Jump to content

अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/साहित्य आणि विचार

विकिस्रोत कडून
१६

साहित्य आणि विचार


 शरद जोशींना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड होती आणि त्यांची वैचरिक बैठक घडवण्यात वाचनाचे योगदान मोठे आहे.
 नाशिकला रुंगठा हायस्कूलमध्ये असताना जोशींनी पुस्तकांच्या जगात प्रवेश केला व त्यानंतर तीन-चार वर्षांतच त्यावेळच्या उपलब्ध होऊ शकलेल्या बहुतेक प्रमुख मराठी पुस्तकांचा त्यांनी फडशा पाडला. बालसाहित्यात ते रमले नाहीत कारण वयाच्या मानाने त्यांची वैचारिक वाढ खूपच जास्त झालेली होती. साहजिकच त्यांचे वाचनही बरेच प्रौढ होते. खांडेकरांच्या ध्येयवादी नायकांचा पगडा कुमारवयात त्यांच्यावर बराच होता. समाजातील अन्याय आणि शोषण, सामान्य माणसांची होणारी फरफट, अनेक व्यक्तिगत अडचणींवर मात करून समाजसेवेसाठी स्वतःला झोकून देणारे ध्येयवादी तरुण वगैरे चित्रण या कादंबऱ्यांत असे. आपणही आयुष्यात समाजासाठी असेच काहीतरी केले पाहिजे असे त्यांना फार वाटे. शरच्चंद्र चटर्जीच्या अनुवादित कादंबऱ्याही त्यांनी लहानपणीच वाचल्या होत्या. त्यांतली पाथेर दाबी ही त्यांना विशेष आवडलेली कादंबरी. या कादंबरीचा नायक डॉ. सब्यसाची नावाचा एक क्रांतिकारक डॉक्टर आहे; जतींद्रनाथ ऊर्फ बाबा जतीन या बंगाली क्रांतिकारकाच्या जीवनावर बेतलेला. एका सशस्त्र बंडखोर संघटनेचा तो प्रमुख आहे. अत्यंत धाडसी, बुद्धिमान, प्रतिभावंत, अफाट ताकदीचे आणि बरेचसे गूढ असे हे व्यक्तिमत्त्व आहे. या डॉ. सब्यसाचीच्या जागी आपल्या भावविश्वात त्यांनी अनेकदा स्वतःला कल्पिले होते.
 जे वाचले, ते जोशी वाचून सोडून देत नसत, तर त्यावर मनन करत; त्याचे संस्कार साहजिकच मनावर व म्हणून वागण्यावरही होत. त्या संस्कारांचा प्रभाव दर्शवणारा त्यांनीच सांगितलेला हा एक शाळकरी वयातला अनुभव -
 ओगलेवाडीला असलेल्या त्यांच्या मामाकडे सुट्टीत ते खूपदा जात. तिकडे भटकणे, आसपासच्या मुलांबरोबर खेळणे, टिवल्याबावल्या करणे यांतच सुट्टी संपायची. एकदा सुट्टीत कोणी काय काय केले ह्याची चर्चा वर्गातल्या मुलांमध्ये सुरू होती. ते तेव्हा सातवी-आठवीत असतील. त्यावेळी आपण इतर सर्वांपेक्षा अगदी वेगळे असे काहीतरी केले असे दाखवण्याचा जोशींना फार मोह झाला व कल्पनेनेच एक चित्र त्यांनी मित्रांसमोर रंगवले, ओगलेवाडी काच कारखान्याच्या बाजूला मोठी झोपडपट्टी होती. बहुतेक औद्योगिक वसाहतींच्या आसपास असते तशी. कारखान्यात रोजंदारीवर काम करणारे किंवा एखाद्या कंत्राटदाराकडे काम करणारे वगैरे अगदी गरीब कामगार किंवा अनेक बेकार माणसेही तिथे राहत. सुट्टीत आपण त्या झोपडपट्टीत जात असू असे भासवणारे वर्णन जोशींनी त्यावेळी इतर मुलांसमोर केले. उदाहरणार्थ, एक दारुडा नवरा आपल्या बिचाऱ्या बायकोला कसा बेदम मारत होता याचे वर्णन. तसे हे कुठल्याही झोपडपट्टीत नेहमीच दिसणारे दृश्य आहे व ते बघण्यासाठी सुट्टीत तिथे जाणे काही आवश्यक नव्हते. पण जोशींनी ते अगदी रंगवून रंगवून सांगितले; जणू त्यांच्या डोळ्यांसमोरच ते घडत होते! दुसरे एक दृश्य होते खूप भाजलेल्या व त्यामुळे ओगलेवाडीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या एका लहान मुलीचे. ती हॉस्पिटलमध्ये असताना एकसारखी वेदनेने किंचाळत होती; तिथले डॉक्टर तिला म्हणत होते, 'असं किंचाळायचं होतं, तर मग भाजून कशाला घेतलंस?' जणू काही तिने मुद्दाम स्वतःला भाजून घेतले होते! हे सर्व वर्णन काल्पनिकच होते; पण आपण इतर सर्वांपेक्षा किती वेगळे आहोत, अगदी वेगळे असे काहीतरी आपण या सुट्टीत कसे केले हे मित्रांना दाखवण्यासाठी जोशी ते सारे खुलवून सांगत होते. त्यांच्यातल्या लेखकीय प्रतिभेचे हे एक उदाहरण; त्यांच्या व्यक्तित्वाच्या एका अंगावर प्रकाश टाकणारेही.
 'स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यांसाठी जगलास तरच जगलास' अशा वाक्यांचा त्यांच्यावर बराच प्रभाव होता आणि तशा प्रकारच्या भूमिकेतून एक दांभिकपणा कसा आपोआप तयार होत जातो. ते स्पष्ट करण्यासाठी जोशींनी ओगलेवाडीचे उदाहरण दिले होते.
 पुढे याच संदर्भात मॉमची एक गमतीदार छोटी गोष्ट ते नेहमी सांगायचे. दुसऱ्या कोणाचातरी उद्धार करायचा मोह किती जबरदस्त असतो हे दाखवण्यासाठी. एकदा येशू ख्रिस्ताला सैतान भेटतो. ख्रिस्ताने मोहाला बळी पडावे, यासाठी तो अनेक प्रलोभने दाखवतो. सोने-नाणे, पैसाअडका, जमीन-जुमला इत्यादी. पण येशू कशालाच बळी पडत नाही. शेवटी सैतान त्याला म्हणतो, की पृथ्वीवर जाऊन सर्व मानवजातीच्या उद्धारासाठी बलिदान करण्याची संधी मी तुला आता देतो. आणि ते प्रलोभन काही ख्रिस्ताला टाळता येत नाही! 'परोपकार ही एक चटकन चढणारी दारू आहे,' असा जोशी यांनी यातून काढलेला निष्कर्ष आहे.
 कॉलेजमध्ये गेल्यावर जोशींचे मराठी वाचन मंदावले; मराठी ललित साहित्याचे वाचन तर फारच कमी झाले. त्यांचा भर नंतरच्या काळात इंग्रजी वाचनावर होता. इंग्रजी ललितसाहित्यात पी. जी. वुडहाउस आणि सॉमरसेट मॉम हे त्यांचे आवडते लेखक. आयन रँड हिच्या कादंबऱ्यांचाही त्यांच्या विचारांवर खूप मोठा पगडा आहे. कॉलेजच्या ग्रंथालयात त्यांनी मुख्यतः आर्थिक विषयांवरील इंग्रजी पुस्तकांचे वाचन केले. या वाचनामुळे त्यांना अर्थशास्त्राची गोडी लागली आणि एकूण मानवी व्यवहारातील अर्थकारणाचे महत्त्वही लक्षात आले. त्यांच्या अर्थवादी विचारसरणीचे मूळ काही प्रमाणात तत्कालीन वाचनातही असू शकेल.

 आपण केलेल्या वाचनाच्या प्रकाशात भोवतालच्या जगाचे निरीक्षण करायची त्यांची सवय होती. उदाहरणार्थ, डॉन क्विहोती (Don Quixote; क्विझोटी हाही उच्चार आपल्याकडे प्रचलित आहे) ही सर्वान्तीस (Cervantes) या जगप्रसिद्ध स्पॅनिश लेखकाची प्रख्यात कादंबरी त्यांनी शाळेत असतानाच वाचली होती. १६०५ साली लिहिली गेलेली ही कादंबरी स्पॅनिश भाषेतील सर्वश्रेष्ठ आणि एकूणच जगातील सर्वश्रेष्ठ अशा दहा कादंबऱ्यांपैकी एक मानली जाते. डॉन क्विझोटी हा या कादंबरीतील नायक. अत्यंत जुलमी, पण काल्पनिक, अशा अतिप्रबळ शत्रूशी हे पात्र सतत झगडत असते. आपण कोणीतरी महान शक्तिशाली आहोत आणि जगातल्या सर्वांवरील अन्याय आपण दूर करणार आहोत अशी त्याची स्वतःविषयी खात्री असते. जोशींची आई कधी कधी त्यांना डॉन क्विझोटी म्हणायची!
 या वाचनाचा प्रत्यक्ष जीवनाशी संदर्भ जोशी कसा लावतात ते बघण्यासारखे आहे. एके ठिकाणी ते लिहितात,

सर्व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एक डॉन क्विझोटी लपलेला असतो, एक स्वप्नरंजन असते, प्रत्यक्षात न जमलेले भव्यदिव्य असे काहीतरी आपण करत असतो अशी छुपी आत्मवंचना असते. वेळोवेळी असे अनेक डॉन क्विझोटी माझ्या स्वतःच्या मनामध्येही निर्माण झालेले आहेत. कधी कधी मी स्वतःला सॉमरसेट मॉमच्या The Moon and Six Pence या कादंबरीतील स्टॉकब्रोकर नायकाच्या जागी कल्पिलेले आहे, तर कधी कधी मी स्वतःला एखाद्या आध्यात्मिक प्रेषिताच्या जागी कल्पिलेले आहे. या सगळ्या अनुभवांतून मी स्वतः गेलेलो असल्याकारणाने स्वयंस्फूर्त क्षेत्रातील कार्यकर्त्यांमधील डॉन क्विझोटी मला लगेच ओळखू येतो.

(बस करा हे समाजसेवेचे ढोंग!, अंतर्नाद, दिवाळी १९९९)

 आपण केलेल्या वाचनाच्या प्रकाशात भोवतालच्या वास्तवाचे अधिक खोलात जाऊन विश्लेषण करायची ही विशिष्ट दृष्टी हे त्यांच्या प्रगल्भ अशा विचारशक्तीचे द्योतक आहे.

 ज्याला वाचनाची आवड आहे आणि ज्याच्यापाशी थोडेफार भाषाप्रभुत्व आहे, त्याला केव्हा ना केव्हा स्वतःही लिहावेसे वाटणे तसे स्वाभाविक असते. जोशींनीही कुमारवयातच कथालेखन करायला थोडीफार सुरुवात केली होती व त्यांच्या एका कथेबद्दल पहिल्या प्रकरणात लिहिलेच आहे. पण पुढील आयुष्यात ते मराठी साहित्यापासून काहीसे दूर गेले. विशेषतः शेतकरी आंदोलन सुरू झाल्यावर. म्हणजे एकीकडे त्यांनी साहित्यावर खूप प्रेमही केले व दुसरीकडे त्यांनी वेळोवेळी साहित्य हे तसे अनुपयुक्त आहे, असेही म्हटले आहे.
 जोशींनी आपले विचार एखाद्या पुस्तकाच्या स्वरूपात मांडले पाहिजेत असा अरविंद वामन कुळकर्णी व सुरेशचंद्र म्हात्रे या दोघांचा खूप आग्रह होता. स्वतः जोशी मात्र अशा लेखनाबद्दल उदासीन होते. शेतकरी आंदोलनाला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी जोशींचा भर त्यांच्या भाषणांवरच होता. 'वारकरी' होते; पण केवळ संघटनेच्या बातम्या इतरांना कळाव्यात म्हणून. 'शेतकरीवर्ग हा काही वाचणारा वर्ग नाही व त्यामुळे आपल्या विचारांचा प्रसार लेखनातून फारसा होणार नाही, भाषणे हेच खरे आपले हत्यार' असे त्यांना वाटत असे. परुळकरांच्या 'योद्धा शेतकरी'मुळे आंदोलनाचा खूप प्रसार झाला हे त्यांनी नंतर मान्य केले असले, तरी मुळात ती लेखमाला लिहायची व नंतर त्याचे पुस्तक काढायची कल्पना 'माणूस'चे संपादक श्री. ग. माजगावकर व स्वतः लेखक विजय परुळकर यांचीच होती; त्यात जोशींनी त्यांना फार काही उत्तेजन दिले अशातला भाग नव्हता.
 शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती हे सुरेशचंद्र म्हात्रे यांनी शब्दांकित केलेले पुस्तक अतिशय महत्त्वाचे ठरले हे खरे, पण त्या पुस्तकाचे कामही प्रशिक्षण शिबिराच्या टेप्स नकलून झाल्यानंतर मागेच पडले होते. म्हात्रेंनी खूप कष्ट घेऊन ते शब्दांकन पूर्ण केले. पण अशा स्वरूपाच्या शब्दांकनामध्ये नेमकेपणाचा व अचूकतेचा स्वाभाविक अभाव असतो. यासाठी म्हात्रे तयार झालेला मजकूर जोशींकडे तपासण्यासाठी पाठवत, पण कामाच्या रगाड्यात बरेच दिवस त्यासाठी जोशींना वेळ मिळत नसे व त्यामुळे पुस्तकाचे काम अडून राहायचे. खरे सांगायचे तर हे पुस्तक प्रकाशित करण्याबद्दल जोशींचे मन द्विधा होते. "माझे विचार अजून पक्के झालेले नाहीत. अशातच ते छापील स्वरूपात प्रकाशित झाले, तर नंतर मला ते बदलता येणार नाहीत." असे ते म्हणत. पण म्हात्रेनी पाठपुरावा करणे थांबवले नाही.
 शेवटी एकदाचे २३ नोव्हेंबर १९८२ रोजी पुस्तक प्रकाशित झाले. तरीही पहिल्या आवृत्तीवर लेखक म्हणून 'शरद जोशी' असे नाव छापलेले नाही; 'शब्दांकन : सुरेशचंद्र म्हात्रे' एवढेच छापलेले आहे! जोशी या पुस्तकाविषयी शेवटपर्यंत किती साशंक होते हे यावरून दिसते. 'शेतकरी आंदोलनात बळी पडलेल्या हुतात्म्यांना हे पुस्तक अर्पण केलेले आहे. वर्धा व अंबाजोगाई येथील दोन्ही प्रशिक्षण शिबिरांतील विचारांचे शब्दरूप असलेल्या ह्या पुस्तकात एकूण २१४ पाने (अंबाजोगाई १७४ + वर्धा ४०) असून त्याची किंमत अवघी दहा रुपये, म्हणजे त्या काळाचा विचार करताही खूपच कमी आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांमधेही त्याचा प्रसार व्हावा ही भूमिका त्यामागे होती. ह्या प्रकाशनाद्वारे शेतकरी संघटनेचा प्रकाशन विभाग सुरू झाला व पुढे अनेक वर्षे म्हात्रे यांनीच त्या विभागाची धुरा वाहिली.
 कांदा आंदोलनाच्या वेळी १९७९ साली सुरू केलेले वारकरी हा जोशींच्या नियतकालिकांच्या जगातील प्रवेश. एक-दीड वर्षातच आंदोलनाच्या वाढत्या व्यापामुळे ते चालवणे अशक्य झाले. त्याच्याविषयीही पूर्वी विस्ताराने लिहिलेच आहे.
 नंतरचे पाऊल म्हणजे शेतकरी संघटक. हे पाक्षिक संघटनेचे मुखपत्र म्हणून ६ एप्रिल १९८३ रोजी सुरू झाले. सर्वसामान्य मासिकाच्या आकाराची, साध्या न्यूजप्रिंटवर लेटरप्रेसने छापलेली, घडी घातलेली, एकरंगी, चार किंवा जास्तीत जास्त आठ पाने त्यात असत. सलग चार वर्षे ते प्रकाशित झाल्यानंतर ते स्थगित करून ६ एप्रिल १९८७ पासून आठवड्याचा ग्यानबा हे बहुरंगी मुखपृष्ठ व अधिक चटपटीत रूप असलेले, ऑफसेटने छापलेले पाक्षिक सुरू केले गेले. ते नाशिकहून प्रकाशित होत होते. संपादक होते मुरलीधर खैरनार व प्रकाशक मिलिंद मुरुगकर. पण तेही तसे अल्पजीवी ठरले व आधीच्या स्वरूपातील शेतकरी संघटक पुन्हा सुरू केले गेले ते बरीच वर्षे चालले, पण पुढे काळाच्या ओघात तेही बंद पडले.
 सुरुवातीला वारकरी, नंतर आठवड्याचा ग्यानबा व नंतरची सर्वाधिक वर्षे शेतकरी संघटक ह्या संघटनेच्या मुखपत्रांतून जोशींनी आपले बहुतेक सर्व लेखन केले. मुख्यतः ते चळवळीशी संबंधित अशा विषयांवर होते; त्या लेखनातून ते आपल्या विखुरलेल्या कार्यकर्त्यांना भेटत असत, आपली मते त्यांच्यापर्यंत पोचवत असत.
 शेतकरी संघटनेचा पुस्तक प्रकाशन विभाग असायला हवा, हादेखील कुळकर्णी-म्हात्रे या द्वयीचाच आग्रह होता व त्यांनीच तो विभाग सुरूही केला. शेतकऱ्याचा असूड- शतकाचा मुजरा, चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न, प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश (दोन भागांत), शेतकऱ्यांचा राजा शिवाजी, जातीयवादाचा भस्मासुर, खुल्या अर्थव्यवस्थेकडे खुल्या मनाने, स्वातंत्र्य का नासले? ही त्यांची जुनी पुस्तकेदेखील वाचनीय आहेत. त्यांतली काही बरीच छोटी आहेत, पण जोशींची वैचारिक मांडणी समजून घेण्याच्या दृष्टीने तीही महत्त्वाची वाटतात. ही पुस्तके म्हणजेही बव्हंशी पूर्वप्रकाशित लेखांचे संकलनच आहे.

