Jump to content

अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/शिक्षणयात्रा

विकिस्रोत कडून
शिक्षणयात्रा


 'शेतकऱ्यांचे पंचप्राण' म्हणून ज्यांची पुढे ख्याती झाली त्या शरद अनंत जोशी यांचा जन्म ३ सप्टेंबर १९३५ रोजी झाला. शनिवार पेठ, सातारा येथे. पण एक आश्चर्य म्हणजे त्यांच्या, किंवा त्यांच्याविषयीच्या, प्रकाशित लेखनात ते सातारा येथे जन्मले ह्याची कुठेच नोंद नाही. खूप वर्षांनंतर, ९ जानेवारी २०१० रोजी, त्यांना तेथील रा. ना. गोडबोले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे साताऱ्यात जन्मलेल्या व लोकोत्तर कार्य केलेल्या एखाद्या व्यक्तीला दिला जाणारा साताराभूषण पुरस्कार मिळाला, तेव्हाच बहुतेकांना कळले, की साताऱ्याशी त्यांचे असे काही जवळचे नाते आहे. याचे एक कारण कदाचित हे असावे, की त्यांचे वडील अनंत नारायण जोशी हे पोस्टात नोकरीला होते व त्यामुळे त्यांच्या बऱ्याच बदल्या होत असत. विशेषतः सुरुवातीच्या काळात. पुढे ह्या बदल्यांची वारंवारिता कमी झाली.
 अनंतरावांचा जन्म १९०५ सालचा. ते चार-पाच वर्षांचे असतानाच त्यांचे आईवडील वारले. घरची आत्यंतिक गरिबी होतीच, त्यात आता आणखी अनाथाचे जिणे नशिबी आले. आधार कोणाचाच नव्हता. माधुकरी मागून आणि घरोघर वारावर जेवूनच त्यांचे शिक्षण झाले. कोल्हापूर येथील एका ख्रिश्चन मिशनरी शाळेत. त्यामुळे त्यांच्या मनावर ख्रिस्ती शिकवणुकीचा बराच प्रभाव पडला होता. पुढे शरद जोशी यांच्या एका कथेवर त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली होती, तिच्यावरून त्यांच्या स्वभावावर थोडासा प्रकाश पडतो.
 कॉलेजात शिकत असताना शरद जोशींनी ती कथा लिहिली होती व त्यावेळच्या एका चांगल्या मासिकात ती प्रसिद्धही झाली होती. त्या कथेत मुंबईतला एक तरुण लोकल गाडीखाली सापडून मरतो व त्याचे प्रेत त्याच्या घरी आणले जाते. चाळीतली सर्व मंडळी अवतीभवती गोळा होतात. त्यांच्यात एक विधवा असते. त्या तरुणाच्या शेजारीच राहणारी. प्रेत बघितल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर काय काय प्रतिक्रिया उमटल्या व विशेषतः त्या विधवेच्या चेहऱ्यावर काय भाव उमटला याचे वर्णन करताना त्यांनी लिहिले होते, की एखाद्या विधवा बाईला दुसऱ्या बाईचा नवरा मेल्यावर जे समाधान वाटेल, तसे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते! हे मी माझ्या खवचट स्वभावाने लिहिले होते' असेही त्यांनी नंतर नमूद केले आहे. सॉमरसेट मॉम हा त्यांचा त्यावेळचा आणि नंतरचाही आवडता लेखक. त्यावेळी जोशींनी नुकतीच कथा लिहायला सुरुवात केली होती व मॉमच्या काही कथांचा त्यांनी अनुवादही केला होता. मॉम त्याच्या इतर वैशिष्ट्यांबरोबरच मनुष्यस्वभावातील विसंगतीच्या चित्रणासाठी, चर्च व मिशनऱ्यांच्या थट्टेसाठी आणि एकूणच तुच्छतावादासाठी (सिनिसिझमसाठी) प्रसिद्ध. त्याच्याच प्रभावाखाली लिहिलेले हे वाक्य असावे. वडलांच्या वाचनात ती कथा आली व ते वाक्य त्यांना अजिबात आवडले नाही. त्यांच्या त्या वेळच्या प्रतिक्रियेविषयी जोशींनी बऱ्याच वर्षांनी (अंगारमळा, पृष्ठ ११४) लिहिले आहे,

माझे वडील अगदीच वेगळ्या पठडीतले. राग आला तर दुष्ट, कपटी, अभद्रेश्वर व राक्षस यापलीकडे पाचवी शिवी त्यांना माहीत नव्हती. माझी गोष्ट वाचून ते रागाने म्हणाले, 'मनुष्य जितका दुष्ट आहे, तितकं सगळं कागदावर लिहिण्याची काही आवश्यकता नाही.' मी मोठ्या पंचायतीत सापडलो. जे आहे, जे मला दिसतंय ते लिहायचं नाही, म्हणजे मग काय लिहायचं? मग मी हळूहळू साहित्यापासून दूर जायला लागलो.

 अनंतराव पोस्टात साधे कारकून म्हणूनच लागले होते. 'एकदा माणूस पोस्टात लागला की निवृत्त होईपर्यंत तिथेच चिकटतो' असे गमतीने म्हटले जाई. अनंतरावांच्या बाबतीतही ते खरेच ठरले. ह्या नोकरीत पगार तसा बेताचाच असायचा; शिवाय पदरी चार मुलगे व दोन मुली. त्यामुळे तसा ओढाताणीचाच संसार. वडलांना खास आवडीनिवडी अशा फारशा नव्हत्या. सामाजिक जीवनातही त्यांचा काही सहभाग नसे. त्या काळातील बहुसंख्य सरकारी नोकरांप्रमाणे आपण बरे की आपली नोकरी बरी अशीच एकूण त्यांची वृत्ती असावी.

 जोशींच्या आईचे नाव इंदिरा. त्यांचा जन्म १ जुलै १९११ रोजी झाला. त्या मूळच्या पंढरपूरच्या. माहेरच्या आपटे. वर देशस्थ-वधू कोकणस्थ असा, आज काहीच विशेष नसलेला पण पाऊणशे वर्षांपूर्वीच्या ग्रामीण महाराष्ट्रात पुरोगामी मानला जाणारा त्यांचा विवाह. वडलांना मुले 'काका' म्हणत, तर आईला 'माई'.
 आपल्या वडलांबद्दल जोशींनी फारसे कुठे लिहिलेले नाही, ते वारलेही तसे लौकर; पण आईबद्दल मात्र त्यांनी काही ठिकाणी उत्कटतेने लिहिले आहे. त्या पंढरपूरच्या असूनही त्यांच्या घरची मंडळी वागण्यात फारशी धार्मिक वा कर्मकांड पाळणारी नव्हती. शिवाय, इंदिराबाई कायम तेथील बडव्यांच्या विरोधात असत. ते बडवे अनीतीने वागतात, भाविकांना लुटतात, आणि विशेष म्हणजे गावात येणाऱ्या परित्यक्तांशी गैरवर्तन करतात असे बोलले जाई व त्याचा इंदिराबाईंना खूप राग असायचा. त्यांचे वडील विष्णुपंत विठ्ठल आपटे समाजसुधारक होते. १९१४ साली त्यांनी पंढरपुरात आपटे प्रशाला सुरू केली होती. पुढे उपलब हे पंढरपुरातील प्रसिद्ध उद्योजक कुटुंबही तिच्यात सहभागी झाले व आपटे-उपलब प्रशाला ह्या नावाने आजही ती शाळा चालू आहे.
 आश्चर्य म्हणजे घरची शाळा असूनही इंदिराबाईंचे औपचारिक असे शालेय शिक्षण झाले नव्हते. दोन बालविधवा बहिणी घरात; त्यामुळे घरकाम खूप. घरच्या सुसंस्कृत वातावरणामुळे इंदिराबाईंना लहानपणापासूनच वाचनाचे वेड मात्र होते. अनेक कविता त्यांना पाठ होत्या. संगीताचीही आवड होती व पाठ केलेल्या कविता त्या नेहमी सुरेल आवाजात मोठ्याने म्हणत असत. पेटीही छान वाजवायच्या. त्यांची दृष्टी लहानपणापासून अधू होती; एका डोळ्याने काहीच दिसत नसे व पुढे पुढे तर दुसऱ्या डोळ्यानेही खूप पुसट दिसायला लागले. त्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी व त्यामुळे कदाचित अधिक चांगले दिसू लागेल, असे अनेकांनी सुचवूनही त्या तयार झाल्या नाहीत. “शस्त्रक्रिया करायचीच तर लहानपणीच आंधळ्या झालेल्या डोळ्यावर करा. सुधारला तर तो सुधारेल. नाहीतर मी दोन्ही डोळ्यांनी आंधळी होईन," त्या म्हणत.
 हो-नाही करता करता अनेक वर्षे गेली. पुढे वय झाल्यावर मग शेवटी डॉक्टरांचेही मत 'ह्या वयात आता ऑपरेशनचा धोका नकोच' असे झाले. त्यामुळे मग ऑपरेशन टळले, पण जवळजवळ काहीच दिसेनासेही झाले. तशाही परिस्थितीत त्यांची वाचनाची आवड कायम होती. रोजचे वर्तमानपत्र अगदी डोळ्याशी नेऊन वाचायला लागले तरीही त्या वाचत. त्यांनी दोन नाटके आणि काही कथाही लिहिल्या होत्या; वृत्तपत्रांकडे त्या पत्रेही पाठवत.
 अधूनमधून त्यांना कविता स्फुरायच्या व जे कोणी मूल जवळपास असेल त्याला ती कविता सुवाच्य अक्षरात लिहून द्यायचा त्या आग्रह करायच्या. बालसुलभ वृत्तीनुसार मुले ती लिहून घेण्यात टंगळमंगळ करत असत. तरीही त्या मुलांना पुनःपुन्हा विनंती करत, मुलांच्या मागे लागत. त्यांच्या काही कविता कुठे कुठे छापूनही आल्या होत्या. आपल्या कवितांचे पुस्तक निघावे अशी त्यांची इच्छा होती. 'माझं एखादं पुस्तक प्रसिद्ध कर, असा लकडा त्यांनी नंतर जोशींचे एक निकटचे सहकारी प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांच्यामागे लावला होता. आपल्या अखेरच्या दुखण्याच्या वेळी इस्पितळात असतानासुद्धा त्यांनी म्हात्रेंना त्याची आठवण करून दिली होती. पण काही ना काही कारणांनी योग येत नव्हता. त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी म्हात्रे यांच्या पुढाकारातून ती इच्छा पूर्ण झाली; त्यांच्या कवितांचा एक संग्रह ३ सप्टेंबर २०१५ रोजी, शरद जोशी यांच्या ऐंशीव्या वाढदिवशी, श्रीकांत उमरीकर यांच्या औरंगाबाद येथील जनशक्ती वाचक चळवळीने माईंच्या कविता या नावाने प्रसिद्ध केला. एक वेगळेपण म्हणजे त्या वृत्तबद्ध आहेत व त्यांतील अनेकांना इंदिराबाईंनी त्यावेळच्या प्रसिद्ध गीतांनुसार चालीही लावल्या होत्या.
 १९८२ ते १९९२ या कालावधीत म्हात्रेनी इंदिराबाईंशी शक्य तेवढा संपर्क ठेवला. त्या काळात चळवळीमुळे जोशी बहुतांशी प्रवासात असत, पुण्यात येणे कारणपरत्वेच होई. म्हात्रे अधिक वरचेवर येत. आई, कशाला ग पुनः दुष्ट पावसाळा आला? या शीर्षकाची इंदिराबाईंची एक कविता कित्येक वर्षांपूर्वी साधना साप्ताहिकात प्रकाशित झाली होती. जोराच्या पावसामुळे गरिबाच्या घरात पाणी कसे शिरते, सगळ्यांचे किती हाल होतात, तो प्रश्न विचारणाऱ्या मुलाचे वडीलही अशाच पावसाळ्यात कसे वारलेले असतात वगैरे अनेक आठवणींचे चित्रण करणारी. म्हात्रेनी ती त्याचवेळी वाचली होती व प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्यांनी एकदा इंदिराबाईंना तिची आठवण करून दिली. इंदिराबाईंना त्याचे फार कौतुक वाटले होते. म्हात्रे पेटीही चांगली वाजवत. दोघांना जोडणारा तो आणखी एक दुवा. म्हात्रेंना त्या आपला मुलगाच मानत. म्हात्रे सांगत होते, "आपल्या शरदला हा सांभाळेल, असा विश्वास बहुधा त्यांना वाटत होता."
 इंदिराबाई खूप कर्तृत्ववान व कामसू होत्या; सतत काही ना काही चालूच असायचे. बागेतला पालापाचोळा गोळा करणे, घरचे केरवारे, भांडी-धुणी, स्वैपाक वगैरे सगळी कामे त्या स्वतःच करायच्या. लहानसहान दुरुस्तीची कामेही. अधूनमधून मोलकरीण मिळायची, पण त्यांच्या कडक शिस्तीला कंटाळून ती लगेचच काम सोडून द्यायची. त्यामुळेही कदाचित त्यांना सर्व कामे स्वतः करायची सवय लागली असेल. शिवाय कुठलेही काम कसे करायचे ह्याची त्यांची एक पद्धत ठरलेली असायची व तीच पद्धत सर्वोत्तम आहे याविषयी त्यांची खात्री असायची. तसे त्या इतरांना पटवूनही द्यायच्या. कुठलेही काम दुसऱ्या कुठल्या पद्धतीने केलेले त्यांना पसंत पडत नसे. साहजिकच त्यांच्याकडे कोणी नोकर टिकत नसत. पुढे जोशींनी लिहिले आहे, "तिच्याकडे कामाला राहिलेल्या बाया, मोलकरणी यांच्याच कथा लिहायच्या म्हटल्या, तरी तो एक वाचनीय ग्रंथ होऊन जाईल."
 त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्या अगदी करारी व स्वतंत्र बाण्याच्या होत्या. "शिकली असती तर माझी आई एखाद्या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टरही सहज झाली असती," असे त्यांचे सध्या नाशिकला राहणारे एक चिरंजीव प्रभाकर ऊर्फ येशू प्रस्तुत लेखकाला म्हणाले होते.
 यजमान वारल्यानंतरही कुठल्याच मुलाकडे न जाता त्यांनी स्वतःच्या घरात एकट्याने राहणेच पसंत केले होते. पुण्यात प्रभात रोडवर, आताच्या आयकर कार्यालयाजवळ पतीने बांधलेल्या 'सदिच्छा' ह्या छोट्या बंगल्यात. आपल्या खासगीपणाची (पर्सनल स्पेसची) कटाक्षाने केलेली जपणूक हे एकूणच जोशी कुटुंबीयांचे एक वेगळेपण असल्याचे जाणवते. जोशी जेव्हा स्वित्झर्लंडहून सहकुटुंब भारतात परतले, तेव्हादेखील स्वतःचे वेगळे घर विकत घेईपर्यंतचे सहाएक आठवडे आईकडे न राहता ते सहकुटुंब डेक्कनवर श्रेयस हॉटेलात राहिले होते. थोरल्या भगिनी नमाताई पुढे म्हातारपणी जबलपूरहून महाराष्ट्रात स्थायिक झाल्या, तेव्हा त्यांनीही चाकणला आपले स्वतंत्र बिहाड थाटले; त्या पुण्यात भावाकडे म्हणजे शरदकडे राहायला आल्या नाहीत.

