आमच्यातला राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सध्यःस्थितिप्रेरित दोन नाटके' या टिकालेखातून घेतलेला हा उतारा.

आशियातल्या इतर देशांप्रमाणे हिंदुस्थानात पूर्वीपासून राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव असलेला आपणास दिसून येतो. सर्व हिंदुस्थानात एक चक्रवर्ती असून त्याच्या प्रजाजनांमध्ये बंधुत्वाचे नाते आहे. असा काल आपणास इतिहासात बहुदा कधीच आढळून येत नाही. अनेक लहान लहान राज्ये भिन्न भिन्न राज्यांच्या अमलाखाली नांदत असून परस्परांमध्ये वैरे चालत असलेलीच आपल्या दृष्टोत्पत्तीस येतात. त्या वैरांचे पर्यवसान अनेकदा एक राज्य दुसऱ्यात लुप्त होण्यात होई. ती वैरे कधी कधी इतक्या तीव्रतेस पोहोचत असत की, मुसलमानांसारख्या परक्या शत्रूची धाड आली असतानाही त्या वैराचा या नवीन उपस्थित झालेल्या संकटांमुळे लय होण्याच्या ऐवजी त्यांचा फायदा शत्रूस घ्यावयास सापडे. ज्याप्रमाणे राज्यातील प्रजाजनांचा परस्परांवरील विश्वास नष्ट झाल्यावर त्याच्या परचक्राकडून ग्रास होण्यास विलंब लागत नाही, त्याप्रमाणे राष्ट्रसमुहाच्या भिन्न भिन्न अवयवांत दुजाभाव असल्यास त्यास अंकित करणे परदेशीय शत्रूस सोपे जाते. बरे, राज्याची अंतःस्थिती समाधानकारक होती असे म्हणावे तर तसेही दिसत नाही. राजाने प्रजेवर हवा तसा जुलूम करावा, व प्रजेने त्यास विष्णूचा अवतार मानीत तो निमूटपणे सहन करावा, त्यास दुसऱ्या राजाने जिंकल्यास त्याच्याशीही तितक्याच राजनिष्ठेने वागावे यापेक्षा अधिक समाधानकारक राजकीय परिस्थिती फारशी आढळून येत नाही. एखादे वेळी अशा प्रजेने राजास पदभ्रष्ट केल्याचाही दाखला इतिहासांत सापडतो, नाही असे नाही. पण अशा एखाद दुसऱ्या अपवादाचा उपयोग मुख्य नियम दृढतर करण्याचे कामीच विशेष होतो. अशा स्थितीत प्रजेत करारीपणाचे प्रमाण कमी असल्यास आश्चर्य वाटावयास नको.

या शोचनीय स्थितीचे समर्पक कारण अजून कोणी दिलेले पाहण्यात नाही. आम्हांस वाटते की, आपणाकडील राज्यांचा अल्पविस्तार व राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव या दोहिंचे मूळ आपल्या एका संस्थेत आहे. ती संस्था सामायिक कुटुंब ही होय. समाजाच्या बाल्यावस्थेत सामायिक कुटुंबे हिंदुस्थानाप्रमाणे युरोपातही होती, यात बिलकुल शंका नाही. फरक इतकाच की, आमच्याकडे ही संस्था धर्मशात्रामुळे लवकरच कायमची होऊन बसली, व तिकडे तसा फारसा प्रकार झाला नाही. आमच्याकडे कुटुंबास मध्यबिंदू धरून राज्याचे वर्तुळ आखले गेले; व तिकडे राज्याच्या धोरणावर कुटुंबाची उभारणी झाली. पाश्चात्यांच्या दृष्टीने कुटुंब म्हणजे लहान राज्य, पौरस्त्यांच्या दृष्टीने राष्ट्र म्हणजे मोठे कुटुंब.