 'साहित्यिक व्हावे असे एकेकाळी आपल्याला वाटत होते,' असे त्यांनी एका भाषणात म्हटले होते. संस्कत व मराठी साहित्याची त्यांची जाण सूक्ष्म होती; पण एकूण साहित्यविश्वाविषयी त्यांचे मत तसे कटूच होते.
 पहिली गोष्ट म्हणजे, ज्या शेतकऱ्यांबरोबर काम करण्यात त्यांनी स्वतःला पूर्णतः झोकून दिले त्या शेतकऱ्यांच्या करुण जीवनाचे खरेखुरे चित्रण त्यांना मराठी साहित्यात कुठेच आढळेना. ते लिहितात,

दरवर्षी पावसाळा यायच्या आधी बी-बियाण्याची जमवाजमव, खर्चीसाठी सावकाराची मिनतवारी, सोसायटीतील कारस्थाने आणि भानगडी, पाऊस येतो किंवा नाही याची चिंता, आल्याचा आनंद व येत नसला तर पोटात उठणारा भीतीचा गोळा, पिकावर येणाऱ्या तणांच्या आणि रोगांच्या धाडी, पीक उभे राहिल्यानंतर होणारा आनंद व बाजारात गेल्यावरची शोकांतिका, वाढते कर्ज, पुढाऱ्यांची मग्रुरी, आग लागलेल्या घरातून निसटताना व्हावी तशी गावच्या आयुष्यातून सुटण्याची ज्याची त्याची स्वतःपुरती धडपड या किड्यांसारख्या जीवनात लिहिण्यासारखी प्रचंड साधनसामग्री आहे. पण या सत्तर टक्के लोकांच्या आयुष्याचे प्रतिबिंब साहित्यात कधीच पडले नाही.
खुरपताना, गवत कापताना, पिके काढताना, जात्यावर शेतकरी स्त्रियांनी उत्स्फूर्तपणे म्हटलेली गाणी माळरानातच विरून गेली. मोटेवर, नांगरावर बैलांच्या साक्षीने शेतकऱ्यांनी ढाळलेले दुःखाचे कढ तापलेल्या जमिनीतच जिरून गेले.
शेतकऱ्याची पिके लुटून नेलेल्या दरोडेखोर लुटारूंच्या तळावर गायली गेलेली उत्तान, उन्मत्त गाणी साहित्यात आली. मोठ्या लुटारूंनी दरबार भरवायला सुरुवात केल्यावर त्यांचे कौतुक करणाऱ्या भाट-शाहिरांची प्रतिभा गाजली. त्यांचे मनोरंजन करणाऱ्या कलावंतिणींच्या लावण्यांचा पूर आला, संगीताच्या मैफिली झडू लागल्या. पिके लुटून पेठा, शहरे वसवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या, कारकुनांच्या समाजाचे साहित्य तयार झाले. साहित्य असो, संगीत असो, कला असो, त्यात शेतकऱ्याचे असे काहीच नाही.

(आम्ही लटिके ना बोलू, प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश, भाग दोन,
पृष्ठ १०६, २६ जुलै १९८५

 साहित्याप्रमाणेच प्रत्यक्ष साहित्यिकांविषयीदेखील जोशींचे मत कटूच असल्याचे जाणवते. उपरोक्त लेखातच त्यांनी लिहिले आहे,

शहरात गेलेली शेतकऱ्यांची पोरे शहरात रमली. त्यात लिहिण्याचे कसब असणाऱ्यांनी गावाविषयी लिहिले; पण शहराला काय पटेल, काय आवडेल याचा विचार करीत लिहिले. 'हरामखोरांनो, तुम्ही माझे गाव लुटले. या पापाचा तुम्हाला झाडा द्यावा लागेल.' असा टाहो कोणी फोडला नाही. उलट आपल्या ग्रामीण जन्मामुळे साहित्यात आपल्याला काही राखीव जागा असावी असा आक्रोश करणारी एक साहित्य आघाडी उभी झाली. शेतकऱ्यांच्या दु:खाचे भांडवल करून त्यावर साहित्यात स्थानाचा जोगवा मंडळी मागू लागली.

 याच संदर्भात पुढे काही वर्षांनी जोशींनी लिहिले आहे,

डाव्यांच्या चळवळीमध्ये, त्यांच्यामागे शेपाचशे माणसेसुद्धा नसली तरी, त्यांची कवने गाणाऱ्यांचा सुंदर ताफा त्यांच्यापुढे असतो. ज्यांच्या आंदोलनात आंदोलकांची संख्या कमी, पोलिसांची जास्त, त्या आंदोलनात प्रतिभेचा हा झरा खळाळून वाहताना दिसतो आणि प्रचंड आंदोलने करणाऱ्या शेतकरी संघटनेत, काही अपवाद वगळल्यास साहित्य, कला, संगीत, शाहिरी, पोवाडे अशा मार्गांनी प्रतिभा दाखविणारे निपजले नाहीत. असे का झाले?
एकदा एका कार्यकर्त्याने नानासाहेब गोऱ्यांना प्रश्न विचारला, 'शेतकरी संघटना ही अशी रुक्ष, काव्य नसलेली का झाली?' ते म्हणाले, 'शरद जोशी हा माणूसच गद्य आहे. त्यांनी जो अर्थशास्त्रीय विषय मांडला. तोच रुक्ष आणि गद्य आहे. आंदोलनाचे साहित्य हे कधी अशा गद्य भाषेत तयार होत नाही. आंदोलनात काहीतरी डोक्यात मस्ती चढवणारी, झिंग आणणारी गोष्ट असावी लागते. रामाच्या देवळाचं नाव घ्यावं लागतं, नसलेल्या गोष्टी तयार कराव्या लागतात, सामान्य माणसांचेसुद्धा पुतळे जागोजागी उभे करून त्यांना देवता बनवावं लागतं. समाजाच्या हितसंबंधांबरोबरच काही एक पागलपणा केल्याखेरीज आजकाल खरं आंदोलन बनतच नाही. आणि शरद जोशींना पागलपणा दाखवता येत नाही.'

एकेक दिवस, बी पेरल्यानंतर हाती पीक येईपर्यंत, किंवा न येईपर्यंत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या मनाला ज्या सहस्त्र इंगळ्या डसतात त्याचे चित्र साहित्यात मला कुठेही दिसत नाही. मी शेतकरी जीवनाचे उदात्तीकरण करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. काय ते जीवन, काय ती हिरवी हिरवी झाडे, काय ती स्वच्छ हवा, कसे झुळझुळ पाणी; शेतीवर असणे म्हणजे परमेश्वराच्या सान्निध्यात असणे! असे म्हणण्याचा वाह्यातपणा मी केला नाही. शेती ही एक जीवनपद्धती आहे; इतिहासाच्या एका ठरावीक काळामध्ये तिचे महत्त्व होते; पण पुढे जितकी माणसे शेतीतून निघून बिगरशेती व्यवसायाकडे वळतील, तितका त्या समाजाचा विकास आहे.

(समाजसेवेची दुकानदारी नको! अंतर्नाद, फेब्रुवारी २००७)}}

  जोशींच्या मते, दूरचित्रवाणीवर असंख्य मालिका अहोरात्र चालू असतात; पण त्यात शेतकरी जीवनाचे प्रामाणिक चित्रण कुठेच दिसत नाही. पाच टक्क्यांच्या आयुष्याच्या चित्रणाने दूरचित्रवाणीचा पडदा नव्याण्णव टक्के भरलेला आहे. पण याची कोणालाच खंत वाटत नाही; खुद्द शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाही तशी खंत वाटत नाही. गावागावात तेही सगळे तेच रंगीबेरंगी स्वप्नरंजन जिभल्या चाटत बघत राहतात! ह्या भयानक विसंगतीविरुद्ध कोणीही बोलताना दिसत नाही. शहरी लोकांना ज्याप्रकारचे ग्रामीण जीवनाचे खोटे-खोटे चित्रण आवडते, तशाच प्रकारचे ग्रामीण जीवन हे तथाकथित ग्रामीण साहित्यिक रंगवत बसतात; केवळ स्वतःसाठी नाव मिळवण्यासाठी. शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष वेदनेशी त्यांना काहीच देणेघेणे नसते. साहित्य आणि साहित्यिक यांच्यापासून जोशी दूर होत गेले ते अशा मतांमुळे.
 मी 'साहित्यिक' नाही हे जवळाबाजार येथे १९९५ साली भरलेल्या चौथ्या परभणी जिल्हा मराठी साहित्य संमेलनातील त्यांचे भाषण (शे.स. २१.१०.१९९६) सर्व मराठी साहित्यिकांनी अभ्यासावे असे आहे. पण एरव्ही साहित्य संमेलनाबद्दल भरपूर चर्चा करणाऱ्या वृत्तपत्रांनी व एकूणच साहित्यविश्वाने ह्या भाषणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांस पत्र ह्या त्यांच्या एका पत्ररूपी लेखाबद्दल दुसऱ्या प्रकरणात लिहिले आहे. गावातून शहरात शिकायला आलेल्या असंख्य युवकांना त्या काळात या पत्राने भारावून टाकले होते. जोशींची लेखणी किती विलक्षण प्रभाव टाकू शकत असे याचे हा लेख म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.

 सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांचा जोशींशी चांगला संबंध आला होता. फेब्रुवारी १९८४मध्ये परभणीला झालेल्या शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या अधिवेशनाला भालेराव गेले होते. तेथील केवळ भाषणेच त्यांना आवडली असे नव्हते; त्यांच्या साहित्यिक नजरेने इतरही अनेक आगळ्या गोष्टी टिपल्या होत्या. उदाहरणार्थ, एके ठिकाणी ते लिहितात,

शेतकरी संघटनेने वेळोवेळी काढलेली पोस्टर्स काळजाचा ठाव घेणारी होती. म्हाताऱ्या, दाढी वाढवलेल्या, रापलेल्या, पण तरीही करारी अशा शेतकऱ्याचे चेहरे पाहताच ती पोस्टर्स आपली वाटत. त्यांच्या मांडणीत कल्पकता असे. प्रथमच उभ्या राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या चळवळीची असलेली ही कलात्मक आणि काव्यात्मक बाजू स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकते.

(शरद जोशी, शेतकरी संघटना आणि माझी कविता,
अंतर्नाद, ऑक्टोबर २००९)

 नेत्याची प्रतिभा ही प्रत्येक वेळी फक्त त्याच्या भाषणातून आणि लेखातूनच व्यक्त होते असे नाही. त्याने प्रचारासाठी जी साधने निवडली असतात, त्यांतूनही ही प्रतिभा दिसते. बळीराज्य, सीताशेती, लक्ष्मीमुक्ती वगैरे पारंपरिक शब्दांचा जोशींनी केलेला वापर खूप कल्पक आहे.
 जालना येथील शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात इंद्रजित भालेराव यांनी आपली 'शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक' ही गाजलेली कविता लाखाहून अधिक शेतकऱ्यांसमोर म्हटली होती. तो प्रसंग सांगताना उपरोक्त लेखात भालेराव लिहितात,

टाळ्यांच्या रपरप आवाजात मी कविता म्हणत होतो. लोक इतक्या तालात टाळ्या कसे काय वाजवताहेत, म्हणून सहज मागे फिरून बघितलं, तर जोशीसाहेब स्वतः एखाद्या संगीतकाराच्या आविर्भावात तालाचं संचलन करत होते आणि त्या तालावर लोक टाळ्या वाजवत होते. मला माझं आयुष्यच धन्य झाल्यासारखं वाटलं, कविता म्हणून झाल्यावर लोकांनी प्रचंड जल्लोष केला. भारावलेल्या अवस्थेत मी माझ्या जागेवर येऊन बसलो. सभेत चैतन्याचा संचार झाला होता.