 १९७० साली अनंतराव वारले. वयाच्या पासष्टाव्या वर्षी. त्यावेळी सुट्टी घेऊन जोशी स्वित्झर्लंडहून पुण्याला आले होते. परत गेल्यावर त्यांनी आईला एका पत्रात लिहिले होते : "काका गेले म्हणजे आता उरलेले आयुष्य कसेबसे काढून संपवायचे आहे, असा विचारही मनात आणू नकोस. अशातही जिद्दीने उभे राहून आयुष्याला एक नवा अर्थ दिला पाहिजे." नंतर या संदर्भात लिहिताना “मी तिला असे लिहिण्याची गरज होती असे नाही; मी न लिहिताही तिचा निर्णय असाच झाला असता," असेही जोशींनी लिहिले आहे. परंतु माई मात्र त्या पत्राचा वरचेवर उल्लेख करत. पतिपश्चात आपल्या आयुष्याची घडी त्यांनी पुन्हा एकदा बसवली; पण तरीही पतीमागे तब्बल बावीस वर्षे एकट्याने राहण्याची वेळ येईल अशी त्यांची अपेक्षा नसावी. "मला घेऊन जायचं देव विसरून गेला," त्या कधीकधी म्हणत.

 दिवस जात राहिले; त्या ब्याऐंशी वर्षाच्या झाल्या. डॉक्टरकडे त्या अगदी क्वचितच जात. लिंबाचे सरबत किंवा आल्याचे पाचक किंवा एखादे आयुर्वेदातले चूर्ण यावर त्यांचे दुखणे बहुतेकदा बरे होई. पण एक दिवस अगदी गंभीर प्रसंग ओढवला. घरी स्वयंपाक करता करता पदर पेटून भाजल्याने त्यांना पुण्यात जवळच असलेल्या जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. हॉस्पिटलमध्ये असतानाच माई गेल्या. तो दिवस होता ३ मार्च १९९२.

 शरदचा जन्म पंचांगाप्रमाणे ऋषिपंचमीचा. शरद हे नाव मोठ्या बहिणीने, नमाताईने, ठेवले. शरद इतर भावंडांच्या तुलनेत सावळा पण अंगाने गुटगुटीत होता. 'सुदृढ बालक स्पर्धेत त्याला नक्की बक्षीस मिळालं असतं,' असे आई म्हणायची. घरी सगळे त्याला गबदुलशेठ म्हणत. बोलणे थोडे बोबडे; त्यामुळे बोबडकांदा म्हणूनही चिडवत. साताऱ्यात दोन-तीनदा वडलांनी घरे बदलली व पुढे लवकरच त्यांची बेळगावला बदली झाली.
 बेळगावात ठळकवाडीत लोकूर म्हणून एका डॉक्टरांचा बंगला होता. त्याच्या आउटहाउसमध्ये जोशी परिवार राहू लागला. जवळच एक शाळा होती. 'रजपूत बंधूंची शाळा' असेच तिला म्हणत. इथले माध्यम कन्नड नव्हते, तर मराठीच होते. ह्या खासगी शाळेत महिन्याला एक रुपया फी होती, इतर सरकारी शाळा फुकट होत्या; पण घरच्यांना शिक्षणाचे महत्त्व असल्याने सगळी मुले ह्याच शाळेत जाऊ लागली. 'आपण सरकारी शाळेत नव्हे, तर खासगी शाळेत जातो' ह्याचा आजच्याप्रमाणे त्या काळीही काहीसा अभिमान बाळगला जाई. मास्तरांनी घेतलेल्या प्रवेशपूर्व चाचणीत चांगली उत्तरे दिल्यामुळे धाकट्या शरदला एकदम दुसरीत प्रवेश दिला गेला. लहानपणापासून शरद खूप हुशार. पाठांतर उत्तम. मोठा भाऊ बाळ एक यत्ता पुढे होता, पण त्याच्याबरोबरच वावरत असल्याने ऐकून ऐकून त्याचेही धडे शरदला पाठ असत. त्यामुळे खरेतर शरदला एकदम तिसरीत बसवायलाही रजपूत मास्तर तयार होते. पण 'शरदला माझ्याच वर्गात बसवलं तर मी शाळा सोडून देईन' अशी धमकी बाळने दिल्यामुळे नाइलाजाने शरदला दुसरीतच बसावे लागले. त्याची जीभ थोडीशी जड होती; तरीही कष्टपूर्वक त्याने आपले उच्चार सुधारले. बऱ्याच वर्षांनी बेळगाव येथील एका जाहीर सभेत जोशींनी केलेल्या अस्खलित भाषणाचे रजपूत मास्तरांना त्यामुळे खूपच कौतुक वाटले होते.
 बेळगावचा एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. पाटकर नावाच्या एका शिक्षकांची शिकवणी आईने बाळला ठेवली व त्याच्याबरोबर तूही बसत जा' असे शरदला सांगितले. शरदला तो अपमान वाटला. शिकवणी लावणे म्हणजे कुठेतरी आपण अभ्यासात कमी आहोत, मठ्ठ आहोत, हे मान्य करणे असे त्याला वाटले. त्याची समजूत घालताना आई म्हणाली,
 “गरीब बिचारे पाटकर मास्तर! महिना एक रुपयात रोज तासभर घरी येऊन शिकवणी घ्यायला तयार आहेत आणि तुम्ही दोघंही बसणार असलात तर ते आपल्यालाही परवडेल. तुला शिकवणीची कदाचित गरज नसेल, पण बाळला तिचा उपयोग होणार आहे. त्याच्याशेजारी नुसतं बसायला तुला काय एवढा त्रास आहे? तेवढंच काही कानावर पडेल. पुढच्या वर्षी तुला कदाचित बाळबरोबर एकदम चौथीतच बसवू. शिवाय ह्या एक रुपयाची पाटकर मास्तरांना मोठी मदत होणार आहे. अरे, तुझ्या वडलांना महिना चाळीस रुपये पगार आहे आणि तरी त्यात भागवताना आपली किती ओढाताण होते तुला ठाऊकच आहे. पाटकर मास्तरांना तर फक्त महिना आठ रुपये पगार आहे! त्यांची किती ओढाताण होत असेल?"
 त्यानंतर शरद शिकवणीला बसायला तयार झाला. कदाचित मोठ्या भावाबरोबर एकदम चौथीत बसायच्या आमिषाने! शिकवणीचा त्याला किती फायदा झाला असेल कोण जाणे, पण आईने ज्या प्रकारे त्याची समजूत काढली, त्याची मात्र त्याला आयुष्यभर आठवण राहिली. आपली परिस्थिती चांगली नसली, तरी आपण आपल्यापेक्षाही दुर्बळ अशा कोणालातरी मदत करू शकतो ही शिकवण फार महत्त्वाची होती. 'लहानपणी आम्ही गरीब असतानाही आमच्याकडे कायम कोणीतरी विद्यार्थी वारकरी म्हणून रोज जेवायला असायचा, याचा उल्लेख त्यांनी एकदा काहीशा अभिमानाने केला होता. गरजू विद्यार्थ्याला वारावर जेवायला घालून मदत करायची, तर गरजू मास्तरांना शिकवणी देऊन मदत करायची, हा इंदिराबाईंचा मनोदय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगणारा आहे.
 बेळगावची जोशींनी सांगितलेली आणखी एक आठवण म्हणजे ते तिथे जिन्यावरून खाली पडले होते ती. ते म्हणाले,
 “मला फ्लॅट फूटचा, सपाट तळपायाचा, थोडा त्रास होता. साहजिकच तोल सांभाळणं इतर सर्वसामान्य मुलांपेक्षा मला किंचित अवघड व्हायचं. अशा मुलांना लष्करात प्रवेश मिळत नसे. साताऱ्याला असताना एकदा मी व बाळ डोंबाऱ्याचा खेळ खेळत होतो व तेव्हाही मी असाच दोरीवरून पडलो होतो आणि पायही मुरगळला होता."
 पुढील आयुष्यात जोशी भरपूर चालत, अगदी गिर्यारोहणही करू लागले. बोबडेपणाप्रमाणे ह्या फ्लॅट फूटवरही त्यांनी मात केली. या सगळ्यामागे, जन्मजात शारीरिक कमतरतेवर मात करण्यामागे, त्यांची जिद्द दिसून येते.
 त्यांची आणखीही एक लहानपणची साताऱ्यातली आठवण ह्या गिर्यारोहणप्रेमाशी असलेला बालपणाचा संबंध सुचवणारी आहे. ते सांगत होते,
 "लहानपणी मला प्लुरसी झाली होती - फुफ्फुसांचा हा एक न्युमोनियासारखा विकार. त्याचा परिणाम म्हणून कदाचित असेल, पण मला बंदिस्त जागेत खूप कोंदटल्यासारखं (claustrophobic) होई. डोंगरावर फिरायला गेलं, की मात्र तिथल्या मोकळ्या हवेमुळे बरं वाटायचं. साताऱ्याला अजिंक्यतारा किल्ल्यामागे खूप डोंगर होते. आमच्या गड्याच्या किंवा कधी वडलांच्या खांद्यावर मी बसलेला असायचो. तिथून लांबवरचं दृश्य दिसायचं. ते बघणं मला खूप आवडायचं. पुढे मला डोंगर चढायची जी आवड लागली, तिचं मूळ कुठेतरी ह्या शारीरिक कमतरतेत असावं."

