Jump to content

अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/सहकारी आणि टीकाकार

विकिस्रोत कडून

१४

सहकारी आणि टीकाकार



 एखादी व्यक्ती कितीही कर्तृत्ववान असली तरी तिच्या कार्यात अनेकांचा हातभार हा असतोच; त्याशिवाय मोठी कार्ये उभीच राहू शकत नाहीत. शेतकरी संघटना हा एकखांबी तंबू होता असे अनेक जण म्हणाले आहेत, पण प्रत्यक्षात अनेकांची जिवाभावाची साथ शरद जोशींना वेळोवेळी मिळत गेली हेही खरे आहे. अशा अनेक सहकाऱ्यांचा ह्या पुस्तकात वेळोवेळी उल्लेख झालाच आहे; तसा तो सर्वांचाच करणे स्थलाभावी अशक्यच आहे, पण तरीही आणखी काही सहकाऱ्यांविषयी इथे थोडेफार लिहिणे आवश्यक आहे; किंबहुना त्याशिवाय जोशींचे चरित्र अपुरेच राहील.

 मांडववाले गोपाळशेट ऊर्फ गोपाळ मारुती जगनाडे, ऑइल इंजिन दुरुस्त करणारे मधुकर रघुनाथ शेटे, फिटर अप्पासाहेब देशमुख वगैरे त्यांचे अगदी सुरुवातीचे चाकणमधले व्यवसायातून ओळख झालेले सहकारी. चाकणमधलेच पण सामाजिक कामातून जोडले गेलेले सहकारी. मोहनलाल परदेशी ऊर्फ बाबूलाल, शंकरराव वाघ, डॉ. अविनाश अरगडे, श्याम पवार आणि 'चाकणचे साने गुरुजी' मामा शिंदे. बाबूलाल परदेशी व शंकरराव वाघ यांची 'अंगारमळा' मध्ये जोशींनी चितारलेली व्यक्तिचित्रे जिव्हाळ्याने ओथंबलेली आहेत. 'शेतकरी संघटक'चे मालक म्हणून मोहन बिहारीलाल परदेशी हे नाव कायम छापले जात होते. शंकरराव आपल्या थट्टेखोर, दिलखुलास बोलण्यामुळे परप्रांतातील शेतकरीनेत्यांतही परिचित होते. श्याम पवार यांनी पुढे आपल्या म्हाळुंगे ह्या गावी एक हॉटेल काढले. जोशी तिथे खूपदा जात असत. आंबेठाणला मुक्काम असला, की खूपदा जोशी गप्पा मारायला अरगडेंकडे येऊन बसत; त्या छोट्या गावात त्यावेळी सुशिक्षित मंडळी थोडीच असत.
 या साऱ्यांशी संपर्क आला तेव्हा जोशी कोणी शेतकरीनेते वगैरे बनलेले नव्हते. खरे म्हणजे तेव्हा, आपल्या आयुष्यात असे काही पुढे घडेल ह्याची त्यांना स्वतःलाही अजिबात कल्पना नव्हती; इतरांना ती असायचे काहीच कारण नव्हते. 'माणूस तसा भला दिसतोय, शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करू पाहतोय,' अशीच इतरांची भावना होती. कांदा आंदोलन सुरू झाल्यावर मग हळूहळू जोशींच्या विचारांची झेप त्यांच्या लक्षात येत गेली. पण सुरुवातीलाच नात्यात निर्माण झालेली एक प्रकारची अनौपचारिकता व सहजता कायम टिकली. पुढे आंदोलनातही ही मंडळी भाग घेत असत, पण पहिल्या रांगेत बसायचा त्यांनी कोणीच कधी प्रयत्न केला नाही. या साध्याभोळ्या माणसांत जोशीही रमत असत.
 माधवराव मोरे, प्रल्हाद कराड पाटील, माधवराव बोरास्ते, बागलाणचे रामचंद्रबापू पाटील हे सारे ऊस आंदोलनातील सहकारी. बोरास्ते तसे अकालीच वारले, पण माधवराव मोरे, प्रल्हाद पाटील व जोशी यांची एक त्रिमूर्तीच बनली होती. चाकणच्या संघापेक्षा हा संघ वेगळा होता. ही सर्व मंडळी तशी पूर्वीपासूनच आपापल्या परीने नेतृत्वगुण असलेली होती; शेतकरी संघटनेलाही त्यांनी नेतृत्व दिलेच.
 विजय व सरोजा परुळकर, निपाणीचे प्रा. सुभाष जोशी हेही निकटचे सहकारी. काळाच्या ओघात पुढे जोशींपासून दूर राहूनही मनातील आदर जपून ठेवलेले.
 या साऱ्यांविषयी पूर्वी लिहिलेच आहे.

 पुण्यापुरता विचार केला तर शशिकांत बोरावके हे जोशींचे तसे पहिले सहकारी म्हणता येतील. 'सकाळ' दैनिकात ते सामाजिक व शेती प्रश्नांबाबत पत्रे लिहीत व ती वाचून जोशींनी स्वतःहूनच त्यांच्याशी संपर्क साधला होता. कोपरगावच्या प्रसिद्ध बागाईतदार बोरावके कुटुंबातील असूनही हे स्वतः अन्य व्यवसाय करत होते. पुण्यात फोटोकॉपीचे दुकान काढण्यापासून वाचनालय चालवण्यापर्यंत अनेक व्यवसाय त्यांनी केले. शेतीतून बाहेर पडायची गरज त्या काळातच त्यांना जाणवली. पुढे त्यांचे काका, भास्करराव बोरावके शेतकरी आंदोलनात मोठे नेते बनले, पण शशिकांत बोरावकेंचा संपर्क हा त्यापूर्वीचा.
 पुण्याला जंगली महाराज रोडवर बालगंधर्व रंगमंदिरासमोर (११८७/६६ शिवाजीनगर) शशिकांत बोरावके यांची जागा होती. त्यांचे वाचनालय चालायचे, त्याच छोट्या खोलीत पुढे शेतकरी संघटनेचे कार्यालय सुरू झाले. ती खोली अवघी आठ बाय सहा फूट होती; पुढे शेजारच्याच १५ बाय २० फुटाच्या मोठ्या खोलीत कार्यालय हलवले गेले. जागा मोक्याची, बाहेरगावाहून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी सोयीची अशी होती. सिंध सोसायटीतील बंगला जोशींनी पत्नी वारल्यानंतर कुठल्यातरी कंपनीला भाड्याने दिला होता; त्यामुळे शेतकरी संघटनेला पुण्यात काहीच आसरा उरला नव्हता. अशा परिस्थितीत शशिकांत बोरावके यांनी ती जागा संघटनेला भाडे वगैरे न घेता वापरायला दिली होती ही मोठीच मदत होती.
 पुण्यातील आपल्या अवतीभवतीच्या बहुतेक पांढरपेश्यांना शेतकऱ्यांविषयी फारसे प्रेम नव्हते, ही गोष्ट लौकरच जोशींच्या लक्षात आली. शेतकरी म्हणजे बागाईतदार ऊस शेतकरी; माजलेला आणि धनदांडगा, असाच बहुतेकांचा समज असायचा. एका कोणातरी पुढारी बागाईतदराने आपल्या मुलीच्या लग्नात लक्षभोजन घातले आणि प्यायच्या पाण्याच्या विहिरीत बर्फाच्या लाद्या टाकल्या, ह्या ऐकीव कथेमुळे मध्यमवर्गीय पांढरपेशांच्या लेखी शेतकरी जणू बदनाम झाले होते. प्रत्यक्ष त्या बागाईतदाराची काय बाजू होती, ते जाणून घ्यायचा बहुतेकांनी प्रयत्नच केला नव्हता. स्वतः शेती करायला लागल्यावर जेव्हा तिथल्या विदारक परिस्थितीचे वर्णन जोशी आपल्या घरात करत होते, त्यावेळी सामाजिक कामात बऱ्यापैकी सक्रिय असलेल्या त्यांच्या उच्चशिक्षित मेहुणीची प्रतिक्रिया होती, "अहो, ह्या गोष्टींचा तुम्हांला जितका त्रास वाटतो, तितका त्यांना नाही वाटत. त्यांना अशा सगळ्या अडचणींची सवयच असते!" मध्यमवर्गीयांची ही तशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती.
 पुण्यातल्या काही जणांशी जोशींचे व्यावसायिक संबंध आले. उदाहरणार्थ, त्यावेळी सीडॅकमध्ये असलेले व पुढे एमकेसीएल कंपनीमुळे ख्यातकीर्त झालेले विवेक सावंत. जोशींचा त्यांनी स्वित्झर्लंडहून आणलेला प्रिंटर बिघडला होता व तो फक्त सावंत दुरुस्त करू शकतील असे त्यांना कोणीतरी सांगितले. त्यानुसार तो दुरुस्त करून घेण्यासाठी जोशी सावंत यांच्याकडे गेले होते. सावंतांनी तो दुरुस्त करून दिलाही! जोशींना तांत्रिक गोष्टींत बराच रस असल्याने दोघांच्या गप्पाही खूप होत, पण पुढे दोघांच्या कार्यबाहुल्यामुळे फारसा संबंध राहिला नाही.
 आणखी एक व्यावसायिक संपर्क म्हणजे गोपाळ परांजपे. मुंबई-पुणे रस्त्यावर फुगेवाडीत, अल्फा लव्हाल कंपनीसमोर त्यांचे शारदा मोटर वर्क्स नावाचे गॅरेज होते. योगायोगाने गॅरेजसमोरच एकदा जोशींची जुनी अँबेसडर गाडी बंद पडली. गाडीत ते एकटेच होते. कशीबशी ढकलत त्यांनी ती गॅरेजमध्ये आणली. दुरुस्तीला एक-दोन तास लागणार होते व तो सगळा वेळ जोशी गॅरेजमध्येच थांबले. एकीकडे कामगार दुरुस्तीचे काम करत होते व दुसरीकडे जोशी व परांजपे गप्पा मारू लागले. शरद जोशींच्या थोरल्या भगिनी सिंधुताई यांचे यजमान वसंतराव व परांजपे हे मुंबईच्या व्हीजेटीआयमधले वर्गमित्र असल्याचे गप्पांच्या ओघात कळले! परांजपे सांगत होते,
 "पहिल्याच भेटीत मी जोशीसाहेबांकडे आकृष्ट झालो. खरं तर वयाने मी त्यांच्याहून मोठा, पण मी त्यांना कायम 'जोशीसाहेब' म्हणत आलो. संघटनेच्या अनेक सभांना नंतर मी हजर राहू लागलो. तीन वेळा रास्ता रोकोत भाग घेतला. २ ऑक्टोबर १९८९च्या बोटक्लबवरच्या मेळाव्यातही मी होतो. आंबेठाणच्या प्रशिक्षण वर्गांत मी इतिहास विषय शिकवायचो. संघटना उभारण्यासाठी जोशीसाहेबांनी जे कष्ट घेतले त्याला खरोखरच तोड नाही."
 पण त्याचबरोबर परांजपे स्पष्टवक्तेदेखील होते. शेतकरी संघटनेवर खरपूस टीका करणारे त्यांचे एक विस्तृत पत्र शेतकरी संघटकच्या ६ जुलै २००९ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे.
 पुण्यातले एक तरुण स्नेही नितीन भोसले म्हणजे बळीराजा हे शेतीला वाहिलेले मासिक चालवणाऱ्या प्र. बा. भोसले यांचे चिरंजीव. फर्गसन कॉलेजात ते शिकत होते. वयात खूप अंतर असूनही जोशींशी त्यांची चांगली गट्टी झाली. खूपदा डेक्कनवर कॅफे डिलाइटमध्ये कॉफी पिता पिता त्यांच्या गप्पा रंगत. बहुतेकदा लीलाताईदेखील सोबत असत. फर्गसनमध्ये एकदा त्यांनी जोशींचे भाषणही ठेवले होते; भाषणाला चांगले पाच-सहाशे विद्यार्थी हजर होते. २५ नोव्हेंबर १९९४ रोजी जोशींनी पुण्यात कृषिअर्थतज्ज्ञांची एक परिषद भरवली होती. तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग तिला संबंध दिवस हजर होते. परिषदेत 'न बोलण्याच्या अटीवर' हजर राहण्याची अनुमती नितीननी मिळवली होती. नितीन म्हणतात, "तो दिवस माझा वाढदिवस असल्याचे कोणीतरी शरद जोशींना सांगितले. त्यांनी लगेच माझ्यासाठी केक मागवला व माझा तो वाढदिवस डॉ. मनमोहन सिंग आणि शरद जोशी यांच्यासोबत साजरा झाला!" पुढे शेतकरी संघटनेच्या एका अधिवेशनात नितीननी एक कृषिप्रदर्शनदेखील भरवले होते व त्यातून संघटनेला पाच लाख रुपये मिळवूनही दिले होते. अखेरपर्यंत दोघांचा स्नेह कायम राहिला.
 पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठाचे मनोहर आपटे हे तर त्यांचे खूप जवळचे मित्र बनले. ते वारल्यानंतर त्यांच्यावर जोशींनी एक उत्तम लेखही लिहिला होता.

 काळाच्या ओघात इतरही काही पुणेकरांशी जोशींचा स्नेह जुळला. उदाहरणार्थ, आकाशवाणीवरील प्रसिद्ध वृत्तनिवेदक अरुण बेलसरे, रॅलीज इंडियामधील एक अधिकारी प्रतापराव बोर्डे, फडतरे चौकातील ओबीसी ड्रायक्लिनिंग वर्क्सचे मालक बाबा व्यापारी.
 आणखीही काही पुणेकरांचा इथे उल्लेख करायला हवा. उदाहरणार्थ, ल.स. तथा अण्णा केळकर. 'मॅट्रिक मॅगझिन'ची कल्पना त्यांचीच. ते वाचूनच अनेक प्राथमिक शिक्षकांनी बाहेरून परीक्षा दिली व शैक्षणिक गुणवत्ता सुधारली. एक मुद्रण व्यावसायिक, ग्रंथसंग्राहक व कौटुंबिक मित्र म्हणूनही ते जोशींच्या जवळिकीतले बनले. श्रेया जोशी व सुनील शहाणे यांचा साखरपुडा केळकरांच्या घरीच झाला. दत्तवाडीचे स. वा. भिडे हे दूध व्यावसायिक म्हणून संपर्कात आले. त्यांच्या अनुभवाचा बराच उपयोग दूध आंदोलनाच्या वेळी दूधाचा उत्पादनखर्च काढताना जोशींना झाला. अ. पु. तथा नाना आठवले हे असेच एक जवळचे मित्र. ते कॅलेंडर्सचा व्यवसाय करत. जोशींच्या काही पुस्तकांची व 'शेतकरी संघटक'ची सुरुवातीच्या चार वर्षांतली छपाई त्यांनीच करून दिली.

 शेतकरी चळवळ वणव्यासारखी पसरली, याचे मोठे कारण म्हणजे तत्कालीन तरुण शेतकरी समाजात शरद जोशींचे जबरदस्त आकर्षण निर्माण झाले होते. त्याची दोन कारणे असावीत.
 पहिले कारण म्हणजे, ते अतिशय तळमळीने करीत असलेले शेतीतील गरिबीचे मर्मभेदी विश्लेषण व त्यावर सुचवत असलेला उपाय. सगळा शेतकरी समाज त्या मांडणीसाठी जणू भुकेलेला होता; शिवाय जोशी जो विचार देत होते तो विचार इतर कोणीच देत नव्हते. 'आपण इतकी वर्षं इतकी मेहनत करूनही आपली स्थिती का सुधारत नाही?' या शेतकरी तरुणाला कायम छळणाऱ्या प्रश्नाला जोशींचा विचार हे अचूक व मनाला भिडणारे उत्तर होते. या विचाराच्या ताकदीमुळेच हा 'बाहेरचा' माणूस शेतकऱ्यांना इतका भावला. शरद जोशी ही त्या समाजाची त्यावेळची गरज होती. पंकज उदासने त्याच्या एका गजलेत म्हटले आहे,

'कितने दिनों के प्यासे होंगे यारो सोचो तो,
शबनम का कतरा भी जिनको दरिया लगता है!'

 दवाचा एक थेंबदेखील समुद्रासारखा भासावा, इतकी ह्या समाजाची तहान तीव्र होती. मुळातली तहानच इतकी तीव्र असल्याने हे भारावलेपणही तितकेच उत्कट होते.

 'नांगरून पडलेली जमीन...' या आपल्या एका लेखात (शेतकरी संघटक, २० एप्रिल १९८४) परभणी कृषी विद्यापीठातील एक विद्यार्थी व आता लातुरात असलेले प्राध्यापक शेषराव मोहिते लिहितात,

बऱ्याच दिवसांनंतर परवा गावाकडे गेलो होतो. तो बोडका माळ पार रया गेलेल्या म्हाताऱ्या माणसासारखा दिसत होता. नांगरून पडलेली जमीन पावसाची वाट पाहत, आसुसलेल्या नजरेनं आकाशाकडे पाहत सुस्त पडून होती. आक्रसलेल्या चेहऱ्याची माणसं भवितव्य नसल्यासारखी, अंधारात चाचपडल्यासारखी सारी जमवाजमव करण्याच्या मागे लागली होती. पण सहज बोलता बोलता शेतकरी आंदोलन, शरद जोशी, शेतकरी संघटना, शेतीमालाला भाव असले काही शब्द ऐकले, की युगानुयुगापासून पावसाची वाट पाहत नांगरून पडलेल्या जमिनीवर पावसाची सर बरसावी अन् ढगात वीज चमकून जावी, तशा त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या चमकत होत्या. हा 'काळ' आता आपली फार दिवस सोबत करणार नाही असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

 शेषराव मोहिते यांचा हा भावपूर्ण उतारा त्याकाळी शेतकरी समाज जोशींकडे किती असोशीने पाहत होता याची साक्ष पटवणारा आहे. अशा माणसाकडे समर्पणोत्सुक तरुण मने आपोआपच आकृष्ट होतात.
 डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर म्हणतात,

शेतकरी संघटनेचे अधिवेशन हा एक थरारक, भारावून टाकणारा अनुभव असतो. तीनचार वर्षांपूर्वी मी एक अधिवेशन पाहण्यासाठी गेलो होतो. खेड्यापाड्यातून पुरुष, बायका, मुलं झुंडीने येत असतात. मोटारसायकलीने, सायकलीने, बैलगाडीने वा पायी, बहुसंख्य बायका व मुलांच्या पायात चपला नसतात. हे आंदोलन धनदांडग्या शेतकऱ्यांचे नाही. सारेच शेतकरी गरीब असतात, पिळलेले असतात. त्यांच्यात धनदांडगा नसतो. धनदांडगा शेतकरी ही शहरी माणसाची कविकल्पना आहे, हे जाणवत राहते. साऱ्या जागेला एखाद्या वसाहतीचे स्वरूप आलेले असते. बायका, मुले काट्याकुट्या गोळा करून कोरड्यास भाकरी बनवत असतात. शरद जोशींना खडी तालीम देऊन त्यांचे होणारे स्वागत चित्तथरारक असते.