 मराठी साहित्यविश्वाने जोशींकडे केलेल्या दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीवर एका मोठ्या बंगाली कादंबरीकाराने त्यांचा केलेला एक उल्लेख विशेष लक्षणीय आहे. उपरोक्त लेखातच भालेराव त्याविषयी लिहितात,

देबेश रॉय हे फार मोठे बंगाली कादंबरीकार आहेत. बंगालच्या ग्रामीण भागाचं आणि कृषी जीवनाचं चित्रण करणाऱ्या हजारो पानांच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. 'तिस्ता पारेर वृत्तान्त' ही त्यांची कादंबरी माझ्या वाचनात आलेली आहे. 'तिस्तेकाठचा वृत्तान्त' असं त्या कादंबरीचं मराठी भाषांतर नगरच्या विलास गीते यांनी केलेलं आहे. तिला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळालेला आहे. साहित्य अकादमीनेच ती मराठीमध्ये प्रकाशित केलेली आहे. आठशे पानांच्या या कादंबरीत तिस्ता नदीच्या काठावर जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांचं भेदक चित्रण आलेलं आहे. शेवटी या कादंबरीत देबेश रॉय यांनी लिहिलं आहे, 'शेतकऱ्यांच्या या समस्येवर बंगाल सरकारनं काही उपाय शोधून काढला नाही, तर हे शेतकरी महाराष्ट्रातल्या शरद जोशी यांच्या शेतकरी चळवळीच्या मार्गाने जातील.' देबेश रॉय यांच्या लेखनातलं हे द्रष्टेपण मराठीतल्या एकाही कादंबरीकाराने आपल्या लेखनातून अजून तरी दाखवलेलं नाही.

  इंद्रजित भालेराव, शेषराव मोहिते, अरविंद वामन कुळकर्णी व श्रीकांत उमरीकर यांनी जोशींच्या साहित्याबद्दल लिहिलेले थोडेफार माझ्या वाचनात आले आहे, पण अन्य कोणी प्रस्थापित समीक्षकांनी त्यांची लेखक म्हणून घेतलेली दखल माझ्यातरी वाचनात आलेली नाही. 'इतकी पुस्तके लिहुनहीं मला कोणी साहित्यिक मानत नाही' ही खंत जोशींनी एका जाहीर भाषणात व्यक्तही केली होती. ते लिहितात,

मी आत्तापर्यंत अठरा-वीस पुस्तके लिहिली आहेत. मराठीबरोबर इंग्रजीतही लिहिली आहेत. माझ्या काही पुस्तकांची इतर भाषांतही भाषांतरे झाली आहेत. आमच्या शेतकरी संघटनेच्या कामामध्ये अक्षरशः लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतात. शेतकरी आंदोलनात जितकी माणसे तुरुंगात गेली, तितकी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यआंदोलनातही गेली नव्हती. असे असूनही मराठी साहित्यामध्ये शेतकरी आंदोलनाला काहीही स्थान मिळालेले नाही.

(समाजसेवेची दुकानदारी नको!, अंतर्नाद, फेब्रुवारी २००७)

 चळवळ ऐन भरात असताना जोशींनी संघटनेच्या मुखपत्रापलीकडे फारसे कुठे लेखन केलेच नाही. पुढे उतारवयात त्यांनी लेखनाकडे फार नाही, पण निदान पूर्वीपेक्षा जरा अधिक गांभीर्याने बघायला सुरुवात केली. पण तेव्हाही कुठल्या संपादकाने आपणहून मागितले, तरच लिहायचे अशी त्यांची वृत्ती होती.

 लेखनाला बऱ्याच उशिरा, उमेदीचे वय ओसरल्यावर सुरुवात केल्यामुळेही हे झाले असेल. स्वतःहून काही लिहिणे, त्यासाठी चांगला प्रकाशक शोधणे, आपल्या पुस्तकांची विस्तृत परीक्षणे योग्य त्या ठिकाणी छापून आणणे, त्यांना पुरस्कार मिळावेत व ते लेखन चांगल्या वाचकांपर्यंत पोचावे म्हणून स्वतः काही प्रयत्न करणे वगैरे गोष्टी दुर्दैवाने आपल्याकडे स्वतः लेखकाला कराव्या लागतात. विशिष्ट वयानंतर स्वतःला 'प्रोजेक्ट' करण्यासाठी हे सारे करणे कोणालाही अवघडच जाणार. शिवाय तसले काही करणे हा जोशींचा पिंडच नव्हता. संपादकांच्या मागणीनुसार थोडेफार इंग्रजी वृत्तपत्रीय लेखनदेखील त्यांनी केले, पण अगदी कमी. चेन्नई येथून प्रकाशित होणाऱ्या 'हिंदू'च्या बिझिनेस लाइन ह्या आर्थिक वृत्तपत्रात त्यांनी पंधरा दिवसांनी एक असे सदरलेखन काही काळ केले. त्याचे Down to Earth हे संकलन दिल्लीच्या एका प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केले आहे; पण त्याचीही फारशी दाखल घेतली गेलेली नाही. लोकसत्तालोकमत ह्या मराठी वृत्तपत्रांतून त्यांनी अधूनमधून सदरलेखन केले; पण एकूण मराठी किंवा इंग्रजी साहित्यक्षेत्रात त्यांचा लेखक म्हणून फारसा कुठे उल्लेख झालेला नाही.

 मराठी साहित्यातील कोणती पुस्तके त्यांना विशेष आवडली होती किंवा कोणते लेखक त्यांना महत्त्वाचे वाटतात, ह्याविषयी जोशींनी कुठे लिहिल्याचे माझ्यातरी वाचनात आलेले नाही. कुठल्या लेखकाची त्यांनी कधी भलावण केल्याचेही मी ऐकलेले नाही. भालेराव किंवा आणखी एखाददुसऱ्यांचे त्यांनी केलेले कौतुक हा अपवाद म्हणता येईल. इतर कुठल्या मराठी पुस्तकांविषयी किंवा लेखकांविषयी त्यांनी कधीच का लिहिले नाही हा एक प्रश्नच आहे. एकूणच मराठी साहित्य व साहित्याविषयी त्यांचे मत फारसे चांगले नसावे.
 याउलट इंग्रजी साहित्याविषयी त्यांनी बरेच लिहिले आहे. सॉमरसेट मॉम हा त्यांचा अतिशय आवडता लेखक. त्याचा तुच्छतावाद (सिनिसिझम) त्यांच्या स्वतःच्या वृत्तीशी मिळताजुळता होता, हे त्याचे एक कारण असू शकेल. त्याच्या अनेक कथांचे संदर्भ त्यांच्य लेखनातून आढळतात. 'ज्याला कोणाला लेखक बनायचे आहे, त्याने मॉमच्या निदान सहातरी कथा आधी वाचाव्यात अशी मी शिफारस करेन' असे त्यांनी लिहिले आहे. मॉमच्या साहित्यातील संदर्भ जोशींच्या भाषणांत आणि लेखनात अनेकदा आले आहेत. 'त्याचा सिनिसिझम (तुच्छतावाद) मला खूप आवडतो,' असेही ते म्हणाले होते. इतरांवरील जोशींच्या टीकेतही कधीकधी हा सिनिसिझम जाणवतो.
 पण मॉमचा तो सुप्रसिद्ध सिनिसिझम आपल्याला लोकप्रियता मिळाली, पण आपल्याला समीक्षकांनी कधीच श्रेष्ठ मानले नाही, या डंखातून तर आला नव्हता? आणि कुठल्याही निर्मितीसाठी स्वप्ने आवश्यक नाहीत का? केवळ सिनिसिझममधून कधी निर्मिती होऊ शकेल का? असले विचार जोशींच्या मनात कधी आले होते का हा प्रश्न पडतो.
 पी. जी. वुडहाउस हा विनोदी लेखकही त्यांना फार आवडायचा. त्यांच्या पलंगाशेजारी वुडहाउसचे एखादे पुस्तक कायम ठेवलेले असे. 'वुडहाउसमुळे माझे ब्लडप्रेशर नॉर्मल राहते,' असे ते एकदा म्हणाले होते. त्याशिवाय त्यांना अनेक वैचारिक पुस्तकेदेखील प्रिय होती व तीही ते पुनःपुन्हा वाचत असत. रोज झोपण्यापूर्वी काही ना काही वाचायचा त्यांचा प्रघात होता व त्यांच्या उशाशी नेहमीच काही पुस्तके ठेवलेली असत.

 जग बदलणारी पुस्तके या त्यांच्या पुस्तकात त्यांना खूप महत्त्वाच्या वाटणाऱ्या अशा वीसेक इंग्रजी पुस्तकांचा त्यांनी अल्पपरिचय करून दिला आहे. त्यात लायोनेल रॉबिन्सचे विद्यापीठांतून वर्षानुवर्षे पाठ्यपुस्तक म्हणून अभ्यासले जाणारे The Nature and Significance of Economic Science आणि जॉन मेनार्ड केन्सचे Economic Consequences of Peace, तसेच महात्मा फुलेंना प्रभावित करणाऱ्या थॉमस पेनचे Common Sense, चार्ल्स डार्विनचे उत्क्रांतिवादाची मांडणी करणारे On the Origin of Species यांचा परिचय आहे. अ‍ॅडम स्मिथच्या वेल्थ ऑफ नेशन्स ह्या विख्यात पुस्तकाचे त्यांना खूप अप्रूप होते व मुक्त अर्थव्यवस्थेचा पाया म्हणता येईल अशी त्यातील विचारसरणी त्यांना पूर्ण पटणारी होती; पण त्याचबरोबर The theory of moral sentiments हे त्याचे तुलनेने कमी परिचित असलेले पुस्तकही त्यांना महत्त्वाचे वाटे व त्या दोन्हींचाही त्यांनी परिचय करून दिला आहे. या दुसऱ्या पुस्तकात 'मनुष्यप्रकृती एकसूत्री नाही. त्यात अर्थप्रवृत्ती आहे तितकीच निसर्गसिद्ध करुणेची भावना आहे.' अशी मांडणी आहे.
 Road to Serfdom या एफ. ए. हायेक याच्या १९४४ सालच्या पुस्तकाचा परिचय इथे वाचायला मिळतो. सुरुवातीला एकहीं प्रकाशक ते छापायला तयार नव्हता, कारण सर्व तत्कालीन विचारवंतांचा त्यातील भूमिकेला प्रचंड विरोध होता. पण पुढे त्याची महती समाजाला पटली. १९७४चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार त्याला मिळाला होता. 'कोणत्याही मिषाने का होईना, पण एकदा सरकारी नियोजन आले, की नागरिक बाहुली बनतात आणि सरकार हुकूमशहा' हे त्याचे मुख्य प्रतिपादन. सरकारीकरणाला विरोध करणारे आणि खुल्या अर्थव्यवस्थेचा विचार मांडणारे हे सर्वांत महत्त्वाचे पुस्तक मानले जाते.
 बर्नार्ड मांदेविल ह्या १६७० साली जन्मलेल्या डच-इंग्लिश मानसोपचार तज्ज्ञाने लिहिलेल्या फेबल ऑफ द बीझ (मधमाश्यांची परीकथा) या एका आगळ्या पुस्तकाचा परिचय विशेष वेधक आहे. मुळात हे पुस्तक म्हणजे एक विनोदी ढंगाने लिहिलेली दीर्घ कविता होती. 'माणसाचे मैत्री, प्रेमभावना इत्यादी निसर्गसिद्ध गुण किंवा विवेक आणि संयम यांसारखे त्याने संपादिलेले गुण यांतून मोठ्या संस्कृती उगम पावत नाहीत; उलट, ज्याला आपण वाईट बुद्धी समजतो, अनैतिकता मानतो त्यातूनच सर्व समाजप्रिय प्राण्यांत मजबूत नाती तयार होतात. त्यातूनच जीवन, व्यापारउदीम आणि वैभव उद्भवतात.' हे त्याचे सूत्र होते. जोशींच्या मते अ‍ॅडम स्मिथ आणि आयन रँड यांच्यावर ह्या पुस्तकाचा बराच प्रभाव होता. ह्या लेखकाचा काळ म्हणजे साधारण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील उत्तरार्ध व त्यानंतरच्या काही वर्षांचा काळ; पण त्या काळात पाश्चात्त्य जग आपल्यापेक्षा किती पुढे गेले होते आणि किती वेगवेगळे विचार तेथील विचारवंत मांडत होते ह्याकडे जोशी वाचकाचे लक्ष वेधतात.
 किंबहुना या सगळ्या पुस्तकात त्या-त्या पुस्तकाच्या काळात आपल्या देशात काय घडत होते याची तुलनाही ते करतात व त्यातून आपण जगाच्या किती मागे होतो हेही दाखवून देतात.
 डॉ. ज्युलियन सायमन या अर्थतज्ञाच्या The Ultimata Resourses आणि The State of Harmony या दोन पुस्तकांचा जोशींनी एकत्रित करून दिलेला परिचय अतिशय रोचक आहे. विशेष म्हणजे हे लेखक १९९७ साली शेतकरी संघटनेचा सहभाग असलेल्या देवळाली येथील एका परिसंवादाला हजर राहिले होते. त्यांची ओळख 'आशावादी अर्थतज्ज्ञ' अशी आहे. त्यांच्या मते, धर्माचा आणि राजसत्तेचा पगडा जसजसा कमी होत गेला, तसतशी माणसाची प्रगती झाली, जीवनमान सुधारत गेले; स्वातंत्र्य आणि प्रगती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; व्यापक परिप्रेक्ष्यात बघितले तर चिंतातुर विचारवंतांनी काहीही म्हटले तरी माणसाची सतत प्रगतीच होत गेली आहे, तथाकथित प्रदूषणदेखील प्रत्यक्षात कमी-कमी होत गेले आहे, जगातील खनिजे वगैरे संपायची अजिबात शक्यता नाही, तशा प्रकारची वेळोवेळी मांडली जाणारी भिती अगदी अवाजवी आहे अशी त्यांची मांडणी आहे. एकेकाळी जमीन हीच सर्वांत मोठी साधनसंपत्ती होती; पण पुढे जमिनीपेक्षा भांडवल, त्यानंतर भांडवलापेक्षा तंत्रज्ञान आणि आता तंत्रज्ञानापेक्षा 'योजक' म्हणून माणूस हाच उत्पादनाचा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे असे ते म्हणतात.
 रासायानिक कीटकनाशकांमुळे निसर्गावर किती विपरीत परिणाम होत आहे, याकडे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या Silent Spring ह्या राशेल कार्सन या अमेरिकन महिलेच्या पुस्तकाचाही परिचय जोशी करून देतात. जगभरच्या पर्यावरणवाद्यांचे हे अतिशय लाडके पुस्तक, रसायनांच्या वापरामुळे उत्पादन वाढले, पण त्याचबरोबर डीडीटी अथवा एंड्रिनसारख्या रसायनांमुळे कोट्यवधी मासेही मरतात, पर्यावरणाची अपरिमित हानी होते, याकडे लक्ष वेधून घेण्याचे काम या पुस्तकाने केले. तिचे म्हणणे चुकीचे आहे असे जोशी म्हणत नाहीत, पण अशा औषधांचे फायदेही त्यांना दिसतात. ते म्हणतात,

या औषधांचा वापर झाला नसता तर साथीचे रोग आटोक्यात आले नसते, त्यामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले असते; कीटकनाशकामुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले, अन्यथा लक्षावधी माणसे भुकेने तडफडून मेली असती; रसायनांच्या वापराचे दुष्परिणाम आहेत हे खरे, पण रसायने वापरलीच नसती तर निसर्ग मोठा स्वच्छ, सुंदर राहिला असता हेही खरे नाही. मनुष्यप्राणी पर्यावरणाच्या नवनव्या समस्या उभ्या करीत जाईल आणि हळूहळू त्यांचे निराकरणही करीत जाईल.

