Jump to content

अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/मातीत पाय रोवताना

विकिस्रोत कडून



मातीत पाय रोवताना


 शरद जोशी स्वित्झर्लंड सोडून सहकुटुंब भारतात परतले १ मे १९७६ रोजी.
 ते आणीबाणीचे दिवस होते. २५ जून १९७५मध्ये पुकारलेल्या आणीबाणीला सुरुवातीला झालेला थोडाफार विरोध थोड्याच दिवसांत मावळला होता. काही लोकशाहीप्रेमी सरकारविरुद्ध लढा देत होते, पण तो बहुतांशी छुप्या स्वरूपातला होता; जाहीररीत्या सरकारविरुद्ध कारवाया अशा होत नव्हत्या. 'गाड्या बघा आता कशा अगदी वेळेवर धावतात!' हे कौतुक सारखे कानावर पडायचे.
 योगायोग म्हणजे त्या दिवशी जोशींनी पुण्याला जाण्यासाठी डेक्कन क्वीन पकडली. तेव्हा ती नेमकी अर्धातास उशिरा सुटली होती! आणीबाणीसमर्थकांचा निदान एक दावा तरी चुकीचा होता ह्याचा त्यांना प्रत्यय आला!
 आपले बहुतेक घरगुती सामान त्यांनी युरोपातून बोटीने मागवले होते व ते येण्यास अजून काही दिवस लागणार होते. कपडे वगैरे आवश्यक तेवढ्या सामानाच्या चार बॅगा घेऊन, पत्नी लीला आणि गौरी व श्रेया ह्या दोन मुली यांच्यासह ते टॅक्सीने विमानतळावरून दादर स्टेशनवर आले होते व तिथेच त्यांनी व्हीटीहन नेहमी संध्याकाळी पाच दहाला निघणारी डेक्कन क्वीन पकडली होती. प्रथम वर्गाची तिकिटे असल्याने गाडीत जागा तर मिळाली, पण पूर्वीप्रमाणे गाडीत कुठेच कोणाच्या गप्पा रंगल्या नव्हत्या. सगळा शुकशुकाट.
 "कधीच लेट न सुटणारी गाडी आज चक्क अर्धा तास लेट सुटली!" शेजारच्या माणसाला ते सहज काहीतरी गप्पा सुरू करायच्या म्हणून म्हणाले, तशी त्याने व आजूबाजूच्या दोन-तीन जणांनी चमकून त्यांच्याकडे पाहिले. सगळ्यांचेच चेहरे सावध दिसत होते. भारतात सध्या प्रचंड सरकारी दहशत आहे हे त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये असताना वाचले होते व ते खरेच असावे हे त्या पहिल्याच संध्याकाळी जाणवले. पुढचा प्रवास जोशी कुटुंबीयांनी आपापसातच वरवरच्या गप्पा मारत पार पाडला.
 त्यांच्यासारख्या कमालीच्या स्वातंत्र्यप्रेमी आणि त्यातही पुन्हा स्वित्झर्लंडसारख्या देशात आठ वर्षे राहून परत येणाऱ्या गृहस्थाला ही दहशत बोचणारी होती. पण त्याचवेळी कसाही असला, तरी हाच आपला देश आहे आणि यापुढे आपण इथेच राहायचा निर्णय स्वखुशीने घेतला आहे ह्याची जाणीव त्यांना होती. सगळ्या राजकीय घडामोडींपासून आपण अगदी अलिप्त राहायचे आहे व फक्त शेतीवरच आपले सर्व लक्ष केंद्रित करायचे आहे, ह्याची खूणगाठ त्या पहिल्या संध्याकाळीच त्यांनी मनाशी पक्की बांधली.
 पुण्याला पोचल्यावर रेल्वेस्टेशनवरून ते सहकुटुंब डेक्कनवर श्रेयस हॉटेलात गेले. इथल्या दोन खोल्या त्यांनी पूर्वीच आरक्षित करून ठेवल्या होत्या. आईसमवेत सदिच्छा बंगल्यात न राहता स्वतःचे वेगळे घरच विकत घ्यायचे व ते सापडेस्तोवरदेखील हॉटेलातच राहायचे जोशींनी ठरवले होते. त्यादृष्टीने थोडीफार चौकशी त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये असतानाच करून ठेवली होती.
 त्याप्रमाणे ते लगेच कामाला लागले. सहाएक आठवड्यांतच एक बंगला त्यांनी खरेदी केला. औंध येथील सिंध सोसायटीत ७०५ क्रमांकाचा. तीन बेडरूम्स असलेला. शिवाय पुढेमागे थोडी बाग होती. परिसर निवांत होता. मालक एक शाळामास्तर होते. त्याकाळी पुण्यापासून लांब समजल्या जाणाऱ्या औंधसारख्या ठिकाणी घरे बऱ्यापैकी स्वस्तात उपलब्ध होती. घराचे नाव त्यांनी मृद्गंध ठेवले. त्या नावाचा विंदा करंदीकर यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध होता व शिवाय त्या शब्दातच काव्यात्मकता होती. जोशींसारख्या कविताप्रेमीला तो शब्द भावला. त्यांनी बंगला घेतला त्यावेळी पावसाळा नुकताच सुरू झाला होता व औंध परिसरात तेव्हा बऱ्याच शेतजमिनी असल्याने खूपदा हवेत हवाहवासा वाटणारा मृद्गंध दाटून येई, हेदेखील त्यामागचे कदाचित एक कारण असू शकेल.