हल्ली आपले वाढते दारिद्र्य व प्रवासाची साधने यामुळे सामायिक कुटुंबांची संस्था दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गाला लागली आहे. तथापि, हल्लीही जी अवशिष्ट अवाढव्य सामायिक कुटुंबे तुरळक तुरळक आपल्या दृष्टीस पडतात, त्यावरून त्यांच्या पूर्वीच्य स्थितीचीही आपणास कल्पना करिता येते. अनेक कुटुंबांत चार-चार, पाच-पाच पिढ्यांचे नातलग व त्यांचे आश्रित मिळून ५०-५०, १००-१०० माणसे असल्यास नवल नाही. या लहानशा राज्याची व्यवस्था पाहता पाहता कर्त्या पुरुषास कुटुंबाच्या बाकायहेर चालले आहे, हे पाहण्यास सवड किंवा उत्साह न उरल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कुटुंबातल्या कुटुंबात स्वरक्षणाची सर्व साधने अनुकूल असल्याने कुटुंबबाह्य गोष्टीकडे लक्ष्य पुरविण्याची त्यास आवश्यकताही भासत नसे. पंचायतीसारख्या ग्रामसंस्था असल्यामुळे इतर ग्रामस्थ कुटुंबांशी त्यांचा अगदीच संबंध येत नसे, असे नाही. पण एवढे खरे की, गावापेक्षा स्वकुटुंबाशीच अधिक संबंध पडत असल्यामुळे, ग्रामस्थितीपेक्षा कुटुंबाच्या क्षेमाकडेच त्यांचे चित्त अगदी वेधले जाई. ही कुटुंबाच्या कर्त्याची गोष्ट झाली. इतर कुटुंबीय मनुष्यांचे केंद्र कर्ताच असल्यामुळे त्यांचा इतर ग्रामस्थांशी तात्पुरताच संबंध असे.

कुटुंबाच्या कर्त्याच्या कुटुंबाखालोखाल गावाशी संबंध येई. पण ग्रामसंस्था म्हणजे लहान पण स्वतंत्र राज्यच असल्यामुळे अंपूर्ण राज्याच्या व्यवस्थेशी त्याचा संबंध फारच क्वचित येई. यामुळे तो तिजविषयी उदासीन असल्यास नवल नाही.

या प्रकारामुळे भक्ती, दया, औदार्य इत्यादी अंध गुणांस आम्हामध्ये वाव मिळून करारीपणासारख्या डोळस गुणांची वाढ खुंटून गेली. पितृभक्त पुत्र, कर्तव्यनिष्ठ मातापिता, दिव्य पतिव्रता, एकनिष्ठ सेवक ही चोहोकडे दिसू लागली. पण कट्टा राष्ट्रभक्त मात्र फारच क्वचित दिसून येई. हळूहळू सामायिक कुटुंबाच्या कल्पनेसही व्यापून टाकून राष्ट्र म्हणजे एक अवाढव्य कुटुंब, राजा म्हणजे आपला मायबाप व आपण त्यांची लेकरे अशा कल्पना प्रचलित होऊन बसल्या. देशकार्यासाठी प्राण देण्याचा प्रसंग आला असता कुटुंबाचा मोह सुटेनासा झाला. कर्तव्याच्या प्राप्तींसाठी संकोच करण्याची ही जी प्रवृत्ती झाली, तिजमुळेच जातिभेदाचाही उदय किंवा उत्कर्ष झाला, असे म्हटल्यास फारशी चूक होणार. नाही हिंदूस्थानच्या काही भागांत तर जातीचे इतके वैपुल्य आहे की, जितकी कुटुंबे तितक्या जाती तिथे असाव्यात. अविभक्त कुटुंबपद्धतीमुळे जसा राष्ट्रीय गुणांचा ऱ्हास झाला, तसा जातीभेदामुळेही झाला.

असो; मराठ्यांचा उदय झाला तेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रीय गुणांचा उअदय व्हावयास सुरुवात झाली. परंतु शिवाजी महारजांचीही महात्वाकांक्षा गोब्राम्हणप्रतिपालनाचीच होती; व दिल्लीपतीचा एक मोठा अंकित होण्याच्या इच्छेपलिकडे तिची फारशी मजल गेली नव्हती, असेही कित्येक विद्वानांचे मत आहे. याच राष्ट्रीय गुणाभावामुळे व कुटुंबप्रवण दृष्टीमुळे ब्राम्हणांनी पुणे येथे निराळी गादी स्थापण्याचा, व नागपूर, बडोदे, इंदूर व ग्वाल्हेर येथील अधिपतींनी स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला. मधून मधून बाजी देश्पांडे, मालुसरे, खंडोबल्लळ चिटणीस वगैरे काही विलक्षण स्वर्थत्यागी पुरुषही डृग्गोचर होत. पण त्यांचा स्वार्थत्याग देशसेवेसाठी नसून स्वामीसेवेसाठीच बहुदा असे. हिंदू समाजास आरंभी जे राष्ट्र घातक वळण लगले होते, त्याचा नाश होऊन राष्ट्रानुकूल नवे वळण कायम होण्यापूर्वीच दुर्दैवाने मराठी राज्याचा अंत झाला.