 १९४२च्या फेब्रुवारीत वडलांची नाशिकला बदली झाली. यावेळी बढतीही मिळाली होती. पोस्टाच्या एका खात्यांतर्गत परीक्षेत पहिला क्रमांक मिळाल्याने त्यांना इन्स्पेक्टर म्हणून नेमले गेले. पगारही थोडा वाढला. गंगापूर रोडवर कुलकर्णी नावाच्या एका गृहस्थांच्या बंगल्यात ते राहू लागले. तिसरी व चौथी यत्ता शरदने इथल्या प्राथमिक विद्यामंदिर ह्या शाळेत काढल्या व नंतर पाचवी ते नववी त्याच शाळेशी संबधित असलेल्या रुंगठा हायस्कूलमध्ये. तेच सध्याचे न्यू हायस्कूल. इथे असताना शरदला वाचनाचे जे वेड लागले ते पुढे आयुष्यभरासाठी. त्या दिवसांविषयी बोलताना जोशी म्हणत होते,
 "मला वाचनाकडे वळवण्यात मोठा सहभाग होता तो तेथील एक शिक्षक अकोलकर ह्यांचा. त्याच सुमारास मी शेजारपाजारच्या इतर मुलांबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही जाऊ लागलो. संघात जाण्यामागे फारसं काही वैचारिक कारण होतं असं नाही, पण संध्याकाळचे शाखेतले मैदानी खेळ मला आवडायचे. त्यावेळी टीव्ही वगैरे नव्हते. आमच्या घरासमोरच्या रस्त्यावरून कधी कधी संघाची संचलनं होत. गणवेषातले ते सगळे शिस्तीत चालणारे तरुण बघायला मजा यायची. आम्ही मुलंही मग घरातल्या घरात जमिनीवर चिंचोके मांडून संचलनाचा असा एक खेळ खेळायचो. संघाप्रमाणेच राष्ट्रसेवादलातही आम्ही जायचो. तेही मला आवडायचं. सानेगुरुजी त्यावेळी सेवादलात येत. सुंदर, भावुक गाणी तालासुरात म्हणत व त्यांच्यामागे आम्हालाही मोठ्याने म्हणायला लावत. त्यावेळचे सानेगुरुजी खूप ओजस्वी अशी भाषणंही करत. आमचा ते अगदी आदर्श होते."

 १९४२चा ऑगस्ट महिना. गांधीजींच्या आदेशानुसार चले जाव आंदोलन सुरू झाले. प्रभातफेऱ्या वगैरे सुरू झाल्या होत्या. शरद तेव्हा सात-आठ वर्षांचाच होता, त्यामुळे प्रत्यक्ष आंदोलनात तो सहभागी व्हायचा प्रश्नच नव्हता. पण विशेष म्हणजे सेवादलातील अन्य मुलांना होती त्याप्रमाणे त्याला किंवा घरच्यांना एकूण त्या आंदोलनाबद्दल फारशी सहानुभूतीदेखील नव्हती. ह्याचे कारण सांगताना जोशी म्हणाले,

 “सरकारी नोकरीत असल्याने वडलांना चळवळीत कुठल्याही प्रकारे सहभागी होणं शक्य नव्हतं. दुसरं म्हणजे, गांधीजी जरी अहिंसेचे पाठीराखे होते, तरी प्रत्यक्षातलं आंदोलन अहिंसक नव्हतं. आंदोलक खूपदा जाळपोळदेखील करत. माझे वडील तेव्हा देवळाली पोस्ट ऑफिसात होते. पत्राची एक पेटी आंदोलकांनी जाळली होती. वडलांनी ती कशीबशी उघडली व आतली अर्धवट जळलेली पत्रं ते घरी घेऊन आले. घरीच मग आम्ही सगळ्यांनी त्यांचं सॉर्टिंग केलं व ती योग्य त्या ठिकाणी रवाना केली. त्यातली अनेक पत्रं महत्त्वाची असू शकतील. अहिंसात्मक मानल्या गेलेल्या चळवळीची ही दुसरीही बाजू होती हे त्या लहान वयातही माझ्या लक्षात आलं त्या विशिष्ट दिवशी एक अमेरिकन लष्करी अधिकारी आमच्या घरी आला होता. असे अनेक अमेरिकन तेव्हा इतर इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर भारतात होते. दुसरं महायुद्ध चालू असल्याने. सॉर्टिंगच्या वेळी आम्हाला सापडलेली काही महत्त्वाची पत्रं ताब्यात घेण्यासाठी तो आला होता. तो गेला तेव्हा आईने सगळं घर पाण्याने धुऊन काढलं होतं. तसं आमच्याकडे कोणीच कसली अस्पृश्यता पाळत नव्हतं, पण ह्या गोऱ्या सोजिरामुळे मात्र आपलं घर बाटलं असं तिला वाटलं असावं; किंवा कदाचित त्याच्या बुटाला माती लागलेली असेल व बुटांबरोबर तीही घरात आली असेल."

 'बेचाळीसचे गौडबंगाल' या त्यांनी बऱ्याच वर्षांनी लिहिलेल्या लेखाला (शेतकरी संघटक, २१ नोव्हेंबर १९९३) नाशिकमधील त्यावेळच्या अनुभवाची पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाने बेचाळीसच्या आंदोलनाचे सर्व श्रेय आवर्जून स्वतःकडे घेतले आहे; पण प्रत्यक्षात जोशीच्या मते त्या आंदोलनात गांधी-नेहरूंचा विरोध असलेला हिंसाचारही खूप झाला होता. टपाल कचेऱ्या जाळणे, विजेच्या व संदेश वाहतुकीच्या तारा तोडणे, रेल्वेचे रूळ उखडणे, सरकारच्या साऱ्या नाड्याच आखडल्या जातील व सेनेच्या हालचालींमध्ये अडचणी येतील असे संप जागोजाग घडवून आणणे; हे सारे झाले होते. 'बेचाळीसच्या चळवळीतील काँग्रेसची जबाबदारी' या विषयावर लंडन येथे एक श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात आली होती व या हिंसाचारातील काँग्रेसच्या सहभागाचे अनेक पुरावे त्यात देण्यात आले होते.
 तशी इंग्रज सरकारला बेचाळीसच्या आंदोलनाची फारशी फिकीर नव्हती; त्यांनी ते पोलिसांचे बळ वापरून महिन्याभरातच दाबूनही टाकले होते. त्याचप्रमाणे महायुद्ध चालू असताना व स्वतःचे सगळे सैन्य तिथे गुंतलेले असतानाच भारतात झालेल्या या आंदोलनामुळे ते दबले व म्हणून त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिले, या म्हणण्यातही जोशींच्या मते काही तथ्य नव्हते; कारण अमेरिका युद्धात उतरल्यावर दुसरे महायुद्ध आपण जिंकणार ह्याविषयी इंग्रजांना कधीच शंका नव्हती; पण जर्मनीवर आपण निर्णायक प्रतिहल्ला करण्यापूर्वी रशियावर स्वारी करून गेलेल्या जर्मन फौजांनी साम्यवादी रशियाचे जास्तीत जास्त नुकसान केले, तर ते त्यांना हवेच होते. म्हणूनच केवळ ते जर्मनीवर घणाघाती हल्ला करणे शक्य तितके लांबणीवर टाकत होते. पण रशियाने हिटलरला अनपेक्षितपणे जबरदस्त प्रतिकार केला व शेवटी जर्मनीला रशियातून काढता पाय घ्यावा लागला; उलट्या रशियन फौजा जर्मनीच्या रोखाने पुढे सरकू लागल्या. आता हिटलरच्या पाडावाचे सारे श्रेय रशियालाच मिळेल अशी धास्ती वाटून, शेवटी इंग्रजांनी ६ जून १९४४ रोजी फ्रान्समधल्या नॉर्मंडी इथे सर्वशक्तीनिशी दोस्तांची मोठी फौज अंतिम हल्ल्यासाठी उतरवली. लेखाच्या शेवटी जोशी या साऱ्या निवेदनाला एक अगदी आगळे असे वळण देतात. ते लिहितात,

१९४४-४५च्या सुमारास भारतातील तरुणांवर जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन यांचा मोठा प्रभाव होता. युद्ध संपले, स्वातंत्र्यदानाची प्रक्रिया सुरू झाली. स्वातंत्र्य जर लवकर आले नाही, तर अहिंसावादी स्वराज्य आंदोलन संपून बेचाळीसच्या जहालांच्या हाती आंदोलनाचे नेतृत्व जाईल, अशी धास्ती नेहरूपटेल यांनासुद्धा पडली होती. घाईत त्यांनी फाळणीदेखील कबूल करून टाकली. त्याचे एक कारण बेचाळीसच्या क्रांतिकारकांबद्दलची काँग्रेसनेतृत्वाची धास्ती, हे उघड आहे.

 काँग्रेसनेत्यांनी फाळणीला शेवटी पाठिंबा का दिला, याची अनेक संभाव्य कारणे पूर्वी वाचनात आली होती; पण चळवळीचे नेतृत्व आपल्या हातून निसटेल व ते जहालांच्या हाती जाईल, आणि पर्यायाने हातातोंडाशी आलेला स्वातंत्र्योत्तर सत्तेचा आपला घासही हिरावला जाईल ही काँग्रेसनेत्यांची भीती हे एक कारण होते, हे मात्र कधी वाचनात आले नव्हते. एखाद्या घटनेचे इतरांपेक्षा अगदी वेगळे असे विश्लेषण जोशी कसे करू शकायचे याचे हे एक चांगले उदाहरण आहे.

