अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/सांजपर्व
सांजपर्व
शरद जोशींनी शेतीला सुरुवात केली तेव्हापासूनच्या त्यांच्या एकूण आयुष्याचे स्थूलमानाने तीन टप्पे दिसतात.
पहिला म्हणजे, १९७७ ते १९९० हा शेतीतील प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा, शेतकरी संघटना उभारण्याचा, वेगवेगळी आंदोलने करण्याचा, राजकारणात सहभाग घेण्याचा.
दुसरा टप्पा म्हणजे, उदारीकरणाचे धोरण सरकारने स्वीकारले, संघटनेच्या कामाला वेगळे आयाम द्यायची गरज निर्माण झाली, खुल्या अर्थव्यवस्थेचे त्यांनी हिरिरीने समर्थन केले, स्वतंत्र भारत पक्षाची निर्मिती केली तो सगळा १९९१ ते २००० पर्यंतचा.
आणि तिसरा टप्पा म्हणजे, २००१ ते २०१६ मध्ये हे जग सोडून जाईस्तोवरचा कालखंड; ज्या काळात आंदोलनाचा व एकूणच जीवनाचा वेग मंदावला होता, ज्याला आपण सांजपर्व म्हणू शकू असा टप्पा.
अर्थात कोणाच्याच आयुष्याचे हवाबंद कप्पे पाडता येत नाहीत; ही विभागणी केवळ मांडणीच्या सोयीसाठी केलेली आहे हे उघड आहे.
आयुष्याच्या या तिसऱ्या कालखंडात शेतकरी प्रश्नाशी संबंध नसलेला, पण जोशींनी जिद्दीने हाती घेतलेला एक व्यक्तिगत उपक्रम म्हणजे नर्मदा परिक्रमा. ही परिक्रमा करायचे तसे त्यांच्या खूप वर्षे मनात होते, पण चळवळीच्या व्यापामुळे सवड मिळत नव्हती. ती आत्ता मिळाली. १५ नोव्हेंबर २००२ रोजी जोशींनी प्रस्थान ठेवले. एकूण ३५०० किलोमीटरची ही यात्रा होती. तेव्हा जोशींचे वय ६७ होते. तशी ही परिक्रमा फार अवघड. तीन राज्यांतून जाणारी. रस्त्यात सोयीसुविधा काहीच नाहीत. सगळा ग्रामीण भाग. वाटेत वस्ती व दुकानेही तुरळक. औषधपाण्याची तर काहीच सोय नाही. परिक्रमेत त्यांच्याबरोबर प्रथमपासून शेवटपर्यंत दर्शिनी भट्टजी व बबन शेलार होते, तसेच त्यांचे बंधू ज्ञानेश्वर शेलारही ४ मार्चपासून २१ दिवस होते. कायम राहिलेली अशी आठ-दहाच मंडळी होती; पण इतरही काही जण वेळोवेळी येत. एका वेळी साधारण तीस-चाळीस यात्रेकरू असत. ज्ञानेश्वर शेलारांनी त्या दिवसांचा वाचनीय वृत्तान्त शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत लिहिला आहे. त्यावेळी रोज जोशी यात्रेकरूंसमोर एक व्याख्यानही देत; पण व्याख्यान न म्हणता त्याला प्रवचन म्हणत. स्थानिक लोकही प्रवचनासाठी येत. रोज पहाटे तीन वाजता जोशी उठत; इतर कोणी उठायच्या आत. नदीवर जात व कडाक्याची थंडी असूनही गार पाण्याने अंघोळ करून मुक्कामी परत येत. रोजचे चालणे सरासरी तीस किलोमीटर होई. ह्या अनुभवाविषयी बोलताना नंतर एकदा जोशी म्हणाले,
"शरीर कष्टवणे ह्यालाही आपल्या संस्कृतीत एक आध्यात्मिक महत्त्व आहे. सर्वच साधक म्हणून शरीराला कष्ट देत असतात. हाही एक आयुष्यातला अनुभव आहे व तो मला घ्यायचा होता."
२६ मार्च २००३पर्यंत, म्हणजे पुढच्या १३० दिवसांत, त्यांनी ३००० किलोमीटरची परिक्रमा पूर्ण केली; आता फक्त शेवटचा ५०० किलोमीटरचा टप्पा बाकी होता. दुर्दैवाने त्या दिवशी खलघाटनंतरच्या ठिकरी या मुक्कामी अचानक त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला; बोलणेही अस्पष्ट होऊ लागले. घाईघाईने सहकाऱ्यांनी त्यांना इंदोरला हलवले व तेथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्वरित उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी पुढे प्रवास करायला सक्त बंदी केली. पुढचे तीन आठवडे त्यांनी त्या हॉस्पिटलमध्येच काढले. तेथून शेवटी ४ एप्रिलला ट्रेनने पुण्याला परतले. तब्येतीने शेवटपर्यंत साथ दिली नाही याचे शल्य होते, पण जवळजवळ ऐंशी टक्क्यांहून अधिक परिक्रमा आपण पूर्ण केली ह्याचे समाधानही जोशींना होते. एका अर्थाने माझी ती स्ट्रेस टेस्ट झाली!' ते म्हणाले. ह्या प्रवासातला एक गमतीचा भाग म्हणजे जोशींसकट सर्वांनीच दाढी वाढवली होती! त्यावेळच्या फोटोंत जोशी ओळखताच येत नाहीत!
ह्या अखेरच्या काही वर्षांत जोशी अध्यात्माकडे वळले होते ह्याचा इथे उल्लेख करायला हरकत नाही. त्यांचे एक सहकारी धुळ्याचे रवी देवांग हे विपश्यना केंद्र चालवतात. दोन वेळा जोशी त्यांच्या शिबिरांना हजर राहिले. विपश्यनेत मौनाला खूप महत्त्व. जोशींना ते अवघड वाटले. २००० साली पहिल्या प्रयत्नात पाचच दिवसात त्यांनी साधना सोडली. दोन वर्षांनी पुन्हा प्रयत्न केला व दहा दिवसांची साधना पूर्ण केली. पण त्यात त्यांना विशेष लाभदायक असे काही जाणवले नाही. रोज दोनदा ते संध्या करत. उपनिषदे, गीता, योगसूत्रे तासन्तास वाचत. त्यांच्यासारख्या निरीश्वरवादी माणसाला ह्या सगळ्यातून नेमके काय साधायचे होते हे सांगणे अवघड आहे. त्यांचे एक स्नेही, नागपूरचे प्रसिद्ध विधिज्ञ व आता सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायाधीश शरद बोबडे यांनी त्यांना ह्या मार्गाविषयी सांगितले, असे ते एकदा मला म्हणाले होते; पण त्यावर त्यांनी अधिक काही नेमके भाष्य केले नव्हते. अर्थात दुसऱ्या कोणीतरी सुचवले म्हणून काही करणाऱ्यांपैकी जोशी नव्हते; कुठेतरी त्यांनाही ह्या मार्गाने एकदा जाऊन पाहावे असे वाटत असणार. इतरांच्या मनात त्यांची जी प्रतिमा होती, तिच्याशी अगदी विसंगत असेच त्यांचे हे नवे अध्यात्मप्रेम होते. अनेक सहकाऱ्यांना ते खटकतही असे. पण एकदा एखादी गोष्ट करायची ठरवल्यावर, काहीही झाले तरी ती करायचीच, हा त्यांचा स्वभावच होता. नर्मदा परिक्रमेच्या वेळीही अनेकांनी त्यांना 'तुम्ही अलीकडेच मोठ्या दुखण्यातून उठले आहात. तरुणांनाही खूप दमवणारी अशी ही यात्रा आहे. कशाला उगाच हे करता?' असे पुनःपुन्हा सांगितले होते. त्याकडे दुर्लक्ष करत जोशी परिक्रमेला गेलेच. ह्या अध्यात्माच्या बाबतीतही जोशींनी आपला मार्ग सोडला नाही; आपली साधना अगदी शेवटाशेवटापर्यंत ते करतच राहिले.
शेवटच्या काही दिवसांत जेव्हा जेव्हा ते आंबेठाणला जात, तेव्हा तेव्हा ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा वगैरेचे अर्थासह वाचन करत. ह्यावेळी श्याम पवार व सुरेशचंद्र म्हात्रेदेखील त्यांच्याबरोबर असत. शंकराचार्य हा त्यांचा विद्यार्थिदशेपासूनच जिव्हाळ्याचा विषय होता. कुंडलिनी जागृती, योगसाधना यांविषयीदेखील ते वाचन करत. ३ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांचा ऐंशीवा वाढदिवस त्यांनी श्याम पवार यांच्या आंबेठाणजवळच्या म्हाळुंगेमधील हॉटेलातच अगदी साधेपणे व काही मोजक्याच सहकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला. पवार लिहितात,
संघटनेचे एक श्रद्धावान कार्यकर्ते, यवतमाळचे बापट यांची कन्या सानिका, आळंदीचे ह.भ.प. किसन महाराज साखरे यांची सून झाली आणि आळंदीला आली. त्या संबंधातून त्यांच्याशी भेटीचा योग जुळून आला. शरद जोशी आम्हाला समवेत घेऊन तीन वेळा साखरे महाराजांच्या भेटीला गेले. आपल्या मनातील आध्यात्मिक भूक यामुळे शमविता येईल असा त्यांचा प्रयत्न होता. तथापि, साखरे महाराजांनी विशेष चर्चा केली नाही असे मला जाणवले. कदाचित पंढरपूरची वारीची परंपरा आणि एकूणच वारकरी संप्रदायाच्या विषयाने सुरुवातीच्या दिवसांत शरद जोशी यांनी जी जाहीर मते व्यक्त केली होती, त्याचाही तो परिणाम असावा. त्यानंतर भेट झाली नाही. आजारानेही चांगलेच मूळ धरले होते.
(बळीराजा, सप्टेंबर २०१६, पृष्ठ ३३-४)
हॉस्पिटलच्या वाऱ्या सांभाळूनही जोशी आपल्यापरीने आध्यात्मिक साधना करतच राहिले. पुढे अंथरुणाला खिळल्यावरच ते नाइलाजाने थांबले. ह्या अध्यात्मयात्रेत त्यांना काही प्रकाशकण गवसले होते का, हा प्रश्न आता कायम मूक राहणार आहे.
७ जुलै २०१०मध्ये राज्यसभेचा सहा वर्षांचा कालावधी संपल्यावर जोशी कायम वास्तव्यासाठी पुण्याला परतले. दिल्लीला असतानाच आंबेठाण येथील ज्या प्लॉटवर घर होते तो प्लॉट सोडून, आजूबाजूची शक्य तेवढी शेतजमीन विकायचा निर्णय त्यांनी घेतला होता. १९७७ साली घेतली, तेव्हा ती एकूण साडेतेवीस एकर होती व त्यातली १८ एकर, म्हणजे साधारण तीन चतुर्थांश जमीन, त्यांनी २००५ ते २००७ या कालावधीत दोन-तीन टप्प्यांत विकली. अर्थात आज त्याची किंमत बरीच जास्त मिळाली असती, पण तसा विचार करण्यात काहीच अर्थ नाही.
आदली पंचवीस-तीस वर्षे आर्थिकदृष्ट्या त्यांना फारच हलाखीची गेली होती; नोकरी सोडताना मिळालेले फंडाचे व इतर थोडेफार साठवलेले पैसे घर व शेती खरीदण्यात गेल्यावर नियमित उत्पन्न असे फारच थोडे होते. शेती कायम तोट्यातच होती. महागाईच्या दिवसांत नवे काही उत्पन्न नसताना केवळ साठवलेल्या पुंजीवर दिवस काढणे तसेही अवघडच होते. लौकरच ती संपली. खूपदा महिन्याचा घरखर्च भागवण्याइतकेही पैसे हाती नसत. अधूनमधून घरातील वस्तू विकून दिवस काढायची पाळीही त्यांच्यावर आली होती. आईच्या मृत्यूनंतर ती राहत असलेला सदिच्छा बंगला विकायचा निर्णय सर्व भावंडांनी मिळून १९९२-९३च्या सुमारास घेतला. त्या वाट्याचे आलेले पैसेही थोडे थोडे करत संपलेच. दरम्यान स्वतःचा औंधच्या सिंध सोसायटीतील मृद्गंध बंगला त्यांनी भाड्याने दिला होता; घरखर्चासाठी काही नियमित उत्पन्न मिळावे म्हणून. पण लौकरच तो बंगला त्यांनी विकूनही टाकला व सेनापती बापट रोडवर बिना अपार्टमेंट येथे एक फ्लॅट खरेदी केला होता. या दोन्ही व्यवहारांतील फरकाची रक्कमही पुन्हा उदरनिर्वाहासाठी उपलब्ध झाली होती. जोशींची एकूण आर्थिक परिस्थिती किती बेताबाताची झाली होती याची यावरून कल्पना यावी.
आंदोलनासाठी अनेकदा जोशींनी स्वतःच्या बचत खात्यातून पैसे दिलेले आहेत. त्यांची दैनंदिन राहणी इतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखीच होती. तेही एसटी बसने व ट्रेनच्या तृतीय श्रेणीने प्रवास करत. 'तुम्हीसुद्धा या वयात. आजारी असताना वर्धा स्टेशन ते रवीच्या घरापर्यंत भल्या मोठ्या बॅग्स हातात घेऊन, मध्यरात्रीनंतर पायी जाण्याचा, पाच-पाच तास सलग बोलण्याचा रोमँटिसिझम धकवून नेता तो यापुढे बंद करावा, असे मोहन गुंजाळ यांनी एका पत्रात त्यांना लिहिले होते. पंजाबला जाताना इतरांबरोबर तेही कसे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झोपले हे अनंत उमरीकर सांगतात. 'दोन हातात दोन बॅगा घेऊन रेल्वेच्या डब्यात शिरणाऱ्या जोशींना बघून अ. वा. कुळकर्णी आश्चर्य व्यक्त करतात. भंडारदऱ्याहून पुण्याला परतताना दोन्ही मुलींना विनाआरक्षित एसटी बसमध्ये कसेबसे बसवून स्वतः ड्रायव्हरशेजारी बसणाऱ्या जोशींचे म्हात्रेना अप्रूप वाटते. पुन्हा हे सारे जराही कुरकुर न करता किंवा कुठल्याही प्रकारचे अवडंबर न माजवता जोशी वर्षानुवर्षे करत गेले.
इथे हेही नमूद करायला हवे, की १९७६ मध्ये भारतात परतल्यानंतरच्या चाळीस वर्षांत स्वतः जोशीदेखील फक्त पाच-सहा वेळाच परदेशी गेले. केवळ काही महत्त्वाच्या परिषदांसाठी. तेही बहुतेकदा अगदी सात-आठ दिवसांसाठी. अनेक सेवानिवृत्त मध्यमवर्गीय नागरिकदेखील हल्ली वर्षातून एखादी परदेशवारी करताना दिसतात आणि अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते तर त्या बाबतीत अगदी कॉर्पोरेट अधिकाऱ्यांशी स्पर्धा करताना दिसतात. त्या पार्श्वभूमीवर स्वतः आठ वर्षे परदेशी वास्तव्य केलेले असून आणि स्वतःच्या दोन मुली परदेशी स्थायिक झालेल्या असूनही जोशींनी इतका कमी विदेश प्रवास करावा हे अधिकच उठून दिसणारे आहे.
आर्थिक चणचणीबद्दल त्यांनी चुकूनही कधी कोणापाशी तक्रार केली नव्हती, पण निकटचे कार्यकर्ते एकूण परिस्थिती ओळखून होते व खूपदा शक्य ती मदतही करत असत. उदाहरणार्थ, सांगलीचे जयपाल फराटे (पुढे जे संघटनेचे अध्यक्षही झाले) यांची एक जोशींनी स्वतःच सांगितलेली आठवण. "जयपालअण्णा यांनी ते एकदा पुण्याला माझ्या घरी आले असताना, माझ्या घरखर्चासाठी म्हणून, एक हजार रुपये गुपचूप हाती ठेवले होते आणि त्यावेळी ती रक्कम मला बरीच मोठी वाटली होती," असे जोशी एका भाषणात गहिवरलेल्या आवाजात म्हणाले होते. प्रस्तुत लेखकाला फराटे यांनी पाठवलेल्या १० मार्च २०१२ तारखेच्या एका पत्रातही या घटनेचा उल्लेख आहे. चाकणच्या कांदा आंदोलनाविषयी वाचून फराटे खास त्यांना भेटायला म्हणून पुण्याला गेले होते व हे हजार रुपये त्यांच्या गावातल्या शेतकऱ्यांनी जमा केले होते. त्या काळात त्यांचा प्रवासाचा व इतरही अनेक प्रकारचा खर्च कार्यकर्तेच काही न बोलता परस्पर भागवत.