 पुढच्या काही दिवसांत बोटीने येणारे त्यांचे सामानही येऊन पोचले. ते नीट लावण्यात बराच वेळ गेला. 'बर्नमधल्या माझ्या खोलीत जे सामान आहे, ते सगळंच्या सगळं पुण्यातल्या माझ्या खोलीत असलं, तरच मी पुण्याला येईन, अशी धाकट्या गौरीची अटच होती. नव्या जागी वास्तव्य सुरू करायचे म्हणजे धावपळ तर अपरिहार्यच होती. शहरापासून इतक्या लांब त्यावेळी सार्वजनिक वाहनव्यवस्था नव्हती; दिवसभरात जेमतेम सात-आठ बसेस औंधमार्गे पिंपरी-चिंचवडकडे जायच्या. शिवाय बहुतेक सगळ्या खरेदीकरिता डेक्कनला जावे लागे. त्यामुळे त्यांनी लगेचच स्वतःसाठी एक लॅम्ब्रेटा स्कूटर घेतली व सहकुटुंब कुठे जाता यावे म्हणून काही दिवसांनी एक सेकंडहँड जीप गाडीही खरेदी केली..
 घर शोधत असतानाच मुलींसाठी चांगली शाळा कुठे मिळेल याचाही शोध चालूच होता. कारण ते अगदी शाळा सुरू व्हायचेच दिवस होते. स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही मुलींना इतर विषयांबरोबरच फ्रेंच, जर्मन व लॅटिन हे तीन विषय होते; इथे पुण्यात मात्र त्याऐवजी इंग्रजी, हिंदी व मराठी हे विषय होते. पाचगणीला एका मुलींच्या प्रख्यात निवासी शाळेत फ्रेंच हा विषय अभ्यासक्रमात आहे असे त्यांनी ऐकले होते व नव्या शाळेतला एकतरी विषय मुलींना चांगला येणारा असावा म्हणून एकदा सगळे पाचगणीला जाऊनही आले. शाळेला मैदान वगैरे उत्तम होते, इमारत प्रशस्त होती, पण निवासव्यवस्था दाटीवाटीची व अस्वच्छ होती – निदान नुकतेच स्वित्झर्लंडहून आलेल्यांच्या दृष्टीनेतरी. 'आम्ही ह्या असल्या डॉर्मिटरीमध्ये चार दिवससुद्धा राहू शकणार नाही' असे दोन्ही मुलींनी स्पष्ट सांगितले. मुळात भारतात परत यायचा वडलांचा निर्णय मुलींना मनापासून मान्य नव्हताच; कशीबशी वडलांच्या आग्रहापुढे त्यांनी मान तुकवली होती. अशा परिस्थितीत त्यांना अमान्य असलेल्या शाळेत घालून अधिक नाराज करणे वडलांना परवडणारे नव्हते. पाचगणीच्या शाळेत मुलींना घालायचा इरादा त्यांना सोडून द्यावा लागला.
 पुण्याला परतल्यावर दुसऱ्याच दिवशी पाषाण भागात असलेली सेंट जोसेफ ही जुनी कॉन्व्हेंट शाळा ते बघायला गेले व ती त्यांना चांगली वाटली. शिक्षणखात्याच्या कार्यालयात तीन चार चकरा टाकल्यावर इथे प्रवेश मिळू शकेल हे तेथील अधिकाऱ्यांकडून कळले. शाळेच्या स्वतःच्या बसेस होत्या व कधी गरज पडली तर घरापासून पायीसुद्धा पंधरा-वीस मिनिटांत जाता येईल इतकी ती जवळ होती. विशेष म्हणजे तिथे फ्रेंच हा विषय होता. त्याच शाळेत मग मुलींचे नाव घातले गेले.

