूर्वी गुजर राजाच्या ताब्यांत होते. त्याची राजधानी मंगलोर हे शहर होतें. ते येथून दहा कोसांवर आहे. हल्ली त्या राजाचा नष्टांश झाल्यामुळे एकंदर अम्मल इंग्रजी झाला आहे.
 येयें एकाने बंडाच्या सालची अशी गोष्ट सांगितली कीं, हिमालयाच्या पायथ्याशी एका नवाबाचे राज्य होते. तो बंडाच्या साली बदलला आणि त्याला बदमाष लोकही पुष्कळ मिळाले. तेव्हां सुमारे पांच हजार हत्यारबंद शिपाई घेऊन तो नबाब हरिद्वारावरून पुढे जाण्यास निघाला. तेव्हां प्रथमतः मुळचा जो गंगेचा ओघ आहे, तेथें वाळवंट बंधाऱ्याने मोठे झाल्यामुळे त्याने तळ दिला. तेव्हां बंधाऱ्याच्या देखरेखीवरचा एक इंजिनेर व पन्नास शिपाई स्टेशनावर होते. त्यांनी बंधाऱ्याच्या फळ्या काढून टाकिल्या आणि स्वस्थ बसले. तो सुमारे २५ मिनिटांत पांच हजार लोक वाहून गेले आणि त्या इंजिनेराची मोठी शिफारस झाली. ह्यावरून पहा मुख्य प्रसंगाच्या कामांत हिंदू लोक किती वेडे आहेत ते. तर माझा त्यांस उपदेश आहे की, बाबानो आतां पहिल्याने शहाणे व्हा, आणि मग योग्य वाटेल तर दुसरा विचार करा. अस्तु विषयांतरांची माफी असावी.
 हरिद्वारी ब्रम्हघाटी मुख्य स्नान करावे लागते मग कुशावर्ती स्नान व श्राद्ध होते. तेथून ३ मैलांवर कनखळ गांव आहे तेथे गंगेस एका घाटी "कङ्खळ" असे नांव आहे. ह्याचा अर्थ असा की, असा कोण खळ आहे कीं, जो येथें स्नान केल्यास मुक्त होणार नाही. "कुशावर्त" ह्याची कथा अशी सांगतात की, श्री दत्तात्रय समाधी लावून तपश्चर्येस बसले असत भगीरथानें भागीरथी आणिली. ती वाटेने येतांना दत्तात्रय बसल्या ठिकाण आली आणि त्यांनी जे कुश ठेविले होते ते विस्तृत केले आणि दत्ताची समाधी भंग केली. तेव्हां त्यांनी डोळे उघडले आणि पाहिले तो गंगोदकाने सर्व व्यापिले. त्यावर उभयतांचा मोठा संवाद झाल्याचे मोठे पुराणच आहे, परंतु शेवटी दत्तानी त्या जाग्यास असा वर दिला की, येथे जो श्राद्ध करून पिंड देईल त्याचे पितर मुक्तीस जातील.
 काय एडिटर साहेब त्रिंबकाजवळचे उष्टया पत्रावळीचे खङ्खल आणि तेथील कुशावर्त कधी कसे झाले ते कोणीं कृपा करून कळवील तर बरे होईल.
 हरिद्वार ही पुण्यभूमी पडली म्हणून स्त्री संभोगादि पातकें तेथें घडूं नयेत याकरितां येथे रात्री कोणी राहात नाही. किरकोळ दुकानदार, व यात्रेकरी मात्र राहतात. कुंभास येथें फार मोठा मेळा जमतो असे सांगतात. गेल्या कुंभास बारा लक्ष मनुष्ये जमला होती व तीस हजार लोक सरकाराने बंदोबस्ताकरितां आणिले होते. येथें वर सांगितलेले कङ्खळ गांवी ब्राम्हण लोक राहतात व दुसरे ज्वालापूर म्हणून मोठे गांव २ कोसांवर आहे तेथे राहतात.
 येथून बद्रिकेदार १५० कोस आहे, परंतु रस्ता पहाडांतून सबब तेथ पर्यंत पोहोचण्यास सुमारे १ महिना लागतो, तेथून ५० कोस पुढे पहाडांत बद्रिनारायण आहे. त्यास जाण्यास १५ दिवस लागतात. त्याच्या पुढे गंगोत्री ३० कोस आहे. तिकडे जाण्यासही दहा, बारा दिवस लागतात. ही यात्रा लोक वैशाख शुद्ध ३ पासून कार्तिक शुद्ध १ च्या आंत करितात. नंतर सहा महिने सर्व मार्ग बर्फाने आच्छादिले जातात. येथे पाहाडातूंन जाण्यास बसण्याकरितां 'झंपान' म्हणजे एका बाजल्यास दोहो अंगांनी वेळूची तिकटी बांधून त्यामध्ये बास अडकविलेला असतो आणि त्यास दोन भोई उचलतात. अशा डोल्या मिळतात, परंतु रुपये ७५ पडतात, म्हणून गरीबांस अवघड पडतें. बद्रिनारायणा पलीकडे ब्रम्हकपाट स्थान आहे. तेथे पिंडदान केले म्हणजे करणारा पुढे श्राधे करण्याच्या खटपर्टीतून मुक्त होतो. हरिद्वारास गंगा येण्या पूर्वी तिला मंदाकिनी आणि अलकनंदा या दोन नद्या मिळाल्या आहेत. यापैकी एकीचा संगम गंगेशी झाला आहे तेथे देवप्रयाग आहे.
 कुंभाच्या मेळ्यास येथे ५।६ लक्ष गोसावी नंगे व कौपीनधारी असे जमतात. इकडे दक्षणी लोकांपेक्षां पंजाबी लोक फार यात्रेस येतात. आतां पुरे करितो. पुढे लिहीन.

एडिटराचा मित्र
एक फिरस्ता.



कुरुक्षेत्र.
मुक्काम श्री० क्षेत्र वाराणशी.
ता ० १८ दिसेंबर १८७१.

 ज्ञानप्रकाशकर्ते यांस:-

 वि०वि०. गेल्या पत्री आपणाकडे हरिद्वाराची माहिती थोडीशी लिहिली. आज कुरुक्षेत्र अयवा ठाणेश्वर (स्थानेश्वर) ची माहिती लिहितों. स्थानेश्वरास जाण्याकरितां रुडकीवरून सारणपुरास जावे लागते. सारणपूर हे मोठे शहर आहे. येथे जिल्हा स्टेशन आहे. येथे एक ऑग्लोव्हर्न्याक्युलर स्कूल आहे. तेथे फी दर मुलास महिना २ आणे आहे. शाळा बरी आहे. येथे लांकडी काम पेट्या वगैरे नक्षीदार पहिल्या प्रतीचें बनते. येथून आगगाडींत बसून अंबाळ्यास जावें. अंबाळा हेही जिल्हा स्टेशन आहे. येथून स्थानेश्वर १८ कोस आहे. तेथे पाय मार्गाने एक्यांतून जाण्यास ६ तास लागतात.

 कुरुक्षेत्र ही पूर्वी कैरव आणि पांडव ह्यांच्यामध्ये युद्ध झालेली जागा आहे. येथे सरस्वती नदी आहे. येथे पूर्वी जिल्हा स्टेशन होते, परंतु हल्ली रेल्वेमुळे तें तेथून काढून अंबाळ्यास नेले आहे. ह्या गांवीं ब्राम्हण लोकांची वस्ती दाट आहे. येथून हस्तनापूर ८ कोस आहे. ते आतां लहानसे खेडे आहे. कुरुक्षेत्राचे क्षेत्र ८४ कोसांचे आहे. येथे स्थानेश्वर महादेवाचे प्राचीन स्थान सरस्वती कुंडाच्या काठी आहे. तेथे दोन प्रहरी स्नानाचे फल आहे. येथे लक्ष्मी कुंड म्हणून एक मोठे तळें २ कोस लांबीचें आहे. ह्यांत काय ते मुख्य स्नान. भारतांतील युद्धाच्या सर्व जागा येथे अबालवृद्धांस माहीत आहेत. मला वाटते की, पुराणिकानें भारत चांगले सांगता यावे म्हणून येयें येऊन सर्व स्थाने पाहून जावी. त्याप्रमाणेच भागवतांतील कृष्ण लीला चांगली सांगावयास पाहिजे तर मथुरा वृंदावन आणि गोकूळ येथील सर्व स्थाने पाहावी.
 येथे कर्णाळ ह्मणून एक मोठे गांव २३ मैलांवर आहे. ती अंगदेशाची राजधानी राजा कर्णाचें मुख्य रहावयाचे ठिकाण होते. ह्या कुरुक्षेत्रांत भीष्मानी युद्ध करून ते शरपंजरी पडले ती सर्व जागा व बाणगंगा ही स्थळे, त्याप्रमाणेच समसप्तकची जागा व चक्रव्यूह आणि शकटव्यूह व कर्णाच्या फौजेची वगैरे सर्व जागा दृष्टीस पडतात. कर्णाने आपल्या फौजेनिशी जेथे तळ दिला होता त्यास राजा कर्णका खेडा म्हणतात. तेथे कर्ण मोठा दाता सबब त्याने धर्मादाय केला, तो इतका की, ब्राम्हणांनी सुवर्ण मुद्रांनी भरलेल्या गोण्याच्या गोण्या नको म्हणून टाकून गेले. त्या मुद्रा पांच पन्नास त्या जागी दरसाल पावसाळ्यांत लोकांस सांपडतात व त्या मुद्रा लोक प्रसादिक म्हणून ज्यास्त दाम देऊन घेतात, असे येथे पुष्कळ लोक सांगतात. गदा युद्ध झालेली जागा व अश्वत्याम्याने पांडवाचे लोक निजलेल्या ठिकाणी मारले ती जागा, अशा सर्व जागा येथे आहेत. सूर्य ग्रहणांत स्थाणू तीर्थी स्नानाचे मोठे पुण्य आहे. यंदाच्या सूर्य ग्रहणांत सुमारें पांच सहा लक्ष यात्रा तेथे जमेल असा अंदाज होता.
 इकडील मुलखांत लोकांस शिकण्याची चाढ आमच्या तिकडच्या सारखी फारच कमी आहे. त्यांची अज्ञानानेही पाठ घेतली आहे. ज्याप्रमाणे आपल्या तिकडे भारतीय युद्धांत चार चाकी, २ चाकी रथ काढितात त्याप्रमाणे रथ गाड्या करण्याची इकडे सध्या वहिवाट आहे. लोभ असो देणे हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.



ता० १२ डिसेंबर १८७१.
मुक्काम श्री क्षेत्र वाराणशी.

ज्ञानप्रकाशकर्ते महाराज:—
 वि० वि०. म्यां गेल्या पत्री तुम्हास कुरु क्षेत्राची थोडी माहिती लिहून पाठविली. हल्ली अमरसर, लाहोर, मुलतानची लिहितो.
 कुरुक्षेत्राहून अमरसरास जाण्याचें असले तर अंबाळ्यावरून जाणारी रेल्वे नजीक पडते. अंबाळा हे स्टेशन सिमल्यास जाण्यास जवळ आहे. इकडे हिमालय पर्वतास पहाड म्हणण्याचा सांप्रदाय आहे. काय सांगू एडिटरराव हा हिमालय जेव्हां म्यां पहिल्यानें हरिद्वारच्या वाटेने रुडकीस पाहिला त्या वेळची माझ्या स्थिति! ह्या पर्वताच्या मध्य प्रदेशास जो पहाड आहे तो सर्व निरंतर श्वेत, चकचकणारा आणि गगन चुंबित दिसला. आम्हा दक्षिणी लोकांस हा बर्फाचा डोंगर हजारों कोस पसरलेला पहाणे म्हणजे एक अद्भुत चमत्कार वाटतो. तुम्हास सारांश इतकाच सांगतो की, मी तर अल्प मतीच आहे, परंतु थोरथोरांनी जे त्याचे वर्णन लिहून ठेविले आहे ते वाचून देखील त्याचे यथार्थ ज्ञानाचा लेशही होगें मुष्कील आहे. ते काय आहे ते सांगतांच येत नाहीं. अस्तु.
 आम्ही अंबाळ्याहून निघालो तो रेल्वेचा सतलज नदीवरील प्रचंड पूल उतरलो तेव्हां त्या पुलाचे काम पाहून आम्हास परमाश्चर्य वाटलें. येवढा मोठा पूल हिंदुस्थानांत दुसरा विरळाच असेल. ह्याच सतलज नदीच्या काठी आटक हें खेडें आहे व तेथ पावेतों हिंदू लोकांनी जावें अशी मर्यादा पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी केलेली होती. येथून थोडया कोसांवर पानपत खेडें आहे. त्याच्या जवळच पेशव्यांच्या फौजेची कत्तल उडाली.
 आम्ही अमरसरी पोहोचल्यावर शहर पाहिले तो आम्हास फारच चांगले भासले. ह्या शहरांत लोकरीचा, रेशमाचा, आणि कलाबतूचा कशिदा काढणारे लोक पुष्कळ आहेत. येथे शाल-जोड्या वगैरे लोकरीचे जिन्नस नाना तऱ्हेचे चमत्कारिक मिळतात. ह्याच गांवीं गुरु नानक जो शीख लोकांचा धर्मस्थापक होऊन गेला त्याची समाधी आहे. ती पाहण्यास सर्व विद्याचारसंपन्न हिंदूनी जाण्याचा यत्न करावा. काय सांगू! जेथें कबर आहे त्या जाग्याचे वर्णन एडिटर बाबा इतक्या दिवस अरेबियन नाईट मधील वर्णन मला गप्पासारखे वाटत होते, परंतु आतां ती भ्रांती उरली नाहीं. खरोखरीच तें वर्णन यथार्थ आहे; कारण नानकच्या समाधीच्या इमारतीचें काम त्या वर्णनाप्रमाणे आहे. आंतील संगमरवरी दगडाच्या इमारतीला "दरबार" ही संज्ञा आहे व सतलज, बीहा, रावी वगैरे नद्या फारच मोठ्या असल्याने त्यांस मिठ्ठा दरयाव ह्मणण्याची चाल आहे.
 नानकाचे दरबार अमृत सरोवराच्या मध्ये आहे. त्याला एका बाजूने पायवाट संगमरवरी दगडांची बांधलेली आहे. त्या वाटेवर जे उजेडाकरितां कंदील दुतर्फा लावले आहेत त्यांच्या फ्रेमी सर्व सोने आणि चांदीच्या गिलिटाच्या आहेत. दरबारची सर्व इमारत तीन मजले पावेतों संगमरवरी दगडाची आहे, आणि छताला चोहोंकडे आरसे गालिच्याच्या बुटासारखे बसविलेले असून मध्ये जो वेल काढिला आहे तो सोन्याच्या आणि चांदीच्या शाईचा आहे. सोने आणि चांदी येयें लोखंडाप्रमाणे खर्च केली आहे. छताच्या कामाची पतलावण बेहद्द कारेगिरीची आहे.
 येथील बगीचे म्यां पाहिले तेव्हा मला असे वाटले कीं, धन्य आहेत हे लोक. आम्हा लोकांस बगीच्या अगोदर नको आणि तशांत कांही नाद असला तर त्याचे ज्ञान नाहीं असे म्हटले तरी चालेल. अस्तु. येथे मुख्य महात्म म्हटले ह्मणजे अमृत सरोवरी स्नान करण्याचे आणि गुरु नानकाच्या समाधीचे दर्शन घेण्याचे आहे. इकडे मेवा मिठाईची गर्दी हो. आतां झोप येते सबब पुरे करितों. लोभ असावा हे विनंती.



  मुक्काम वाराणशी. ता० २० डिसेंबर १८७१.
ज्ञानप्रकाशकर्ते यांस:-
 वि० वि०. काय सांगू अमरसरच्या गुरु नानकाच्या मंदिराची शोभा. या मंदिरास दरबार म्हणतात, हे मी पूर्वीच्या पत्र लिहून कळविलेच आहे. आतां ह्या मंदिरास पांच मोठाले कळस आहेत. ते आपल्या पर्वतीच्या देवालयाच्या कळसापेक्षा प्रत्येकी तिपट मोठे असून त्यावर सोने चढविले आहे. सारांश सोने रुपें येथे कांहींच पदार्थ नाहीं, असे त्या काली होते असे मानणे भाग आहे.
 ह्या मंदिराचे अद्यापि काम चालले आहे. तटाच्या दोन बाजूनी संगमरवरी दगडाचा कटा आहे. बाकी दोन बाजूचें काम सुरू आहे. ह्याप्रमाणे स्थिति आहे.
 अमरसरापासून दक्षिणेस ३२ मैलांवर लाहोर आहे. हे शहर बारा कोस घेराचें आहे. ह्याच्या सभोवती जे बगीचे आहेत ते अवर्णनीय आहेत. कित्येक बगीच्यांतून ६ ऋतूंत जे वेगवेगळाले मेवे उत्पन्न होतात ते पिकतात. वसंताचा वाफा वेगळा. ग्रीष्म ऋतूचा वेगळा. ह्याप्रमाणे सर्व काळचे वाफे दहा बिघ्यांचे केलेले आहेत. काय सांगावें एके ठिकाणी तर असा चमत्कार दृष्टीस पडला की, पलंगावर बिछाना घालून तोंडाने झाडाची नाना तऱ्हेची फळे खावीं, अशी कांही चमत्कारिक योजना केलेली आहे. सर्व काही विलक्षण आहे. लाहोर हें रावी नदीच्या कांठी आहे. ह्या नदीचे जे कालवे काढलेले आहेत ते प्रत्येकी नदीच्या बरोबरीचे आहेत असे म्हटलें तरी चालेल.
 लाहोरांत पाहण्यासारख्या इमारती म्हटल्या म्हणजे वजीरखानाची महजीद, बारद्वारी, जाहांगीरचा मुकरबा इत्यादि आहेत. वजीरखानाच्या महजिदीत सोनेरी शाईने सर्व कुरान लिहिले आहे. बारद्वारीचे काम सगळे संगमरवराचे आहे. ह्या इमारती पाहिल्या म्हणजे चित्तास फारच आनंद होतो.
 पंजाबाच्या सरहदीवर मुलतान प्रांत लागतो. त्यांत मुलतान हे गांव पाहण्यासारखे आहे. येथे नरसिंह अवतार झाला. जेथे नरसिंह खांबांतून निघाला तें स्थान व प्रल्हादपुरी ह्या जागा हिंदु लोकांस पाहण्यासारख्या आहेत. इकडे आज पावेतों बैराग्यांवांचून कोणी यात्रेस आले नाहीत अशी खबर मिळते.
 मुलतानांत शाशमततबरेल नामक मठी आहे, ती पाहण्यासारखी आहे. ह्याप्रमाणेच अकबराची महजीद वगैरे पाहण्यासारखी आहे. पत्रविस्तार भयास्तव पुरे करतों. लोभ असावा हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता



शीख लोकांचे धर्म.

 पंजाबामध्ये जे शीख लोक आहेत त्यांचे नानकशाही, उदासी, गंजभक्षी, रामराई, सुथ्राशाही, गोविंदसिंही, निर्मळ, आणि नाग, असे अनेक पंथ आहेत. हे सर्व पंथ नानाकशाही पंथाचेच वेगवेगळाले अनेक मठ होऊन त्या मठाधिपतींच्या मताभिमानानें भिन्नत्व पावले आहेत. हिंदु धर्मामध्ये आजपावेतों अनेक आचार्यांच्या मतभेदाप्रमाणे अनेक पंथ उत्पन्न झाले आहेत त्याप्रमाणेच हा शीख लोकांचा नानकशाही पंथही उत्पन्न झाला आहे. प्रथमतः नानकशहाने धर्माच्या बाबतींत आपल्या बुद्धीस जे योग्य वाटलें तें घेऊन जे त्याज्य वाटले तें टाकिलें आणि अशा प्रकारचा एक धर्मग्रंथ बनविला आणि आपण त्याप्रमाणे लोकांस उपदेश करूं लागला. असे उपदिष्ट झालेले जे लोक ते शीख होत. आरंभी हा पंथ फारसा बलाढ्य नव्हता तरी मुसलमान लोकांच्या छळणुकीमुळे आणि त्या पंथांतील अग्रसर लोकांच्या महत्वाकांक्षीपणामुळे उत्तरोत्तर त्यास पुष्कळ बळकटी आली. औरंगजेब पादशहाने हिंदु धर्माच्या सर्व पंथांचा उच्छेद करण्याबद्दल होईल तितकी पराकाष्ठा केली ही गोष्ट सर्वांस महशूर आहे. त्या पादशहाच्या वेळीं शीख लोकांचा मुख्य धर्माध्यक्ष गोविंद सिंह म्हणून होता. हा मनुष्य अत्यंत महत्वाकांक्षी होता. ह्याने आपल्या बुद्धि कौशल्याने नानकशहानें केलेली जीं शांतिपर सूत्रे ती सर्व युद्धपर लावून त्याप्रमाणे लोकांस उपदेश करून सर्व शीख लोक मोठे शिपाई करून टाकिले. आतां आपण वेगवेगळ्या पंथाचा विचार करूं.


उदासी.

 शीख लोकांपैकी जे लोक उदासी पंथास अवलंबून आहेत ते सर्व नानकशाही पंथाचे खरे शिष्य आहेत असे मानण्यास चिंता नाही. हे लोक इहलौकिक अवस्थांतराविषयी फार औदासिन्य दाखवितात. हे लोक फार विरक्त असतात आणि आपला सर्व काळ ईश्वराचें ध्यान आणि भजन करण्यांत घालवितात. त्यांचा जो मठ असतो त्याला संगत असे म्हणतात. हे लोक पुष्कळ एकत्र जमून यात्रा करीत फिरतात. हिंदुस्थानांतील मोठमोठ्या शहरांतून एकाद दुसरा उदासी शीख कोणीं श्रीमानाच्या आश्रयानें राहिलेला आढळतो. हे लोक जरी विरक्तपणाचा बाणा बाळगितात तरी मलीन वस्त्रे अगर चिंध्या परिधान करीत नाहीत. त्यांचे कपडे चांगल्या प्रकारचे असतात. ते दाढी मिशा राखितात. आणि संभावित व खपसुरत असतात. आम्ही गरीब आहोत असे जरी ते सांगतात तरी ते कधीं भिक्षा मागत नाहींत. त्यांच्या धर्मात लग्न करूं नये असे जरी सांगितले आहे तथापि जे शीख भागीरथीच्या किनाऱ्यावरील प्रदेशांत राहिले आहेत त्यांनी हा नियम पाळल्याचे आढळत नाहीं. हे लोक नेहमी आपल्या शिष्यांस आदि ग्रंथ व दशपादशहाका ग्रंथ ह्यांतील धर्मपंथाचा उपदेश करीत असतात. हे ग्रंथ नानकशहा आणि गोविंद सिंह यांणी केलेले ग्रंथ एका ठिकाणी करून रचलेले आहेत. ह्या ग्रंथावरून जेव्हां पुराण चाललेले असते तेव्हां मधून मधून कबीर, मिराबाई, आणि सुरदास ह्यांची पदें व रेखते मोठ्या प्रेमानें श्रोते वक्त्यासह म्हणतात. पुराण समाप्तीच्या वेळीं श्रोते ग्रंथापुढे यथाशक्ती दक्षिणा ठेवतात. नंतर उदासी गुरुजी त्यांस प्रसाद व मिठाई देतात. काशी क्षेत्रीं कांहीं उदासी लोकांचे मठ आहेत. तेथे रात्री पुष्कळ वेळ पुराण चालतें. ह्या उदास्यामध्ये कित्येक वेदांत शास्त्र चांगले जाणणारे असतात. नानकशहानें केलेले ग्रंथ वेदांतास अनुसरून आहेत. धर्मचंद म्हणून नानकशहाचा नातू होता त्यानें उदासी पंथ स्थापित केला. त्याच्या वंशजांस नानक पुत्र असे म्हणतात व पंजागंत त्यास शीख लोक मोठा मान देतात.
 नानकोपदिष्ट धर्म कबिराच्या धर्म पंथापासून फार भिन्न आहे असे नाहीं व साधारणतः हिंदुधर्मापासून तर बिलकुलच सुटत नाहीं. या धर्मांत हिंदूची सर्व पुराणे व त्यांतील पुरुष हे खरे मानले आहेत. परंतु मुख्य कटाक्ष मनुष्याने जन्मास आल्यावर आपल्या जीवाची मुक्तता मायेच्या पाशापासून कोणत्या प्रकारे करावी त्यावर आहे. नानक आणि कबीर ह्यांच्या मते सर्व एकच आहेत व धर्म संबंधी कामामध्ये हिंदूनी आणि मुसलमानानी आपणास वेगळे आहोत असे मानावे हे बरोबर नाहीं. ते उभयतां हिंदूस व मुसलमानास असा उपदेश करीत कीं, दोन्ही धर्मांच्या मुख्य गोष्टी एकच आहेत. फक्त मध्यंतरी ज्या आगंतुक चाली मध्ये शिरून परस्परांचे निरर्थक वैपरित्य आले आहे तितके काढून टाकणे अवश्य आहे.