अगदी सुरुवातीला भारतात परतल्यावर त्यांनी काही वर्षांच्या कालावधीत घेतलेली आधीची जीप व नंतरची अॅंबॅसडर ही दोन वाहने जुनी झाल्यावर रद्दबातल करावी लागली होती. त्यानंतरची काही वर्षे कार्यकर्त्यांनी पैसे गोळा करून त्यांच्यासाठी घेतलेली एक मोटार ते वापरत असत. अखेरच्या काही वर्षांत ते वापरत असलेली इनोव्हा मोटार वर्ध्याच्या रवी काशीकर यांनी वापरण्यासाठी दिली होती, तर ड्रायव्हर बबन शेलार हे कोपरगावचे भास्करभाऊ बोरावके यांनी दिले होते. पुढे त्यांचा प्रवास कमी होत गेल्यावर ते पुण्यातील जगताप नावाच्या भाड्याने ड्रायव्हर पुरवणाऱ्या गृहस्थांकडून कामानुसार कोणीतरी ड्रायव्हर मागवत असत. आंदोलनकाळात त्यांची अनेक गंभीर आजारपणेही झाली व बराच खर्च कार्यकर्त्यांनीच आपापसात पैसे गोळा करून भागवला होता.
त्यागाचे हे ज्वलंत उदाहरण समोर असल्याने मिळेल तिथे हात मारून घ्यायचा, हा इतर संस्थांत वा पक्षांत दिसणारा प्रकार शेतकरी संघटनेच्या बाबतीत सहसा कधी घडलेला नाही.
जमीन विकल्यामुळे उर्वरित आयुष्यात मात्र बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्य जोशींच्या वाट्याला आले. पुण्याच्या बोपोडी भागात देवी ऑर्किड या इमारतीत दहाव्या मजल्यावर त्यांनी दोन सदनिका एकत्रित असलेली एक प्रशस्त सदनिका २००८ साली खरेदी केली. चारही बाजूंनी विहंगम दृश्य दिसायचे व ते बघायला त्यांना फार आवडे. त्यांची आयुष्याची शेवटची काही वर्षे तशी आर्थिकदृष्ट्या कसलीही ओढाताण न होता गेली.
आर्थिक सुस्थिती आल्यानंतर त्यांनी आवर्जून केलेल्या एका गोष्टीचा इथे उल्लेख करायला हवा. ती होती शिवार अॅग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड या कंपनीच्या संदर्भात. खुल्या अर्थव्यवस्थेचे स्वागत करताना युरोप-अमेरिकेतील सुपर मार्केटच्या धर्तीवर खरेदी-विक्री केंद्रांची एक साखळी उभी करायला हवी असे ते म्हणाले होते. 'खुली अर्थव्यवस्था कोणासाठी थांबत नाही; अशी यंत्रणा तुम्ही उभी केली नाही तर दुसरे कोणीतरी करतीलच' असेही त्यांनी शेतकऱ्यांना निक्षून सांगितले होते. कोणीतरी कार्यकर्ता याबाबतीत पुढाकार घेईल याची तब्बल दोन वर्षे त्यांनी वाट बघितली. पण काहीच घडले नाही. मग त्यांनी स्वतःच ३१ ऑक्टोबर १९९३ रोजी औरंगाबाद येथील अधिवेशनात उपरोक्त कंपनीच्या स्थापनेची घोषणा केली. प्रत्यक्षात अपेक्षित भांडवल जमा झालेच नाही म्हणून आणि इतरही काही कारणांमुळे ती कंपनी कधी उभीच राहिली नाही. याबद्दल पूर्वी लिहिलेलेच आहे. 'शेतकरी संघटक'च्या ६ जानेवारी २००७च्या अंकात स्वतःच्या सहीनिशी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात जोशी लिहितात,
ज्यांनी 'शिवार'मध्ये पैसे गुंतवले होते त्यातले बरेच संघटनेच्या कुटुंबातलेच होते, त्यांच्या रकमाही तशा छोट्या होत्या व ते पैसे परत मिळावेत अशी त्यांची काही अपेक्षाही नव्हती. संघटनेशी फारसा संबंध नसलेले किंवा ज्यांना पैशाची खूप गरज होती अशा काही जणांनी आपले मूळ गुंतवणुकीचे पैसे परत मागितले व कबूल केल्याप्रमाणे ते जोशींनी लगेच पाठवूनही दिले. एकूण परत केलेली रक्कम १,७९,००० रुपये होती. खरे तर कायदेशीरदृष्ट्या अशा प्रकारची कुठलीच जबाबदारी जोशींवर नव्हती; ना ते कंपनीचे प्रवर्तक होते, ना संचालक, कंपनी उभी राहू शकली नाही ह्यात व्यक्तिशः त्यांचा काही दोषही नव्हता व कोणीही त्यांना तसा दोष कधी दिलाही नव्हता. पण तरीही स्वतःच्याच पुढाकारातून याची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी हे पैसे परत केले.शेतकरी संघटनेवर आणि व्यक्तिशः माझ्यावर प्रेम करणाऱ्या पाइकांचे पैसे अडकून पडले याचे शल्य गेली पंधरा वर्षे माझ्या मनात डाचत आहे. माझ्या शब्दाखातर गुंतवलेली ही रक्कम परत करणे ही मी माझी व्यक्तिगत जबाबदारी समजत असून १ एप्रिल २००७च्या आत त्यातून मुक्त व्हायचे मी ठरविले आहे. त्यासाठी, आंबेठाण येथील माझ्या जमिनीतील काही हिस्सा विकून मी तरतूद केली आहे. कंपनी सुरूच न झाल्यामुळे आज कंपनीच्या भागांचे बाजारमूल्य काहीच नसले तरी शेतकरी संघटनेच्या पाइकांकडील भागांचे दर्शनी मूल्य त्यांना परत करण्याचा निर्णय मी घेतला आहे. ज्या भागधारकांना आपली रक्कम परत हवी आहे, त्यांनी आपले भाग खालील पत्त्यावर २० मार्च २००७च्या आत पाठवून द्यावेत; म्हणजे कंपनीच्या दस्तावेजांमध्ये पडताळणी करून त्यांची रक्कम पाठवणे शक्य होईल.
या सांजपर्वात सुरुवातीच्या काळात ठणठणीत असलेली जोशींची प्रकृती हळूहळू त्रास देऊ लागली. २० डिसेंबर १९९८ रोजी पुण्याहून दिल्लीला जाताना विमानातच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर दीड महिन्यानी, ४ फेब्रुवारी १९९९ रोजी, दिल्लीलाच इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर (दुसऱ्यांदा) अँजिओप्लास्टी करण्यात आली; मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या एका वाहिनीत स्टेंट बसवण्यात आला. दोनच महिन्यांनी, ५ एप्रिल १९९९ रोजी, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डॉ. सुबोध भट्टाचार्य यांनी त्यांच्यावर बायपास सर्जरी केली. जोशी स्वतःच्या तब्येतीची डॉक्टरांच्या सूचनांनुसार काळजी घेत; नियमित तपासण्या करून घेत. आदली काही वर्षे कमी कमी करत आणलेली सिगरेटही त्यांनी बायपासनंतर पूर्णतः वर्ज्य केली होती. मधुमेहाचा त्रास पूर्वीपासून होताच, पण औषधोपचारांनी सगळे नियंत्रणाखाली होते.
परंतु १० फेब्रुवारी २०११ रोजी डॉ. अशोक गुलाटी यांनी 'अन्नसुरक्षा' या विषयावर आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिसंवादासाठी दिल्लीला गेले असताना हॉटेलच्या लॉबीतील जिन्यावरून ते पडले. पहिल्या पायरीपासून जमिनीपर्यंत गडगडत आले; बेशुद्धावस्थेत खाली पडले. कधी नव्हे ते या प्रवासाला ते एकटेच गेले होते; दीदी त्यावेळी त्यांची स्वतःची आई वारल्यामुळे बडोद्याला गेल्या होत्या. कसेबसे त्यांना इंद्रप्रस्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. खरे तर खाली यायला समोरच लिफ्ट उपलब्ध होती, पण तरीही त्यांनी जिना उतरून जायचे का ठरवले, ते त्यांचे त्यांनाही नंतर सांगता आले नाही.
हा आघात त्यांना शेवटची तीन-चार वर्षे खूप त्रासदायक ठरला. मेंदूला मार लागल्याने स्मरणशक्तीवर तसेच विचार व्यक्त करायच्या क्षमतेवर परिणाम झाला व त्यांच्या जवळच्या व्यक्तींना ते जाणवत असे. खांद्याला मोठीच इजा पोचली होती व हाताचा वापर करणेही अवघड झाले. 'आता उर्वरित आयुष्य मला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार,' अशी खंत त्यांनी म्हात्रेपाशी व्यक्त केली होती. दुर्दैवाने ती खरी ठरली.
त्यांच्याबरोबर केलेल्या एका लांबच्या प्रवासाचा अनुभव सांगण्यासारखा आहे. ३० जुलै २०१२ला केसीसी (Kisan Coordination Committee)ची बांदा येथे बैठक होती. मीही सोबत चलावे अशी त्यांची इच्छा होती. बांदा हे उत्तर प्रदेशातील एक जिल्ह्याचे ठिकाण. ज्याला बुंदेलखंड म्हणतात तो हाच परिसर. राजा छत्रसाल आणि बाजीरावाची मस्तानी इथलीच. इतक्या लांबच्या ठिकाणी जोशी कसे जाणार याचीच त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांना काळजी; पण जोशींची फार इच्छा होती.
आम्हां दोघांशिवाय अनंतराव देशपांडे, बद्रीनाथ देवकर, वामनराव चटप व शैलजा देशपांडे हेही या प्रवासात बरोबर होते.
डॉ. साहेब लाल शुक्ला हे बुंदेलखंडातले शेतकरीनेते आमचे स्थानिक यजमान. केसीसीची बैठक बांद्याला एकदातरी व्हावी या त्यांच्या आग्रहामुळे ही बैठक इतक्या अडनडी गावी ठरली होती.
आमच्या आगेमागे इतरही प्रांतांतले काही शेतकरीनेते तिथे हजर झाले. कर्नाटकचे हेमंत कुमार पांचाल, आंध्रचे एस. पी. शंकरा रेड्डी, पंजाबचे भूपिंदर सिंग मान वगैरे. सकाळी दोनअडीच तास बैठक झाली. मग संध्याकाळी जाहीर सभा. केसीसीची ती बैठक मला अगदीच अपेक्षाभंग करणारी वाटली. नंतरची संध्याकाळची जाहीर सभाही. दात काढलेल्या सिंहाप्रमाणे झालेली त्यांची अवस्था आम्हांला कोणालाच बघवत नव्हती. संघटनेत आता दम राहिला नव्हता, हे मला व बरोबरच्या अनेकांना पदोपदी जाणवत होते; पण हे जोशींना जाणवत होते का, हा प्रश्नच आहे.
हॉटेल सारंग इंटरकॉन्टिनेन्टलमध्ये सगळ्यांची राहायची सोय केली होती. नाव आणि वास्तव यांत जेवढा फरक आपण कल्पू शकतो, तो सगळा इथे होता. लिफ्ट एकदाही चालली नाही. दोन मजले पायीच चढायचे-उतरायचे. पहिल्याच रात्री जोशींना हॉटेलात खूप अस्वस्थ वाटू लागले, सॉर्बिट्रेटची गोळी द्यावी लागली. त्या आडगावी काही झाले तर काय करायचे, ह्या विचाराने त्यांच्या खोलीतच राहणाऱ्या अनंतराव देशपांडे यांचे व आम्हां सगळ्यांच्याच काळजाचे ठोके चुकत होते. तरीही त्यांच्या इच्छेनुसार दुसऱ्या दिवशी आम्ही चित्रकूटलादेखील जाऊन आलो. पूर्वी तो परिसर म्हणजे बांदा जिल्ह्याचाच एक तालुका होता. आठ-दहा वर्षांपूर्वी चित्रकूटला एका स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला. भाजपचे नानाजी देशमुख यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर या अत्यंत मागासलेल्या भागात ग्रामविकासाचे मोठे काम उभे केले आहे. इथले रामदर्शन हे प्रदर्शनही प्रसिद्ध आहे. रामाच्या जीवनातील विविध प्रसंग तिथे चित्रित केले आहेत. मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांचा ह्यात मोठा सहभाग होता. तिथेही जोशींनी दोन तास खर्च करून एक प्रदक्षिणादेखील घातली.
मुळात बांद्याला जाणे हाच मोठा द्राविडी प्राणायाम होता. आधी भल्या सकाळी पुण्याहून विमानाने नागपूरला जायचे. तेथून गोंडवाना एक्स्प्रेसने झांसी. रात्री बारा वाजता झांसीला उतरायचे आणि तिथून रात्री दोन वाजता संपर्क क्रांती एक्स्प्रेस पकडायची. ती बांद्याला जाते. प्रत्यक्षात ती दोन तास उशिरा आली. रात्रीचा तो सगळा वेळ आम्ही प्लॅटफॉर्मवरच काढला. परत येताना पुन्हा तोच प्रकार. एकूण सगळा फार जिकीरीचाच प्रवास. प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी व्हीलचेअर शोधणे म्हणजेही मोठे दिव्य होते. आपल्याकडे कागदोपत्री सगळ्या सोयी असतात, पण प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीकरता धावपळच करावी लागते. जोशींना स्वतःलाही हे परावलंबित्व विलक्षण क्लेशदायकच असणार.
पण या सगळ्या प्रवासात दोन गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या.
एक म्हणजे सर्व सहकाऱ्यांचे जोशींवर असलेले निरतिशय प्रेम. त्यांच्यापैकी कोणालाच आता जोशींकडून काहीही मिळवण्यासारखे असे नव्हते, पण तरीही एखाद्या आज्ञाधारक मुलाने स्वतःच्या वडलांची म्हातारपणी घ्यावी, तशीच सगळे त्यांची काळजी घेत होते. परतताना एक रात्र आमचा रवी काशीकर यांच्या नागपूरच्या घरी मुक्काम होता व त्यावेळीही जोशींना भेटायला माणसांची अगदी रीघ लागली होती. त्यात ज्योतिषी चंद्रशेखर शर्मांपासून पत्रकार सुरेश द्वादशीवारांपर्यंत सगळ्या प्रकारची माणसे होती आणि सगळेच जोशींविषयी अतिशय आदराने बोलत होते. त्यात चमचेगिरीचा भाग जराही दिसत नव्हता, कारण आता 'मधुघटची रिकामे पडती घरी' अशीच जोशींची स्थिती होती; जाणवत होती ती अकृत्रिम आपुलकी. वाटले, सहकाऱ्यांचे हे निरपेक्ष प्रेम ही जोशींची खूप मोठी कमाई आहे.
दुसरी मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे जोशींची ऐंशीच्या उंबरठ्यावरही टिकून असलेली कमालीची जिद्द आणि त्या जिद्दीपोटी कुठलीही शारीरिक गैरसोय सहन करायची अपरिमित क्षमता. ह्या वयात ही सगळी दगदग म्हणजे शरीराचे हालच, पण सगळ्या प्रवासात मी एकदाही त्यांच्या तोंडून तक्रारीचा एक शब्दही ऐकला नाही.
असाच अनुभव आम्ही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात गुणवंत पाटील हंगरगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडला गेलो होतो तेव्हा आला. गुणवंतभाऊंनी प्रचंड घाट घातला होता. भव्य शामियाना उभारला होता. त्यांचा जनसंपर्क दांडगा. लांबून लांबून लोक आले होते. प्रकृती ठीक नसतानाही व्यासपीठावर चार तास एकाच प्लास्टिकच्या खुर्चीत जोशी बसून होते. अखंड चाललेली भाषणे, भोवतालची प्रचंड गजबज, असह्य उकाडा हे सारे तसे त्रासदायकच वाटत होते; पण जोशींच्या चेहऱ्यावर त्रासाची बारीकशी छटाही नव्हती. वाटले, ऐन उमेदीत ह्या माणसाचा झपाटा काय जबरदस्त असला पाहिजे! आणि दोन दिवस त्यांना भेटणाऱ्यांची अखंड रांग. आमदार शंकर धोंडगेंपासून लांबून लांबून आलेल्या अगदी सामान्य शेतकरी बंधू आणि भगिनींपर्यंत. पुन्हा तेच प्रेम. शेतकरी आंदोलनाचा बहर ओसरून अनेक वर्षे लोटल्यानंतरही टिकून राहिलेले! ऐन वसंतात त्या प्रेमाचा आविष्कार किती उत्कट असला पाहिजे! वाटले, 'शेतकऱ्यांचे पंचप्राण' असे जोशींचे वर्णन केले जायचे ते यथार्थच होते.
२५ नोव्हेंबर २०१४ ही यशवंतराव चव्हाण यांची तिसावी पुण्यतिथी. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा एक लाखाचा मानाचा पुरस्कार प्रतिष्ठानच्या मुंबईतील सभागृहात प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात जोशींना दिला गेला. कार्यक्रमाला जोशी अर्धा-एक तास उशिरा पोचले, पण आले हेच विशेष. त्यावेळी ते फारच थकलेले दिसले. जोशींचा हा जवळजवळ शेवटचाच मोठा असा कार्यक्रम. पंजाबबद्दलच्या प्रकरणात सुरुवातीलाच त्याचा उल्लेख झालेला आहे.