 आणि या तीव्र आकर्षणाचे दुसरे कारण म्हणजे जोशींचे व्यक्तिमत्त्व.
 जोशींनी आंदोलनाला सुरुवात केली, तेव्हा त्या ग्रामीण परिसरात ते साहजिकच उठून दिसत असत. शहरी, सुशिक्षित, ब्राह्मण, परदेशातली भारी पगाराची नोकरी सोडून इथे आलेला हा माणूस. याउलट ग्रामीण भागातली बहुतेक मंडळी गरीब, अल्पशिक्षित होती; पण तरीही त्यांच्याशी जोशी बरोबरीच्या नात्याने वागत असत. उच्चनीचतेच्या कल्पना हाडीमाशी रुजलेल्या तत्कालीन ग्रामीण समाजात जोशींच्या व्यक्तिमत्त्वाचे हे अंग ह्या तरुणांना पहिल्या भेटीतच आकर्षून घेणारे होते. जोशींच्या स्वभावात, वागण्याबोलण्यात एक कमालीची अनौपचारिकता होती. हा कदाचित पाश्चात्त्य संस्कारही असेल. ह्यामुळेही अनेक तरुण त्यांच्या संपर्कात आल्यावर भारावून जात. ह्या प्रथमदर्शनीच पडणाऱ्या प्रभावाची काही उदाहरणे लक्षात घेण्यासारखी आहेत.
 अंबाजोगाईचे अमर हबीब छात्र युवा संघर्ष वाहिनीतून आलेले. त्यांनी स्वतः उत्तम लेखन केलेच व शिवाय थोडा काळ 'शेतकरी संघटक'चे संपादक म्हणूनही काम पाहिले. आपल्या 'आकलन' या लेखसंग्रहात त्यांनी शरद जोशींबरोबर झालेल्या आपल्या पहिल्या भेटीचे वर्णन केले आहे. जोशींना भेटण्यासाठी पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टँडवरील एका टेलिफोन बूथवरून त्यांनी फोन केला. त्यांच्याकडे कधी आणि कसे यावे ते विचारायला. 'तुम्ही तिथेच थांबा. मी तिकडेच निघालो आहे." म्हणत जोशी स्वतःच तिथे आले. कधी एकमेकाला पाहिलेले नाही; आपण त्यांना ओळखणार कसे, याची चिंता करीत हबीब थांबले होते. एवढ्यात तिथे पोचलेल्या जोशींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत विचारले, "तुम्ही अमर हबीब ना?" त्यांनी आपल्याला कसे ओळखले हा हबीबना पडलेला प्रश्न! जोशींना एसटी बसने नाशिकला जायचे होते. "चला, आपण त्या रिझर्वेशनच्या रांगेत उभे राहू. मला नाशिकचे रिझर्वेशन करायचे आहे." असे सांगून ते झपाझप पुढे चालू लागले. हबीब लिहितात,

शरद जोशी रिझर्वेशनच्या रांगेत उभे राहिले. आम्ही त्यांच्या आंदोलनाविषयी प्रश्न विचारले व त्यांनी उत्तरे दिली. जोशी म्हणाले, 'सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत असा माझा दावा नाही. आपण मिळून काम करू. त्यातून आपल्याला उत्तरं सापडतील.' जोशींचे हे उत्तर माझ्या मनाला भावले. मी आतापर्यंत अनेक लोकांना भेटलो. जो तो आपल्याला सगळी उत्तरे माहीत आहेत अशा आविर्भावात बोलायचा. 'चला, आपण मिळून उत्तरं शोधू' असे कोणी म्हटले नव्हते. तसे फक्त शरद जोशी पहिल्यांदा म्हणाले. अशा माणसासोबत जायला भीती वाटत नाही.

(आकलन, पृष्ठ ८४)

 त्या काळात जोशी कसा एसटीने प्रवास करायचे; एवढेच नाही, तर स्वतः जाऊन रिझर्वेशनही कसे करायचे हे सगळे लक्षणीय आहेच, पण शिवाय पूर्णतः अपरिचित अशा एखाद्या तरुणाला त्यांनी इतक्या सहजगत्या भेटावे हेही दुर्मिळ आहे. अतिशय अकृत्रिम असा संवाद जोशी पहिल्या भेटीतच साधत आणि समोरच्याला जिंकून घेत. पुढे वर्षानुवर्षे हबीब यांनी जोशींबरोबर काम केले. जोशींचा मराठवाड्यातला पहिला दौरा त्यांनीच शेषराव मोहिते व सुधाकर जाधव यांच्या मदतीने आयोजित केला.
 पिंपळगाव बसवंतचे एक तरुण शेतकरी तुकाराम निरगुडे पाटील यांनाही जोशींनी असेच पहिल्या भेटीतच जिंकले होते. आपल्या कुटुंबासोबत एकत्र जेवायला बसवून आणि स्वतःच्या घरीच त्यांची रात्रीच्या मुक्कामाची सोय करून. मागे त्याबद्दल लिहिलेच आहे. त्या एका कृत्याने जोशींनी एक सहकारी जोडला; असा सहकारी की जो त्यांना प्रथम नाशिक जिल्ह्यात घेऊन गेला. पुढे निरगुडे संघटनेचे अध्यक्षही बनले.
 अलिबागचे सुरेशचंद्र म्हात्रे आणि अरविंद वामन कुळकर्णी जोशींना प्रथम भेटले निपाणी आंदोलनात; ती पहिली भेटही अशीच संस्मरणीय झाली होती. "मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातले आहात; आम्हाला वाटलं हेलिकॉप्टरने याल!" अशा नर्मविनोदी शब्दांत जोशींनी केलेल्या सहजस्फूर्त स्वागतात वातावरणातला प्रचंड तणाव दूर करण्याचे आणि त्याचबरोबर दोन उत्तम लेखक-कार्यकर्ते कायमचे जोडण्याचे सामर्थ्य होते.
 मराठी विचारवंतांनी व साहित्यिकांनी जोशी यांची योग्य ती कदर केली नाही याची कुळकर्णांना कायम खंत असायची. माणूस मधल्या एका लेखात (१४ मार्च १९८१) ते लिहितात,

नेहमीच्या मराठी पद्धतीला जागून शरद जोशी यांची खिल्ली उडविण्याचे कर्म जवळजवळ सर्व मराठी पत्रकारितेने केले. भारतात सत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यांची आर्थिक गळचेपी चव्हाट्यावर मांडावी, त्यांच्यासाठी न्याय मागावा हे अर्थशास्त्राला आजवर सुचले नाही. हे सारे छातीठोकपणे सांगणारा आणि नुसते आपल्या केबिनमध्ये बसून न सांगता त्यासाठी आवश्यक ती जागृती करणारा, संघटना उभारणारा, या क्षेत्रातील प्रस्थापितांची झोप उडवील असे रान उठवणारा शरद जोशी हा पहिला नि खराखुरा शेतकरी नेता आहे. आज कदाचित अतिशयोक्तीचा आरोप होईल; पण तो पत्करूनही असे म्हणावेसे वाटते, की दलितांना डॉ. आंबेडकरांच्या रूपाने जसा पहिल्यांदा सर्वार्थाने समर्थ नेता लाभला, तसाच या शरद जोशींच्या रूपाने आज शेतकऱ्यांना नेता लाभला आहे.

 दुर्दैवाने पुढे २९ ऑक्टोबर २००३ रोजी वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने कुळकर्णीचा बळी घेतला.
 शिरोळचे झुंजार आणि लोकप्रिय शेतकरीनेते राजू शेट्टी यांच्याविषयीही पहिल्या भेटीच्या संदर्भात इथे लिहायला हवे. जोशींपासून पुढे त्यांची वाट वेगळी झाली; त्यांनी वेगळी संघटना काढली आणि पक्षही. निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले. अत्यंत कमी आर्थिक बळ असताना. पुढच्या गावी जाण्यासाठी गाडीत पेट्रोल भरायला मागच्या गावचे शेतकरी पैसे गोळा करत. निवडणुकीत लागणाऱ्या अमाप पैशाबद्दल सगळे बोलतात; पण त्यालाही काही अपवाद असतात हे राजू शेट्टी यांनी सिद्ध केले. त्यांनी लिहिले आहे,

माझे वडील लहानपणीच वारले. त्यानंतर आई सोडून मी कोणाच्या कधी पाया पडलो नाही; अपवाद फक्त शरद जोशींचा. औरंगाबादला ते एकदा उपोषणाला बसले होते. सरकार लक्ष देत नव्हतं, म्हणून मी मोर्चा काढला. त्यांना ती बातमी कळल्यावर पंधरा दिवसांनी ते कोल्हापूरला आले. मोरेश्वर टेमुर्डेनी मला साहेबांच्या पुढे नेलं. 'हाच तो मुलगा' म्हणत भेट घालून दिली. 'एवढं धाडस करत जाऊ नकोस. लहान आहेस तू.' हे त्यांचे शब्द होते. त्यावेळी मी कॉलेजमध्ये शिकत होतो. त्यांनी स्वतःच्या हातांनी मला बिल्ला लावला. त्यावेळी त्यांनी पाठीवरून फिरवलेला हात मला जसाच्या तसा आठवतो. ही आमची पहिली भेट.

 आपल्या पहिल्या भेटीतच जोशींनी जोडलेल्या अशा कार्यकर्त्यांची यादी बरीच लांब होईल. राजीव बसर्गेकरांपासून मधु किश्वरपर्यंत अनेकांचा तो अनुभव होता. जोशींच्या व्यक्तिमत्त्वात एक अहंकार जाणवायचा, अशी टीका काही जणांनी केली आहे. ही यादी म्हणजे त्या टीकेला दिलेले एक उत्तर असेल. किंबहुना जोशींचे व्यक्तिमत्त्व हे दुसऱ्याला खिळवून घेणारे होते असे दिसते.

 कार्यकर्त्यांबद्दल लिहिताना कोपरगावचे भास्करराव बोरावके यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. एकेकाळी सव्वा लाख मोसंबीची झाडे असलेली, नऊशे एकरांची त्यांच्या कुटुंबीयांची शंकरबाग ही आशिया खंडातील सर्वांत मोठी मोसंब्याची बाग मानली जाई. पंडित नेहरूंपासून सर विश्वेश्वरय्या अय्यरांपर्यंत अनेक नामवंत मंडळी तिथे येऊन गेली होती. लहानपणापासून ते राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते होते. गर्भश्रीमंती असूनही सेवादलाच्या संस्कारामुळे त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. आणीबाणीत अनेक भूमिगत नेत्यांनी शंकरबागेत आसरा घेतला होता. पुढे राष्ट्र सेवा दलाचे ते विश्वस्तही झाले. पण 'शेतकरी संघटनेचे काम सोडा, असे सेवा दलाने सांगितले, तर मी सेवा दल सोडेन' हे त्यांचे उद्गार होते. पुढे शेतकरी संघटनेचे ते अध्यक्षही बनले. मितभाषी, मृदू, मनमिळाऊ भास्कररावांच्या शब्दाला संघटनेत सगळे फार मानतात.
 भास्कररावांना सगळे भाऊ म्हणतात. कोपरगाव परिसरात त्यांना मोठा मान आहे. सेवा दलाप्रमाणे शिर्डी येथील प्रसिद्ध साई संस्थानाचेही ते एक विश्वस्त होते. 'वारकरी' साप्ताहिक वाचून त्यांना जोशीविषयी प्रथम माहिती मिळाली. 'लिखित साहित्याचा आपल्याला शेतकरी आंदोलनासाठी फारसा उपयोग होणार नाही' हे जोशींचे पूर्वीचे मत कसे चुकीचे होते हेही ह्यावरून दिसते. कोपरगावला झालेल्या ऊस आंदोलनात भाऊ सामील झाले. त्यांच्यासारखा प्रतिष्ठित शेतकरी त्यात पडल्यामुळे साहजिकच आंदोलनाला मोठीच चालना मिळाली. आंदोलनात अटक झाल्यावर त्यांची रवानगी इसापूर तुरुंगात झाली. त्यावेळी इतरही सात हजार आंदोलक त्याच तुरुंगात अटकेत होते. योगायोग म्हणजे त्यांत बावीस वकीलही होते! आंदोलनाची व्याप्ती किती वाढली होती याची त्यावरून कल्पना येते. तुरुंगात असतानाच सर्व सत्याग्रहींनी आपला नेता म्हणून त्यांची निवड केली होती. पुढे ते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बनलेच.
 जोशींपेक्षा भाऊ पाच वर्षांनी मोठे. पुढे ते प्रत्यक्षातही जोशींचे जणू मोठे भाऊच बनले. लीलाताईदेखील त्यांना खूप मानत. पुण्यात भाऊंचे एक घर होतेच. पुण्यात आले की ते तिघेही नाटक-सिनेमा बघायला जात. भाऊंच्या पत्नी माईदेखील खूपदा सोबत असत. दोन्ही कुटुंबांत घरोबा होता. लीलाताई गेल्यावर जोशींनी भाऊंच्या खांद्यावर डोके ठेवूनच अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पुढे श्रेयाचे कन्यादानही भाऊंनीच केले.
 विनय हर्डीकर हे शेतकरी संघटनेचे एक वेगळेच कार्यकर्ते. वेगळे अशा अर्थाने, की अन्य कार्यकर्त्यांप्रमाणे ते शेतकरी कुटुंबातील वा ग्रामीण भागातील नव्हते. मूळचे ते मुंबईकर, पुढे उच्चशिक्षणाच्या निमित्ताने पुणेकर. इंग्रजीत एमए. व्यवसायाने पत्रकार. वृत्तीने विचारवंत. उत्तम लेखक. तेवढेच उत्तम टीकाकारही. शेक्सपीअरपासून शास्त्रीय संगीतापर्यंत अनेक क्षेत्रांत रुची आणि गती. आणीबाणीत तीन महिने कारावास भोगलेला. ज्ञानप्रबोधिनीपासून ग्रामायनपर्यंत अनेक संस्थांशी संबंध. पण एका जागी फारसे कुठे स्थिरावले नाहीत. सप्टेंबर १९८१मध्ये पिंपळगाव बसवंत येथे त्यांची व जोशींची पहिली भेट झाली. इंडियन एक्स्प्रेसमधील नोकरी सोडून ते १९८६च्या जानेवारीपासून जोशींबरोबर पूर्ण वेळ काम करू लागले. 'अन्य संघटना संपर्क' हे खाते त्यांच्यावर सोपवलेले.
 आणखी एक कार्यकर्ते परभणी जिल्ह्यातील सेलू गावचे गोविंदभाऊ जोशी. एक सधन शेतकरी. १९७० सालचे परभणी कृषी महाविद्यालयाचे प्रथम वर्गातले पदवीधर. शेतीप्रमाणेच संगीताचीही खूप आवड. वसंतराव देशपांडे हे त्यांचे मित्र. त्यावेळच्या सरकारी धोरणानुसार आधुनिक शेतीचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार व्हावा म्हणून त्यांनी १९७४च्या सुमारास कृषी सेवा केंद्र सुरू केले. गूळ गाळण्याची मोठी यंत्रणा उभारली. देना बँकेकडून कर्ज काढले. त्यात स्वतःचीही बरीच गुंतवणूक केली. दुर्दैवाने त्याच परिसरात पुढे गोदावरी-दुधना सहकारी साखर कारखाना निघाला. शासकीय नियमांप्रमाणे उसावर प्रक्रिया करणारी दुसरी कुठलीच यंत्रणा कारखान्याच्या परिसरात उभारता येत नाही. कारखान्याचे चेअरमन काँग्रेसचे आमदार होते. त्यांच्या दडपणामुळे गोविंदभाऊंना युनिट बंद करावे लागले. पोलिसांच्या साहाय्याने युनिटची वीजच बंद केली गेली! कर्जाचा बोजा मात्र डोक्यावर कायम राहिला. पुढे त्यांनी उत्तम प्रकारची ज्वारी विकसित केली. तिला बाजारात सुमारे दीडशे रुपये क्विटल असा भावही मिळत होता. पण दुर्दैवाने ती ज्वारी लेव्हीपोटी सरकारकडे जमा करावी लागली. तीही फक्त पन्नास रुपये क्विंटल दराने! सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांची पावलोपावली कशी कोंडी होते ह्याचा त्यांना आलेला हा दुसरा व्यक्तिगत अनुभव. पुढे १९८४ सालच्या परभणी अधिवेशनापासून ते शरद जोशींच्या सहवासात आले आणि मग ती साथ कायमचीच ठरली.
 गोविंद जोशी हे शेतीसोबतच शेतीसामानाचे एक दुकानही चालवतात. जोशींवर कुठलेही संकट आले, अडचण आली तर तत्काळ धावून जाणारी ही व्यक्ती. आम्ही ट्रेनने एकदा नांदेडला चाललो असताना न्याहारीचा डबा घेऊन ते मुद्दाम चार तास खर्च करून सेलूहून आले होते. जोशीवरच्या प्रेमापोटी.
 तसेच परभणीचे वकील व लेखक अनंतराव उमरीकर व त्यांचे प्रकाशक-लेखक चिरंजीव श्रीकांत उमरीकर. पुढे श्रीकांत उमरीकरांनी जोशींचे समग्र साहित्य प्रकाशित करून मोठेच काम केले. म्हात्रे यांच्यानंतर काही काळ 'शेतकरी संघटक'ची धुराही त्यांनी वाहिली; अंकाला आकर्षक, आधुनिक रूप द्यायचा प्रयत्न केला. पण पुरेशा जाहिराती मिळवता न आल्याने वा अन्य काही अडचणींमुळे 'संघटक' बंद पडले. अनेकांना त्याची आजही हळहळ वाटते.