 पुस्तकातला शेवटचा लेख रोझा लुक्झेम्बर्ग या पोलंडमधील साम्यवादी महिलानेत्यावर आहे; तिने मार्क्सवादातील एक महत्त्वाची त्रुटी दाखवून देणारा तिसऱ्या जगाच्या शोषणाचा सिद्धांत मांडला होता. विकसित जगातले कामगार आणि व्यवस्थापन हे दोघेही खरे तर पुढे एकत्रच येतात, वर्गयुद्ध वगैरे त्यांच्यात प्रत्यक्षात काहीच होत नाही; कारण दोघे मिळून गरीब वसाहतींचे शोषण करत असतात व त्यावर दोघेही समृद्ध होत असतात! इंपिरिअ‍ॅलिझम (साम्राज्यवाद) हा शब्दही तिनेच प्रथम वापरला. १५ जानेवारी १९१९ रोजी सरकारनेच तिच्यावर मारेकरी घातले, तिच्याच घरातून तिला फरफटत बाहेर काढले, लाठ्यांनी झोडपलेआणि नंतर बंदुकीची गोळी झाडून तिचे प्रेत जवळच्या एका कालव्यात फेकून दिले. तब्बल पाच महिन्यांनी पूर्ण सडलेल्या अवस्थेत ते सापडले. तिची क्रांतिकारक मांडणी आणि ज्या धाडसाने तिने ती केली त्याचे जोशींना विलक्षण कौतुक आहे. लेखाच्या, व या पुस्तकाच्या, शेवटी जोशी लिहितात,

शेतकरी संघटनेने भारतीय शेतीच्या पराधीनतेचे विश्लेषण करताना 'इंडिया' विरुद्ध 'भारत' असा संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्या मांडणीचा मूळ प्रेरणास्रोत रोझा लुक्झेम्बर्गच आहे.

 आश्चर्य म्हणजे जोशींवर ज्या लेखिकेचा सर्वाधिक प्रभाव आहे, त्या मूळच्या रशियन पण तरुणपणीच अमेरिकेत स्थायिक झालेल्या आयन रँड हिच्या; We the Living. The Fountainhead, Atlas Shrugged किंवा The Virtue of Selfishness यांसारख्या एखाद्या पुस्तकाचा मात्र त्यात परिचय नाही. तिने प्रसृत केलेल्या Objectivism या विचारपद्धतीचा आधुनिक पाश्चात्त्य जगावर जोरदार ठसा आहे. अर्थात प्रस्तावनेत ह्या त्रुटीचा जोशींनी स्वतः उल्लेख केला आहे व पुढील आवृत्तीत ती उणीव भरून काढायचे वाचकाला आश्वासनही दिले आहे. ती पुढची आवृत्ती कधी निघाली नाही हा भाग सोडा. आयन रँड ही अमेरिकन लेखिका व्यक्तिशः त्यांच्या सर्वात आवडीची. 'मला कधीही उदास वाटू लागलं, की मी तिचं एखादं पुस्तक वाचायला घेतो,' असं ते म्हणाले होते.
 जग बदलणारी पुस्तके हे शरद जोशींचे पुस्तक तसे छोटेखानी आहे; फक्त १२७ पानांचे. पण तरीही त्याच्याविषयी इथे काहीसे विस्ताराने लिहिले आहे, कारण जोशींनी जी पुस्तके इथे निवडली आहेत त्यांवरून त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीबद्दलही बरेच काही स्पष्ट होते. पुस्तकाचे शीर्षक 'जग बदलणारी पुस्तके' असले तरी 'मला घडवणारी पुस्तके' हे शीर्षकही या पुस्तकाला चालले असते.

  अंगारमळा हे त्यांचे साहित्यिक मापदंडावर विचार करता मला खूप आवडलेले पुस्तक. त्यातील अंगारमळा हा पहिला लेख 'साप्ताहिक ग्यानबा'मध्ये २६ सप्टेंबर १९८८ रोजी प्रकाशित झाला होता. ह्यात त्यांनी स्वित्झर्लंडहून भारतात परत आल्यानंतरच्या काही दिवसांचे हृदयस्पर्शी वर्णन केले आहे. या लेखाचे त्यांच्या स्वतःच्या अक्षरातील हस्तलिखितही सुदैवाने उपलब्ध आहे व त्याच्या पहिल्या पानावर उजव्या कोपऱ्यात 'स्वातंत्राच्या कक्षा या आगामी आत्मचरित्रात्मक निवेदनातील काही भाग' असे लिहिले आहे. यावरून त्यांना आत्मचरित्र लिहायचे होते व त्याचे शीर्षकही त्यांनी त्यावेळी ठरवले होते हे जाणवते. पण प्रत्यक्षात ह्या पुस्तकात 'स्वातंत्र्याच्या कक्षा' या विषयावर काहीच नाही. निव्वळ आत्मचरित्र असेही या पुस्तकाला म्हणता येणार नाही. या पुस्तकातील एकूण चौदा लेखांपैकी स्वतःविषयी फक्त चार लेख आहेत. ते उत्कृष्ट आहेत, पण त्यांतून त्यांचे सलग असे चरित्र उभे राहत नाही. पुस्तकातील सहा लेख म्हणजे व्यक्तिचित्रे आहेत; त्यांच्या मातोश्री इंदिराबाई, शंकरराव वाघ, बाबूलाल परदेशी, शेवाळेगुरुजी, दत्ता सामंत, दुर्गा भागवत व मनोहर आपटे (शेवटच्या दोघांची एकत्रित) यांची. पुस्तकातले दोन साहित्यविषयक लेख म्हणजे त्यांनी केलेल्या दोन भाषणांचे शब्दांकन आहे. पुस्तकातील सर्वांत मोठा तीस पानांचा लेख आहे, बस करा हे समाजसेवेचे ढोंग! हा त्यांनी अंतर्नाद मासिकाच्या १९९९च्या दिवाळी अंकासाठी लिहिला होता.

 जोशींचे शब्दवैभव कोणाही प्रस्थापित लेखकाने हेवा करावा असे आहे. 'म्हातारीच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये कोरून ठेवलेले पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य' ह्यासारखे शब्दप्रयोग ते सहज करून जातात. याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा त्या वर्षीचा 'आत्मचरित्र' या गटासाठी असलेला प्रथम पुरस्कारदेखील मिळाला होता. साहित्यासाठी त्यांना मिळालेला हा बहुधा एकमेव पुरस्कार असावा. "स्पर्धेसाठी मी कधीच पुस्तक पाठवणार नाही व तसे ते पाठवायचे नाही अशी ताकीद मी प्रकाशकांना दिलेली आहे," असे ते पूर्वी एका भाषणात म्हणाले होते, पण बहुधा त्यांच्या प्रकाशकाकडून हे पुस्तक परस्पर पाठवले गेले असावे व त्याबद्दल जाहीर झालेला पुरस्कार त्यांनी सुदैवाने प्रत्यक्षात स्वीकारलादेखील.
 त्यांच्या एकूण लेखनाचे वेगळेपण म्हणजे अतिशय गुंतागुंतीचा विषयदेखील ते खूप सोप्या शब्दांत मांडतात, ते लेखन कुठेही बोजड होणार नाही ह्याची दक्षता घेतात. पण त्यांच्या लेखनातील या प्रासादिकतेचे एक मोठे कारण म्हणजे मुळातच त्यांना लेखविषयाचे सखोल चिंतन केलेले असते व त्यांचे विचार त्यामळे त्यांच्या स्वतःच्या मनात सुस्पष्ट झालेले असतात. खूपदा लेखकाला स्वतःलाच त्याला नेमके काय म्हणायचे आहे ते नीट उमगले नसते व बऱ्याच साहित्यातील संदिग्धता व विसंगती त्या अपरिपक्व विचारांतून येत असते. जोशींच्या विचारांचे वेगळेपण आणि ते मांडण्यातील भाषाप्रभुत्व, संदर्भबाहुल्य आणि शब्दलाघव वाचकाला खिळवून ठेवतात. लक्षावधींचा जमाव खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत होते; प्रस्तुत चरित्रात वेळोवेळी त्याचा उल्लेख झालेलाच आहे; त्यांच्या या अमोघ वक्तृत्वाचा काही अंश त्यांच्या लेखनातही उतरला आहे.
 बऱ्याच वर्षांनंतर औरंगाबाद येथील जनशक्ती वाचक चळवळ ह्या श्रीकांत उमरीकर यांच्या प्रकाशनसंस्थेने जोशींच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित करायचा संकल्प सोडला व पुढच्या काही वर्षांत एकूण पंधरा पुस्तके प्रसिद्ध केली. (त्यांची यादी शेवटी परिशिष्टात आहे.) श्रीकांत उमरीकर यांचा परिवार शेतकरी संघटनेशी खूप पूर्वीपासून जोडला गेलेला आहे. श्रीकांत औरंगाबाद येथे येऊन प्रकाशन व्यवसायात शिरले. जोशींची अकरा नवी पुस्तके व चार पुनर्मुद्रित पुस्तके ओळीने प्रकाशित करून त्यांनी महत्त्वाचे काम केले आहे.
 पण एक नमूद करायला हवे; जोशींची बहुतेक पुस्तके म्हणजे मुख्यतः त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणांचा व लेखांचा संग्रह आहे. हे लेखही बव्हंशी 'शेतकरी संघटक'मध्ये प्रकाशित झालेले आहेत. एक लेखक म्हणून ती पुस्तके वाचताना, स्वतंत्र पुस्तक म्हणूनच त्यांचे लेखन झाले असते, तर ती अधिक चांगली झाली असती असे मला खूपदा वाटले आहे. पुस्तकासाठी लेख निवडताना विशिष्ट आशयसूत्र उमरीकरांनी डोळ्यासमोर ठेवले आहे, पण तरीही एखादे विशिष्ट पुस्तक लिहायचे असा संकल्प सोडून, बैठक मारून जोशींनी हे लेखन केलेले नाही. चळवळीच्या धबडग्यात त्यांना ते जमले नसेल किंवा कदाचित एकूणच मराठी साहित्याविषयीची अप्रीती त्यामागे असेल; पण जर त्यांनी तशी मुळापासूनच 'पुस्तक' या स्वरूपात साहित्यनिर्मिती केली असती, तर त्यातून मराठी साहित्य अधिकच समृद्ध झाले असते.

 'लिखित शब्द मेला आहे' ('The written word is dead') असे संयुक्त राष्ट्रसंघाचे एकेकाळचे अवर महासचिव फिलिप द सेन यांचे वाक्य जोशींनी एक-दोनदा उद्धृत केले आहे. साहित्याला आता भवितव्य नाही, असे बहुधा त्यातून त्यांना सूचित करायचे असे. त्यांनी स्वतः पुस्तकलेखनाकडे फारशा गांभीर्याने का बघितले नाही याचे कदाचित ते एक समर्थनही असू शकेल. 'डंकेल आणि लेखी शब्दाचा मृत्युलेख' या शीर्षकाचा एक लेख त्यांनी 'शेतकरी संघटक'मध्ये लिहिला होता (१७ जून १९९३), प्रत्यक्षात डंकेल प्रस्ताव फारच थोड्या विद्वानांनी वाचला होता, पण ज्यांनी डंकेल प्रस्ताव कधी वाचलाच नव्हता, असेही अनेक तज्ज्ञ केवळ आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्या प्रस्तावाला डोळे मिटून कसा विरोध करत आहेत, याविषयी त्या लेखात जोशींनी लिहिले होते.
 त्या लेखाच्या शेवटी जोशींनी लिखित शब्द मेला असे त्यांना का वाटते, हे दाखवणारा एक प्रसंग सांगितला होता. ते लिहितात,

माझ्या नात्यागोत्यातील कुटुंबांत माझ्या कामासंबंधी कौतुक तर सोडाच, पण जिज्ञासाही नाही. माझ्या उपस्थितीत शेती, शेतकरी आणि तत्संबंधी विषय कटाक्षाने टाळण्याचा शिष्टाचार सगळे जण पाळतात. कुटुंबातील एक दुःखद घटना म्हणून माझ्याकडे सगळे पाहतात. पण परवा एकदम बदल झाला. महाविद्यालयात जाणारी माझी एक भाची थोड्या दिवसांपूर्वी मला पाहिल्याबरोबर तिच्या शाळेत जाणाऱ्या भावाला म्हणाली, 'परवा (टीव्हीवर) 'परख'मध्ये पाहिले ना, ते हे अंकल! त्यांचा ऑटोग्राफ घे!' लिखित शब्दाचा यापेक्षा अधिक निश्चयात्मक मृत्युलेख काय असू शकेल?

 नात्यागोत्यातला हा अनुभव खरे तर अनेक लेखकांना आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही!
 पण ह्या अनुभवावरून जोशींनी काढलेला निष्कर्ष मात्र नक्कीच नाकारायला हवा! कारण लिखित शब्दाला भवितव्य नसते, तर जगातील सर्वांत कार्यमग्न माणूस ज्यांना म्हणता येईल, त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाच पुस्तके लिहिण्यासाठी आपल्या अत्यधिक व्यग्र दिनक्रमातून वेळ काढलाच नसता.