आयुष्यात भेटलेल्या व्यक्तींपैकी कोणाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला या विषयावर आम्ही काही वेळा बोललो. एक लेखक म्हणून, संपादक म्हणून आणि माजी केंद्रीय मंत्री म्हणून अरुण शौरी प्रख्यात होते. साहजिकच त्यांचा विषय निघाला होता. "मी आणि शौरी साधारण एकाच सुमारास भारतात परतलो," बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा जोशी सांगत होते. "तो वर्ल्ड बँकेतून आणि मी यूएनमधून. दिल्लीत आमची कधीकधी गाठ पडते. तेव्हा या तीस वर्षांत आपण काय कमावले ह्या विषयावर चर्चा होते." त्या चर्चेचा निष्कर्ष जोशींनी सांगितला नाही. विषय बदलला. या मुद्द्यावर खोलात जाऊन अधिक काही विचारणे मलाही अप्रशस्त वाटले. दिल्लीत राजीव गांधींच्या विरोधात एखादी आघाडी स्थापन करायच्या उद्देशाने त्यांनी बोलावलेल्या एका बैठकीत त्यांनी शौरींना 'तुम्ही देशाचे पंतप्रधान होऊ शकता' असे सुचवल्याचे आठवत होते. त्या बैठकीचा संदर्भ मागे आला आहे. संघटनेने आयोजित केलेल्या दोन-तीन परिसंवादांतही शौरींचा सहभाग होता. पुढे पुण्याजवळ लवासा येथेच ते राहायलाही आले होते.
शौरी हे केवळ एक उदाहरण म्हणून लिहिले; पण दिल्लीइतकी नसली तरी मुंबई-पुण्यातही राष्ट्रीय पातळीवर नाव असलेली बरीच मंडळी होती. परंतु पुण्यात आल्यावर व बऱ्यापैकी निवांत वेळ उपलब्ध असतानाही त्यांच्यापैकी कोणाशी मैत्री जोडायचा जोशींनी प्रयत्न केल्याचे जाणवत नाही. फारसे कोणी भेटायला आलेले त्यांना आवडतही नसे आणि तसे कोणी येतही नसत. भेटायला येणाऱ्यांमध्ये संघटनेतील जुने साथीदारच प्रामुख्याने असत. नाही म्हणायला लिबरल ग्रुपच्या लोकांशी त्यांचा संपर्क असायचा. Down to Earth हे त्यांचे हिंदूच्या 'बिझिनेस लाइन'मधील सदरलेखनाचे हार्ड बाउंड संकलन याच लोकांनी दिल्लीहून प्रकाशित केले.
"तसा मी अनेकांना भेटलो, पण माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे अशा कुठल्या व्यक्तीचं नाव मला नाही सांगता येणार. किंबहुना कोणामुळेच मी फार भारावून गेलो असं म्हणता येणार नाही. कॉलेजातले प्राचार्य मुरंजन, संस्कृतचे शिक्षक अभ्यंकर, पोस्टातले बॉस वेलणकर, ज्ञानेश्वर विद्यापीठाचे मनोहर आपटे, दुर्गाबाई भागवत, अहमदाबादच्या सेवा या संघटनेच्या इलाबेन भट अशी काही मोजक्या माणसांविषयी मला आदर वाटतो, पण त्या कोणाहीपेक्षा पुस्तकांचा आणि पुस्तकांपेक्षा मी स्वतः केलेल्या विचारांचा व घेतलेल्या अनुभवांचा माझ्यावर जास्त प्रभाव आहे." असे एकदा ते म्हणाले होते.
पुढे पुढे त्यांच्याबरोबर खोलात जाऊन चर्चा करणे अवघड होत गेले. लगेचच त्यांच्या मेंदूला शीण यायचा; त्यांना फार काळ बसवतही नसे. दोन वेळा आमच्या भेटीची वेळ व चर्चेचा विषय हे आदल्या दिवशी फोनवर ठरलेले असतानासुद्धा तब्येत नरम असल्याने त्यांना झोपूनच राहावे लागले. अर्थात बोलण्यासारखे बहुतेक सारे बोलून झालेही होते. आमच्या औपचारिक मुलाखतवजा भेटी त्यानंतर थांबल्या; त्यानंतरच्या भेटी केवळ त्यांची तब्येत कशी आहे एवढे पाहण्यापुरत्याच झाल्या; संभाषण व्हायचे ते काहीतरी जुजबी स्वरूपाचे.
कधी कधी आम्ही प्रश्नोत्तरे बाजूला सारून आणि कुठलीही गंभीर चर्चा करण्याऐवजी हलक्याफुलक्या विषयांवरही बोलायचो. एक दिवस अल्फ्रेड हिचकॉकच्या The man who knew too much या गाजलेल्या रहस्यपटातील डोरिस डे हिच्या 'Ke sera sera: Whatever will be, will be; Future's not ours to see; Ke sera sera; What will be, will be.' ह्या प्रसिद्ध गाण्याचे रेकॉर्डिंग मी त्यांना लागोपाठ दोनदा ऐकवले. त्यांना ते गाणे मनापासून आवडत होते. कदाचित त्यांचीही मनोभूमिका त्यावेळी तीच होती. 'के सेरा सेरा हे फ्रेंच आहे बरं का' असे ते दीदींना म्हणाले. 'हा आवाजही डोरिस डेचाच आहे, की आणखी कुणाचा?' याचे कुतूहल त्यांना होते. अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या पिकू या चित्रपटाची कहाणी मी त्यांना एकदा ऐकवली होती. हा बहुधा मे २०१५ मधला प्रसंग असेल. त्यांना ती फारच आवडली. 'आपण सगळेच तो बघायला जाऊ या, तुम्ही तिकीटं बुक करून टाका' असे ते अनंतरावांना म्हणालेसुद्धा. दोन दिवस वाट बघून नंतर मी त्यांना आठवणही केली, ते 'हो, हो' म्हणाले; पण प्रत्यक्षात त्यांचा उत्साह काही तेवढा टिकला नाही. असे खूपदा व्हायचे.
घरी बसून बसून ते बेचैन होत, सारखे कुठेतरी लांब भटकायला जावे असे वाटे. मोटारीत बसूनच मग ते इकडेतिकडे फिरून यायचे; आंबेठाणलाही जायचे. पुण्याजवळ दिघी इथे एक टेकडीवरचे दत्तमंदिर आहे. चांगला अर्ध्या-पाऊण तासाचा चढ आहे. अनंतरावांचा हात धरून एकदा ते त्या देवळातही जाऊन आले; 'त्याशिवाय माझा आत्मविश्वास वाढणार नाही' ही त्यांची त्या धाडसामागची भूमिका. पावसाळ्यात महाबळेश्वर-पाचगणीच्या एखाद्या हॉटेलात जाऊन त्यांना आठ दिवस राहायचे होते, तेथील एखाद्या चांगल्या हॉटेलची चौकशी करायला त्यांनी मला सांगितले होते व ती करून मी त्यांना सगळी माहिती दिलीही होती. त्याना ब्रह्मगिरीलाही जायचे होते. आपला २०१५ सालातला वाढदिवस तिथे त्यांना लोकांपासून दूर अशा एखाद्या निवांत जागी एकांतातच घालवायचा होता. अर्थात प्रत्यक्षात यातले काहीच कधी झाले नाही. शेवटी शेवटी असेच एकदा ते जिद्दीने सज्जनगडावरही जाऊन आले. भंडारदऱ्यालाही गेले होते. त्यांना नेणे-आणणे बरोबरच्यांनाही तसे अवघडच असायचे. अर्थात निरपेक्ष बुद्धीने आपल्या नेत्याची सेवा करायचा निर्धार असल्याने कोणी काही तक्रार करायचा प्रश्नच नव्हता.
९ ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांनी आपले मृत्युपत्र तयार केले होते. मरणोत्तर जेव्हा ते जाहीर झाले तेव्हा कळले, की आपली पुण्यातील राहती सदनिका आपल्या दोन्ही कन्यांना त्यांनी दिली आहे व आंबेठाण येथील उर्वरित सुमारे सहा एकर जमीन तिच्यावरील अंगारमळा या घरासकट त्यांनी ३० सप्टेंबर २०१४ मध्ये नोंदणी झालेल्या 'शेतकरी संघटना' न्यासाला दिली आहे. न्यास स्थापन केला तेव्हा ते स्वतः मुख्य विश्वस्त होते. त्यांच्या पश्चात रवी काशीकर न्यासाचे प्रमुख असून बद्रीनाथ देवकर, सुरेशचंद्र म्हात्रे, अनंत देशपांडे, गोविंद जोशी, संजय पानसे, भास्करराव बोरावके, रामचंद्रबापू पाटील, वामनराव चटप, मानवेन्द्र काचोळे व अलका दिवाण हे न्यासाचे इतर विश्वस्त आहेत. ठेवीच्या स्वरूपात शिल्लक रक्कम होती तिच्यातून दर्शनी भट्ट, अनंत देशपांडे व सुरेशचंद्र म्हात्रे यांना प्रत्येकी वीस लाख रुपये द्यायची तजवीज त्यांनी केली. मृत्युपत्रातही त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे व शेतकरी संघटनेप्रती असलेल्या निष्ठेचे चांगले प्रतिबिंब उमटलेले आहे. शासनाने मरणोत्तर देऊ केलेली पद्मश्रीदेखील जोशी यांच्या कुटुंबियांनी नाकारली होती हे इथे नमूद करायला हरकत नाही.
सिंहावलोकन करताना केलेल्या विश्लेषणाला तसे मर्यादितच महत्त्व असते; माणूस त्या त्या वेळी योग्य वाटेल तशी पावले उचलत जातो; असे झाले असते तर आणि तसे झाले असते तर, ही चर्चा व्यर्थच असते. पण तरीही जोशींच्या एकूण कार्याच्या संदर्भात मागे वळून पाहताना काय वाटते? स्वतः जोशींनी तसे काही सांगितले आहे का किंवा लिहिले आहे का?
त्यांचा तसा एक अप्रकाशित लेख वाचनात आला. २०१५ साली एका दिवाळी अंकाने 'आयुष्यात झालेल्या माझ्या चुका' ह्या विषयावर वेगवेगळ्या व्यक्तींकडून लेख मागवले होते. त्यात जोशींचाही लेख मागवला गेला होता. जोशींनी तो लिहिलाही होता, पण प्रकाशनासाठी पाठवला मात्र नाही. त्यांच्या त्या अप्रसिद्ध राहिलेल्या लेखात त्यांनी स्वत:ला जाणवलेल्या आपल्या काही चुका नोंदवलेल्या आहेत.
आपली पहिली चूक म्हणून त्यांनी राजकारणात शिरायची वेळ चुकल्याचा उल्लेख केला आहे. ऊस आंदोलन जोरात असताना नाशिक जिल्ह्यात सर्वत्र काँग्रेसविरोधी वातावरण होते व शेतकरी संघटनेला प्रचंड जोर होता. त्यानंतर झालेल्या १९८५च्या निवडणुकीत शेतकरी संघटनेने आपले सगळे बळ शरद पवारांच्या पुरोगामी लोकशाही दलाच्या मागे उभे केले व मुख्यतः त्याचमुळे पुलोदने त्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व बारा जागा जिंकल्या. मग पवारांना पाठिंबा देण्याऐवजी त्याचवेळी शेतकरी संघटना स्वतःच निवडणुकीच्या आखाड्यात उतरली असती तर? आपल्या उपरोक्त लेखात जोशी म्हणतात,
"पण त्या वेळी मी पक्षउभारणीचा कार्यक्रम करण्याऐवजी 'कधी तुमच्याकडे मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा' अशा तऱ्हेचा आविर्भाव करून बसलो होतो! त्यातून बाहेर पडण्यासाठी मला बराच वेळ लागला."
नंतर राजकारणात शिरायचा निर्णय घेतल्यावर त्यांनी तशाही अनेकांच्या शिव्या खाल्ल्याच; त्या जर आधीच खाल्ल्या असत्या व ८५ सालीच निवडणुकीत उडी घेतली असती, तर बरेच काही पदरात पडून गेले असते आणि मग एकूण परिस्थितीच खूप बदलली असती, असे त्यांना वाटते. जोशी म्हणतात,
"संघटनेने स्वतःच त्या निवडणुका लढवल्या असत्या तर नाशिक जिल्ह्यातल्या त्या सर्वच्या सर्व बारा जागा शेतकरी संघटनेला मिळाल्या असत्या आणि मग शेतकरी संघटनेचे राजकारणातील अपयश हे कोणालाही टोमणा मारायला शिल्लक राहिले नसते."
दुसरी चूक ते अशी सांगतात -
"संघटनेचा सगळा भर शेतीमालाच्या विक्रीतून शेतकऱ्याला अधिक पैसे कसे मिळतील यावर होता. पण त्याबरोबर शेतजमिनीची उपलब्धता जसजशी कमी होते, तसतसा शेतजमिनीच्या विक्रीतूनही शेतकऱ्यांच्या हाती अफाट पैसा येतो- जे आज प्रत्यक्ष घडते आहे- हे शेतकरी संघटनेला अचूकपणे हेरता आले नाही. पुढे शेतीच्या विक्रीचा व्यवसाय करणारी 'गुंठामंत्र्यां'ची जमात तयार झाली. त्यांनी गावागावात जमिनीचे व्यवहार करून प्रचंड उत्पन्न मिळवले. शेतकऱ्यांनाही शेतीमालाऐवजी जमिनीच विकून जन्मात कधी पाहिला नव्हता इतका पैसा मिळाला. त्यांनी मग घरे बांधली, मोटारगाड्या घेतल्या, इतरत्र जमिनी घेतल्या. 'शेतीमालाच्या भावाइतकाच, किंबहुना त्याहून अधिकच पैसा शेतजमिनीच्या खरेदीविक्रीतूनही मिळू शकतो' हे बदललेले वास्तव शेतकरी संघटनेच्या विचारात कुठेच चपखल बसत नव्हते."
आपली आणखी एक चूक नोंदवताना जोशी म्हणतात,
"शेतकरी संघटना ही कायमच खेडेगावातील लोकांची संघटना राहिली. खरे तर अण्णा हजारेंच्या खूप आधी भ्रष्टाचाराचा मुद्दा संघटनेने उठवला होता. लातूर जिल्ह्यात 'उसने पैसे परत घेणे' असा भ्रष्टाचारविरोधी प्रयोगही केला होता. म्हणजे नाइलाजाने लाच म्हणून द्यावे लागलेले पैसे त्या-त्या अधिकाऱ्याविरुद्ध निदर्शने करून त्याच्याकडून परत घेणे.' नेता-तस्कर, गुंडा-अफसर...' अशी घोषणाही आम्ही दिली होती. परंतु त्याकरिता आवश्यक तितके परिणामकारक व व्यापक आंदोलन शेतकरी संघटनेला उभे करता आले नाही. त्यामुळे 'खेडेगावातील लोकांचे आंदोलन' हे तिचे स्वरूप कायम राहिले. अण्णा हजारे वगैरेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला आताच्या माध्यमयुगाचाही पाठिंबा मिळाल्यामुळे ते आंदोलन पुष्कळ यशस्वी झाले असे दिसते."
अर्थात हा अप्रसिद्ध लेख त्यांनी आयुष्यात अगदी अखेरच्या काळात लिहिला व त्याचा परिणाम म्हणून शेतकरी संघटनेच्या धोरणात काही बदल घडायची वेळ केव्हाच निघून गेली होती.
जोशींना लाखो शेतकऱ्यांनी अलोट प्रेम दिले, पण अभिजनवर्गातील अनेक जण मात्र कायम त्यांच्या विरोधात राहिले. संघटनेतून बाहेर पडलेले काही साथी, राजकारणी, डावे विचारवंत, अर्थशास्त्री वगैरेंच्या टीकेबद्दल चौदाव्या प्रकरणात लिहिलेच आहे; पण त्याव्यतिरिक्त असे काही समाजघटक होते का ज्यांचा विरोध काहीसा गैरसमजातून निर्माण झाला होता व थोडे प्रयत्न करून जोशी तो टाळू शकले असते?
असा एक महत्त्वाचा समाजघटक म्हणजे स्वयंसेवी संस्था किंवा ज्यांना एनजीओ म्हटले जाते अशा संस्था. पत्रकारांमध्ये व एकूणच समाजात या स्वयंसेवी संस्थांबद्दल बरीच सद्भावना होती. जोशींनी स्वयंसेवी संस्थांवर सतत तोफ डागल्यामुळे तो मोठा प्रभावशाली घटक त्यांच्या कायम विरोधात गेला.
समाजसेवी कार्यकर्त्यांवरील जोशींची टीका अत्यंत धारदार आहे; कार्यकर्त्यांच्या साऱ्या आयुष्यभराच्या श्रद्धा हलवून टाकणारी आहे.