गंजभक्षी.

 ह्या लोकांची माहिती विशेष मिळत नाहीं. फक्त हे नांव त्या पंथाच्या लोकांस त्याच्या मूळ आचार्यावरून पडलें आहे इतकेच कळते.


रामराई.

 रामराय म्हणून हरीरायाचा नातू अगर पणतू होता. त्याचा आणि हरी कृष्ण हा हारिरामाचा मुलगा होता. त्याच्या बरोबर मठाधिपत्याविषयीं तंटा झाला. तेव्हां जे शीख लोक रामरायाच्या पक्षाचे होते ते त्यांचा मोड झाला तरी त्यांच्याकडे तसेच राहिले आणि त्यानें स्थापिलेल्या धर्माचे अनुयाई झाले. रामरायाचा हक्क मठाधिपत्याविषयीं खरा आहे व तो पुण्य पुरुष होता म्हणून त्यानें पुष्कळ अनुभविक कृत्ये केलीं. ह्याबद्दल रामराई लोकांमध्ये मोठे ग्रंथ आहेत. हा पंथ १६६० मध्ये उद्भवला. ह्या पंथाचे लोक हिंदुस्थानांत फारसे नाहींत.


सुथ्राशाही.

 वर सांगितलेल्या दोन पंयांच्या लोकांपेक्षां सुथ्राशाही पंथाचे लोक चोहीकडे पुष्कळ आढळतात. ह्यांच्यामधील धर्मोपदेशक आपल्या कपाळास उभी काळी रेघ लावितात आणि हातांत एक हात लांबीच्या दोन टिपऱ्या घेऊन त्या तालावर वाजवून गाणी गातात आणि भिक्षा मांगतात. हे लोक आपले अयुष्य असद् मार्गाने घालवितात. ह्या लोकांत प्रतिष्ठा नाहीं व ते हमेशा जुवा खेळतात, दारू पितात आणि चोऱ्या करितात. गुरुगोविंदाचा बाप तेघर बहादूर हा आपल्या धर्म पंथाचा उपदेष्टा असे ते मानितात.


गोविंदसिंही.

 पंजाबामध्ये जे शीख लोक आहेत व ज्यांचे वर्चस्व राष्ट्राच्या गणनेत आज पावेतों होत आले आहे. ह्याच्या पैकी बारा आणे लोक ह्या पंथाचे आहेत. जरी नानकोपदिष्ट धर्म हे मानितात व नानकास मोठा मान देतात तरी त्याने जी शांती धरावी, क्षमा करावी, दया बाळगावी इत्यादि नियम सांगितले आहेत ते सर्व ह्यांनी एकीकडे गुंडाळून ठेविले आहेत आणि समशेर बहादर होण्याकरितां हे तरवारीची भक्ति करूं लागले आहेत. ह्या पंथाची स्थापना गुरुगोविंदानें केली. आणि ती हिंदू आणि मुसलमान ह्यांजवर कशी चालवावी तो उपदेश केला. गुरुगोविंदाने आपल्या शिष्यांस दाढी व मिशा राखण्याची परवानगी दिली व निळा पोषाग घालावा म्हणून हुकूम दिला. त्याने गौमांस खेरीज करून सर्व प्रकारचे मांस भक्षण्याची मोकळीक दिली व जातिभेद मोडून टाकिला. हिंदू अथवा मुसलमान कोणीं जरी त्याच्या पंथांत गेला तरी तो घेई. असे त्याने केल्यापासून शीख लोकांस राष्ट्रत्व आले असे जरी आहे तरी ते हिंदूच्या सर्व देवांची भक्ति करितात; त्यांचे सर्व सण पाळितात, त्यांचीच काय ती ह्यांस वाचावयास पुस्तकें, आणि ते ब्राम्हणास मोठा मान देतात. ह्यावरून हे स्पष्ट होते कीं, जरी त्यांनी जातिभेद मोडला व वेद पुराणे वगैरेबद्दल दशवादशहाका ग्रंथ वाचूं लागले तरी आपण मुळचे हिंदूच आहोत हे त्यांच्या मनांत पक्के ठसले आहे. दशपादशहाका ग्रंथ गुरुगोविंदानें केला व तो नानकापासून दहावा उपदेशक झाला म्हणून त्या ग्रंथास दशपादशहाका ग्रंथ म्हणू लागले. गुरुगोविंद अठराव्या शतकाच्या आरंभी प्रसिद्धीस आला.


निर्मळ.

 ह्या लोकांच्यामध्ये आणि उदासींच्या मध्ये फारसे अंतर नाहीं. वास्तविक पाहिले तर नानकानें जो धर्म सांगितला त्याप्रमाणे हेच लोक यथार्थ आचरण करितात असे म्हटले पाहिजे. त्यांचे नांव निर्मळवधी हे आहे म्हणजे नानकापासून आलेल्या धर्मांत भेसळ न होऊं देतां मुळच्या धर्माप्रमाणे वागणारे ते जगांतील दूषणापासून आपण अलग आहोत असे ते सांगतात, व निरंतर धर्म आचरणामध्ये काळ घालवितात. ते लग्न करीत नाहींत व प्रायः अल्प वस्त्रे परिधान करितात. ते उदासी पंथाच्या शीख लोकांप्रमाणे संगतींत जमून राहात नाहीत व ईश्वर भजन करण्याचा त्यांचा एक विवक्षित मार्ग नाहीं. नानक, कबीर वगैरे दुसरे एकेश्वर वादींच्या ग्रंथाचें वाचन मनन करून ते ईश्वरार्चन करितात. हे लोक आपल्या शिष्यांपासून उपजीविका करितात. ते वेदांत शास्त्रांत पारंगत असतात. ह्या पंथाचे लोक फार नाहीत तरी मोठमोठ्या शहरांतून व विशेष करून काशींत कांही आढळतात.


नाग.

 नंगे गोसांवी म्हणून शेवामध्ये आणि वैष्णवांमध्ये आहेत त्याप्रमाणेच शीख लोकांमध्येही आहेत. त्यांत आणि ह्यांत भेद इतकाच कीं, पहिल्या दोन पंथांचे लोक हत्यारे बाळगितात व हे लोक त्यांस शिवत देखील नाहीत, परंतु स्वस्थ एकांत वासांत ईश्वराचें स्तौत्य करून काळक्षेप करितात. हे नग्म फिरतात आणि निर्मळ पंथी अल्प वस्त्र परिधान करितात. ह्या खेरीज उभय पंथाच्या लोकांमध्ये कांहीं फरक दृष्टोत्पत्तीस येत नाहीं.



आग्रा.

मुक्काम वाराणशी ता० २८ दि० १८७१

ज्ञानप्रकाशकर्ते महाराज,
 नमस्कार. पंजाबांतील लोक दक्षणिपेक्षा स्वभावानें शूर असावे असे आम्हास वाटतें. इकडे ज्ञातिभेद नांवाचा आहे असे म्हटलें तरी चालेल, आतां माझ्या ह्या लिहिण्याचा अर्थ म्हणजे कांहीं सर्व ज्ञातींचा विवाहव्यवहार अथवा पंक्तिव्यवहार होतो असा समजतां कामा नये. परंतु आमच्या तिकडे जसा स्पर्शास्पर्शाचा विटाळ मानतात तसा इकडे बिलकुल मानण्याचा प्रघात नाहीं. हलालखोर घरांत सर्व वागण्याच्या जिन्याच्या चौथ्या मजल्यापर्यंत जातो. स्मश्रु करण्याच्या संप्रदायांत ज्याची त्याची मर्जी पुष्कळांशीं काम करिते. कोणीं कल्लया मधील नुसती दाढीच मात्र काढवितो, कोणी कपाळावर नुसता एक तीन बोटाचा त्रिकोन होण्यापुरतीच हजामत करवितो, कोणी नुसती शेंडी कायम ठेवून सर्व हजामत करवितो, कोणी सर्व डोक्याभर दोन अगर तीन बोटे लांबीचे केंस राखितो, ह्याप्रमाणे नाना तऱ्हांनी स्मश्रु करविणारे लोक एका जातींत आढळतात. बायकांच्या नथेचा मासला कसा असतो ते आपणास थोडक्यांत कळवितो. नाकांत जी नथ घालण्याची ती घातली म्हणजे बेंबीच्या वर दोन बोटे पडते. सारांश काय सांगावयाचा. महाराज आतां माझ्या ध्यानांत आले "अगे अगे बायको ऊठ ऊठ तुझ्या नथेंतून तीर मारूं दे" ह्या म्हणींचे तात्पर्य! कां एडिटर बाबा असल्या नथेंतून तोफेचा गोळा ती नाकांत असतां निघून पार जाण्यास कांही अडचण पडेल काय? नाहींहो नाहीं. मग तीर तर सहज निघून जाईल. वः काय तिरंदाजी ही. अस्तु.
 आम्ही अमरसरास गेलो म्हणून तुम्हाला मागल्या पत्र लिहून कळविलेंच आहे.
 अमरसराहून जे निघालों ते थेट आग्र्यास उतरलो. कां एडिटरराव केवढा प्रवास हा. अहो महाराज, हिमालयाच्या पायथ्याशी आम्ही सकाळी थंडीनें कुडकुडत होतो ते एकदम संध्याकाळी दिल्लीच्या पलीकडे उष्ण प्रदेशांत पडलो. काय आमच्या प्रवासाची स्थिति सांगावी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हवेत, देशांत, त्यांच्या भाषेत किती फरक!!! ह्याचे वर्णन करवत नाहीं. सकाळी पंजाबी भाषा, दोन प्रहरीं गुरजरी आणि संध्याकाळी एकदम दिल्ली प्रांतची शुद्ध मुसलमानी.
 आग्रा शहर हे यमुनेचे काठ अंतरवेदी बाहेर आहे. ह्यापासून ग्वालेर ३६ कोश आहे. आणि मथुरा १८ कोश आहे. आम्ही आग्र्यास पोहोचलो. त्याच्या अदल्या दिवशींच तेथील किल्ल्यांत स्टोअर हौस आहे, त्यांत दारूखान्यांस आग लागून २५, ३० मनुष्ये जाया झालीं होतींव तेथील इमारतही बरीच पडली होती. ती सर्व आम्ही पाहून आम्हास मोठे वाईट वाटले.
 ह्या शहरांतील बाजारच्या रस्त्याची बांधणी मथुरेच्या बांधणीप्रमाणेच आहे, परंतु बाजार मोठा, पेठा दोन दोन मैल लांब, दुकानें दाट असे कांही हे शहर चमत्कारिक आम्हास वाटले. इकडे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादि पाहिजे तो व्यापार करितात. तुम्हास थोडकेंच उदाहरण देतों कीं, म्यां ज्या दुकानी कलाबतूचा कातडी जोडा विकत घेतला तो दुकानदार क्षत्रिय होता. येथे लोक शुद्ध उर्दु भाषा बोलतात. पेहेराव अनेक तऱ्हेचा विचित्र आढळतो व त्यांत प्रतिबंध नाहीं. आज तुम्ही पागोटें घाला, उद्यां टोपी, परवां पटका, तरी लोक हसतील असे वाटत नाहीं.
 आग्र्यास प्रवाशाने पाहण्यासारिख्या ज्या इमारती आहेत त्यांत ताज म्हणून जी इमारत आहे त्या सारखी इमारत माझ्या पाहण्यांत आज पावेतों एकही आली नाहीं.
 ह्याच्या दरवाज्यांत प्रथमतः गेले म्हणजे ताजावर जीं माणसे उभी असतील त्यांच्या उरापासून वरचे भाग दिसतात. दरवाज्यांतून आंत गेले म्हणजे चोहोकडून महिरपदार कमानीचे दुजोडीचे सोपे नजरेस येतात. नंतर आंतील दरवाज्यांत गेल्यावर सभोती नाना तऱ्हेचे वृक्षांनी सुशोभित झालेली अशी बाग दृष्टीस पडते. ह्या बागेत फळझाडे आणि फुलझाडें नाना तऱ्हेची आहेत. हा ताज नूरजहान बेगम होती तिनें बांधिला आहे. ही पांच मजले प्रचंड इमारत सर्व संगमरवरी दगडांची आहे. ह्या इमारतीत सर्व सामग्री वर्षाच्या बेगमीची घेऊन ५० हजार मंडळी खुशाल नांदेल असा अंदाज आमचा झाला आहे. ह्यांत नाना तऱ्हेचे वेल वेगवेगळ्या रंगानें दगडाचे खोदून केले आहेत. ह्याबद्दल कल्पना करण्यांत ज्यानें ही इमारत पाहिली नाहीं त्यास अशक्य आहे. आंतील कबरा दोन ठिकाणी आहेत. एक वरच्या मजल्यावर आणि दुसरी तळमजल्यावर. येथे जे वेलबुटीचें खोदीव काम आहे त्यांत कारागिरीची आणि पैसा खर्चण्याची हद्द झाली आहे. ह्या ताजाच्या एका आंगास निमाज पढण्याकरितां एक सोपा बांधलेला आहे. त्यांत ६ हात लांब आणि ३ हात रुंद असे एकेक आसन संगमरवरी पांढरा दगड आणि दुसरा तसाच गुळगुळीत तांबडा दगड ह्याची एकेक महिरप अशी हजार आसने केली आहेत. ह्यांत यमुनेचा पाट आणून जलक्रीडेकरितां एक बावडी बांधली आहे. तिला चार मजले इमारत वाटोळी बांधलेली आहे. ती फार चमत्कारिक आहे. ह्या ताजमहालांतील बगीच्याची व्यवस्था सरकाराने इंजनेर खात्यांतून बरीच ठेविली आहे.
 येथें त्याच नमुन्याची दुसरी इमारत यमुनेच्या काठी नूरजहानच्या दिवाणानें बांधली आहे. तीही पाहण्यासारखी आहे.
 आग्र्याच्या किल्यांत मोतीयहजाद वगैरे इमारती आहेत. त्या सर्व अनुपम्यच आहेत. किल्यांत एका ठिकाणी स्नानाची जागा केली आहे. तेथें यमुनेच्या पाटाचे पाणी आणून दरएक स्नानाच्या जाग्याच्या सभोंवती पाट फिरविले आहेत. हे सर्व काम संगमरवराचें आहे. सारांश माती आणि विटा प्रमाणे संगमरवर येथे झालेला आहे. आग्र्यास रेल्वेचें स्टेशनही विटांचे फार चमत्कारिक रीतीचे बांधलेले आहे.
 येथील लोक दगडी कोरीव व कलाबतूचें काम फार चांगले करितात. मला असे वाटते की, प्राण्याने जन्मास येऊन आपल्या डोळ्याचे सार्थक करणे असल्यास एकवार तरी येथे येऊन ह्या सर्व इमारती पाहाव्या म्हणजे त्यास जे समाधान होईल तें अवर्णनीय आहे. येथे सत्रंज्या, हिंदुस्थानचें वगैरे भरजरी कापड फार चांगले होते.
 येथे कोहळा आणि साकर ह्यांचा पाक करून पेठा म्हणून एक पदार्थ करितात तो खाण्याला फारच चांगला लागतो. व तसा पेठा दुसरा कोठेंही बनत नाही. येथे एकंदर ७-८ दक्षणी ब्राम्हण आम्हास स्थाईक असे आढळले. राजा दिनकरराव साहेब हेही येथेंच वाडा बांधून राहिलेले आहेत. ह्यांचेंच मात्र येथे नांदते दक्षणीचे घर आहे. हे गृहस्थ ह्या प्रांती फार इभ्रतदार आहेत. आतां पत्रविस्तारास्तव पुरे करितों.

तुमचा मित्र एक फिरस्ता



कानपूर व लखनौ

ज्ञानप्रकाशकर्ते यांस:-
 वि० वि०. गेल्या पत्री आपणाकडे आग्रा शहरची थोडीशी हकीकत लिहून पाठविली. आतां आग्र्याहून आम्ही कानपूर वगैरे कडे गेलो तिकडील कांहीं माहिती लिहून कळवितों.
 आग्र्याहून आम्ही पहाटेस तीन वाजतां रेल गाडींत स्वार झालो तो सुमारे साडेदहा वाजतां सकाळी कानपूरच्या स्टेशनावर दाखल झालों. कानपूरच्या स्टेशनाजवळ शिंदे सरकारची मोठी धर्मशाळा दक्षणी लोकांकरितां उतरण्यास बांधली आहे. तेथें कांहीं लोक उतरतात. कित्येक गंगापार जाऊन लखनौस रेल गाडी जाण्याचें जें स्टेशन आहे तेथे उतरतात. गंगापार उतरल्याने यात्रेकऱ्यांस गंगेचें उदक स्नानास मिळते. आणि कानपुराहून लखनौस जी गाडी सकाळी आठ वाजतां जाते ती साधण्यास बरें पडतें.
 कानपुराहून चवदा मैलांवर ब्रम्हावर्त आहे तेथे शिघ्राम गाडीत बसून गेले म्हणजे सुमारे दोन कलाखांत मनुष्य पोहोचते. जातां येतांचे भाडे २σ८ पडतें. हें वाल्मिकीचे आश्रमस्थान आहे. येथे श्रीमंत कैलासवासी बाजीराव रघुनाथ पेशवे राहत होते. त्यांच्यामुळे दक्षणी लोकांची वस्ती येथें पुष्कळ आहे. हल्ली ते लोक निराश्रित झाले आहेत. त्यांपैकी सर्व ब्राम्हण लोकांच्या कुटुंबांस अलीजा बहादर शिंदे सरकार यांणी कांही साह्य करून दिले आहे. ह्या ठिकाणी सन १८५७ इसवीचे बंड फार भयंकर रीतीचे झाले ही गोष्ट प्रसिद्धच आहे. कानपूर हे शहर फार मोठे आहे. एडिटरराव इकडच्या दगडी इमारतीची तऱ्हाच कांही चमत्कारिक. सगळी घरें चार मजली पांच मजली महिरापदार नक्षीचे काम. ह्या सर्व गोष्टींनी एकंदर शहरास जी रमणीय शोभा येते ती अवर्णनीय आहे.
 येथे गंगा तटाकी साहेब लोकांनी मोठे मौजेचे बंगले बांधले आहेत आणि त्यांतून ते वास करून विहार करतात. धन्य आहेत ते इतकेंच म्हणावयाचें. अहो, मला एक भ्रांती उत्पन्न झाली आहे. ती कोणती ह्मणाल तर साहेब लोकांच्या बंगल्याची तऱ्हाही पुष्कळांशी इकडील नेटिव इमारती सारखीच दिसते. तेव्हां ही तऱ्हा चांगली म्हणावी किंवा कसें. असो त्या पोकळ बोलण्यांत काय हशील आहे. आपले काम पुढे चालवूं या. ह्याच गांवीं जो सत्यश्रौतास कालवा भागीरथीचा काढला आहे तो पुनः भागीरथीस मि ळविला आहे. हा कालवा शहरांतून सुमारे दोन कोस गेला आहे आणि ह्याच्या दुथड्यानी सराया बांधल्या आहेत. त्या फार रमणीय आहेत. ह्या कालव्यांत हरिद्वारास नावेत बसतात ते कानपुरास उतरतात; अशी मोठी मौज केली आहे.
 कानपुरास गंगेच्या पैलतीरी आम्ही एक मुक्काम केला. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठाच्या गाडीस लखनौस जाण्यास निघालों तो साडे दहा वाजतां लखनौ स्टेशनावर पोहोचलो. हे स्टेशन मध्यम तऱ्हेचें बांधलेले आहे. लखनौ स्टेशनापासून गांव सुमारें पक्का दीड कोस आहे. येयें स्टेशनापासून एक मैलावर राजा मानशिंगाने एक धर्मशाळा बांधली आहे. तीत सुमारे २००० उतारूपेक्षा ज्यास्ती लोक राहतील येवढी मोठी आहे. व ही धर्मशाळा एका मोठ्या राजवाड्यासारखी आहे. लखनौ शहर ही एक अजब चीज आहे. ह्याचे यथार्थ वर्णन करण्यास मी असमर्थ आहे हे मला कबूल करणे भाग आहे. ह्या शहरचे बाजार ही फारच मोठे. तरी एडिटर बाबा हे दहा आणें शहर इंग्रज सरकाराने बंडाच्या साली अगदी उद्वस्त करून टाकिले आहे. येथे फारशी भाषेंत निष्णात असे पुष्कळ लोक मला आढळले. येथे इमाम वाडा आणि केसरी बाग ही दोन स्थले पाहण्यासारखी आहेत. येथील किल्ला पाडून अगदी जमीनदोस्त केला आहे.
 इमाम वाड्यांत नबाब लोकांच्या कबरी आहेत. ह्या कबरीस पुष्कळ पैसा खर्च झालेला आहे. संगमरवरी दगडाचे काम केले आहे. येथे दोन नमुने करबला येयील हसन हुसनच्या कबरीचे आपल्या तिकडील डोले करितात त्या नमुन्याप्रमाणे चांदीचे भले मोठाले बनविलेले आहेत. येथें आरसे, हंड्या झाडे, वगैरे सामान लाखो रुपयांचे आहे. येथे एक आग्र्याच्या ताजमहालाच्या नमुन्याप्रमाणे लहानशीशी इमारत बांधलेली आहे. येथे पाण्याचा हौद फार मोठा आहे. त्याच्या मध्य भागी इकडून तिकडे जाण्यास एक लोखंडी पूल बांधिला आहे. केसरी बागेत पांच पन्नास मशीदी आहेत. त्या सर्वांस कळस सोन्याच्या मुलाम्याचे आहेत. ह्या शहरांतून गोमती नदी वाहात आहे. तिजवरून लखनौस मुसलमानी अंमल असतांना एक लोखंडाचा पूल बांधिलेला आहे. त्याचे काम फार मजबूद असून पाहण्यासारखे आहे.
 लखनौपासून अयोध्या क्षेत्र ४० कोस आहे. तेथपर्यंत रेलगाडीचा रस्ता अद्यापि तयार झाला नाहीं. ह्याकरितां घोड्याच्या गाड्यांतून लोक तेथे जातात. लखनौस गोमती नदी आहे. हे तीर्थ मोठे आहे. आता पुरे करितों. लोभ असावा हे विनंती. ता० ७ माहे जानेवारी सन १८७२ इ.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.