 किशोरवयातच जोशींना असे वाटे, की या सर्व अनंत जगामध्ये एक काहीतरी असे सूत्र असले पाहिजे, की ज्या सूत्रामुळे जगातील सारे बदल घडून येतात, साऱ्या क्रांत्या घडतात आणि अशा त्या सूत्राचा वेध घेणारे एक पुस्तक लिहावे, अशी त्यांची तीव्र महत्त्वाकांक्षा होती. सगळ्या विश्वाचे रहस्य उलगडून दाखवणारे असे काहीतरी त्यांना लिहायचे होते.
 ते एकदा म्हणाले होते,
 "एखादा मोठा डोलारा उभा असावा पण त्याचा मूलाधार असलेली एखादी छोटीशी काडी हलवताच तो कोसळावा, या कल्पनेचं मला नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. मला लहानपणापासूनच असं वाटत आलं आहे, की जगातल्या सगळ्या घटनांना आधारभूत असा एखादा सिद्धांत आपण शोधला पाहिजे; असा सिद्धांत की ज्याद्वारे जगातील सगळ्या घटनांची संगती लावता येईल. मी एक मोठं पुस्तक लिहायला सुरुवात केली होती. त्याचं शीर्षक होतं, Theory of Revolutions."
 पोस्टखात्यात नोकरीला असताना १९६७ मध्ये ते सात महिन्यांसाठी पॅरिसला प्रशिक्षणार्थ गेले होते व त्यावेळी त्यांनी लिहिलेल्या इंग्रजीतील १६ हस्तलिखित पानांचा उल्लेख दुसऱ्या प्रकरणात आहे. ती पाने या संभाव्य पुस्तकाशी संबंधित असावीत असे वाटते, पण ते लेखन त्यांनी अर्धवटच सोडून दिलेले असल्याने त्याबद्दल निश्चित काही सांगता येणार नाही.
 त्यांची स्वतःविषयीची अपेक्षा किती उच्च होती, त्यांच्या स्वप्नांचा आवाका केवढा विशाल होता हे मात्र या पुस्तकाच्या एकूण संकल्पनेतून जाणवते. एक गमतीचा भाग म्हणजे ते ह्या उपरोक्त संकल्पित पुस्तकाबद्दल असेही म्हणाले होते, "या पुस्तकाची अर्पणपत्रिका मी आधीच लिहिली होती व ती खूप वैशिष्ट्यपूर्ण होती – to the one who inspired writing of this book."
 अर्थात ती व्यक्ती कोण होती हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही!
 जगावेगळे असे काहीतरी आपण लिहावे, जे वाचल्यावर 'अरे, इतके सगळे सोपे आहे? मग आपल्याला हे कसे नाही सुचले?' असे वाटून सगळे थक्क होतील अशी काहीतरी सैद्धांतिक मांडणी आपण करावी ही भावना त्यांच्या मनात अगदी पूर्वीपासून असल्याचे जाणवते व ती उतारवयातही कायम असावी. 'इंडिया' विरुद्ध 'भारत' ही त्यांची मांडणी किंवा 'शेतीमालाला रास्त दाम' ह्या एक-कलमी मागणीवरचा त्यांचा भर किंवा 'माणसाचा निरंतर शोध हा इतर कशाहीपेक्षा स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवण्याचा आहे' हा त्यांचा विचार, हे सारे त्या दृष्टीने सैद्धांतिक व मूलभूत स्वरूपाचेच आहे. आपल्या त्या मतांशी असलेली त्यांची बांधिलकी शेवटपर्यंत होती आणि अशी सूत्रबद्ध वैचारिक मांडणी आपण करू शकलो, याचा त्यांना खूप अभिमानही होता.

 त्यांच्या एका कादंबरीची सुरुवातीची वीस अप्रकाशित हस्तलिखित पाने अनपेक्षितपणे त्यांच्या कागदपत्रांत आढळली. मजकूर इंग्रजीत होता. हा काय प्रकार आहे, म्हणून कुतूहलाने वाचायला लागलो, तो पुरता रंगून गेलो. मराठीप्रमाणे जोशींचे इंग्रजीवरही प्रभुत्व होते. कागद पिवळट आहेत; अनेक वर्षांपूर्वी, नक्की केव्हा ते सांगता येणार नाही, त्यांनी ही कादंबरी लिहायला घेतली असावी.
 कादंबरीच्या पहिल्याच वाक्यात पुढे येते ते फुलो मुदोशी (Phulo Mudoshi) हे एक जगातल्या अनेक देशांत दबदबा असलेले व्यक्तिमत्त्व. Universal Newspapers Distributors Union (UNDU) ह्या एका आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे ते असिस्टंट डायरेक्टर जनरल आहेत. पुढच्याच परिच्छेदात फ्लॅशबॅकने फुलो नावाचा एक गरीब मुलगा आपल्यापुढे येतो. कथानक परदेशात कुठेतरी, एका नवस्वतंत्र देशात, घडणारे आहे.
 पहाटेची वेळ आहे. फुलो गाढ झोपला आहे आणि त्याची आई, 'ऊठ बाळ, कामावर जायची वेळ झाली तुझी' म्हणत त्याला उठवत आहे. शाळेत जायच्या आधी घरोघर पेपर टाकायचे काम तो करत असतो. पुढे त्यांच्या देशात सशस्त्र क्रांती होते, लष्कर सगळी सत्ता आपल्या ताब्यात घेते.
 लष्कराविरुद्ध भूमिगत राहून लढणारा एक क्रांतिकारक फुलोला भेटतो, काही गुप्त पत्रकांचे वाटप करायची जबाबदारी त्याच्यावर सोपवतो. सगळीकडे त्यावेळी संचारबंदी असते. पहाटेच्या अंधारात ती पत्रके घेऊन फुलो चालला असताना काही सैनिक त्याला बघतात. घाबरून फुलो पळत सुटतो. पण कुठे लपावे हे त्याला कळत नाही. एका मोठ्या बंगल्याच्या दाराशी येऊन तो थबकतो. ते घर एखाद्या युरोपियन माणसाचे वाटत असते. इथे आपल्याला आसरा मिळणार नाही हे त्याला लगेचच जाणवते. दुसरीकडे कुठे पळावे याचा विचार करत तो उभा असतानाच मागून हळूच बंगल्याचे दार उघडते, आतून एक हात बाहेर येतो, फुलोला आत खेचतो आणि अस्फुट आवाजात कोचाखाली लपायला सांगतो. विसावे पान इथे संपते!
 पुढे हाच फुलो स्वतःच्या हिमतीवर, जगभरातील वेगवेगळ्या देशांत घरोघर पेपर टाकणाऱ्या मुलांच्या एका आंतरराष्ट्रीय संघटनेत उच्चपदी पोचतो, असे लक्षात येते. मुळात ह्या मुलांची अशी एखादी आंतरराष्ट्रीय युनियन असू शकते ही कल्पनाच खूप वेधक वाटते. अशा युनियनच्या हाती किती मोठी ताकद असू शकेल तेही जाणवते; कारण हा व्यवसाय करणारे नसतील, तर जगभरातील वृत्तपत्रे वाचकांपर्यंत कधीच पोचणार नाहीत.
 हे टीव्ही किंवा संगणक यांच्या आधीच्या कालखंडातील कथानक आहे. सगळ्या बड्या वृत्तपत्रांच्या नाड्या ह्याच युनियनच्या हाती असतील, ही कल्पना थरारक वाटते. जोशींच्या अक्षरातील निळ्या शाईने लिहिलेली, जागोजागी सुधारणा केलेली, ए फोर आकाराची ही फक्त वीस पाने आहेत; पुढचा मजकूर उपलब्ध नाही. तो त्यांनी लिहिला की नाही, हेही कळायला मार्ग नाही. मला स्वतःला ती अर्धवट सोडून दिलेली कादंबरी पूर्ण झाली असती तर खूप आवडली असती; तिची भाषा व निवेदनशैली तर सुरेख वाटलीच, पण तिचा एकूण आवाकाही प्रचंड वाटला.

 त्यांना दोन इंग्रजी पुस्तके लिहायची होती. Metaphysics of Market (बाजारपेठेचे अध्यात्म) आणि Metaphysics of Leadership (नेतृत्वाचे अध्यात्म).
 पहिल्या पुस्तकात बाजारपेठेत सर्व संबंधितांचे हित आपोआप कसे साधले जाते याचे विवरण त्यांना अपेक्षित होते. मुक्त अर्थव्यवस्थेचा मुख्य प्रणेता मानला गेलेल्या अ‍ॅडम स्मिथने आपल्या 'वेल्थ ऑफ नेशन्स'मध्ये असे म्हटले आहे, की मांस विकणारा (बुचर), ताडी गाळणारा (ब्रुअर) आणि भट्टीत पाव भाजणारा (बेकर) हे काही परोपकारासाठी आपापली कामे करत नाहीत, स्वतःचे पोट भरण्यासाठीच ते आपापला व्यवसाय करत असतात; पण त्यांच्या कामातून आपल्याही गरजा भागतात, आपल्यालाही आपले जेवण मिळते. ("It is not from the benevolence of the butcher, the brewer, or the baker, that we can expect our dinner, but from their regard to their own interest.") हे घडते कारण एक कुठलातरी 'अदृश्य हात' ("an invisible hand") असतो, ज्याच्यामुळे स्वार्थ साधता साधताच आपोआपच परमार्थही साधला जातो; व्यक्तिगत गरजा भागवतानाच सामूहिक गरजाही भागतात.
 सामूहिक हित साधणाऱ्या या 'अदृश्य हाताचे स्पष्टीकरण करणारे पुस्तक लिहायची जोशींची इच्छा होती. बाजारपेठेत जेव्हा माल विकणारा व विकत घेणारा समोरासमोर येतात तेव्हा असेच काहीतरी त्यांच्यात घडते. मग तो प्रसंग अगदी आपण भाजीवाल्याकडून रोजची भाजी खरेदी करतानाचाही असू शकतो. किती किमतीच्या खाली वस्तू विकायची नाही, ह्याचा विचार विकणारा करत असतो आणि किती किमतीच्यावर ती खरेदी करायची नाही, याचा विचार खरेदी करणारा करत असतो. दोघेही समोरच्याला किती ताणणे शक्य आहे याचा मनातल्या मनात अंदाज घेत असतात. मग घासाघीस करता करता एक क्षण असा येतो, की आपण अती स्वस्तात वस्तू विकली असे दुकानदारालाही वाटत नाही व आपण वस्तूसाठी अवाच्या सवा किंमत मोजली असे खरेदी करणाऱ्यालाही वाटत नाही. दोघांचे असे समाधान होऊन जेव्हा व्यवहार होतो तेव्हा तो उत्तम व्यवहार असतो; तेव्हाची किंमत ही योग्य किंमतच असते. दिल्लीत बसून नियोजन मंडळाचे अधिकारी बाजारपेठेतील एखाद्या वस्तूची जी किंमत आपल्या हिशेबासाठी गृहीत धरतात, तो अंदाज नेहमीच चुकतो आणि या उलट बाजारातील अडत्यांचा किंमतीचा अंदाज अधिक बरोबर ठरतो. म्हणूनच सामूहिक निर्णयापेक्षा, संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयापेक्षा, पंचायतीने घेतलेल्या निर्णयापेक्षा एखाद्या व्यक्तीने घेतलेले निर्णय बरोबर असायची शक्यता अधिक असते. कारण निर्णय घेण्याची क्षमता एका व्यक्तीकडेच असते, समूहाकडे नसते. एखाद्या व्यक्तीकडेच विशिष्ट असे संवेदनापटल असते. त्यानुसार एखाद्या विशिष्ट आनंदासाठी किती किंमत चुकवणे योग्य होईल, तो कसा मिळवता येईल याचाही निर्णय ती व्यक्ती स्वतःपुरता घेत असते. दुसरी कुठली यंत्रणा तो निर्णय त्या व्यक्तीसाठी घेऊ शकत नाही (Arrow's Theorem).
 दोन व्यक्तींमधील संवादही ह्या संवेदनपटलामार्फत अचूक होतो. वुडहाउसच्या कादंबरीत एका इंग्लिश उमरावाच्या हवेलीत लग्नाप्रीत्यर्थ जमलेल्या प्रचंड गर्दीत आणि आसपासच्या गलबल्यातही दोन प्रेमिक केवळ नेत्रपल्लवीने आपल्या भेटीचे स्थळ व वेळ अचूक ठरवतात, त्याप्रमाणे! बाजारातील व्यवहाराबद्दल अशी काहीतरी जोशींची एकूण धारणा होती व ह्या कल्पनेचा त्यांना वेगवेगळ्या अंगांनी बराच विस्तार करायचा होता.
 एकदा हृदयविकाराच्या झटक्यानंतर प्रकृती सुधारण्यासाठी ते दोन महिने गुजरातमध्ये विश्रांती घेत होते. त्यावेळी रोज संध्याकाळी ते फिरायला बाहेर पडत व एका विशिष्ट जागी जमलेल्या श्रोत्यांसमोर 'बाजारपेठेचे अध्यात्म' ह्या विषयावर व्याख्यान देत. ही सारी मांडणी त्यांच्या मनातही तशी धूसरच होती, पण ती नीट तयार व्हावी म्हणूनच त्यांनी हा व्याख्यानांचा घाट घातला होता. एखाद्या विषयावरील आपले विचार पक्के व्हावेत यासाठी ते खूपदा त्या विषयावर व्याख्याने द्यायचा मार्ग अवलंबत. त्या व्याख्यानांचे ध्वनिमुद्रणही झाले होते; पण त्यांचे शब्दांकन उपलब्ध नाही. 'बाजारपेठेचे अध्यात्म' हे पुस्तक शेवटपर्यंत त्यांच्या हातून लिहून झाले नाही.