 आजही जे आंबेठाणला अंगारमळ्यात राहतात आणि जे जोशींचे केवळ सारथी नव्हते तर जिवाचे साथी होते, ते बबन शेलार. तोंडाने फटकळ पण मनाने प्रेमळ. यांचे हस्ताक्षरही सुरेख. जोशींचे लेखनिक म्हणूनही ते काही वर्षे काम करत. धुळ्याचे रवी देवांग, शिक्षणाने सिव्हिल इंजिनिअर. शेतकरी संघटनेचे ते अध्यक्ष होते आणि त्याचवेळी विपश्यना या मौनाभोवती गुंफलेल्या तिबेटी अध्यात्मसाधनेचे प्रचारकही. नाशिकचे डॉ. गिरीधर पाटील, जे स्वतंत्र भारत पक्षाचे महासचिव होते व ज्यांना आपला बराचसा ग्रंथसंग्रह जोशींनी भेट दिला. हिंगणघाट तालुक्यातील आर्वी छोटी या गावचे कवी गंगाधर मुटे; शेतकरी संघटनेची वेबसाइट ते सांभाळतात. नाशिकचेच डॉ. श्याम अष्टेकर आणि त्यांच्या डॉक्टर पत्नी रत्ना पाटणकर, ज्या अगदी पहिल्यापासून जोशींबरोबर चाकण परिसरात खेडोपाडी रुग्णसेवा द्यायला फिरत असत. जोशींशी अगदी प्रथमपासून जोडले गेलेले हे एक ध्येयवादी जोडपे. इस्लामपूरचे उच्चशिक्षित व झुंजार शेतकरीनेते रघुनाथदादा पाटील, ज्यांनी पुढे स्वतःही वेगळी शेतकरी संघटना काढली. रावेरीच्या सीता मंदिराची जबाबदारी सांभाळणारे इंजिनिअर-शेतकरी बाळासाहेब देशमुख. नागपुरचे विजय जावंधिया; 'शरद जोशींचे वारसदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहायचो' असे मी काही जणांकडून ऐकले आहे. नागपूरचेच राम नेवले. जोशीच्या हातात घरखर्चासाठी म्हणून काही रक्कम देणारे सांगलीचे जयपालअण्णा फराटे. पुण्याचे मदन दिवाण आणि त्यांच्या पत्नी अलका. दिल्लीतील वास्तव्यात जोशींच्या निकट वावरणारी फारच थोडी कार्यकर्ता मंडळी होती; त्यांतले दिवाण एक प्रमुख. 'अंकुर सीड्स' कंपनीचे रवी काशीकर, यांचे घर म्हणजे संघटनेचे वर्ध्यातील कार्यालयच होते; आणि परिवार म्हणजे संघटनेचे हक्काचे पाईक. संघटनेला आर्थिक मदत करण्यात त्यांना मनापासून आनंद मिळत असे.
 नांदेडचे शंकरअण्णा धोंडगे आणि उत्साही अभियंते गुणवंत पाटील हंगर्गेकर, राजुऱ्याचे वामनराव चटप, वरोऱ्याचे मोरेश्वर टेमुर्डे (जे दोन वेळा आमदार झाले, महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापतीही झाले), लातूरचे पाशा पटेल, धुळ्याचे अनिल गोटे हे सारे अगदी बिनीचे शिलेदार. या साऱ्यांचा विशेषतः राजकीय प्रवासात पुढाकार होता. यांतल्या काहींनी पुढे अन्य पक्षात जाऊन नाव कमावले, पण आपली सुरुवात शेतकरी संघटनेपासून झाली ह्याची जाणीव कायम ठेवली.
 पुणे येथील 'माणूस' साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर, पुण्यातल्याच 'सोबत' साप्ताहिकाचे ग. वा. बेहेरे, नाशिकचे प्रसिद्ध उद्योगपती व 'देशदूत' वृत्तपत्रसमूहाचे मालक देवकिसन सारडा, अकोल्याच्या 'देशोन्नती' दैनिकाचे प्रकाश पोहरे ही पत्रकारितेतील मोजकी मंडळी, ज्यांना जोशींच्या कार्याचे महत्त्व जाणवले व ज्यांनी त्या काळात आपापल्या नियतकालिकांतून संघटनेच्या कार्याविषयी लिहिले.
 संघटनेच्या प्रसारात ज्यांचा मोठा वाटा आहे असे देवकिसन सारडा प्रस्तुत लेखकाला म्हणाले,
 "नाशिकच्या ऊस आंदोलनाला सुरुवात झाली, त्याच सुमारास एक दिवस मी शरद जोशींना मुद्दाम भेटलो. चांगले तीन-चार तास आमची चर्चा झाली. त्यांचे एकूण विचार मला पटले. म्हटले, माणूस प्रामाणिक आहे; देशाच्या भल्याचेच बोलतो आहे. आमचे संपादक शशिकांत टेंभे यांना मी नंतर बोलावून घेतले आणि माझे मत सांगितले. त्यांनाही ते पटले. देशदूत आणि सार्वमत अशी आमची दोन वृत्तपत्रे आहेत. आवृत्त्या अनेक आहेत. ह्या विचारांची पाठराखण करायचे आम्ही ठरवले. टेंभे यांचे सहकारी सुरेश अवधूत (जे पुढे संपादकही झाले) हे जिल्ह्यात जिथे जिथे संघटनेचा कार्यक्रम असेल, तिथे तिथे हजर राहत आणि सविस्तर वृत्तान्त लिहीत. नाशिक, सटाणा, श्रीरामपूर, शिर्डी, अहमदनगर वगैरे सगळ्या साखरउत्पादक परिसरात आमचे वाचक मोठ्या संख्येने आहेत. पुढची पंधरा-वीस वर्षे आम्ही सातत्याने शरद जोशींच्या आंदोलनाला भरपूर प्रसिद्धी दिली."
 दुर्दैवाने शेतकरी आंदोलनाची अशी पाठराखण मुंबई-पुण्याच्या कुठल्या वृत्तपत्राने केली नाही.
 मुंबईचे राजीव बसर्गेकर, नाशिकचे मिलिंद मुरुगकर, पुण्याचे विनय हर्डीकर, औरंगाबादचे मानवेंद्र काचोळे, यवतमाळचे सुधाकर जाधव, कोल्हापूरचे अजित नरदे, नागपूरचे शरद पाटील, मेटाखेड्याचे चंद्रकांत वानखडे ही विचारवंत मानली गेलेली मंडळी. म्हणजे शेतकरी संघटनेचे थिंक टॅक. आपल्या लेखनातून त्यांनी संघटनेचे विचार सर्वदूर पोचवले.
 घरंदाज मराठा घराण्यातल्या असूनही घराबाहेर पडून दारूदुकान बंदी आंदोलनात नेतृत्व देणाऱ्या व पुढे महिला आघाडीच्या अध्यक्ष बनलेल्या अमरावतीच्या विमल पाटील, वर्ध्याच्या सरोज काशीकर व सुमन अगरवाल, आर्वीच्या शैला देशपांडे, मुंबईच्या पत्रकार ओल्गा टेलीस, अमेरिकन असून ग्रामीण महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या गेल ऑमवेट, मुंबईच्या लेखिका व लघुपटनिर्मात्या अंजली कीर्तने, दिल्लीच्या मधु किश्वर, पुण्याच्या विद्युत भागवत, म्हसवडच्या चेतना गाला सिन्हा ह्या सर्व महिला सहकाऱ्यांचे योगदानही मोठे आहे. क्वचितच कुठल्या पक्षाला वा संघटनेला इतका कर्तृत्ववान व गुणसंपन्न महिला विभाग लाभला असेल.

 अनंतराव देशपांडे, बद्रीनाथ देवकर, सुरेशचंद्र म्हात्रे व दर्शिनी भट्ट हे चार कार्यकर्ते अखेरच्या काही वर्षांत जोशींच्या सर्वाधिक निकट राहिले. त्यांच्या निष्ठेविषयी व सेवावृत्तीविषयी लिहावे तेवढे थोडेच आहे.
 अनंतराव देशपांडे मूळचे लातूरचे. परभणी अधिवेशनापासून ते शेतकरी आंदोलनात सामील झाले. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची एक सभा उधळून लावण्याइतके 'धाडस' संघटनेत आल्यावर त्यांच्यात निर्माण झाले. शिवार योजनेत त्यांनीही एक शाखा लातूरला उघडली होती; पण ती सगळी योजनाच पुढे फसली. त्यांची उसाची शेती होती. तशी मोठी होती, पण पूर्ण तोट्यात.सामान्यतः शेतमजुरावर होणाऱ्या अत्याचाराच्या कहाण्या आपण ऐकतो. अनंतरावांची कहाणी वास्तवाच्या अगदी वेगळ्या अंगावर प्रकाश पाडते. त्यांचा पूर्ण तयार झालेला ऊस तोडायला ऊसतोडणी कामगारांनी नकार दिला. कितीही मनधरणी केली, कितीही मजुरी देऊ केली, अगदी हातापाया पडून विनवणी केली, तरी कोणी यायला तयार होईना. शेवटी तो सगळा तयार झालेला ऊस अनंतरावांना चक्क जाळून टाकायला लागला. शेतकरी किती मोठ्या

आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा जोशींनी सातत्याने पुरस्कार केला : १४ नोव्हेंबर २०००, जळगाव येथे ठिबक सिंचन यंत्रणेचे निर्माते भंवरलाल जैन यांच्यासमवेत
शेतकरी संघटनेच्या नोव्हेंबर २००३ मधील चंद्रपूर अधिवेशनात विक्रीसाठी ठेवलेली पुस्तके न्याहाळताना. सोबत सुरेशचंद्र म्हात्रे, सरोज काशीकर व शैलजा देशपांडे
एप्रिल १९९९. बायपास सर्जरीनंतर पुन्हा एकदा संगणक हाताळून स्वतःच्या क्षमता विलक्षण जिद्दीने व एकाग्रतेने पुनरुज्जीवित करताना आंबेठाण येथील आपल्या खोलीत
कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान स्वतः हाताळण्यात जोशी नेहमीच आघाडीवर असत - नोव्हेंबर २००३ मधल्या चंद्रपूर अधिवेशनात भरवलेल्या कृषी प्रदर्शनात ट्रॅक्टर चालवताना
ख्यातकीर्त कृषिशास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांच्यासमवेत एका परिषदेत
ॲड. राम जेठमलानी यांनी कायदेशीर प्रकरणात नेहमीच मोलाची साथ दिली. २८ मे १९९४, मुंबई, स्वतंत्र भारत पक्षाच्या एका बैठकीत.
जागतिक व्यापार परिषदेचे (WTOचे) तिसरे महासंचालक माईक मूर यांची दिल्लीतील एका हॉटेलात घेतलेली भेट, १० जानेवारी २०००.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भामा उद्योग नगरी, भूमिपूजन समारंभ, आंबेठाण, १२ मार्च १९९९
ॲड. दौलतराव घुमरे पत्नी लीलावती यांच्या समवेत. ऊस आंदोलनात ३१,००० शेतकऱ्यांना अटक झाली होती. घुमरे यांनी संपूर्ण नाशिक बार कौन्सिल शेतकऱ्यांच्या बचावार्थ विनामूल्य उभे केले.
विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर व अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमवेत शरद जोशी. नागपूर येथे १२ डिसेंबर १९८७ रोजी भरलेल्या संघटनेच्या सभेत. यांतील तिघांच्या नशिबात भविष्यात पंतप्रधानपदाचा योग होता.
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची नवी दिल्ली येथे किसान समन्वय समितीच्या सदस्यांसह भेट घेताना (डावीकडून भूपिंदर सिंग मान, हरयाणाचे किसान नेते प्रेमसिंह दहिया व शरद जोशी), १९ जानेवारी २०००
मुंबई येथे लेस्ली सोनी फाउंडेशनने आयोजित केलेल्या 'Outline of the Second Republic' ह्या विषयावरील जोशीच्या एका व्याख्यानानंतर जेआरडी टाटा व मिनू मसानी यांच्यासमवेत, १५ मे १९८७
(डावीकडून) भूपिंदर सिंग मान, बिपीनभाई देसाई, शरद जोशी व मिनू मसानी २८ मे १९९४, मुंबई, स्वतंत्र भारत पक्षाच्या एका बैठकीत.
५ एप्रिल १९९४, शेतकरी संघटनेच्या पाच आमदारांसह, महाराष्ट्र विधानसभेतील तत्कालीन उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांच्या मुंबईतील निवासस्थानी. (डावीकडून) ॲड. वामनराव चटप, शिवराज तोडचिरकर, ॲड. मोरेश्वर टेमुर्डे, शरद जोशी, डॉ. वसंतराव बोंडे व सरोजताई काशीकर.
शेवटचा ठळक असा जाहीर कार्यक्रम. यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते स्वीकारताना. सोबत अनंतराव देशपांडे व भानू काळे, २५ नोव्हेंबर २०१४, मुंबई.
भंडारदरा, ८ ऑगस्ट २०१५. दर्शिनी भट्टजी आणि अनंतराव देशपांडे यांच्यासह. शरद जोशी यांचे अगदी शेवटच्या कालखंडातील छायाचित्र.
प्रमाणावर मजुरांवर अवलंबून असतो, आणि मजूरही शेतकऱ्याचे कसे शोषण करू शकतात, याचे हे एक बोलके उदाहरण आहे. ह्या सगळ्याचा मानसिक ताण अनंतरावांना सहन होईना; त्यांना औदासीन्याने घेरले. एकदा तर त्यांनी आत्महत्या करायचा विचार केला.
 पुढे त्यांनी शेती बंद करायचा निर्णय घेतला. जमीन विकून टाकली. पुण्यात भोसरीला फ्लॅट घेतला. मुलांना शिकवले. एक मुलगा नोकरीनिमित्त कोरियाला गेला, दुसऱ्याला पुण्यातच चांगली नोकरी मिळाली.
 शेवटची काही वर्षे अनंतराव दिवसभर जोशींबरोबर राहत. औषधे जोशी नेहमीच आपली आपण घेत, त्याबाबतीत ते खूप दक्ष होते. पण अंघोळ करताना, कपडे बदलताना, उठताना, बसताना पुढे पुढे जोशींना सतत आधार लागे. व्हीलचेअरवरून कुठे जायचे म्हटले तरी कोणीतरी लागे. अनंतराव ही सारी कामे विनातक्रार, आपुलकीने व शांतपणे करत असत. जोशींना काही त्रास होत असेल तर रात्रीचा ते तिथेच मुक्कामही करत. 'साहेबांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यांनी आम्हाला जे दिले त्या तुलनेत हे काहीच नाही,' ह्या अत्यंत निरलस भावनेने अनंतरावांनी अखेरच्या श्वासापर्यंत जोशींची सेवा केली.

 कोपरगावजवळच्या टाकळी गावचे बद्रीनाथ देवकर ऊस आंदोलनापासून जोशींच्या संपर्कात आले. तीनशेचा भाव मिळेस्तोवर कारखान्याला ऊस घालायचा नाही हा संघटनेचा आदेश होता. कारखान्याची माणसे ऊस तोडायला आली तेव्हा बद्रीनाथांनी बांधावर उभे राहून त्यांना कडवा विरोध केला. त्यावेळी बरीच मारामारीदेखील झाली होती, पण उंचेपुरे बद्रीनाथ डगमगले नाहीत. त्याकाळात कितीही कष्ट केले तरी खर्च भरून निघण्याइतकेही पैसे शेतीत सुटायचे नाहीत; कमाई दूरच. भावंडांचे शिक्षण, बहिणींची लग्ने वगैरे घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावरच. नशिबाला दोष देत दिवस कंठत असताना उसाच्या आंदोलनात त्यांना आशेचा पहिला किरण दिसला आणि सगळे कौटुंबिक पाश तोडून त्यांनी आंदोलनात उडी घेतली. पूर्णवेळ संघटनेचे काम करू लागले. खूपदा असे व्हायचे, की घरची एखादी गाय विकून किंवा असेल नसेल ते दुसरे काही विकून ते अधिवेशनाला जात. ते एकदा मला म्हणाले होते, "वयाच्या चाळिसाव्या वर्षापर्यंत फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय, हेही मला ठाऊक नव्हते."
 संघटनेत बद्रीनाथ यांनी कधीच कुठले पद भूषवले नाही, कधी भाषणही केले नाही, कधी व्यासपीठावर दिसले नाहीत. त्यांचा तो पिंडच नव्हता. पण स्वतः पार्श्वभूमीवर राहन सगळे नियोजन करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या पत्नी शुभांगी म्हणजे श्रीरामपूरच्या प्रसिद्ध शिंदे कुटुंबातल्या. रावसाहेब आणि त्यांचे मोठे बंधू अण्णासाहेब शिंदे ही अगदी जुळ्या भावांप्रमाणे दिसणारी जोडगोळी सगळ्या नगर जिल्ह्यात प्रसिद्ध. दोघेही पूर्वी बेचाळीसच्या आंदोलनात व नंतर साम्यवादी आंदोलनात सामील झाले होते. पुढे दोघेही वकील झाले, रावसाहेब कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहवासात आले. आशिया खंडात सगळ्यांत मोठ्या मानल्या गेलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कामाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. संस्थेचे चेअरमन बनले. अण्णासाहेब पुढे यशवंतरावांच्या सल्ल्याने राजकारणात शिरले. सलग चौदा वर्षे ते कृषिमंत्री होते. शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा मार्ग दोघा भावांना तितकासा मान्य नव्हता, पण दोघांनाही जोशींबद्दल खूप आदर होता. रावसाहेबांच्या ज्येष्ठ कन्या म्हणजे शुभांगी; बद्रीनाथांच्या पत्नी. आपले जावई पूर्णवेळ शेतकरी संघटनेचे काम करतात याचा रावसाहेबांना अभिमान होता.
 शेतीतील एकूण दुर्दशा आयुष्यभर अनुभवल्यानंतर बद्रीनाथांनी एक निश्चय केला; कसेही करून निदान आपल्या मुलांना शेतीतून बाहेर काढायचे. तेच उद्दिष्ट समोर ठेवून ते पुण्याला राहायला आले. अनंत कष्ट उपसले, तब्येतीच्या व इतर प्रापंचिक अडचणी झेलल्या, संसाराचा गाडा चालवण्यासाठी बरीचशी शेती देवकरांना थोडी थोडी करत विकावीही लागली. जेमतेम तीनेक एकर शेती आणि राहते घर तेवढे राहिले. पण तिन्ही मुले आता परदेशात सुस्थितीत आहेत. कधी कधी महिना महिना बद्रीनाथ संघटनेच्या कामासाठी घराबाहेर असत, पण शुभाताईंनी सर्व भार विनातक्रार वाहिला. जोशींचा बद्रीनाथांवर पूर्ण विश्वास. आपली अनेक व्यक्तिगत कामेही जोशी त्यांच्यावर निःशंकपणे सोपवत. पुण्यात जेव्हा जोशींचा स्वतःचा फ्लॅट नव्हता, तेव्हा पुण्यात आले, की खूपदा त्यांचा मुक्काम देवकरांच्या पुण्यातल्या घरीच असायचा. पुण्यातील देवकरांचे सध्याचे घर आमच्या शेजारच्याच इमारतीत आहे. त्यांच्याकडे गेल्यावर जोशींना भेटायचा, त्यांच्याबरोबर जेवायचा योग मलाही आला आहे.