अयोध्या

मुक्काम श्री क्षेत्र वाराणसी
ता० ३ जानेवारी सन १८७२

ज्ञानप्रकाशकर्ते महाराज, -
 वि०वि०. गेल्या पत्री म्या आपणाकडे लखनौ शहरची वगैरे हकीकत लिहून पाठविली तिजला आपण आपल्या सुंदर पत्र जागा दिली ते पाहून मजला परमानंद झाला. आतां आपणाकडे फैजाबाद आणि अयोध्या ह्या हर्दू शहरांची थोडीशी माहिती लिहितो. तिला कृपा करून जागा द्याल अशी उमेद आहे.
 महाराज, लखनौ शहरी अयोध्यस जाण्याकरितां घोड्याच्या गाड्या मिळतात. त्यांत रेकल्यासारखी एक गाडी असते तीत ६ प्यासेंजर बसतात. शिवाय एक कोचमन आणि दुसरा घोडेवाला असे आठ असामी असून त्यांचा सामानाचा बोजाही त्या गाडींत सांठवितात आणि दोन घोडे तिला जोडून ती चालवितात. ह्या गाडीचे भाडें फैजाबादपावेतों १५ रुपये पडतें. ही गाडी लखनौहून निघाल्यापासून सुमारे २० तासांनी अयोध्यस दाखल होते. अयोध्येच्या आलीकडे सुमारे २ कोसांवर फैजाबाद आहे. त्यास मुसलमान लोक बंगला ह्मणतात. लखनौ पासून अयोध्यस जाण्यास जो सडकेचा रस्ता बांधिला आहे, तो फारच चांगला आहे. वाटेनें दुतर्फा झाडांची दाट गर्दी आहे. फैजाबाद हें शहर फार मोठे आहे. येथील इमारती वगैरेची शिस्त कानपूर वगैरे शहराप्रमाणेच आहे. अयोध्या क्षेत्र शरयू नदीच्या काठी आहे. ही नदी फार मोठी आहे. अयोध्या शहर हे त्रेतायुगीं श्री रामाच्या राज्याची राजधानी होतें. ह्या क्षेत्री श्री रामाचीं मंदिरें सुमारे ३ हजार आहेत. येथे अयोध्येचा महिमा असा आहे कीं, अयोध्यावासी जितके लोक आहेत ते सर्व जगन्नायासम आहेत. ह्याकरितां एडिटरराव आसपास राजे रजवाडे लोक येथे जितका पुष्कळ होईल तितका वास करितात. अयोध्या शहर हे दोन वेळां स्वर्गास गेले आहे व आणखी एकवार जाणार आहे, ह्याकरितां पुष्कळ बैरागी लोक येथें वास करितात. येथे मोठमोठ्या साव सावकारांची व राजे रजवाड्याची पुष्कळ अन्नछत्रे आहेत. येथे पंडित उमेदत्त महाराज म्हणून महा विद्वान वृद्ध पंडित आहेत. ह्यांची ह्या प्रांती मोठी मान्यता आहे व ह्यांस सालांतून सरासरी उत्पन्न २५ हजारांचे आहे. ह्या पंडित महाराजांच्या दर्शनास आम्ही गेलो होतो. आमचें आदर तार्तम्य ह्यानी चांगले केले. ह्यांस अबालवृद्धाशी भाषण करण्याचा कंटाळा नाहीं. हे स्वभावान फार सुशील आहेत. ह्यांचा विद्यार्थी पढविण्याचा आणि त्यांचे पोटास घालण्याचा मोठा अस्करा आहे. ह्यांचे वय सत्तरीच्या जवळ जवळ आहे असे आम्हास वाटले.
 येथील देवालयांच्या इमारती सर्व दगडी असून लाखो रुपये खर्चाने झालेल्या आहेत. येथे राजा मानसिंगाने एक शिव मंदिर बांधिले आहे. त्यास फारच खर्च लागलेला आहे. त्याच राजाने येथे शरयू नदीच्या काठी स्वर्गद्वार म्हणून जागा आहे म्हणजे ज्या द्वारानें श्री रामचंद्रानी अयोध्या स्वर्गास नेली तेथे त्याच राजा मानसिंगाने सुमारे २ कोट रुपये खर्च करून घांट व देवालये बांधलेली आहेत. ती पाहण्यासारखी आहेत.
 येथे प्रथमतः गांवांत शिरतांना हनुमान गढी आहे. तीत श्री मारुतीचे संस्थान आहे. येथील मारुतीची मूर्त बसलेली आहे. ह्याचे कारण लोक असे सांगतात की, श्री रामचंद्रानी जेव्हां अयोध्या स्वर्गास नेली तेव्हां तेथील राज्य श्री मारुतीस देऊन त्या गादीवर त्याची स्थापना केली. आणि त्यास सत्तारूढ होण्याविषयी आज्ञा दिली म्हणून मारुतीची मूर्त बसलेली आहे. बाकी हिंदुस्थानांत कोणत्याही मारुतीच्या देवालयांत मारुती बसलेले आढळत नाहीत. येथे हनुमान गढीच्या नजीकच श्री रामचंद्राच्या राजवाड्याचे स्थान आहे. येथे ज्या कांहीं इमारती आहेत त्यांजविषयों लोक अशी कथा सांगतात की, श्री रामचंद्रानी अयोध्या स्वर्गात नेली तेव्हां खालीं नुसती जागा उरली. नंतर पुढे राजा विक्रमानें रामायणाच्या आधारें त्या राजवाड्यांतील वेगवेगळ्या मंदिरांची ठिकाणें कायम करून तेथें नवीन इमारती बांधावल्या. त्यांत दशरथ राजाचा महाल, कौसल्या, सुमित्रा, कैकयी ह्यांचे महाल श्री शितेचा महाल, तिची पाकशाळा, श्री रामचंद्राची लहानपणची खेळण्याची जागा, रंगमहाल, दरबारची जागा, अशा अनेक इमारती आहेत. त्या सर्व ठिकाणीं श्री रामचंद्राच्या वगैरे मूर्ती स्थापिल्या आहेत त्यांचे दर्शन होते.
 येथे श्री रामचंद्राचा जन्म झाला त्या ठिकाणी औरंगजेब पादशहाने मोठी थोरली महजीद बांधावली आहे. त्याप्रमाणेच त्रेतायुगाचा राम म्हणजे त्या काली स्थापन केलेल्या मूर्ती (ह्या श्री राम, शिता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न वगैरेच्या सोन्याच्या आहेत.) ची स्थापना केली आहे, आणि तेथे देवालयही बांधले आहे. त्या देवालयावरही सदर पादशहानें एक महजीद बांधिली आहे, आणि तिसरी महजीद स्वर्गद्वाराच्या ठिकाणी बांधली आहे.
 येथें मुख्य यात्रा म्हटली म्हणजे श्रीराम घाटीं शरयू नदीचे स्नान व त्याप्रमाणे स्वर्ग द्वारी ब्रह्मघाटी शरयू स्नान आणि तीर्थश्राद्ध आणि वर सांगितलेल्या ठिकाणच्या देवांचीं दर्शने इतकेच काय ते. येथें दक्षणी ब्राम्हणांची सुमारे ३०, ३५ घरे आहेत. बाकी सर्व तद्देशी लोक आहेत. येथें तांबड्या तोंडांची माकडे पुष्कळ आहेत. त्यांचा यात्रेकऱ्यांस फार उपद्रव होतो. रस्याने जातांना ते त्याच्या डोक्यावरचें पागोटे उचलून नेतात. येथील हवा पाणी फार चांगले आहे. येथे मार्गशीर्ष शुद्ध ५ स श्री रामचंद्राचा सीतेशी विवाह झाला. त्याचा मोठा समारंभ होतो. यात्रा सुमारे २ लाख जमते. मोठ मोठाले राजे रजवाडे लोकही येतात. हा समारंभ पाहण्यासारखा आहे. आतां पुरे करितों. लोभ असावा हे विनंती.

एडिटराचा मित्र
एक फिरस्ता.



अयोध्येपासून काशीपर्यंत रस्ता व काशींतील
मुख्य देवता.

मुक्काम श्रीक्षेत्र वाराणसी ता०
५ जानेवारी सन १८७२

ज्ञानप्रकाशकर्ते यांस:—-
 वि० वि०. आपणाकडे मी नेहमी इकडील खबर लिहून पाठवितो तिला आपण आपल्या सुंदर पत्री जागा देतां हे पाहून मला आणखी कांही ज्यास्त हकीकत लिहिण्यास उमेद आली आहे. ह्यास्तव हल्लीं ह्या चार ओळी आपणाकडे लिहून पाठविल्या आहेत तर त्यांस कृपा करून येत्या अंकांत जागा द्यावी हीच प्रार्थना आहे.
 महाराज गेल्या पत्री श्री अयोध्या क्षेत्राची माहिती म्यां यथामती आपणाकडे पाठविली. हें क्षेत्र आउध प्रांतांत आहे. ह्या प्रांताचा राज्यकारभार चीफ कमिशनर पाहतो. तो नेहेमी लखनौस राहतो. अयोध्येस कानपूर मार्गे येण्यास लखनौ पावेतों रेलगाडीची सडक मिळते. हिला आउध आणि रोहिलखंड रेल्वे असे नांव आहे. ह्या रेल्वेस कानपुरापासून आरंभ होतो. ह्या रेल्वेची सडक हल्ली लखनौ पावेतो तयार असून तिजवरून वाफेनें चालगारी गाडी जाण्या येण्याचा क्रम सुरू आहे. लखनौपासून फैजाबाद पावेतोही सदर प्रकारची सडक तयार झाली आहे, परंतु मध्ये कांहीं कांही ठिकाणी काम होणें आहे तें लवकरच संपेल अशी येथे माहिती मिळते. ते काम संपलें म्हणजे सुमारें पेस्तर महिन्यांत त्यावरून गाडी सुरू होईल असा अंदाज आहे. ही रेलगाडीची सडक जीवनपूर मार्गे श्री वाराणसी पावेतो नेली आहे व हें कामही मोठ्या झपाटयाने चालू आहे. यंदाच हे काम संपले असते, परंतु महाराज यंदा पर्जन्यानें जी इकडे अति वृष्टी केली तिच्या योगे पुष्कळ तयार झालेले काम वाहून गेलें. ते सर्व पुनः करण्याचा क्रम जारी आहे. जीवनपूर फार मोठे शहर होते, परंतु सालमजकुरच्या अति वृष्टीनें त्याची इतकी खराबी झाली आहे कीं, गांवांपैकी दहा आणे भागांतील इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. जीवनपुरास बेलियाचें तेल फार चांगलें पैदा होतें, परंतु यंदा तेथील बेलियाच्या फुलाच्या वाड्यांतून पाणी शिरून फारच नुकसान झाले आहे, ह्यामुळे यंदा बेलियाच्या तेलाची अम्मळ चणचण होईल असे लोक ह्मणतात.
 अयोध्येपासून ६ कोसांवर नंदिग्राम आहे. तेथे भरतानें तपश्चर्या केली. हे ठिकाण पाहण्यासारखे आहे. ह्याचप्रमाणें अयोध्येपासून सुमारे १८/२० कोसांवर नैमिषारण्य आहे. (ह्यास इकडील लोक निमसार ह्मणतात) हे ठिकाण सत्ययुगी तपश्चर्येचें स्थान होते आणि सूतानी शौनकादि ऋषीप्रति पुष्कळ पुराणे इतिहास वगैरे कथन केली आहेत. हेही वन एडिटरराव पाहण्यासारखे आहे.
 आम्ही अयोध्यापुरीहून परत लखनौ व कानपूर मार्गे श्री वाराणसीस आलो. वाराणसी हे क्षेत्र आशी आणि वरुणा ह्या दोन नद्यांचे संगम भागीरथीशी झाले आहेत त्यांच्या मध्ये आहे. अशीचा संगम भागीरथीशी वाराणशीच्या दक्षिण सीमेवर झाला आहे, आणि वरुणेचा संगम उत्तर सीमेवर झाला आहे. त्याच शब्दाचा हिंदुस्थानी भाषेत बनारसी अथवा बनारस हा अपभ्रंश झाला आहे असे अनुमान होतें. ह्या क्षेत्राचें काशी हेही नांव दक्षणी लोकांत प्रसिद्ध आहे.
 विश्वेश्वर, बिंदुमाधव, धुंडिराज गणपति, दंडपाणी, भैरव, काशी, गुहा, गंगा, भवानी आणि मणिकर्णिका ह्या मुख्य देवतांची नित्य यात्रा यात्रेकऱ्याने करावी लागते.
 पहिले जे काशी विश्वेश्वराचे देवालय आहे त्यावर औरंगजेब पादशहानें एक मोठी महजीद बांधिली आहे, म्हणून त्याच्या जवळच हिंदूनी नवें विश्वेश्वराचे देवालय बांधिले आहे. ह्या देवालयाचे काम जुन्या चालीच्या देवळाप्रमाणे आहे. ह्या शिवालयाचें शिखर देवळाच्या भिंतीच्या वरल्या गलथ्यापासून तो वरच्या कळसापावेतों सोन्याने मढविलेले आहे. ह्या देवालयाच्या उत्तरेस ज्ञानवापि तीर्थाचा कूप आहे. जशी विश्वेश्वराच्या देवालयावर महजीद बांधली आहे तद्वतच बिंदुमाधवाच्या मुळच्या देवळावर एक भली मोठी महजीद सदर पादशहाने बांधिली आहे. ह्या महजिदीस दोन मनोरे आहेत. प्रत्येकी महाजदीच्या चौत्र्यापासून १२५ फूट उंच आहेत. ह्याजवर चढून काशी क्षेत्र पाहूं लागले ह्मणजे जो काय मौजेचा चमत्कार शहरांतील इमारतीचा दृष्टीस पडतो तो अनिर्वाच्य आहे. ह्या महजिदीजवळच हल्लींचें श्री बिंदुमाधवाचे देवालय आहे. आणि ह्या देवालयाजवळच पंचगंगेचा घाट आहे. ज्या बिंदुमाधवाच्या मूर्तीचा उच्छेद औरंगजेबाने केला. ती मूर्ति हल्ली एका सावकाराच्या येथे आहे. तिचे दर्शन सकाळी प्रहर दिवस पावेतों होतें. धुंडिराज विनायकाचे देऊळ श्री विश्वेश्वराच्या देवळाजवळच आहे. दंडपाणी हे विश्वेश्वराच्या देवळांत पश्चिमेस आहेत. आधी त्यांचे दर्शन घ्यावे आणि मग श्री विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे. कालभैरव हे काशिकापुरीचे कोतवाल आहेत. काशीचे देऊळ भैरवाच्या देवळापासून बरेंच लांब आहे. ह्या देवीला तेथील लोक वन्दे काशी म्हणतात. ह्या देवळाच्या जवळच गुहा आहे आणि तेथून थोड्याच अंतरावर गंगा ह्या नावाचा एक तलाव आहे. भवानीचे देवालय धुंडिराजाच्या देवळाजवळ आहे. गंगेच्या काठी एक घाट आहे. ह्या घाटानजीक जो गंगेचा भाग आहे त्यास मणिकर्णिका हें नांव आहे. ह्या नित्य यात्रेच्या देवतांचे दर्शन यात्रेकऱ्याने "विश्वेशं माधवं धुंडिं दंडपाणिच भैरवं॥ वन्दे काशी गुहां गंगां भवानी मणिकर्णिकां" ह्या श्लोकाच्या अनुक्रमानें घेतले पाहिजे. येथे त्या नित्य यात्रेखेरीज आणखी अतर्गृही, दक्षिण मानस, उत्तर मानस, पंचतीर्थ आणि पंचक्रोशी ह्या यात्रा कराव्या लागतात. ह्यांच्याबद्दल तपशिलवार हकीकत मागाहून लिहीन.
 गंगेस आशी, दशाश्वमेध, मणिकर्णिका, पंचगंगा आणि वरुणा हे पांच मुख्य घाट ३ कोसांच्या लांबीत आहेत. येथे प्रत्येक ठिकाणी यात्रेकऱ्याने श्राद्ध करावे लागते.
 प्रथमतः यात्रेकरी काशी क्षेत्रीं गेला म्हणजे त्यानें क्षौर करून माणिकर्णिका तीर्थप्रयुक्त श्राद्ध करावे लागतें. नंतर वर लिहिलेली पांच श्राद्धे केली पाहिजेत. पुढे पंचक्रोशीच्या वाटेनें ५ श्राद्धे केली पाहिजेत.
 आतां महाराज पत्रविस्तार फार झाला सबब पुरे करितों. लोभ असावा हे विनंती.

एडिटराचा मित्र एक
फिरस्ता.



रेल्वे पासून फायदा व बंगाली बाबू प्यासेंजरास कसे छळतात.
मुक्काम श्री वाराणशी
ता० जानेवारी १८७२.
ज्ञानप्रकाशकर्ते महाराज,
 वि० वि०. रेल्वे ह्या देशांत होण्यापूर्वी वाराणशी ही जागा पंजाब, काश्मीर आणि काबूल तसेंच बंगाल, बहार, आढीया, ब्रह्मदेश आणि नेपाळ ह्या प्रांतांची आणि दक्षिण हिंदुस्थानांतील प्रांतांची व उत्तर हिंदुस्थानांतील प्रांतांची व्यापाराची एक मोठी उतार पेंठच होती. तो संबंध आतां अगदी सुटला यामुळे व्यापाराच्या निमित्तें जें वैभव ह्या स्थलास आले होतें तें अगदींच कमी झाले असे म्हटले तरी चालेल. आतां देखील येथे व्यापार मोठा होतो, परंतु तो फक्त यात्रेच्या संबंधाने जो होतो तितकाच मात्र. इतर पालवी त्याच्या अगदी नाहीशा झाल्या.

 येथे कारागीर लोक हर जातीच्या कसबांत फार उत्कृष्ट आढळतात. जडावाचें काम तर येथें अनुपम्य रीतीचे बनतें. तांबे, पितळ वगैरे धातूंचें काम चांगले होऊन स्वस्तें पडतें. लांकडी काम, दगडी काम ह्याचीही तऱ्हा सदर्हू प्रमाणेच. इकडे हलवायाच्या दुकानी पक्वान्ने बहुत तोफा होतात व त्यांत विशेष इतकाच कीं, ती घृतपक्व असल्यामुळे ब्राह्मण प्रभृति सर्व ज्ञातीचे लोक खातात. हजारों मण पक्वानें नित्य तयार होतात आणि वर लिहिलेली मोकळीक असल्यामुळे तितकी ती दररोज खपतात. नेहमीचे एतद्देशीय रहिवासी लोकांच्या येथे हलवायाच्या घरच्या पुऱ्यांचा व लांडवांचा नित्य खर्चाच्या मानाने दोन शेर चार शेरांचा रतीब लावलेला असतो. जे दक्षणी लोक नवीन येऊन राहिलेले आहेत, त्यांच्या येथे मात्र नित्य सर्व प्रकारची सोय घरीं होते. बाकी ठिकाणी रगडून बाजारांतील जिन्नस चालतात. रांगड्या ब्राह्मण हलवायाच्या दुकानची पक्की रसोय दक्षणी यात्रेकऱ्यास श्राद्धादि कर्मास प्रशस्त आहे. एक दामाजीपंत कमरेस असले ह्मणजे जेवायाला, निजायाला, हुक्का ओढायाला वगैरे सर्व प्रकारची सोय देशाटण करणाऱ्याची निमिष मात्रांत होते.
 रेल्वेच्या संबंधाने येथील व्यापार कमी झाला असे आम्हीं वर लिहिले आहे तरी येथे फार मोठा व्यापार आहे. आह्मी पितांबर घेण्यास एके दुकानी गेलो होतो तेथें तीन मजला पितांबर भरले होते, असाच प्रकार हर जिनसांचा.
 रेल्वे आणि तारायंत्र ह्यांनीं मजा केली खरी, परंतु त्यापेक्षां जे लोक तेथे नौकरीवर आहेत त्यांच्या सारखे मजेदार लोक दुनियेत आढळणे मुष्कील. काय सांगावें एडिटरबावा, इकडे रुपये ७ दरमहा झाला ह्मणजे त्याला "बाबू" हें उपनामाभिधान प्राप्त होतें. तेथें स्टेशनावर शोध केला तो "बाबू" ह्या शब्दाचा अर्थ आपल्या इकडे "राव" अगर "पंत" म्हणतात, त्याप्रमाणेंच आहे असे समजले. आतां आम्ही रेल्वे स्टेशन बाबूंचें थोडेंसें वर्णन करितों. त्यांत कदाचित एखादे ठिकाण बाबू इतक्याच शब्दानें निर्वाह करूं तर ती गोष्ट रेल्वेवरील अगर इतर संभावित वास्तविक बाबूंस लागू नाही असे समजले पाहिजे. सारांश काय म्हणाल तर झालेल्या बाबूंची ही गोष्ट आहे. प्रथमतः स्टेशनावर म्हणजे रेल्वेच्या हे अध्यारित घ्यावयाचेंच. नौकरी लागली म्हणजे हिवाळ्यांत आधी बाबूस एक दुलई पांधरावी लागते व चरस म्हणजे गांजाचा अर्क ह्याचा हुक्का ओढावा लागतो. तो हुक्का कशाचा म्हणाल तर श्रीफलाचें बेलें, देवनळाच्या दांडीवर चिलीम, आपल्या तिकडील रंगाऱ्याच्या येथे सतेली असतात त्या घाटाची आणि बेल्याच्या भोंकास वर ओठ लावून बाबू गुड गुड ओढितात. मग काय विचारावयाची बाबूची चैन. मुलाच्या पायांत साक्स असून बूट असतात. व स्वारी १॥ हाती पंच्या नेसून सोगा खालीं सोडून डोकीवर इकडील किरिस्तवाप्रमाणे केस राखून आंगावर दुलईच्या आंतून एक आंगोछा वेष्टून उघड्या माथ्यानें स्टेशनावर गाडी जाण्याच्या अगर येण्याच्या वेळी फिरूं लागते.
 प्रयागाहून दिल्ली वगैरेकडे गाडी जाऊ लागली म्हणजे तो प्रांत प्रयागच्या पश्चिमेस आहे म्हणून तिला "पछाहाकी गाडी" असे म्हणतात. त्याप्रमाणे कलकत्ता वगैरे पूर्वेस आहे म्हणून तिकडे जाणारी अगर तिकडून येणाऱ्या गाडीस "पूरभ गाडी" असे म्हणतात. ह्या बाबूंची नावें भलीं लांब लांब असतात- बाबू राजेंद्र कुमार, बाबू शिवचरण प्रसाद अशा प्रकारची. आणि ह्या कृपाळू गृहस्थाची आणि टिकिट विकत मागणाऱ्या प्रवाशाची गांठ पडली म्हणजे फजितीच.
 ईस्ट इंडियन रेल्वे कंपनीने ज्या तिसऱ्या क्लासाच्या गाड्या केल्या आहेत त्या प्रत्येकींत समोरासमोर दोन चाकांवर दहा मनुष्ये बसतील इतक्या जाग्याचा एक भाग असे वेगळे वेगळे भाग केलेले आहेत. ह्याला हिंदुस्थानी भाषेनें "दरजा" अथवा "खाना" अशी संज्ञा आहे. ह्या दरएक खान्यांत जरी दहा मनुष्यें बसण्याची जागा असते तरी जर एकाद्यास तो सगळा दरजा घेणे असेल तर सहा मनुष्यांचे भाडे द्यावे आणि "रिजर्व" करून घ्यावा. असा रिजर्व करून एकादा अगर ज्यास्त दरजे हवे असतील तितके घेतले म्हणजे त्यांत आपलीच काय ती मंडळी बसते. दुसरे परकीय कोणी येत नाहीत, ह्यामुळे बायका मनुष्ये घेऊन अदबशीर रीत्या बसण्यास चांगले पडतें. ह्याकरितां तसा दरजा ज्याची ५/६ माणसे असतात ते घेतात. परंतु तो मिळण्याची जी पंचाईत आहे तिचा जेव्हां जातीने अनुभव घ्यावा तेव्हांच इंगित कळते. नाहीपेक्षा कळण्यास कठीण. ज्यास दरजा रिजर्व करणे असेल त्याने लहान स्टेशनावर पूर्वी ४८ तास आणि मोठया स्टेशनावर पूर्वी २४ तास व कांही विशेष स्टेशन आहेत तेथे पूर्वी सहा तास नोटिस दिली म्हणजे मिळेल, असा ईस्ट इंडियन रेल्वे कंपनीने नियम केला आहे. ह्या नियमाप्रमाणे कोणी ती नोटिस देण्यास प्रथमतः गेला म्हणजे तेथील शिपाई लोक वगैरे म्हणतात की, "आछा कुच फिकीर नही. तुमको हम एक पलखने दरजा रिजर्व करवा देयेंगे. जाव तुम अबी मकानपर" ह्यावर समाधान न पावतां जर कोणी स्टेशन मास्तरास नोटिस दिलीच तर मग जेव्हां दरजा रिजर्व करण्याची वेळ येते तेव्हां बुकिंग क्लार्क जे बाबू त्यांच्या हातीं संधी येते. मग त्यांजकडे दरजा रिजर्व करून द्या ह्मणून मागावयास गेलेना गेले म्हणजे ते प्रथमतः "गाडीमे दरजा खाली होगा तो गाडी आई बाद हम तुमको पास देयेंगे" असे उत्तर सांगतात. तेव्हां यात्रेकरू मोठ्या प्रतिष्ठेनें बाबूजवळ बोलू लागतो कीं, बाबूजी "हमने परसूं इस दरजेके वास्ते स्टेशन मास्तरसाबकू नोटिस दियाथा" असे बोलतांच बाबू म्हगतात की, जाव "तुम स्टेशन मास्तर साबके पास" इतके यात्रेकऱ्याशी बोलून शिपायाला हाक मारून त्याला विचारतात की, क्यौं तुम कैसा गाफिल अदमी है, बाहेरके अदमी कोठडीमें केसे आने सकते है. लेकिन फोरन सबकु हकाल देव" मग पात्रेकऱ्याची काय विचारतां फजिती "अर्ध चंद्रेण राघवः" ही स्थिति प्राप्त होते. अशा प्रकारे बाहेर आल्यावर यात्रेकरी स्टेशन मास्तराकडे जातो, तेथें त्यास आम्हास दरजा देण्यास बाबूस हुकूम द्या म्हणून बोलावयास जातो तो साहेब आम्हास नोटिस दिल्याचे स्मरण नाहीं असे स्वच्छ सांगतात. मग येत बाबूशीच गांठ. मग शिपाई बोवा मध्ये येऊन म्हणतात की, हम तुमको दरजा करवाय देते, तुम कुचतोची बाबूकू देव." असे बोलून त्यास बाबूकडे नेतो. आणि त्यांस सांगतो कीं, "बाबूजी इनको दरजाका पास करदेव और तुम आपना दस्तुरी लेव" मग बाबू तेव्हांच ताळ्यावर येतात. आणि म्हणतात की, अच्छा निकालो रुपय्या. केतने दरजे तुमको होनासो बोलो" मग यात्रेकरी जितके हवे लागतील तितके दरजे मागतो. त्याचा पास बाबू लिहून ठेऊन रुपये पेटींत टाकून स्वस्थपणे टिकिका वाटणे वगैरे काम करूं लागतात. इकडे जो जो गाडी स्टेशनावर येण्याची वेळ होते तो तो यात्रेकरू बावाची जी बाहेर परिवार मंडळी असते त्यांच्याजवळ टिकीट वगैरे कांही नसतें म्हणून रेल्वे स्टेशन पोलिसाचे लोक त्यांस धक्का बुक्की करण्याच्या बेतांत येतात. आणि हे गृहस्थ तर आंत अडकलेले असतात. पासाचे रुपये भरून चोरासारखे उगीच उभे राहिलेले असतात; कारण बाबूसाहेबांची मर्जी दुखावेल. मग हळूच धीर करून बोलूं लागतात की, "बाबूजी मेहरबानी करके पास देव, अशा प्रकारें तीन चार वेळां चार चार मिनिटांच्या अंतराने कृत्रिम बाबूजींची प्रार्थना केल्यावर बाबूजीच्या मुखावाटे मुक्ताफळे कोसळतात की, दरजेके पीछे हम दो दो रुपय्या लेयेंगे. अशा प्रकारची आकाशवाणी झाल्यावर यात्रेकरू कांहीं बोलण्याचा यत्न करणार, इतकें त्या अंतरसाक्ष बाबूस कळतेच. मग तत्काळ बाबूजीकडून आपोआपच उत्तर मिळते की, हं एक पाइ कम लेनेके नहीं." मग जितके दरजे घेतले असतील त्याप्रमाणे प्रत्येकास रुपये दोन दोन प्रमाणे बाबूच्या पायावर अर्पण करून पास घेऊन बाहेर येतात तो शंकासुराची गांठ पडते. ते लागलीच सवाल करितात की, "शिपाईकी दस्तुरी .।. दरजा दिये बिगर दरजा नहीं खोला जायगा" आणि गाडी तर स्टेशनावर थोडा वेळ उभी राहते तेव्हां पटा पट पावल्या टाकून गाडी उघडून घेऊन माणसे आंत घालताहेत तो लगेज वगैरे कांहीं वजन झाले असते त्याच्या पासाची बोंब उडते. लगेज वजन करणाऱ्या बाबूची पाद्य अर्घ्यादि पूजा केल्याशिवाय लगेजचा पास तर मिळणेंच नाही. बरे ती पूजा करून जो पास घेऊन गाडीत बसावयास जावें तो लगेज्याच्या बोजावरून लेबल मारणारा शंकाशूर हातांत पांच सहा लेबल व गोंदाची करटी घेऊन सलाम करिता आणि म्हणतो की, "क्यों हम लेबल नहीं लगाना" तेव्हां यात्रेकरू बावा प्रश्न करितात "क्यों किसवास्ते नही लगाते, तेव्हां त्यांचे छापिल उत्तर येतें कीं, हमारी दस्तुरी काहा है" मग यात्रेकरू बाबा म्हणतात की, बाबा आतां तुला तरी काय देऊं? मग शिपाई बावा बोलतात कीं, "हंम आठ आणे लेंगे. मग त्यांच्या हातावर तितकी रक्कम टाकिल्यावर रिजर्व केलेल्या दरजास लेबल मारणारा येतो. त्याचीही कथा सदर्हूप्रमाणे. अशा प्रकारे यात्रेकरू बावाची पिशवी बरीच खाली होते. आणि इतकी भुतावळ संपून जर स्टेशनावर कांही वेळ गाडी उभी राहिली तर वशिल्याने प्लाटफार्मवर आलेले भिकारी लोकांची गांठ पडते आणि गाडी निघे पावेतो त्रास देतात. सर्व कृत्यांत अशी कांहीं जिकीर होते कीं, जो गाडीचा पास काढण्याच्या वेळेपासून डोके दुखण्यास आरंभ होतो तो डोके उतरण्यास गाडी चालू झाली तरी दोन तास पुढे काळ लागतो.
 ह्याप्रमाणे पास काढणे झाल्यास अगर रिटर्न जर्नी टिकिट घेणे झाल्यास यात्रेकऱ्यास दुःख मानसिक व शारीर संबंधी सोसावे लागते. केवळ टिकिटेच काढावयाची असली तरी देखील सदरीं सांगितलेली भयंकर चिरी मिरि द्यावी लागते. तिच्या शिवाय गत्यंतरच नाहीं.
 आतां एडिटरराव उत्तर हिंदुस्थानांतील रेल्वे कंपनीने जी सुखाची साधने करून ठेविली आहेत ती सर्व ह्या आगांतुक कारणामुळे व्यर्थ होतात. ह्याचा बंदोबस्त होणे मला तर कठीणच दिसतें. अस्तु प्रालब्ध योग म्हणायाचा.
 आतां सदरी जी हकीकत म्यां लिहिली आहे ती सर्वत्र आहे असे समजूं नये.
 (आम्ही आतां गयेस जाण्याचा बेत केला आहे. तिकडे जाऊन आल्यावर पुनः आपली भेट पत्रद्वारे घेऊं. येतों लोभ असावा हे विनंती.)