 'नेतृत्वाचे अध्यात्म' या दुसऱ्या संकल्पित पुस्तकात नेत्याला समाजच स्वत:च्या कालसापेक्ष गरजांनुसार पुढे आणत असतो, नेत्याच्या कर्तृत्वामुळे वा काही अंगभूत गुणांमुळे तो नेता बनतो असे नाही, असे काहीतरी त्यांना सांगायचे होते. ते एकदा मला सांगत होते,
 "मी फार चांगले विचार मांडतो म्हणून शेतकरी माझ्याकडे आकर्षित होतात, असे जर कोणी म्हणत असेल, तर ते सपशेल चुकीचे आहे. कारण ज्याने कधीच कुठली वैचारिक मांडणी केलेली नाही, अशा टिकैतसारख्या नेत्याकडेही तेवढ्याच मोठ्या संख्येने शेतकरी आकृष्ट होताना दिसतात. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत समाजच आपल्याला हवा तो नेता निवडतो. आपल्याला हव्या असलेल्या गुणांचे आरोपण तो त्या नेत्यावर करत असतो व त्यातून त्या नेत्याची समाजाला प्रिय अशी प्रतिमा घडत जाते. प्रेमात पडल्यावर समोरची व्यक्ती आपोआपच सुंदर दिसू लागते, तसा हा प्रकार असावा."
 अनेक मोठ्या व्यक्तींमध्ये काहीतरी उणिवा असतात, रोग असतात, आणि त्यांचा उपयोग नेतेपदाकडे वाटचाल करताना त्यांना आपल्या गुणांपेक्षाही अधिक होतो, असेही ते अनेक उदाहरणे देऊन सांगत, महात्म्यांना आपण उगाचच फार महत्त्व देतो, समाजाचे कल्याण महात्म्यांपेक्षा तथाकथित दुरात्म्यांनीच अधिक केले आहे, लुटालूट करणाऱ्या चेंगीज खान आणि नादिर शहा यांनीही देशादेशांतील भिंती उद्ध्वस्त करायचे फार मोठे काम केले आहे व त्यातून जग जवळ आणायला प्रेरणाही दिली आहे असेही ते म्हणाले होते.
 एखाद्याला किती यश मिळणार हे त्याच्या त्याच्या नशिबावर सर्वाधिक अवलंबून असते असेही ते मानत. आपण नेहमी अपयशाचेच धनी होणार, आपल्या कामाचे उचित श्रेय आपल्याला कधीच मिळणार नाही, ही लहानपणापासूनचीच त्यांची भावना होती. त्यांना असलेल्या या श्रेयविहीनतेच्या जाणिवेबद्दल मागे लिहिलेलेच आहे.
 याही कल्पनेचा पुरेसा विस्तार त्यांच्या मनात झाला नसावा. स्वतःच्या जीवनाचे सिंहावलोकन करताना जाणवणाऱ्या काही गोष्टी त्यांना या दुसऱ्या पुस्तकात मांडायच्या होत्या असे वाटते; नेमके सांगणे अवघड आहे, पण हे पुस्तक लिहायचे राहून गेले एवढे मात्र खरे.

 त्यांचे लेखन वाचताना आणखी एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे अनेकदा अगदी आगळ्यावेगळ्या पण मौलिक अशा मुद्द्यांना ते स्पर्श करतात, त्यातून सजग वाचकाचे कुतूहल जागृत होते, पण मग त्या मुद्द्यांचा पुरेसा विस्तार न करता, ते अर्धवटच सोडून जोशींचे निवेदन पुढे सरकते. उदाहरणार्थ, मुसलमान आक्रमकांनी देवळे का लुटली याची त्यांची कारणमीमांसा, किंवा रशियन क्रांती ही कम्युनिस्टांपेक्षा पहिल्या महायुद्धात पराभूत होऊन मॉस्कोला परतणाऱ्या बेधुंद रशियन सैनिकांनी केली हे त्यांचे मत, किंवा इतिहासावर महापुरुषांचा फारसा परिणाम होत नाही हा त्यांचा मुद्दा, अधिकाधिक उत्पादन हे उपभोग वाढवण्यासाठी नसून निवडीसाठी पर्याय वाढावेत म्हणून असते ही त्यांची भूमिका. वाचकांची जिज्ञासा चाळवणाऱ्या, पण पुरती न शमवणाऱ्या, अशा वेधक उल्लेखांची ही यादी पुष्कळ वाढवता येईल.
 या व अशा इतरही अनेक विषयांवर त्यांनी विस्ताराने लिहायला हवे होते. पुरेसा वेळ देऊन व पुरेशा गांभीर्याने लिहायला हवे होते. ते चांगल्याप्रकारे वाचकांपुढे यायला हवे होते. त्यांतले निदान काही इंग्रजीतही असायला हवे होते. मराठी भाषेच्या सीमा ओलांडून जागतिक स्तरावर वाचले जावे असे त्यांच्याजवळ खूप काही होते.
 चळवळीच्या धामधुमीत त्यांच्या हातून फारसे लेखन झाले नाही हे समजण्यासारखे आहे. कारण शेवटी लेखकाला लेखन करतानातरी स्वतःला इतरांपासून तोडून घ्यावे लागते, बाकी सारे विसरून तासनतास लेखनसमाधीत रंगून जावे लागते, तरच त्या लेखनाला उत्कटता, एकतानता लाभते. त्यांच्या लेखनात जाणवणारा एकाग्रतेचा अभाव, आणि एक प्रकारचा विस्कळीतपणा हा त्या धकाधकीच्या जीवनातूनच आलेला असावा. आयुष्यातील शेवटची काही वर्षे जरी त्यांनी पूर्णवेळ लेखनाला दिली असती, तर काही उत्तम पुस्तके वाचकांना मिळाली असती. पण आवश्यक ते प्राधान्य जोशी लेखनाला देऊ शकले नाही. 'भारतातला शेतकरी कर्जमुक्त झालेला मला पाहायचा आहे' हाच ध्यास त्यांना शेवटपर्यंत होता, शेवटच्या काही वर्षांतही शेतकरी संघटनेचीच काळजी होती. प्रकृतीचीही फारशी साथ नव्हती हेही खरेच आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्यनिर्मितीच्या अनेक शक्यता अमूर्तच राहिल्या.

 १९९१नंतर जेव्हा त्यांनी शेतकरीलढ्याचे पुढचे पाऊल म्हणून नव्या दिशांचा शोध घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी आपले विचार फक्त शेतकरीवर्गापुरते न राहता सर्व समाजापुढे येणे आवश्यक आहे ही जाणीव त्यांना झाली. नव्वदच्या दशकात बदलत्या परिस्थितीचा वेध घेताना त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर बरेच लेखन केले. या साऱ्यातून त्यांनी महत्त्वाचा असा वैचारिक वारसा भावी पिढ्यांसाठी मागे ठेवला आहे. त्या समृद्ध वारशातील काही घटक इथे नोंदवणे आवश्यक वाटते.
 एक तर पहिले संपत्तिनिर्माण हे शेतीतच झाले आणि त्यानंतरचा सगळा इतिहास हा शेतीतील ह्या संपत्तीची जी लूट होत गेली त्या लुटीचा इतिहास आहे हे त्यांचे प्रतिपादन. शेतकरी आंदोलनाचा ती मांडणी हा पायाच होता व त्याबद्दल नवव्या प्रकरणात विस्ताराने लिहिलेले आहे.
 प्रस्थापित कल्पनांना धक्का देणारे इतरही अनेक विचार जोशींनी मांडले. उदाहरणार्थ, ते म्हणतात की आर्थिक विकास ही गर्भाच्या वाढीप्रमाणे सहजतः होणारी बाब आहे; त्यात घिसाडघाई करता उपयोगी नाही. जीवशास्त्रीय विकासाप्रमाणेच आर्थिक विकास ही निसर्गतः होणारी गोष्ट आहे. त्यासाठी कोणालाही काहीही वेगळे करण्याची गरज नाही; जो तो त्याचा त्याचा विकास करतच असतो. आर्थिक विकास ही माणसाची निसर्गसिद्ध प्रेरणा आहे. लहान मुलाला मोठे करण्याकरिता त्याला आडवे-उभे असे काही ताणावे लागत नाही! गरिबी दूर करण्याच्या नावाखाली ती वाढवणारे तुमचे नियोजन बंद करा, लोक आपोआपच आपापला विकास साधतील. "गरिबाच्या छाताडावरून तुम्ही उठा, म्हणजे मग तो स्वतःच उभा राहील आणि आपली प्रगती करून घेईल," हे गांधीजींचे उद्गार जोशी अनेकदा उद्धृत करत.
 सरकारने काय करावे आणि काय करू नये याविषयी जोशींची मते ठाम होती. त्यानुसार सरकारने मुख्यतः कायदा व सुव्यवस्था (law and order) प्रस्थापित करावी, कारण तेच खरे सरकारचे सर्वाधिक महत्त्वाचे काम आहे. ब्रिटिशांनीही आधी ठग व पेंढाऱ्यांचा पक्का बंदोबस्त केला, 'काठीला सोने बांधून खुशाल काशीस जावे' इतका विश्वास जनतेमध्ये निर्माण केला व मगच रस्ते- रेल्वे- टपालसेवा- महसूल यंत्रणा वगैरेंची उभारणी सुरू केली ह्याकडे ते लक्ष वेधत. बाकी गरिबी हटवण्याचे वगैरे प्रयत्न सरकारने लोकांवरच सोपवावे; फक्त त्यात अडथळे निर्माण करू नयेत, असे ते म्हणत.
 क्रांती कोणापासून सुरू होते याविषयीदेखील जोशींचे विचार प्रचलित धारणांपेक्षा अगदी वेगळे आहेत. आजपर्यंत असे सांगण्यात आले, की जो सर्वांत जास्त शोषित आहे, तो उठून क्रांती करतो. प्रत्यक्षात सर्वाधिक शोषण ज्याचे होते त्याच्यात उभे राहायचेही बळ उरलेले नसते. त्याची प्रतिकार करण्याची सगळीच शक्ती कुपोषणामुळे व मानसिक दुबळेपणामुळे निघून गेलेली असते. अत्यंत हलाखीत जगणारी माणसे आपण पाहिली तर ती क्रांतीच्या तयारीत असल्याचे अजिबात दिसत नाही. उलट शोषकांकडे ती दयेची भीक मागताना दिसतात. ज्याला क्रांती करायची आहे त्याच्याजवळ काही किमान स्वास्थ्य लागते, काही किमान साधनसामग्री लागते. भाकरी न मिळाल्यामुळे माणसाला होणाऱ्या वेदना ह्या लोणी न मिळालेल्यांपेक्षा जास्त असतात, असे चुकीचे गृहीत धरून 'शोषितांच्या क्रांतीचा' फसवा व प्रचारकी सिद्धांत मांडला गेला. पण इतिहासात शिरल्यावर कळते, की आजपर्यंत घडवून आणलेल्या क्रांत्या ह्या प्रामुख्याने ज्यांना लोणी मिळाले नाही त्यांनी घडवून आणल्या होत्या! ज्यांना भाकरी मिळाली नाही ते तसेच अन्याय व उपासमार सहन करत दिवस रेटत राहिले. बंगालच्या दुष्काळात ज्यांना भाकरीही मिळाली नाही असे हजारो शोषित शेतकरी धान्याच्या सरकारी गोदामासमोर जाऊन उपाशी मेले; पण त्यांनी गोदाम फोडायचा प्रयत्न केल्याची कुठेही नोंद नाही. क्रांतीचा अग्रदूत म्हणजे शोषित, हा समाजमनात स्थिर झालेला गैरसमज जोशींनी दूर केला.

 १५ ऑगस्ट १९९७ रोजी भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली. पण पन्नास वर्षांपूर्वी देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशात जे प्रचंड उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते त्याचा मागमूसही या सुवर्णमहोत्सवी क्षणी नव्हता. या पन्नास वर्षांत आपण जी काही समृद्धी मिळवली, ती रुपयाच्या घसरलेल्या मूल्यामुळे आणि लोकसंख्या चौपट झाल्यामुळे नगण्य ठरली; सत्तेचाळीसच्या तुलनेत रुपयाचे मूल्य अवघे तीन पैसे एवढे उरले होते, तर लोकसंख्या पस्तीस कोटीहून शंभर कोटीच्या पुढे गेली होती. त्यामुळे उत्पादनातील वाढीचे सरकारी कागदपत्रांतील दावे अतिशयोक्त किंवा फसवे होते. पन्नास वर्षांपूर्वी भारताच्या तुलनेत मागासलेले असलेले इंडोनेशिया, मलेशिया यांसारखे कितीतरी देश या काळात आपल्या खूप पुढे निघून गेले. याची जाणीव सामान्य जनतेला आणि राज्यकर्त्यांनाही होती. म्हणूनच यावेळी त्यांच्यात जरासुद्धा उत्साह नव्हता; सगळा सोहळा मारूनमुटकून जमवून आणलेला. संसदेच्या खास भरवलेल्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनाला जेमतेम शंभर खासदार सभागृहात हजर होते, त्यावेळी कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसलेल्या खासदारांची संख्या त्याहून अधिक होती! त्यावेळी सभागृहात झालेल्या चर्चेबद्दल जोशी म्हणतात,
 "शाळकरी मुलांना स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांविषयी निबंध लिहून आणायला सांगितले असते, तरी ते खासदारांच्या वक्तव्यापेक्षा उजवे झाले असते. भारताच्या अर्थव्यवस्थेवरील कोणत्याही क्रमिक पुस्तकात सहज उपलब्ध होणारी, शेकडो वेळा वापरून गुळगुळीत झालेली आकडेवारी आणि माहिती, आणि आपण काही भलेमोठे सांगत आहोत असा आवेश आणि दंभ!"
 या सगळ्या पार्श्वभूमीवर १०,११,१२ डिसेंबर १९९८ या काळात अमरावती येथे शेतकरी संघटनेने एक जनसंसद भरवली होती. आत्मचिंतन हा त्यामागचा उद्देश. त्या निमित्ताने स्वातंत्र्य का नासले? हे एक ११०-पानी पुस्तक जोशींनी प्रकाशित केले. त्यातील त्यांचे विश्लेषण विचारप्रवर्तक आहे. गेल्या पन्नास वर्षांत जे काही अभद्र घडत गेले त्याची मुळे स्वातंत्र्यपूर्व काळातच कशी दिसतात हे त्यांनी दाखवले आहे.
 शरद जोशींचे अनेक विचार त्यांच्या कार्यातही प्रकर्षाने प्रतिबिंबित झाले आहेत; त्यातून त्यांच्या कार्याला एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण आपोआपच लाभते. त्यांच्या कार्यातील व आनुषंगिक मांडणीतील पाच वैशिष्ट्ये कायम प्रेरणादायी ठरतील अशी आहेत. ही पाच वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या वैचारिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे.