 सुरेशचंद्र म्हात्रे मूळचे अलिबागचे. गणिताचे प्राध्यापक. पण पिंड समाजसेवकाचा. त्यांचे एक सहकारी प्राध्यापक अरविंद वामन कुळकर्णी यांच्यासोबत ते जोशींना निपाणी येथे प्रथम भेटले. पहिल्या भेटीतच जोशी व त्यांचे विचार यांनी म्हात्रेच्या मनाची पुरती पकड घेतली. अलिबागची उत्तम नोकरी सोडून त्यांनी स्वतःहूनच पूर्णवेळ विनावेतन शेतकरी संघटनेचे काम करायचा निर्णय घेतला. जोशींना खरे तर ते तितकेसे पसंत नव्हते; पूर्णवेळ कार्यकर्त्यांची आर्थिक जबाबदारी अप्रत्यक्षपणे तरी आपल्यावर पडते व आजवर त्याबाबतीत आपल्याला फारसे यश मिळालेले नाही याच्या जाणिवेमुळे. 'माझा कुठचाही भार तुमच्यावर कधीच पडणार नाही' असे आश्वासन म्हात्रेनी दिले तेव्हाच जोशींचा विरोध मावळला. शेवटपर्यंत म्हात्रेनी ते आश्वासन पाळले. शरद जोशींनी चाकण येथे सुरु केलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्यपद त्यांनी काही काळ नाइलाजाने सांभाळले. खादीचे, घरी धुतलेले, बिनइस्त्रीचे साधे कपडे घालणारे, किरकोळ चणीचे, चष्मा लावणारे म्हात्रे नेहमी गंभीर असतात, पण साहित्य व कलांचे ते भोक्ते आहेत; स्वतः उत्तम हार्मोनियम वाजवतात. आधुनिक तंत्रज्ञानाची त्यांना नितांत आवड आहे व त्यातले बरेच काही त्यांना जमतेही.
 'शेतकरी संघटक'ची धुरा त्यांनी सव्वीस वर्षे वाहिली; मधला अमर हबीब यांनी सांभाळलेला व नंतर श्रीकांत उमरीकर यांनी सांभाळलेला कार्यभार सोडला तर जवळजवळ सर्वच काळ. अंकाची अक्षरजुळणी (डीटीपी) करायला अमोघ आर्ट्सच्या हरीश घाटपांडे यांच्याकडे ते येत व त्यांच्याकडेच अंतर्नाद मासिकाच्या अक्षरजुळणीचे कामही होई. चाळीस किलोमीटरवरच्या आंबेठाणहून सकाळी अगदी लौकर ते आपल्या मोटर सायकलवरून निघत व शनिवारपेठेत घाटपांडेकडे मजकूर घेऊन येत. संगणकावर ते उत्तम अक्षरलेखन करतात व बहुतेकदा जवळच्या सीडीवर ते पूर्वीच तयार केलेला मजकूर आणून देत. सर्व चुका सुधारून अंकाला अंतिम मुद्रणपूर्व रूप लाभेपर्यंत दिवसभर तिथेच थांबत. साहजिकच आमच्या तिथे कधीकधी भेटी होत, कामादरम्यानच्या वेळेत थोड्याफार गप्पाही. आपल्या संपादनाच्या व मुद्रितशोधनाच्या कामात म्हात्रे वाकबगार होते. काकदृष्टीने बघणाऱ्यालाही संघटकमध्ये सहसा चुका सापडत नसत. शेतकरी संघटकची जबाबदारी पार पाडताना म्हात्रेना अक्षरजुळणी करणारे हरिश घाटपांडे, मुद्रक गणेश ऑफसेटचे गिरीश दात्ये व बांधणीकार (कै.) मामा व जयंत भोसले यांची मोलाची मदत झाली; केवळ 'धंदा' म्हणून त्यांनी हे काम केले नाही. शरद जोशींचे बरेचसे मराठी व इंग्रजी लेखन म्हात्रे लिहून घेत व नंतर जोशींच्या सल्ल्याने त्याचे संपादनही करत.
 संघटनेत सर्व जण त्यांना म्हात्रेसर म्हणत व आजही म्हणतात. त्यावेळी आजच्यासारखी सरसकट सर्वांना 'सर' म्हणायची पद्धत नव्हती. पण एकेकाळी केलेल्या प्राध्यापकीमुळे व एकूणच वडिलकीच्या भावात ते वावरत असल्यामुळे सगळ्यांचे ते 'सर' बनले. हे संबोधन संघटनेत फक्त त्यांच्याकरिताच राखून ठेवलेले होते. इथे एक नमूद करायला हवे. जोशींना संघटनेत सगळे जण 'जोशीसाहेब' म्हणत; महिलांचे मात्र ते 'शरदभाऊ' असत. त्यांना फक्त 'शरद जोशी' म्हणणारे संघटनेत म्हात्रे एकटेच. म्हात्रे अविवाहित आहेत, कडक आणि शिस्तप्रिय म्हणून प्रसिद्ध आहेत, पण संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांच्या कुटुंबाशी त्यांचे घरच्यासारखेच संबंध आहेत. स्मरणशक्ती दांडगी, सगळी माहिती तोंडावर. संघटनेबद्दल काहीही विचारा; म्हात्रेना ते ठाऊक असते. आणि लगेच नाही सांगता आले तरी ती माहिती नेमकी कुठे असेल हेही त्यांना ठाऊक असते. त्यामुळे काही मिनिटांतच तुमच्यापुढे ती माहिती येते.
 शेतकरी संघटनेच्या माहितीपत्रकांत 'मध्यवर्ती कार्यालय' (Central Office) म्हणून आंबेठाणचा भारदस्त वाटेल असा पत्ता असतो; पण हे 'मध्यवर्ती कार्यालय' म्हणजे म्हात्रे एकटेच! संघटनेच्या कार्यक्रमात किंवा बैठकीत किंवा जोशी कोणाशी कसली चर्चा करत असताना ते आडबाजूला कुठेतरी बसतील; पण जोशींना कुठचीही माहिती हवी असेल तर ते मागायच्या आधीच त्यांची गरज ओळखून म्हात्रे ती पुरवायला सामोरे येतील. शेवटच्या काही वर्षांत जोशींनी केलेल्या जवळजवळ सर्वच लेखनाचे शब्दांकन म्हात्रेनी केलेले आहे. जोशींचे त्यांच्यावाचून चालणे अवघडच होते, असे मलातरी वाटायचे. इतरही अनेकांचे बहुधा तेच मत होते. कदाचित त्यामुळेच अधूनमधून होणाऱ्या स्वभावसुलभ मतभेदांकडे दुर्लक्ष करत जोशींनी म्हात्रे यांच्याशी कायम जुळवून घेतले होते.

 नर्मदा नदीचे पाणी दुष्काळात होरपळणाऱ्या शेतीला मिळावे म्हणून जोशींनी केलेल्या जनआंदोलनात त्यांच्या हाती लागलेले रत्न म्हणजे दर्शिनी भट्टजी ऊर्फ दीदी. त्यांचे वडील जोशींना खुप मानत. 'हे धरण होऊ नये म्हणून मेधा पाटकर जर नर्मदेत जलसमाधी घेणार असतील, तर हे धरण व्हावे म्हणून मी जलसमाधी घ्यायला तयार आहे,' असे उद्गार या तरुण सामाजिक कार्यकर्तीने काढले होते. 'बालमूर्ती' नावाचे मुलांसाठीचे एक मासिक त्या चालवत. माँटेसरी शिक्षणाचे भारतातील खंदे पुरस्कर्ते गिजुभाई बधेका आणि ताराबाई मोडक यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले हे मासिक. संस्थापकांच्या निधनानंतर एका न्यासातर्फे ते चालवले जाई. कुठच्याही ध्येयवादी मासिकाप्रमाणे बालमूर्तीचा संसारही भागवाभागवीचाच होता. त्याची व्यावहारिक जबाबदारी दर्शिनी यांनी घेतली होती.बडोद्याला जोशी हृदयविकाराच्या दुखण्यानंतर विश्रांतीसाठी आले असताना, त्यांना एखाद्या स्वीय सहायकाची गरज होती. त्यासाठी स्वयंस्फूर्तीने दर्शिनी पुढे झाल्या. आपले घरातले व जोशींना सांभाळण्याचे काम त्या इतक्या निगुतीने करत, की जोशींनी नंतर त्यांना पुण्याला येऊन त्यांच्या घरची जबाबदारी घ्यायची विनंती केली. बालमूर्तीच्या विश्वस्तांची व आपल्या कुटुंबाची परवानगी घेऊन त्या आल्या आणि मग २००० ते २०१६ अशी पुढची सोळा वर्षे जोशींबरोबरच राहिल्या. जोशी त्यांना आपली मुलगीच मानत. त्यांच्यातला धाडसीपणा थक्क करणारा होता. जोशी दौऱ्यांवर असताना खूपदा आंबेठाणला त्या एकट्या राहत. कधीकधी अगदी बिछान्याजवळून मोठाला साप जाई. पण त्या कधीही घाबरल्या नाहीत. किंवा जोशींशी पटले नाही म्हणून गुजरातेत आपल्या घरी परत जावे असे त्यांच्या मनातही आले नाही. कितीही त्रास झाला तरी त्यांनी आपल्या कामात कधी कुचराई केली नाही. जोशींच्या फ्लॅटला घरपण लाभले ते त्यांच्यामुळे. शेतकरी संघटनेतले सगळे कार्यकर्ते त्यांना 'दीदी' म्हणत. जोशींची शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी जी प्रेमाने आणि निरलस सेवा केली ती केवळ अजोड अशीच आहे.

 काही जण व्यावसयिक रूढार्थाने संघटनेचे कार्यकर्ते नव्हते; पण जोशींविषयी त्यांना जिव्हाळा होता व वेळोवेळी त्यांनी संघटनेच्या कामात सहभागदेखील दिला. नाशिकचे वकील दौलतराव घुमरे, मुंबईचे वकील राम जेठमलानी व नितीन प्रधान, संघटनेच्या हिशेबाची जबाबदारी घेणारे मुंबईचे अर्थसल्लागार व चार्टर्ड अकाउंटंट संजय पानसे, पुण्याचे जाहिरात व्यावसायिक शरद देशपांडे इत्यादी. यांच्याशी जोशींचा संबंध केवळ व्यावहारिक कामापुरता राहिला नाही; या सर्वांनी जोशींना आपापल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊनही मनःपूर्वक सहकार्य दिले.
 मुंबईचे एस. व्ही. राजू, दिल्लीच्या लिबरल ग्रुपचे वरुण मित्र व पार्थ शहा, किसान समन्वय समितीचे भूपिंदर सिंग मान, बंगलोरचे हेमंतकुमार पांचाल, केरळचे प्रा. बाबू जोसेफ, आंध्रातील शंकर रेड्डी, बुंदेलखंडातले डॉ. साहेब लाल शुक्ला, 'शेतकरी संघटक' मधील निवडक लेखांचा हिंदीत अनुवाद करून ते लेख उत्तर भारतात प्रसृत करणारे झाशीचे प्रा. रामनाथन कृष्ण गांधी, सुरतचे बिपीन देसाई व गुणवंत देसाई, लेखक इंद्रजित भालेराव व शेषराव मोहिते, नागपूरचे विधिज्ञ शरदराव बोबडे हीदेखील त्यांच्या स्नेहपाशात अडकलेली मंडळी.
 ही यादी खरे तर अजून खूप वाढवता येईल. पण कुठेतरी थांबायलाच हवे. ह्यांतील बहुतेक सर्वांबद्दल ह्या पुस्तकात वेगवेगळ्या ठिकाणी प्रसंगोपात्त लिहिले गेलेच आहे; ज्यांचा उल्लेख अनावधानाने राहून गेला असेल, त्यांची क्षमा मागतो.

 आपल्या कार्यकर्त्यांना उत्तम प्रशिक्षण मिळावे म्हणून जोशींनी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरे घेतली. त्यासाठी आपली इतर कामे बाजूला ठेवून भरपूर वेळ काढला. प्रवासात व एरवीही त्या कार्यकर्त्यांची बौद्धिक वाढ कशी होईल याकडे लक्ष पुरवले. त्यांचे क्षितिज अधिक विस्तृत व्हावे म्हणून त्यांच्यातील काहींना किसान समन्वय समितीच्या देशपातळीवरील कामात सहभागी करून घेतले व स्वतःबरोबर वेगवेगळ्या प्रांतांत नेले. मे १९९९मध्ये संघटनेच्या दहा कार्यकर्त्यांसाठी त्यांनी युरोपचा दोन आठवड्यांचा दौराही बेल्जियममधील 'युरोपा बायो' या संस्थेमार्फत आयोजित केला होता. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केला गेलेला हा पहिला आणि शेवटचा विदेश दौरा.
 शेतकरी संघटना उभारण्यासाठी अनेक कार्यकर्ते उभे करावे लागतील याची जोशींना पूर्ण जाणीव होती व म्हणूनच त्यांनी असे कार्यकर्ते उभे करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले. खन्ना येथील किसाननेत्यांच्या बैठकीत ते म्हणाले होते त्याप्रमाणे ते आणि कार्यकर्ते यांच्यातील नाते त्यांनी आई आणि मूल यांच्यातील नात्याप्रमाणेच मानले व तसे ते जपलेही. प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल त्याच्या त्याच्या वृत्तीप्रमाणे ते पावले उचलत गेले.उदाहरणार्थ, नरेन्द्र अहिरेसारख्या त्यांच्या एका खंद्या कार्यकर्त्याला त्यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून निवडून यायची प्रेरणा दिली तर अंजली कीर्तनेसारख्या लेखिका-विचारवंत मुंबईकर महिलेला स्वतंत्र भारत पक्षाचे चिटणीस बनवले.
 जोशींकडे आकृष्ट झालेले कार्यकर्ते वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे होते. काही जण खरे तर स्वतःच मान्यवर नेते होते. उदाहरणार्थ, अंबाजोगाईजवळच्या मोरेवाडीचे श्रीरंगनाना मोरे. जोशींपेक्षा ते चार वर्षांनी मोठे. जोशी भारतात यायच्यापूर्वीच त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेली अशी 'शेतकरी संघटना, मोरेवाडी' स्थापन केली होती. शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या इतर सर्व संस्था कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित होत्या. त्या काळात खरे तर, मराठा समाजातील बहुतेक सुशिक्षित तरुण यशवंतराव चव्हाणांमुळे काँग्रेसकडे आकृष्ट होत होते. त्यांना सत्ताही सहजतः मिळत होती. पण श्रीरंगनानांनी तो मोह टाळला. शेतकरीहित हेच आपले कार्यक्षेत्र ठरवले. आपले विचार श्रीरंगनाना मोठ्या धाडसाने मांडत. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी तब्बल ६४ दिवस संप पुकारला होता. त्या संपाच्या विरोधात नानांनी 'भ्रष्टाचारी नोकरशाहीचा धिःकार असो' अशी घोषणा देत शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा काढला होता. याचा धागा पुढे शेतकरी संघटनेने भ्रष्टाचाराच्या विरोधात जे 'Q' आंदोलन छेडले त्याच्याशी जुळतो. १९८० ते १९८४ अशी चार वर्षे नानांनी 'भूमिसेवक' नावाचे एक पाक्षिकही चालवले. मुख्यतः त्यात त्यांचेच लेख असत; पण एक वेगळेपण म्हणजे पाक्षिकाच्या प्रत्येक अंकात प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांची एखादी कविता प्रसिद्ध होत असे. पुढे नानांनी मुद्दाम नाशिकला जाऊन जोशींची भेट घेतली व ते जोशींच्या विचारांनी इतके भारावून गेले, की आपली संघटना त्यांनी जोशींच्या संघटनेत विलीन करून टाकली.
 श्रीरंगनाना हे एक टोक पकडले तर वसमत तालुक्यातील जवळाबाजारचे पुरुषोत्तम लाहोटी हे दुसरे टोक म्हणावे लागेल. एकेकाळी त्यांना 'वाया गेलेला मुलगा' असेच सगळे म्हणत. शाळा लहानपणीच सोडलेली. मटक्याचे व्यसन. पण जोशींच्या सहवासात आल्यावर ह्या 'वाल्याचा वाल्मीकी' झाला. संघटनेच्या कामात त्यांनी स्वतःला इतके वाहून घेतले, की स्वतःच्या आजोबा- भाऊ- पुतण्या यांच्या अंत्यविधीलाही ते त्यापायी हजर राहिले नाहीत. वाघा बॉर्डरपासून सरदार सरोवरापर्यंत जिथे जिथे जोशी जात, तिथे तिथे एखाद्या सुरक्षारक्षकाप्रमाणे लाहोटीही जात; सतत सावलीसारखे जोशींच्या मागे राहत. लाहोटींसारख्यांनाही जोशींनी आपले प्रेम दिले.
 कार्यकर्त्यांनी केवळ पुस्तकी अभ्यास न करता माणसांत रमावे असा जोशींचा आग्रह असे. अमरावतीचे दिनेश शर्मा यांची एक आठवण बोलकी आहे. व्यवसायाने शर्मा एक वकील. हिंदीभाषक, फर्डे वक्ते आणि तितकेच चांगले लेखक. आपली वाणी आणि लेखणी त्यांनी संघटनेच्या प्रसारासाठी कायम वापरली. शर्मा लिहितात, "माझ्या हातात नेहमी कुठले ना कुठले नवे पुस्तक असते हे लक्षात आल्यावर ते मला एकदा म्हणाले, 'माणसे म्हणजे जीवन. जीवनातील सत्य माणसांमध्ये शोधा, पुस्तकांत नाही. त्यानंतर माझे पुस्तकांवर अवलंबून राहणे कमी झाले आणि जीवनाबद्दलचे प्रेम वाढू लागले." (अंगारमळा – फेब्रुवारी २०१६ अंक, संपादन : गंगाधर मुटे, पृष्ठ १३३)
 सध्या राज्यमंत्री असलेले सदाभाऊ खोत यांची एक आठवण सांगण्यासारखी आहे. एकेकाळी ते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते; पुढे राजू शेट्टी यांच्या संघटनेत ते गेले. एकदा शरद जोशींबरोबर ते सोलापुरात होते. तेथील एका सराफी दुकानात कोणाबरोबर तरी भेट ठरली होती. दुकानातच उभ्या राहून सदाभाऊंच्या पत्नी काचेच्या कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र न्याहाळत होत्या. जोशींच्या ते लक्षात आले होते. गप्पा संपल्यावर जोशी त्यांना म्हणाले, "वहिनी, हा सदा तुम्हाला दोन वाट्या आणि काळे मणी यापलीकडे काही देऊ शकणार नाही." मग त्यांनी दोन-अडीच तोळ्यांचे ते मंगळसूत्र स्वतःच्या खिशातून पैसे काढून विकत घेतले आणि वहिनींना भेट दिले.
 कार्यकर्ते आयुष्यभरासाठी जोडले जातात ते अशा हृदयस्पर्शी क्षणांनी. जोशी अशा क्षणांची कायम उधळण करत राहिले. शेतकरी संघटना उभी राहिली ती अशा असंख्य क्षणांच्या गुंफणीतून.