यानंतर हिंदूस्थानचा ज्या लोकांशी योग जुळून आला, ते सर्व जगात स्वातंत्र्य प्रिय म्हणून नावाजलेले होते. गुलामगिरीपासून जो पोचटपणा उत्पन्न होतो तो त्यांची अंगी नसून, उलट स्वातंत्र्याबरोबर वास्तव्य करणारा करारीपणा त्यांचे अंगी बाणला होता. हे लोक अन्यायाचे व जुलुमाचे पूर्ण द्वेष्टे होते; व त्यांच्या स्वातंत्र्य प्राप्तीस स्वराष्ट्र पुरेसे न वाटून तिने इतर देशांतही आपले ध्वज उभारिले होते. सुयंत्र राज्यव्यवस्था व लोकस्वातंत्र्य यांचे जितके योग्य मिश्रण शक्य असते, तितके यांच्या राज्यपद्धतीत असून त्या पद्धतीचे अनुकरण इतर राष्ट्रेही करू लागली होती. फ्रान्स व अमेरिका या देशांस प्रजासत्तक राज्ये स्थापण्याचे कामी हेच लोक पर्यायाने गुरू झाले होते; व ग्रीस, रोम इत्यादी एकदा अत्युच्च शिखरास पोहोचून नंतर अवनतीच्या डोहात बुडालेली राष्ट्रे पुढे पुन्हा डोकी वर काढू लागणार होती, तीही याच लोकांचा कित्ता डोळ्यासमोर ठेवून. या लोकांनी पुढे ऑस्ट्रेलिया, कानडा वगैरे देशांस आपण होऊन स्वराज्य अर्पण केले. या लोकांचे करारीपणाचे तेज या प्रकारएह असल्यामुळे यांना हिंदूस्थानसारख्या तेजोहीन देशावर सहज विजय मिळवता आला.

आपल्या देशातील लोक इंग्रजांच्या मानाने अस्त्यनिष्ठ व बेकरारी आहेत, हे विधान वाचून पुष्कळांस राग येईल. अलीकडे, अनेक वक्यांचा व लेखकांचा आपल्या जुन्या ग्रंथातून आपल्या नीतिमत्तेबद्दलचे दाखले काढून, आपण हल्ली तितकेच नितीमान आहोत, असे अप्रत्यक्षतः सिद्ध करण्याचा प्रघात पडला आहे. परंतु हा प्रकार सर्वथा आत्मघातकीपणाचा आहे, असे आम्हास स्पष्ट म्हटले पाहिजे. आपले पूर्वज एकदा अत्यंत नीतिमान व सत्यनिष्ठ असल्याबद्दल भारतादी ग्रंथ साक्ष देत आहेत, व त्याबद्दल मतभेद होण्याचा मुळीच संभव नाही. यास मुख्य प्रमाण हेच की, आपला देश एकदा फार भरभराटीस आला होता. परंतु तीच नीतिमत्ता व सत्यनिष्ठा त्यांच्या सांप्रत वंशजात आहे असे म्हणणे, म्हणजे गेल्या हजार वर्षांच्या गुलामगिरीचा व दारिद्र्याचा आपणावर काही परिणाम झाला नाही असे म्हणण्यासारखेच आहे. लॉर्ड कर्झनसारख्याने सबंध देशास असत्यनिष्ठ म्हटल्यास आपणास त्वेष येणे हे ठीक आहे. परंतु आत्मनिरीक्षणप्रसंगी आपणास खरा प्रकार लपविता कामा नये. इंग्रज लोकांतील सत्यनिष्ठेस दिवसेदिवस ओहोटी लागत आहे, मोर्ले साहेबांसारख्या सत्यनिष्ठ म्हणून मिरवणाऱ्या मुत्सुद्याच्या लपंडावावरून उघड होत आहे. परंतु असे असतानाही त्यांचा हल्लीचा करारीपणा आपले अंगी येण्यास आपणास आणखी काही वर्षे घालविली पाहिजेत. ज्याप्रमाणे फ्रेंच लोकांची रंगेलपणाबद्दल. इटालियन लोकांची दीर्घद्वेशाबद्दल, त्याचप्रमाणे इंग्रजांची युरोपियन राष्ट्रात सरळपणाबद्दल प्रसिद्धी आहे. एक इंग्रज नोकर कोणत्याही युरोपियन नोकरापेक्षा अधिक सचोटीने व कसोशीने काम करतो, ही गोष्ट अर्थशास्त्रविषयक ग्रंथात नमूद केलेली तज्ज्ञांस विदित आहेच; 'खोटा' ही शिवी एका इंग्रजाने दुसऱ्यास दिली असता त्याबद्दल खून पडलेले आपण प्रत्यही वाचतो; इंग्लंडातील न्यायसभांत फार थोड्या साक्षीदारांच्या जबान्यांवर मोठमोठ्या खटल्यांचे निकाल झालेले आपल्या ऐकण्यात येतात. या गोष्टीवरून इंग्रजांची सत्यनिष्ठेबद्दलची प्रसिद्धी विनाकारण नसावी, असे अनुमान निघते. आता हे खरे की, मनुष्याने काढलेल्या चित्रांवर विश्वास ठेवताना सिंहास जसा विचारच करावा लागतो, त्याप्रमाणे इंग्रजी किंवा अमेरिकन पुस्तकांतील माहितीचा आपणास बेतानेच उपयोग केला पाहीजे. तथापि, त्यावरूनही इंग्रज लोक कोणत्या सद्गुणांबद्दल विषेश आदर बाळगतात, एवढे स्पष्ट दिसून येते.