 पहिले वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची निर्विवाद जातिधर्मप्रांतभाषानिरपेक्षता. अन्य नेत्यांपासूनचे त्यांचे हे एक प्रमुख वेगळेपण.
 मिशनच्या शाळेत शिकलेले वडील आणि पंढरपूरची असून बडव्यांची चीड असलेली आई ह्यांच्या पार्श्वभूमीमुळे जोशी कुटुंबात ब्राह्मणी कर्मठपणा किंवा ब्राह्मण्याचा अहंकार असा कधीच नव्हता. स्पृश्यास्पृश्यतातर अजिबात नव्हती. जोशी म्हणतात, "गायकवाड नावाचा एक हरिजन वर्गमित्र पाणी प्यायचं झालं, तर फक्त आमच्या घरी येत असे." त्या काळाचा विचार केला तर त्यांचे आईवडील तसे पुरोगामीच होते; त्यांचे संस्कार या जातिधर्मनिरपेक्षतेला कारणीभूत होतेच; पण शिवाय त्यांच्या सखोल विचारांचाही हा एक परिपाक होता.
 दरवर्षी आपण धर्म बदलायचा आणि वेगवेगळ्या धर्मांचा अनुभव घ्यायचा असाही त्यांचा लहानपणी इरादा होता; अर्थात प्रत्यक्षात तो आणणे शक्य नव्हते, पण मुळात असा विचार त्यांनी करावा याचेही नवल वाटते. पुढे मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात शिक्षणासाठी गेल्यावर व मुख्य म्हणजे तिथल्या सिडनमसारख्या परप्रांतीयांचा भरणा असलेल्या कॉलेजात सहा वर्षे काढल्यावर जातिधर्माचा कुठलाच विचार त्यांच्या मनात राहिला नाही. हे त्यांचे व्यक्तिवैशिष्ट्य पुढे शेतकरी संघटनेतही उतरले.
 पण त्याचबरोबर ब्राह्मण घरात जन्मल्याचे काही फायदे आपल्याला निश्चित मिळाले हे ते मानत. ब्राह्मण्याचे म्हणून काही विशिष्ट जीन्स आपल्यात आले असे नाही, पण ब्राह्मण्याचे म्हणून काही विशिष्ट संस्कार आपल्यावर झाले हे ते कबूल करतात. उदाहरणार्थ, घरी रोज संध्याकाळी सगळ्यांनी जमिनीवर मांडी घालून बसायचे व मोठ्याने रामरक्षा म्हणायची अशी पद्धत होती. आई दर सोमवारी किंवा एकादशीच्या दिवशी शिवलीलामृताचा एखादा पाठ वाचायची. यातून पाठांतर वाढले, उच्चार शुद्ध झाले, वाचनाची गोडी निर्माण झाली. एखादी गोष्ट नेमाने, नियमितपणे करण्याचे महत्त्व अंगी बाणले. ते म्हणतात.
 "अभ्यास, वाचन, पाठांतर करणे यात काहीतरी फायद्याचे आहे, अशी जाणीव एक ब्राह्मण मुलगा म्हणून माझ्या मनामध्ये तयार झाली. त्याचा मला जो फायदा मिळाला, तो मागासवर्गातल्या एखाद्या श्रीमंत विद्यार्थ्यालासुद्धा मिळणे शक्य नव्हते."
 ह्या जाणिवेमुळे जातिधर्मनिरपेक्ष राहूनही अन्य काही पुरोगाम्यांप्रमाणे त्यांनी धार्मिक परंपरांची कुचेष्टादेखील कधी केली नाही; ह्या परंपरेतूनही आपल्याला काहीतरी उपयुक्त मिळाले आहे व इतरांनाही तसे मिळू शकते याची त्यांना जाणीव होती.
 स्थानिक अस्मिता कुरवाळण्याच्या या काळातही त्यांनी कुठल्याही प्रकारचा जातीय, धार्मिक, प्रांतिक वा भाषिक अभिनिवेश बाळगला नाही. अशा अभिनिवेशांतून भारतीय जनतेत नेहमीच पद्धतशीररीत्या फूट पाडली गेली आहे. जोशी म्हणतात,

जाती, भाषा, धर्माचे क्षुद्र वाद हे देशाची विकासाची गती खुंटल्यामुळे निर्माण होतात. ओढ्याला तुंबारा पडला, की शेवाळे माजते, किड्यांची वळवळ, हाणामारी सुरू होते. किड्याकिड्यांतील वाद सोडवू म्हटल्यास सुटणार नाहीत. किंबहुना ते वाद वाढवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होतो. विकासाचा खुंटलेला मार्ग खुला करणे, तुंबारा काढणे हा क्षुद्रवाद संपवण्याचा एकच रस्ता आहे.
देशातली गरिबी हटली, देशातील सर्व घटकांचा विकास होत राहिला तर यांपैकी एकही भांडण होणार नाही. आपल्या देशातले एखादे राज्य म्हणते, की आम्हांला फुटून जायचे आहे. अमेरिकेतले एखादे संस्थान असे म्हणते का? मुळीच नाही. तिथेसुद्धा अनेक धर्मांची, पंथांची माणसे आहेत; अनेक राष्ट्रांतून आलेली आहेत, पण तिथे असे कुणी म्हणत नाही. उलट, अमेरिकेतील संस्थान असणे ही प्रतिष्ठेची, सन्मानाची गोष्ट समजली जाते. अशी भावना आपल्याकडे निर्माणच होऊ शकली नाही, कारण आम्ही गरिबी हटवू शकलो नाही.

(समाजसेवेची दुकानदारी नको! अंतर्नाद, फेब्रुवारी २००७)

 स्थानिक अस्मितेशी निगडित कुठलाच अभिनिवेश जोशींमध्ये अजिबात नव्हता. पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठाचे संस्थापक मनोहर आपटे यांच्यावर 'अंगारमळा' मध्ये लिहिलेल्या लेखात ते शेवटी म्हणतात,

असल्या लोकविलक्षण प्रज्ञावंताच्या मनात स्वदेश, महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी संत यांच्याबद्दल अतिरेकी म्हणावा इतका जिव्हाळा होता. या कोणत्याच गोष्टीबद्दल मला फारशी कदर नाही. ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पसायदान म्हटले जाते आणि त्यावेळी सर्व सभा उठून उभी राहते हे मला हास्यास्पद वाटते.

 असेच दुसरे एक उदाहरण. कृष्णा खोरे पाणी वाटपात महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे व आंध्र प्रदेशचा जास्त फायदा करून दिला गेला आहे अशी एक भावना महाराष्ट्रात होती. अशा प्रश्नांवर सर्व पक्षभेद विसरून आपल्याकडे राज्यातील सर्व लोक एक होतात असा अनुभव आहे. या प्रश्नावर महाराष्ट्राची बाजू केंद्रापुढे जोरकसपणे कशी मांडता येईल याचा विचार करण्यासाठी १९८५च्या सुमारास तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत या विषयाचे एक तज्ज्ञ आणि महाराष्ट्र सरकारचे एक प्रमुख अभियंता जांभळे आपली अभ्यासपूर्ण मांडणी करू लागले. नंतर त्यावर आपले मत व्यक्त करताना जोशी म्हणाले होते, "या चर्चेत वा मांडणीत मला रस नाही. भारतातील कोणत्याही शेतकऱ्याला ते पाणी मिळाले तरी त्यात माझ्या मते काही फरक पडत नाही." त्यावेळची जोशी यांची ही प्रतिक्रिया जांभळे यांना धक्कादायक वाटली होती; पण जोशींची एकूण वैचारिक बैठक पाहता ही प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक अशीच होती.

 शरद जोशींचे दुसरे वैचारिक वेगळेपण म्हणजे त्यांची ठाम अर्थवादी भूमिका. या भूमिकेमुळेच त्यांनी शेतकऱ्यांना शेतीकडे एक व्यवसाय म्हणून बघायला शिकवले. शेतीच्या संदर्भात हा निखळ अर्थवादी विचार जोशींनीच प्रथम मांडला. उगाचच 'काळी आई', 'शेतकरीधर्म' असले भावुक शब्दप्रयोग करून ते शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळले नाहीत, किंवा त्यांनी शेतकऱ्यांचा बुद्धिभेद केला नाही. शेती हा एक व्यवसाय माना, ह्याच्यातून तुम्हाला पुरेशी आर्थिक प्राप्ती व्हायलाच हवी; ती होत नसेल तर ह्यातून बाहेर पडून तुम्ही दुसरा कुठलातरी व्यवसाय करायला हवा,' असे ते म्हणत.
 ही दृष्टी म्हणजे जोशींच्या एकूण अर्थवादाचा आणि त्यांच्या स्वतंत्रतावादाचाच एक आविष्कार होता आणि ह्याच भूमिकेतून त्यांनी खुल्या अर्थव्यवस्थेचाही सतत पाठपुरावा केला.
 बंदिस्त अर्थव्यवस्थाच ज्यांच्या अंगवळणी पडली आहे त्यांना हे खुलीकरण सुरुवातीला अवघड जाईल याची जोशींना पूर्ण कल्पना होती. चीनमधल्या एका प्रथेचे उदाहरण ते या संदर्भात देत. एकेकाळी चीनमध्ये मुलींची पावले लहान असणे हे सौंदर्याचे लक्षण मानले जाई. त्यामुळे मुलगी जन्मताच तिचे पाय पट्ट्यांनी बांधून ठेवले जात. साम्यवादी क्रांतीनंतर ह्या प्रथेवर बंदी घालण्यात आली. इतकी वर्षे ज्यांचे पाय बांधून ठेवले होते, त्या साऱ्यांच्या पायाच्या पट्ट्या सोडल्या गेल्या. त्यावेळी त्या बदलाला त्या महिलांचाच जोरदार विरोध झाला. कारण प्रथमच त्यांच्या पायांतून जेव्हा रक्त मोकळेपणे वाहू लागले, आखडलेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या झाल्या, तेव्हा त्या वेदना महिलांना सहन होईनात; कारण त्या नसांना वाहत्या रक्ताची सवयच नव्हती. पुढे अर्थातच त्या वेदना नाहीशा झाल्या व मग पट्ट्या सोडल्याचे व पाय मोकळे झाल्याचे अवर्णनीय सुख आयुष्यात प्रथमच जाणवू लागले. जोशींच्या मते खुलीकरणाच्या ह्या सुरुवातीच्या काळात भारतीयांची स्थिती त्या चिनी महिलांसारखीच आहे. 'नको ते खुलीकरण, नको तो जगभरातून येणारा माल, नको ती स्पर्धा, त्यापेक्षा आपले जुने लायसन्स-परमिट राज्यच बरे होते' असे आपल्याला वाटते. पण हळूहळू आपल्याला ह्या खुलीकरणाची सवय होईल, त्याचे असंख्य फायदे दिसू लागतील, कारण मुळात व्यापार बंदिस्त करणाऱ्या ह्या भिंतीच कृत्रिम आहेत, त्या पाडून टाकणे हेच नैसर्गिक आहे, खऱ्याखुऱ्या खुलीकरणातूनच समृद्धी येईल ह्याविषयी त्यांचा खात्री होती. ह्यात आपला आर्थिक फायदा आहे हे जेव्हा लोकांना दिसू लागेल तेव्हा आपोआपच ते खुलीकरणाचे समर्थन करू लागतील, कारण शेवटी आपला आर्थिक फायदा ज्या व्यवस्थेत होतो तीच व्यवस्था माणसाला हवीशी वाटायला लागते.
 हा अर्थवादी दृष्टिकोन ते जीवनाच्या इतरही अनेक क्षेत्रांना लागू करतात. उदाहरणार्थ, माणसाच्या वागण्याच्या संदर्भात ते म्हणतात,
 "आपण अर्थशास्त्रीय विचार करताना पहिल्यांदा एक गोष्ट गृहीत धरायची आहे, की प्रत्येक गोष्टीचं कारण हे आर्थिक असतं. अर्थकारणानं स्वभाव ठरतात, स्वभावानं अर्थकारण ठरत नाही. अगदी पुण्यामध्ये ब्राह्मण घरात जन्मलेले आणि लहानपणी स्नानसंध्या केलेले लोक अमेरिकेत गेल्यावर पहिल्याच आठवड्यात गोमांसभक्षण कसं करू लागतात, हे मी पाहिलेलं आहे. ज्यांच्या आयुष्यात कधीही काही विशेष घडलेलं नाही, तेही कसे बदलतात हेही पाहिलेलं आहे. याला कारण त्यांचं अर्थकारण बदललेलं असतं. अमुक एका माणसाचा स्वभाव असा का, हे समजून घ्यायचं असेल, तर त्याचा स्वभाव तसा असल्याने किंवा तसा नसण्याने त्याचा काय फायदा किंवा काय तोटा होणार आहे, हे समजून घ्यावं लागेल. जसं वागल्याने आपला अधिक फायदा होणार असतो, तसं वागणं ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. माणसाचं विचार करण्याचं इंद्रिय मेंदू हे नसून खिसा हे आहे."

 शरद जोशींचे तिसरे वैचारिक वेगळेपण म्हणजे त्यांनी शेतीप्रश्न हा फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अशा प्रकारे त्याच्याकडे न पाहता, हा एकूण देशाचे दारिद्र्य दूर करण्याचा प्रश्न आहे अशी मांडणी केली. एकूण देशाच्या व्यापक परिप्रेक्ष्यात शेतकऱ्याचा प्रश्न पूर्वी कधी मांडला गेला नव्हता.
 त्यांच्या मते शेतीमालाला वाजवी भाव मिळाला, की शेतकऱ्याच्या हातात अधिक पैसा येईल. हाती पैसा आला, की शेतकऱ्याला अधिक चांगले जगावेसे वाटेल. आजच्यापेक्षा अधिक चांगले खाणे, पिणे, कपडे घालणे, घर बांधणे, ते विविध वस्तू आणून सजवणे, प्रवास करणे, शिक्षण घेणे, साहित्य-कलांचा आस्वाद घेणे व एकूणच चांगल्या प्रकारे जगणे त्याला जमेल. पुन्हा हे समृद्धीचे चक्र फक्त त्याच्या व्यक्तिगत जीवनापुरते सीमित राहत नाही. आपली बचत तो गावातच छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यात गुंतवू शकेल. गावातील सर्व तरुणांनी रोजगारासाठी शहराकडे धाव घ्यायची आणि तिथल्या बेसुमार गर्दीत आणखी भर घालायची हा प्रकार संपेल. गावातच त्या तरुणाच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. यातूनच गाव समृद्ध होईल आणि अंतिमतः देश समृद्ध होईल. शेतकरी समृद्ध होणे म्हणजेच देश समृद्ध होणे.
 शेतीतून व्यापक आर्थिक विकास कसा होतो याचे उदाहरण म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या म्हादबा मिस्त्री यांचा उल्लेख केला आहे. उसाचे गुऱ्हाळ चालवून आणि गुळाची विक्री करून जो पैसा आला, त्यातूनच म्हादबा मिस्त्री उभे राहिले; जोशींना अभिप्रेत असलेल्या ग्रामीण औद्योगिकीकरणाचे ते उत्तम प्रतीक आहे.
 पंजाबमध्येही हेच घडले. तेथील उद्योगांत सरकारी गुंतवणूक अशी जवळजवळ अजिबात नाही. शेतीतले पैसे गुंतवून शेतकऱ्यांच्या मुलांनी आपापल्या गावात छोटे-छोटे कारखाने उभारले, साधी स्वस्तातली लेथ मशीन्स बसवून उत्पादन सुरू केले. वाहतुकीचा, वाहनदुरुस्तीचा व इतरही असेच बारीकसारीक व्यवसाय सुरू केले. अशा असंख्य व्यक्तींनी घेतलेल्या स्थानिक पुढाकारांतूनच तेथील ग्रामीण भागाचे आर्थिक चित्र पालटायला सुरुवात झाली.
 ह्या संदर्भात त्यांनी दिलेले जपानचे उदाहरण लक्षणीय आहे. खुल्या अर्थव्यवस्थेकडे खुल्या मनाने ह्या आपल्या पुस्तकात ते म्हणतात, की जपानी सरकार १९२१ सालापासून सातत्याने त्यांच्या शेतकऱ्याला भाताची जी आंतरराष्ट्रीय किंमत असते, तिच्या तिप्पट भाव देत आले आहे. त्याशिवाय, तांदळाचा एक दाणाही आयात होणार नाही असे त्यांचे धोरण आहे. त्यामुळे जपानी शेतकरी भातशेती करूनही चांगल्या प्रकारे जगू शकतो.
 हाच प्रकार चीनमधेही अलीकडच्या काळात घडून आला आहे. आज चिनी वस्तूंनी सगळ्या जगाची बाजारपेठ जणू काबीज केली आहे; इतके त्यांचे उत्पादनक्षेत्र (manufacturing) प्रबळ आहे. पण चीनने खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यावर सर्वांत आधी शेतीमालाला अधिक किंमत द्यायला सुरुवात केली. त्यातून निर्माण झालेल्या ग्रामीण समृद्धीतूनच त्यांची विकासदौड सुरू झाली. देशातील बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती शेतीविकासातूनच वाढू शकते व ही क्रयशक्ती वाढल्याशिवाय औद्योगिक किंवा इतर वाढीला बाजारपेठच उपलब्ध होत नाही. तीही वाढ मग खुंटते. आधी शेतीचा विकास. त्यातून स्थानिक बाजारपेठेतील वाढणारी मागणी व मग औद्योगिक विकास हाच क्रम जगभर राहिलेला दिसतो. म्हणूनच शेतीमालाला वाजवी भाव मिळायला हवा, ही शेतकरी संघटनेची मागणी केवळ शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नसून सगळ्या देशाचाच विकास त्यात सामावलेला आहे असे जोशी म्हणतात.