 एखाद्या कार्यकर्त्याने आपल्या वागण्यात काही चूक असल्याचे दाखवून दिले, तर ती चूक सुधारून घ्यायचा खिलाडूपणाही जोशींमध्ये होता. त्याचे एक उदाहरण. चेतना गाला सिन्हा ह्यापूर्वी छात्र युवा संघर्ष वाहिनीत होत्या. जोशींशी नुकताच परिचय झालेला. खुलताबादला कार्यकारिणीची सपत्निक बैठक जोशींनी बोलावली होती व तिला त्याही हजर होत्या. त्यावेळी जोशी सिगरेट ओढत; त्या बैठकीतदेखील ते अधूनमधून सिगरेट ओढत होते. चेतना गालांन ते खटकत होते. पण दुसरे कोणीच काही बोलत नव्हते. शेवटी धीर करून त्या एकदम म्हणाल्या, "मला वाटतं. या मीटिंगमध्ये कोणीही स्मोकिंग करू नये. ही शिस्त आपण पाळायला हवी." सगळे एकदम चमकले, अचंबित नजरेने सिन्हांकडे बघू लागले. क्षणात खोलीत तणाव जाणवू लागला. त्याही काहीशा वरमल्या. पण नंतर लगेच जोशी स्वतः म्हणाले, "चेतना म्हणते, ते खरं आहे. मीटिंगमध्ये बसलेल्या कोणाही एका व्यक्तीला जर माझ्या स्मोकिंगचा त्रास होत असेल, तर मी मीटिंगमध्ये स्मोकिंग करणे गैर आहे." त्यानंतर त्यांनीही संघटनेच्या सभांमध्ये सिगरेट ओढणे थांबवले. बऱ्याच जणांना हा प्रसंग ठाऊक नसेल, पण जोशी एखाद्या अगदी नव्या कार्यकर्त्यांचेही म्हणणे पटले, तर ऐकत असत हे यावरून जाणवते.
 कवी इंद्रजित भालेराव यांनी त्यांच्याबरोबर आंबेठाण येथे घालवलेल्या दोन दिवसांबद्दल लिहिले आहे. त्यावेळी जोशी त्यांच्याशी टेबल टेनिस खेळण्यात रंगले होते आणि दोनदा हृदयविकाराचा झटका येऊन गेला असतानाही जिद्दीने भामचंद्रचा डोंगर चढून गेले होते.
 प्रत्येक वेळी कार्यकर्त्याने कार्यकर्ता याच भूमिकेत राहिले पाहिजे, जीवनातील आनंदापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे असे जोशींना अजिबात वाटत नसे. खूपदा आपल्या मनमोकळ्या वागण्याने जोशी वयातले अंतरही सहजगत्या मिटवून टाकत. एकदा ते आगगाडीने अहमदाबादला जात असताना चेतना सिन्हा त्यांच्यासोबत होत्या. प्लॅटफॉर्मवर उभे असताना हातातले कोल्ड ड्रिंक कोण लौकर संपवतो यावर त्यांच्यात पैज लागली होती! ती अर्थातच सिन्हा जिंकल्या होत्या!

 प्रत्येक वेळी इतर मंडळीच जोशींकडे आकृष्ट होत असे नव्हते, कधी कधी जोशी स्वतःहूनही काही जणांशी संपर्क साधत. शिवाय, प्रत्येकाने सामाजिक कार्यकर्ताच बनले पाहिजे असे जोशींना अजिबात वाटत नसे. त्यापेक्षा वेगवेगळ्या जीवनक्षेत्रांत त्यांनी कर्तृत्व गाजवावे असे जोशींना वाटे.
 उदाहरणार्थ, पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीशी संबंधित अशोक निरफराके. एसएससीच्या परीक्षेत ते संपूर्ण महाराष्ट्रात पहिले आलेले. त्यांची एक कविता एका मासिकाच्या 'युवा' विशेषांकात प्रकाशित झाली होती. तिचे 'ततः किम्?' हे संस्कृत शीर्षक आकर्षक वाटल्याने जोशींनी ती दोन-तीनदा वाचली. 'ठीक आहे, आलो पहिला, गाजवले कर्तृत्व, पण म्हणून काय झाले? आता पुढे काय?' असा काहीसा तिचा सूर होता. त्यांना २१ फेब्रुवारी १९९७ रोजी जोशींनी आपणहूनच एक मोठे, सहा पानी पत्र पाठवले होते. त्यात जोशी लिहितात,

राष्ट्रसेवा घडली पाहिजे अशी आपली दुर्दम्य आकांक्षा आहे. राष्ट्रसेवा म्हणजे आपण काय करू इच्छिता, हे मात्र लक्षात येईना. या देशातील कोट्यानुकोटी लोक दैन्यात आहेत; ते दैन्य दूर करण्यासाठी काही पौरुषाची प्रतिज्ञा आपण करू इच्छिता? जगभरात आज संशोधनाचा रथ प्रचंड वेगाने चालला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, जेनेटिक्स या क्षेत्रांत तर अद्भुत अवतरत आहे. तुम्ही राष्ट्रसेवा, राष्ट्रसेवा जी म्हणता, ती अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काही ज्ञानकण जोडून दिल्याने होणार नाही का?
गेल्या ऑलिंपिकमध्ये भारताची दुर्दशा झालेली आपण पाहिली. एरवीही भारतीय पुरुषांचे उच्चांक जागतिक महिलांच्या उच्चांकाच्या खालचे असतात. विद्या, कला, क्रीडा, नेतृत्व, वक्तृत्व या सगळ्याच क्षेत्रांत परिस्थिती अशी आहे, की आमची राष्ट्रीय शिखरे जगाच्या तुलनेत खुजी वारुळे दिसू लागावीत. मागासलेल्या देशात सारीच चणचण असली तरी महात्म्यांची वाण नसते. जन जितके अधःपतित, तितके त्यांचा उद्धार करण्याचा डौल मिरवणारे 'थोर' लोक अधिक संख्येने उपलब्ध. त्यांचा मानही मोठा. सारा देश दैन्यावस्थेतला, पण दैवी गुणांच्या महात्म्यांचा उदो उदो प्रचंड! मग कुवतीची तरुण मुले आइनस्टाइन होऊ पाहत नाहीत, आयफेल होण्याची धडपड करत नाहीत, व्हॅन गॉग होऊ पाहत नाहीत, बिल गेट्स किंवा पीट सँग्रस होण्याचे स्वप्न बाळगत नाहीत. उलट असल्या सगळ्या कर्तबगारीचा 'ततः किम' म्हणून उपहास करतात. आणि काही शाब्दिक वाचाळपणा करण्याच्या कामाला राष्ट्रसेवा म्हणतात. आपणही तसेच करणार काय?


 पत्राला निरफराके यांनी उत्तरही दिले होते, पण मग हा पत्रव्यवहार जोशींनी पुढे वाढवला नाही. हा सारा पत्रसंवाद पुण्याच्या वंचित विकास संस्थेचे विलास चाफेकर यांनी प्रसिद्धही केला आहे व तो जोशींच्या एकूण विचारसरणीची, त्यांच्या वर्ल्डव्ह्यूची ओळख पटवणारा आहे.
 साधारण अशाच स्वरूपाची मते जोशींनी हेरंब कुलकर्णी हे शिक्षक-कार्यकर्ते त्यांना भेटायला आंबेठाण येथे गेले होते, त्यावेळी मांडले होते. त्यांच्या अमृतमहोत्सव स्मरणिकेत एका लेखात ते प्रकाशित झालेले आहेत (पृष्ठ ४१ ते ४५). कुलकर्णी यांनी त्या भेटीच्या साधारण बारा वर्षांपूर्वी, १९९७ मध्ये, पाचव्या वेतन आयोगाने दिलेल्या वेतनवाढीला विरोध केला होता व एक शिक्षक म्हणून स्वतःला मिळालेली ही पगारवाढ गैर समजून नाकारली होती. जोशींना त्याचे खूप कौतुक वाटले होते व आपणहून नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील कुलकर्णीच्या शाळेत खास जाऊन त्यांनी कुलकर्णी यांचा जाहीर सत्कारही केला होता. शिक्षणक्षेत्रातले एक कार्यकर्ते म्हणून आणि त्याविषयी लेखन करणारे म्हणून कुलकर्णी प्रसिद्धआहेत. मेधा पाटकरांपासून बाबा आमटेंपर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांविषयी त्यांना उत्कट आदरभाव आहे. आंबेठाणच्या भेटीत जोशी त्यांना म्हणाले होते,
 "तुम्हां तरुणांना समाजसेवेचे इतके वेड का? त्यापेक्षा उद्योजक होऊन पैसा कमवा व गरिबांना वाटा. गरिबांसाठी रोजगार निर्माण करावा, असे तुम्हाला का वाटत नाही? तात्त्विक वटवट करण्यात रस का वाटतो?"
 सगळ्यांनीच सामाजिक कार्यकर्ता बनायला हवे असे जोशींना कधीच वाटत नसे.

 बहुतेक सर्व जुन्या कार्यकर्त्यांबरोबर जोशींचे कौटुंबिक स्वरूपाचे संबंध होते. त्या अर्थाने शेतकरी संघटना हे एक कुटुंबच होते. शेतकरी आंदोलन ही एका अर्थाने जोशींच्या दृष्टीने 'सेकंड इनिंग' होती; एकूणऐंशी साली संघटनेला सुरुवात करताना ते स्वतःही ४४ वर्षांचे होते – बरेच कार्यकर्ते यांच्या निम्म्या वयाचे होते. त्यांच्या दृष्टीने जोशी म्हणजे घरातली एखादी वडीलधारी व्यक्ती बनली.
 आयुष्यातल्या वेगवेगळ्या संकटांशी झगडताना हेच शेतकरी संघटनेचे कुटुंब जोशींच्या पाठीशी सतत उभे राहिले. याचे एक उदाहरण म्हणजे लीलाताईंनी स्वतःचा विषप्राशन करून दुर्दैवी शेवट करून घेतला तो क्षण. त्यादिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. बरीच शोधाशोध केल्यावर घराच्या गच्चीवरच लीलाताईंचा देह सापडला होता. घाईघाईने त्यांना आधी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधे नेले गेले. दैवदुर्विलास म्हणजे नेमकी त्यावेळी आंतरराज्य समन्वय समितीची (Interstate Coordination Committee) वर्ध्याला बैठक ठरली होती. ऑक्टोबर १९८२चा तो शेवटचा आठवडा होता. पुण्यात लीलाताईची तब्येत तेव्हाही बरी नव्हती; पण ती बैठक हा जोशींचाच पुढाकार होता आणि शिवाय १४ राज्यांतील शेतकरीनेते हजर राहणार होते. त्यामुळे मग जोशी शेवटी वर्ध्याला गेले होते.
 ती घटना आठवताना सरोजताई काशीकर लिहितात,

३० व ३१ ऑक्टोबर १९८२ रोजी वार्ध्याला आंतरराज्यीय किसाननेत्यांची परिषद होती. देशभरातून प्रमुख लोक आले होते. परिषद सुरू झाली. नंतर चार वाजता खुली सभा होती. पण ११ वाजताच लीलाताई गेल्याची बातमी आली. साहेबांना ती कळल्यावर परिषदेची ती बैठक पूर्ण करूनच साहेब म्हात्रेसर व प्रल्हाद पाटील कराड यांच्यासोबत गाडी घेऊन १२०-१४०च्या वेगाने पुण्याला निघाले.


 या कठीण काळात जोशींना त्यांच्या संघटनेच्या सहकाऱ्यांनी मोठा आधार दिला. त्या काळातील आपल्या आठवणीही सरोजताई सांगतात. त्या लिहितात,

गौरी व श्रेया या लीलाताईंच्यासोबत वर्ध्याला येऊन गेल्या होत्या. लीलाताई गेल्यावर त्यांच्यासोबत राहायला जावं म्हणून विजय व वृषाली काटकर, त्यांची दोन मुलं व आमचे वैभव व अश्विन ह्यांच्यासह आम्ही आंबेठाणला गेलो. मुलांमध्ये श्रेया, गौरी व साहेब छान मिसळले. काटकरांच्या मुलींना ते पिपाण्या म्हणत; कारण दोघी एकाच वेळी रडत असत! तिथल्या मुक्कामात आम्ही श्रेया, गौरी व साहेबांसोबत जवळचा भामचंद्र डोंगर चढायला शिकलो. आपण डोंगर चढू शकतो हा आत्मविश्वास आम्हा दोघा नवराबायकोत निर्माण झाला. मुलांची तर मज्जाच होती. अश्विन तर साहेबांच्या पाठीवर बसूनच डोंगरावर यायचा.
साहेब विदर्भात आले, की वर्ध्याच्या मुक्कामी सर्व कार्यकर्ते जमायचे. घरी रात्री जेवणं आटोपली, की वरच्या गच्चीत गाण्याच्या भेंड्यांचा कार्यक्रम व्हायचा. यात आम्ही सर्व सहभागी होत असू. भाऊ व माई बोरावके, बद्रीनाथ व शुभांगी देवकर या सगळ्यांची मैफल असायची. एकमेकांवर भेंड्या चढवण्यात आम्ही तत्पर असायचो. तेव्हा साहेब आमचे नेते हा भावच कोणाच्या मनात नसायचा. त्यामुळे कार्यकर्ता व नेता ही दरीच आमच्यात कधी निर्माण झाली नाही. साहेबांनी प्रेषित, महात्मा किंवा उद्धारक म्हणून आपली प्रतिमा कधीही होऊ दिली नाही.

(शरद जोशी अमृत महोत्सव स्मरणिका, २०१०, पृष्ठ २३७-८-९)


 आपल्या पत्नीविषयी जोशींनी फारसे लिहिलेले नाही. पण एकूण कार्यात लीलाताईंची साथ खूप मोलाची होती यात शंका नाही. जोशींनी स्वतः पत्नीला, किंवा नात्यातील कुठल्याच अन्य व्यक्तीला, शेतकरी आंदोलनात सहभागी करून घेतले नाही. सुरुवातीच्या काळात लीलाताई पतीबरोबर कार्यक्रमांना उपस्थित असत, पण मागे कुठेतरी श्रोत्यांमधे बसत. संघटनेत कुठलेही पद त्यांनी कधीच भूषवले नाही. जोशींनीही त्यांना पुढे आणायचा कधी प्रयत्न केला नाही. पण तरीही कांदा आंदोलनात ते उपोषण करत असताना लीलाताई स्वयंस्फूर्तीने चाकणला गेल्या आणि काहीशा गांगरून गेलेल्या शेतकऱ्यांसमोर त्यांनी परखड भाषण केले तो आंदोलनातील उत्कर्षबिंदू होता. त्याविषयी पाचव्या प्रकरणात लिहिलेच आहे
 खूप नंतर, चांदवड येथील महिला अधिवेशनाबद्दलच्या आपल्या एका लेखात पत्नीपासून आपल्याला कशी प्रेरणा मिळाली याविषयी जोशी लिहितात,

ह्या अधिवेशनात त्यावेळी हयात असलेल्या माझ्या पत्नीने, लीलाने, पहिले भाषण केले होते आणि त्या भाषणात शेतकऱ्यांच्या संघटनेबरोबर शेतकरी महिलांचीही संघटना असायला पाहिजे, अशी बाजू मोठ्या परिणामकारकरीत्या मांडली होती. लीला गेल्यानंतर माझ्या मनात एका अपराधी भावनेपोटी, महिलांचे काहीतरी काम घडावे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली.