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.



मानमंदीर.
मु० श्री वाराणशी ता०
जानेवारी सन १८७२.
ज्ञानप्रकाशकर्ते यांस:-
 वि० वि०. गेल्या पत्री म्यां तुम्हास लिहून कळविले होते की, आम्ही गयेस जाणार, परंतु एडिटरबावा आमचा मुक्काम येथे आणखी काही दिवस आहे ह्याकरितां येथील प्रसिद्ध प्रसिद्ध ठिकाणची हकीगत तुम्हास लिहून कळवावी असा ग्यां बेत केला आहे आणि ह्याला अनुलक्षून हे आजचे पत्र लिहितो. आजच्या पत्री तुमच्या वाचकांस ह्या क्षेत्रांतील मानमदिल आणि त्या मोहोल्यांत जी दुसरी मोठमोठाली देवालये आहेत त्यांचे वर्णन करितो.
 मानमंदिल ही एक जुनी वेधशाळा आहे व ह्याच्या नजीक जो गंगेस घाट आहे त्याला मानमंदील घाट ही संज्ञा आहे. त्या भव्य इमारतीनें घाटाला फारच शोभा आली आहे आणि ह्या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याच्या आटाळीवर उभे राहून गंगा प्रवाह अवलोकन केला म्हणजे मोठीच मौज दिसते. ह्या मंदिरांत जाण्याच्या द्वाराच्या आसपास पुष्कळ जुन्या झिजलेल्या मूर्ति दृष्टीस पडतात. त्यांत बऱ्याच मूर्ति मारुतीच्या आहेत. येथे एक जयपूरच्या राजाचे उंच काठीला बांधलेले निशाण फडकत असतें. ह्याचे कारण असे की, हा सर्व मोहोल्ला त्याचा म्हणविला जातो आणि हल्लीच्या राजे साहेबांच्या पूर्वजांपैकी कोणी जयसिंह म्हणून जयपूरचा राजा होऊन गेला त्याने ही मानमंदिल नामक वेधशाळा बांधविली. ह्या वेधशाळेपासून घाटावर जी गल्ली जाते तीत दालभैरवेश्वराचें शिवालय आहे. ह्या देवावर जर अवर्षण पडले तर संततधार धरितात असा येथे सांप्रदाय आहे. हा महादेव देवालयाच्या मध्यभागी एक खोल कुंड आहे त्याच्या मध्ये आहे आणि जेव्हां देवाला गंगोदकाने कोंडून टाकितात तेव्हां नुसते कुंडच भरून राहात नाहीत तर देवालयाची सर्व कपाटे बंद करून ते देखील तुडुंब भरतात, अशी येथे माहिती मिळते. ह्या देवाची यात्रा दारिद्रमोचनदायकही आहे. येथे चतुर्भुज अथवा श्री विष्णु आणि शीतला देवी हे देव आहेत. दालभैरवाच्या देवालयाजवळच सोमेश्वराचें देवालय आहे. ह्या देवाचे आराधन यथाशास्त्र केले म्हणजे सकल व्याधीचा परिहार होतो. कोणी थट्टेखोराने आम्हास असा प्रश्न केला कीं, सकल व्याधीचें परिहार स्थान सोमेश्वराचे देवालय आहे तर इंग्लिश दवाखाने आणि नेटिव डाक्तर ह्यांच्या घरीं रोग्यांची गर्दी कां? आम्ही पडलों शहाणेच तेव्हां प्रश्नास कांहीं तरी उत्तर द्यावे ह्मणून "भावेन देवं" ह्या वचनाने त्याला गप्प बसविले. कां? एडिटरराव आम्ही शहाणे खरे किंवा नाहीं? आम्हाला तर वाटते की, आम्ही मोठे शहाणे. अस्तु विषयांतराची क्षमा असावी. ह्या देवालयापासून नजीकच एका गल्लीत एक बऱ्हान देवीचे देवालय आहे. ह्या देवतेच्या आराधनाने हाती पाय सुजलेले लोकांची व्याधी दूर होते.

 मानमंदिल अथवा मानमंदीर ही वेधशाळा घाटावर उभें राहिले म्हणजे भली उंच दिसते. ह्या मंदिराच्या थोरल्या दरवाज्यांतून आंत गेले म्हणजे एक मोठा चौक लागतो. तेथून दुसऱ्या मजल्यावर गेलें म्हणजे ग्रहादिकांचे वेध वगैरे करण्याकरितां जी कांहीं मजबूत यंत्रे बांधलेली आहेत ती दृष्टीस पडतात.
 ही वेधशाळा सन १६९३ इसवीत अंभेरीचा राजा जयसिंह ह्याने बांधविली. राजा जयसिंह हा मोठाच विद्वान महमदशहा पादशहाच्या वेळी होऊन गेला. इतर शास्त्रापेक्षां ह्याला गाणिताची अशी कांहीं आवड होती आणि तो ज्योतिष शास्त्रांत इतका निपूण होता की, महमदशहा पादशहाने त्याजकडून ज्योतिष शास्त्राच्या गणितास बाहेरील अनुभवास जो कांहीं फरक येतो तो काढून टाकावा, या हेतूनें एक सारणी तयार करविली. आणि तिला जीज महमदशाही हें नांव दिले. ह्याच सारणीच्या अनुरोधाने हल्ली दिल्ली वगैरे प्रांती ज्योतिष शास्त्राचे सर्व गणित करितात. आपली ही सारणी चांगली व्हावी आणि ज्योतिष शास्त्र संबंधी शोधास पुष्कळ मदत मिळावी म्हणून राजा जयसिंह ह्यानें दिल्ली, वाराणशी, मथुरा, अवंतिका आणि जयपूर इतक्या ठिकाणी एकेक वेधशाळा बांधविली. त्या सर्व अद्याप काल पावेतो पाहण्या सारख्या आहेत.
 महमदशहा पादशहानें जेव्हां राजा जयसिंहास वर लिहिलेली सारणी तयार करण्याचा हुकूम केला तेव्हां त्याने प्रथमतः जी आपल्या लोकांत पितळेची केलेली ज्योतिष शास्त्र संबंधी यंत्रे प्रसिद्ध होती ती जमवून त्याने काम चालाविलें, परंतु त्या यंत्रांनी मनाजोगे काम होईना ह्मणजे तीं यंत्रें लहान असल्यामुळे व त्यांजवर अंश कला, विकला इत्यादि अति सूक्ष्म भाग बरोबर नसल्यामुळे यथा तथ्य वेध होईनासे झाले. व दुसऱ्या पुष्कळ अडचणी येऊं लागल्या. तेव्हां त्याने आपल्या मतानेच "रामजंतर", "समराटजंतर" इत्यादि यंत्र निर्माण केली. समराटजंत्राची तृजा १८ हातांची आहे आणि कला दीड जवाची आहे. ही यंत्रे दगड आणि चुना ह्याची भली मजबूत बांधलेली आहेत. ही यंत्रे बांधविते वेळी जे भूमिति शास्त्राकडे लक्ष्य दिले आहे त्याचें तें यंत्र पाहतांना आश्चर्य वाटल्यावांचून राहवतच नाहीं. ह्याप्रमाणे एडिटर महाराज राजा जयसिंहाने ज्योतिःशास्त्राचा विजय करून वेधशाळा बांधण्याचा प्रचार सुरू केला. ह्या वेध शाळेच्या योगाने ग्रह, तारे व इतर नक्षत्रे ह्यांच्या गति, स्थिति वगैरे प्रकार सुगम रीत्या कळू लागले. ह्या पांच ठिकाणी वेग वेगळ्या ज्या वेधशाळा बांधविल्या त्यांचे कारण इतकेच कीं, एके ठिकाणी जे गणित अगर वेध एका विवक्षित वेळी केले तर ते वेध अगर गणित त्या विवक्षित वेळी दुसऱ्या ठिकाणी केल्याने मिळते किंवा चुकतें हे पाहतां यावे. ह्या प्रत्येक ठिकाणी जे वेध होत ते नित्यशः आणवून प्रत्येक ठिकाणच्या रेखांशाचे अंतर काढून नंतर ते मिळाले तर खरें, नाहीं पेक्षां पुनः तपासणीस तो राजा पाठवी. परंतु त्याच्या ह्या वेधपत्रकांत अंतरच येत नसे. जसे गणितानें येईल तसेंच वेधाने येई. इतके बरोबर काम त्याने केलें. ह्याप्रमाणे श्री वाराणशी येथील वेधशाळेची आणि तेथील यंत्रांची हकीकत आहे. ती आमच्या एका मित्राने आम्ही ही वेधशाळा पाहण्यास गेलो त्या वेळी सांगितली. ती आपणाकडे पाठविली आहे. कृपा करून छापावी.
 हल्ली या यंत्राच्या योगानें ग्रहणे, तिथी वगैरे मात्र वर्तवितात. युरोपियन वगैरे जे कोणी ह्या क्षेत्री येतात ते या वेधशाळेत आल्यावांचून राहात नाहीत. तिगस्ता डयूक आफ एडिंबरोची स्वारी हिंदुस्थानांत देशाटनास आली होती तेव्हां येथे आली होती. हे मंदिर व त्यांतील यंत्रे फार पैसा खर्च करून व अक्कल खर्च करून बांधिली आहेत तरी जे ब्राम्हण ह्या मंदिरी राहतात आणि त्यांस पाहण्यास येणाऱ्या लोकांपासून बरेच पैसे मिळतात तथापि त्यांची झाड झुड देखील बरोबर रीत्या त्यांच्याने ठेववत नाहीं ही मोठी दुःखकारक गोष्ट आहे. ह्या यंत्राचे जे आति सूक्ष्म भाग आहेत ते कित्येक ठिकाणी अगदी झिजून गेले आहेत व कित्येक ठिकाणी माती सांठून सांठून बुजून गेले आहेत.
 वेधशाळेत गेले म्हणजे पाहिल्याने "मिति यंत्र आपल्या दृष्टीस पडते. ह्याची जी एक भिंत आहे ती अकरा फूट उंच आणि ९ इंच जाड असून क्षितिजाच्या पातळीत आहे. ह्या यंत्राच्या योगे मध्यान्हास सूर्य आला म्हणजे त्याची उंची वगैरे मापतां येते. ह्या यंत्रापासून थोड्याच अंतरावर एक फक्त दगडी आणि दुसरे केवळ चुन्याचे अशी दोन भली मोठी वर्तुळे बांधलेली दृष्टीस पडतात. त्यावरही अंश, कला वगैरे भाग पाडलेले आहेत, परंतु त्याचा उपयोग काय करितात तो आम्हास कोणी तेथे सांगितला नाहीं. यंत्र सम्राट अथवा यंत्रराज हें एक यंत्र येथे बांधलेले आहे. ह्याची भिंत ३६ फूट लांब आणि ४॥ फूट रुंद आहे. ती क्षितिज्याच्या पातळीत आहे. ह्याचें एक टोक ६ फूट ४। इंच उंच आहे. आणि दुसरें २२ फूट ३॥ इंच हळू हळू उंच उंच होत गेले आहे आणि ते उत्तरधृवाच्या अगदी सम रेषेत आहे. ह्या यंत्राच्या योगानें क्षितिज्यापासून एकाद्या ग्रहाचे अगर ताऱ्याचे अंतर वगैरे काढतां येते. येथे आणखी ३ ४ दगडी यंत्रे आहेत. त्यांची नांवें आतां मला आठवत नाहींत. लहान लहान यंत्रसम्राटही आणखी पुष्कळ येथे बांधलेले आढळतात.
 ह्यांच्या जवळच चक्रयंत्र आणि दिगंशयंत्र ही आहेत.
 मानमंदिराजवळच घाटावर नेपाळच्या राजाने बांधविलेले एक देवालय आहे. हे अवश्य पाहण्यासारखे आहे. हे देवालय बांधण्याची तऱ्हा इतर जी देवालये ह्या क्षेत्री आहेत त्यांच्या पासून फारच भिन्न आहे. असेना बापडी आपणास काय? हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.



दशाश्वमेध
मुक्काम श्री वाराणशी.
ता० जानेवारी १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांस:-
 वि० वि०. गेल्या पत्रीं आपणाकडे मानमंदीर मोहोल्याची हकीकत लिहून पाठविली. ती आपण कृपा करून छापालच. हल्लींच्या पत्र दशाश्वमेध मोहोल्याचे विवरण लिहून पाठवितो. तिला आपल्या सुंदर पत्राच्या एका अंकांत कृपा करून जागा द्या.
 दशाश्वमेधाचा घाट मानमंदीर घाटाच्या दक्षिणेस आहे. ह्या घाटी स्नानादि कर्माचें महत्पुण्य आहे याकरितां यात्रेकरू व क्षेत्रस्थ येथे जितकी स्नानें साधतील तितकी साधून घेतात. ह्या क्षेत्री पंचतीर्थी म्हणून जी यात्रा करितात त्या यात्रेचे एक श्राद्ध येथे करावे लागते. बाकीची चार श्राद्धे अशी संगम मणिकर्णिका, पंचगंगा, आणि वरुणा संगम ह्या ठिकाणी केली पाहिजेत. ह्या पांच ठिकाणच्या श्राद्धाची फले जगंनाथ, गया, प्रयाग, वाराणशी, हरिद्वार इत्यादि स्थली श्राद्ध यात्रा करून जे फल प्राप्त होते तत्समान आहे.
 दशाश्वमेधाची कथा मला एकानें सांगितली ती येथे लिहितो. कोणे एके दिवशीं शिव आणि पार्वती मंद्राचल पर्वताच्या शिखरावर क्रीडा करीत असतां एकाएकी शंकरास वाराणशी क्षेत्राचें स्मरण झाले आणि तेथील वर्तमान आपणास पुष्कळ दिवस कळले नाही म्हणून त्यास फार खेद झाला. श्री वाराणशी येथे दिवोदास राजा राज्य करीत होता. त्याने महादेवासुद्धां सर्व देवांस श्री वाराणशींतून हाकून लावले होते. नंतर शंकर तेथून निघून कांहीं दिवस मंद्राचलावर उमेसह येऊन राहिले होते. तेथून पुष्कळ दूतांस त्यांनी वाराणशीस जाऊन तेथील वर्तमान काय आहे हे पाहून येण्यास आज्ञा केली व ते दूत वाराणशीस गेले. परंतु वाराणशी क्षेत्राचा महिमाच विलक्षण ह्यामुळे जो दूत तेथे जाई तो परत येत नसे. कोणास ते क्षेत्र सोडावे असे वाटेचना, आणि शंकरास तर तेथील कांहींच वृत्त कळेना. अशा संकटांत सांपडले असतां काय करावे हा विचार करूं लागले. त्यांचे मन ह्या विचारांत निमग्न असतां ब्रह्मदेवास श्री वाराणशीस पाठवून शोध आणवावा ह्मणून उमेने सुचविलें. तेव्हां महादेवानी ब्रह्मदेवास बोलावून आणून सांगितले की, तुम्ही वाराणशी क्षेत्री जाऊन तेथील वर्तमान घेऊन यावे. नंतर ब्रम्हदेव हंसारूढ होऊन वाराणशीस गेले. तेथे दाखल झाल्यावर त्यानीं सर्व क्षेत्रभर पर्यटण केले. सर्व देवांची दर्शने घेतली. नंतर त्यांस तेथे अत्यंत आनंद झाला आणि तें क्षेत्र सोडून जाण्याची वासना त्यांस होईना. तेव्हां त्यानी आपणास राहण्याकरितां दशाश्वमेधचें स्थल निवडले आणि तेथे एका वृद्ध ब्राम्हणाचें रूप धारण करून स्वस्थ राहिले. परंतु शंकरानी जे काम त्यांस सांगितले होते त्याचा त्यांस विसर पडला नाही. दिवोदास राजाच्या नित्य कृत्यांत अगर दानधर्मांत कोठे तरी व्यंग काढावे ह्या हेतूने ते शोध करूं लागले. तो त्यांस न्यून कोठेंच दिसेना. नंतर ब्रम्हदेवानी अश्वमेधसामग्री राजाजवळ मागितली. ती अशी की, २७ कुंडांचें उदक, सत्तावीस वृक्षांच्या पालवी, ह्या प्रमाणे सर्व सामग्री दरएक जिन्नस सत्तावीस सत्तावीस ठिकाणचे असे आणून दे म्हणून म्हणतांच राजाने त्यांस उत्तर केले की, महाराज एक अश्वमेध सामग्री तर काय, परंतु दहा अश्वमेधांची सामग्रीची तयारी ठेवितों. आपण स्वस्थ आश्रमास चलावे. नंतर ब्रम्हदेव गंगातटाकी आले आणि स्नानसंध्यादि नित्य क्रम त्यानी सुरू केला. नंतर राजाने दहा अश्वमेधांची सामग्री ब्रम्हदेवास पाठविली. ते सर्व जिन्नस त्यानी तपासून घेतले तो त्यांस एकही न्यून आहे असे दिसले नाही. यामुळे त्याची मर्जी फारच संतोष पावली आणि त्यांनी दहा अश्वमेध केले. ज्या स्थली ब्रम्हदेवाचे हे दहा अश्वमेध झाले त्या स्थलास त्यांनी दशाश्वमेध हे नांव देऊन त्या जागी जो कोणी तीर्थवीधि वगैरे कर्म करील त्यास ती कर्मे प्रयागास त्रिवेणी संगम केल्याचें फल मिळेल असा वर दिला. ब्रम्हदेवानी नंतर एक दशाश्वमेधेश्वर महादेव आणि दुसरा ब्रम्हेश्वर महादेव अशी दोन लिंगे स्थापिली दशाश्वमेधेश्वराचे लिंग फार मोठे गंडकी शिळेचे आहे. सुमारे घेर ६ फूट असून उंची ४ फूट आहे. ब्रम्हेश्वराचें लिंग इतके मोठे नाहीं. दशाश्वमेधेश्वराच्या आराधनेने नरदेह धारण करणाऱ्या प्राण्यास जन्ममरणापासून मुक्ती आहे, आणि ब्रम्हेश्वराच्या आराधनेने ब्रम्हलोक प्राप्ती आहे अशी कथा आहे. ह्या देवालयांतून पुष्कळ दुसरी लिंगे स्थापन केली आहेत. त्यांस रांगडे लोक कचेरी असे म्हणतात. दशाश्वमेध घाटी आणि तेथेंच रुद्रसर ह्या नांवाचें कुंड आहे तेथें दशाहारांत स्नानाचें विशेष महात्म आहे. ज्येष्ठ शुद्ध १५ च्या स्नानाचे फल तर फारच मोठे आहे.
 ब्रम्हदेवाचे अश्वमेध संपल्यावर शंकराच्या कामाचे त्यांस पुनः स्मरण झाले म्हणून पुनः ते विचार करूं लागले. तो त्यांस कांहींच युक्ती सुचेना व दिवोदासाचा अपराधही त्यांस कांही आढळेना, तेव्हां त्यांनी वाराणशीसच राहण्याचा निश्चय केला.
 सिद्धेश्वरी महल्यांत एक सिद्धेश्वरीचे आणि दुसरे संकटा देवीचें अशी दोन देवालये आहेत. सिद्धेश्वरीच्या देवळालगतच चंद्रकूप म्हणून जो प्रसिद्ध कूप तो आहे. ह्या देवालयास दोन चौक आहेत त्यांपैकी एकांत हा कूप आहे. चैत्र शुद्ध १५ स चंद्रकूपाची यात्रा मोठी भरते आणि कोणत्याही महिन्यांत सोमवारी पौर्णिमा आली तर तेथे मोठा मेळा जमतो. ह्या कूपांत पिंडदानाचे मोठे फल आहे. याच चौकांत दुर्गा देवी आहे. ती चतुर्भुज आहे. एका हातांत कमल दुसऱ्या हातांत तरवार तिसरा हात सिंहावर आणि चवथा हात रेड्यावर असे आहेत. ह्या देवळा मागे सिद्धेश्वरीचे देवालय आहे. ही देवी सकल कार्यांची सिद्धिदायका आहे म्हणून सर्व लोक हिची आराधना करितात.
 संकटा देवी ही सकल संकटाची परिहर्ती आहे. हे देवालय मोठे असून ह्यांत एक मठ आहे. ह्या मठांत वाराणशी क्षेत्री मरावे ह्या उद्देशाने आलेले गरीब लोक राहतात. तसे कांही शास्त्राध्ययन करणारे विद्यार्थीही राहतात. ह्या देवळापासून जवळच भागीरथीच्या तटाकास एक घाट आहे. त्याला संकटाघाट ही संज्ञा आहे. ह्या घाटावरच महावीराचे देवालय आहे. संकटा घाटाच्या उत्तरेस रामघाट आहे. येथे जितके घाट आहेत तितके प्रायः राजे लोकांनी आणि महाजन लोकांनी बांधलेले आहेत व दरएक घाटी एकेक शिवालय आहे. आतां आम्ही कंटाळलो. हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.