 शरद जोशी यांचे चौथे प्रमुख वैचारिक योगदान म्हणजे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा हिरिरीने आणि निःसंदिग्धपणे केलेला पुरस्कार.
 शेतकऱ्याच्या जीवनात असलेले तंत्रज्ञानाचे महत्त्व जोशींनी प्रथमपासून अधोरेखित केले आहे व त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या प्रशिक्षणाचा तो अगदी पहिल्या शिबिरापासून एक महत्त्वाचा भाग होता. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती (नोव्हेंबर १९८२) या पुस्तकात ते म्हणतात,

गेल्या फेब्रुवारीत चाकणच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांना आपला टोमॅटो अवघ्या तीन पैसे किलो भावाने विकावा लागला. अनेकांनी तर तोही भाव येत नाही म्हणून आपल्या टोमॅटोचे ढीगच्या ढीग रस्त्यावर फेकून दिले. नंतर फक्त चार महिन्यांनी तोच टोमॅटो दोन रुपये किलो झाला. पण नाशवंत पीक असल्याने शेतकरी चार महिने थांबू शकत नव्हता. इथे तंत्रज्ञान आपल्या उपयोगी पडू शकते. बाजारात चांगला भाव मिळेस्तोवर टोमॅटो शीतग्रुहांत साठवता आला पाहिजे. म्हणजे मग योग्य वेळी तो बाजारात आणून आपल्याला उत्तम भाव मिळू शकेल. तसेच त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचा रस, सॉस, सूप, चटणी करता आली पाहिजे. ते तयार खाद्यपदार्थ मग आपल्याला जगभर कुठेही विकता येतील.
हा केवळ तंत्रज्ञानाचा एक छोटासा भाग झाला. त्याचे खरे तर अनंत उपयोग शेतकरी करू शकतो. नैसर्गिक आपत्तीवरही तंत्रज्ञान मार्ग काढू शकते. आज मनुष्य चंद्रावर जाऊ शकतो किंवा जिथे दहा-दहा, बारा-बारा फूट बर्फ वर्षभर असते अशा सैबेरियासारख्या ठिकाणीसुद्धा चांगली शेती होऊ शकते. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग आपण करायला हवा.

 भारतातील साठाव्या दशकातील हरितक्रांती ही मुख्यत: मेक्सिकोमध्ये तयार केलेल्या गव्हाच्या-तांदळाच्या सुधारित बियाणांमुळे आणि खतांच्या सढळ वापरामुळेच शक्य झाली याविषयी त्यांच्या मनात तिळमात्र संदेह नव्हता. जनुकीय क्रांतीमुळे (जेनेटिकली मॉडिफाइड बियाणांमुळे) भारताचा तसाच फायदा होईल, असे ते म्हणतात. पण त्या बियाणामुळे रासायनिक खतांचा व केमिकल्सचा वापर अनावश्यक ठरतो, म्हणून अशा खतांचे व केमिकल्सचे निर्माते व व्यापारी काही मुठभर भारतीयांना हाताशी धरून आदळआपट करत आहेत, असे त्यांना वाटते. एका व्याख्यानात जोशी म्हणतात,

गेल्या वर्षी आंध्र प्रदेशात १,५०० हुन अधिक कापूस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एका लहानशा अळीने- बोंडअळीने- त्यांना आत्महत्या करायला लावली. बोंडअळीचा इतका प्रचंड हल्ला झाला, की कापसाचे पीक नाहीसे झाले आणि त्यांना आत्महत्या करणे भाग पडले. आता कापसाचे एक नवीन बियाणे असे निघाले आहे. की त्या बियाण्यातन उगवलेल्या रोपांवर बोंडअळी येतच नाही कपाशीच्या बियाण्याच्या विशिष्ट जनुकात काही बदल करून शास्त्रज्ञांनी हे बोंडअळीला प्रतिबंध करण्याची अंगची ताकद असलेले बियाणे तयार केले आहे. आज हे बियाणे अमेरिकेतील ३५ टक्के शेतकरी वापरतात. त्याचा परिणाम असा झाला, की तेथील कापसाचे उत्पादन वाढले आणि औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे उत्पादनखर्चही कमी झाला. आणि त्यामुळे पहिल्यांदा अशी परिस्थिती तयार झाली आहे, की कापसाचा जागतिक बाजारपेठेतला भाव हिंदुस्थानातील कापसाच्या भावापेक्षा कमी आहे. हे घडले याचे कारण अमेरिकन शेतकऱ्यांनी हरित क्रांतीच्या पुढे पाऊल टाकून जनुक क्रांतीत भाग घेतला.

आपल्याकडे मात्र आपण या नवीन तंत्रज्ञानाच्या क्रांतीच्या बाबतीत हरित क्रांतीच्या वेळेपेक्षाही अधिक बेसावध आहोत. आपल्याकडचे थोर थोर विचारवंत, थोर थोर साहित्यिक, थोर थोर पत्रकार हे नवीन तंत्रज्ञानाने येणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे परमेश्वराविरुद्धचा कट आहे, ते पाप आहे, मनुष्यप्राण्याने असल्या गोष्टी करण्याच्या फंदात पडू नये अशी हाकाटी करतात. याच मंडळींनी, हिंदुस्थानात पहिल्यांदा आगगाडी आली तेव्हा विरोध केला. रासायनिक खते आणि औषधे यांनाही याच लोकांनी विरोध केला. नवीन कोणतीही गोष्ट आली, की त्याला विरोध करण्याची ही वृत्ती म्हणजे ज्ञानाला संकुचित करणारी वृत्ती आहे.

(माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कै. अण्णासाहेब शिंदे स्मृती व्याख्यान,
श्रीरामपूर, १२ जानेवारी २०००)

  तंत्रज्ञानातून अनेक समस्या निर्माण होतात याची अर्थातच त्यांना जाणीव होती, पण त्या समस्यांवर उत्तरेही अधिक प्रगत तंत्रज्ञानातूनच निघतील, इतिहासाची चक्रे उलटी फिरवणे वेडेपणा होईल यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. म्हणूनच निसर्गशेती हा आपल्यापुढचा पर्याय होऊ शकत नाही, त्यातून जगातील अब्जावधींचे पोट भरेल इतके उत्पादन होऊ शकत नाही व भोंगळपणे तसा आग्रह धरला तर जगात लाखो भूकबळी पडतील असे ते मानतात. तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेबद्दल इतरांचा आणि स्वत:चाही बुद्धिभेद होईल अशी भोंगळ मांडणी त्यांनी कधीही केली नाही.

 शरद जोशींचा पाचवा महत्त्वाचा वैचारिक वारसा म्हणजे त्यांनी शेतकऱ्याला दिलेला स्वाभिमान.
 त्यांनी आयुष्यभर पाठपुरावा केलेले स्वातंत्र्य व खुलेपण ह्या स्वभिमानाशीच जोडलेले आहे. 'मेंढरे म्हणून नव्हे, माणसे म्हणून जगा', हा त्यांचा कायम संदेश असायचा. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न त्यांनी स्वातंत्र्याची गुरुकिल्ली म्हणून हाती घेतला; कारण स्वातंत्र्यावरचा सर्वांत मोठा घाला गरिबी हा आहे व ती गरिबी बहुसंख्य शेतकरी असलेल्या आपल्या देशात शेतीमालाला वाजवी भाव मिळत नाही म्हणून आहे, अशी त्यांची धारणा होती.
 शेतकऱ्याच्या स्वाभिमानाची जपणूक जोशींनी अगदी प्रथमपासून जाणीवपूर्वक केली. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती या पुस्तकात ते म्हणतात :

आम्ही शेतकऱ्याला एकच सांगतो - हा माल पिकवण्यासाठी तू जितका खर्च करतोस, तितके पैसे जरी तुला मिळाले तरी तुला, तुझ्या पत्नीला किंवा मुलाबाळांना मोफत शाळा, मोफत दवाखाना, कर्जमाफी, निराधार अनुदान योजना असल्या कुठल्याही धर्मादायावर जगण्याची गरज नाही. आम्हाला फक्त आमच्या शेतीमालाचा रास्त भाव द्या! शेतकऱ्याजवळ थोडा पैसा साठू द्या! तो स्वतःच्या गावात चांगली शाळा काढून, चांगला शिक्षक नेमून अभिमानानं आपली मुलं तिथं शिकायला पाठवेल! शेतकऱ्याजवळ पैसा आला तर एमबीबीएस झालेले डॉक्टर आपण होऊन गावोगाव दवाखाने काढतील!

 शेतकऱ्यांना पोषक आहार पुरवणाऱ्या समाजसेवी उपक्रमांवरपण जोशी यांचा रोष आहे. ते म्हणतात,

सकस आहार वगैरे द्यायला आम्ही काय जनावरं आहोत का? आमच्या मालाला नीट भाव द्या, आम्ही आमचं काय ते विकत घेऊन खाऊ.

 सामाजिक कार्याविषयीची त्यांची मते खूप बोचरी आहेत, हे खरे पण त्यामागेदेखील कुठेतरी या कार्यात ते कार्यकर्ते 'देणारे' व सामान्य माणसे 'घेणारे' अशी स्वाभिमानाला बोचणारी भूमिका असते असे त्यांना वाटते व ती त्यांना पूर्णतः अस्वीकृत आहे.
 शेतकऱ्यांमध्ये जोशींनी जागवलेला हा स्वाभिमान केवळ अमोल असा होता. परभणी येथे भरलेल्या शेतकरी संघटनेच्या अधिवेशनाला जेव्हा कवी इंद्रजित भालेराव प्रथम गेले तेव्हाची त्यांची पहिली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. ते म्हणतात,

या अधिवेशनात मनात ठसलेली सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे, हातात नांगर धरलेला शेतकऱ्याचा प्रचंड मोठा कटआउट. तो आम्ही अजूनही विसरलेलो नाही. सार्वजनिक सभेच्या ठिकाणी शेतकऱ्याची एवढ्या मोठ्या सन्मानासह स्थापना झालेली आम्ही प्रथमच पाहत होतो. शेतकऱ्याची पोरं असणाऱ्या आम्हांला ती गोष्ट भावून गेली. शेतकरी संघटनेचा लाल बिल्लाही तेव्हापासूनच मनावर ठसलेला आहे. अजूनही हा बिल्ला कुणाच्या छातीवर पाहिला, की भावुक व्हायला होतं.

 "छातीवर हा लाल बिल्ला लावला, की आम्हाला कुठल्याही सभेत, कुठल्याही नेत्याला, अवघड प्रश्न विचारायचं धाडस कुठूनतरी येतं," असे शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रस्तुत लेखकाला सांगितले आहे. ह्या धाडसामागे केवळ लाल बिल्ला नव्हता, पुरती मशागत केलेली पक्की विचारसरणीही होती.
 शेतीमालाला वाजवी भाव ही मागणी करण्यामागे त्यांचे अंतिम उद्दिष्ट हेच होते, की शेतकऱ्याच्या हातात चार पैसे यावेत. ते झाले तरच आजचे त्याचे लाचारीचे जिणे संपून तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. तसे झाले तरच त्याचा स्वाभिमान वाढेल. जोशींच्या मते शेतीमालाच्या आंदोलनाचे सर्वांत मोठे फलित हेच आहे- शेतकऱ्याला अधिक स्वतंत्र करणे, त्याचा आत्मसन्मान वाढवणे. त्यासाठीच हवी कर्जमुक्ती, त्यासाठीच हवे बाजारपेठेचे आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य, त्यासाठीच हवा शेतीमालाला वाजवी दाम. शेतकऱ्याला त्याचा हा पिढ्यानुपिढ्या चिरडला गेलेला स्वाभिमान परत मिळवून देणे हे शरद जोशींचे फार मोठे योगदान आहे.
 राजू शेट्टी यांनी काढलेल्या नव्या संघटनेचे नावही त्यांनी 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' ठेवले; नावातच हा स्वाभिमान समाविष्ट केला, हे लक्षणीय आहे.

 आपल्या भाषणांतून आणि लेखांतून शरद जोशींनी जे विचारधन मागे ठेवले आहे, त्याचे खरे मूल्यमापन पुढच्या पिढीतच बहुधा होऊ शकेल. त्यांचा हा वैचारिक वारसा त्यांच्या आंदोलनाच्या वारशाइतकाच महत्त्वाचा आहे; त्यांनी भावी पिढ्यांसाठी मागे ठेवलेला मोठा खजिनाच आहे. भविष्यातही जेव्हा जेव्हा आपण नव्या दिशांचा शोध घेऊ. तेव्हा तेव्हा त्यांचे हे विचार आपल्याला उपयुक्त ठरणारे आहेत.