(लोकसत्ता, ६ फेब्रुवारी २०१३)


 आपल्या दोन मुलींविषयी अगदी क्वचित प्रसंगी जोशींनी काही लिहिले आहे. ईटीव्हीवरील संवाद ह्या कार्यक्रमात प्रसिद्ध पत्रकार राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत एक आठवण आहे. जोशी म्हणतात,
 "१९८६मध्ये जेव्हा मी कापूस आंदोलन सुरू केलं - राजीवस्त्रांच्या होळ्या करण्याचं - त्यावेळी माझी धाकटी मुलगी वर्ध्याला मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस करत होती. काही पत्रकार त्या दिवशी तिच्याकडे गेले आणि या दिवशी योगायोगाने तिने ती खूपदा घालायची तसले सिंथेटिक म्हणजे राजीवस्त्राचे कपडे घातलेले होते. एका पत्रकाराने तिला विचारले की, 'तुझे वडील तिकडे राजीवस्त्राच्या होळ्या करतात आणि तू कसे टेरिलिनचे कपडे घालतेस?' त्यावर ती म्हणाली, 'माझ्या वडलांनी मला कधीही मी कसं वागावं, काय वापरावं हे सांगितलं नाही आणि ते मला कधी सांगणारही नाहीत. मला काय चांगलं वाटतं, हा माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे.' स्वातंत्र्य हाच माझा मुख्य संदेश आहे, हे तिने बरोबर जाणलं होतं."
 पुढे मोठ्या श्रेयाचे लग्न ६ जून १९८६ रोजी झाले. पुण्यातील एक इंजिनिअर सुनील शहाणे ह्यांच्याशी. वधूवरांनी स्वतःच्या हस्ताक्षरातील सहीने प्रसृत केलेले संध्याकाळच्या स्वागत समारंभाचे व नंतरच्या जेवणाचे साधे, अनौपचारिक पण आकर्षक आमंत्रणपत्र उपलब्ध आहे. श्रेया व्यवसायाने आर्किटेक्ट झाली व आता ती दोघे कॅनडात ओटावा येथे स्थायिक आहेत.
 धाकट्या गौरीने वर्ध्याला एमबीबीएस केल्यानंतर एमडी फ्रान्समधून केले. पण नेत्रतज्ज्ञ असून युएसमध्ये तिचे वैद्यकीय प्रशिक्षण प्रमाणित धरले गेले नाही. ती आता युएसमध्ये न्यू जर्सी येथे राहते. शेतकरी संघटकच्या एका जुन्या अंकात (२१ जून १९९५) ३ व ४ जून रोजी आंबेठाण येथे भरलेल्या संघटनेच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीचे वृत्त आहे. त्या वृत्ताच्या शेवटच्या परिच्छेदात लिहिले आहे,
 "बैठकीच्या शेवटी शरद जोशींनी आपल्या या सर्व स्नेही मंडळींना स्नेहभोजन दिले. प्रयोजन होते, त्यांची धाकटी लेक गौरी हिचे लग्न. गौरीचे लग्न १९ फेब्रुवारी ९५ रोजी अमेरिकेत झाले, त्यावेळी शरद जोशी गुजरातमध्ये निवडणूक प्रचार दौऱ्यावर होते; ते स्वतः लग्नाला जाऊ शकले नाहीत."
 जानेवारी २००९ मध्ये परभणी येथे संघटना कार्यकारिणीच्या एका बैठकीत भाषण करताना जोशींनी एक हृदयद्रावक कथन केले होते. प्रकाशित झालेले जोशींचे ते शेवटचे भाषण. त्यात ते म्हणाले होते,

आणखी एक आठवण, जी मी फारशी कोणाला सांगत नाही, माझ्या मनाला नेहमी डाचत असणारी आहे. शेतकरी संघटनेने महाराष्ट्रात सुरू केलेली शेतकरी चळवळ देशभरात उभी राहिली, तरच शेतकऱ्यांच्या दुःस्थितीत काही फरक पडेल, फक्त महाराष्ट्रातले प्रयत्न पुरे पडणार नाहीत, हे लक्षात घेऊन १९८१च्या ऑक्टोबरमध्ये देशभरातील समविचारी शेतकऱ्यांच्या नेत्यांची आम्ही एक बैठक वर्ध्याला बोलावली होती. मी तिकडे जाण्याची तयारी करीत असताना माझ्या पत्नीने, लीलाने, माझ्याकडे हट्ट धरला, की मी वर्ध्याच्या या कार्यक्रमाला जाऊ नये. पण माझा वर्ध्याला जाण्याचा निश्चय पक्का आहे, हे लक्षात आल्यानंतर ती माउली मला मोठ्या तळतळाटाने म्हणाली, 'नको म्हणत असतानासुद्धा तुम्ही मला आणि मुलींना सोडून जात आहात; हे शेतकरीसुद्धा तुम्हाला एक वेळ सोडून जातील हे लक्षात ठेवा.' शेतकरी संघटनेच्या कुटुंबात आजवर वेळोवेळी जे काही घडले आहे, आणि घडते आहे, ते पाहिले, की वाटते की माझ्या पत्नीचा शाप खरा ठरला आहे.

(माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो... पृष्ठ ३११)

  जोशी वर्ध्याला असतानाच लीलाताई हे जग सोडून गेल्या व अखेरच्या क्षणी ते त्यामुळे पत्नीसोबत नव्हते हे लक्षात घेतले की ह्या घटनेतील कारुण्य मनाला अधिकच भिडते.
  अर्थात ही जखम तशी कधीच पूर्णतः भरून येणारी नसली तरी, काळाच्या ओघात शेतकऱ्यांनी आपल्या या एकाकी नेत्याला कायम प्रेम दिले हे जाणवते. संघटनेच्या कार्यात माझं कुटंब उद्ध्वस्त झालं, पण आजही महाराष्ट्रातल्या शेकडो कुटुंबांत वावरताना ती माझीच कुटंबं आहेत असं मला वाटतं,' अशी भावना जोशींनीही अनेकदा कृतज्ञतापूर्वक व्यक्त केली आहे.

 त्याची साक्ष पटवणारा एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. १९९८च्या डिसेंबर महिन्यात दिल्लीला जाताना जोशींना अर्धांगवायूचा झटका आला. विमानतळावरून थेट रुग्णालयातच दाखल केले गेले. दाखल होऊन ४८ तास व्हायच्या आत नागपूरहून सरोज काशीकर, सुमन अगरवाल, शैलजा देशपांडे या रुग्णालयात येऊन त्यांच्याभोवती हजर झाल्या. पुण्याचे बद्रीनाथ देवकर व औरंगाबादचे हेमंत देशमुख हे दोघे त्यापूर्वीच हजर झाले होते. त्या दोघांनी तर येताना एक लाख रुपयेही बरोबर आणले होते. हॉस्पिटलमध्ये काही कमी पडायला नको म्हणून. दोघेही त्यावेळी तरी अगदी ओढगस्तीचा संसार करणारे; त्यांनी ऐनवेळी पैशाची जमवाजमव कशी केली त्यांचे त्यांना ठाऊक, नाशिकहून डॉ. श्याम अष्टेकरही पोचले. लातूरहून पाशा पटेल आले. या सगळ्यांना बातमी कशी पोचली आणि तडकाफडकी ते आपापले व्याप सोडून कसे निघू शकले कोण जाणे! जोशींचे थोरले बंधू बाळासाहेब दिल्लीलगतच फरीदाबाद येथे राहत असत; पण त्यांना बातमी लागून ते हॉस्पिटलमध्ये येईस्तोवर जोशींच्याभोवती लाल बिल्ला लावलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गराडाच पडला होता. बाळासाहेब हे कार्यकर्त्यांचे प्रेम बघून अगदी थक्कच झाले. आपल्या भावाला ते म्हणाले, "हे तुझं खरं कुटुंब. आम्ही रक्ताच्या नात्याचे; पण आम्हीसुद्धा इतक्या त्वरेने धावून आलो नाही."
 हीच भावना व्यक्त करताना त्यांच्या मोठ्या भगिनी सिंधूताई यांनी लिहिले आहे,

आम्हा भावाबहिणींपलीकडे शरदच्या कुटुंबाचा परीघ आता विस्तारला आहे. त्यात सर्व शेतकरी स्त्रिया व त्यांचे कुटुंबीय येतात. माझ्या परिचयात सरोजताई, शैलाताई, मायाताई, शोभाताई अशा अनेक आहेत. माझ्यापेक्षा अधिक तत्परतेने त्या बहिणीची भूमिका पार पाडतात.

(चतुरंग, दैनंदिनी, २०१२, पृष्ठ ७६)

  जोशींना शेतकऱ्यांचे प्रचंड प्रेम मिळाले, पण त्यांना प्रथमपासून टीकाकारही खूप भेटले. त्याची त्यांना खंतही नव्हती. किंबहुना, 'आपल्यावर कोणी टीका करणारा भेटला नाही, तर आपल्या मांडणीत काहीतरी चूक झाली आहे असं खुशाल समजावं!' असे ते म्हणत. डावे विचारवंत, अर्थतज्ज्ञ, पत्रकार वगैरेंकडून होणाऱ्या टीकेबद्दल त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. ते कितपत बरोबर होते हे जो तो आपापल्या विशिष्ट भूमिकेनुसार ठरवेल.
 प्रथमपासून त्यांच्यावर सर्वाधिक टीका करणारे होते डावे विचारवंत. त्यांच्याविषयी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली त्याच दरम्यान जोशींनी लिहिले होते :

डाव्या कार्यकर्त्यांची परिस्थिती मोठी विचित्र झाली आहे. शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे नाव घ्यावे, पण काम करावे कामगारांचे, पांढरपेशांचे. त्यांची मजुरी वाढवून द्यावी, बोनस मागावे, नोकरीतल्या इतर अटी सुधारून घ्याव्यात, महागाईला विरोध करावा हे कार्यक्रम त्यांनी वर्षानुवर्षे राबविले आणि गरिबांचे कैवारी म्हणून ते मिरवले. संघटनेच्या ताकदीवर त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामगारांची परिस्थिती भाग्यवंतांच्या पातळीवर आणली. आता राजकीय सत्तेला हात घालावा अशा प्रयत्नात डावे असतानाच, मळकी धोतरे नेसलेले लक्षावधी शेतकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी डाव्यांची सर्व समीकरणे विस्कटून टाकली. गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाण्याची डाव्यांची मक्तेदारी संपली. आर्थिकदृष्ट्या त्या कामगारापेक्षाही हीन अवस्थेत असलेला एक समाज प्रचंड संख्येने उठतो आहे, 'भाववाढ कमी करा' अशा कानाला सवय पडलेल्या घोषणेऐवजी भाववाढ मागतो आहे, ही अनपेक्षित घटना होती. संघटित कामगार आणि त्यांचे नेते यांना आपण 'डावे' राहिलो नसून 'उजवे' झालो आहोत, हा पालट पेलण्यासारखा नव्हता. अशा परिस्थितीत प्रस्थापितांची जी सहज प्रतिक्रिया असते तीच डाव्यांची झाली. उपहास, शिवीगाळ, इतिहासाने खोट्या ठरवलेल्या आपल्या श्रद्धांची वारंवार पुनरुक्ती, आरोपांच्या फैरी यांची झोड उठवण्यात आली. अशा आशेने, की ही नवी चळवळ मुळात खुडून टाकली, तर आपल्या डावेपणाला आव्हान निर्माण होणार नाही

(प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश - भाग दुसरा, शेतकरी प्रकाशन, अलिबाग, पहिली आवृत्ती, डिसेंबर १९८५, पृष्ठ २८)


 जोशी स्वतः पूर्णतः अर्थवादी होते. सुरुवातीच्या काळात सर्व शेतकरी आंदोलनच 'शेतीमालाला रास्त भाव' या एकमेव आर्थिक मागणीवर आधारित होते. पण तरी अर्थतज्ज्ञानी त्यांची कधी दखल घेतली नाही. अर्थतज्ज्ञांच्या बैठकीत वक्ता म्हणून तर सोडाच, पण केवळ एक सहभागी म्हणून यायचेही आमंत्रण जोशींना कधीच नसे. खरे म्हणजे शेतीचे अर्थशास्त्र सर्वप्रथम शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत मांडले ते जोशीनीच. पण विद्यापीठीय वर्तुळात, तेथील चर्चा-परिसंवादांत, अर्थशास्त्राशी संबंधित परिषदांत जोशींना काहीही स्थान कधी दिले गेले नाही.
 या साऱ्याची जाणीव जोशींनाही नक्कीच होती. ते एकदा सांगत होते, "आज इथले अर्थशास्त्रातले तथाकथित विद्वान प्राध्यापक मला अर्थशास्त्रज्ञ मानायलाही तयार नसतात! ते मला एक 'चळवळ्या' (activist)मानतात! जणू माझी मांडणी त्यांच्या विद्यार्थ्यांनी फारशी गांभीर्याने घ्यायचं कारण नाही! पण मी स्वित्झर्लंडला असताना हेच प्राध्यापक माझ्याशी संपर्क साधायचे आणि युएनची एखादी असाइनमेंट मी त्यांना मिळवून द्यावी म्हणून मस्का लावायचे!"
 टीकाकारांच्या संदर्भात सुरुवातीच्या काळातला एक प्रसंग नोंदवायला हवा. पुण्यातील टिळक स्मारक मंदिराच्या प्रेक्षागृहातला. दिवस होता रविवार, २० फेब्रुवारी १९८३. जोशींच्या भारतीय शेतीची पराधीनता (पृष्ठे ४०), शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (पृष्ठे १७०) आणि प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश (पृष्ठे ७५) या तीन संकलित पुस्तकांचे प्रकाशन त्यादिवशी प्रख्यात अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांच्या हस्ते झाले. जोशींची ही पहिलीच तीन पुस्तके. प्रकाशक होते शेतकरी प्रकाशन, अलिबाग.
 माधवराव मोरे अध्यक्षस्थानी होते. दांडेकर व जोशी ह्यांच्याप्रमाणे मोरे व दुसरे एक वक्ते प्रल्हाद कराड पाटील यांचीही भाषणे झाली व त्या चारी भाषणांचे संकलन ३० एप्रिल १९८३ रोजी शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र - खंडनमंडन या शीर्षकाखाली प्रकाशित झाले. पुढे या प्रसंगी केलेली दांडेकर व जोशी यांची भाषणे 'केसरी'च्या एका विशेषांकातही (कृषी वार्षिक १९८३) प्रकाशित झाली होती.
 सगळे सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरले होते आणि दुपारी चार वाजता सुरू झालेली ही भाषणे रात्री सव्वा आठला संपली; पण शेवटपर्यंत सर्व श्रोते अगदी तल्लीन होऊन ती ऐकत होते. जोशींच्या पुस्तकांचे असे जाहीर प्रकाशन समारंभ नंतर कधी झाले नाहीत.
 आपल्या भाषणात दांडेकर यांनी काही चांगले मुद्दे मांडले होते. उदाहरणार्थ, ग्राहकांच्या क्रयशक्तीवरही शेतीमालाचा भाव आधारित असतो, केवळ उत्पादनखर्चावर नव्हे. 'इंडिया' विरुद्ध 'भारत' ऐवजी 'शेतीवर अवलंबून असलेली जनता' विरुद्ध 'बिगरशेती व्यवसायावर अवलंबून असलेली जनता' असे विभाजन त्यांच्या मते अधिक योग्य होते. त्यांच्यातील दरी मिटवण्यासाठी बिगरशेती भागातील श्रीमंत वर्गाचे थोडे कमी करून शेती भागाच्या तळातील घटकास ते मिळावे, असे ते म्हणाले. "शरद जोशी यांच्या कोत्या, एकांगी व एकार्थी विचारसरणीमुळे शेतकरी संघटनेतील तरुण कार्यकर्त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व वैचारिक प्रगतीला तर मर्यादा पडतीलच, परंतु विधायक कार्यक्रमाच्या अभावी, नाकर्तेपणामळे त्यांच्यात विद्ध्वंसकता घर करू लागेल. समाजाच्या उन्नतीस हे हितकारक नाही," असा गंभीर इशारा देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला. पुस्तकांचे प्रकाशन करतानाच त्यांनी ही टीकाही केलीच. पण जोशींनी शेवटी आपल्या भाषणात टीकेचे स्वागतच केले व टीकेला समर्पक उत्तरेही दिली.
 जिथे दोन्ही बाजू मांडल्या जातील अशा प्रकारचा असला जाहीर कार्यक्रम शेतकरी संघटनेच्या संदर्भात नंतर कोणीच कधी आयोजित केला नाही.