पिशाचमोचन.
मु० श्री वाराणशी ता०
जानेवारी १८७२.
ज्ञानप्रकाशकर्ते यांस:-
 वि० वि०. आम्ही विक्षिप्त आणि आतां तुम्हास काय म्हणूं? आम्ही विक्षिप्त कसे म्हणून प्रश्न कराल तर सांगतो ऐका. आम्ही काल पर्वा तुमच्याकडे दोन पत्रे रवाना केली त्यांतून "मानमंदीर" आणि "दशाश्वमेध" ह्या मोहोल्याची हकीकत तुम्हास लिहून कळविली आणि आज त्या क्रमाने म्हटले म्हणजे "बंगाली टोला" मोहोल्याची काही माहिती तुम्हास ल्याहावी, तसे न करितां आज आम्ही तुम्हास "पिशाच मोचना" कडील वाराणशीच्या भागाची हकीकत लिहिणार अतएव विक्षिप्त अस्तु.
 ह्या क्षेत्राच्या पश्चिम सीमेवरच कां म्हणाना "पिशाच मोचनाचें" मोठे तळे आहे. ह्यांतील उदक संचयास विमलतीर्थ असे नांव आहे. ह्या सरोवरास चोही बाजूनी घाट बांधलेले आहेत. जो घाट दक्षिणोत्तर जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला आहे त्यावर देवळे आहेत. जे यात्रेकरू श्री वाराणसीस यात्रेस येतात त्यांस येथे येऊन स्नान व श्राद्ध करावे लागते. येथे एक त्रिपिंडी श्राद्ध आणि दुसरे विमल तीर्थप्रयुक्त श्राद्ध ही करावी लागतात. ज्याच्या घरांत कांहीं पिशाचाचा उपद्रव असेल त्यास पहिले श्राद्ध करणें अवश्य आहे, नाहींपेक्षां फक्त दुसरेच केले म्हणजे बस होतें. पहिल्या श्राद्धाच्या संकल्पांत भूम्यांतरिक्षादिविस्थानां आज्ञातनाम गोत्राणां प्रेतानां उत्तम लोक प्रात्यर्थं असे म्हणावे लागतें. क्षेत्रस्थ जे लोक आहेत ते वर्षांतून एकवार तरी ह्या विमलतीर्थी स्नान करितात. ह्या तीर्थाच्या स्नाने करून ब्रम्हराक्षासादि पिशाचांच्या पीडा परिहार होतात. ह्या क्षेत्राची कोतवाली कालभैरवाकडे श्री विश्वेश्वरानीं दिलेली आहे ह्याकरितां त्यांचे दूत ह्या क्षेत्राच्या संरक्षणार्थ चोहीकडे पहारा करीत असतात. एके दिवशी असा चमत्कार झाला की, कोणी एक महद्भूत जिवाचा धडा करून वाराणसीस येऊं लागला. तेव्हां तो ह्या नगराची पंचक्रोशीची जी प्रदक्षणा आहे त्या मार्गावर आला. तेव्हां त्यास भैरवनाथाच्या दूतांनी अडविलें आणि नगरीत जाण्यास प्रतिबंध केला. तेव्हां त्या ब्रम्हराक्षसाने त्या भैरव दूतांशी युद्ध केले आणि त्यांचा पराभव करून आपण पुढे चालता झाला. मार्गाने येतां येतां तो विमल तीर्थ कुंडापाशी आला. तेव्हां खुद्द भैरवेश्वराची आणि त्याची गांठ पडली. आणि उभयतांचें युद्ध जुंपलें. युद्धांत भैरवांनी आपल्या खड्गाने त्याचा शिरच्छेद केला आणि तें शीर घेऊन श्री विश्वेश्वराकडे वर्दीस गेले. वर्दी देताहेत तोच त्या महद्भुताच्या शिरानें श्री विश्वेश्वराच्या स्तवास आरंभ केला. हे पाहून उभयतांस परमाश्चर्य वाटले. त्या स्तवें करून श्री विश्वनाथ भोळेच ते संतुष्ट झाले आणि त्या महद्भुतास वर माग म्हणून म्हणाले. तेव्हां त्याने मला श्री वाराणशी क्षेत्री विमल तीर्थी निरंतर राहण्याची परवानगी मिळावी म्हणून वर मागितला. त्याप्रमाणें श्री विश्वेश्वरांनी त्यास वर देऊन सांगितले की, इत उत्तर कोणीही दुष्ट पिशाचाचा प्रवेश ह्या नगरांत न होई असा बंदोबस्त तूं ठेव. ह्याप्रमाणे येथील पिशाच मोचनाची कथा आहे महाराज.

 तिरस्थळी (त्रिस्थळी) ची यात्रा करणाऱ्याने श्री वाराणशीस आल्यावर पिशाच मोचनाची यात्रा केली नसली तर त्यास गयेची यात्रा करण्याचा अधिकार येत नाहीं, परंतु कोणी यात्रेकरू अज्ञानाने काशी प्रयागची यात्रा करून काशींतील पिशाच मोचनाची यात्रा न करितां गयेस गेला तर गयावळ त्यास लागली पिशाच मोचनाची यात्रा केली किंवा नाही ह्याबद्दल प्रश्न करितात. केली नसल्यास गयेस पिशाच मोचनाचे स्थान अक्षयवटाकडे आहे तेथे प्रथमतः विधियुक्त पिशाच मोचनाची यात्रा करवून नंतर गयावर्जनास आरंभ करवितात.
 परंतु एडिटर महाराज, हा जो यात्रेचा क्रम म्यां लिहिला तो प्राचीन काळचा बरें. हल्ली जर विचाराल तर ह्या आगगाडीने आणि तारायंत्रानें जो विलक्षण वेग यात्रेस आला आहे तो फारच आश्चर्यकारक आहे. ज्या गयेच्या यात्रेस पुरे ६० दिवस अवश्य आहेत ती यात्रा दोन दिवसांत संपून पार! आगगाडीने जितका काळ मार्ग क्रमणाचा कमी केला आहे, त्याचप्रमाणे गयावर्जनाचा काळही कमी झाला आहे. श्राधाची जी फजिती उडाली आहे ती तर लिहिण्याची सोयच नाहीं. अग्नौकरण, ब्राम्हण भोजन आणि पिंडदान हीं श्राद्धाची मुख्य तीन अंगे असतां आम्हास ते यथासांग करण्यास अवधि आणि सामर्थ्य असतां आम्ही ते सर्व पिंडदानावर आणि एक पैसा दक्षिणेवर भागवितों, तेव्हां शाबास आमची किंवा नाहीं एडिटरराव?
 येथे म्हणजे पिशाचमोचनीं वर्षांतून बरेच मेळे भरतात. त्यांत मुख्य म्हटला म्हणजे काय तो पौषवद्य १४ म्हणजे आपल्या तिकडील मार्गशीर्षवद्य १४ चा. ह्या मेळ्यास रोट्या भट्याचा मेळा असे म्हणतात म्हणजे साधारणतः मुळ्याच्या थालीपिठाचा मेळा असे म्हटले तरी चालेल. ह्याचे कारण असे कीं, रांगडे लोक त्या दिवशी मुळ्यांनी मिश्रित केलेले कणकीचे रोट त्या यात्रेत आणितात आणि खातात. हा मेळा फारच मोठा भरतो. सर्व अलम दुनिया तेथे जमते. एडिटरराव ह्या मेळ्यांत जे मुळे विकावयास येतात तेवढे मोठे मुळे म्यां कधीं व कोठेंच पाहिले नाहीत. एकेक मुळा १४ तसूंच्या हाताने १। हात लांब आणि ६-७ इंच घेराचा. एकेक मुळ्याचें वजन सुमारें ६–७ पक्के शेर असून किंमत २-३ पैसे.
 विमल तीर्थ म्हणून जो तलाव आहे त्याच्या पूर्वेकडील घाटाचा कांहीं भाग सुमारे ८० वर्षांपूर्वी कोणी गोपाळदास साहू ह्या नांवाच्या सावकाराने बांधविला आणि बाकीचा भाग आणि त्यावरील देवालय ही मृगाबाई ह्मणून कोणी सावकाराची स्त्री होती तिनें बांधविला असे कळते. पश्चिमेच्या आंगचा घाट आणि त्यावरील बुरूज हेही तितकेच जुने आहेत. घाट कोणीं बळवंतराव बाकिरा ह्यानें आणि बुरूज मिरजा खुरमशा ह्याने बांबविले. उत्तरेच्या आंगचा घाट १०० वर्षांपूर्वी राजा मुरलीधर ह्याने बांधविला, परंतु दक्षिणेकडील घाटाचें काम फारच जुने आहे. तो सुमारे ३०० वर्षांपूर्वी राजा शिवशंबर ह्याने बांधविला. त्याच्या कांही भागाचा जीर्णोद्धार थोड्या वर्षांपूर्वी विनायकराव साहेब ह्यानी करविला.
 पूर्वेकडील घाटी दोन देवालये एक नक्कुमिश्र ह्याने आणि दुसरे मृगाबाईने अशी बांधविली.
 मृगाबाईने जे महादेवाचे देवालय पिशाचमोचनीं बांधविलें आहे त्यांत मुख्य दैवत शिव असून त्याचे जवळच ज्या पिशाचाचें शिर कालभैरवानें छेदिले त्याचें द्योतक दगडी शीर भयंकर आकाराचें करून बसविले आहे. ह्याच्या पलीकडे श्री लक्ष्मी नारायणाच्या मूर्ति आहेत. ह्या सर्व मूर्तिजवळच एक ऋषीची मूर्ति आहे. ह्याच देवळाच्या पूर्वेस कोपऱ्यास पांच सोंडेच्या गणपतीची मूर्ति आहे.
 नगरीच्या ह्याच आंगास दुसरें एक कुंड आहे त्याला सूर्यकुंड ह्मणतात. ह्या कुंडांत पूर्वी १२ कूप होते त्यांपैकी २ कूप हल्ली उपलब्ध आहेत. ह्या कुंडांत एका आंगास घाट आहे त्यावर सूर्यनारायणाचे देऊळ आहे. हे देऊळ बुंदीकोट्याच्य राजाने बांधविले आहे. ह्या देवळांत मध्यभागी सूर्ययंत्र भले मोठे पाषाणाचे आहे. त्याची पूजा परमादराने लोक रविवार करितात. ह्या देवळांतच एक कोठडी आहे तेथें होम कराव लागतो. होम होते वेळी यजमानास सूर्यपुराण श्रवण करावे लागतें. ह्या देवाचें नांव सांबादित्य आहे. ह्याची कथा अशी आहे कीं, श्रीकृष्णाचा मुलगा जांबवतीच्या पोटी झालेला जो सांबादित्याला कांहीं पातकामुळे कुष्ट भरले. तेव्हां जांबवतीने श्री कृष्णास त्याची कुष्टरोगापासून मुक्ती व्हावी ह्मणून कांहीं तरी व्रत सांगावे ह्मणून विनंती केली, तेव्हां कृष्णानी तिला सांगितले की मुलानें श्री वाराणशी क्षेत्री जावे आणि तेथे एक तलाव बांधून त्यावर श्री सूर्यनारायणाचे देऊळ बांधावें आणि नित्य त्या तळ्यांत स्नान करून देवळांतील सूर्ययंत्रावर अर्घ्यप्रदान करावे म्हणजे कुष्टरोग दूर होईल. ह्याप्रमाणे सांबाने आचरण केले तेव्हां त्याचें कुष्ट गेले. ह्या सूर्यकुंडासमीप अष्टांगभैरवाची मोर्ति आहे ती औरंगजेब पादशहाने छिन विछिन्न केली आहे.
 इकडेच ध्रुवेश्वराचे देवालय आहे. ह्यांत ध्रुवऋषीनी स्थापित महादेवाची शाळुंका आहे. आतां पुरे करितो हे विनंती

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.



काळभैरव काशीचे कोतवाल.
मुक्काम श्री वाराणशी.
ता० जा० १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांस:-
 वि० वि०. अहो एडिटर बाबा आलीकडे आम्हास विस्मरणाची बाधा फारच झाली. ती कोठवर म्हणाल तर तारीख देखील ध्यानांत राहिनाशी झाली. नुकतें आज सकाळी पंचांग पाहिले आणि ता० कितवी ती घोकली. असे असतां दोन पंचांगाचे बेरजे बरोबर एक दशांगाची गोळी होऊन आमच्या स्मरणाग्नीत धूप बनून गेली. वाः धन्य तुमची आणि आमची. अस्तु.
 आजच्या पत्री काशी क्षेत्राचे कोतवाल जे काळभैरव ह्यांच्या मंदिराचें आणि त्या मोहोल्याचे थोडेंसें वर्णन तुमच्याकडे पाठवितो. त्याला आपण कृपा करून जागा द्या.
 भैरवनाथाचें मंदीर श्री काशी विश्वेश्वराच्या मंदिरापासून सुमारे एक मैलभर लांब आहे. काळभैरवाचा अंमल सगळ्या पंचक्रोशीत आहे. ह्यांचा सोटा मोठा कठीण आहे. ह्या सोट्याचे नांव दंडपाणी. आतां दंडपाणी ह्या शब्दाचा अर्थ पाहूं गेले तर ज्याच्या हातांत दंड तो. व अशा नांवाचा एक शंकराचा दूत होता. असे असतां येथे दंडपाणी याचा अर्थ काळभैरवाचा सोटा असा सर्व लोक समजतात. ह्या दंडपाणीचे देवालय काळभैरवाच्या देवालयाजवळच आहे. काळभैरवाच्या देवळांत एक चौघडा आहे. ब्रम्हराक्षसादि पिशाच योनीतले जिवास व पातकी प्राण्यास काळभैरव शिक्षा करितात. दंडपाणीच्या देवळांत गेले म्हणजे तेथे एक चार उंचीचा भला मोठा पाषाण आहे. इतकेच काय ते दृष्टीस पडतें. ह्यांच्या दर्शनास लोक प्रत्येक रविवारी आणि प्रत्येक मंगळवारी फार जातात. त्या दिवशी ह्या देवास एक रुप्याचा मुखवटा घालितात. आतां खुद्द काळभैरवाच्या देवळांत दर्शनास जे लोक जातात त्यांच्या पाठीवर काळभैरवाचा सोटा बसल्यावांचून राहतच नाहीं. आतां हे समजण्याकरितां मला येथे थोडेसे काळभैरवाच्या आंतील देवळाचे वर्णन केले पाहिजे. ज्या ठिकाणी देवाचा देव्हारा आहे तें स्थल अथवा ती खोली तीन खण + दोन खण अशा लांबी रुंदीची आहे. व त्या पुढे तीन खण लांबीचे बाहेरील खुले दालन आहे. ह्या दालनांत मधल्या खणांत दरवाजा देवघरांत जाण्याचा आहे. ह्या दरवाजाने यात्रेकरू देवदर्शन घेऊन परत जाऊं लागला म्हणजे त्यास बाहेर दोन्ही आंगास काळभैरवाचे दोन निशीम भक्त चौरंगावर बसलेले असतात. त्यांपैकी एकजण गांठितो आणि त्यांच्या हातांत रेशिमाचा काळा गंडा बांधून त्याच्या पाठीवर मोराच्या पिसांचा कारल्याच्या आकृतीसारखा केलेला एक सोटा लगावतो आणि एक पैसा घेऊन सोडून देतो. भैरवनाथाची मूर्ति चतुर्भूज आहे. येथें व येथील दुसऱ्या देवळांतून देवदर्शनास गेले म्हणजे कपाळास पुजारी लोक चिमटीने एक तांबडी भरड पूड लावितात. तिला कुंदी असे नांव आहे. ह्या देवास मादक द्रव्याची फार आवड आहे. कुत्रे हें त्या देवाचें प्रिय श्वापद आहे. एक भला मोठा दगडी कुत्रा दरवाजाच्या आंत गेले म्हणजे दृष्टीस पडतो.
 सुमारे ४०, ४२ वर्षांपूर्वी कैलासवाशी बाजीराव रघुनाथ पेशवे ह्यानी भैरवनाथाचे देवालय बांधविले अशी माहिती लागते. ह्या देवळाच्या बाहेरच्या आंगास ३।४ हलवायाची दुकाने आहेत. तेथे साखरेचा वडा आणि घोडा हीं विकत मिळतात. तें घेऊन देवास अर्पण करण्याचा संप्रदाय आहे. मला कोणी सांगितले कीं, तो घोडा नव्हे तर कुत्रा असतो. आणि ह्या गोष्टीचा संभवही आहे. कारण कुत्रा हें भैरवनाथाचें वहान आहे.
 भैरवाच्या देवळापासून जवळच रवि, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु आणि केतु ह्या नवग्रहांचे आलय आहे. हे नवग्रह तीन ओळींत दर ओळीत तीन प्रमाणे स्थापिले आहेत.
 येथून थोडेसे पुढे गेलें म्हणजे पूर्वी सांगितलेले दंडपाणीचे देऊळ लागते. त्यांत काळकूप म्हणून जो प्रख्यात कुवा तो आहे. ह्या कूपांत मध्यान्हीं सूर्य आला म्हणजे लोक स्नानास जातात. त्या स्नानाने आपल्या भविष्य स्थितीचे ज्ञान होते असे सांगतात. येथेंच महा काळाची मूर्ति आहे. ह्या महा काळाच्या आराधनेने प्राणी जन्ममरणापासून मुक्त होतो. येथे पांच पांडवांचे पुतळे आहेत.
 मणिकर्णिका कुंडाची कथा येथे लिहितो. ह्या कुंडांतील तीर्थात स्नान केल्याने मुक्ति प्राप्त होते. ह्या कुंडाबद्दल कथा अशी आहे की, कोणे एके समयीं श्री विष्णूनी काशी क्षेत्रीं येऊन आपल्या चक्राने एक कूप खणिला आणि त्याला चक्रपुष्करणी हे नांव दिले. त्या कूपाचें सौंदर्य पाहून विष्णूस फार संतोष झाला. आणि ते त्या कूपाच्या उत्तर भागी तपश्चर्येस बसले, इतक्यांत श्री शंकराची स्वारी तेथे आली. आणि तो कूप पाहून आनंदानें नृत्य करूं लागली. हें नृत्य करितां करितां शंकराच्या कानांतील कुंडल त्या तीर्थांत पडले तेव्हांपासून पुढे त्या कूपाला मणिकर्णिका हे नांव प्राप्त झाले. आतां मागाहून लिहूं. हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.



मणिकर्णिका, चक्रपुष्करणि आणि वृद्धकाळेश्वर.

मुक्काम श्री वाराणशी ता०
जानेवारी सन १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांस-

 वि० वि०. गेल्या पत्री आपणाकडे मणिकर्णिका तीर्याची कथा लिहून पाठविली. आजही आणखी थोडीशी लिहून नंतर दुसऱ्या ठिकाणची माहिती लिहितों. तिला आपल्या सुंदर पत्री कृपा करून जागा द्यावी.
 मणिकर्णिका कुंडास मुक्तिक्षेत्र आणि पूर्ण शुभकरण ही नांवें आहेत. लोकांत ह्या कुंडास माणिकर्णिका हें नांव कां पडले त्याबद्दल आणखी अशी कथा प्रसिद्ध आहे कीं, कोणे एके समयीं ह्या कुंडावर शंकर आणि पार्वती क्रीडा करीत होती तेव्हां पार्वतीच्या कानांतील एक तानवड त्यांत पडले ह्यामुळे त्यास मणिकर्णिका हें नामाभिधान त्यास प्राप्त झाले. सारांश काय तर कानांतला मणी त्यांत पडला. तो शंकराच्या कानांतील पडलेला असो किंवा पार्वतीच्या कानांतील असो म्हणून त्या कुंडास मणिकर्णिका हें नांव मिळाले. नाहीं तर त्याचे पहिले नांव मागल्या पत्री लिहिल्याप्रमाणे चऋपुष्करणी हें होतें व तें हल्लींही प्रसिद्ध आहे.

 ह्या कुंडास चोहीकडून पायऱ्या बांधलेल्या आहेत त्यांपैकीं अगदी तळच्या ज्या पायऱ्या आहेत त्या एक संधी आहेत असे. गंगापुत्र सांगतात. परंतु त्याला सांधे दिसतात ते कां म्हणून विचारिलें तर ते म्हणतात की, जरी ते सांधे वर दिसतात तरी ते आंत पावेतो नाहीत. ह्या पायऱ्या श्री विष्णूनीं जे वेळी आपल्या चक्रानें चक्रपुष्करणी निर्माण केली त्या वेळींच त्यांनी बांधल्या. ह्या पायऱ्याच्या एका पटांगणावर उत्तरेच्या आंगास एक कोनाडा आहे. त्यांत श्री विष्णूची मूर्त आहे. तिचें पूजन पुष्करणीचे स्नान झाले ह्मणजे करावे लागते. ह्या कुंडांत हल्ली पाणी भरावे लागते ह्मणून ते कोंडलेले पाणी होऊन लोकांच्या स्नानाने त्यास गंधी येतो.
 चक्रपुष्करणी कुंड आणि भागीरथी ह्यांच्या मध्यें जो घाट आहे त्याला माणिकर्णिका घाट असे नांव आहे. ह्या घाटावर तारकेश्वराचे आलय आहे. वाराणशी क्षेत्री प्राण्याच्या प्राणोत्कमणाच्या वेळी हे तारकेश्वर त्याच्या कानांत तारक मंत्राचा उपदेश करतात आणि त्याची जन्म मरणापासून मुक्ती होते. येथे असे सांगतात की, जो कोणी येथें म्हणजे वाराणशी क्षेत्री मरण पावतो त्यास तारकोपदेश होतो आणि तो झाला म्हणजे त्याचा उजवा कान त्या वेळी वर असतो. तारकेश्वराचें मंदीर अगदी भागीरथीच्या काठी असल्यामुळे व वर्षांतून सुमारे चार महिने ते सगळे पाण्यात बुडत असल्यामुळे त्याचे खालचे सर्व चिरे उखळले आहेत. तारकेश्वराचे लिंग कुंडांतील देवळांत आहे आणि तें कुंड हमेश भाभीरथीच्या उदकाने भरलेले असते म्हणून त्याचें स्पष्ट दर्शन बहुषा होत नाहीं.
 मणिकर्णिका घाटाच्या वरच्या आंगी चरण पादुका आहेत. त्या विष्णूची दोन पावले संगमरवरी दगडावर कोरून कुरूंदाच्या दगडांत बसविलेली आहेत. ह्या विष्णूच्या चरण पादुका येथे स्थापन करण्याचे कारण असे सांगतात की, पूर्वी जेव्हां श्री वि णूनी शंकराचे आराधन केलें तेव्हां ते ह्या ठिकाणी तपश्चर्येस बसले होते. कार्तिक महिन्यांत येथे मोठा मेळा जमतो.
 मणिकर्णिका घाट ही सर्व काशी क्षेत्रांत अत्यंत पवित्र जागा असून ती ह्या क्षेत्राचा मध्य बिंदु आहे असे मानल्यास चालेल. कारण ह्या ठिकाणापासून जर रेषा काढून काशी क्षेत्राचे दोन भाग केले तर ते परस्पराशी अगदी जवळ जवळ सारखे होतील. ह्या घाटाच्या दुसऱ्या तबकडीच्या पायऱ्या चढून वर गेले म्हणजे सिद्ध विनायकाचें देऊळ लागते. ह्या देवळांत सिद्ध विनायकाची मूर्त असून दोन्ही अंगास सिद्धीबुद्धीच्या मूर्ति उभ्या आहेत. विनायक राजाच्या चरणापाशी एक लहानसा मूषक आहे.
 मणिकर्णिका घाटाच्या जवळ शिंदे आणि भोसले ह्यांचे घाट आहेत. शिंद्याचा घाट बायजाबाई शिंदे ह्यांनी बांधविला आहे. ह्याच बायजा बाईंनी ज्ञानवापीचा मंडप बांधविला. शिंद्याचा घाट अगदी ओहोरून गेला आहे. त्याचे बुरूज कोसळून पडले आहेत. जशी धरणीकंपाने जमीन फाटते आणि वरील इमारत आंत खचते त्याप्रमाणे ह्या घाटाची स्थिति दिसते.
 वृद्ध काळेश्वराचे देऊळ वाराणसी क्षेत्राच्या उत्तर भागांत आहे. हे देऊळ फार प्राचीन आहे. प्रथमतः ह्यास १२ चौक होते असे सांगतात. परंतु हल्लीं सात उभे आहेत. पैकी कित्येक अगदी मोडकळीस आलेले आहेत. ह्या देवळाच्या आवारांत एक बगीच्या होतासा वाटतो. ती जागा आणि पडलेल्या पांच चौकांची जागा ह्यांत लोक घरे बांधून राहिले आहेत. प्रथमतः हें देवालय बांधून तयार झाले असेल तेव्हां खरोखरीच फार शोभायमान दिसत असेल. ह्या देवाची कथा अशी आहे कीं, सत्ययुगी कोणी एक राजा वृद्धापकाळी अत्यंत रोगग्रस्त झाला तेव्हां तो काशीस आला. आणि ईश्वराचे आराधन करूं लागला. ह्या त्याच्या आराधनाने महादेव फार संतुष्ट झाले, आणि राजास रोगमुक्त केला एवढेच नाहीं तर त्यास यौवन दिले. नंतर त्या राजानें हे वृद्ध काळेश्वराचे मंदिर बांधले. आणि तेथें महादेवाची स्थापना केली. नंतर शंकरानी प्रसन्न होऊन असा वर दिला कीं, जो कोणी वृद्धकाळेश्वराची आराधना करील व्यास कोणत्याही रोगाची बाधा होणार नाही. व तो दीर्घायु होईल. ह्या देवळांत शिरतांना पहिल्याने महा वीराचें दर्शन होतें. पुढे काली देवीचे दर्शन होते. तिच्या पुढेंच महादेवाचे दुसरे एक लिंग त्या राजानें स्थापिलेले आहे त्याचे दर्शन होतें. काळीच्या उजव्या आंगास पार्वती आणि गणपतीच्या मूर्ति आहेत. आणि पार्वतीच्या डाव्या आंगास भैरवनाथ, सूर्यनारायण, हनुमान, आणि लक्ष्मी नारायणाच्या मूर्ति आहेत. येथे दोन कूप आहेत त्यांपैकी एका कुपांतील पाण्यास मनस्वी घाण येते आणि तिनें तो सगळा चौक भरलेला असतो. कूपाच्या पाण्यांत व्याधिस्त लोक स्नाने करितात. बारा वर्षे सारखे ह्या कूपोदकाने स्नान केले तर कुष्टादि महान रोग दूर होतात असे सांगतात. ह्या कूपोदकास विशेषेकरून गंधकाची फारच घाण येते. ह्या कूपाच्या शेजारी दुसरा एक कूप आहे. ह्यांतील पाणी गोड असून चांगले पाचक आहे ह्या चौकांतून दुसऱ्या चौकांत गेलें ह्मणजे तेथे भले मोठे अश्वथ आणि निंबाचे दोन वृक्ष दृष्टीस पडतात. तिसऱ्या चौकांत दोन भाग आहेत. पैकी एका भागांत वृद्ध काळेश्वराचें लिंग आहे.
 ज्या चोकांत कूप आहेत त्याच्या उत्तरेस एक लहानसे आवार आहे. त्यांत मार्कंडेश्वर आणि दक्षेश्वर हे दोन देव आहेत. वृद्ध काळेश्वराच्या देवळा बाहेर पडून त्या देवळाच्या दक्षिणेकडील भिंतीच्या बाजूने रस्यांतून चालले ह्मणजे त्यां भिंतीच्या कोपऱ्यास अल्पमृतेश्वराचे देऊळ लागतें. ह्या देवाची आराधना दीर्घायुत्व देते. वृद्ध काळेश्वराच्या देवळांत दर रविवारी मोठा मेळा जमतो आणि श्रावणा आदितवारी मोठीच यात्रा जमते.
वृद्धकाळेश्वरार्पणमस्तु.