 अनंतरावांचे नाशिकनंतरचे पोस्टिंग मुंबई इथे होते. राहायला त्यांनी भाड्याने घर घेतले होते. (६०, लक्ष्मी निवास, अंधेरी पूर्व) त्यावेळी वाजवी भाड्याने मुंबईत सर्वत्र जागा उपलब्ध होत्या. त्यावेळचा पार्ले-अंधेरी परिसर आतासारखा गजबजलेला नव्हता. खूप मोकळी जागा असायची, झाडे मुबलक होती, लोकवस्ती अगदी तुरळक व बरीचशी माणसे एकमेकांना ओळखतही असत. पुढे अनंतरावांची बदली प्रमोशनवर बडोद्याला झाली, पण कुटुंब मात्र त्यांनी याच घरात ठेवले.
 इथे जोशींच्या अन्य भावंडांविषयी लिहायला हवे. एकूण ती सहा भावंडे. सगळ्यात मोठ्या निर्मला ऊर्फ नमाताई. यांचा जन्म १९३०चा. म्हणजे शरदहन पाच वर्षांनी मोठ्या. त्यांचे यजमान चंद्रकांत देशपांडे जबलपूरला सरकारच्या दारूगोळा कारखान्यात होते व आयुष्याची पन्नास वर्षे त्या तिथेच राहिल्या. नंतर सिंधूताई वसंतराव जोशी. मुंबईत गोवंडीला राहायच्या. त्या रसायनशास्त्र विषय घेऊन एम्.एस्सी. झाल्या होत्या व टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नोकरी करत. त्यांचे यजमान वसंतराव टेक्स्टाइल इंजिनिअर होते. आता दोघेही हयात नाहीत. त्यांचे जवळचे वर्गमित्र गोपाळराव परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार वसंतराव मुंबईच्या व्हीजेटीआयमधून पदवी मिळवणाऱ्या पहिल्याच बॅचचे विद्यार्थी; तत्पूर्वी तिथून फक्त डिप्लोमा मिळायची सोय होती. पुढे ते एका कापडगिरणीत मॅनेजिंग डायरेक्टरही बनले. त्यांच्या व सिंधूताईंच्या लग्नात परांजपेंचा बराच पुढाकार होता. तिसरा क्रमांक मनोहर ऊर्फ बाळासाहेब जोशी यांचा. त्यांनी आधी बी.एस्सी. केले व नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा घेतला. पुढे त्यांनी दिल्लीजवळ फरीदाबाद येथे इलेक्ट्रिक स्विचेस बनवायचा कारखाना सुरू केला. २०१३ मध्ये ते वारले. चौथे भावंड म्हणजे शरद. पाचवे प्रभाकर ऊर्फ येशू. ते मेकॅनिकल इंजिनिअर होते व पुढे जर्मनीत जाऊन त्यांनी उच्चशिक्षणही घेतले होते. हुबळी, अहमदाबाद, मुंबई, पुणे वगैरे ठिकाणी नोकरी करून शेवटी त्यांनी कर्नाटकात स्वतःचा कारखानाही काढला होता. पुढे वृद्धापकाळी सेवानिवृत्ती घेऊन शेवटची दोन वर्षे ते सपत्नीक नाशिकला राहत होते. १ नोव्हेंबर २०१६ मध्ये ते निवर्तले. सहावे व सर्वांत धाकटे भावंड म्हणजे मधुकर जोशी. त्यांनीही टेक्स्टाइल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा घेतला होता. ते नोकरीसाठी अमेरिकेत गेले व नंतर तिथेच स्थायिक झाले; आता हयात नाहीत. आता फक्त निर्मला ऊर्फ नमाताई हयात आहेत.
 वडलांची नोकरी बदलीची असल्याने या सर्वच सहा भावंडांना मुख्यतः माईंनी वाढवले. आईचे संगीतप्रेम पुढे सर्व सहा मुलांमधेही आले. त्यांच्यातला तो एक समान धागा. शाळेत असतानाच नमा व सिंधू गाणे शिकल्या, तर बाळ तबला शिकला. सर्वांत मोठ्या नमाताई जबलपूरला हार्मोनियम व तबल्याचे क्लासेसदेखील घ्यायच्या, तर त्यानंतरच्या मुंबईत स्थायिक झालेल्या सिंधूताई व्हायोलिन शिकवायच्या. शरद जोशींनी संगीतात प्रावीण्य असे मिळवले नाही; पण त्यांची गाण्यांची आवड कायम राहिली; मोठेपणीही फावल्या वेळात सैगल व मुकेश यांची अनेक गाणी ते गुणगुणत असत. विशेषतः दर्दभरी. प्रवासात गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या, तर त्यातही उत्साहाने भाग घेत. त्यांना कविता आवडत आणि त्या मोठ्याने चालीवर म्हणायलाही आवडे. ही आईकडूनच आलेली आवड.

 शाळेची दहावी व अकरावी (त्यावेळचे मॅट्रिक) ही शेवटची दोन वर्षे शरदने जवळच असलेल्या विलेपार्ले पूर्व येथील पार्ले टिळक विद्यालयातून केली. इथे काही विषय इंग्रजी माध्यमातून होते.
 शाळेत शिकत असतानाच मुंबई सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकलेच्या एलेमेंटरी व इंटरमिजिएट या दोन परीक्षाही शरदने १९४७ व १९४८ साली यशस्वीपणे दिल्या होत्या. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या हिंदीच्या, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृतच्या व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मराठीच्या परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता.
 शाळेत असताना शरदने 'मौजे अकरावी' नावाचे एक हस्तलिखित काही दिवस चालवले होते. पेंढारकर नावाचे एक कर्तबगार शिक्षक तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांच्याशी कशावरून तरी शरदचा एकदा वाद झाला. त्यावेळी ह्या हस्तलिखितातून त्याने शिक्षकांवर टीका केली होती. ह्यावर मुख्याध्यापकांनी त्याला आपल्या कार्यालयात बोलावून घेतले व त्याची चांगलीच हजेरी घेतली. शिवाय, त्या हस्तलिखितावर बंदीही घातली. शरद खूप नाराज झाला, पण त्याचे काही चालले नाही. ह्या सगळ्या घडामोडी होत असताना आपल्या अभ्यासाकडे मात्र शरदने दुर्लक्ष केले नव्हते. ६ जून १९५१ रोजी अकरावीच्या परीक्षेचा निकाल लागला. ८००पैकी ५६२, म्हणजे सत्तर टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. त्याकाळी आजच्याइतकी गुणांची खैरात केली जात नसे.

 शरद जोशी आता सोळा वर्षांचे झाले होते. हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा. ह्या टप्प्यावर घ्यायचा सर्वांत मोठा निर्णय म्हणजे अकरावीनंतर काय करायचे. इतर मित्रांप्रमाणे सायन्स वा आर्टसला न जाता जोशींनी मुंबईतील सिडनम (Sydenham, सिडनेहम हा उच्चारही आपल्याकडे रूढ आहे) ह्या वाणिज्य (कॉमर्स) कॉलेजात प्रवेश घेतला.
 त्यामागेही रोचक पार्श्वभूमी आहे. खरे तर जोशी कॉमर्सला जातील असे कोणालाच कधी वाटले नव्हते; त्यांना स्वतःलाही नाही. शाळेत असताना संस्कृत हा त्यांचा आवडता विषय होता. असंख्य श्लोक, स्तोत्रे, सुभाषिते; रघुवंश-मेघदूतसारखी काव्येही त्यांना तोंडपाठ होती. भावी आयुष्यात लिहिलेल्या त्यांच्या अनेक उत्तम लेखांची शीर्षके संस्कृत आहेत. उदाहरणार्थ, इति एकाध्याय, मुहुर्तम् ज्वलितम् श्रेयम् वगैरे. “लहानपणी मला कधी अस्वस्थ वाटू लागलं, की मी गीता म्हणायचो," असे ते एकदा म्हणाले होते. त्या वयात गीतेचा अर्थ कितपत उलगडत होता, हा भाग वेगळा; पण बरीचशी भगवद्गीता त्यांना तोंडपाठ होती हे नक्की. गीताधर्म मंडळ, पुणे, या संस्थेने घेतलेली गीतासार परीक्षा ते डिसेंबर १९४८मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. सुदैवाने संस्कृतसाठी त्यांना सतत चांगले शिक्षकदेखील लाभले. नाशिकच्या शाळेतील गुरुजी विषय सोपा करून शिकवत. पाठांतराऐवजी प्रत्यक्ष बोलण्यावर त्यांचा भर होता. वर्गात ते सर्वांना संस्कृतातच बोलायला लावत. ही आवड मुंबईला आल्यावर अधिकच वाढली. स्वतः मुख्याध्यापक पेंढारकर संस्कृतच शिकवायचे.
 आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे नारायण अभ्यंकर नावाचे शिक्षक, अभ्यंकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. संस्कृत, गणित, संगीत व कुंडली ज्योतिष ह्या चारही विभिन्न क्षेत्रांत त्यांनी असामान्य प्रावीण्य मिळवले होते. लोकमान्य टिळकांच्या प्रभावामुळे इतर उत्तम नोकऱ्या मिळत असूनही त्यांनी शिक्षकाचा पेशा पत्करला होता. गिरगावच्या विल्सन स्कूलमध्ये ते संस्कृत व गणित शिकवत. राहायचे शिवाजी पार्कला. दिसायला ते काहीसे जे. कृष्णमूर्तीसारखे दिसत. मूळचे ते कोल्हापूरचे व म्हणून अनंतरावांच्या लहानपणापासून ओळखीचे. ते भविष्य सांगत व ते बहुतेकदा खरे ठरते, असा त्यांचा लौकिक होता. अनंतराव अनेकदा त्यांच्याकडे पत्रिका दाखवायला, मुहूर्त काढायला वगैरे जात असत. वडलांच्या सांगण्यानुसार जोशी अभ्यंकरांकडे संस्कृतच्या शिकवणीसाठी जाऊ लागले. मोठे बंधू बाळासाहेबदेखील त्यांच्याकडे यायचे; पण ते गणिताच्या शिकवणीसाठी. त्यांच्या घरी जेव्हा जोशी प्रथम गेले. तेव्हा त्यांची जणू परीक्षा घेण्यासाठी अभ्यंकरांनी त्यांना एका इंग्लिश परिच्छेदाचे संस्कृतात भाषांतर करायला सांगितले व ते जरावेळासाठी म्हणून घराबाहेर गेले.ते परत आले तेव्हा जोशींचे भाषांतर पूर्ण झाले होते. विशेष म्हणजे गद्यापेक्षा पद्यातले संस्कृत अधिक गोड वाटते, म्हणून जोशींनी त्या उताऱ्याचा चक्क पद्यात अनुवाद केला होता. अभ्यंकर खूष झाले व जोशींना त्यांनी आपला शिष्य म्हणून स्वीकारले.
 आपल्या शिष्यांच्या जीवनात अभ्यंकर अगदी समरस होऊन जात. एकदा त्यांनी बाळासाहेबांना भूमितीच्या एका पुस्तकातील एक अवघड प्रमेय घातले होते व आश्चर्य म्हणजे ते दोघांनाही तासभर खटपट करूनही सोडवता येईना. दिवसभर अभ्यंकर अगदी बैचेन होते. संध्याकाळी अचानक त्यांना उत्तर सापडले. त्यांना इतका आनंद झाला, की लगेच त्यांनी आपल्या घरून लांब अंधेरीला जोशींच्या घरी धाव घेतली व बाळासाहेबांना ते प्रमेय कसे सोडवायचे ते सांगितले! जोशींना अभ्यंकरांविषयी फार आदर वाटायचा. अभ्यंकरांच्या शिकवणीचा शालेय अभ्यासातही फायदा होतच होता. त्यामुळे जेव्हा 'अकरावीनंतर पुढे काय करायचं?' ह्याची चर्चा मुलांमध्ये सुरू झाली तेव्हा जोशी संस्कृतच घेणार व पुढे संस्कृतचे प्राध्यापक होणार हे साऱ्यांनी गृहीतच धरले होते.
 मित्रांमधल्या त्या चर्चेच्या संदर्भात पुढे जोशींनी लिहिले आहे,

आकंठ जेवून तृप्त झालेल्याला रस्त्याकाठी बसलेल्या माणसाच्या पोटातील भुकेची जाणीव नसावी तसा, काहीशा आढ्यतेने मी मित्रांना म्हणालो, 'यात एवढा विचार

करण्यासारखं काय आहे? कोणताही शिक्षणक्रम घेतला तरी फरक काहीच पडत नाही.' चिंतामणराव देशमुख, त्यावेळचे आमचे दुसरे चरित्रनायक म्हणत, आवडणारी गोष्ट कोणीही करेल; पण करावी लागणारी गोष्ट आवडीने करणे यात पुरुषार्थ आहे. आपल्या लोकोत्तरतेच्या धुंदीत, आपल्या हातानेच आपले आयुष्य कडू करून घेण्यात गोडी मानणारे कितीतरी खांडेकरी नायक डोक्यात बिळे करून बसले होते.
(अंगारमळा, पृष्ठ ५१)