त्यांनी जेव्हा शेतीला सुरुवात केली त्यावेळी महाराष्ट्रात व एकूणच भारतात एनजीओ मोठ्या प्रमाणावर सुरू होत होत्या. त्यांना अनेकदा विदेशी फंडिंग असायचे, तसेच युनायटेड नेशन्सचे जोरदार पाठबळही असायचे. विकासकामासाठी उपलब्ध केला जाणारा बराचसा सरकारी निधी त्यांच्यामार्फत वितरित व्हायचा. स्वतः युनायटेड नेशन्सचे काम करत असताना जोशींनी या साऱ्यातील भ्रष्टाचार अगदी जवळून पाहिला होता. त्याकाळात बऱ्याच स्वयंसेवी संस्थांत अपप्रवृत्ती शिरल्या होत्या, त्यांच्यावर टीका करणे गैर नव्हते; पण साऱ्याच स्वयंसेवी क्षेत्राला इतके मुळापासून तोडायचे जोशींना खरे तर काहीच कारण नव्हते.
रेड क्रॉससारख्या स्वयंसेवी संस्थांबद्दल जोशींना आदर होता; निपाणी आंदोलनानंतर त्यांनी रेड क्रॉसची मदतही मागितली होती.
शीख गुरुद्वारांमधील लंगरचे त्यांना कौतुक होते. लंगरमध्ये कोणाही गरजू व्यक्तीची जेवण्याची व राहण्याची सोय काही दिवसांकरितातरी नक्की होते. त्या कालावधीत त्याला स्वतःचा रस्ता शोधायची सवड मिळते. म्हणूनच पंजाबमध्ये भिकारी दिसत नाहीत; उलट छोटे छोटे व्यावसायिक मात्र खेडोपाडी दिसतात. 'दारिद्र्यनिर्मुर्लनाचा या देशातील यशस्वी झालेला एकमेव कार्यक्रम म्हणजे शिखांचे लंगर,' असे त्यांनी म्हटले आहे.
अनेक स्वयंसेवी कार्यकर्त्यांबद्दलही त्यांना व्यक्तिशः आदर होता. स्वतःचा उत्तम चालणारा इंजिनिअरींग व्यवसाय सोडून पाणीप्रश्नावर काम करणारे विलासराव साळुखे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडून म्हैसाळला स्वतःच्या बळावर ग्रामसुधार प्रकल्प उभारणारे मधुकर देवल. राजकारणात शिखरावर असतानाच त्यातून निवृत्त होऊन चित्रकूटला ग्रामोद्धाराचे काम उभारणारे नानाजी देशमुख. महिला कामगारांची आणि फेरीवाल्यांची Self Employed Women's Association (SEWA) ही प्रबळ संघटना उभारणाऱ्या इलाबेन भट. विद्यापीठाची मान्यता न घेता उत्तम तांत्रिक शिक्षण देऊन हजारोंना नोकऱ्या मिळवून देणाऱ्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचे मनोहर आपटे, अशा अनेकांचे त्यांना कौतुक होते. तरीही एकूण सामाजिक कार्यावर त्यांनी खूपच टीका केली.
सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्यांची भारतातली संख्या एक-दोन टक्केसुद्धा नसताना आणि अन्य सारा समाज पूर्णतः स्वार्थाच्या मागेच लागलेला असताना जोशींनी पुन्हा स्वार्थाचा पुरस्कार करावा व सेवावृत्तीचा कठोर उपहास करत राहावे, याचे खूप आश्चर्य वाटते.
स्वार्थाचा आणि एकूणच मुक्त अर्थव्यवस्थेचा कायम गुणगौरव करणाऱ्या आयन रँडच्या युनायटेड स्टेट्समध्येसुद्धा स्वयंसेवी क्षेत्राला प्रचंड जनाधार होता व आहे. असंख्य अमेरिकन अशा सेवाकार्यात सहभागी होत असत व आजही होतात. किंबहुना अमेरिकेचा उल्लेख आजही 'अ नेशन ऑफ जॉइनर्स' असा केला जातो. या साऱ्या पार्श्वभूमीवर जोशींनी स्वयंस्फूर्त कार्याला केलेला प्रखर विरोध असमर्थनीय वाटतो. त्यातून विनाकारण अनेक जण दुरावले.
'मी केवळ माझ्या आनंदासाठी युएनमधली नोकरी सोडून भारतात परतलो, या कामात पडलो. यात त्याग वगैरे अजिबात नाही, समाजसेवा तर नाहीच नाही' असे त्यांनी वेळोवेळी कितीही ठासून सांगितले, तरी अन्य जगाच्या दृष्टीने त्यांनी जे केले तो त्यागच होता; समाजहितासाठी केलेले समर्पणच होते. पण मग तरीही 'हे मी इतरांसाठी नाही, स्वत:साठीच करतो आहे' ही भूमिका त्यांनी का घ्यावी?
कदाचित असे तर नसेल, की शेतकरी संघटनेच्या अगदी सुरुवातीच्याच काळात त्यांना काही कटू सत्ये जाणवली होती? "तुम्ही मांजराला मिठाई खायला घालत असला, आणि एवढ्यात त्याला एखादा उंदीर दिसला, तर मिठाई सोडून ते मांजर उंदराच्याच मागे पळत जाईल," असे माधवराव मोरे आपल्याला म्हणाल्याचे त्यांनी एके ठिकाणी लिहिले आहे. तसे काही अनुभव त्यांना आले होते का? आणि मग त्यागी भावनेतून केलेल्या कार्यातूनही जर निराशाच हाती येणार असेल, तर मग आपले कार्य हा त्याग नव्हताच, त्यापासून कुठलेच श्रेय अपेक्षित नव्हते, ते करण्यातला आनंद मिळविणे एवढेच आपले ईप्सित होते, ही भूमिका त्यांना अधिक सुरक्षित वाटली असेल?
उघड उघड केलेल्या प्रचंड त्यागाचे श्रेय नाकारण्याचा त्याग ही त्यांनी अंतर्मनाच्या गाभ्याचे संरक्षण करण्यासाठी घेतलेली कवचकुंडले होती का?
काही गैरसमज शरद जोशींबद्दल उगाचच प्रचलित आहेत. एक म्हणजे अर्थवादाच्या मागे लागून त्यांनी चारित्र्यसंवर्धनाला दुय्यम लेखले हा. नैतिकतेला महत्त्व देणाऱ्यांचा त्यांनी केलेला उपहास हाही अनावश्यक होता. खरे तर नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या इतर अनेकांपेक्षा जोशींचे वागणे अधिक नैतिक होते, व्यक्तिगत पातळीवर अधिक प्रामाणिक होते.
त्यांना वारकरी संप्रदायाचे वावडे होते हा असाच एक गैरसमज. त्यांनी सुरुवातीच्या काळात वारकऱ्यांवर खूप टीका केली हे खरे आहे व प्रकरण नऊमध्ये तो भाग आलाच आहे. शेतीला सुरुवात केली त्यावेळच्या त्यांच्या अनुभवावर ती टीका आधारलेली होती. पण वारकरी संप्रदायाची चांगली बाजूही त्यांनी पुढे आठ-दहा वर्षांनी लिहिलेल्या आपल्या शेतकऱ्यांचा राजा शिवाजी (प्रकाशन १८ एप्रिल १९८८) या छोट्या पण महत्त्वाच्या पुस्तकात अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. त्यांची त्या संदर्भातली काही काही विधाने इथे उदधृत करण्याजोगी आहेत.
"जयजय रामकृष्ण हरी' आणि 'पुंडलिक वरदा'च्या घोषाने दुःखे संपली नाहीत तरी, या दुःखांपलीकडे पाहण्याची ताकद समाजाला मिळाली."
"ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी जातिव्यवस्थेतील उच्चनीचतेवर आपल्या लिखाणाने आणि वागणुकीने उघडपणे आघात केले. शूद्रातिशूद्रांना समाज पारखा झाला होता. संतांनी उपदेशिलेल्या भक्तिमार्गामुळे त्यांच्या मनात आसपासच्या समाजाशी आपले काहीतरी लागेबांधे आहेत अशी भावना तयार होणे शक्य झाले."
"संतांनी बजावलेली आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे अध्यात्म व धर्म जनसामान्यांच्या मराठी भाषेत मांडणे. संतांनी जनसामान्यांना धर्मविचाराचे एक नवीन दालन उघडून दिले. धर्म म्हणजे निरर्थक वटवट नाही, धर्मविचार सामान्य जीवनातही महत्त्वाचा आहे याची जाणीव जनसामान्यांना पहिल्यांदी झाली. तुकडे तुकडे झालेल्या समाजाला एकत्र जोडण्याकरिता संतांनी केलेले हे काम अद्वितीय मानावे लागेल."
"पंढरपूरची वारी हा निराधारांचा आधार आहे. वारकरी पंथाने या चलनवलनातील लाचारीचे रूप काढून टाकले. पंढरपूरला जाणारे पोटार्थी भिकारी राहिले नाहीत; पंढरीनाथाचे पुण्यवान भक्त झाले. त्यांना भाकरतुकडा घालणारे श्रीमंत दाते राहिले नाहीत; विठोबाच्या भक्तांच्या सेवेचे मानकरी झाले. महाराष्ट्रातील भक्तिमार्ग हा एक अत्यंत बिकट दैन्यावस्थेत समाजाला तगवून ठेवणारा चमत्कार ठरला."
दुर्दैवाने जोशींची ही वारकरी संप्रदायाचा अत्यंत तार्किक व वस्तुनिष्ठ गौरव करणारी मांडणी फारच कमी लोकांपढे पोचली.
जोशींबद्दल अगदी विनाकारण प्रचलित असलेला आणखी एक गैरसमज म्हणजे त्यांच्यामागे फक्त बडे बागाईतदार होते. मुळात 'कसेल त्याची जमीन' हे धोरण सरकारने अमलात आणल्यानंतर महाराष्ट्रात मोठी शेती अशी जवळजवळ नव्हतीच. जी काही होती तिच्याही पुढील पिढ्यांत वाटण्या होऊन प्रत्येक कुटुंबाचे उर्वरित क्षेत्र हे छोटेच होते. त्यातल्या त्यात जे शेतकरी धनिक होते, त्यांचा पैसा हा शेतीतून नव्हे तर अन्य उत्पन्नाच्या साधनांतून किंवा राजकारणातून आला होता. तशी मंडळी सहकारी साखर कारखाने किंवा पतपेढ्या किंवा दूधसंघ यांच्यामागे होती; शेतकरी आंदोलनात त्यांच्यापैकी क्वचितच कोणी आले असेल; किंबहुना त्या मंडळींचा जोशींना व शेतकरी संघटनेला कायम विरोध होता. ही मंडळी बहुतांशी काँग्रेससमर्थक होती. आमची १९९९ साली पहिली भेट झाली तेव्हा ते 'बिना अपार्टमेंट्स'मध्ये राहत होते व तिथे त्यांच्याबरोबर मी दोनतीनदा तरी जेवलो; डायनिंग टेबलाभोवतीच आमचे बोलणे व्हायचे. त्यांची ती सुमार अशा इमारतीतील सदनिका, घरातले साधे फर्निचर, त्यांचे कपडे, त्यांचे जेवण हे सर्वच 'कुलक' ह्या प्रतिमेशी अगदी विसंगत होते. त्यानंतरही पुढच्या सतरा वर्षांत त्यांची जीवनशैली जवळून बघता आली. उच्चपदी काम केलेल्या कुठल्याही सरकारी नोकरापेक्षा अथवा एखाद्या प्राध्यापकापेक्षा त्यांची राहणी अधिक आरामदायी होती असे मला तरी कधीच जाणवले नाही. 'बड्या बागाईतदारांचे प्रतिनिधी' वगैरे आरोप त्यांच्यावर करणे म्हणजे उघडउघड दुष्टपणा होता.
जोशींनी खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन केले म्हणजे ते 'बड्या भांडवलदारांचे बगलबच्चे' होते हाही असाच एक बिनबुडाचा गैरसमज! वस्तुस्थिती याच्या नेमकी उलट होती. सरकारच्या तथाकथित समाजवादी धोरणांचा सर्वाधिक फायदा भारतातील भांडवलदारवर्गाला होत होता. त्यांना मुळात खुली अर्थव्यवस्था व त्यातून येणारी स्पर्धा नकोच होती. लायसन्सपरमिट राज त्यांच्या पथ्यावरच पडणारे होते. एकदा एखादे उत्पादन करायचे लायसन्स मिळवले, की त्या मालाची परदेशाहून कधी आयात होणार नाही याची दक्षता घ्यायची, एवढेच त्यांचे काम होते. ते येन केन प्रकारेण जमवले, की आपले दुय्यम प्रतीचे उत्पादन भारतात अवाच्या सवा किमतीला विकणे त्यांना सहजशक्य होते. कारण एकदा स्पर्धा निर्माणच होऊ दिली नाही, की सगळे सेलर्स मार्केटच होते! माणसे विकत घ्यायची कला या भांडवलदारांना अवगत होती; केवळ राजकारणीच नव्हे तर कामगारनेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सरकारी अधिकारी वगैरे सगळीच समाजातील सत्तास्थाने पैशाच्या जोरावर वश करता येत होती.
चेतना गाला यांनी मुंबईला इंडियन मर्चेट्स चेंबरमध्ये एकदा जोशींचे मुक्त अर्थव्यवस्थेवर भाषण ठेवले होते. नवल म्हणजे त्यावेळी उपस्थित उद्योगपतींनी व त्यांच्या प्रतिनिधींनी जोशींना समर्थन देणे सोडाच, उलट खूप विरोधच केला होता. बौद्धिक संपदेचे रक्षण करण्याच्या डंकेल अहवालातील कलमावरून तर जोशींच्या भूमिकेला सर्वाधिक विरोध उद्योगपतींनी केला - विशेषतः औषध कंपन्यांनी. शेतकरी संघटनेला किंवा स्वतंत्र भारत पक्षाला कुठल्या बड्या भांडवलदाराने किंवा देशी-विदेशी फंडिंग एजन्सीने कधी मोठी देणगी दिल्याचे माझ्यातरी ऐकिवात नाही किंवा संघटनेच्या कुणा टीकाकारानेही तसे कुठे लिहिलेले नाही. आजकाल अगदी प्रादेशिक, राजकीय पक्षही शेकडो कोटींची माया जमवत असतात. हेच कॉर्पोरेट जग खरेतर अनेक तथाकथित पुरोगामी पक्षांना, व्यक्तींना व त्यांच्या संस्थांना मात्र वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात भरीव आर्थिक मदत करत होते. आणि त्यांच्याकडून भक्कम फंडिंग घेऊनही काही माणसे कायम 'पुरोगामी' म्हणून मिरवत आली आणि ज्याने तसे फंडिंग कधीच घेतले नाही, त्याला मात्र त्यांनी 'भांडवलशाहीचा बगलबच्चा' ठरवून टाकले! जोशींच्या कामाचे मूल्यमापन करताना अंजली कीर्तने लिहितात,
समाजवादाला कडवा विरोध करणारा हा विचारवंत! तो समाजाच्या पचनी पडला नाही. अनुल्लेखानं मारणं, कार्याची दखल न घेणं हे एखाद्याला नेस्तनाबूत करायचं, अवमानित करायचं, अगदी सुलभ आणि प्रभावी शस्त्र असतं. जोशींना ज्यांचा वैचारिक विरोध होता त्यांनी हे धारदार शस्त्र त्यांच्यावर मुबलक चालवलं. जोशींच्या कार्याला विरोध केला असता, तर विरोधाला तेजस्वी प्रतिकार करून जोशींनी विरोध परतवला असता. त्यापेक्षा सोपा मार्ग म्हणजे कार्याची दखल न घेणं, दुर्लक्ष करणं. प्रसिद्धीचे मार्ग बंद झाल्यानं जोशी ग्रामीण भागाच्या वर्तुळाबाहेर, शहरी संस्कृतीत फारसे पोहोचले नाहीत. उलट कांद्याचे भाव उगाचच वाढवणारा माणूस म्हणून शहरी माणसानं त्यांचा रागच केला.
छात्र युवा संघर्ष वाहिनीचे एकेकाळचे पूर्णवेळ कार्यकर्ते व आपल्या मार्मिक विश्लेषणात्मक लेखनाकरिता प्रसिद्ध असलेले यवतमाळचे सुधाकर जाधव 'शांत वादळाचा अंत' या आपल्या मृत्युलेखात म्हणतात,
शरद जोशींचे वेगळेपण कोणते असेल, तर ते म्हणजे त्यांनी समाजवादी विचाराच्या कैदेतून विचारकांची आणि सामान्य जनांची सुटका करण्याचा शतकातील सर्वांत मोठा प्रयत्न आणि प्रयोग केला.