एडिटराचा मित्र फिरस्ता.

दिवोदास हा बौद्ध धर्मी होता वगैरे.
मु० श्री वाराणशी ता०
जानेवारी १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांस-
 वि०वि०. काल रोजी आह्मी ह्या क्षेत्री फिरत असतां एका मिशनरी साहेबांची व आमची गांठ पडली. तेव्हां त्यांनी चालीप्रमाणे आम्हावर झडप घातलीच आणि बराच वेळ त्यांचे व आमचें संभाषण झाले. त्यापैकी येथे थोडेसे लिहितो. नंतर आमचा जो क्रम आहे त्याप्रमाणे ज्या ज्या देवालयांत आह्मी दर्शनास गेलों तेथील हकीकत लिहितो. तिला कृपा करून आपण आपल्या सुंदर पत्री जागा द्या. नाही ह्मणूं नका हो बाबा.
 मिशनरी बाबांनी काशी क्षेत्री श्री विश्वेश्वराचें आधिपत्य प्राचीन काळापासून आहे ह्याबद्दल बरेच वेळ संभाषण केले. नंतर त्यांस व त्या सहित इतर सर्व देवांस वाराणशी क्षेत्रांतून दिवोदास राजाने हाकून दिलें, ह्याबदलही संभाषण केले. दिवोदास राजाची कथा अशी आहे कीं, कोणे एका समयी वाराणशी क्षेत्रीं दिवोदास नामें राजा राज्य करीत होता. तो परम धार्मिक, पुग्यशील, नीतिमान इत्यादि सर्व गुणांनी संपन्न होता. असें असतां देवांचें आणि त्याचे वाकडे आले आणि त्यानें श्री विश्वेश्वर प्रभृति सर्व देवतांस वाराणशीतून हाकून लाविले. श्री शंकरास वाराणशीवांचून इतर ठिकाणी तर चैन पडेना आणि दिवोदास राजा तर त्यांचा त्या नगरीत प्रवेश होऊं देईना. तेव्हां युद्ध प्रसंगाने दिवोदासास जिंकावे असा बेत सर्व देवांनी केला. परंतु त्यांतही ते फसले. पुढे दिवोदासाच्या हातून कांहीं तरी पातक घडवावे आणि त्याच्या पुण्याईंत कांहीं कमतरता आणून त्यास राज्यभ्रष्ट करावें असा बेत त्यांनी केला. परंतु तोही निष्फल झाला. मग सर्व देव उगीच बसले. त्यांस काय करावे हे सुचेना. शेवटी श्री गजानन महाराजांनी देव सभेत पुढे येऊन विडा उचलला की, मजकडे जर हे काम सोपविले तर मी दिवोदासास वाराणशींतून बाहेर काढितो. अशा प्रकारचे वचन लंबोदर महाराजांचे ऐकतांच सर्व देवांस परम संतोष झाला आणि भोळ्या शंकरांनी त्यास तसे करण्यास आज्ञा दिली. नंतर गणपतीनी वृद्ध ब्राम्हणाचे रूप धारण केले आणि दिवोदास कचेरीत प्रवेश केला. दिवोदासानें गणेश भटजीस अत्यादरें आसन वगैरे देऊन आपल्याजवळ बसवून घेतले आणि प्रत्यक्ष गणपतीनी भाषणास आरंभ केला. ते भाषण ऐकून सर्व कचेरीतील लोकांची अंतःकरणें वेधली गेली. राजाची भक्ति तर गणेश भटजींच्या भाषणावर इतकी बसली की, "गणेशभटजी वाक्यं प्रमाणं" असे होऊन गेले. पुढे कांही दिवस लोटल्यावर एके दिवशी राजाने गणेश भटजीस गुरू करून उपदेश घेतला. तेव्हां आतां गुरुदक्षिणा द्यावयाची ती काय द्यावी म्हणून गुरू महाराजांस प्रश्न केला असतां त्यांनी आज रात्रौ स्वप्नांत जो दृष्टांत तुम्हास होईल ती गुरुदक्षिणा मला द्या म्हणून सांगतांच राजाने ती गोष्ट स्वीकारली. नंतर त्या दिवशी रात्रौ राजा निजला असतां त्यास स्वप्न पडले की, "तुम्हीं वाराणशीतून बाहेर जावें". नंतर राजा जागा झाला आणि विचार करूं लागला तो त्यास हे सर्व देवांचें कपट आहे असे कळले. परंतु एडिटर दादा गुरुभक्तीविषयीं सत्ययुगीचे लोक परम दृढतर ह्यामुळे त्याने स्वप्नांत झालेल्या आज्ञेप्रमाणे वाराणशीचा त्याग केला आणि सर्व देवांस आंत येण्यास मोकळीक दिली अशी कथा आहे. ह्या कथेवर मिशनरी साहेबांनी थोडेसे व्याख्यान दिलें तें येथे लिहितों. सदर साहेबांचा अभिप्राय असा कीं, दिवोदास राजा हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता ह्मणून त्यास हिंदूंच्या देवांची मानखंडणा करणे अवश्य वाटे व जेव्हां त्यांचे वर्चस्व काशी क्षेत्री झाले तेव्हां त्यानें सर्व देव तेथून हाकून दिले. त्याचा अर्थ काय म्हणाल तर त्या देवतांची पूजा अर्चा आपल्या राज्यांत त्याने बंद केली. अशा प्रकारें व्यवस्था झाल्यावर देवांनी त्याचा पराभव करून तर नाहींच, परंतु कपटाने काशी हस्तगत करून घेतली. साहेब म्हणाले कीं, आम्हास असे वाटतें कीं, ज्या काळी बौद्ध धर्माचा ऱ्हास काळ आला, त्याच वेळी काशी देवांच्या हस्तगत झाली, असे आमचे अनुमान आहे. असो, कांहीं कां असेना. आमच्या कथेंत दिवोदास राजास कैलासास पुढे शंकरांनी नेले असे सांगितले आहे.
 काय हो एडिटर बाबा, विश्वेश्वराच्या नगरीच्या मागे लचांडे तरी! दिवोदास राजाने तिला हिरावून घेतलीच होती. अहो आलीकडे सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी औरंगजेच पादशहाने ती घेतली तेव्हां श्री विश्वेश्वरादि सर्व देवांची स्थाने समूळ भ्रष्ट केली. सारांश काय? चांगले ह्मणजे कोणाला नको असे नाही.
 दिवोदासेश्वराचे देऊळ मीरघाटी आहे. येथे एक "वीस बाहुक" ह्मणून वीस भुजांचा देव आहे. येथे एक कूप आहे. त्याचे नांव धर्मकूप आहे. मुख्य देवळांत जाण्याच्या वाटेवर धर्मेश्वराचे देवालय आहे. येथून थोड्याच अंतरावर विशालाक्षी देवीचें आलय आहे. मीर घाटाच्या पायऱ्या फार सोप्या आहेत.
 येथून जवळच औसानगंजा शेजारी नागकुवा महला आहे. त्यांत नागकुवा मोठा प्रसिद्ध कुवा आहे. ह्या नाग कुव्यांत पहिल्या १२ पायऱ्या उतरून गेले ह्मणजे जे पाणी लागते ते अगदी गढूळ आणि घाणेरे आहे. त्या पाण्याखाली एक लोखंडी पत्रा आहे. तो पत्रा काय तो खालच्या खऱ्या विहिरीचे द्वार. येथे पूर्वेच्या आंगच्या भिंतीवर एक लेख आहे. त्यांत संवत १८२५ सांत एका राजाने ह्या विहिरीचा जीर्णोद्वार केला असे लिहिले आहे. येथे ईश्वराच्या लिंगावर नागाची फडी आहे. त्याला नागेश्वर म्हणतात. श्रावण वद्य ९-१० च्या दिवशी दरसाल येथे मोठा मेळा जमतो. पहिल्या दिवशी बायकांची यात्रा आणि दुसऱ्या दिवशीं फक्त पुरुष. लोभ करावा हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.



विश्वेश्वर मोहोला.

मु० श्री वाराणशी ता०
जानेवारी सन १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांस:-
 वि० वि०. म्यां एका पूर्वीच्या पत्री आपणाकडे काशीविश्वेश्वराच्या देवळाची थोडीशी माहिती लिहून पाठविली होती ती आपण कृपा करून छापली. आज तेथील विशेष हकीकत लिहितों.
 विश्वेश्वराच्या देवालयाच्या घुमटास आणि वरील शिखरास दगडी इमारतीवरून तांब्याचे पत्रे मारून वर सोन्याच्या वरखाचा मुलामा केला आहे. ह्याचा सर्व खर्च राजा रणजितसिंह जो लाहोरचा राजा होऊन गेला त्याने केला आहे. विश्वेश्वरापुढे सुमारे नऊ घांटा टांगलेल्या आहेत. त्यांपैकी एक आहे तिचे काम पाहण्यासारखे आहे. ही घांट नेपाळच्या राजाने टांगली आहे. ह्या देवळांत उत्तरेच्या अंगास जोतें देऊन एक सोपा बांधलेला आहे. त्यांत पुष्कळ देवता स्थापिल्या आहेत. ह्या सर्व देवता पहिले जे विश्वश्वराचें देऊळ होते आणि जे १७ व्या शतकांत औरंगजेब पादशहानें मोडिले आणि त्यावर एक मोठी महजीद बांधली त्यांतील मूर्ति आहेत असे सांगतात.
 पहिले विश्वेश्वराचे देऊळ हल्लींच्या देवळाच्या ईशान्येस होतें आणि ते हल्लींच्या देवळाच्या इमारतीपेक्षां सुमारें पांचपट मोठें असावे असे अनुमान होतें. हल्लींचे देवळाच्या शिखराची उंची सुमारे ५० फूट येईलसे वाटते. पहिल्या देवळावर औरंगजेबाने एक मोठी महजीद बांधली आहे. तिचें काम आबडधोबड आहे. ह्या महजिदीत गेलें तर तेथे पहिल्या हिंदूच्या देवळाचे खांब पुष्कळ नजरेस पडतात. ह्या महजिदीस जी सफेती लावलेली आहे ती तर अगदीच घाणेरडी आहे. त्या सफेतीच्या योगानें ती खुलावी ते एकीकडे राहून उलटी ज्यास्त मळकट आणि कंटाळवाणी दिसते. ह्या महजिदीस एक मोठा दरवाजा बांधलेला आहे, परंतु तो वागता दरवाजा नाहीं. तो हिंदु आणि मुसलमान ह्यांच्या तंट्यामुळे सरकार हुकुमानें बुजवून टाकिला आहे आणि दुसरी एक लहानशी वाट दुसऱ्या बाजूस कोपऱ्यास पाडलेली आहे. ह्या महाजिदीच्या थोरल्या दरवाज्याजवळ एक मोठा अश्वत्थ वृक्ष आहे. त्याचें दर्शन अंतर्गृहीच्या यात्रेच्या वेळी अवश्य आहे. ह्या महजिदीच्या खर्चास सरकारी तिजोरीतून भरलेल्या पैशाचें व्याज बरेंच येतें असे कळते. ह्या महजिदीच्या आणि हल्लीच्या विश्वेश्वराच्या देवळाच्या मध्ये ज्ञानवापीचा मंडप आहे. ह्या ज्ञानवापीत विश्वेश्वराची नित्य वस्ती आहे असे सांगतात. ह्याची कथा अशी आहे कीं, कोणे एका समयी वाराणशी क्षेत्री १२ वर्षे पर्यंत पाऊस पडला नाही आणि पाण्याचें अवर्षण पडले. तेव्हां एका ऋषीने शिवाच्या त्रिशुळाने ही विहीर खाणली आणि पाहतो तो तिला पाणी विपूल लागले. ही गोष्ट शंकरास कळतांच शंकर तेथे आले आणि त्यानी ऋषीस सांगितले की, आम्ही येथे निरंतर वास करूं. दुसरे असे सांगतात की, औरंगजेबानें जेव्हां विश्वेश्वराचे पहिले देऊळ मोडलें तेव्हां पुजाऱ्याने विश्वेश्वराचे लिंग उचलून ज्ञानवापीत टाकिले. ह्या ज्ञानवापीस जो मंडप बांधिला आहे त्याचे काम चांगले केले आहे. छताचें काम कळसपाकी आहे. तीन दालनी मंडप आहे. ह्यास खांबांच्या चार ओळी आहेत. त्या सर्व मिळून खांब सुमारे ४० आहेत. हा मंडप बायजाबाई शिंदे ह्यानी सन १८१८ इसवीत बांधविला.
 ह्या मंडपासमीपच एक भला मोठा पाषाणाचा नंदी आहे. तो सुमारे सात फूट उंच आहे. त्या नदीपासून थोड्याच अंतरावर नेपाळच्या राजाने एक नंदिकेश्वराचे देऊळ बांधिले आहे. ह्या मंडपाच्या ईशान्येस महजिदीपासून सुमारे १५० यार्डांवर आदि विश्वेश्वराचे मंदीर आहे. हे देऊळ फार जुनाट आहे. त्याचा घुमट अगदी मोडकळीस आलेला आहे. ह्या देवळाच्या खालच्या भागाचा जीर्णोद्धार एक गणेशदास तंबाकूवाला यानें केला आहे. आदि विश्वेश्वराच्या देवळाच्या पूर्वेस थोड्याच अंतरावर काशी कर्वत नामें कूप आहे. ह्या कूपास वरून चालीप्रमाणे तोंड असून एक आंत उतरण्यास वाट आहे, परंतु ती आतां दर सोमवारी मात्र काही वेळ खुली असते. ह्याचे कारण असे सांगतात की, कांही वर्षांपूर्वी एका बैराग्याने येथे शिवार्चन करून प्रसिद्धपणे जळसमाधि घेतली. तेव्हां पासून सरकारने ती वाट अगदी बुजवून टाकिली होती. पुढे तेथील पुजाऱ्याने अर्ज करून पुनः तशी गोष्ट न होऊं देण्याबद्दल मुचलका देऊन दर सोमवारी अमुक वेळ तो रस्ता यात्रेकऱ्याकरितां खुला ठेवावा असा हुकूम आणिला. ह्या भागांत पुष्कळ देवळे ज्यांची कारागिरी उत्कृष्ट अशी आहेत.
 विश्वेश्वराच्या देवळापासून थोडेसे पुढे गेले म्हणजे शनीचे देऊळ लागते. तेथून पन्नास पाऊणशे कदम पुढे गेले म्हणजे अन्नपूर्णेचें मंदीर लागते. ह्या देवीचे काम सर्वांस भोजन घालण्याचे आहे. येथे असा चमत्कार सांगतात की, कोणत्याही प्रकारचा तडीतापडी अतिथी उपोषित राहात नाहीं. सर्वांस ह्या अन्नपूर्णेच्या कृपेने भोजन मिळते. येथे भिजवून मूठ मूठ दाळ वाटण्याची चाल फार आहे. ह्याबद्दल कथा अशी सांगतात की, जेव्हां प्रथमतः श्री अन्नपूर्णा काशीवासास आली तेव्हां श्री० विश्वेश्वरानी तिला माझ्या नगरीत कोणी उपोषित राहू नये अशी तजवीज तू ठेव म्हणून सांगितले. तेव्हां इतक्या लोकांस अन्न पाणी माझ्या एकटीच्याने कसे पुरवेल अशी काळजी ती करीत बसली. तेव्हां गंगेनें येऊन तिला सांगितले कीं, तूं सर्वांस मूठ मूठ दाळ दे म्हणजे मी त्यांस लोटा लोटा पाणी देईन. अशा प्रकारें दोघीनी ही दोन कामे वाटून घेतली. ह्यामुळे येथे पुष्कळ श्रीमंताच्या बायका भिजलेली डाळ मूठ मूठ वाटितात. व ह्याच कारणास्तव एडिटरराव मला वाटते कीं, चैत्रांत हळदी कुंकाच्या समारंभास भिजविलेल्या डाळीने आपल्या तिकडे सुवासिनींच्या ओट्या भरतात. येथे एकएकास इतकी डाळ मिळते की, दररोज ती वाळवून त्याने विकली म्हणजे त्याची आठ बारा आण्याची रोजी होते. असो, अन्नपूर्णेच्या कृपेचें फळ अन्नपूर्णेचें मंदीर सुमारे १५० वर्षांपूर्वी पुण्यांतील पेशव्यांपैकी एकानें बांधिले अशी खबर मिळते. ह्या देवीस जडितांचे अलंकार वगैरे पुष्कळ आहेत.
 ह्या देवळांत एका कोपऱ्यास सूर्यनारायणाची मूर्त स्थापिली आहे व दुसऱ्या कोपऱ्यास गौरी शंकराची मूर्त आहे. तिसऱ्या कोपऱ्यास हनुमान आणि चवथ्या कोपऱ्यास गणपती असे आहेत. अन्नपूर्णेच्या देवळावरून साक्षी विनायकास जाऊं लागले ह्मणजे धुंडिराज विनायक एके कोनाड्यांत बसविलेले आहेत त्यांचे दर्शन होते. साक्षी विनायकाचे देऊळ कोणी दक्षिणेकडील मराठ्यानें बांधले आहे असे समजतें.
 शनीच्या देवळाच्या दक्षिणेस शुक्रेश्वराचें देवालय आहे. सर्व यात्रा झाली म्हणजे साक्षी विनायकाचे दर्शन घेऊन त्यास साक्षी ठेवून नंतर काशींतून यात्रेकरू लोक जातात. लोभ असावा हे विनंती.

एडिटराचा मित्र एक
फिरस्ता.



बंगाली टोला.