 जोशींना त्यांचा एक जवळचा मित्र म्हणाला, "तुझ्या बाबतीत काही प्रश्नच नाही रे. तू संस्कृत घेणार हे आम्हाला ठाऊकच आहे."
 खरे तर ह्यात जोशींनी नाराज व्हावे असे काहीच नव्हते, कारण शेवटी तो त्यांचा एक जवळचा मित्रच होता; पण कुठल्यातरी एका सर्वसामान्य विद्यार्थ्याने आपण भविष्यात काय करणार हे ठामपणे सांगावे हे त्यांना अजिबात आवडले नाही. काहीशा रागाने व त्याचे म्हणणे खोडून काढत “मी कॉमर्सला जाऊन अर्थशास्त्राचा अभ्यास करणार," असे जोशींनी जाहीर केले.
 घरी आल्यावर जोशींनी आपला निर्णय घरच्यांनाही सांगितला. सगळ्यांना आश्चर्य वाटले. शरदने प्राध्यापक बनावे आणि ते करायचे नसेल, तर इतर सगळ्या भावांप्रमाणे सायन्सला तरी जावे व इंजिनिअर बनावे असे घरच्यांचे म्हणणे पडले. कॉमर्सला जाऊन हा मुलगा पुढे करणार काय, हाच घरच्यांना प्रश्न पडला होता. स्वतः जोशींनाही आपण असे करणे कदाचित चुकीचे ठरेल हे विचारांती जाणवलेदेखील; पण एकदा सगळ्यांसमोर आपला निर्णय जाहीर केल्यानंतर आता तो फिरवणे त्यांना कमीपणाचे वाटले. जिद्दीने त्यांनी कॉमर्सला प्रवेश घेतला. तोही पुन्हा सिडनम कॉलेजात.
 त्याकाळी महाराष्ट्रात अगदी थोडी वाणिज्य महाविद्यालये होती. मुंबईत बोरीबंदरचे सिडनम व माटुंग्याचे पोद्दार होते. बहुतेक मराठी विद्यार्थी पोदार कॉलेजात जात. तिथले एकूण वातावरणही मध्यमवर्गीय होते. ह्याउलट सिडनममध्ये उच्चभ्रू विद्यार्थ्यांचा भरणा होता. पारशी, गुजराती, मारवाडी मुले तिथे बहुसंख्य होती. साहजिकच जोशी पोद्दारमध्ये अधिक सहजगत्या सामावून जाऊ शकले असते. घरापासून ते तुलनेने जवळही होते. मोठे बंधू बाळासाहेबही पोद्दारलगतच असलेल्या रुइयामध्ये सायन्सला होते. पण का कोण जाणे, नेहमी इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करायचे, त्यांना अवघड वाटणारी वाटच आपण स्वीकारायची असा जणू त्यांनी निश्चयच केला होता!

 १९१३ साली स्थापन झालेले सिडनम हे केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात, किंबहुना परदेशातही नामांकित होते. आशिया खंडातील हे सर्वांत पहिले वाणिज्य महाविद्यालय. त्यावर्षी, म्हणजे १९५१ साली, महाविद्यालयाच्या वार्षिकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर (व नंतरचे केंद्रीय अर्थमंत्री) चिंतामणराव ऊर्फ सी. डी. देशमुख आले होते. आपल्या भाषणात ते म्हणाले होते, “देशात जमा होणाऱ्या एकूण आयकरापैकी २५% आयकर हा सिडनममधील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जमा होतो." आपण ज्या कॉलेजात प्रवेश घेतला आहे, ते किती प्रतिष्ठित आहे ह्याची त्या क्षणी जोशींना कल्पना आली. अनेक बड्या उद्योगपतींची मुले इथेच शिकायला येत. कांतीकुमार पोद्दार तर जोशींच्या वर्गातच होते. बिर्ला उद्योग चे कुमारमंगलम बिर्ला, एच.डी.एफ.सी.चे दीपक पारेख, लंडनमधील ऐतिहासिक इस्ट इंडिया कंपनी ज्यांनी मध्यंतरी विकत घेतली ते संजीव मेहता वगैरे उद्योगक्षेत्रातील आजची अनेक बडी मंडळी एकेकाळी ह्याच कॉलेजात शिकलेली आहेत. अनेक मुले स्वतःच्या मोटारीतून कॉलेजात येत. पदवीनंतर पुढे काय हा त्यांच्यापुढे प्रश्नच नसायचा. आजवर ज्या मराठमोळ्या वातावरणात जोशी वाढले होते त्यापेक्षा इथले वातावरण अगदी वेगळे होते. इथे मराठी विद्यार्थ्याला 'घाटी' म्हणून हिणवले जाई. कपडे, बोलणे, वागणे ह्या सर्वच बाबतींत मराठी विद्यार्थी मागासलेला दिसायचा. वर्गात मराठी मुले जेमतेम दहाबारा होती. सुरुवातीला हे सगळे जोशींना जडच गेले, पण हळूहळू या अवघडलेपणावर त्यांनी मात केली.
 इथले प्राध्यापक कॉलेजच्या लौकिकाला शोभेल असेच नावाजलेले होते. त्यातील ग. र. ऊर्फ जी. आर. दीक्षित यांच्याशी जोशींचा पुढेही बराच संबंध आला. पण जोशींवर सर्वाधिक प्रभाव पडला तो कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुमंत ऊर्फ एस. के. मुरंजन यांचा. एक नाणेतज्ज्ञ म्हणून ते विख्यात होते. नुकतेच अमेरिकेहून परतले होते. त्यांनी नाणेव्यवस्थेवर दोन उत्तम पुस्तके लिहिली होती व विशेष म्हणजे दोन्ही मराठीत लिहिली होती. ती इंग्रजीत लिहायला हवी होती असे म्हणणाऱ्या टीकाकारांना उद्देशून ते म्हणत, "ज्याला या विषयाचा खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे आणि ह्या विषयावर मला काय म्हणायचे आहे हे जाणून घ्यायचे आहे, त्याला त्यासाठी मराठी शिकायला काय हरकत आहे?" ह्यापूर्वी बरीच वर्षे सुप्रसिद्ध इतिहासकार राजवाडे यांनी असेच फक्त मराठीतच लेखन केले होते व त्याच्या समर्थनार्थ असेच काहीसे उत्तर दिले होते. स्वतः जोशींना पुढे एका-दोघांनी 'मराठीत लिहिण्याऐवजी तुम्ही इंग्रजीत लिहा, म्हणजे सगळीकडे पोचाल' अशी सूचना केली होती, तेव्हा त्यांनीही असेच उत्तर दिले होते.
 प्राचार्यांबद्दल जोशी लिहितात,

बस्स! या एकाच उत्तरावर आम्ही लट्टू होतो. त्या एकाच वाक्याने पदोपदी जाणवणारे, टोचणारे मराठी माणसाचे दैन्य धुतले गेल्यासारखे वाटत होते. मुरंजन यांनी आम्हाला बँकिंगमधले काही शिकवल्याचे मला आठवत नाही. पण त्यांनी कान्टशी ओळख करून दिली. “I think, therefore, I am.' या कान्टच्या उक्तीतील सगळा उल्हास आणि आवेग आम्ही मुरंजनांच्या चेहऱ्यावर अनुभवला.

(अंगारमळा, पृष्ठ ५९)

 गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या एका मुंगीचे महाभारत ह्या आत्मकथनात डॉ. मुरंजन यांचे सुरेख व्यक्तिचित्र रेखाटले आहे. भारताच्या नियोजन मंडळाने नेमलेल्या अर्थशास्त्र्यांच्या सल्लागार मंडळात डॉ. मुरंजन यांचाही समावेश होता. प्राचार्यांनी आपल्याला मदत करण्यासाठी एक रिसर्च ग्रुप स्थापन केला होता व त्यात घेतल्या गेलेल्या दोन विद्यार्थ्यांमधले एक जोशी होते. १९५५-५६ सालात 'बेरोजगारांचा अंदाज' (एस्टिमेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट) ह्या विषयाच्या नियोजन मंडळासाठी केलेल्या अभ्यासासाठी जोशींनी बरेच संख्याशास्त्रीय काम केले होते व त्याचे प्राचार्यांनी कौतुक केले होते.
 सुप्रसिद्ध कवी व कादंबरीकार पु. शि. रेगे त्यांना वाहतुकीचे अर्थशास्त्र शिकवायचे. मुंबईतील साहित्यिक वर्तुळात त्यावेळी रेगे यांना मानाचे स्थान होते. पण तरीही साहित्याची खूप आवड असलेल्या जोशींनी त्यांच्याविषयी काही लिहिलेले नाही. मराठी साहित्यापासून जोशी त्यावेळी बरेच दूर गेले होते, असा याचा अर्थ लावायचा का? रेगे यांचा जोशींनी निदान नामोल्लेखतरी केला आहे, पण गंगाधर गाडगीळ ह्यांच्या बाबतीत तसा नामोल्लेखही झालेला नाही. गाडगीळ त्यांना अर्थशास्त्र शिकवत असत. ते मराठी नवकथेचे प्रवर्तक म्हणून त्यावेळी ऐन भरात होते. विशेष म्हणजे पुढे जोशी यांच्याचप्रमाणे गाडगीळांनीही मुक्त अर्थव्यवस्थेचा जोरदार पुरस्कार केला होता; त्यांच्यात तो समान असा एक वैचारिक दुवाही होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे असूनही जोशींच्या लेखनात गाडगीळांचा उल्लेख कुठेच आढळत नाही. किंबहना पुढे एकदा मी त्यांच्यापाशी गाडगीळांबद्दल विचारणा केली असताना त्यांची एकही आठवण जोशी सांगू शकले नाहीत. खरेतर नंतरच्या आयुष्यात एक-दोनदा हे दोघे एकाच व्यासपीठावर वक्ते म्हणून हजरही होते, पण त्यातलेही काही जोशींना त्यावेळीतरी आठवत नव्हते.

 इथल्या विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व जोशींपेक्षा कसे वेगळे होते त्याची ही एक झलक. केंद्रीय अर्थमंत्री टी. टी. कृष्णम्माचारी यांच्यावर आयुर्विमा महामंडळाचे पैसे एका भ्रष्ट उद्योगात गंतवून स्वतः कमिशन मिळवल्याचा एक गंभीर आरोप त्यावेळी केला गेला होता व त्याची चर्चा एकदा कॉलेजात सुरू होती. त्यावेळी जोशी म्हणाले, "सुदैवाने आपली न्याययंत्रणातरी अजून प्रामाणिक राहिली आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शासन होऊ शकतं." त्यावर एक उद्योगपतिपुत्र फटकन म्हणाला, “घाटी लोकांची भाषा सोडून दे! कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने फिरवायचा असेल, तर कोणाला काय काय पुरवावं लागतं ते मला विचार!" आणि हे बोलताना त्याने असे काही डोळे मिचकावले, की हा करावा लागणारा पुरवठा वस्तूंचा नाही हे उघड व्हावे!
 गर्भश्रीमंत विद्यार्थ्यांप्रमाणे इथे काही अतिशय बुद्धिमान विद्यार्थीदेखील होते. त्यांतील एक म्हणजे जगदीश भगवती. भगवती जोशींच्या एक वर्ष पुढे होते. दोघेही संस्कृतप्रेमी व योगायोगाने दोघेही अभ्यंकरांचे विद्यार्थी. तिथेच त्यांचा प्रथम परिचय झाला होता. अर्थात दोघांमधले साम्य बहुधा इथेच संपत होते. भगवतींचे वडील सुप्रीम कोर्टात एक नामांकित वकील होते. रोज सकाळी चिरंजीवांना कॉलेजात सोडायला एक मोटार येई व संध्याकाळी दुसऱ्या एका मोटारीतून ते घरी परतत. सगळा वेळ कॉलेज आणि ग्रंथालय ह्यातच घालवत. सगळीकडे त्यांचा दबदबा असे. एसएससीला ते संपूर्ण बोर्डात काही लाख विद्यार्थ्यांमध्ये पहिले आले होते. भगवती नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स करायला गेले. तिथले शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत गेले. आज ते अर्थशास्त्रासाठी जगप्रसिद्ध अशा कोलंबिया विद्यापीठात शिकवतात. बहुतेक सर्व बड्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे व भारत सरकारनेही २००० साली पद्मविभूषण हा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला आहे. आज ना उद्या त्यांना नोबेल पुरस्कारही मिळेल असे म्हटले जाते. त्यांचे एक बंधू प्रफुल्लचंद्र ऊर्फ पी. एन. भगवती हेही वडलांप्रमाणेच नामांकित वकील होते व पुढे भारताचे सरन्यायाधीशही बनले. जनहितयाचिका (Public Interest Litigation) हा प्रकार सुरू करण्याचे श्रेय त्यांचेच. त्यांनाही पद्मविभूषण मिळाले आहे. दोन भावांनी पद्मविभूषण मिळवायचे हे बहुधा एकमेव उदाहरण असावे. जगदीश भगवती हा त्या काळात जोशी यांचा आदर्श होता.
 रोज सकाळी शक्य तितक्या लवकर अंधेरीतील आपल्या घरून जोशी निघत व आगगाडीने मरीन लाइन्सला येत. तिथून पुढे चालत बोरीबंदरला कॉलेजात. एकदा कॉलेजात आले की दिवसभर तिथेच. आधी लेक्चर्स आणि ती संपल्यावर मग ग्रंथालय, सगळा अभ्यास, सगळे वाचन तिथेच. घरी रात्री उशिरा, फक्त झोपायला. नाशिकला असताना त्यांना क्रिकेट खेळायची गोडी लागली होती; पण इथे क्रिकेट अगदी पूर्ण बंद. इतर मित्र असेही त्यांना इथे फारसे नव्हते; त्यावेळी तरी ते बऱ्यापैकी एकांतप्रिय होते. इतर मुलांप्रमाणे त्यांच्याकडे चित्रपट बघायला, हॉटेलात उडवायला पैसेही नसत. घरून जो काही चार-पाच रुपये पॉकेटमनी मिळायचा तो आठवड्याहून जास्त टिकायचा नाही. त्यामुळे सगळा वेळ फक्त अभ्यास एक अभ्यास. त्यांची पहिली चार वर्षे, म्हणजे १९५५ साली ते बी.कॉम. होईपर्यंत, सिडनम कॉलेज बोरीबंदरला व्हीटी स्टेशनसमोर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या आवारातच होते, पण त्यानंतर ते स्वतःच्या आधुनिक इमारतीत, चर्चगेट स्टेशनलगतच्या बी रोडवर गेले. ह्या इमारतीतील सर्वच सोयी अधिक प्रशस्त होत्या. विशेषतः ग्रंथालय, अर्थशास्त्राशी संबंधित जगातील बहुतेक सारी महत्त्वाची पुस्तके कॉलेजच्या ग्रंथालयात होती, जगभरची आर्थिक नियतकालिकेदेखील येत. जमेल तेवढे सगळे जोशी बारकाईने वाचून काढत, टिपणे काढत.