 हे सगळे होत असतानाच एकीकडे त्यांनी शेतीसाठी जमिनीचा शोधही सुरू केला होता. पूर्णतः पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू जमीनच घ्यायची हे त्यांनी परदेशात असतानाच नक्की केले होते. त्यांची आई व अन्य भावंडे ह्यांना जोशी करत होते तो कमालीचा विक्षिप्तपणा वाटत होता. मुळात त्यांच्या खानदानात कधी कोणी शेती केलीच नव्हती. पण त्यांनी 'तुला काय योग्य वाटेल ते कर' अशीच भूमिका घेतली. एकदा आपल्या शरदने एखादी गोष्ट ठरवली, की ती केल्याशिवाय तो कधीच राहणार नाही हे घरच्यांना चांगले ठाऊक होते. आश्चर्य म्हणजे, अन्य जवळ जवळ कोणीच त्यांच्या उपक्रमाबद्दल फारसे कुतूहल दाखवलेच नाही! म्हणजे उत्तेजनहीं दिले नाही आणि टीकाही केली नाही. हा शहरी मध्यमवर्गीय अलिप्तपणा म्हणायचा की काय कोण जाणे!
 नात्यागोत्यांतल्या बहुतेकांनी दाखवलेल्या या अलिप्ततेच्या अगदी उलट अनुभव म्हणजे रावसाहेब शेंबेकर यांच्याशी झालेली भेट, तशी त्यांची काहीच पूर्वओळख नव्हती. कोणाकडून तरी त्यांनी जोशीविषयी ऐकले व कुतूहल वाटून ते खास त्यांना भेटायला म्हणून पुण्याला आले. शेंबेकर यांची स्वतःचीही उसाची बरीच शेती होती. ते म्हणाले, "बागायती शेतीतूनही शेवटी शेतकऱ्याच्या पदरी तोटाच येतो. हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. नाहीतरी तुम्हाला प्रयोगच करायचा आहे ना? मग त्यासाठी बागायती शेती का नाही घेत? हवं तर मीच माझ्या जमिनीचा एक चांगला तुकडा तुम्हाला प्रयोगासाठी देतो. त्याचे तुम्ही मला काहीही पैसे देऊ नका." खरेतर ह्या भल्या गृहस्थाने आपणहून दिलेला सल्ला अगदी योग्य असाच होता. शिवाय सोबत प्रत्यक्ष मदतीचे अत्यंत दुर्मिळ व ठोस असे आश्वासनहीं होते; पण जोशींनी तो जुमानला नाही; आपला कोरडवाहू शेतीचा आग्रह सोडला नाही. बऱ्याच वर्षांनी, २० जून २००१ रोजी, 'दैनिक लोकमत'मध्ये लिहिलेल्या आपल्या एका लेखात ते म्हणतात,

शक्य तितक्या सौजन्याने मी रावसाहेब शेंबेकरांना काढून लावले. कोरडवाहू कातळात पाणी शोधण्याच्या आणि शेती फुलवण्याच्या कामात गढून गेलो. शेंबेकरांच्या मनात किती सच्चाई आणि कळकळ होती ते कळायला मला दहा वर्षे लागली. त्यांचा तेवढा एक अपवाद सोडला तर शेतीच्या प्रयोगात मला सल्ला देण्याचा किंवा मी काय करतो आहे ते समजून घेण्याचा उपद्व्याप करणारे इतर कोणीच आले नाहीत.