मुक्काम श्री वाराणसी
ता० जानेवारी १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांस: -
 वि० वि०. गेल्या पत्री साक्षी विनायकापर्यंत आम्ही पल्ला पोंचविला. व आतां यात्रा समाप्त झाली. परंतु एडिटरराव आम्ही मध्येच खंड केला होता. आणि बंगाली टोला वगैरे प्रदेशाची माहिती लिहिण्याचे काम तसेच सोडून दिले होतें तें आतां लिहितों. त्याला कृपा करून आपल्या सुंदर पत्री जागा द्या.
 विश्वेश्वराच्या देवालयावरून साक्षीविनायकाच्या रस्त्याने दक्षिणेस पुढे गेलें म्हणजे दशाश्वमेध महल्ला लागतो. आणि त्याच्या दक्षिणेस बंगाली टोला आहे. ह्या भागास बंगाली टोला म्हणण्याचे कारण असे आहे की, येथे बंगाली लोकांचीच वस्ती विशेष आहे. बंगाल्यांतून जे शेट सावकार लोक वार्धक्य दशेत काशीवासास येत गेले ते बहुषा येथेच राहिले. त्यांच्या नंतर सरकारी कामाच्या संबंधाने अगर दुसऱ्या काही निमित्ताने जे दुसरे बंगाली लोक आले ते तेथेच राहूं लागले. आतां ह्या महल्यांत दुसरे कोणी लोक राहात नाहीत अगर काशीच्या दुसऱ्या महल्यांतून बंगाली लोक राहात नाहीत असे जरी सर्वांशी वाचकानी समजूं नये तरी ह्याच प्रदेशांत बंगाली श्रीमान लोकांचा मुख्य भरणा आहे असे समजण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं. ह्या लोकांमध्ये इंग्रजी भाषेत प्रवीण पुष्कळ लोक आहेत. व ह्या क्षेत्री सुधारणुकेच्या ज्या गोष्टींचे विचार होतात त्यांच्यामध्ये हे लोक पुढारी असतात. ह्या बंगाली लोकांच्या बायकांस व मुलीस लिहितां वाचतां बरेंच येत असते. असे येथील सब् अ० सर्जन हे बंगाली आहेत ह्यांच्या भाषणावरून कळले. गरीब जे बंगाली लोक काशीवासास आले आहेत, ते सर्व काहींना कांहीं तरी व्यापार करितात. इतर हिंदूंप्रमाणे भिक्षा मागणारे लोक ह्यांच्यामध्ये आढळत नाहीत. ह्यांच्यामध्ये जे ब्राम्हण आहेत ते सर्व शास्त्राध्ययन करणारे आहेत. वेदाचें अध्ययन करणारे लोक अगदीच नाहीत म्हटले तरी चालेल. आपल्या तिकडे जसे पारशी लोक तसे इकडे हे बंगाली लोक आहेत.
 ह्या महल्यांतही देवालयांची गर्दी जशी विश्वेश्वरगंज महल्यांत आहे तशीच आहे. परंतु येथें मुख्य देव म्हटला म्हणजे केदारेश्वर अथवा केदारनाथ हा आहे. हे स्थान फार जुनाट आहे असे सांगतात. केदारनाथाचे मंदीर गंगेच्या तटाकी आहे. त्याच्या पूर्वेस गंगाप्रवाहापर्यंत एक पसंत घाट बांधिला आहे. त्याला केदारघाट अशी संज्ञा आहे. हें केदारेश्वराचे मुख्य देवालय असून शिवाय चार कोपऱ्यांस चार देवालये आहेत. ह्या देवालयाचा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. ह्या दरवाजाबाहेर दोन पाषाणाचे द्वारपाळ उभे आहेत. त्या प्रत्येकास चार चार हात आहेत. ह्या मूर्ति सुबक आहेत. ह्यांच्या चार हातांपैकी एकांत त्रिशूळ, दुसऱ्यांत दंड आणि तिसऱ्यांत कमल पुष्प अशी आयुधें आहेत. चवथा हात अभयसूचक मुद्रेप्रमाणे रिकामा आहे. केदारनाथाचे दर्शन नेमलेल्या वेळी होतें. मध्यंतरी मंदीर लावलेले असते. मध्ये चौकांत वर सांगितलेली पांच देवालये असून चारी बाजूनी चार सोपे आहेत. त्यांत पुष्कळ देव आहेत.
 केदारेश्वराच्या मुख्य देवालयांत दररोज संध्याकाळी टांगलेले पितळेचे ६७ कंदील लावितात. केदार ही जागा हिमालयांत आहे, आणि तेथील जो स्वामी तो केदारेश्वर. हिमालयांत बद्रिनारायणाचे आलीकडे बद्रिकेदाराचें स्थान आहे. कोणी ब्राम्हण केदार नांवाचा वसिष्ट ऋषीबरोबर हिमालयांत बद्रिकेदारास गेला. आणि तेथे त्याने मोठें तप केले. पुढे तो मरण पावला. तेव्हां शंकरानी आपल्या ज्योतीत मिळवून घेतला. पुढे तो ब्राम्हण वसिष्ट ऋषीच्या स्वप्नांत गेला आणि म्हणाला की, आपण जे सांगाल तें मी करीन. तेव्हां वसिष्टानी त्यास निरंतर काशीस असावे म्हणून सांगितल्यावरून तो साक्षात शिवच येथे येऊन राहिला. अशी त्या केदारेश्वराची कथा आहे.
 येथे लक्ष्मीनारायण, भैरवनाथ, गणपति आणि अन्नपूर्णा ह्यांचीही देवळे आहेत. गंगेवर जाण्याच्या घाटाच्या अंगास जी केदारेश्वराच्या देवळाची भिंत आहे तिच्या बाहेरच्या अंगास हिंदी आणि बंगाली लीपीत केदारचरित्र कोरलेल्या अक्षरांनी लिहिले आहे. त्या देवळाच्या बाहेरील अवारांत भिकाऱ्यांची मनस्वी गर्दी असते. घाटावरून खालीं आलें म्हणजे तळाशी एक चौकोनी विहीर आहे, तिला गोरीकुंड असे नांव आहे. ह्या कुंडाच्या उदकाच्या सेवनाने ज्वराचा परिहार होतो असे सांगितले आहे.
 केदारेश्वराच्या देवळाच्या पश्चमेस सुमारे पाव मैलावर मानसरोवर नामें कुंड आहे. या सभोवती सुमारे ५० लहान मोठी देवालये आहेत. येथे एक रामचंद्राचे देवालय मोठे आहे. हे मानसरोवराचे कुंड राजा मानसिंगानें बांधिलें. येथे एकंदर मूर्तीचा मोजून अंदाज केला तर हजारांपेक्षां कमी भरणार नाहीं. मानसरोवराच्या पूर्वद्वारी बाळकृष्णाचें मंदीर आहे. मूर्त रागांत असून हातांत लोण्याचा गोळा वगैरे आहे. जशी बायका आपल्या तिकडे पितळेच्या बाळकृष्णाची पूजा करतात त्याप्रमाणे येथील बाळकृष्णाची मूर्त आहे.
 येथेंच नैऋत्येस तिळभांडेश्वराचे देऊळ आहे. हे स्थान स्वयंभू आहे असे म्हणतात. तरी पिंडीचा घेर सुमारे १५ फूट असून उंची ४॥ फूट आहे. हा देव रोज एकेक तिळ वाढतो. तिळभांडेश्वराच्या देवळाचा चौत्रा मनस्वी उंच केला आहे. येथें कार्तिक स्वामीचें देऊळ आहे. येथे एक शिवाची पाषाणाची मूर्ति फारच सुरेख केलेली आहे. तिचें ध्यान मोठ्या विचारांत निमग्न असावें अशा प्रकारचें आहे, आणि जवळ कार्तिकस्वामी पुस्तक वाचीत आहेत.
 तिळभांडेश्वराच्या खालच्या अंगास एक मोठा अश्वत्याचा वृक्ष आहे. तेथे एक वीरभद्राची छिन्न भिन्न झालेली मूर्त आहे. ही मूर्त औरंगजेब पादशहानें फोडिली म्हणून सांगतात. येथून थोड्याच अंतरावर एक लिंबाचे झाड आहे, त्याच्या खाली अष्टभुजा देवीची मूर्त असून शिवाय नव दुर्गाच्या नऊ मूर्तेि आहेत.
 केदारनाथाच्या देवळाकडून दशाश्वमेधाकडे येऊं लागले तर वाटेत दुलरेश्वराचे देऊळ आहे. हे देऊळ सातु बाबू या बंगाल्याने सुमारे पन्नास वर्षांपूर्वी बांधिलें.
ह्या मोहोल्यांत पुष्कळ ठिकाणी ज्या मूर्ति आहेत त्या पुष्कळ जुन्या काळच्या आहेत खऱ्या, परंतु तेणेंकरून ह्या मोहोल्यांत जुन्या काळी हल्लींप्रमाणे दाट वस्ती नव्हती म्हणून ह्या सर्व मूर्ति दुसऱ्या ठिकाणाहून आणिल्या आणि स्थापिल्या असे अनुमान करण्यास कांहीं बाध येतो असें नाहीं. लोभ असावा ही विनंती.

एडिटराचा मित्र एक
फिरस्ता.



दुर्गा देवी.
मु० श्री वाराणशी
ता० जानेवारी १८७२

ज्ञानप्रकाशकर्ते यांस:-
 वि० वि०. वाराणशीच्या दक्षिणेस दुर्गा देवीचे मोठे देवालय आहे. हे कोणी सातारच्या राजाची राणी भवानीबाई साहेब ह्यानी बांधिविले असे समजतें. ह्या देवीच्या जवळ एक दुर्गाकुंड अथवा दुर्गातीर्थ नामें सरोवर आहे. या तळ्याला चारी अंगानी घाट आहेत, आणि ह्यांत पाणी विपूळ आहे. ह्या दुर्गेस नित्य मांसाचा नैवेद्य आहे. असमंतात ५।५० कोशांतील लोक येथे हमेषा येत असतात. यात्रेकरी तर दुर्गादेवीच्या दर्शनास गौबाईच्या दर्शनास जातात तेव्हां जातात. ह्या देवीच्या देवळांत दर मंगळवारी बरीच गर्दी होते, आणि श्रावण्या मंगळवारी तर फारच मोठे मेळे जमतात.
 ह्या दुर्गेच्या देवळाच्या जवळच्या मोहोल्यांत हजारों माकडे आहेत. ह्यांस यात्रेकरी लोक फुटाणे घालितात. ही माकडे त्या मोहोल्यांतील घरांच्या कवलारास मनस्वी उपद्रव करितात तरी त्यांस कोणी हात लावीत नाहीं. त्या माकडांत कांही मोठी माकडे आहेत ती फार भयंकर आहेत. डोक्यावरील पागोटें अगर टोपी वरच्यावर उचलून नेतात आणि पांतस्थास वेड्यासारखे करितात.
 ह्या दुर्गादेवीची कथा अशी आहे कीं, कोणे एका समयी रुरुचा पुत्र दुर्ग हा तपास बसला. ह्यानें तप इतके मोठे केले की, त्याला त्यापासून इंद्रपद प्राप्त झाले. नंतर तो देव ब्राम्हण गाई वगैरेंचा फार छळ करूं लागला. त्याने चोहीकडे अन्याय व जुलूम चालावेला. ह्या योगे सर्व देव त्रासून गेले आणि इंद्र, वरुण, वायु प्रभृति सर्व महादेवास शरण गेले आणि दुर्गाच्या त्रासापासून मुक्त करण्याबद्दल त्याची प्रार्थना केली. नंतर शंकर प्रसन्न झाले आणि गौरी जी त्यांची पत्नी तिला दुर्गाचा वध करून यावे ह्मणून आज्ञा केली. तेव्हां गौरीने आपली जी तमोगुण प्रकृति महाकाली तिला दुर्ग वधार्थ पाठविलें. ती दुर्गाच्या नगरावर गेली. तेव्हां दुर्गानें आपले कांहीं आप्त सैन्य बरोबर देऊन महाकालीशी युद्धास पाठविलें, आणि त्यांस अशी ताकीद केली की, महाकालीस पकडून आणावे. नंतर त्या दुर्ग सेनेने महाकालीस वेढा घालून पकडले आणि तिला दुर्गाकडे चालविलें. तेव्हां महाकालीस महाक्रोध आला आणि तिच्या मुखावाटे प्रचंड अग्नी उद्भवला. त्या अग्नीनें ती सर्व राक्षस सेना दग्ध झाली. ही गोष्ट दुर्गास समजली तेव्हां त्यानें नवी फौज पाठावली, परंतु याचीही दशा पहिल्या सेनेच्या दशेप्रमाणे झाली. ही बातमी दुर्गास कळली तेव्हां त्यास अत्यंत क्रोध आला आणि त्याने लाखो फौज महाकालीवर पाठविली. तेव्हां महाकाली आकाश मार्गे पळून गौरीकडे गेली. इकडे दुर्ग सेनाही तिच्या मागे तिचा पाठलाग करीत गेली. नंतर ते सर्व परत विंध्याचल पर्वतावर येऊन राहिले. झालेले सर्व वृत्त महाकालीच्या मुखे गौरीने श्रवण केल्यावर तिनें स्वतः विलक्षण रूप धारण केले. ते असे की, स्वरूप अत्यंत लावण्य, परंतु अत्यंत, विशाल. हात सहस्र पृथ्वीपासून आकाशा पावेतों पोहोचणारे. अशा प्रकारें गौरी युद्धास गेली. गौरीचे स्वरूप अत्यंत लावण्य पाहून दुर्गाने आपल्या सर्व सेनेस असा हुकूम केला की, गौरीस पाहिजे त्यांनी वरावी आणि आपली बायको करावी. असा हुकूम झाल्यावर मग काय विचारतां एडिटर बाबा, ज्याने त्याने आपला जीव अर्पण करण्याचा निश्चय केला. नंतर ते सर्वजण अत्यंत आवेशाने गौरीवर चालून गेले. त्या वेळी सर्व अवनी थरथर कांपली. गौरीने इकडे आपल्या संरक्षणार्य लाखो देवसेना उत्पन्न केली. आणि मग देव आणि दैत्य ह्यांचे तुंबळ युद्ध झाले. युद्ध संग्रामांत कोट्यावधि राक्षस मारले गेले. असा विलक्षण कहरी प्रसंग गुदरला तेव्हां दुर्ग फारच तळमळला आणि मोठ्या क्रोधाने जातीने युद्धास आला. त्याने हातांत त्रिशूळ, खड्ग, ही आयुधे धारण केली होती. पाठीशी भाता बाणांनी भरलेला आणि धनुष्येही होती. इतक्यासहीत दुर्गाने संग्राम भूमीवर येऊन गौरीस एक जबरदस्त प्रहार केला. तेव्हां तिला मूर्च्छना आली आणि ती बेशुद्ध पडली. कांही काळाने सावध झाल्यावर तिनें सर्व देवांस पुनः युद्ध संग्राम माजविण्यास आज्ञा केली. असा हा युद्ध प्रसंग चालला असतां दुर्गानें गौरीस गांठले आणि मग उभयतांच्या मध्ये अंतरिक्षी आणि पृथ्वीवर फारच तुंबळ युद्ध झाले. जेव्हां उभयतां पृथ्वीवर येऊन युद्ध करूं लागली तेव्हां दुर्गाने एक पर्वत गौरीचे आंगावर टाकिला. तो गौरीनें आपल्या शापरूप शब्द वज्राने चूर केला. नंतर दुसरा पहिल्यापेक्षा मोठा पर्वत टाकिला. त्यालाही गौरीने आपल्या वज्रानें चुरून टाकिलें, आणि आपल्या हातांतील शस्त्राचा प्रहार राक्षसावर करून त्याला धरणीवर असुरहित करून पाडिला. ह्याप्रमाणे दुर्गाचा वध झाल्यानंतर गौरीने त्याचे शीर छेदून घेतले आणि सर्व शत्रूचे निर्दळण केलें. अशा प्रकारे गौरीने विजय संपादिल्यावर सर्व देवांत अत्यानंद झाला. आणि ते सर्वजण तिचा स्तव करूं लागले. गंधर्व, अप्सरादि नृत्य गायन करूं लागली. आणि तिन्ही लोकांत एकच आनंद झाला. ही कथा जो कोणी श्रवण करील अथवा पठण करील त्यास कोणतेंही संकट प्राप्त होणार नाही, असा या कथेस गौरीने वर दिला, आणि त्या दिवसापासून दुर्गा हें नांव आपण धारण केले. ह्याप्रमाणे कृत्य करून दुर्गा कैलासास अंतर्धान पावली.
 ह्या दुर्गेच्या देवालयाचा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे. त्याच अंगानें थोरली सडक आशी वर गेली आहे. देवालयासमोर सडकेच्या आलीकडे एक नौबतखाना आहे. तेथे दररोज वेळच्या वेळीं चौघडा झडत असतो. देवीच्या देवळापुढे नौबतखान्यासमोर दोन लहान लहान देवळें असून त्यांच्यामध्ये दोन दगडी खांब आहेत. त्यापैकी दहा फुटी उंचीच्या खांबाची खुर्ची एक फूट तळाशी असून माथ्यावर एक दगडी सिंह आहे. दुसरा जो आहे तो २ फूट उंच आहे आणि ह्यावर देवीस जो बळी द्यावयास आणिलेला पशुभाग असतो तो मांडितात. ह्या खांबाजवळ एक लांकडी खांब आहे, त्याला जो पशू अर्पण करावयाचा असतो तो बांधितात.
 देवद्वारांतून आंत गेल्यावर मंडपांत प्रथमतः दोन सिंह दगडाचे दृष्टीस पडतात. त्यांची तोंडें देवीच्या देवळाच्या आंतील द्वाराकडे परस्परांशी समोर आहेत. ह्या दोन्ही सिंहाच्या पलीकडे एक गणपतीचे आणि दुसरे महादेवाचे अशी दोन देवळे आहेत. महादेवाची शाळुंका संगमरवरी दगडाची असून पुढे नंदीही त्याच पाषाणाचा आहे. देवीचे देवळांत चोहों बाजूनीं मोठाले सोपे आहेत, त्यांतून बैरागी वगैरे लोक राहतात. ह्यापैकी मागल्या सोप्यावर बागेश्वरीचे स्थान आहे. ह्या देवीचा मुखवटा सोन्याचा आहे. ह्या बागेश्वरीपासून थोड्याच अंतरावर एक बिभित्स पुतळी आहे. ह्या देवळाचा सभामंडप एके पलटणीतील सुभेदाराने थोड्या वर्षांपूर्वी बांधिला आहे. ह्या देवळांत एक मोठी घांट आहे. ती मिरजापुरास सुमारें ४० वर्षांपूर्वी एक गोरा माजिस्त्रेट होता त्याने दिली असे सांगतात.
 ह्या देवालयाचे काम फारच नक्षीदार आहे. कमानी आंतील आणि बाहेरील अशा दुहेरी आहेत. बाहेरील कमानीवरून पक्षावर बसलेले आणि हातांत विणा घेतलेले असे दगडी पुतळे बसविलेले आहेत. आणि आंतील कमानीवरून दुर्गा देवीच्या मूर्ति बसविल्या आहेत. देवळाच्या पुढील अंगास बाहेरील कमानीवर जे पुतळे आहेत त्यांची वाहने सिंह आहेत.
 ह्या देवळाच्या बाहेरच्या अंगास एक मोठा तलाव आहे. हा तलाव फारच मोठा आहे. परंतु ह्याचे विशेष महात्म्य नाहीं. तत्रापि त्या महल्यांतील लोकांस त्यांतील पाण्याचा पुष्कळ उपयोग पडतो.
 ह्या दुर्गाकुंडापासून गंगेच्या वाटेवर थोड्याच अंतरावर पूर्वेस कुरुक्षेत्र तलाव आहे. हा तलाव चोंही आंगांनी बांधून काढिला आहे. हा ज्या राणीने दुर्गेचें देवालय बांधिले त्याच भवानी बाईनें बांधिला असे सांगतात. सूर्यग्रहण पर्वणींत ह्या तलावांतील स्नानाचे मोठे फल आहे.
 कुरुक्षेत्र तलावाच्या वायव्येस थोड्या अंतरावर लोलारिक कुवा आहे. हा कुवा जोडकुवा आहे. ह्मणजे खालीं पाण्याचा तळ एक असून वर दोन तोंडे दोन विहिरीसारखी आहेत. ह्या दोन्ही तोंडांपैकी पूर्वेकडील तोंड वाटोळे आहे. आणि पश्चिमेकडील तोंड समान्तरभुज चौकोनाकार आहे. ह्या चौकोनी तोंडास तीन बाजूंनी पायऱ्या आहेत. त्या उतरून खालीं गेलें म्हणजे तळचे पाणी मधील मोठ्या भव्य कमानीतून इकडून तिकडे जाते ते मोठ्या मौजेचें दिसतें. हा कुवा अहिल्याबाई राणी, बहारचा राजा आणि अमृतराव साहेब पेशवे या त्रिवर्गांनी वेगवेगळ्या काळी बांधिला. येथे एक सूर्यनारायणाचे दगडी यंत्र आहे. त्याची पूजा करण्यास दर रविवारी गर्दी जमते. आतां येथून पुढे दुसरा मोहोल्ला लागला त्याचें वर्णन पुढील पत्रीं करूं. लोभ असावा हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.



व्यासकाशी व रामनगर.

मुक्काम श्री वाराणशी
ता० जानेवारी १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांस :-
 वि० वि०. आज रोजी रामनगराकडील हकीकत थोडीशी लिहितो. रामनगर हे गंगापार आहे. येथील राजाचे संस्थान मोठें टुमदार आहे. रामनगरास यात्रेकरू लोक काशींतून व्यासाच्या दर्शनास जातात. ह्या व्यासकाशीचे वर्णन मागाहून करूं. हल्ली रामनगरच्या राजाने जे मंदीर बांधिले आहे त्याचे येथे थोडेसे वर्णन करितों. रामनगरच्या किल्ल्यापासून सुमारे एक मैलावर रामनगरच्या राजानें बांधिलेले श्री रामचंद्राचें मंदीर आहे. ह्याच्या पश्चिमेस एक मोठा तलाव आहे. हे राममंदीर हल्लींचे जे राजे साहेब आहेत त्यांचे वडील राजे चेतसिंग होते त्यानी आरंभिले. व त्यांच्या मागे त्यांच्या चिरंजिवानी संपविले. हे देवालय खालच्या जोत्याच्या बेद्रीपासून शिखरापर्यंत १०० फूट उंच आहे. ह्याच्या चारी बाजू तळापासून सुमारे ३५-४० फूट उंच पावेतों कोरीव चित्रांनी आणि वेलानीं भरलेल्या आहेत. कित्येक पुतळे भंगलेले आहेत. परंतु बाकीचे सर्व दुरस्त आहेत. प्रत्येक बाजूस पांच पांच ओळी असून दर दर ओळीत सहा सहा चित्रे ह्याप्रमाणे चारी बाजूंत मिळून एकंदर १२० चित्रे आहेत. येथे पैसा मुबलग खर्च करून जितके कुशळ कारागीर हल्लींच्या दिवसांत हिंदुस्थानांत मिळाले तितके येथे कामास लावले असावे असे अनुमान होते. काशीस आल्यावर हे राममंदीर यात्रेकऱ्यानें पाहिल्या खेरीज राहूं नये. सगळ्याच्या खालच्या ओळींत हत्तीची चित्रें आहेत. हत्तीवर सिंह आणि सिंहावर देवाचे दुसरे अवतार ह्याप्रमाणे चित्रे कोरलेली आहेत.
 येथें गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या तीन नद्यांच्या वेग वेगळ्या कोनाड्यांतून मूर्ति बसविलेल्या आहेत. त्याप्रमाणेच दोन गोपींसह श्री कृष्णाची मूर्त आहे, इंद्र, ब्रम्हदेव, विष्णु आणि शंकर ह्यांच्या मूर्तिही येथे कोनाड्यांतून स्थापिल्या आहेत. त्याप्रमाणेच कुबेर, भैरवनाथ, रामचंद्र, सीता, गणपती, बलीराम, ह्यांच्या मूर्ति आहेत. याप्रमाणेच वायू, सूर्य, अग्नेि, आाणि चंद्रमा ह्यांच्याही मूर्ति आहेत. शिवाय नारद, तुंबर, गजेंद्रमोक्ष, आणि सहस्रार्जून ह्यांच्या मूर्ति आहेत. दक्षिणेकडील वरल्या ओळींत मध्यभागी दुर्गादेवीची मूर्ति आहे. पूर्वेस वरल्या ओळीत मध्यभागी महाकाली आहे. उत्तरेच्या भिंतीस कोनाड्यांत श्री कृष्णानीं गोवर्धन पर्वत उचलून जी क्रीडा केली तो सर्व प्रकार आहे. ह्या देवालयाच्या चारी कोपऱ्यांस वरच्या आंगास एकावर एक अशी सूर्यांची दोन दोन तोंडे करून बसविलेली आहेत. त्यांस मुलामा केलेला आहे.
 घुमटाच्या चारी कोपऱ्यांस सूर्याची तोंडें एकावर एक अशी दर कोपऱ्यास दोन दोन प्रमाणे असून त्यांच्या सभोवती रश्मि प्रभा दाखविली आहे. ह्या तोंडांस सोन्याचा मुलामा केला आहे. घुमटाच्या शिखरावर एक सोनेरी मुलाम्याचें दुर्गेचे मुख करून बसविले आहे. खाली सभामंडपाच्या चौथऱ्यावर तिन्ही दरवाज्यांकडे तोंडे करून तीन मूर्ति संगमरवरी दगडाच्या करून बसविल्या आहेत. दक्षिणेकडील दरवाज्यासमोर नंदिकेश्वर, उत्तरेकडील दरवाज्यासमोर गरूड आणि मुख्य जो वागता दरवाजा त्या समोर सिंह असे आहेत. ह्या दरवाज्याच्या झडपा पितळी पत्र्याने मढविलेल्या आहेत. ह्या देवालयाच्या आंतील देवालयांत दरवाज्या समोर संगमरवरी दगडाची दुर्गेची मूर्त आहे. (ह्या देवालयाच्या आंतील देवालयांत दरवाज्या समोर संगमरवरी दगडाची दुर्गेची मूर्त आहे.)ह्या दुर्गेच्या शेजारच्या डाव्या कोनाड्यांत राधा कृष्णाची मूर्त आहे. आणि उजव्या कोनाड्यांत पंचमुखी शंकराची मूर्त आहे. ह्या देवालयानजीक एक बाग असून आंत तलाव आहे. तो राजा चेतसिंग याणीं बांधिला म्हणून सांगतात. ह्या तलावास चोहोंकडून घाट बांधिला आहे. जे यात्रेकरी व्यास काशीस येतात ते सर्व बहुत करून येथे स्नानें करितात.
 रामनगरास यात्रेस जाण्याबद्दल अशी कथा सांगतात की, एका समयीं वेदव्यास वाराणशीस येण्याकरितां निघाले. आणि येतां येतां रामनगरापाशी आले तेव्हां त्यांस ती जागा फारच आवडली आणि ते तेथेच राहिले. नंतर त्या जागी जो कोणी यात्रेस येईल त्यास मुक्ती प्राप्त होईल असा वर त्यांनी त्या क्षेत्रास दिला. तेव्हां शंकरास राग आला. आणि जो कोणी व्यासकाशीत मरण पावेल त्यास पुढल्या जन्मीं गर्धभयोनी प्राप्त होईल असा त्यानी शाप दिला. नंतर वेद व्यासानी रामनगरांत एक तीर्थ निर्माण केले. आणि माघ महिन्यांत व विशेष करून त्या महिन्याच्या शुक्रवारी आणि सोमवारी जो कोणी त्या तीर्थात स्नान करील त्यास तो व्यासकाशीत मरण्यापासून जी गर्धभयोनो प्राप्त होणार ती व्हावयाची नाही. असा उशाप त्यांनी दिला.
 रामनगरास जो राजाचा किल्ला आहे त्यांत कोटाच्या भिंतीवर वेदव्यासाचे देऊळ आहे. किल्ला गंगातटाकीच आहे. त्यामुळे गंगेच्या तटावरून चढून वेदव्यासाच्या देवळांत रस्ता जातो. हा घाट चढू लागले म्हणजे डाव्या हातास संगमरवरी दगडाची गंगेची मूर्त कोनाड्यांत बसविलेली आहे तिचें दर्शन होतें. ही मूर्ति चतुर्भुज आहे त्यापैकी दोन हस्त वरद आणि अभय आहेत. तिसऱ्या हातांत कमलपुष्प व चवथ्या हातांत पानपात्र अशी आहेत. हा घाट चढून गेलें म्हणजे वर किल्याच्या भिंतीसच वेदव्यासाच्या देवळाचा दरवाजा लागतो. त्यांतून आंत गेल्यावर एक महादेवाचे मंदीर दृष्टीस पडतें. हेच काय तें वेदव्यासाचें देऊळ.
 पंचक्रोशीची यात्रा अवश्य केली पाहिजे. अशी ह्मण आहे कीं, घडे काशी पण न घडे पंचक्रोशी. पंचक्रोशीची यात्रा म्हणजे प्रदक्षिणेची यात्रा आहे. ह्या पंचक्रोशीचा रस्ता राणी भवानी बाई साहेब यानीं सुमारे १०० वर्षांपूर्वी नीट बांधिला. व हल्लीही त्याची दुरुस्ती बरीच आहे. ही प्रदक्षिणा पांच पन्नास यात्रेकरी एकत्र मिळून करितात. वाटेनें रावापासून रंकापावेतो अनवाणी चालावें लागतें. पान सुपारी खातां कामानये. सोवळें असावें. आपल्या डाव्या अंगास थुंकी वगैरे टाकावी, असे अनेक नियम पाळावे लागतात. ही यात्रा क्षेत्रस्थाने संवत्सरांतून दोनदां करावी. व यात्रेकऱ्याने तर एकदां केलीच पाहिजे असे सांगितले आहे. जे कांहीं पातक काशी क्षेत्री घडते त्या सगळ्याचें मोचन पंचक्रोशीच्या यात्रेने होतें.
 मणिकर्णिका घाटापासून पंचक्रोशीच्या प्रदक्षिणेस आरंभ होतो. पाहिल्याने यात्रेकरी मणिकर्णिकेचे दर्शन घेऊन निघाला म्हणजे गंगेच्या कांठाकांठानें आशी संगमावर जातो. आणि जवळच्या जगन्नाथाचे दर्शन घेऊन पहिला मुक्काम बहुशा खांडव्यास करितो. हे गांव प्रदक्षिणेच्या वाटेवर मणिकर्णिकेपासून सुमारे सहा मैल आहे. दुसरा मुक्काम तेथून पुढे सहा मैलांवर धूपचंडीस करतो. तेथे श्राद्धादिक कृत्य करून तिसरे दिवशी प्रातःकाळी उठून तेथून पुढे सुमारें १४ मैलांवर रामेश्वर आहे तेथे मुक्कामास येतो. तेथील यात्रा संपल्यावर चवथे दिवशीं शिवापुरास आठ मैल चालून येतो. येथे पांच पांडव आणि द्रौपदी ह्यांच्या मूर्ति आहेत. त्यांचे दर्शन वगैरे घेतल्यावर व दुसरी यात्रा संपल्यावर पांचवे दिवशी सकाळी उठून सहा मैलांवर कपिलधारा म्हणून तीर्थ आहे तेथे येतो. आणि तेथे श्राद्धादि सर्व झाल्यावर सहावे दिवशीं वारणा संगमावरून पुनः मणिकर्णिकेपाशी येतो. कपिलधारेपासून मणिकर्णिका ही ६ मैलच आहे. ह्याप्रमाणे एडिटरराव, यात्रेकऱ्यांस ६ दिवसांत पन्नास मैलांची मजल करावी लागते. ह्या पन्नास मैलांपैकी वरुणेपासून आशीपावेतों ६ मेल गंगेच्या कांठाने चालावे लागते.
 कपिलधारेपासून मणिकर्णिका घाटापावेतो यात्रेकऱ्यास जव पेरावे लागतात. नंतर मणिकर्णिका घाटी स्नान वगैरे झाल्यावर तेथून साक्षीविनायकास जव टाकीत जातात. आणि तेथून पुनः मणिकर्णिका घाटाजवळ विनायक आहे तेथपर्यंत जव पेरीत पेरीत येतात. तेथून दर्शन घेऊन घरी जातात. पहिला जो खांडव्याचा मुक्काम करितात म्हणून लिहिले आहे तेथे कर्दमेश्वर देव आहे. हे देवालय फार जुनाट असून ह्यावर कारागिरीही चांगली केल्याचे आढळते.
 ह्या पंचक्रोशी रस्त्याच्या दोन्ही आंगास वृक्ष लाविले आहेत. त्यांची गर्द छाया रस्त्यावर पडते. बहुत करून हे वृक्ष आंब्याचेच आहेत. ह्या पैकी कित्येक वृक्ष फार मोठे आहेत. ते असे कीं, त्यांचीं खोडें १२ पासून १७ फूट घेरांची आहेत. आतां दुसरी यात्रा पढल्या खेपेस लिहूं. लोभ करावा हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.