जे व्यक्तिशः जोशींच्या संपर्कात आले त्यांना त्यांची वास्तविक बाजू कळली, पण बहुसंख्य विचारवंत केवळ माध्यमांतून त्यांच्याविषयी जे प्रसृत होत गेले त्यावरच विश्वास ठेवत गेले व अशा मंडळींच्या मनात जोशींबद्दलचे गैरसमज कायम राहिले.
यातले अनेक गैरसमज जोशींना प्रयत्नाने दूर करता आलेही असते; पण आश्चर्य म्हणजे त्यांनी त्यादृष्टीने फारसे काही प्रयत्न केल्याचे दिसत नाही; एकूणच प्रतिमानिर्मिती हा प्रकार त्यांनी कायम टाळला. हीदेखील 'प्रत्यक्षाहुनि प्रतिमा अद्भुत' असलेल्या आजच्या जगात चूकच म्हणावी लागेल. टीकेकडे दुर्लक्ष करत राहायचे धोरण त्यांना महाग पडले असेच मागे वळून पाहताना वाटते.
सिंहावलोकन करताना जोशींचे प्रसारमाध्यमांशी (मिडियाशी) जे नाते होते, त्याबद्दलचे काही विचारही मनात येतात.
पूर्वी जयप्रकाश नारायण व बाबा आमटे यांना किंवा अलीकडे अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांना मिडियाने जसे उचलून धरले, तसे जोशींच्या बाबतीत कधीच घडले नाही. कारण कदाचित मिडिया हाही शेवटी 'इंडिया'चाच भाग होता, 'भारताचा' भाग नव्हता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यामुळे माध्यमांमध्ये फारसे स्थानच नव्हते; तसे ते आजही नाही आहे. पण आपली प्रतिमा व्यापक समाजमनावर ठसवायची असेल, तर त्यासाठी आजच्याप्रमाणे तेव्हाही मिडियाला पर्याय नव्हता हेही तितकेच खरे आहे. मिडियाच तुमची larger than life प्रतिमा बनवू शकतो– मग तुम्ही नेता असा वा नट, उद्योगपती असा वा विचारवंत. सत्तेसाठी मिडिया 'सांभाळणे' आजच्याइतकेच तेव्हाही अपरिहार्य होते. इंदिरा गांधींपासून एखाद्या स्थानिक नगरसेवकापर्यंत बहुतेक सर्व नेते तेव्हाही ते करतच होते; पण ते जोशींना कधीच जमले नाही.
सुरुवातीपासून ज्यांनी शेतकरी आंदोलनात रुची दाखवली अशा पुण्यातील एका पत्रकाराने सांगितलेल्या आठवणीनुसार, ऐंशीच्या दरम्यान आपली निळी जीन्स घालून आणि मोटारसायकलवर बसून जोशी खूपदा त्यांच्या कचेरीत जात, संपादकीय विभागात समोर दिसणाऱ्या कुणाच्याही टेबलावर एखादे कार्यक्रमाचे पत्रक ठेवत आणि 'बघा, वेळ मिळाला तर वाचा; आणि वाटलं तर छापा' असे म्हणून लगेच आल्या पावली निघून जात; गप्पा मारणे नाही. छापण्याबद्दल विनंती करणे नाही. संपर्क वाढावा म्हणून कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही.
पुढे पुढे तर जोशींनी वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाणेही थांबवले. अनेकदा काही कार्यकर्ते एखाद्या खास सभेसाठी 'पत्रकारांना मुद्दाम जाऊन भेटावं, त्यांच्याशी चर्चा करावी व त्यांना आमंत्रण द्यावं' असे सुचवत. जोशी त्यांना उत्तेजन देत नसत. ते म्हणत,
"आपण असा जंगी बार उडवायचा की पत्रकार आपणहूनच आले पाहिजेत. आपण कशाला कोणाचं लांगूलचालन करायचं?"
याचा अर्थ त्यांना प्रसिद्धी नको होती असा नाही; पण आपले काम इतके महत्त्वाचे आहे, की त्याची दखल माध्यमांना घ्यावीच लागेल असा त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता.
सुरुवातीच्या काळात शेतकरी आंदोलनाकडे अनेक वृत्तपत्रे, विशेषतः शहरी मराठी वृत्तपत्रे, दुर्लक्ष तरी करत वा टीका तरी करत व त्यामुळे आपले कार्यकर्ते खचून जायची किंवा चिडायची शक्यता आहे ह्याची जोशींना जाणीव होती. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचा मतदारसंघ शेतकरी हाच आहे व नेमका तोच वर्ग आपल्यामागे येत असल्याने सत्ताधारी आपल्या कायम विरोधात असणार, येन केन प्रकारेण सरकारी आश्रयावर अवलंबून असणारी वृत्तपत्रेही आपल्या विरोधातच राहणार; पण एक ना एक दिवस त्यांना आपले महत्त्व मान्य करावेच लागेल हे जोशींचे गृहीतक होते. वर्धा येथील १९८० सालच्या अगदी सुरुवातीच्या प्रशिक्षण शिबिरातील भाषणात ते म्हणाले होते :
त्यांनी नेपोलियनचा संदर्भ द्यावा यावरून जोशींना स्वतःच्या कामाविषयी सुरुवातीपासून किती प्रचंड आत्मविश्वास होता हे दिसते; पण त्यांना अपेक्षित होते त्याप्रमाणे वृत्तपत्रांनी त्यांची नंतरही कधी भलावण केली नाही. किंबहुना नेपोलियनच्या वाटचालीत आला तसा पुनर्मूल्यांकनाचा योगही कधी जोशींच्या आयुष्यात आला नाही.हल्लीचे संपादक क्रिकेटपासून शेतकरी आंदोलनापर्यंत सगळ्याच विषयांवर सारख्याच अधिकाराने सल्ले देत असतात. त्यांतल्या बहुतेकांची धोरणं ही परिस्थितीनुरूप बदलत असतात. युरोपमधील फ्रान्सचा बादशहा सम्राट नेपोलिअन याच्या राज्यात एकदा बंड झालं आणि त्याला पकडून दूरवरच्या एल्बा नावाच्या बेटावर तुरुंगात ठेवलं गेलं. नेपोलिअनने तिथून आपली सुटका करून घेतली. त्यावेळी पॅरीसच्या वर्तमानपत्रांनी 'दरोडेखोर नेपोलिअनचे तुरुंगातन पलायन' अश मथळ्याखाली ही बातमी प्रसृत केली. पुढे नेपोलिअनने सैन्य गोळा करून प्रदेशामागून प्रदेश काबीज केले. जसजसा तो राजधानी पॅरिसच्या जवळ येऊ लागला, तसतसे वर्तमानपत्रांचे मथळे बदलू लागले! आणि नेपोलिअन जेव्हा पॅरिसच्या वेशीपाशी आपल्या सेनेसह आला, तेव्हा वर्तमानपत्रांनी 'सम्राट नेपोलिअनचे भव्य स्वागत' असे ठळक मथळे दिले!
माध्यमांनी शरद जोशींची पाठराखण केली नाही याचे कदाचित सर्वाधिक मोठे कारण म्हणजे शरद जोशींनी १९९०नंतर केलेला खुल्या अर्थव्यवस्थेचा उत्साही पुरस्कार.
केवळ पत्रकारच नव्हे तर देशातील बहुतेक विचारवंत, लेखक, राजकारणी, नोकरशहा, कामगारनेते. सामाजिक कार्यकर्ते हे सारेच निर्णायक घटक त्याकाळात समाजवाद आणि एकूणच डावी विचारसरणी यांच्या प्रचंड प्रभावाखाली होते. प्रत्यक्षात तुम्ही एस्टॅब्लिशमेंटचाच एक अविभाज्य भाग असलात, आणि एस्टॅब्लिशमेंटचे सारे फायदे तुम्ही घेत असलात, तरीही तुमची समाजातील प्रतिमा मात्र अँटी-एस्टॅब्लिशमेंट असणे आवश्यक होते. व्यक्तिगत जीवनात तुम्ही कितीही ऐश्वर्यात राहत असलात आणि भ्रष्ट असलात तरी जाहीर वक्तव्यांत मात्र तुम्ही डाव्या, तथाकथित पुरोगामी विचारांचे आहात असा देखावा निर्माण करणे आवश्यक होते.
खुद्द जोशींना याची जाणीव होती. "लालूप्रसाद यादव गुपचचूप रेल्वेत प्रायव्हेटायझेशन आणू शकले; पण लोकांपुढे मात्र त्यांनी 'कुल्हडमधून चहा देणारा' हीच स्वतःची 'खेडवळ' प्रतिमा माध्यमांतून दृढ केली. मला तसं करता आलं नाही," आमच्या एका मुलाखतीत जोशी म्हणाले होते.
पण मग हे सारे जाणवूनसद्धा त्यांनी आपल्या माध्यमसंपर्क धोरणात काहीच फरक का केला नाही? स्वतःशी प्रामाणिक राहायच्या आग्रहामुळे? अंतिमतः आपलीच भूमिका खरी ठरेल व सगळ्यांना स्वीकारावी लागेल या आत्मविश्वासामुळे? अहंकारामुळे? नेमके सांगणे अवघड आहे.
पण यात नुकसान माध्यमांचे नाही झाले, तर जोशींचे व एकूण शेतकरी आंदोलनाचेच झाले. कारण परिणामतः जोशींच्या एक दशांशही माणसे ज्यांच्या मागे नव्हती अशा अनेकांनी वृत्तपत्रांतील ठळक मथळे काबीज केले आणि जोशी कुठेतरी मागच्या पानावरच अडकले. त्याकाळी सोशल मिडिया हा प्रकार अर्थातच नव्हता, आजच्याएवढ्या टीव्ही वाहिन्याही नव्हत्या. त्यातल्या त्यात ग्रामीण वृत्तपत्रांनी शेतकरी आंदोलनाला थोडीफार प्रसिद्धी दिली, पण मोठ्या शहरांतल्या वृत्तपत्रांनी त्या आंदोलनाकडे जवळजवळ दुर्लक्षच केले. बहुतेक अभिजनवर्ग शहरातच राहत असे व तोच मतप्रवर्तक वर्ग होता, देशाची धोरणे ठरवणारा किंवा त्या प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकणारा होता. ग्रामीण भागातील बातम्या नीट पोचवण्यासाठी त्याकाळी तरी बहुतेक वृत्तपत्रांकडे यंत्रणाही नव्हती. आजच्याप्रमाणे तेव्हा संगणकाचा, इंटरनेटचा, जलद छपाई यंत्रांचा, स्थानिक आवृत्त्यांचा व एकूणच तंत्रज्ञानाचा सर्वदूर प्रसार झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला शहरी वर्गात योग्य ती प्रसिद्धी कधीच मिळाली नाही. उलट संघटनेच्या रास्ता रोको वगैरेंमुळे आपली गैरसोय होते हेच त्यांना प्रकर्षाने जाणवत राहिले.
पत्रकारांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन त्यांनी थोडा बदलायला हवा होता असे आज वाटते. जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन आणि नंतरचे आणीबाणीविरुद्धचे आंदोलन ह्यांत सक्रिय भाग घेतलेली अनेक ध्येयवादी आणि प्रामाणिक तरुण मंडळी ऐंशीच्या दशकात पत्रकारितेत शिरली होती. त्यांतील काहींशी जरी जोशींनी चांगले संबंध जोडले असते व टिकवले असते तरी त्याचा त्यांना खूप उपयोग झाला असता असे वाटते.
माध्यमांपासून अलिप्त राहिल्यामुळे म्हणा किंवा त्यांच्याशी जोडून घ्यायचा फारसा प्रयत्न न केल्यामुळे म्हणा, आपल्या आर्थिक लढ्यात आणि मुख्य म्हणजे आपल्या राजकारणात जोशींना माध्यमांचा उपयोग झाला नाही व त्यांच्या अपयशाचे ते एकमेव नसले तरी एक कारण नक्की होते.
राजकारणातील हे अपयश जोशींना जाणवत होते त्याहून खूप महाग पडले असे वाटते. राजकारणातील यशामुळे त्यांच्या अनेक समस्या सुटू शकल्या असत्या. उदाहरणार्थ, कार्यकर्त्यांची आर्थिक सोय लावणे. स्वतः कायम अर्थवादी मांडणी करत असताना, आर्थिक समृद्धीचे महत्त्व अधोरेखित करत असताना, जोशींना स्वतःच्या कार्यकर्त्यांची नीट आर्थिक सोय लावता आली नाही व हा त्यांच्या कामातला एक मोठाच अंतर्विरोध होता. 'शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षाला निदान मामलेदाराएवढेतरी मानधन आपण द्यायला हवे' असे ते अनेकदा म्हणाले होते. प्रत्यक्षात ते कधीच जमले नाही. सुरुवातीला कार्यकर्त्यांना दरमहा तीनशे रुपये मिळावेत म्हणून त्यांनी कृषि योगक्षेम संशोधन न्यासातर्फे प्रयत्न केले. निफाडच्या व इतर दोन-तीन साखर कारखान्यांनी उसापोटी शेतकऱ्यांना द्यायच्या रकमेतील काही विशिष्ट रक्कम शेतकरी संघटनेची वर्गणी म्हणून कापायची व संघटनेकडे एकरकमी जमा करायची असे ठरले. गेल्या तीस-चाळीस वर्षांत कामगार संघटना हे अगदी सर्रास करत आल्या आहेत व त्यामुळे त्यांच्याकडे सहसा कधी आर्थिक चणचण नसते. काही युनियन्स तर संपकरी कामगाराला आवश्यक तेवढे वेतनही देऊ शकत होत्या; इतकेच नव्हे तर कारखान्याच्या मालकांना जरूर पडली तर कर्जही देऊ शकत होत्या. शेतकरी संघटनेच्या बाबतीत मात्र हे प्रयत्न अगदीच अपुरे आणि अल्पजीवी ठरले; घरचे खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजण्याचाच प्रकार कायम असायचा. ह्या परिस्थितीला 'संन्याशाचे वैभव' वगैरे म्हणणे काही काळापुरते ठीक होते, पण ती दीर्घकालीन व्यवस्था नव्हती. त्यामुळे कौटुंबिक व अन्य अडचणींमुळे अर्थार्जन करणे आवश्यक होते असे बहुसंख्य कार्यकर्ते हळूहळू आंदोलनातून काढता पाय घेऊ लागले. निवडणुकीतील यशातून हे सारे पालटले असते.
राजकीय सत्ता मिळाली असती तर इतरही अनेक फायदे झाले असते यात शंकाच नाही. राजकीय सत्तेबरोबर शेकडो लोकांना उपकृत करायची एक मोठी संधी प्राप्त होते. असंख्य समित्या असतात, महामंडळे असतात, पदे असतात, विदेश दौरे असतात; कोणाला साखर कारखाना दे, कोणाला कॉलेज काढू दे, कोणाला दूध महासंघ दे, अनुदाने दे, सदनिका वा भूखंड दे, सरकारी कंत्राटे दे; अशा अगणित मार्गांनी एक लाभार्थीचा गोतावळा (system of patronage) तयार करता येतो. प्रचंड आर्थिक बळ लाभते. पैशाकडे पैसा जातो या न्यायाने ते वाढतच जाते. सत्तेचा उपयोग करून माध्यमांशी चांगला संपर्क ठेवता येतो; आपली जनमानसातील प्रतिमाही जोपासता येते. सत्ताधीशांची उपद्रवक्षमतादेखील भरपूर असते. या साऱ्यातून सर्वोच्च नेत्याची सत्ता अधिकाधिक बळकट होतेच, पण इतरही अनेकांना नेता बनायची संधी मिळते. 'लोकांची सेवा करायची तर सत्ता ही हवीच,' असे स्वतः लोकनेता असलेले यशवंतराव चव्हाणही म्हणत.
ही राजकीय सत्ता, त्यातून तयार होणारी आर्थिक हितसंबंध जोपासणारी यंत्रणा, कार्यकर्त्यांना आत्मविकासासाठी व अधिकाधिक मोठे बनण्यासाठी मिळणारा वाव, त्यातून त्यांना लाभणारे बळ, अशा बलिष्ठ कार्यकर्त्यांची व नेत्यांची दुसऱ्या फळीतील साखळी आणि त्यांतून साधले जाणारे सर्वोच्च सत्तेचे सातत्य यांपासून शेतकरी संघटना कायम वंचित राहिली.
जेव्हा तुम्ही दुसऱ्याला काही देऊ शकता, तेव्हा तुम्हांला काहीतरी मिळायची शक्यताही दुणावते. एखादी मोठी संस्था किंवा व्यवसाय किंवा राजकीय सत्ता हाती असेल तर इतरांना देण्यासारखे बरेच काही तुमच्यापाशी असते; जे जोशींपाशी अजिबातच नव्हते.
शेतीमालाला वाजवी दाम ह्या एक-कलमी कार्यक्रमावर सर्व लक्ष केंद्रित केल्यामुळे इतर काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे जोशींचे फारसे लक्ष गेले नाही अशी काहीशी टीका त्यांच्यावर केली गेलेली आहे.