 आल्याआल्याच जोशींनी किर्लोस्कर कन्सल्टंट्स या प्रसिद्ध कंपनीला सल्लागार म्हणून नेमले होते; योग्य ती शेतजमीन शोधून देण्यासाठी. उगाच इकडच्या तिकडच्या ओळखीवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट व्यावसायिक तत्त्वावर करण्याची त्यांची इच्छा होती. कंपनीच्या वतीने एका अधिकाऱ्यावर हे काम सोपवले गेले. पण त्या सल्लागाराचाही फारसा उपयोग होत नव्हता. यवत व उरळीकांचन येथे काही सुपीक विकाऊ जमिनी त्यांनी दाखवल्या; जोशींनी त्यांतली एखादी जमीन खरेदी करावी असा त्यांचा सल्ला होता. अशा भेटींच्या वेळी बहुतेकदा लीलाताईदेखील बरोबर असत. 'उसाच्या शेतीतदेखील हवे ते प्रयोग आपण करू शकू. शिवाय, त्यात धोका कमी आहे. आपल्याला आता केवळ शेतीवरच उदरनिर्वाह करायचा आहे, तेव्हा जिथे चार पैसे सुटायची थोडीतरी शक्यता आहे, तीच जमीन का खरेदी करू नये?' असे त्यांचे म्हणणे. पण जोशी आपल्या निर्णयापासून जराही हटायला तयार नव्हते.
 शेवटी एकदाची हवी होती तशी कोरडवाहू शेतजमीन जोशींना मिळाली. त्या मागेही एक योगायोगच होता. एक निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर जोशींच्या ओळखीचे झाले होते. त्यांनी त्यांच्या एका मित्राची जोशींबरोबर ओळख करून दिली. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण ह्या गावापासून सात किलोमीटरवर आंबेठाण नावाचे एक छोटे खेडे होते. ह्या मित्राची तिथे जमीन होती, पण त्यांनी वेळोवेळी बँकेकडून घेतलेल्या कर्जापोटी ती गहाण पडली होती. खूप तगादा लावूनही त्यांच्याकडून कर्ज फेडले जात नसल्याने शेवटी बँकेने जमिनीचा लिलाव करायचे ठरवले होते. या परिस्थितीत काही मार्ग निघतो का, हे बघायला ते जोशींकडे आले होते.
 जोशींची ती जमीन प्रत्यक्ष बघायची इच्छा होती व त्यानुसार दुसऱ्याच दिवशी दोघे तिथे गेले. वाटेत त्यांच्या बऱ्याच गप्पा होतच होत्या. त्यांचा मोकळाढाकळा स्वभाव जोशींना आवडला व त्याच दिवशी बँकेचे एकूण जितके कर्ज थकले होते. तेवढे पैसे जोशींनी त्यांच्या बँकेत रोख भरले व त्यांची जमीन लिलावापासून वाचवली.
 पण तेवढ्याने त्यांची पैशाची गरज भागणार नव्हती. कारण आता दुसऱ्या काही कामासाठी त्यांना पुन्हा पैशांची गरज होती. पुन्हा एकदा जोशींनी त्यांना रोख पैसे कर्जाऊ दिले. असे दोन-तीनदा झाले. ते शेतकरी बँकेच्या कर्जातून मुक्त झाले, तरी आता जोशींचे बरेच पैसे त्यांच्याकडे थकले होते व ते परत मिळायची काही लक्षणे दिसेनात. जोशींच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी म्हणून शेवटी त्यांनी आपली ती जमीनच जोशींना विकायचे ठरवले.
 प्रत्यक्ष व्यवहार करण्यापूर्वी एकदा ती जमीन नीट पारखून बघावी, ह्या उद्देशाने जोशी पतिपत्नी त्यांच्याबरोबर पुन्हा आंबेठाणला गेले. त्या जमिनीच्या बरोबर समोर तुकाराम महाराजांचा भामचंद्राचा डोंगर होता- जिथे ते चिंतन करायला एकांतात बसत. त्या डोंगराला एक विशिष्ट उंचवटा आहे. योगायोग म्हणजे बर्नमधल्या जोशींच्या घराजवळ जो गानट्र नावाच्या डोंगराचा भाग होता, अगदी तसाच तो उंचवटा दिसत होता. जोशीना एकदम तो जागा आवडली. या डोंगराच्या गानटशी असलेल्या साधामळे इथेच शेती करायचा योग आपल्या आयुष्यात आहे असे काहीतरी त्यांना वाटले. लगेचच त्या शेतकऱ्याने सांगितलेली किंमत जोशींनी चुकती केली व ती शेतजमीन विकत घेतली. १ जानेवारी १९७७ रोजी.
 ही एकूण साडेतेवीस एकर जमीन होती. त्या जागेचे नाव जोशींनी 'अंगारमळा' असे ठेवले. 'क्रांतीचा जयजयकार' ही कुसुमाग्रजांची कविता जोशींच्या खूप आवडीची. त्याच कवितेतील 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार, होता पायतळी अंगार' ह्या ओळीवरून हे नाव त्यांना सुचले. पुढील आयुष्यात त्या जागी जोशींची जी वाटचाल झाली त्यातील दाहकता विचारात घेता हे नाव अगदी समर्पक ठरले असेच म्हणावे लागेल.
 सरकारी नियमानुसार जो शेतकरी नाही त्याला शेतजमीन विकत घेता येणे आजच्याप्रमाणे त्याकाळीही अतिशय अवघड होते. पण प्रत्येक कायद्याला काही ना काही पळवाटा असतातच. ५ जुलै २००१ रोजी 'दैनिक लोकमत'मधील आपल्या एका लेखात त्यांनी लिहिले आहे,