पंचक्रोशी

मुक्काम श्री वाराणसी
ता० जानेवारी १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते महाराज: -

 वि० वि०. वारणासंगमाकडील प्रदेशाची माहिती लिहितो.
 गंगा आणि वरुणा ह्या दोन नद्यांचा संगम वाराणशीच्या ईशान्य सीमेवर झाला आहे. ह्या वरुणा संगमी एकवार स्नान ज्या प्राण्याला घडतें तो सकल पातकापासून मुक्त होतो असे सांगितले आहे. पंच तीर्थीच्या यात्रेत भागीरथीच्या तटाकी ज्या पांच ठिकाणीं श्राद्धे करावी लागतात त्यांपैकीं वारणासंगम हें एक ठिकाण आहे. म्हणून जेव्हां यात्रेचा मेळा जमतो तेव्हां येथे श्राद्ध व स्नान करणारांची मनस्वी भीड होते. पंचक्रोशीची यात्रा करते वेळीही वरुणासंगम हें स्थल मोठे महत्वाचें आहे.
 वाराणसीतून मणिकर्णिका घाटापासून यात्रेकरी प्रथमतः आशी संगमाकडे ह्मणजे काशीच्या दक्षिणेकडे जाऊन मग सगळी प्रदक्षिणा संपली म्हणजे ईशान्येकडून वारणासंगमावरून प्रदक्षिणा संपवितात. वरुणा संगमी गंगेच्या तटाकी चार देवालये आहेत. त्यांत देवदर्शनास जाण्याची सरकार हुकमाने बंदी आहे. सन १८५७ इसवीत ह्या देवळांचे अधिपत्य ज्याकडे होते तो फितुरी लोकांस सामील झाला आणि त्याने ह्या देवालयांतून बंडखोर लोकांच्या टोळ्या जमूं दिल्या. तेव्हांपासून सरकाराने ती सगळी देवालये आपल्या ताब्यांत घेऊन बंद करून ठेविलीं. पुढें कांही दिवसांनी ती खुली करण्यास परवानगी दिली असून पुनः काय कारणाने बंद केली हा पुरता शोध लागला नाहीं. ही सर्व देवालये शंभर वर्षांमागे शिंद्याच्या एका दिवाणाने बांधली असे म्हणतात. ह्या देवालयांत जे मोठें देवालय आहे तें आदिकेशवाचे आहे. येथे शंख, चक्र, गदा, पद्म किरिटादि धारण केलेली श्री विष्णूची मूर्ति स्थापिली आहे. श्री विष्णूच्या मूर्तिजवळ एक सूर्य नारायणाची मूर्ति आहे. ह्या देवालयाच्या पूर्वेकडील द्वारी एक मंडप आहे. त्यास दहा खांब आहेत. ह्या मंडपांतून खाली गंगेवर जाण्यास पायऱ्या आहेत. त्यावरून पुष्कळ मूर्ति स्थापिलेल्या आहेत, त्यांपैकी संगमेश्वर आणि ब्रम्हेश्वर ह्यांचे विशेष महात्म आहे. आतां ह्यावरून वाचकांच्या लक्षांत सहज येईल की, ह्या ठिकाणी ब्रम्हा, विष्णु आणि शिव ह्या तिन्ही देवतांचें पूजन घडतें.
 बाकीच्या देवालयांतून लोकांस जाण्याचा प्रतिबंध आहे म्हणून वरुणासंगमाजवळ एक दगडी चौत्रा बांधला आहे. आणि त्यावर विष्णुपदाची आणि संगमेश्वराची स्थापना केली आहे. येथे एक मारुतीचे देवालय आहे.
 वरुणासंगमाजवळ जो घाट आहे त्याच्या माथ्यावर पूर्वीच्या किल्ल्याचे अवशेष नजरेस पडतात. ह्यावरून असे अनुमान होते की, ह्या किल्ल्यालगतच शहर वसलेले असावे, परंतु हल्लीं जें शहर आहे ते ह्या जाग्यापासून पुष्कळ लांब आहे.
 वरुणा घाटाच्या पश्चमेस एक मैदान सुमारे एक मैल लांब आणि १/ ४ मैल रुंद असे आहे. ह्या मैदानाच्या पूर्वोत्तर भागी गंगा आणि वरुणा ह्या नद्या आहेत. शिवाय पश्चमेच्या आंगास वरुणेस मिळणारा एक भला मोठा पाण्याने भरलेला ओढा आहे. अशा प्रकारें हें लहानसे मैदान तिन्ही अंगांनी स्वभावतः पाण्याने भरलेल्या खंदकानें वेष्टिलेले आहे. ह्याच मैदानांत प्राचीन काळीं हिंदूनी एक किल्ला बांधिला होता. तो अगदी मोडून गेला आहे. ता० ४ जून सन १८५७ इसवीत येथे बंड उद्भवले. तेव्हां इंग्रज सरकारची छावणी गंगा किनाऱ्यापासून तीन मैलांवर लांब असून मध्ये वाराणशी क्षेत्र होते. ह्यामुळे तिकडून शहरचा बचाव करून बंडवाल्याशी सरकारास लढतां येईना. तेव्हां जुन्या किल्ल्याची जागा शोधून काढून तिच्या शेजारी मोर्चे बांधले आणि लहानशी गढी तयार केली. आणि वरुणेच्या कांठचीं चारी देवालये बंद केलीं. ह्या गढींत कांही इमारती आहेत व त्या पाहण्यासारख्या आहेत असे कळते, परंतु त्याला सरकारी हुकूम लागतो सबब त्या आमच्या दृष्टीस पडल्या नाहीत.
 वरुणासंगमापासून दक्षिणेकडे नावेत बसून आले म्हणजे राजघाट लागतो. येथे भागीरथी उतरून पैलपार जाण्यास नावांचा पूल आहे. राज घाटाच्या दक्षिणेस प्रल्हादघाट आहे.
 राजघाटावरून उत्तरेकडच्या रस्त्याने सुमारे पाऊण मैल लांब गेलें म्हणजे कपिलमोचन तलाव लागतो. ह्याला भैरव तलावही म्हणतात. हा तलाव चोहीकडून पक्या दगडांनी बांधिलेला आहे. ह्या तलावाच्या उत्तरेस थोड्या अंतरावर उंचट जमीन आहे. तेथे एक दगडी चउत्रा बांधिला आहे. ह्या चउत्र्यावर सुमारे आठ फूट उंच आणि तीन फूट घेराचा एक दगडी खांब उभा आहे. ह्या खांबास लाट ही संज्ञा आहे. ही लाट शिवाची आहे. हल्लीं जी लाट येथे उभी आहे ती मुळची लाट नाहीं. मुळची लाट सुमारे ६० वर्षांपूर्वी हिंदू आणि मुसलमान ह्यांच्यामध्ये तंटा झाला त्यांत फुटली गेली. तरी ती सगळी मोडली गेली नाहीं, कारण हल्लीं जितकी उभी आहे तितका भाग मुळच्या लाटेचा अवशेष आहे असेंही कांही लोक सांगतात. ह्या अवशेषास हल्ली तांब्याच्या पत्र्याने मढविले आहे.
 ही लाट पूर्वी देवळांत होती, परंतु औरंगजेब पादशहाने तें देऊळ मोडून त्या जागी एक महजीद बांधली आणि लाट उघडीच टाकिली. पुढे ती दुसऱ्या कज्यांत मुसलमानांनी फोडली. कोणी असे सांगतात की, हिंदु आणि मुसलमानांच्या तंट्याच्या वेळी ही लाट उपटून गंगेत नेऊन टाकिली होती.

 साठ वर्षांच्या पूर्वी दंगा झाला, त्याची हकीकत अशी सांगतात की, शिमग्याचा सण आणि मोहोरमचा सण असे दोन्ही सण एकदम आले. हिंदू आणि मुसलमान लोकांचे मेळे दिवसा व रात्री गांवांतून फिरूं लागले. असे एक दोन दिवस झाल्यावर रस्त्यांत एके ठिकाणी दोन्ही ज्ञातीच्या मेळ्यांची गांठ पडली. तेव्हां कोणी कोणास बाजू देईना. मग मोठी मारामारी झाली. तीत मुसलमान लोक हटले. हा आपला पराजय झाला ह्याबद्दल सूड उगवावा म्हणून मुसलमानांनी ह्या लाटेला उपटून टाकिले, मग हिंदु लोकांस मोठाच क्रोध आला आणि त्यांनी महाजेदी पाडण्यास आरंभ केला. एक तर पाडून जमीनदोस्त केली, आणि दुसरी पाडणार तो सरकारी लष्कर येऊन बंदोबस्त केला. पूर्वी येथें दरसाल मेळा भरत असे, परंतु हल्लीं ती चाल अगदी बंद झाली आहे. कपिलमोचन तलावावरून वरुणासंगमाकडे रस्ता जातो, परंतु एडिटर बाबा रस्ता असा खराब आहे की, तांग्यास लावलेला घोडा देखील खांद्यावर घेऊन जाण्याचा समय येतो. ही गोष्ट कपिलमोचनापासून वरुणासंगमाकडे जो रस्ता जातो त्या सगळ्याची नव्हे, परंतु वरुणा नदीस एक मातीचा बांध घालून त्यावर लाकडे टाकून एक पूल केला आहे त्याची सांगतो बरें. आतां ह्या पुलावरून जाण्याबद्दल टोल द्यावा लागतो, परंतु गौरकाय लोक त्या वाटेने बिलकूल येत नाहीत म्हटले तरी चालेल म्हणून पूल जात्याचा आणि टोल दडपायाचा. असो हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.



गयेची यात्रा आणि तेथून परत.

ज्ञानप्रकाशकर्ते यांस :-
 वि० वि०. आपणाकडे आज पावेतों श्री वाराणशी क्षेत्राची हकीकत थोडी थोडी लिहून पाठविली, तिला तुझी आपल्या सुंदर पत्र जागा देत गेलां हे उपकार आपले मजवर मोठे झाले. हल्ली आह्मी गयेकडील माहिती लिहितों, तिला आपल्या सुंदर पत्री जागा द्यावी इतकी आमची प्रार्थना आहे.
 वाराणशीहून निघालें म्हणजे सुमारें ७ मैलांवर मोगल सराईचें स्टेशन लागतें. ह्या स्टेशनाजवळ आले म्हणजे कलकत्याहून दिल्लीस जी आगगाडीची थोरली सडक गेली आहे ती लागते. तेथे गाड्या बदलतात. त्यांतून डाक गाडींत बसलें म्हणजे सुमारें ६ तासांत मनुष्य पाटणा शहरी पोंचतें, ह्मणजे काशीहून पाटणा शहर सरासरी ६० कोस लांब पडते. ह्याच्या जवळच कोसा दीड कोसावर वाकीपूरचे स्टेशन आहे तेथे उतारू लोक गयेस जाण्याकरितां उतरतात.
 पाटणास हिमालयाच्या पायथ्याशी जो तेराई प्रांत आहे तिकडील हत्ती पुष्कळ विकावयास येतात. तेराईच्या जंगलांत हत्ती फारच चमत्कारिक रीतीने धरतात. पानवथ्यावर हत्ती पाणी पिण्यास येतात आणि यथास्थित रीत्या तृषेची शांति झाली ह्मणजे मग बाळ यथाशक्ति क्रीडा करूं लागतें. जंगलांत लहान लहान झाडे असतील तीं उपटून टाकतें. हत्तीण असली तर तिला डोहांत घेऊन जाण्याचा यत्न करतें. असा त्या जनावराचा नित्य संप्रदाय असतो. ही गोष्ट तिकडील सर्व लोकांस जाहिर आहे. ह्या करितां हत्ती धरावयाचा झाला म्हणजे अशा पानवथ्याजवळ माहुद लोक सुमारे २५ पासून ४० फूट लांब आणि १५ फूट रुंद असा लकड कोट करतात. त्यास एक दरवाजा असून भोवताली सुमारे १० फूट खोलीचा खंदक खोदतात. दरवाजा मात्र एक आंत आणि दुसरा बाहेर असा बांधलेला असतो; म्हणजे खंदकाच्या आंतल्या अंगास एक दार आणि बाहेरल्या अंगास एक दार अशी दोन दोन भली मोठी बांधलेली असतात. हीं दारें परस्पराशी समोर नसतात, परंतु त्याच्या मधील रस्त्यास नागमोडी वळण असून आंतील दरवाज्यापासून बाहेरील दरवाज्यापर्यंत येण्यास कांहीं नाहीं तरी ३० फूट जमीन चालावी लागते.
 नंतर हत्ती पाण्यावर येण्याची वेळ झाली म्हणजे माहुद लोक ह्या लकड कोटाची दारें मोकळीं टाकतात आणि आंत चारा वगैरे पदार्थ ठेवून आपण आसपास टपून बसतात. नंतर गजराज उदकपानानंतर चोहोंकडे फिरूं लागले म्हणजे सहज लकड कोटाजवळ येतात आणि आंत चारा पाहून दार शोधूं लागतात. दार सांपडले म्हणजे मुकाट्यानें आंत शिरून भोजनास आरंभ करितात. इतके झाल्यावर माहुद लोक दोन भल्या मोठ्या हत्तिणीवर स्वार होऊन येतात. दरएक हत्तिणींवर दोन मनुष्ये व जाड्या सोलाचा एक तब्बल भारा असतो. त्या हत्तिणीसह ते खंदकाच्या आंतल्या दाराजवळ जाऊन उभे राहतात, हत्तिणी पाहिल्या म्हणजे गजराज लागलीच तिकडे जातात. दाराच्या बाहेर हत्ती आला नाही तोच माहुद लोक त्याच्या दोन बाजूस दोन्ही हत्तिणी उभ्या करितात. आणि हत्तीला त्यांच्या कडून इतका चेपून टाकितात कीं. त्याला इकडे तिकडे फिरण्यास बिलकूल सवड होत नाही. असे झाल्यावर दुसरे जे दोन मनुष्य हत्तिणीवरून बसलेले असतात, ते सोल मधल्या हत्तीच्या पोटा खालून इकडच्याचा पदर तिकडे असे भराभर करून त्या हत्तीच्या पोटास पाठीवरून भला जबरदस्त बिंडा भरितात. ह्या बिंड्यानें हत्तीचें पोट अगदी आवळून टाकिल्यावर त्याला दोन्ही हत्तिणी कडून दाबीत दाबीत तसाच लकड कोटाच्या बाहेर काढून एखाद्या भल्या मोठ्या वृक्षाकडे नेतात. आणि मग दुसरे दोन फार हुशार मनुष्य फार जलदीने त्याच्या पायांस जबरदस्त बिंडा भरितात आणि त्यास झाडाला बांधून टाकितात. असा सर्वांगाने जखडलेला त्याला पांच सहा दिवस जरूर असल्यास ज्यास्त दिवस उपोषित ठेवितात. मग काय विचारतां एडिटर बाबा, सहजच तो सांगितले काम ऐकूं लागतो.
 असो इकडे बाकेपुराहून गया क्षेत्र ५६ मैल दक्षिणेस आहे. गयेस जाण्याला सडक बरीच आहे.
 बाकेपुरास म्याने, एके, गाड्या वगैरे सर्व प्रकारची वाहने मिळतात. ह्या वाहनांतून पैशाच्या मानाप्रमाणे जलद अगर उशिरानें मनुष्य गयेस पोहोचतो.
 बाकेपुरापासून सुमारे ७ मैलावर पुनःपुनः नदी लागते. तेथें सक्षौर श्राद्ध केले पाहिजे. ह्या नदीस पुनःपुनः ह्मणण्याचें कारण असे दिसतें कीं, ती गयेस पोहोचे पावेतो दहा बारा वेळां उतरावी लागते.
 गया हे शहर बरेंच मोठे आहे, परंतु उदास आहे. येथे फलगु नदी पालथी वाहात आहे. ह्या नदीस डब्रे खणून पाणी काढावें लागतें. एकंदर गयावर्जन यथाशास्त्र करावयाचे म्हटले म्हणजे ४५ दिवस लागतात. परंतु आतां तितकें करणारे फार थोडे. दक्षिणी लोक तर तितकें करीत नाहीत म्हटले तरी चालेल. आतां फार झाले तर अकरा दिवसांत गयावर्जन संपवितात. परंतु पुष्कळ लोक ह्मटले ह्मणजे एकोतिष्ठीच करितात. एकोतिष्ठि ह्मटली म्हणजे ३ दिवस तीन श्राद्धे एक फलगु श्राद्ध दुसरे वटश्राद्ध आणि तिसरें विष्णुश्राद्ध करितात. त्यास तीन दिवस लागतात. चवथे दिवशी शुद्धश्राद्ध करून संध्या करितात. संध्या म्हणजे प्रातःसंध्या, माध्यानसंध्या, आणि सायंसंध्या, अशा नांवांची तीन कुंडे आहेत त्यांत सकाळी, दोन प्रहरीं आणि संध्याकाळी स्नानें करून विशेष संकल्पपूर्वक तिन्ही संध्या करितात. ह्या संध्या करण्याचे तात्पर्य असे आहे की, ब्राम्हणाच्या मौजिबंधनापासून गयेस त्रिकाळ संध्या ब्राम्हण करी पर्यंत जो संध्येचा लोप झाला असेल तन्निमित्त जें पातक त्यापासून तो मुक्त होतो.
 गयेस केल्या तर पुष्कळ यात्रा आहेत. परंतु एडिटर बाबा आलीकडे त्या आगगाडीने सर्व गुंडाळून ठेविल्या आहेत.
 गयावळास प्रयागवळ व गंगापुत्र ह्यांच्या पेक्षां बरीच ज्यास्त मिळखत होते. तरी पाहिले तो त्या मानाने ह्मणजे पुष्कळ गयावळ सुखी आहेत असे आढळत नाहीं.
 इकडे पितळेच्या वगैरे मूर्ति ओतण्याचा फारच सपाटा आहे. काळ्या दगडाचे जिन्नसही येथें तऱ्हे तऱ्हेचे करितात.
 अहो आह्मास अशास्त्रतेचा एक प्रकार आढळला तो लिहितो. तो खरा किंवा खोटा अशास्त्रतेचा प्रकार आहे ह्याविषय सूज्ञ वाचकांनी विचार करावा.
 गयावळ लोक श्राद्धास दक्षणी लोकांच्या येथें देखील जेवतात, ते असो परंतु एके दिवसांत तीन चार वेळां जेवतात, आतां श्राद्धास ब्राम्हण गेला म्हणजे रात्रौ देखील त्याने तोंड हलवितां कामा नये, असा परिचार आमच्या तिकडे आहे, परंतु इकडची व्यवस्था पाहिली तर वर लिहिल्याप्रमाणे आहे. आतां अशा प्रकाराने कर्म यथासांग होते किंवा नाहीं हे मला ठाऊक नाहीं. तुमच्या सारखे शास्त्री बावांस हे पक्के ठाऊक असेल.
 अहो महाराज इकडे ज्या कांहीं गाड्या बाकेपुरापासून गयेस आणि गयेहून परत बाकेपुरास सुमारे २४ तासांत पोहोचतात. त्या सर्व बिगारी लोक ओढितात. त्यांस घोडे जुंपलेले नसतात. त्या गाड्यांस दर खेपेस भाडे रुपये २० पडते. आणि आंत ६ माणसे ओझ्यासुद्धां बसतात. त्यांस १० पासून १२ बिगारी लागतात आणि ते घोड्याप्रमाणे जलद एका टप्याहून दुसऱ्या टप्या पावेतों ओढून नेतात. टप्यामध्ये अंतर ६ अगर ७ मैल असतें. एक्यास दर खेपेस दर माणशी हशील ५ रुपये पडतें. आंत स्वाऱ्या दोन बसतात. व तितक्या असामींचा बोजा आंत घालितात. हे एके सुमारे दीड दिवसांत गयेस पोहोचतात. परंतु त्यांत बसून जे अंग हदरतें त्याविषयीं बोलण्याची सोय नाहीं. मेण्यास रुपये १० १२ पडतात, परंतु त्यांत स्वारी एक आणि बोजा कांहीं नाहीं. मेणाही २४ तासांत पोहोचतो.
 दुसऱ्या बैली गाड्या तद्देशी तऱ्हेच्या मिळतात. त्यांस भाडे ५ ६ रुपये पडते व ४ ५ दिवशी पोहोचतात.
 वर जी हत्ती धरण्याची माहिती लिहिली आहे. ती एका मोठया हत्तीच्या सवदागराने आम्हास सांगितली त्याप्रमाणे लिहिली आहे.
 गयेहून परत दक्षिणेत यावयाचे म्हटले म्हणजे पाटण्यावरून अलाहाबादेस आगगाडीच्या मार्गे यावे आणि तेथून जबलपुरावरून पुढे मध्ये बऱ्हाणपूर हे एक शहर पाहण्यासारखे आहे. हे पूर्वी शिंदे सरकारच्या कबजांत होते, परंतु हल्ली येथे इंग्रजी अंमल आहे. येथें गंधी सामान, कापड व कलाबतूचे सामान चांगले बनतें. ही गोष्ट आपल्या तिकडे सर्वांस महशूर आहे. लोभ असावा हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.