 १९५४मध्ये दि न्यूयॉर्क हेरल्ड ट्रिब्युन या जगप्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका देशव्यापी निबंधस्पर्धेत जोशींनी भाग घेतला होता. मुंबई विद्यापीठाकडे आलेल्या सर्व निबंधांत तो सर्वोत्कृष्ट ठरल्याने पुढे तो दिल्लीला शिक्षण मंत्रालयाकडे पाठवला गेला. कारण हेच मंत्रालय स्पर्धेचे व्यवस्थापन करत होते. ही स्पर्धा खूप प्रतिष्ठेची होती व विजेत्याला त्याकाळी अप्रूप असलेल्या अमेरिकेलाही पाठवले जाणार होते. देशभरातील वेगवेगळ्या विद्यापीठांकडून सादर केल्या गेलेल्या निबंधांची छाननी झाल्यावर जोशींचा अंतिम फेरीत समावेश केला गेला. त्यासाठी द्यायच्या एका चाचणीसाठी व प्रत्यक्ष मुलाखतीसाठी त्यांना दिल्लीला यायचे आमंत्रण दिले गेले. जायचे-यायचे इंटर क्लासचे भाडेही मिळणार होते. येताना अमेरिकेला जाण्यासाठी त्याकाळी आवश्यक असलेले वैद्यकीयदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्रही घेऊन यावे असे आमंत्रणपत्रात लिहिले होते. देशभरातील अगदी मूठभर विद्यार्थ्यांनाच ही संधी मिळाली होती. जोशींना खूप आनंद झाला, कारण ह्या निबंधासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. सगळी पूर्वतयारी करून ते उत्साहाने दिल्लीला गेले त्या काळी दिल्लीही खूप दूरची समजली जाई व दिल्लीला जाणारे घरातले ते पहिलेच होते. सगळ्यांनी कौतुकाने त्यांना निरोप दिला. पण दुर्दैवाने तेथील चाचणीत व मुलाखतीत त्यांची पुरेशी छाप पडली नाही. दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजातील एका विद्यार्थ्याची अंतिम फेरीत निवड झाली. जोशी अगदी निराश झाले. आपल्या हातातोंडाशी आलेला यशाचा घास शेवटच्या क्षणी गेला असे त्यांना वाटले; शिवाय, घरच्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही याचा अपमानही वाटलाच.
 पुढे १९५६ मध्ये मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एका महत्त्वाच्या शोधनिबंधस्पर्धेत त्यांनी भाग घेतला. त्यासाठी कसून मेहनत केली व एक बराच मोठा शोधनिबंध लिहिला. शीर्षक होते, River Valley Projects and their Role in the Agricultural Development of India (नदी खोरे प्रकल्प आणि भारतीय शेतीच्या विकासातील त्यांचे योगदान). त्याला मात्र यश मिळाले. होमजी कुरसेटजी डॅडी यांच्या नावे असलेला प्रथम पुरस्कार मिळाला. ह्या पुरस्काराची रक्कम ३०० रुपये होती; त्या काळाच्या मानाने बरीच जास्त. जोशींना खूप आनंद झाला. निबंधलेखनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या खोरे प्रकल्पांचा देशातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती आर्थिक लाभ झाला याचा त्यांनी संख्याशास्त्रीय अभ्यास केला. या अभ्यासात खडकवासला वॉटर अँड पॉवर रीसर्च सेंटरचे अच्युतराव आपटे, त्यावेळी पुण्यात असलेले सुपरिटेंडिंग इंजिनिअर एन. एस. जोशी आणि साखरवाडीत इस्टेट मॅनेजर असलेले त्यांच्या मोठ्या बहिणीचे सासरे श्रीधर गोपाळ देशपांडे यांची खूप मदत झाली होती. मोठी धरणे उभारताना धरणक्षेत्रातील पावसाचे जास्तीत जास्त प्रमाण नियोजनासाठी पकडले जाते, दरवर्षी तसा पाऊस पडेल व धरण पूर्ण भरेल असे गृहीत धरून प्रस्तावित बागायती क्षेत्राचे अतिशयोक्त आकडे कागदोपत्री दाखवले जातात; प्रत्यक्षात मात्र ते चुकीचेच ठरतात; ह्या मोठ्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचा फारसा आर्थिक लाभ झालेला नाही; उलट जे शेतकरी त्या पाण्यावर शेती करत राहिले त्यांच्यापेक्षा जे विस्थापित होऊन मुंबईसारख्या मोठ्या शहरात येऊन स्थायिक झाले व अन्य काही व्यवसाय करू लागले त्यांची आर्थिक स्थिती अधिक सुधारली असा त्यांचा निष्कर्ष होता.
 पुढे ज्या शेतीक्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले त्या क्षेत्रातील त्यांचे हे पहिले वैचारिक पदार्पण होते. इतर कुठल्याही शेतीविषयक सुधारणेपेक्षा, शेतीमालाला चांगला भाव मिळणे हे शेतकऱ्यांसाठी अधिक गरजेचे आहे, ह्या त्यांनी भविष्यात केलेल्या मांडणीची सुरुवातही कुठेतरी ह्या अभ्यासात होती असेही म्हणता येईल. व्यक्तिशः जोशींना हा अभ्यास महत्त्वाचा वाटला होता. १ मार्च १९७६ रोजी स्वित्झर्लंडला असताना जोशींनी आपला एक बायोडेटा तयार केला होता व त्यात ह्या निबंधाचा त्यांनी उल्लेख केला आहे.
 या निबंधस्पर्धेतील जोशींच्या यशालाही एक गालबोट लागले होते. विद्यापीठाचे कामकाज कसे चालायचे ह्याचे निदर्शक अशी ह्या स्पर्धेबाबत घडलेली ती घटना इथे नमूद करायला हरकत नाही. पूर्वी जाहीर झालेले पारितोषिकाचे तीनशे रुपये प्रत्यक्षात जोशींच्या हाती पडले नव्हते. नेमकी काय अडचण होती ते कळायला आज काही मार्ग नाही, पण जोशींच्या कागदपत्रांत मुंबई विद्यापीठाच्या रजिस्ट्रारच्या सहीचे एक पत्र म्हात्रे यांना सापडले. त्या पत्रात 'जोशी यांनी पुरस्काराच्या रकमेएवढी, म्हणजे तीनशे रुपयांची, पुस्तके खरेदी करावीत' असे लिहिले आहे. त्यातही तीन अटी आहेत! एक म्हणजे, ही पुस्तके एकाच दुकानातून व एकाच वेळी खरेदी केलेली असावीत; दोन, त्यांच्यावर विद्यापीठाचे नामांकन करण्यासाठी (for stamping the University Coat of Arms in gold') ती सर्व पुस्तके पुस्तकविक्रेत्याने आपल्या बिलासकट विद्यापीठाकडे पाठवावीत; आणि तीन, त्या नामांकनाचा खर्च म्हणून प्रत्येक पुस्तकामागे सहा आणे विद्यापीठ कापेल व तीनशे रुपयांतून ती रक्कम वजा करून उर्वरित रकमेच्या बिलाचे पैसे विद्यापीठाकडून दिले जातील! हा निबंध प्रकाशित करण्यासाठी विद्यापीठाने अनुमती द्यावी अशी विनंती जोशींनी तीन वर्षांपूर्वी विद्यापीठाकडे केली होती. उपरोक्त पत्रातच त्या अर्जाला उद्देशून रजिस्ट्रारसाहेबांनी कळवले आहे की, "तुमची विनंती विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर विचारार्थ ठेवली जाईल व त्यांचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल."
 हे पत्र जोशींना मिळाले तेव्हा ते पोस्टखात्यात नोकरीलाही लागले होते व बडोदा येथे कार्यरत होते! प्रत्यक्षात त्या रकमेची पुस्तके जोशींनी घेतली का, त्यांचे अपेक्षित तेवढे पैसे मिळाले का याची कुठेच नोंद नाही. दुर्दैवाने आज त्या निबंधाचीही प्रत उपलब्ध नाही. सर्वांत आश्चर्यजनक भाग म्हणजे या पत्रावरची तारीख आहे, २३ जानेवारी, १९५९. म्हणजेच निबंधस्पर्धेचा निकाल लागला त्याला तब्बल तीन वर्षे उलटून गेल्यानंतरची! या अविश्वसनीय विलंबाचे कारण काय असू शकेल? नोकरशाहीतील दिरंगाई की आणखी काही?