मी सरकारी नोकरीत असताना रिझर्व्ह बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख झाली होती. त्यांचे चिरंजीव आयएएस पास होऊन प्रांत म्हणून काम बघत होते. त्यांच्या मदतीने मार्ग सापडला.

 कोकणातला रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा यांच्या सीमेवरच्या खेड तालुक्यातील चाकण हे गाव. शिवाजी महाराजांनी बारा मावळांपासून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. चाकण हे या मावळ मुलुखाचे प्रवेशद्वार. इथलेच लढवय्ये मावळे त्यांचे जिवाभावाचे सोबती.
 असे ऐतिहासिक महत्त्वाचे गाव असूनही इथला सामान्य शेतकरी मात्र कमालीच गांजलेला होता. दुष्काळातील त्याच्या दुःखाचे हृदयस्पर्शी वर्णन तुकाराम महाराजांनी केलेले आहे; पण दुष्काळ नसतानाही त्याची परिस्थिती फारशी काही वेगळी नसायची.
 इथे सतत लढाया चालू असत. कधी दिल्लीचे मोगल आक्रमण करत तर कधी विजापूरच्या अदिलशहाचे सरदार, कधी सिद्धी जोहरचे सैनिक तर कधी पेंढाऱ्यांचे लहानमोठे हल्ले. प्रत्येक स्वारीत उभी पिके कापली जात, गावे लुटली जात, अगदी बेचिराख केली जात. आक्रमक कोणीही असला तरी शेतकऱ्याचे हाल सर्वाधिक असत. त्याचे घरदार, बैलनांगर, बी-बियाणे, पाण्याची व्यवस्था सारे नष्ट होऊन जाई. पुन्हा त्याला शून्यातून सुरुवात करावी लागे आणि जे नव्याने उभारायचे तेही कधी लुटले जाईल ह्याचा काहीच नेम नसायचा. स्थैर्याच्या पूर्ण अभावामुळे मोठे असे काही उभारायची, भविष्यासाठी बचत करायची, संपत्ती निर्माण करायची सारी प्रेरणाच नाहीशी होऊन जायची. राजेमहाराजांच्या स्वाऱ्या, त्यांच्या आपापसातील लढाया, त्यांचे पराक्रम ह्या सगळ्यांनी भरलेल्या इतिहासात त्या सामान्य शेतकऱ्याची काहीच नोंद होत नव्हती. होणारही नव्हती. माणसाचा स्वतःच्या प्रयत्नावरचा सगळा विश्वास उडून जावा व अपरिहार्यपणे, केवळ जगण्यापुरते तरी बळ मिळावे म्हणून त्याने दैववादी बनावे, ठेविले अनंते तैसेची राहावे' हाच आदर्श समोर ठेवून गेला दिवस तो आपला समजत जगावे, अशीच एकूण परिस्थिती होती. पिढ्यानपिढ्या हे असेच चालत आले होते व त्या संचितातूनच शेतकऱ्याची विशिष्ट मानसिकता घडत गेली होती.
 भामा ही इथली प्रमुख नदी. वांद्रे गावाजवळ ती उगम पावते व पुढे भीमा नदीला मिळते. भामा नदीवर जवळच आसखेड धरण आहे. चाकण हे एक टोक पकडले तर वांद्रे गाव हे दुसरे टोक. वांद्र्याच्या पलीकडे रायगड जिल्हा सुरू होतो. वांद्रे व चाकण या दोन टोकांमधले अंतर ६४ किलोमीटर. ह्या भागाला भामनहरचे (किंवा भामनेरचे) खोरे असे म्हटले जाते व याच रस्त्यावर चाकणपासून सात किलोमीटरवरचे आंबेठाण हे एक छोटेसे गाव. इथला सगळा परिसर डोंगराळ. कांदे, बटाटे, ज्वारी आणि भुईमूग ही मुख्य पिके; खोऱ्याचा वांद्र्याजवळचा जो भाग आहे तिथे पाऊस जास्त पडत असल्याने भाताचे पीक घेतले जायचे.