उदाहरणार्थ, अगदी सुरुवातीला त्यांनी शेतीला सुरुवात केली तेव्हा त्या संपूर्ण परिसरात गुरांचा डॉक्टर एकही नव्हता. शेतीच्या दृष्टीने ती मोठी गंभीर समस्याच होती. कारण त्यामुळे औषधाविना गुरे मरायचे प्रमाण तिथे भरपूर होते. शिवाय त्या काळात देशात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली संकरित गाईंची पैदास आंबेठाण परिसरात फारशी होत नव्हती. त्यामुळे दूधसंघ उभे राहणे वगैरे प्रकार दूरच होते. जेमतेम घरातील मुलांच्या वाट्याला येईल इतकेच दूध उपलब्ध असे. पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या उरळीकांचन येथील मणिभाई देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांचे या क्षेत्रातील काम देशभर वाखाणले जात होते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती या जोडधंद्यामुळे सुधारत होती. ज्या देशी गाई सरासरी एक-दोन लिटरपेक्षा जास्त दूध कधीच देत नव्हत्या, त्या विदेशी वळूशी संकर केल्यावर सरासरी वीस-बावीस लिटर दूध सर्रास देत होत्या. ही सारी परिस्थिती जोशींना नक्कीच माहीत असली पाहिजे. अशी श्वेतक्रांती त्यांनी स्वित्झर्लंडमधेही पाहिलीच होती. पण का कोण जाणे, आपल्या शेतीच्या प्रयोगांना जोशींनी ह्या श्वेतक्रांतीची जोड दिली नाही. आपल्या आंबेठाणच्या शेतावर सुरुवातीला त्यांनी गोठा बांधून घेतला होता, दोन-तीन म्हशी पाळल्याही होत्या; पण दोनतीन वर्षांतच त्यांनी तो जोडधंदा बंद करून टाकला.
साताऱ्याचे रमेश आगाशे हायड्रोलॉजिस्ट म्हणून केंद्र सरकारच्या नोकरीत वरिष्ठ पदावर होते. शरद जोशींच्या पंजाब आंदोलनाच्या काळात ते चंडीगढलाच होते. धरण आणि कालवे यांद्वारे होणाऱ्या पाणी वाटपात नदी खोऱ्याच्या खालच्या भागातील शेतकऱ्यांवर किती मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, पाण्याचे न्याय्य असे समवाटप होणे का गरजेचे आहे वगैरे प्रश्नांवर त्यांनी जोशींशी केलेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यात 'पाणी प्रश्नाचे गांभीर्य आपण पुरेसे विचारात घेतले नाही' असे जोशींनी कबूल केले आहे.
इतरही अनेक शेतीविषयक प्रश्नांकडे जोशींचे दुर्लक्ष झाले असे आता मागे वळून बघताना म्हणता येईल. याबाबत जोशींचे स्वतःचे समर्थन असे होते :
"शेतीमालाला वाजवी दाम मिळायला हवा ह्याच मुद्द्यावर लढण्यात आमची सगळी ताकद लागली होती. त्यामुळे शेतीउत्पादन वाढावं म्हणून काही प्रयत्न करण्यात मला स्वारस्य वाटत नसे. कारण एकदा शेती व्यवसाय तोट्यात आहे म्हटल्यावर जेवढं उत्पादन अधिक, तेवढा तोटा अधिक असा माझा सरळ हिशेब होता. त्यामुळे सुरुवातीच्या आठ-दहा वर्षांत तरी इतर कुठल्या गोष्टींकडे मी लक्षच दिलं नाही. त्या वेळच्या परिस्थितीत ते बरोबरच होतं."
सिंहावलोकन करताना इतरही काही प्रश्न मनात येतात.
उदाहरणार्थ, ते स्वत:ला एक यात्रिक म्हणवतात, पण या यात्रिकाची यात्रा 'शेतीमालाला रास्त भाव' या एकाच मुक्कामाशी जरा जास्तच तर रेंगाळली नाही ना?
'शेतीमालाला रास्त भाव' या एकाच सूत्रात आपला सर्व कार्यक्रम गुंफण्याचा जोशींनी प्रयत्न केला. सगळ्या जीवनाला सामावून घेईल अशा एखाद्या सूत्राचा, तत्त्वज्ञानाचा ध्यास त्यांना पूर्वीपासूनच होता. 'योद्धा शेतकरी'मध्ये त्यांनी म्हटले होते, "मार्क्सच्या तत्त्वज्ञानातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे - 'विचारपद्धत' ही कल्पना! आपल्या विचारांची अशी एक पद्धत तयार करता आली पाहिजे, की जिच्यामधील सर्व घटक हे एकमेकांशी तर्कशुद्धरीत्या संबंधित असले पाहिजेत!" हाच सूत्रबद्धतेचा ध्यास ते नंतर विकसित करत गेलेल्या, पण मुळात त्यांच्या विचारसरणीत प्रथमपासूनच अग्रस्थानी असलेल्या, स्वतंत्रतावादाच्या त्यांनी केलेल्या मांडणीतही आढळतो. स्वतःच्या या स्वतंत्रताप्रेमाची सांगड ते शेतकरी आंदोलनाशी घालतच, पण शिवाय थेट आपल्या डोंगर चढण्याच्या आवडीशी आणि अगदी क्लॉस्ट्रोफोबिक (बंदिस्त जागेत गुदमरणाऱ्या) शरीरप्रकृतीशीही घालत. पण मानवी जीवनाची एकूण व्यामिश्रता विचारात घेता सूत्रबद्धतेचा हा हव्यास अडचणीतच आणणारा नव्हता का? देशापुढील सर्वच समस्या सोडवण्यासाठी एकच एक गुरुकिल्ली अशी कधी असू शकते का?
अर्थात अशा प्रश्नांची उत्तरे सोपी किंवा एकमेव नक्कीच नसणार.
एखाद्याचे व्यक्तिगत जीवन आणि त्याचे व्यावसायिक जीवन हे दोन्ही कप्पे तसे स्वतंत्र असतात हे मान्य केले, तरी व्यक्तिगत आणि व्यावसायिक हे दोन्ही घटक तसे अपरिहार्यपणे एकमेकांवर परिणाम करतच असतात. शरद जोशींच्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वात त्यांच्या व्यावसायिक कामात बाधा घालेल असे काही होते का?
विचारार्थ एक उदाहरण घेता येईल. आपल्या त्या वेळच्या अधिकृत राजकारणप्रवेशाचे समर्थन करताना जोशींनी १९८४ साली लिहिले होते,
संघटनेच्या निर्णयात काहीही पक्षीय संबंध नाही. शेतकऱ्याच्या दृष्टीने सर्व राजकारणी सारखेच चोर आहेत. पण आज छातीवर बसलेल्या चोराला दुसऱ्या चोराच्या मदतीने दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. दुसरा चोर छातीवर बसण्याआधी सावधपणे उठता येते का, ते पाहावयाचे आहे.
(शेतकरी संघटक, १४ डिसेंबर १९८४)
पण ह्या समर्थनातही एक गोम आहे हे बारकाईने बघताना जाणवते – ज्यांना त्यांनी पाठिंबा दिला, त्यांनाही जोशींनी चोरच ठरवले होते; फार तर छोटा चोर ठरवले होते; आणि ज्यांना त्यांनी समर्थन दिले त्यांना ही भूमिका खूप खटकणारी असणार हे उघड आहे. 'बाकी सगळेच चोर, पण मी मात्र साव' हा या भूमिकेत अनुस्यूत असलेला अहंकारही तसा फारसा लपून राहणारा नाही. हा अहंकार कदाचित आत्मविश्वासापोटीही आला असेल; पण ते काहीही असले तरी एकूण सर्वच राजकारण्यांमध्ये जोशी अप्रिय ठरले याचे एक मोठे कारण इथे आपल्याला जाणवते.
यशवंतराव चव्हाण म्हणायचे ते बेरजेचे राजकारण जोशींना कधीच का खेळता आले नाही? चांगुलपणातूनही एक प्रकारचे औद्धत्य येत असेल का? संन्यस्ताचा अहंकार अधिकच दाहक असतो म्हणतात, तसे काही असेल का? तत्त्वांना मुरड घालणे मान्य नव्हते म्हणून असेल का?
काहीतरी भव्यदिव्य, आणि मुख्य म्हणजे इतरांपेक्षा अगदी वेगळे असे करून दाखवायची, तशी काहीतरी सैद्धांतिक मांडणी करायची त्यांची लहानपणापासूनची तीव्र महत्त्वाकांक्षा होती. याबद्दल मागे लिहिलेलेच आहे. एका अर्थाने स्वतःचे कर्तृत्व निर्विवादपणे सिद्ध करायचाही हा प्रकार असू शकतो. इतरांना जराही न आवडणाऱ्या संस्कृतात त्यांनी इतकी रुची घेणे, पुन्हा नंतर ते सोडून कॉमर्सला जाणे, त्यातही पोद्दारऐवजी सिडनम कॉलेज निवडणे, सकृतदर्शनी कुठचेही व्यावहारिक कारण नसताना स्वित्झर्लंडमधले सगळे वैभव सोडून भारतात परतणे, पूर्वानुभवाचा विचार करून अन्य एखादी वाट निवडणे सहजशक्य असताना चक्क कोरडवाहू शेती सुरू करणे या सगळ्यामागेही ही वेगळेपणाची आस जाणवते. ही भावनाही कदाचित इतरांशी जुळवून घेण्याच्या आड येणारी असू शकेल.
एक लक्षणीय उदाहरण म्हणजे विचारवंतांचे बुद्धिदारिद्रय हा त्यांचा लेख - ज्यात त्यांनी प्रथम 'नैतिक ऱ्हास हे आपल्या अवनतीचे मुख्य कारण नाही' ही भूमिका मांडली. लोणावळा येथे प्रा. वि. म. दांडेकर यांच्या राजकीय अर्थशास्त्र संस्थेतर्फे २२ व २३ डिसेंबर १९७९ रोजी 'देशातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेतून मार्ग कोणता?' या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. दांडेकर यांच्याशिवाय लॉ कॉलेजचे प्राचार्य सत्यरंजन साठे, अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य अलू दस्तूर, उद्योगपती नवलमल फिरोदिया, रँग्लर महाजनी, पत्रकार प्रेमशंकर झा वगैरे अनेक नामवंत मंडळी हजर होती. त्या सर्वांनी ढासळत्या नैतिक मूल्यांना प्राप्त परिस्थितीबद्दल सर्वाधिक दोष दिला होता. आपल्या त्या चर्चासत्रातील भाषणात व त्यावर आधारित उपरोक्त लेखात त्यांची मांडणी जोशींनी अगदी शब्दश: खोडून काढली होती. जोशींनी लिहिले होते.
समोरच्याला पूर्ण नेस्तनाबूत करण्याइतकी कठोर टीका करण्याचे काही कारण होते का, हा प्रश्नच आहे. का इतर सर्वांपेक्षा अगदी वेगळे काहीतरी मांडण्याची जोशींची आंतरिक गरज त्यामागे होती? अगदी सुरुवातीच्या काळात जाहीरपणे घेतलेली ही नैतिकतेला दुय्यम महत्त्व देणारी भूमिका आपल्या विशिष्ट स्वभावामुळे नंतर ते बदलू शकले नाहीत असेही झाले नसेल ना? जसे एकेकाळी त्यांनी जाहीर केलेला निर्णय कायम ठेवण्यासाठी कॉमर्सला प्रवेश घेतला होता, तसे? त्यांनी सामाजिक कार्याला इतका विरोध करण्यामागे असेच काही कारण असेल का?या विद्वानांच्या विचारांत इतका गोंधळ पाहून हसावे का रडावे हे समजेनासे होते. विषय इतका गंभीर आणि देशाच्या भवितव्याशी निगडित नसता तर पोटभर हसून भागले असते. भारतातील अर्थशास्त्र्यांच्या व समाजशास्त्र्यांच्या विद्वत्तेबद्दल आदर बाळगण्यासारखी स्थिती कधीच नव्हती, पण त्यांची अवस्था इतकी दयनीय असेल, असे वाटले नव्हते.
(प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश, पृष्ठ १९)
ओठात एक, मनात एक, असे व्यवहारी वागणे जोशींना कधीच जमले नाही. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा आणि शिवाय त्याजोडीला वागण्यात असलेला एक प्रकारचा उपजत कोरडेपणा ह्या गोष्टीही कदाचित व्यक्तिगत मैत्र जोडण्याच्या आड आल्या असतील.
कोणाला फार चिकटायचा त्यांचा स्वभाव नव्हता असे म्हणणे ही उनोक्ती ठरावी इतके कधीकधी ते व्रुत्तीने अलिप्त वाटत. 'त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खोली होती. पण रुंदी नव्हती' असे त्यांचे एक जवळचे सहकारी मला म्हणाले होते. "मी माणसे सांभाळणारा नाही असे बरेच लोक म्हणतात. कोणाशी फार सलगी दाखवणे मला कधीच जमले नाही," असे जोशींनी स्वतःही श्रीरंगनाना मोरे यांच्या सत्कारसमारंभात म्हटले होते.
स्वित्झर्लंडमधील त्यांचे सहकारी आणि शेजारी टोनी डेर होवसेपियां यांनी सांगितलेली ती आठवण यावर काही प्रकाश टाकते का - बुद्धिबळ खेळताना प्रथमच एकदा हरल्यानंतर पुन्हा कधीच जोशींनी त्यांच्याबरोबर बुद्धीबळाचा डाव मांडला नाही, ती आठवण? किंवा "He despised those who were intellectually mediocre" हे त्यांचे निरीक्षण?
आपल्या श्रेयविहीनतेचे भानही जोशींना कायम आहे. त्यांनी अनेकदा उद्धृत केलेल्या मॉमच्या त्या चार संतांच्या गोष्टीत प्रतिबिंबित झालेले. अगदी कॉलेजात असतानाही हातातोंडाशी आलेला यशाचा घास शेवटच्या क्षणी हिरावून घेतला गेला असे त्यांच्या बाबतीत दोन-तीनदा घडले होते. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील अगदी अपेक्षित असे यश तसे ओझरतेच हाती लागले होते. निवडणुकीत ते कधीच यशस्वी ठरले नाहीत; त्यांच्या सभांना गर्दी करणारेही त्यांना मत देत नव्हते. "तुमचे आयुष्य खडतर आहे आणि तुमच्या नशिबात राजयोग नाही" असे त्यांची पत्रिका पाहणाऱ्या एका धुळ्यातील ज्योतिषाने १९८५च्या सुमारासच त्यांना सांगितले होते. त्यांनी ती गोष्ट 'माझा असल्या ज्योतिष्यावर अजिबात विश्वास नाही' म्हणून झटकून टाकली नव्हती; अनेक वर्षांनी जोशींनी ते भविष्य मला ऐकवले होते; म्हणजेच त्यांच्या ते स्मरणात होते. ते भविष्य खरे निघाले असे म्हणता येईल का?
एखाद्याला आयुष्यात किती यश लाभावे हे बऱ्याच प्रमाणात नियतीवर अवलंबून असते असे काहीसे त्यांचे मत शेवटच्या काळात बनत गेले होते; पण त्याचबरोबर एकूणच महात्म्यांच्या मर्यादा त्यांना खूप पूर्वीच कळून चुकल्या होत्या – खरे तर पूर्वीच त्या मर्यादा त्यांना जाणवल्या होत्या. अगदी तीस वर्षांपूर्वीच्या एका लेखात ते लिहितात,
नवव्या प्रकरणात नमूद केल्याप्रमाणे शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या यशाचे श्रेयही त्यांनी स्वतःकडे कधीच घेतलेले नाही, तर ते त्या वेळच्या विशिष्ट परिस्थितीला दिले आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. ओढूनताणून प्रत्येक विजयाचे श्रेय स्वतःकडे घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या जगात हा वैचारिक प्रामाणिकपणा अगदी क्वचितच कुठे पाहायला मिळतो.भोवतालच्या वास्तविकतेशी संबंध नसलेला असा चैतन्यमय, प्रकाशमय विचार कोण्या थोर व्यक्तीच्या मनात तयार होतो आणि त्या विचाराप्रमाणे या व्यक्ती जगाचा इतिहास बदलतात, ही कल्पना दूर सारावयास हरकत नाही. विचाराने क्रांती होत नाही एवढेच नव्हे, तर विचाराने संघटनाही बनत नाही. प्रत्येक व्यक्तीचे आणि व्यक्तिसमूहाचे काही आर्थिक हितसंबंध असतात किंवा हितसंबंधांविषयी काही आडाखे असतात. या आडाख्यांच्या अनुरोधाने कृती करण्यासाठी संघटना उभी केली जाते आणि कार्यक्रमाच्या नियोजित दिशेला पूरक असा विचार, तत्त्वज्ञान प्रत्येक संघटना तयार करते. व्होल्टेअरच्या विचाराने फ्रेंच राज्यक्रांती झाली नाही; फ्रेंच राज्यक्रांतीच्या विचाराला व्होल्टेअरने शब्द दिला. थोडक्यात, विचार हा कारक नसतो; विचार ही एक सोय असते. सोईस्कर विचार आंदोलनाला वाचा देतो, प्रेरणा देतो, पण शेवटी अर्थकारण खरे. विचार हा अर्थकारणाचे प्रतिबिंब, हेच त्याचे खरे स्वरूप."
(शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख, पृष्ठ १५० -१)
तशी एकूणच जगात आज महात्म्यांची सद्दी संपली आहे असे त्यांना वाटे. दुसऱ्या एका जुन्याच लेखात ते लिहितात,
अर्थशास्त्राच्या जगात समाजव्यवस्थाच नव्हे, तर अगदी राज्यव्यवस्थासुद्धा उलथवून टाकणारे ग्रंथ एकेकाळी झाले. सगळ्या आर्थिक चलनवलनाचा संदर्भच बदलून टाकणारे ग्रंथराज १९३० सालापर्यंत प्रकाशित होत. अॅडम स्मिथचा ग्रंथ या नमुन्याचे पहिला आणि लॉर्ड केन्सचा 'सर्वदूर सिद्धांत' हे बहुधा शेवटचे उदाहरण. त्यानंतर कितीएक महान अर्थशास्त्री झाले; महाकष्टाने जमा केलेली प्रचंड आकडेवारी आणि माहिती, गणकयंत्राच्या साहाय्याने विश्लेषण करून पुढे मांडणारी कित्येक पुस्तके झाली; अर्थशास्त्रज्ञांना दरवर्षी नोबेल पुरस्काराचा रतीब सुरू झाला; पण लोकांची डोकी साफ धुऊन काढून त्यांना एक नवी स्वच्छ समज देणारा 'सर्वदूर सिद्धांत' पुन्हा झाला नाही. आता न्यूटन होत नाहीत. डार्विन होत नाहीत. लुई पाश्चर होत नाहीत. मादाम क्युरी होत नाहीत. याचा अर्थ संशोधन होत नाही असा नाही; त्यापेक्षा प्रचंड संशोधने होत आहेत; पण 'क्वांटम थिअरी'चा जनक कोण, आणि गुणसूत्रांच्या क्षेत्रातील कोलंबस कोण याचे उत्तर फार थोड्यांना माहीत असेल.
(अन्वयार्थ – एक, पृष्ठ ९४-५)
जोशींचे असे मूलगामी चिंतन वाचले, की विवेकानंदांनी स्वतःविषयी लिहिलेला व दत्तप्रसाद दाभोळकर यांनी उद्धृत केलेला एक मुद्दा आठवतो. ते लिहितात,
"मला आता एक गोष्ट समजली आहे. एकाच व्यक्तीने दार्शनिक, नेता, संघटक, कार्यकर्ता या भूमिका करणे शक्य नसते. त्यामुळे विचारांचे, संघटनेचे आणि आंदोलनाचे अपरंपार नुकसान होते."
जोशींना काळाच्या ओघात ह्या साऱ्या भूमिका बजावाव्या लागल्या. त्यांनी केवळ एखादा सूत्रस्वरूपातील विचार मांडला नाही, त्यांनी त्या विचारातून एक संपूर्ण तत्त्वज्ञान उभे केले, एक संपूर्ण विचारधारा उभी केली; त्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी एक प्रबळ संघटना उभारली, कार्यकर्ते घडवले, अनेक आंदोलने लढवली. हे सारे त्यांनी विलक्षण ताकदीने केले यात शंकाच नाही; पण कधीकधी वाटते, जोशींचा खरा पिंड एकांड्या विचारवंताचाच असावा. आंदोलनाला मिळालेला लक्षावधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना स्वतःलाही अनपेक्षित होता. त्या यशाने ते त्यावेळी भारावून गेले असावेत; पण ते यश म्हणजेच त्यांच्यातील विचारवंतासाठी एक पिंजरा ठरला का?
कधी कधी असेही वाटते, की हा माणूस मूलतःच इतरांपासून खूप वेगळा होता. "माझ्यासारखा माणूस कुठच्याच धर्मात, पंथात, पक्षात, गटात बसणारा नाही," असे ते एकदा म्हणाले होते. अन्य राजकारणी, समाजकारणी, नोकरशहा, अर्थतज्ज्ञ, लेखक, पत्रकार, डावेउजवे, समाजवादी-हिंदुत्ववादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, शेकाप यांच्यापैकी कुणाशीच त्यांचे फार जमले नाही; आणि खरे म्हणजे भोवतालाशी जुळवून घ्यायची त्यांना कधी आवश्यकताही भासली नाही; याचे कारण एक मूलभूत असे वेगळेपण हे असावे. 'योद्धा शेतकरी'मध्ये परुळकरांनी लिहिले आहे, की जाहीर सभेतही ते खूपदा व्यासपीठावर अगदी शांतपणे बसलेले असत, इतर सहकारी चर्चा करत असताना एकटेच शीळ घालत वा गाणे गुणगुणत असत; जणू आपण त्या गावचेच नाही. या अलिप्तपणामागेही ते मूलभूत वेगळेपण असू शकेल.
म्हणूनच ते आपली आरक्षणाला विरोध आणि डंकेलला पाठिंबा, गोहत्याबंदीला विरोध आणि जनुकीय बदल केलेल्या (जेनेटिकली मॉडिफाइड) बियाणांना पाठिंबा असली 'पॉलिटिकली इनकरेक्ट' मते बिनधास्त व्यक्त करत राहिले; पाश्चात्त्य पोषाखातील कोणालाही भेटायला महेंद्रसिंग टिकैतना आवडत नाही हे ठाऊक असूनही जोशींनी त्यांना भेटताना जीन्सटीशर्ट हा आपला वेष बदलला नाही. सार्वजनिक जीवन जगतानाही त्यांच्या व्यक्तित्त्वाचा एक मोठा हिस्सा खोलवर कुठेतरी आत्ममग्नच राहिला, सामान्यांमध्ये वावरतानाही आपले डौलदार राजहंसी वेगळेपण जोशी जपत राहिले.
त्यांच्या भाषणांत व लेखनात मागे वळून पाहताना होणाऱ्या अपेक्षाभंगाचा सूर कधीकधी व्यक्त झाला आहे. उदाहरणार्थ, श्रीरामपूर येथे १२ जानेवारी २००० रोजी त्यांनी दिलेले अण्णासाहेब शिदे स्मृती व्याख्यान. खुल्या अर्थव्यवस्थेकडे खुल्या मनाने या त्यांच्या पुस्तकात 'प्रचलित अर्थव्यवस्था व शेतकऱ्यांचे भवितव्य' या शीर्षकाखाली ते प्रकाशित झाले आहे. त्या एकाच लेखात त्यांनी सहा वेळा स्वतःचा उल्लेख स्पेंट फोर्स (ज्याचे कार्य संपलेले आहे) असा केला आहे.
त्यानंतर पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करताना ३० ऑगस्ट २००९ रोजी प्रसिद्ध झालेल्या आहुती सेनापतीची मंगल होवो तुला ह्या लेखात त्यांनी म्हटले आहे,
पण एक मात्र स्पष्ट जाणवते; वेळोवेळी अपेक्षाभंग झाला तरीही, मनासारखे दान नियतीने कधीच पदरात टाकले नाही तरीही, त्यांचा अंतर्मनाच्या गाभाऱ्यात भरून राहिलेला आत्मविश्वास त्यांना कधीही सोडून गेला नाही. गुंजाळ यांच्याशी झालेल्या एका पत्रव्यवहारात तो उत्तम प्रतीत होतो.आयुष्याची गाडी बऱ्यापैकी उतरणीला लागल्यानंतर, उमेदीच्या वर्षांत काय घडले, काय झाले, काय केले, काय करायला हवे होते याचा विचार साहजिकच मनात डोकावून जातो. आजतरी मला येणाऱ्या उषःकालाची अंधूकही छटा पूर्वक्षितिजावर दिसत नाही. शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात प्रेमाच्या माणसांना लाथाडून देशभर फिरलो. त्यांचे शाप आपल्याला लागले की काय, अशी शंकाही मनात येऊन जाते. रूढार्थाने माझ्यासारख्या नास्तिकाला ही भावना उचित नाही. मानसिक संतुलन पहिल्यासारखे खंबीर राहिलेले नाही, मन विचलित झाले आहे याचे हे लक्षण आहे, हे मलाही मान्य आहे."
(बळीचे राज्य येणार आहे... पृष्ठ १३४-५)
मोहन गुंजाळ हे शेतकरी संघटनेचे येवल्यातले एक तडफदार कार्यकर्ते. अकालीच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावरती एक सुरेख स्मृतिग्रंथ त्यांचे शेजारी आणि अनुष्टुभ या मराठी वाङ्मयीन त्रैमासिकाचे संस्थापक प्रा. गो. तु. पाटील यांनी संपादित केला आहे. त्यात गुंजाळ यांनी जोशींना ३ जानेवारी १९८६ रोजी लिहिलेले एक मनमोकळे पत्र छापले आहे. जोशी हृदयविकाराच्या पहिल्या झटक्यानंतर पुण्याच्या जहांगीर नर्सिंग होममध्ये दाखल असल्याची बातमी ऐकून त्यांच्या तब्येतीविषयी वाटणारी काळजी या पत्रात गुंजाळ यांनी व्यक्त केली होती. त्याला जोशींनी दिलेले उत्तरही स्मृतिग्रंथात छापले आहे. त्या पत्रोत्तरात जोशी लिहितात,
तुझे पत्र कालच सुरेशचंद्र म्हात्रे यांनी दाखवले. पत्रातील तुझी भावना पाहून दाटून आले. दहा वर्षांपूर्वी आल्प्समध्ये गिर्यारोहण करणारा, खरोखरच सणसणीत प्रकृतीचा मनुष्य पार संपायच्या आसपास येतो, हे कसे काय? तीन उपोषणे, सोळा तुरुंगवास, चार हजारावर सभा, रात्रीचा प्रवास, राहण्यासाहण्याच्या गैरसोयी, खाण्यापिण्यातला अनियमितपणा, एवढी दगदग लक्षात घेतली तरी प्रकृतीवर एवढा विपरीत परिणाम व्हायला नको होता असे वाटते. जनसामान्यांच्या बाजूने उठणाऱ्यांना हा काय शाप आहे?...
इस्पितळात इथे पडल्या पडल्या या प्रश्नांची उत्तरे मीही शोधतो आहे. काही काही प्रकाशकिरण सापडतातही. संघटनेच्या कामाला काहींनी संन्याश्याचे वैभव म्हटले होते. त्या वर्णनात एकेकाळी मीही खूप सुखावलो होतो. आमच्या विचारांच्या मस्तीत आम्ही सर्वतोपरी तयारी केली, ती आपापले जीव उधळून देण्याची. मग परिणाम हाच निघाला, की आमचे जीवच उधळले जाऊ लागले...
आम्ही वस्तुवादी रणनीती म्हणून केवळ सत्याग्रह, कायदेभंग स्वीकारला. पण ही साधने हाताळता हाताळता त्यातल्या अध्यात्माने आम्हालाच गिळून, पछाडून टाकले की काय? कळीकाळालाही नमवून मृत्युंजय होऊ या भावनेऐवजी पराभवातली काव्यमय रोमांचकता आम्हाला रुचू लागली आहे की काय?...
गेल्या काही वर्षांत मी आयुष्याच्या उतरंडीला लागलो आहे अशा मनाच्या अवस्थेत गेलो होतो. उरलेल्या काळात हाती घेतलेले काम जितके पुढे नेता येईल तितके न्यायचे, या कल्पनेतच समाधान मानू लागलो होतो. आज मी ठरवतो आहे – या राखेतून मी उड्डाण घेणार आहे. अगदी वैयक्तिक पातळीवरसुद्धा मी उताराला लागलेलो नाही. नव्या टेकडीवर चढायला सुरुवात करतो आहे.
'राखेतूनही पुन्हा उड्डाण घ्यायचा' हा जबरदस्त आत्मविश्वास हे जोशींचे कायम टिकलेले वैशिष्ट्य होते. त्याचे रहस्य होते, आपला विचार बरोबरच आहे याची खात्री. ही अचल वैचारिक निष्ठा त्यांना अवघड वाटेने जातानाही कायम आत्मबळ देत राहिली.
हाच आत्मविश्वास जोशींनी २१ फेब्रुवारी १९९८ मध्ये शेतकरी संघटकमध्ये लिहिलेल्या एका लेखातही दिसून येतो. मुळात स्वतंत्र भारत पक्षाच्या एका शिबिरात केलेले हे भाषण आहे. विशेष म्हणजे यात त्यांनी केलेले स्वतःचे मूल्यमापनही आपल्याला दिसते. जोशी लिहितात,
त्यांच्या दोन्ही मुली परदेशात स्थायिक झाल्या होत्या; मोठी कॅनडात व धाकटी युएसमध्ये. अनेक वर्षे ते घरी एकटेच राहत होते. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्यांना सर्व मदत करत, अगदी रक्ताच्या नात्याचे कुणी घेणार नाही एवढी काळजी घेत, पण शेवटी ते अनुयायी व जोशी नेते हे नाते कायमच होते. व्यक्तिगत जिव्हाळ्याचा असा, ज्याच्यापाशी मनातील सर्व दुःखे मोकळी करावीत असा, जवळचा कोणी मित्र नव्हता. आयुष्याच्या अखेरी अखेरीस असे एकटेपण अनेकांच्या वाट्याला येते; त्यात फार जगावेगळे असे काही नाही; पण जोशींच्या बाबतीत एकटेपणाचा हा कालखंड खूपच लांबलेला होता आणि कितीही नाही म्हटले तरी त्याचा परिणाम जाणवत असे.आजकाल माणसाचे मोजमाप करण्याच्या अनेक फुटपट्ट्या आहेत – पैसा किती गोळा केला? पदे किती मिळवली? खासदारकी मिळवली का? वगैरे, वगैरे. या सर्व फुटपट्ट्यांपेक्षा एक चांगली, महत्त्वाची फुटपट्टी आहे. स्वतःचे मूल्यमापन करायचे झाले, तर फक्त एका प्रश्नाचे उत्तर शोधा. या आयुष्यामध्ये स्वतःशी जास्तीत जास्त निष्ठा तुम्ही बाळगली का आणि त्यातला आनंद तुम्ही मिळवला का? 'माझ्या व्यक्तित्वाचा परिपोष करणे' या यात्रेपरता दुसरा आनंद नाही आणि ही यात्रा करताना मी जरी खड्ड्यात पडलो, अत्यंत वेदनामय परिस्थितीत सापडलो, नरकात पडलो तरीसुद्धा त्याची जी काही वेदना असेल ती माझी स्वतःची आहे आणि ती सहन करण्यातही मला आनंदच वाटतो, असे म्हणण्याची हिंमत ठेवली पाहिजे.
मी जिंकणार आहे; त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आजची चकमक जिंकेन किंवा नाही याची मला खात्री नाही आणि त्याची मला पर्वाही नाही; पण मी युद्ध जिंकणार आहे याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही. आज मोठे वाटणारे, आज सिंहासनावर बसणारे, आज हत्तीवर बसणारे उद्या पायउतार झाले, की त्यांचे इतिहासात नावसुद्धा राहत नाही. आज जी टीनपाट माणसे सत्तेच्या खुर्चीवर बसून, मोठी झालेली दिसतात, त्यांची नावे ज्या वेळी इतिहासाच्या पटलावरून पुसली गेलेली असतील, त्या दिवशी 'व्यक्तिस्वातंत्र्याच्या लढाई'करिता धडपडणारे लोक म्हणून तुमचे नाव त्या इतिहासात राहणार आहे.(पोशिंद्यांची लोकशाही, पृष्ठ १४६-७)
शेवटच्या वर्षभरात त्यांची प्रकृती अधिकाधिक खालावत गेली होती. त्या अवस्थेतून ते कधी नीटसे उठलेच नाहीत. शेवटी त्यांना पुण्याच्या रुबी हॉलमध्ये दाखल केले गेले. गेल्या काही वर्षांत अनेकदा ते तिथे जाऊन-येऊन होते. सुप्रसिद्ध डॉ. दुराई राज यांच्या प्रमुख देखरेखीखाली. अगदी शेवटी प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले. पण तोवर खूपच उशीर झाला होता.
या शेवटच्या खेपेला ते महिनाभर तिथे होते. 'आमच्या उपचारांमुळे आता फारसा काही फरक पडण्यासारखा नाही, तेव्हा तुम्ही त्यांना घरी नेलेत तरी चालेल,' असे तेथील डॉक्टरांनी सांगितल्यावर सारासार विचार करून त्यांच्या निकटवर्तीयांनी १ डिसेंबर रोजी त्यांना बोपोडीला घरीच आणायचा निर्णय घेतला. अखेरच्या आजारपणात दोन्ही कन्या भारतात येऊन गेल्या होत्या. अर्थात त्यांनाही त्यांचे त्यांचे संसार होतेच. दैनंदिन सांभाळ मुख्यतः दीदी, अनंतराव देशपांडे व सुरेशचंद्र म्हात्रे ह्यांनीच केला. आपल्या नेत्याला त्यांनी दिलेली इमानी, प्रेमाची आणि पूर्णतः निरपेक्ष साथ ही खरोखरच थक्क करणारी होती.