 जोशींच्या कॉलेजजीवनातील एका वेधक प्रसंगाची माहिती जी. आर. दीक्षित या त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना १९ जानेवारी २००२ रोजी लिहिलेल्या एका पत्रात वाचायला मिळाली. प्रा. दीक्षित पुढे स्टेट बँकेत खूप वरच्या पदावर गेले व बँकिंग क्षेत्रातले मोठे तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले. हे सहा पानी स्वहस्ते लिहिलेले पत्र अतिशय वाचनीय असून जोशींचे कागदपत्र चाळताना ते मिळाले. त्यात प्रा. दीक्षित लिहितात,

सिडनम कॉलेजच्या दिवसांत तुमचं माझं जे काही बोलणं होत असे, त्याचे तुकडे तुकडे मला अजून आठवतात. त्याच्या गोड आठवणी मनात रेंगाळतात. अशीच एक आठवण. तुम्ही आणि मी चायनीज कॉन्स्युलेटमध्ये हो चि मिन्हला भेटायला गेलो होतो त्याची. मुंबईतल्या काही तरुण प्राध्यापकांना भेटायची इच्छा हो चि

मिन्हने प्रदर्शित केली होती. आम्हा सगळ्यांना बोलावणं केलेलं होतं पण प्रा. रणदिवे, प्रा. गाडगीळ वगैरे कोणी आले नाहीत. त्यांना असा सल्ला दिला गेला होता की 'तुम्ही जर हो चि मिन्हला भेटलात, तर सरकारदप्तरी त्याची नोंद होईल व मग तुम्हाला अमेरिका किंवा इंग्लंडला जायची स्कॉलरशिप मिळणं अडचणीचं होईल.' मला अमेरिका किंवा इंग्लंड या देशांच्या वारीचं इतकं कौतुक नव्हतं. मी मनाशी म्हटलं, की हो चि मिन्हसारखा जगविख्यात माणूस आपल्याला भेटू इच्छितो आहे, तेव्हा ही संघी काही आपण सोडायची नाही. त्याची ती मूर्ती व राहणी पाहून मला खूपच बरं वाटलं. बोटीवरच्या वेटरचा ड्रेसच त्याने घातला होता व बोलताना तो म्हणाला, की अशा कपड्यांचाही फक्त एकच जोड त्याच्याकडे आहे. तो असंही म्हणाला, 'आमचा देश गरीब आहे. त्यामुळे आमच्या हातात राजसत्ता जरी असली, तरी आम्ही गरिबीतच राहिलं पाहिजे. तसं राहिलो, तरच आम्ही त्यांच्यातले आहोत असं लोकांना वाटेल.' Acceptance through identification' या मूलतत्त्वाचाच त्याने पुनरुच्चार केला होता. त्यानी गांधी व औरंगझेब यांच्या साधेपणे राहण्याची वाखाणणी केली. उठता उठता तो म्हणाला, माझ्या आयुष्याची सुरुवात मी बोटीवरचा वेटर म्हणून केली व नंतर बरीच वर्षे मी तीच नोकरी केली. त्यामुळे माझी राहण्याची पद्धत ठरून गेली आहे. त्यात बदल करावा असं मला कधी वाटलं नाही. पुढच्या आयुष्यात अनेक नामवंत लोकांना मी भेटलो; पण हो चि मिन्हची ही आठवण माझ्या मनात चिरंतन राहिलेली आहे.

 व्हिएतनामच्या या क्रांतिकारक भाग्यविधात्याला भेटणे, विशेषतः त्या काळात, हा नक्कीच एक रोमांचकारक अनुभव असला पाहिजे. जोशींच्या लेखनात किंवा बोलण्यात या भेटीचा कुठेच कसा उल्लेख झाला नाही, याचे काहीसे नवल वाटते.
 हो चि मिन्ह यांचे बलाढ्य अमेरिकेविरुद्ध जिद्दीने उभे ठाकलेले एक कडवे साम्यवादी म्हणून दीक्षित यांना खूप कौतुक वाटले होते, पण वैचारिक पातळीवर दीक्षित कायमच खुल्या अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. याच पत्रात त्यांनी विद्यार्थिदशेत असतानापासूनच जोशींवर अ ॅडम स्मिथ वगैरे अभिजात (क्लासिकल) अर्थशास्त्र्यांचा प्रभाव कसा होता व तेव्हापासूनच जोशीही मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक कसे होते याचाही कौतुकाने उल्लेख केला आहे. जगदीश भगवती व अशोक देसाई यांच्यासारख्या मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक राहिलेल्या त्यांच्या काही इतर विद्यार्थ्यांचाही ते उल्लेख करतात. हा सगळा १९५२ ते १९५८ हा कालखंड आहे; जेव्हा उदारीकरण वगैरे शब्दही भारतात फारसे वापरात नव्हते व सोव्हिएतप्रणीत समाजवादी विचारांचा पगडा सर्वव्यापी होता. पण नवल म्हणजे त्या विद्यार्थिदशेपासूनच जोशी यांच्यावर खुल्या (लिबरल) विचारसरणीचा प्रभाव होता. त्या पत्रात दीक्षित लिहितात,
 "आज जेव्हा मी माझे बहुसंख्य विद्यार्थी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन व ग्लोबलायझेशनचा पुरस्कार करताना बघतो, तेव्हा मी जे काही त्या काळात आग्रहाने शिकवलं, त्याचं फळ मिळाल्याचं समाधान मला मिळतं.
 "जास्त काय लिहू? पुन्हा काही लिहायची वेळ येणार नाही. आता माझे डोळे पैलतीरी लागले आहेत. वैतरणा नदीत घोट्याइतक्या पाण्यात उभा आहे, नदी केव्हा पार होते आहे याची मला उत्कंठा लागलेली आहे, घाई लागली आहे."
 असा या आठ-पानी हस्तलिखित पत्राचा शेवट आहे. दीक्षित यांचे हे जणू अखेरचे पत्र असावे असे वाटते व म्हणूनच त्याचे मोल अधिक वाटते.

 १९५२-५३ या वर्षात जोशी कॉलेजातल्या मराठी वाङ्मय मंडळाचे सदस्य होते; १९५३-५४ या वर्षात विकास या कॉलेजात निघणाऱ्या भित्तिपत्रकाचे संपादक होते. १९५४-५५ सालात कॉलेजातील जनरल बँकिंग असोसिएशनचे ते सरचिटणीस होते. मात्र त्या सहा वर्षांत कॉलेजबाहेरच्या जीवनात त्यांनी काय काय केले, कुठल्या उपक्रमांत भाग घेतला, कुठले सिनेमे बघितले, कुठले छंद जोपासले, कोणाशी त्यांची मैत्री झाली वगैरेबद्दलच्या काही आठवणी उपलब्ध नाहीत. ना त्यांनी स्वतः त्याबद्दल काही लिहिले आहे. ना संभाषणात कधी त्यांनी त्याचा उल्लेख केला. अपवाद म्हणजे आपल्या कॉलेजात एकदा त्यांनी दुर्गाबाई भागवत यांना कसे आमंत्रित केले होते याविषयी त्यांनी लिहिले आहे. दुर्गाबाईंविषयी ते बरेच ऐकून होते. फोर्टमधील प्रसिद्ध एशियाटिक लायब्ररीत कधी जाणे झाले तर तिथे आपल्या व्यासंगात कायम गढलेल्या दुर्गाबाई दिसत; पण त्यांच्या समाधीचा भंग करून त्यांच्याशी काही बोलायचा जोशींना धीर होत नसे. एकदा मात्र त्यांनी दुर्गाबाईंना आपल्या कॉलेजात व्याख्यानासाठी बोलावले होते. मध्यप्रदेशच्या एका जिल्ह्यातील आदिवासींचे जीवन, इतिहास, संस्कृती, राहणीमान यांविषयी त्या बोलल्या. बहुसंख्य विद्यार्थ्यांना आदिवासी जीवनाचा काहीच परिचय नव्हता व दुर्गाबाईंच्या भाषणाने एक नवेच जग त्यांना दिसले. सारे सभागृह भारावून गेले होते.
 बऱ्याच वर्षांनी आणीबाणीविरुद्ध ज्या धाडसाने दुर्गाबाईंनी आवाज उठवला त्याचे जोशींनी कौतुक केले होते. पण त्यांना त्याहूनही अधिक कौतुक होते ते आणीबाणीच्या काळात मिळालेल्या तेजोवलयाचा आणि लोकप्रियतेचा हव्यास दुर्गाबाईंनी जराही ठेवला नाही; निवडणुका संपताच त्या साऱ्यातुन निःसंगपणे मोकळ्या झाल्या, आपल्या व्यासंगाच्या विषयाकडे वळल्या आणि अगदी आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यातच रमल्या; या गोष्टीचे.
 मे १९५५ मध्ये जोशी बीकॉम झाले. १००० पैकी ५२८ गुण मिळवून; म्हणजे द्वितीय वर्गात. कॉमर्समधील गुणांची टक्केवारी त्याकाळी कमीच असे. पुढील दोन वर्षे त्यांना विद्यापीठातर्फे दिली जाणारी महिना रुपये तीसची मेरिट स्कॉलरशिप मिळाली. अॅडव्हॉन्स्ड बँकिंग या विषयात कॉलेजात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला सी. ई. रँडल (Randle) सुवर्णपदक कॉलेजतर्फे दिले जाई. त्यावर्षी ते जोशींना मिळाले.
 त्या सुवर्णपदकाचीही एक गंमत आहे. हे सुवर्णपदक मिळाल्याचे कळवणाऱ्या प्राचार्यांच्या २८ नोव्हेंबर १९५५च्या इंग्रजी पत्रातले शेवटचे वाक्य आहे, “सोन्याचा भाव अतिशय वाढलेला असल्याने ह्या पदकाच्या मूल्याइतकी रक्कम जोशी यांना रोख दिली जाईल." त्याप्रमाणे त्यांना सुवर्णपदकाऐवजी रुपये १०५ रोख दिले गेले!
 १९५७ साली जोशी एमकॉम झाले. पुन्हा द्वितीय वर्गात; ८०० पैकी ४१३ गुण मिळवून. इंटरनॅशनल बँकिंग व स्टॅटिस्टिक्स हे विषय घेऊन. सहा वर्षांपूर्वी अनपेक्षितरीत्या सुरू केलेली व त्यावेळी खूप अवघड वाटलेली कॉमर्स कॉलेजची यात्रा सुफळ संपूर्ण झाली.