 जाहीररीत्या टीका करणे टाळणारी, पण मनात जोशीविषयी दुरावा बाळगणारी माणसेही साहजिकच होती. प्रत्येकाची दुराव्यामागची कारणे अर्थातच वेगवेगळी असणार; कधी वैचारिक, कधी व्यक्तिगत तर कधी संमिश्र. अशा टीकेबद्दल काही लिहिणे अवघड आहे. पण त्यांच्यावरील प्रकाशित लेखनात केल्या गेलेल्या काही टीकेची इथे नोंदतरी घेणे अप्रस्तुत ठरू नये, कारण त्यातलेही काही वाचकाच्या लक्षात येणे उपयुक्त ठरू शकेल.
 चंद्रकांत वानखडे पत्रकार व लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक वर्षे ते जोशींबरोबर कार्यरत होते. त्यांच्या आपुला चि वाद आपणांसी या पुस्तकातील एक संपूर्ण प्रकरण (पृष्ठ १३२ ते १४३) शरद जोशी व शेतकरी आंदोलन यांविषयी लिहिलेले आहे. "नेत्याच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेने आंदोलनाचा बळी घेतला." हा त्या लेखाचा समारोप आहे.
 विद्युत भागवत या पुणे विद्यापीठातील स्त्रीअभ्यास केंद्राच्या भूतपूर्व प्रमुख. सुरुवातीच्या काळात शेतकरी महिला आघाडीच्या कामात त्यांनी बराच पुढाकार घेतला. पुढे मात्र त्यांनी शेतकरी संघटनेपासून फारकत घेतली. 'शेतकरी संघटना आणि स्त्री-प्रश्ना'चे आकलन या आपल्या लेखात (अंतर्नाद, ऑक्टोबर २००९) शेतकरी महिला आघाडीबरोबर काम करतानाच्या आपल्या अनुभवांवर आधारित मांडणी केली आहे. "ब्रिटिश राज्यकर्त्याप्रमाणेच शरद जोशीही 'झिरपण्याच्या सिद्धांता'वरच भर देत होते, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. इतिहास नाकारून उभे राहिलेले हे आंदोलन कुंठित झाले तर नवल नाही." हा त्या लेखाचा शेवट आहे.
 डॉ.द. ना. धनागरे यांच्या Populism and Power - Farmers' movement in Western India: 1980-2014 (Routledge प्रकाशन) या इंग्रजी पुस्तकाचा विषयच शेतकरी संघटनेचे आंदोलन हा आहे; शीर्षकात सूचित केलेली आहे तशी जोशींवरची बरीच टीका या पुस्तकात आढळते.
 इतरही काही टीकाकार होते. उदाहरणार्थ, शेतकरी चळवळ ही श्रीकांत सोळुंके यांची कादंबरी व तिला डॉ. भा. ल. भोळे यांनी लिहिलेली प्रस्तावना. वृत्तपत्रांतूनही जोशींवर टीका करणारे अनेक लेख वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहेत. उदाहरणार्थ, शरद जोशींना खुले पत्र हा प्रा. शरद पाटील यांनी लिहिलेला लेख (दै. लोकसत्ता, ९ नोव्हेंबर २००३). अशा लेखांची संख्या तर बरीच भरेल.
 या साऱ्याची दखल घेणे, किंवा केवळ नोंद करणे, हेही स्थलाभावी इथे अशक्य आहे. पण या साऱ्यातील जेवढे शक्य होते तेवढे मिळवायचा आणि वाचायचा, प्रस्तुत लेखकाने प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे माधवराव मोरे यांच्यापासून विनय हर्डीकरांपर्यंत आणि चंद्रकांत वानखडेंपासून विजय साळुंखेपर्यंत ज्यांच्यापाशी जोशींबाबत काही कटू आठवणी असणे शक्य होते अशा जास्तीत जास्त लोकांना भेटायचा, त्यांची बाजू समजून घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे. शेवटी जसे बघावे, तसे दिसते, ह्यात बरेच तथ्य आहे.

 जोशी यांना स्वतःला अशा टीकाकारांबद्दल काही म्हणायचे होते का? संभाषणात हा विषय अधूनमधून निघायचा. त्यांच्या म्हणण्याचा गोषवारा सांगायचा, तर तो पुढीलप्रमाणे सांगता येईल:
 'माझं नेतृत्व अनुयायांनी तसं सहजतःच स्वीकारलं होतं; मी काही ते कोणावर लादलं असं नव्हतं. मला आठवतं, एकदा एक तरुण कार्यकर्ता मला बरंच काय काय सुनावत होता; मी फक्त ऐकत होतो. जरा वेळाने एक दुसरा वरिष्ठ व अत्यंत कर्तबगार सहकारी, जो पुढे मोठा आमदारही झाला, तो त्याला माझ्यासमोरच म्हणाला; 'हे पाहा, मातीने कुंभाराला अक्कल शिकवायची नसते!' म्हणजे जणू मी कुंभार व तो माती याचा तिथे सहजस्वीकार होता!
 'पण हळूहळू त्यांच्यातील काहींना आपल्यामुळेच संघटना चालते असं वाटू लागलं. येणारे पाहुणे मलाच भेटायचे, मी काय म्हणतो तेच पत्रकार छापायचे. हे काही मी जाणीवपूर्वक करत नव्हतो, पण तसं होत होतं. आपण डावलले जात आहोत अशी भावना त्यामुळे त्यांच्या मनात निर्माण होत असावी. व्यक्तिगत मत्सराची भावनाही त्यामागे असू शकेल.

 'काळाच्या ओघात अशी काही माणसं दुरावली. काहींना मुळातच मोठी महत्त्वाकांक्षा होती. ही मंडळी तशी कर्तबगारही होती. शेतकरी संघटनेत मात्र त्यांना देण्यासाठी माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं. इतर राजकीय पक्षांनी थोडंफार आमिष दाखवल्यावर ही मंडळी तिकडे गेली. शंकर धोंडगे, पाशा पटेल, अनिल गोटे वगैरे. आज विचार करताना वाटतं, को ही माणसं दुसरीकडे गेली, आमदार वगैरे झाली हे चांगलंच झालं. विचार तर ते संघटनेचाच मांडतात की. काही जणांनी व्यक्तिगत आर्थिक गरजांमुळे वेगळा रस्ता धरला. उदाहरणार्थ, आमच्यातल्या अशोक गायकवाडने चळवळ सोडली, पण स्वतःची उत्तम शेती विकसित केली. बद्री देवकरने शेती सोडून ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली. प्रकाश पाटील जळगावहून औरंगाबादला आला आणि चांगला सरकारी वकील बनला. अशी मंडळी चळवळीतून बाहेर पडली, पण स्वतः चांगली प्रस्थापित झाली व याचा मला आनंदच आहे.
 'आणखी एक काहीशा प्रस्थापित नेत्यांचा वर्ग होता, ज्यांना माझ्याबरोबर काम करायची इच्छा होती. तसं ते माझ्याशी बोललेही होते. पण काही दिवसांनी त्यांच्याच लक्षात आलं असावं, की त्यांना साजेसं, किंवा महत्त्वाचं असं काही काम मी त्यांना देऊ शकत नाही. संघटनेत तसा वावही नव्हता. आणि नुसतं कार्यकर्ता बनण्यात साहजिकच त्यांना स्वारस्य नव्हतं. नाशिकचे विनायकराव पाटील किंवा नगरचे गोविंदराव आदिक यांचा समावेश मी अशा मंडळींमध्ये करेन.
 'दुर्दैवाने काही मंडळी मात्र व्यक्तिशः माझ्याबद्दल कटुता बाळगून वेगळी झाली. त्याबद्दल मात्र मला खरंच खूप दुःख होतं. माझ्या हातून कदाचित काही चुकलं असेल. मी स्वतः त्यांच्यातल्या अनेकांच्या घरी जाऊन, त्यांना भेटून त्यांची क्षमा मागितली आहे आणि त्यांनी पुन्हा संघटनेत यावं असं जाहीर सभांमधूनही सांगितलं आहे.'
 श्रीरंगनाना मोरे यांच्या अमृतमहोत्सव सत्कारसमारंभातील जोशींचे भाषण त्या दृष्टीने पुरेसे बोलके आहे. त्यावेळी जोशी म्हणाले होते,

तुमच्यापैकी कोणाच्या मनात असं असेल, की शेतकरी संघटनेत तुम्हाला योग्य तो मान मिळाला नाही, किंवा तुम्हाला सावत्रपणाची वागणूक दिली गेली, तर श्रीरंगनानांच्या साक्षीने मी कुटुंबप्रमुख म्हणून ती माझी चूक मानतो, तुमची माफी मागतो आणि 'परत या' अशी हाक देतो.... श्रीरंगनानांनी कोणत्याही प्रकारचा अहंकार न बाळगता त्यांची 'शेतकरी-शेतमजूर संघटना' पिंपळगाव-बसवंतच्या १९८०च्या सभेत शेतकरी संघटनेत मिसळून टाकली, आपलं नाव ठेवण्याचाही आग्रह त्यांनी धरला नाही. त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगू इच्छितो, की तुमच्या मनात प्रामाणिकपणे शेतकऱ्यांविषयी तळमळ असेल, तर केवळ काही रुसवेफुगवे झाले म्हणून दूर राहू नका. शेतकऱ्यांमध्ये वेगळ्या चुली करू नका.

(६ जानेवारी २००९, बळीचे राज्य येणार आहे., पृष्ठ २५४)

 लिप्ट्न ते स्वातंत्र्यवाद : शरद जोशींचे ऐतिहासिक योगदान व मर्यादा या आपल्या लेखात (मोहन गुंजाळ स्मृतिग्रंथ, नोव्हेंबर २०११) मिलिंद मुरूगकर यांनी 'शरद जोशींची मांडणी मुळात मायकेल लिप्टन याने केलेली आहे व ती स्वतःचीच आहे असे चित्र जोशींनी जाणूनबुजूनच प्रसृत केले' असे म्हटले आहे. अन्य कोणीही त्यापूर्वी किंवा त्यानंतरही हा मुद्दा मांडलेला नाही; त्यावर कधी काही चर्चा झाल्याचे माझ्यातरी ऐकिवात नाही. त्याबद्दल काय म्हणता येईल?
 प्रस्तुत लेखकाला तो मुद्दा ग्राह्य वाटत नाही. याचे एक कारण म्हणजे अशी कुठलीही व्यापक विचारसरणी ही अनेकांच्या चिंतनातून जन्म घेत असते; जग फार मोठे आहे आणि आपण करतो तसा विचार करणारी दुसरी कुठलीही व्यक्ती भूतकाळात नव्हती वा आज नाही, असे समजणेच अवास्तव आहे.
 लिप्टन यांचे उपरोक्त पुस्तक १९७७मधले आहे, पण त्याच्याही खूप पूर्वी कार्ल मार्क्सपासून इतर अनेकांनी 'टाउन आणि कंट्री' यांच्यातील विषमतेचा मुद्दा मांडला आहे आणि 'अर्बन बायस' वगैरे पारिभाषिक शब्द त्यांनी लिप्टनसारखे वापरले नसतील, पण राज्यकर्त्यांच्या धोरणाचा एक परिपाक म्हणून ती विषमता निर्माण झाली असणार हे उघड आहे. राजवाडा आणि झोपडी किंवा 'हिरवीगार शेती' आणि 'धुराड्यांतून प्रदूषण ओकत चाललेल्या गिरण्या' यांच्यातील अंतर्विरोध हा साहित्यिकांच्या प्रतिभेला तर कायम आव्हान देत आला आहे. The Grapes of Wrath किंवा How Green was my valley यांसारख्या अगदी १९४०च्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या, गाजलेल्या, चित्रपटांत रूपांतरित झालेल्या कादंबऱ्यांत हेच ग्रामीण भागाचे उजाडीकरण चित्रित झाले आहे व तोही विशिष्ट धोरणाचाच भाग आहे हे उघड आहे.
 हा विरोध तसा खूप जुनाच, अगदी औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली तेव्हापासूनच चर्चेचा विषय आहे. इंग्लंडच्या संदर्भात हाच भेद 'टाउन आणि काउंटी' या स्वरूपात मांडला गेला आहे. (काउंटी म्हणजे परगणा व टाउन म्हणजे प्रशासनाच्या दृष्टीने प्रमुख असलेले त्यातले गाव, या अर्थाने.) औद्योगिकीकरणासाठी आवश्यक ते भांडवल हे शेतीतूनच घ्यायला हवे, म्हणजेच खेड्यांतील पैसा शहरांकडे वळवायला हवा, हे जुन्या काळातील साम्यवादी विचारवंत प्रिओब्रेझन्स्की आणि रोझा लुक्झेम्बर्ग यांनीही यासंदर्भात लिहिले आहे व 'जग बदलणारी पुस्तके' या आपल्या पुस्तकात जोशींनी त्याचा विस्तृत आढावाही घेतला आहे. (प्रश्न रशियातील विकासाचा प्रचंड अनुशेष अल्पावधीत भरून काढण्यासाठी कशाला प्राधान्य द्यायचे हा होता आणि त्या काळानुरूप व स्थानिक परिस्थितीनुरूप स्टालिनने शेतीपेक्षा उद्योगांना प्राधान्य दिले - ते चूक किंवा बरोबर हे विशिष्ट स्थळ-काळाच्या संदर्भचौकटीतच तपासावे लागेल. असो.) रॉबर्ट बेट्स (Robert Bates) यांनीही या 'अर्बन बायस'बद्दल विस्ताराने लिहिले आहे. नोबेल लॉरेट व जगप्रसिद्ध स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ गुणार म्युरडाल (Gunnar Myrdal) यांनीही अशा स्वरूपाची मांडणी Asian Drama - an enquiry into the poverty of nations या आपल्या पुस्तकात केली आहे व जगदीश भगवती यांनीही 'गुणार म्युरडाल व अर्बन बायस' या विषयावर लिहिले आहे. इंटरनेटवर हे सारे उपलब्ध आहे. प्रत्येकाची शब्दरचना वेगळी असेल, पण आशयसूत्रातील समान धागा देशांतर्गत आर्थिक विषमतेचे स्पष्टीकरण हाच आहे.
 अगदी आपल्या मराठीपुरता विचार केला तरी चारुदत्त दाभोळकर यांनी आपल्या पुस्तकात ही भूमिका अगदी १९५४ सालीच (म्हणजे जोशींच्याच नव्हे, तर लिप्टनच्याही खूप पूर्वीच) मांडली होती, ते पुस्तक दत्तप्रसाद दाभोळकरांनी जोशींना दाखवल्यानंतर या मांडणीचे श्रेय जोशींनी चारुदत्त यांना मोकळ्या मनाने दिलेही होते व त्याचा उल्लेख या चरित्रात पूर्वी विस्ताराने झालाच आहे. पुन्हा दाभोळकरांची मांडणीदेखील युरोपात ते शिकत असताना तेथील शेतकऱ्यांकडून त्यांनी जे ऐकले होते, त्यावर आधारित होती; म्हणजे त्यांच्यावेळीही ही मांडणी अगदी 'ओरिजिनल' होती असे म्हणायला वाव नाही – पुन्हा केवळ कोणा एकाचेच नव्हे तर अनेकांचे ते म्हणणे होते; म्हणजेच ती मांडणी बऱ्यापैकी प्रचलित होती.
 प्रस्तुत लेखकाच्या मते भारतीय संदर्भात तरी शरद जोशी यांनीच 'इंडिया'विरुद्ध 'भारत' ही मांडणी प्रथम लोकांसमोर आणली आणि त्यात कारणस्थानी असलेला शेतीमालाच्या शोषणाचा मुद्दा त्यांनीच प्रथम ऐरणीवर आणला; ह्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.

 जोशींनी माणसांचा वापर केला आणि गरज संपल्यावर त्यांना दूर फेकून दिले असा एक आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. डॉ. धनागरे यांच्या उपरोक्त पुस्तकातही (पृष्ठ २५२ वर) तसे म्हटले आहे. त्यात कितपत तथ्य आहे?
 इथे लक्षात घ्यायला हवे, की शेतकरी संघटना, तिच्या आंदोलनात लाखो शेतकरी सहभागी होत असले तरी, एक संघटना म्हणून छोटीच होती. अनेक राज्यांमध्ये तिच्या अनेक शाखा आहेत, शेकडोंचा कर्मचारीवर्ग आहे, ज्याचे तपशिलात व्यवस्थापन करावे लागेल असे अनेक प्रकल्प तिथे चालू आहेत, अशातला काही भाग नव्हता. त्यामुळे इतरांना तिथे तसा मर्यादितच वाव होता. ज्यांना स्वतःची अशी वेगळी प्रतिभा होती, तिला अन्यत्र अधिक वाव मिळेल अशी खात्री होती ते कार्यकर्ते दीर्घकाळ त्यांच्याबरोबर राहणे अवघडच होते. जोशींबरोबर त्यांचे काहीच बिनसले नसते, तरीही ते वेगळे झाले असते. जोशींनी त्यांना वापरून फेकून दिले असे म्हणणे चुकीचे ठरेल.
 स्वतः जोशींचा कार्यकर्त्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता?
 जोशींनी याचे उत्तर देताना दोन दृष्टान्त दिले.
 एक होता चित्रकाराचा. एखादा चित्रकार कुंचल्याने चित्र रंगवत जातो, त्याला सुचेल त्याप्रमाणे वेगवेगळे रंग घेऊन त्यांचे फराटे कॅनव्हॉसवर मारत जातो, त्याच्या मनातील कल्पना साकार करत जातो; त्याने मारलेल्या रंगाच्या प्रत्येक फटक्याला (स्ट्रोकला) स्वतःचे असे काही रूप वा महत्त्व असतेच असे नाही; पण त्यांचे एकत्रित रूप जेव्हा चित्रात अवतरते, तेव्हा त्यांना स्वतंत्र असा अर्थ, महत्त्व व रूप लाभत जाते. तसे काहीसे जोशींचे होत गेले. जी जी मंडळी जवळ येत गेली, त्यांना मदतीला घेऊन मनातली संकल्पना ते साकार करत गेले. काय करायचे आहे ह्याची ब्ल्यू प्रिंट त्यांच्यासमोरही तयार नव्हती; अशी कुठली ब्ल्यू प्रिंट समोर ठेवून शेतकरी आंदोलन सुरू झाले नव्हते.

 दुसरा दृष्टान्त होता उपलब्ध साधनसामग्रीतून भिंत उभारणाऱ्या गवंड्याचा. त्यांच्या हातात वेळोवेळी ज्या ज्या तुटक्याफुटक्या विटा येत गेल्या, त्या त्या योग्य तिथे बसवून ते भिंत उभारत गेले. या विटा तशा तुटक्याफुटक्याच होत्या, अन्यथा त्या त्यांच्याकडे आल्याच नसत्या. तरीही त्यांचा वापर ते कुठे ना कुठे करत गेले. कुठे ना कुठे हात पोळलेले, भ्रमनिरास झालेले, असेही अनेक कार्यकर्ते खूपदा संघटनेकडे येत गेले. त्यांच्या बाबतीत हा दृष्टान्त जोशींच्या मते लागू पडतो. ह्यात कोणाही कार्यकर्त्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय करण्याची भूमिका नव्हती; त्यांची इच्छा असती तर तिथे वापरले जायला ते नकार देऊ शकले असते आणि जोशी कधीच त्यांच्यावर जबरदस्ती करू शकले नसते.