इंग्रजांनी हिंदुस्थान देश काबीज करताना वाटतील तसे व तितके अनचार व अत्याचार केले. ही गोष्ट अगदी खरी आहे. परंतु, कोणत्याही समाजातील नितीमत्तेची प्रत ठरविताना त्यातील मनुष्ये शत्रुंशी कसे वर्तन करतात, याचा विचार करता येत नाही. कारण वर दर्शविल्याप्रमाणे नीतीचा उगम व उपयोग समाजाच्या अंतर्व्यवस्थेपुरताच असतो. शत्रुशीही धर्माचरण करू पाहणाऱ्या अलौकिक पुरुषास आपण धर्मराजाच्या कोटीत गणू; परंतु तसे न करणाऱ्यास दोष लावता येणार नाही. हल्लीसुद्धा या देशात काही उन्मत्त इंग्रजांकडून जे अनीतीचे प्रकार होत आहेत, त्यावरून त्यांच्या जातभाईंची अटकळ बांधणे कधीही रास्त होणार नाही. कारण स्वदेशातील लोकमताच्या दबावामुळे जे लोक सद्गुणी असतात, तेच तो दाब उडाल्यावर स्वेच्छाचारी होणे अगदी स्वाभाविक आहे.

ही गोष्ट इंग्रजांची झाली. आता आपल्या देशबंधूंकडे पाहा. अत्यंत कनिष्ठ प्रतीच्या मजुरापासून तो वरिष्ठ हिंदी अंमलदारापर्यंत आपण दृष्टी फेकली, तर मनास समाधान व अभिमान वाटण्यासारखी जाज्वल्य सत्यनिष्ठा आपणास किती ठिकाणी दिसेल बरे? आपण बाजरात भाजी विकत घ्यावयास गेलो, तर आपणास किती वेळ घासाघीस करावी लागते? स्टेशनवरील तिकिटे विकणारा अडाणी प्रवाशांपासून किती पैसे लिबाडीत असतो? व्यापाऱ्यांचे मुनीम नुकसानीचे सौदे मालकांच्या व फायद्याचे सौदे स्वतःच्या नावावर दाखवून किती पैसा गिळंकृत करीत असतात? गिऱ्हाईकाकडे माल विकावयास गेला असता तोलताना व त्याचा हिशेब करतना गिऱ्हाईक व मध्यस्थ किती गैरवाजवी नफा आपल्या घशात टाकीत असतात? कामावर मजूर ठेवून त्याजवर गेखरेख न ठेवली, तर किती नुकसान सोसावे लागते? न्यायदेवतेच्या मंदिरात किती पत्रकार, वकील व साक्षीदार न्यायाधिशाच्या डोळ्यांत धूळ फेकित असतात? त्याच क्षणी तेच न्यायाधीश लाच खाऊन न्यायाचा कसा राजरोस खून करीत असतात? आपणास कोणी लबाड म्हटले असता आपणापैकी अनेकांस लाज वाटण्याऐवजी धन्यता वाटते की नाही? अलीकडे शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे हे प्रकार काही कमी झाले असातील. परंतु इंग्रजांच्या खालावलेल्या सत्यनिष्ठेची बरोबरी आपल्या वाढणाऱ्या सत्यनिष्ठेस करावयास अजून काही वर्षे गेली पाहिजेत.