 जडणघडणीच्या ह्या कालखंडाकडे आज मागे वळून बघताना जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वातील दोन वैशिष्ट्ये त्या काळातही प्रकर्षाने जाणवतात.
 एक म्हणजे त्यांची प्रखर बुद्धिनिष्ठा - प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीच्या निकषावर पडताळून पाहायची आणि पटली तरच स्वीकारायची वृत्ती. दुसऱ्याने सांगितले म्हणून त्यांनी ऐकले, मानले असे सहसा कधी होत नसे.
 ते बारा-तेरा वर्षांचे असतानाचा एक प्रसंग. बसल्याबसल्या त्यांच्या मनात एक विचार आला. 'आपण किती नशीबवान आहोत! भारतासारख्या श्रेष्ठ देशात जन्मलो, त्यात पुन्हा शिवरायांच्या आणि ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात जन्मलो, त्यातही सर्वश्रेष्ठ अशा हिंदू धर्मात आणि त्याहून विशेष म्हणजे ब्राह्मण कुलात जन्मलो! जन्मतःच ह्या साऱ्या दुर्लभ गोष्टी आपल्याला लाभल्या; किती आपण भाग्यवान!'
 पण मग लगेच त्यांनी त्या विचाराचे स्वतःच्याच मनाशी विश्लेषण करायला सुरुवात केली. अनेक प्रश्न मग त्यांच्या मनात निर्माण झाले. 'भारत देश सर्वश्रेष्ठ कसा? जगातील अत्यंत गरीब, दुष्काळाने गांजलेल्या देशांत भारत मोडतो. मग असे राष्ट्र सर्वश्रेष्ठ कसे असेल? महाराष्ट्रात शिवराय आणि ज्ञानेश्वर जन्मले, पण इतर प्रांतांतही अशी नररत्ने जन्मलीच आहेत व त्या-त्या प्रदेशातील लोकांना त्यांच्या-त्यांच्या प्रदेशात जन्मलेल्या नररत्नांचा अभिमान असतोच. आपणही त्या प्रदेशात जन्मलो असतो तर आपल्यालाही त्यांच्याविषयी तेवढाच अभिमान वाटला असता. हिंदू धर्मातही सर्वश्रेष्ठ असे काय आहे? जगात जास्तीत जास्त उपासक असलेले धर्म बुद्ध आणि ख्रिस्त यांचे आहेत. इस्लामही अनेक देशांत पसरला आहे. मग एकाच भूखंडात मर्यादित असलेल्या या हिंदू धर्माला सर्वोत्तम म्हणणे म्हणजे खोट्या अभिमानाचे लक्षण नाही का? आणि ब्राह्मण श्रेष्ठ मानणे तर किती मुर्खपणाचे! ब्राह्मणांत काय सगळे महापुरुषच जन्मले? अपकृत्य करणारे कुणी झालेच नाहीत? आणि इतर जातींत जन्मूनही अलौकिक कृत्ये करणारेही अनेक असतातच!'
 या कठोर उलटतपासणीने ते अगदी हादरून गेले. जन्माच्या अपघाताने मिळालेल्या गोष्टींचा वृथा अभिमान बाळगण्याची आपल्यात प्रवृत्ती आहे आणि ती मोडून काढली पाहिजे, याची त्यांना मोठ्या प्रकर्षाने जाणीव झाली. त्या दिवसापासून त्यांनी एक निश्चय केला. जन्माच्या अपघाताने आपल्याला जे जे मिळाले असेल, ते अती कनिष्ठ आहे, असे समजून विचाराची सुरुवात करायची आणि जेथे सज्जड पुरावा मिळेल, तेथेच आणि त्या पुराव्याने सिद्ध होईल तेवढेच, जन्मसिद्ध गोष्टींचे बरेपण मान्य करायचे. अशी शिस्त त्यांनी आयुष्यभरासाठी बाणवून घेतली.
 रूढ अर्थाने त्यांचे परीक्षेतील गुणांच्या स्वरूपात प्रकट झालेले यश फारसे नेत्रदीपक नसेल; पण त्या चाकोरीच्या पलीकडे जाऊन विचार करताना त्यांची प्रखर बुद्धिमत्ता आणि बुद्धिप्रामाण्य सतत जाणवते. स्वतःच्या वागण्याचे, स्वतःच्या स्वभावाचे ते पुनःपुन्हा विश्लेषण करताना आढळतात. जे ऐकले किंवा बघितले तेही सारे त्यांनी जसेच्या तसे कधीच स्वीकारले नाही, तर प्रत्येक गोष्टीचा स्वतः विचार करून त्यातून काय बोध घ्यायचा तो ते घेत गेले.
 तीव्र आत्मभान हा जोशी ह्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बालपणापासून ठळकपणे जाणवणारा दुसरा विशेष म्हणता येईल. तसे हे आत्मभान किंवा स्वत्वाची जाणीव प्रत्येकातच असते, पण जोशींमधे त्याची तीव्रता खूप अधिक असल्याचे जाणवते.
 ह्या तीव्र आत्मभानाचे अनेक तरल पदर ह्या कालखंडात आढळतात. इतरांच्या तुलनेतले आपले वेगळेपण (exclusivity) अधोरेखित करण्याची प्रवृत्ती किंवा मानसिक गरज, महत्त्वाकांक्षा, मनस्वीपणा, मानीपणा, अहंकार, आत्मविश्वास, आत्मकेंद्रितता, हेकटपणा, आत्मभानाला धक्का पोहोचल्यास उफाळून येणारी असुरक्षिततेची भावना इत्यादी – पण मूलतः हे त्या आत्मभानाचे विविध आविष्कार असावेत.
 पूर्वी लिहिल्याप्रमाणे काही शारीरिक कमतरतांमुळे न्यूनगंड निर्माण होऊ न देता त्यांच्यावर मात करायची जिद्दही ह्या आत्मभानातूनच आली असावी. शिकवणीला असलेला विरोधही तसाच.
 विलेपार्ल्याला शिकत असताना मोठ्या भावाशी, म्हणजे बाळशी, धाकट्या शरदचे एकदा कशावरून तरी जोरदार भांडण झाले. त्यावेळी माईंना मधे पडावे लागले. चूक शरदची आहे असे बहुधा त्यांना वाटले. शब्दाने शब्द वाढत गेला. रागाच्या भरात त्या शरदला खूप रागावल्या, थोडे मारलेही. आपण काहीच चूक केलेली नाही असे शरदचे म्हणणे; ते काही त्याने शेवटपर्यंत सोडले नाही. तरीही आई आपल्यालाच ओरडली व आपल्याला तिने मारलेही, यात आपला मोठा अपमान झाला असे वाटून शरद रागाने घरातून निघून गेला. कुठे जायचे काहीच नक्की नव्हते. खिशात फारसे पैसे नाहीत, वय अवघे १३-१४. रात्र झाली तरी तो घरी परतला नाही, तशी घरची सगळी मंडळी प्रचंड काळजीत पडली. त्याचे जोशी याच आडनावाचे एक मावसभाऊ पोलीस इन्स्पेक्टर होते, त्यांची यात खूप मदत झाली. त्यांच्याच संपर्कातल्या कोणीतरी तब्बल दहा दिवसांनी शरदला इगतपुरीला बघितले व मग तिथे जाऊन वडलांनी त्याला ताब्यात घेतले. पायीच चालत चालत, इकडे तिकडे भ्रमंती करत तो इतक्या लांबवर पोचला होता.
 त्यांच्या मोठ्या भगिनी सिंधूताई जोशींनी एके ठिकाणी लिहिले आहे, "तो प्रसंग आठवला,को हृदयात अजून कालवाकालव होते." हाही एक जोशीच्या आत्मभानाचा किवा मनस्वीपणाचा नमुना.
 या आत्मभानाचाच एक आविष्कार म्हणजे आपले वेगळेपण अधोरेखित करत राहणे. उपरोक्त लेखातच सिंधूताई लिहितात,

शरदचे एक वैशिष्ट्य असे, की इतरांपेक्षा आपले काही वेगळे असावे असे त्याला वाटते. नमाताई व मी गाणे शिकू लागलो व बाळ तबला शिकू लागला. शरदनेही काही शिकावे अशी आईची इच्छा होती. आईला पेटी वाजवता येई. शरदचा आवाज गोड. म्हणून आईने एकदा पेटी वाजवून 'शुभं करोति' म्हणायचे म्हटले, तर शरदने नकार दिला. तेच शिक्षणाचे. 'सर्वांनी काय सायन्स आणि आर्ट्स करायचे, मी कॉमर्स घेणार' असे म्हणून त्याने एमकॉम केले.
(चतुरंग, दैनंदिनी २०१२, पृष्ठ ७५)

 इतरांना खूप अवघड व भावी करिअरच्या दृष्टीने अनपयुक्त वाटणारा संस्कृत विषय त्यांनी घेतला, ज्यांचा अर्थही सगळ्यांना नीट समजत नाही अशा संस्कृत साहित्यात त्यांनी रस घेतला, या साऱ्या संस्कृतप्रेमामागेही निखळ आवडीपेक्षा इतरांपासून काहीतरी हटके, काहीतरी वेगळे करायची इच्छा असावी. "ती एक धुंदीच होती, मस्ती होती. इतरांना ज्या क्षेत्रात रस नाही, त्या क्षेत्रात आपण आकंठ आनंदात बुडून जात आहोत याचा अहंकारही मोठा असावा, असे त्यांनीही स्वतःच्या संस्कृतप्रेमाच्या संदर्भात लिहिले आहे.
 "तू काय, संस्कृतचा प्राध्यापक बनणार," असे एका जवळच्या मित्राने सुचवल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया खूप तीव्र होती. ते लिहितात,

मी? विश्वाच्या निर्मितीतील एक प्रमुख प्रमेय असलेले माझे आयुष्य आणि हा कसेबसे ५४ टक्के मार्क मिळालेला मित्र मला माझी वाट सांगतो आहे? शब्दाशब्दाने वाद वाढला... मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचा निश्चय जाहीर केला. केला म्हणजे केला. 'शेंडी तुटो वा पारंबी तुटो', आता माघार घेणे नाही. तोंडातून निघालेला शब्द मागे घेणे भाग पडून, होणाऱ्या अपमानाने मलिन झालेले जीवन जगण्यात तरी काय अर्थ आहे?

 आपण पुढे काय करणार हे त्या मित्राने गृहीत धरावे याचा त्यांना राग आला होता. पुढे मोठेपणीही आपल्याला गृहीत धरले जाणे (being taken for granted) त्यांना मुळीच आवडत नसे.
 दुसरे विशेष नोंद घेण्याजोगे म्हणजे, आपला निर्णय चुकीचा आहे हे जाणवूनसुद्धा त्यांनी आपल्या निवडीचा पुनर्विचार केला नाही. त्यातही पुन्हा पोद्दार कॉलेजसारखे सर्वसामान्य मराठी मुलाने निवडले असते ते कॉलेज न निवडता, त्यांनी सिडनमसारखे उच्चभ्रू व आपल्या घरापासून दुप्पट अंतरावर असलेले कॉलेज निवडले. ह्या साऱ्यातील हेकटपणा हाही त्या आत्मभानाचा किंवा आत्मविश्वासाचा एक आविष्कार वाटतो.
 पुढे कॉमर्स कॉलेजचे वर्ग सुरू झाले आणि, त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, 'हरियाली' सोडून 'पथरीला' रस्ता स्वीकारणाऱ्याच्या वेदना क्षणाक्षणाला जाणवू लागल्या. पण तरीही ते त्याच वाटेने पुढे जात राहिले. आपण जे करायचे ठरवतो, त्यासाठी वाटेल तेवढे कष्ट उपसायची त्यांची तयारी असायची असेही दिसते. 'की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने' ही सावरकरांची ओळ त्यांची आवडती होती. ही कष्ट सहन करण्याची आत्यंतिक क्षमता हीदेखील त्या तीव्र आत्मभानातून किंवा मनस्वीपणातून येत असावी.
बऱ्याच वर्षांनी ह्या निर्णयाबद्दल जोशींनी लिहिले आहे,

प्राणापेक्षा प्रिय असलेल्या सीतेचाही, राजधर्माचे परिपालन करण्याकरिता, त्याग करायला मी मागेपुढे पाहणार नाही, अशा रामचंद्री अभिनिवेशात मी संस्कृत अभ्यासक्रम न घेण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. वर्षानुवर्षे ज्या आयुष्यक्रमाची तयारी केली, तो क्षणार्धात हेकटपणे लाथाडला. आता पुढे काय? आईवर रागावलेले बाळ हट्ट करून जेवायला नकार देते; त्यामुळे आईचे हृदय पिळवटते आहे, या जाणिवेत त्याला काय आनंद होतो? लव-कुशांनी रामाच्या साऱ्या सैन्याचा पराभव केला, सीतेचे निष्कलंकत्व सिद्ध झाले. तिला कोणी पतिता म्हटले असते, तर लव-कुशांचे पराक्रमसिद्ध धनुष्यबाण आकर्ण ताणून सिद्ध झाले असते. तरीही 'सीतेने पुन्हा एकदा अग्निदिव्य करावे' असा आग्रह धरून रामाने मनातल्या मनात कोणत्या असीम कडूजहर सुखाचा अनुभव घेतला?
(अंगारमळा, पृष्ठ ५१)

 हा परिच्छेद जोशींच्या मनस्वी स्वभावाची व असामान्य भाषाप्रभुत्वाची साक्ष पटवतोच; पण त्यातील अर्थबाहुल्य त्यापलीकडे जाणारे आहे असे जाणवते. 'आईचे हृदय पिळवटते आहे, या जाणीवेत त्याला काय आनंद होतो?' किंवा कोणत्या असीम कडूजहर सुखाचा अनुभव घेतला?' यांसारख्या शब्दरचना काहीशा गूढ वाटतात. 'आपल्या लोकत्तरतेच्या धुंदीत, आपल्या हातानेच आपले आयुष्य कडू करून घेण्यात गोडी मानणारे' हे पृष्ठ २८वर उद्धृत केलेले त्यांचे शब्दही काहीतरी वेगळे सूचित करत आहेत असे जाणवते. पण जोशींनी स्वतः त्याचे नेमके स्पष्टीकरण त्यांच्या लेखनात कुठेच दिलेले नाही.

 प्रखर बुद्धिनिष्ठा आणि तीव्र आत्मभान ही पूर्वायुष्यात जाणवणारी जोशींची दोन व्यक्तिवैशिष्ट्ये व त्यांचे विविधांगी आविष्कार भावी वाटचालीचा मागोवा घेतानाही आपल्याला पुनःपुन्हा जाणवत राहतात.