 शेतकरी संघटना हा एकखांबी तंबू होता; तिथे लोकशाहीप्रक्रियेतून निर्णय घेतले जात नव्हते, असा आणखी एक आरोप त्यांच्यावर केला गेला आहे.
 शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीत प्रत्येक प्रश्नावर आधी जोशी काहीतरी निवेदन करीत, नंतर त्यावर सगळे आपापली मते मांडत व त्यानुसार मग शेवटी जोशी निर्णय जाहीर करत. खूपदा इतरांच्या म्हणण्यानुसार ते आपल्या मूळ भूमिकेत फरकही करत. शेतकरी संघटकमध्ये जोशींवर व संघटनेवर टीका करणारे लेखही अनेकदा छापले गेले आहेत व त्यांच्या प्रकाशनाला जोशींनी कधीही आडकाठी घेतलेली नाही. "तुम्ही सगळे इतक्या मोकळेपणे साहेबांना भेटू शकता, त्यांच्यासमोर आपली मते बिनधास्त मांडू शकता याचा आम्हाला हेवा वाटतो. आमच्या साहेबांसमोर तर काहीही बोलायची आमची हिंमतच नसते. ते सांगतात आणि आम्ही ऐकतो असेच चालते," असे एक मोठ्या संघटनेतील पूर्णवेळ कार्यकर्त्याने शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याला सांगितल्याचे प्रस्तुत लेखकाने ऐकलेले आहे.
 अंतिम निर्णय बहुतेकदा जोशी स्वतःच घेत हे खरे आहे, पण त्यातील अपरिहार्यताही समजून घ्यायला अवघड नव्हती. 'डोकी मोजून निर्णय घेणे' हे जोशींना तत्त्वशःच अमान्य होते. स्वतंत्रतावादाचा सारा सिद्धांतच सामूहिक निर्णयप्रक्रियेच्या विरोधात जाणारा आहे. व्यक्ती हेच त्यांच्या दृष्टीने समाजाचे एकक होते. तिलाच फक्त पावित्र्य होते. निर्णयक्षमता व्यक्तीतच असू शकते अशी मांडणी करणारा 'अ‍ॅरोचा सिद्धांत' ते अनेकदा उद्धृत करत. त्यामुळे संघटनेतील निर्णयही अंतिमतः ते स्वतःच घेणार हे क्रमप्राप्तच होते. संघटनेत येणाऱ्या प्रत्येकाला हे पूर्वीच ठाऊक होते; नंतर केव्हातरी झालेला व एकाएकी भ्रमनिरास करणारा असा काही तो साक्षात्कार नव्हता.
 आणि तसे बघितले, तर देशात अन्यत्र काय वेगळे चित्र होते? उदाहरणार्थ, जे सहकारी साखर कारखाने आजही उत्तम चालले आहेत त्यांच्यावर एकवार नजर टाकली तर सहज दिसेल, की त्या सगळ्या नावाला सहकारी असल्या, तरी प्रत्यक्षात कुठल्यातरी एका व्यक्तीच्या अथवा तिच्या कुटुंबीयांच्या व्यवस्थापनाखाली आहेत. इतर संस्थांमध्ये किंवा संघटनांमध्ये किंवा पक्षांमध्ये वेगळे काय घडते? अंतर्गत लोकशाही कुठल्या आस्थापनेत दिसते? शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द कायम प्रमाण मानला गेला. लालू यादव किंवा मुलायमसिंग यादव, शरद पवार किंवा करुणानिधी, मायावती किंवा ममता, जयललिता किंवा सोनिया यांच्या सर्वांच्याच पक्षात त्यांचाच शब्द पाळला जातो असे दिसेल. स्वयंसेवी संस्थांतही काही वेगळी परिस्थिती दिसत नाही. अंतर्गत लोकशाही हा संस्थात्मक जीवनाचा एक आदर्श आहे, पण ते वास्तव नव्हे - निदान भारतात तरी. मुळात शेतकरी संघटना छोटीच राहिली व त्यामुळे एककेंद्री राहू शकली; तिचा जर अनेकांगी विस्तार झाला असता तर कदाचित विकेंद्रीकरण अपरिहार्य ठरले असते, निदान अधिक शक्य झाले असते.
 'शरद जोशींना संघटना चालवायची नव्हती, तर त्यांनी स्वतः बाजूला व्हायचे होते व आम्हाला संघटना चालवायला द्यायला हवी होती,' असाही एक आरोप केला गेला आहे. वस्तुस्थिती काय होती?
 मुळात शेतकरी संघटना ही जोशींचीच निर्मिती होती; तिचा वैचारिक पाया म्हणजे त्यांची स्वतःचीच जीवनधारणा होती. तिच्याबरोबरचे त्यांचे तादात्म्य संपूर्ण होते. ती संस्था मुख्यतः वस्तुरूप नसून विचाररूप होती. अशी संस्था त्या संस्थापकाने दुसऱ्या कोणाच्या हाती सोपवणे हे बोलायला सोपे वाटले, तरी प्रत्यक्षात तितके सोपे नाही. ती आपल्या अपत्याकडे जावी (तेही आपल्या पश्चात, आपल्या हयातीत नाही!) अशी तजवीज करता येते, केलीही जाते; पण अन्य कोणावर ती स्वनिर्मित संस्था सोपवणे अवघड असते. आपल्याकडे संघटनेचे नेतृत्व सोपवावे अशी ज्यांची इच्छा होती आणि ती आपण चांगल्या प्रकारे चालवू शकू अशी ज्यांना खात्री होती, त्यांच्या निष्ठेबद्दल आणि कुवतीबद्दल तेवढा विश्वास जोशींना होता का? तसा असल्याशिवाय संघटनेची सूत्रे जोशी त्यांच्या हाती कशी सुपूर्द करू शकले असते? नेतृत्व हे मागून मिळत नाही; कर्तृत्वाने मिळवावे लागते; किंवा मग स्वतःची स्वतंत्र संघटना काढून ते नव्याने प्रस्थापित करावे लागते.

 शेतकरी संघटनेच्या संदर्भात अगदी सुरुवातीचा विचार केला, तरी काही बाबतीत जोशींची भूमिका स्पष्ट होती हे जाणवते. एक म्हणजे ते स्वतःला स्वतंत्रतेच्या मार्गावरील एक यात्रिक समजत असत; या यात्रेला शेवट नाही, कारण स्वतंत्रता ही एक दिशा आहे, ते काही गंतव्य स्थान नाही असे ते मानत. 'योद्धा शेतकरी'मध्ये जोशींनी म्हटले आहे,
 "मी आज जो शेतकरी संघटनेचा विचार मांडतोय त्याला फक्त पंधरा-वीस वर्षं इतकंच महत्त्व आहे. कुणी जर म्हटलं, की हा विचार कालातीत आहे, त्याचा एक धर्म झाला पाहिजे, तर तो शुद्ध मूर्खपणा आहे! आज जर संघटना तयार झाली, यशस्वी ठरली तर पंधरा वर्षांनी ह्या संघटनेला करण्यासारखं कार्यच उरणार नाही! त्यामुळे संघटनेला अस्तित्वात असण्याचा अधिकारच असणार नाही!" (पृष्ठ ४९)
 हे ऊस आंदोलनाच्या वेळचे, म्हणजे साधारण १९८० सालातले उद्गार आहेत. आपण हाती घेतलेले हे शेतीमालाच्या भावाचे उद्दिष्ट आयुष्यभरासाठी आहे, असे त्यावेळी त्यांना नक्कीच वाटत नव्हते.
 अ. वा. कुळकर्णी यांनी एक आठवण लिहिली आहे. ३० मे १९८२ रोजी इंडियन एक्स्प्रेसचे चंडीगढ येथील प्रमुख वार्ताहर विनोद मिश्रा यांनी जोशींची विस्तृत मुलाखत घेतली व ती दुसऱ्या दिवशी पेपरात छापूनही आली. या मुलाखतीदरम्यान मिश्रांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना जोशींनी एक अतिशय महत्त्वाचे व काहीसे धक्कादायक असे विधान केले होते. ते म्हणाले होते, "शेतीमालाच्या रास्त भावाची आणि योग्य मार्गाने उत्पादनखर्च काढायची कल्पना जर शासनाने कायदा म्हणून मान्य केली तर ही संघटना व चळवळ विसर्जित करायचा मी सल्ला देईन."
  यावेळी तिथे उपस्थित असलेले कुळकर्णी लिहितात (शरद जोशींबरोबर ... पंजाबात, पृष्ठ ५९-६०):

जोशींच्या ह्या बोलण्याने मिश्रांसह सर्व जण एकदम चमकले. जोशींना आपल्या अशा बोलण्याच्या संभवनीय परिणामांची कल्पना असावी. कुणाकडेही न बघत त्यांनी शांतपणे सिगरेट पेटवली आणि एक झुरका घेतला. थोड्या वेळाने त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले. त्यावेळी किंवा त्यानंतरच्या प्रवासात मी प्रकट न केलेली वस्तुस्थिती मला इथे सांगायलाच हवी. जोशींचे ते उत्तर ऐकून मी पुरा हबकून गेलो होतो. अशी विसर्जनाची भाषा करायची म्हणजे मग उभ्या केल्या जाणाऱ्या संघटनेचे, तिच्यासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांचे काय? पण थोड्या विचारान्ती लक्षात आले, की हे वाटणे योग्य नाही. कारण जोशी संघटित करीत असलेल्या चळवळीचा जीवित हेतू केवळ आर्थिक आहे नि एक-कलमी आहे. शेतीमालाचा उत्पादनखर्च ठरविण्यासाठी यथायोग्य आराखड्यास मान्यता आणि त्यानुसार शेतीमालास रास्त भाव देण्यास मान्यता या गोष्टी शासकीय पातळ्यांवर मान्य झाल्यानंतर या चळवळीचे निर्मितिकार्य पूर्ण होणार आहे. तिच्या जीवितहेतूची पूर्तताच अशा मान्यतेत सामावलेली आहे. मग या चळवळीला वेगळे असे कोणते कार्य शिल्लक राहते? मग जे काही प्रसंगोपात्त प्रश्न उभे राहतील त्यांचे स्वरूप मामुली असेल; त्यांची सोडवणूक इतर मार्गांनी करताही येईल. हे असे जाणवून गेले नि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 'काँग्रेस विसर्जित करा' असा सल्ला देणारे महात्मा गांधीजी माझ्या नजरेसमोर उभे राहिले!

 'शेतकरी संघटनेची आज आवश्यकता आहे का?' असा प्रश्न 'शेतकरी संघटक' या मुखपत्रात जोशींनी स्वत:च अनेकदा उपस्थित केला होता. त्यावर भरपूर चर्चाही झाली होती. त्यासाठी ३ ऑगस्ट १९८८ रोजी त्यांनी अंगारमळा येथे आपल्या जवळच्या सहकाऱ्यांची एक बैठकही बोलावली होती. या बैठकीबद्दल डॉ धनागरे यांनी आपल्या उपरोक्त इंग्रजी पुस्तकात विस्ताराने लिहिले आहे. आपल्या संघटनेचे कार्य आता संपले आहे, अशी भूमिका जोशींनी प्रास्ताविकात मांडली; पण त्या बैठकीत प्रस्तावित विसर्जनाला कार्यकत्यांपैकी निदान काहींचा प्रखर विरोध आहे हे त्यांच्या लक्षात आले. 'शरद जोशी मुर्दाबाद' अशी घोषणा भास्करराव बोरावके यांच्या पुतण्याने, शशिकांतने, याच बैठकीत दिली. जोशींनी मग हा मुद्दा पुढे रेटला नाही. त्यानंतरही आता संघटना विसर्जित करावी असे त्यांना कधीकधी वाटायचे, पण प्रत्यक्षात मात्र ते तसे करू शकले नाहीत.
 त्यांच्या दोन निकटच्या सहकाऱ्यांची याबद्दलची मते इथे उदधृत करण्याजोगी आहेत. भास्करराव बोरावके लिहितात,

शरद जोशींनी हाक दिली, की घरचे खाऊन स्वखर्चाने कोठेही सहकुटुंब येणारे लाखो कार्यकर्ते कालांतराने शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या थकून गेले. खरे तर इतकी दीर्घ काळ – तीस वर्षे - संघटना टिकून राहिली हेच आश्चर्य. शरद जोशी सतत नवनवीन कार्यक्रम देऊन सर्वांना इतका प्रदीर्घ काळ कार्यमग्न ठेवण्यामध्ये निश्चितच यशस्वी झाले. इतर संघटना पाहिल्या, तर त्या साधारण दहा ते बारा वर्षांचा काळ टिकून राहतात. त्या मानाने ही तर खूप काळ टिकून राहिली.

(मोहन गुंजाळ स्मृतिग्रंथ, प्रकाशन १० नोव्हेंबर, २०११, पृष्ठ २१९)

 संघटनेला करण्याजोगे आता काही राहिलेले नाही असे संघटनेच्या ह्या माजी अध्यक्षांचेही मत झाले होते हेच ह्यावरून ध्वनित होते.
 ह्याच ग्रंथात पृष्ठ २५७वर संघटनेच्या जन्मापूर्वीपासून, १९७८पासून, जोशींशी संबंध असलेले डॉ. श्याम अष्टेकर लिहितात,

शेतकरी संघटनेची चळवळ आता बहुतांशी ओसरली आहे. कार्यकर्ते वयस्कर झाले, थकले. राजकारणाच्या खडकावर आपटून चळवळी संपतात असे शरद जोशींचेच म्हणणे असते. एरवीही कोणत्याही चळवळीचे आयुष्य एक-दोन दशकांचेच असते. ती पिढी मागे गेली की चळवळी निःशेष होतात. चळवळीचा पक्ष होणे हाही एक प्रकारचा अंतच असतो. अनेक चळवळी पक्षाघाताने संपून जातात किंवा मूळ मागण्या व लढे विसरून जातात.

 एक नक्की, जोशींनी आपल्या एकाही नातेवाइकाला शेतकरी संघटनेच्या जवळपासही आणलेले नसल्याने, संघटनेवर निदान घराणेशाहीचातरी आरोप नक्की करता येणार नाही!
 संघटना दीर्घकाळ उत्तम चालावी या दृष्टीने संघटनेची व्यक्तिनिरपेक्ष व व्यावसायिक उभारणी जोशींनी केली नाही ही परिस्थिती आदर्श होती,असे प्रस्तुत लेखकाला अजिबात सुचवायचे नाही; पण भारतातील संस्थाजीवनाची एकूण परिस्थिती विचारात घेता ती अपरिहार्य अशी वास्तविकता होती असे वाटते.

 जोशींच्या उपरोक्त टीकाकारांच्या संदर्भात तीन गोष्टी मान्य कराव्या लागतील.
 एक म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्यांची साथ सोडली, त्यांनीही कधी शरद जोशीच्या मूलभूत मांडणीला छेद देणारी अशी स्वतःची वेगळी मांडणी केलेली नाही. याचा एक अर्थ असाही होतो, की वेगळे होण्यामागे मतभेदापेक्षा मनभेद हेच खरे कारण होते; वेगळे होण्यामागे वैचारिक मतभेद असल्याचे वरकरणी दाखवले गेले, तरी प्रत्यक्षात वैचारिक भेद फारसे नव्हते; असते, तर त्यांच्या वेगळ्या मांडणीच्या स्वरूपात ते समोर आले असते.
 दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अनेक सहकारी सोडून गेले तरीही शेतकरी संघटना कधी दुभंगली नाही. राजू शेट्टी किंवा रघुनाथ पाटील यांनी स्वतःच्या वेगळ्या शेतकरी संघटना अवश्य काढल्या, पण त्यामळे मुळ संघटनेत उभी फूट अशी कधी पडली नाही.
 तिसरी गोष्ट म्हणजे कोणीही शरद जोशी ह्यांच्या वैयक्तिक चारित्र्याबद्दल, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल, त्यांच्या आर्थिक व्यवहारांबद्दल शंका उपस्थित केली नाही. फार थोड्या भारतीय नेत्यांच्या बाबतीत हे घडताना दिसते. 'आम्हाला फसवून ह्यांनी स्वतः मात्र प्रॉपर्टी केली, मजा मारली' असा आरोप त्यांच्यावर त्यांच्या शत्रुंनीही केलेला नाही. इतकी वर्षे सार्वजनिक क्षेत्रात वावरूनही एखाद्याचे चारित्र्य इतके स्वच्छ राहावे हेही विशेष मानावे लागेल.
 शरद जोशींबरोबर अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्षे राबले. खूप नावे सांगता येतील. यांतल्या काहींना मी कधीच भेटू शकलेलो नाही; पण ऐकले आहे ते असे, की यांतल्या बहुतेकांच्या मनातील जोशींबद्दलचे प्रेम आजही आटलेले नाही.
 'योद्धा शेतकरी'च्या माधवराव मोरे यांना अर्पण केलेल्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत "हरामखोर शेतकरी' असं एक जळजळीत पुस्तक लिहिण्याच्या मनःस्थितीत मी तेव्हा होतो" असे विजय परुळकरांनी लिहिले आहे; पण त्याच अर्पणपत्रिकेतील शेवटचे वाक्य आहे : "शेवटी एकच. शरद जोशींवर मी आणि सरोजा प्रेम करतो – ते अबाधित आहे."
 कोल्हापूर जिल्ह्यातून लोकसभेवर निवडून गेलेले झुंजार शेतकरीनेते राजू शेट्टी यांच्या तोंडून आमच्या भेटीत मी स्वतः ऐकलेले वाक्य होते, "आम्ही साहेबांचे अर्जुन होऊ शकलो नाही, पण आम्ही स्वत:ला त्यांचे एकलव्य जरूर मानतो." हे उद्गार या दृष्टीने खूप बोलके आहेत.