हे एकंदर हिंदुस्थान वासियांबद्दल झाले. खुद्द मराठ्यांविषयी विचार केला, तर त्यांची कीर्ती हिंदुस्थानातील इतर भागांत त्याच्या शौर्याबद्द, क्रौर्याबद्द व धूर्ततेबद्दल असलेली दिसून येते; व ही किर्ती द्वेषमुलक, व अतएअव अस्थानी नसून वाजवी आहे, असेच आपणास प्रत्यक्ष अनुभवावरून म्हणावे लागते. ही स्थिती आपल्या देशात लोकमताच्या दबावाखाली असणऱ्या लोकांविषयी झाली. आपले लोक शिक्षणाच्या किंवा इतर निमित्ताने परदेशी गेले असता त्यांचे वर्तन कसे असते, हे पुष्कळांस ऐकून माहित असल्याने त्याही इथे वाच्यता करण्याचे कारण नाही. ज्याप्रमाणे हल्ली आपणावर इंग्रज राज्य करीत आहेत, त्याप्रमाणे आपण जर इंग्लंडमध्ये त्यांजवर राज्य करीत असतो तर त्यापैकी काही जण हल्ली इकडे जे निंद्य प्रकार करीत आहेत, त्यापेक्षाही अधिक करण्यास आपण चुकलो नसतो, याबद्दल आम्हांस संशय वाटत नाही. इंग्रज लोक आम्हांस आमच्या स्पष्ट भाषेबद्दल काही महिने स्थलांतर करावयास लावितात; तर आम्ही त्यांस त्याच गुन्ह्याबद्द मिर्च्यांच्या धुऱ्या किंवा राखेचे तोबरे देऊन हत्तीच्य पायाशी तुडविले असते. सभाबंदीचा कायदा, राजद्रोहाचे खटले वगैरे जे अनुचित प्रकार हल्ली राज्यकर्त्यांकडून घडत आहेत, ते त्यांच्या नैसर्गिक स्वातंत्र्यप्रियतेस न जुमानता आत्मरक्षणार्थ होत आहेत. पण यापलिकडीलही प्रकार आपणाकडून इंग्लंडात प्रत्यही झाले असते, असे विधान केल्यास चूक होणार नाही.

वरील विधानावरून कोणास असे वाटेल की, आमचे धोरण आम्हामध्ये काहीच सद्गुण नाहीत असे म्हणण्याचे आहे. आम्हामध्ये सद्गुण आहेत, व ते विपुलही आहेत. ते इतके आहेत की, त्यांत आपणांस जगातील कोणत्याही राष्ट्राशी बरोबरी करता येईल. परंतु त्यांचा उपयोग आपली राजकीय स्थिती सुधारण्याकडे होण्यासारखा नाही. म्हणजे त्यांचे स्वरूप सार्वजनिक नसून खाजगी आहे. उदाहरणार्थ, आपणामध्ये काटकसर, साधेपणा, शुचिर्भूतपणाम वैवाहिक कर्तव्यनिष्ठा, धर्मश्रद्धा वगैरे काही अमोल सद्गुण आहेत. परंतु त्यांचा राजकीय स्थितीशी फारसा निकट संबंध नाही. विलायती कापड आपल्या साधेपणाच्या व काटकसरीच्या आड येते म्हणून, साखरेत हाडे व केशरात गाईचे रक्त असल्यामुळे आपला धर्म बाटतो म्हणून, काचेच्या चिमण्या वारंवार फुटून व घासलेट तेलाने घरास आगी लागून नुकसान होते म्हणून, त्या त्या वोलायती जिनसांवर बहिष्कार घालण्याचा आपला प्रयत्न फलद्रूप होईल, हे खरे आहे. पण येथे त्या सद्गुणांच्या सामर्थ्याची मर्यादा संपली. काडतुसात धर्मनिषिद्ध पदार्थ असतात या भ्रमावेर १८५७ सालचे बंडाची इमारत रचली होती. परंतु त्या भ्रमाचा भोपळा फुटताच पुनः चोहोस्वस्थताकडे झाली; व हल्ली देशाची इतकी निकृष्टावस्था झाली असताही संतुष्ट असलेल्या देशी पलटणी बिनचरबीची काडतुसे प्रसंग पडल्यास आपल्या अनाथ देशबांधवांवर सोडण्यास तयार होतील. पण यात नवल कसचे? एखाद्या वस्तूत जितका जोम तितकेच काम ती देणार! जास्त कोठून देणार?