९ डिसेंबरला, बुधवारी, सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास मी व बद्रीनाथ देवकर त्यांना भेटायला गेलो. खोलीत प्रवेश करताच वातावरणातले गांभीर्य जाणवले होते. काही न बोलता आत बेडरूममध्ये गेलो. पलंगावर पडल्यापडल्या ते सारखे कण्हत होते, मधूनच 'झोंबतं आहे' असे बोलत होते. हा औषधांचा परिणाम असावा. त्यांच्या डोळ्यांत आम्हांला बघितल्यावर ओळख उमटली, पण संभाषण अर्थातच अशक्य होते. काही मिनिटे आम्ही पलंगाशेजारीच उभे राहिलो. पण त्यांच्या वेदना आम्हाला बघवेनात. डोळे पाणावले. गतकाळातले त्यांचे तेजस्वी रूप डोळ्यापुढे येऊन दुःखाचे कढ येत होते. डोळे पुसत आणि हुंदका आवरत आम्ही त्यांच्या बेडरूममधून बाहेर आलो. हॉलमध्ये येऊन बसलो. त्यांना सांभाळणारा आनंद नावाचा एक मुलगा तेवढा बेडरूममध्ये थांबला. जवळजवळ दोन तास आम्ही तिथेच होतो. दीदी, अनंतराव व म्हात्रेही तिथे होते. सगळे तसे गप्पगप्पच होतो. बोलण्यासारखे काही नव्हतेच उरलेले. क्वचित कधी होणाऱ्या संभाषणात 'कधी थांबणार हे सारं' हाच अव्यक्त सूर होता.
१२ डिसेंबरला, शनिवारी, सकाळी साडेनऊच्या सुमारास मला बद्रीनाथांचा फोन आला. "सकाळी नऊ वाजता साहेब गेले." काही क्षण काय बोलावे तेच सुचेना. सुन्न झालो. एका अर्थाने ते सुटले असे वाटत होते व त्याचवेळी एक खूप मोठा माणूस हे जग सोडून गेला ह्याची जाणीवही प्रकर्षाने होत होती. मुली अमेरिकेतून परत आल्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार झाले. बातमी लागताच गावोगावाहून धावून आलेल्या १५,००० शेतकरी बांधवांच्या साक्षीने वैकुंठावर दहन झाले.
एक पिंड ब्रह्मांडात विलीन झाला.
शेतकरी संघटना हा आता विझलेला निखारा समजायचा का? भावी पिढ्यांसाठी शरद जोशींचा वारसा काय असेल?
राजीव बसर्गेकर यांनी अंतर्नादमध्ये लिहिलेल्या लेखात शेवटी एक खंत व्यक्त केली होती :
बायाबापड्या 'इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो' म्हणतात. पण बळीराजाला पाताळात गाडणाऱ्या वामनाला दशावतारात स्थान आहे; गणपती उत्सवात गायल्या जाणाऱ्या दशावताराच्या आरतीत बळीराजाला विसरून वामनाची आरती गायली जाते, हेही सत्यच आहे.
याचाच अर्थ शेतकरी संघटना जे करू पाहत होती, शेतकऱ्याला त्याचे स्वातंत्र्य आणि सन्मान पुन्हा प्राप्त करून द्यायचे कार्य करू पाहत होती, त्याची आजही जरूरी आहेच. दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम युरोपात कधीच युद्ध झाले नाही, उलट युरोपियन युनियन निर्माण झाली, याचे एक कारण म्हणजे युद्धाचे मूळ कारण दूर करणारा अमेरिका-पुरस्कृत 'मार्शल प्लॅन'. शून्यातून सुरुवात करून त्यामुळे पश्चिम युरोपातील देश एका पिढीत वैभवशाली बनले. भारतातली शेतीसाठीदेखील बारीकसारीक कर्जमाफी, अनुदाने अशा छोट्या-छोट्या योजना न आखता एक सर्वस्पर्शी असा 'मार्शल प्लॅन' तयार केला पाहिजे असे जोशी म्हणत. शेतकरी समृद्ध होणे म्हणजेच दोन तृतीयांश देश समृद्ध होणे. हे ध्येय इतके विशाल आहे की त्याच्या पूर्तीसाठीच अजून कित्येक दशके लागू शकतील; एकाच आयुष्यात गाठता येईल असे ते मोजूनमापून ठरवलेले, आटोपशीर, सुरक्षित असे उद्दिष्ट नाहीच. त्यामुळे ध्येयपूर्तीच्या मापदंडावर त्यांच्या आयुष्याचे यशापयश कधीच मोजता येणार नाही.
शेतकऱ्यापुढे आज प्रचंड मोठ्या समस्या आहेत. शेतकऱ्याचा मुलगा आज शेती करू इच्छित नाही. जमिनीला उत्तम भाव आला तर या शेतीतून बाहेरच पडायची त्याची इच्छा आहे. शासनाने सर्वत्र कृषी विद्यापीठे काढली, कृषी महाविद्यालये सुरू केली त्यामागे अशी अपेक्षा होती, की इथले प्रशिक्षित विद्यार्थी इथे शिकलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान व व्यावसायिक कार्यपद्धती वापरून आपल्या शेतीचा विकास करतील. प्रत्यक्षात असे दिसते, की इथला जवळजवळ एकही विद्यार्थी परत स्वतःच्या शेतीकडे वळत नाही. एमपीएससी करून भरपूर पगार आणि त्याहून जास्त वरकमाई देणारी सरकारी नोकरी हेच त्याचे पहिले स्वप्न आहे. ते नाही जमले तर दरमहा पगार देणारी इतर कुठलीही नोकरी करायला तो तयार आहे; त्यासाठी काही लाख रुपये द्यायचीही त्याची तयारी आहे; पण त्याला आता शेती मात्र करायची नाही. हा खरे तर सगळ्या देशापुढेच मोठा गंभीर प्रश्न आहे. शेतीचे कमी कमी होत गेलेले क्षेत्र हेदेखील शेती किफायतशीर राहिलेले नाही याचे मोठे कारण आहे. त्यामुळे इच्छा असूनही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे शेतकऱ्याला परवडत नाही. कमाल जमीनधारणा कायद्याऐवजी किमान जमीनधारणा कायदा व्हायला हवा असे म्हणता येईल.
शेतकऱ्यांना शेतीमालाचा वाजवी भाव मिळावा व त्यातून ते समृद्ध व्हावेत एवढ्यापुरता जोशींचा विचार कधीच सीमित नव्हता. त्या मर्यादेत त्यांना बंदिस्त करणे हा त्यांच्यावरचा मोठा अन्याय होईल. स्वतंत्रतावादाची त्यांची मांडणी याच्या खूप पुढे जाणारी होती; किंबहुना सगळ्याच जगाला कवेत घेणारी होती. जोशींच्या विचारव्यूहात 'स्वातंत्र्याच्या वाढत्या कक्षा' ह्या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व होते. भारतीय शेतकरी त्यातील अगदी खालच्या पायरीवर होता. त्याचा सगळाच व्यवसाय सरकारी मगरमिठीत होता. आपल्या मालाची किंमत कुठलाही उत्पादक स्वतः ठरवतो, इथला शेतकरी याला अपवाद होता; आजही बऱ्याच प्रमाणात आहे. त्याची शेती म्हणजे कायमच त्याची गरिबी वाढवणारा, त्याला भांडवल खाऊन जगायला भाग पडणारा व्यवसाय होता; त्याला कायम लाचार ठेवणारा व्यवसाय होता. अशी कुठल्याही स्वरूपाची लाचारी जोशींना खूप क्लेशदायक वाटायची. म्हणूनच त्याचा निदान उत्पादनखर्च भरून निघावा, त्याला थोडेतरी स्वतःच्या पायावर उभे राहायचे बळ प्राप्त व्हावे, या उद्देशाने त्यांनी शेतीमालाला रास्त दाम ही एक-कलमी मागणी मांडली. पण लौकरच आपण याच्या पुढच्या पायरीवर जायला हवे, याची त्यांना जाणीव होती.
दुर्दैवाने वेगवेगळ्या सरकारांनी या देशात अनुदान संस्कृती इतकी खोलवर रुजवली, की त्या अनुदानाचे जणू व्यसनच समाजाला जडले. प्रत्येक गोष्टीकरिता सरकारकडेच बघायचे, जेवढे म्हणून फुकटात मिळेल तेवढे सरकारकडून उकळायचे अशी भीकमागी, हावरी, मिळेल ते मिळेल तिथून ओरबाडून घेणारी संस्कृती तयार झाली. मतांसाठी राजकीय पक्षांनी आणि सरकारने आणलेल्या आमआदमीवादाने तिला खतपाणीच घातले.
आंदोलक शरद जोशी जितके शेतकऱ्यांना भावले तितके नंतरचे खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थक जोशी त्यांना भावले नाही. शेतीमालाला अधिक भाव मिळावा म्हणून रास्ता रोको करायला लाखोंच्या संख्येने येणारे शेतकरी प्रयोगशेती आणि व्यापारशेती करायला उत्सुक नव्हते. योद्धा शेतकरी ही प्रतिमा व्यक्तिस्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या नेत्याच्या प्रतिमेपेक्षा शेतकऱ्यांना अधिक भावली. 'शेतीमालाच्या भावाचे राहू द्या, त्यापेक्षा आम्हाला शेतात मोबाइल टॉवर उभारायची परवानगी द्या; त्याचे भाडे आम्हाला घरबसल्या मिळत राहील' अशी मागणी जोशीच्या कानावर पडू लागली.
अशा सगळ्या परिस्थितीत शरद जोशींच्या अमूल्य वारशाचे संवर्धन कसे करता येईल याचा विचार आपण साऱ्यांनीच करायला हवा.
शरद जोशींनी आम्हांला काय दिले?
आपल्यापुढील बहुतेक प्रश्नांचे मूळ दारिद्र्यात आहे आणि या दारिद्र्याचे मूळ शेतकऱ्याच्या शोषणात आहे; शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित वाजवी दाम मिळेल अशी व्यवस्था केल्याशिवाय हे दारिद्र्य कधीही दूर होणार नाही, हे प्रथमत: त्यांनीच शास्त्रशुद्ध पद्धतीने आम्हांला पटवून दिले. शेतीचे खरेखुरे, केवळ पुस्तकी नसलेले, असे अर्थशास्त्र मांडणारे ते पहिलेच.
'इंडिया विरुद्ध भारत' या द्वंद्वाची मांडणी करून भारताचे मूलभूत दुभंगलेपण अधोरेखित करणारेही ते पहिलेच. शोषणाच्या चरकात पिढ्यानपिढ्या पिळून निघालेल्या; सर्वच राजकीय पक्षांकडून, सरकारी यंत्रणेकडून सदैव लाथाडल्या गेलेल्या शेतकऱ्याची वेदना त्यांनीच प्रथम 'इंडिया'च्या वेशीवर टांगली. उद्याच्या भारतासाठी छोटे-मोठे कुठलेही प्रयत्न करणारा कोणीही माणूस यापुढे त्या वेदनेकडे दुर्लक्ष करू शकणार नाही.
'इंडिया विरुद्ध भारत' हीच मांडणी 'संघटित विरुद्ध असंघटित' अशीही करता येते. समाजातील संघटित घटक आपापल्या मागण्या संघटनेच्या बळावर, कुठल्याही विरोधाला न जुमानता, पदरात पाडून घेऊ शकतात – मग ते विमानाचे पायलट असोत की प्राथमिक शिक्षक, सरकारी नोकर असोत की रिक्षावाले. जागतिकीकरणाच्या युगातही खऱ्या अर्थाने वंचित राहिले आहेत ते समाजातील असंघटित घटक. आणि शेतकरी हा देशातील सर्वांत मोठा असंघटित घटक पूर्वीही होता आणि आजही आहे. शहरातही आपल्या अवतीभवती दिसणारे अनेक सारे वंचित याच असंघटित घटकात मोडतात – कोरिअरवाली मुले, छोट्या दुकानांतील कामगार, कचरा गोळा करणारे आणि घरोघर दूध-पेपर टाकणारे. त्यांची यादी खूप मोठी होईल. खोलात जाऊन विचार केल्यावर लक्षात येते, की यांचेही पूर्वज एकेकाळी शेतकरीच होते. कधीच न परवडणारी शेती विकत विकत एक दिवस शेतमजूर आणि त्यातही भागेनासे झाल्यावर निर्वासित म्हणून शहरात हाच त्यांच्यापैकी बहुतेकांचा जीवनप्रवास असतो.
अशा शेतकऱ्यांची संघटना उभारणे महाकठीण काम. ते कोणी करू शकेल हेच पूर्वी शक्य कोटीतले वाटत नसे. पूर्णतः असंघटित आणि विखुरलेल्या अशा या सर्वांत मोठ्या समाजघटकाची प्रबळ अशी संघटना जोशींनीच प्रथम उभारून दाखवली.
दुबळा, पिचलेला, लाचार मानला गेलेला शेतकरीसुद्धा आपल्या न्याय्य हक्कांसाठी ताठ मानेने उभा राहू शकतो; कसल्याही आमिषाची अपेक्षा न ठेवता, आपली कांदा-भाकरी बरोबर बांधून घेऊन, लाखालाखाच्या संख्येने सभांना हजर राहू शकतो, रस्ते अडवू शकतो, लाठ्या झेलू शकतो, गोळ्या खाऊ शकतो हे त्यांनीच आम्हांला दाखवून दिले. इतक्या मोठ्या संख्येने हा शेतकरी पूर्वी कधीही – अगदी स्वातंत्र्यलढ्यातही – असा पेटला नव्हता. जोशींनी घडवून आणलेले शेतकरी आंदोलन हा एक चमत्कारच होता.
लक्ष्मीमुक्तीच्या अभूतपूर्व आंदोलनातून दोन लाख महिलांचे नाव सात बाराच्या उताऱ्यावर लावले गेले, आयुष्यात प्रथमच या भगिनींच्या नावे जमिनीचा एक तुकडा झाला; हाही एक चमत्कारच होता.
जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडून तिचे लक्ष दूर वळवण्यासाठी, स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी नेतेमंडळी धर्मभेद, जातिभेद, प्रांतभेद, भाषाभेद हे सगळे क्षुद्र भेद उभे करतात; सर्वसामान्य जनतेच्या मनात ते नसतात, हे त्यांनी स्वतःच्या अनुभवांवरून सिद्ध करून दिले.
शेती प्रश्न त्यांनीच ऐरणीवर आणला. शेती प्रश्नाला आज सर्वच राजकीय पक्ष निदान आपल्या बोलण्याततरी प्राधान्य देतात हे त्यांचेच यश.
जवळजवळ सर्व नेते आणि विचारवंत उदारीकरणाला आणि जागतिकीकरणाला विरोध करत असताना, येऊ घातलेली मुक्त अर्थव्यवस्था देशाच्या फायद्याची आहे; सबसिडी, कर्जमाफी, आरक्षण असल्या कुबड्यांची आपल्याला गरज नाही; स्वातंत्र्य हेच सर्वाधिक महत्त्वाचे मूल्य आहे यांसारखी अप्रिय मते त्यांनी निर्भयपणे लोकांपुढे मांडली. आपल्या अभिव्यक्तीच्या आड लोकेषणा कधी येऊ दिली नाही आणि जनतेचे लांगूलचालन न करताही जनतेचे प्रेम मिळवता येते, हे दाखवून दिले. विचार स्वच्छ व पक्का असेल आणि लोकमानसात ठसठसणाऱ्या वेदनेला नेमके उत्तर देणारा असेल, तर घराण्यात कुठलीही नेतृत्वाची पार्श्वभूमी नसताना, पाठीशी पैशाचे, जातीचे वा सत्तेचे बळ नसताना, एखादी व्यक्ती लोकशक्ती उभी करू शकते, जुलमी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष उभारू शकते, हा विश्वास त्यांनी समाजात निर्माण केला. शरद जोशी हे कालोचित विचाराच्या ताकदीचे एक जाज्वल्य प्रतीक आहे.
विशेष महत्त्वाचे म्हणजे त्यांनी शेतकऱ्याला, म्हणजेच देशाच्या सर्वांत मोठ्या समाजघटकाला आत्मसन्मान दिला, स्वाभिमान दिला. 'भीक नको, हवे घामाचे दाम' ही अभूतपूर्व घोषणा त्यांच्या शिकवणुकीचे सार आहे.
शरद जोशींनी आम्हांला काय दिले, याची यादी आणखीही वाढवता येईल.
आम्ही त्यांना काय दिले हा प्रश्न मात्र विचार करायला लावणारा आहे.