 रोज सकाळी सहा वाजता औंधमधील आपल्या घरून जोशी स्कूटरवरून निघायचे आणि ४० किलोमीटरवर असलेल्या आंबेठाणला सकाळी सातपर्यंत पोचायचे. कधी कधी लीलाताईदेखील सोबत येत. अशावेळी ते आपली महिंद्रची पांढरी जीप गाडी आणत. संध्याकाळी काळोख पडला की औंधला परतत. दिवसभर शेतीचे काम करता करता जमेल तेव्हा इतर गावकऱ्यांशी संवाद साधत, त्यांची शेती अभ्यासत.
 आधी त्यांनी जमिनीला कंपाऊंड घालायचे काम हाती घेतले. दोन बाजूंना भिंत, तिसऱ्या बाजूला तार व चौथ्या बाजूला घायपात. घायपात म्हणजे निवडुंगासारखी बांधावर लावली जाणारी झाडे, ह्याची पाने शेळ्या-बकऱ्या खात नसल्याने ती दीर्घकाळ टिकतात व त्यांच्यापासून भाजीच्या जुड्या वगैरे बांधायला लागणारा जाडसर धागा मिळतो. हे असले ज्ञान प्रत्यक्ष शेतीत उतरल्यावरच जोशींना मिळाले. इथली बहुतेक जमीन उंचसखल, खडकांनी भरलेली अशी होती; किंबहुना म्हणूनच ती त्यांना स्वस्तात मिळू शकली होती. कित्येक वर्षे तिथे कुठलेच पीक घेतले गेले नव्हते. शेतीसाठी ती सर्वप्रथम नीट सपाट (लेव्हल) करून घेणे आवश्यक होते. पाणी उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी दोन विहिरीही खणायला घेतल्या. सुदैवाने पाणी चांगले लागले. पाइपाने पाणी सगळीकडे खेळवायचीही व्यवस्था केली. जमिनीवर दोन खोल्यांचे स्वतःसाठी एक घर बांधले. घराशिवाय एक सामानाची खोली होती, शेतीची अवजारे, खते व तयार शेतमाल ठेवायला मोठी शेड होती. म्हशी पाळायचा त्यांचा विचार होता व त्यासाठी गोठाही बांधायला घेतला. वीज महामंडळाकडे अनेक चकरा टाकून विजेची जोडणी करवली. अडचणीच्या वेळी अत्यावश्यक म्हणून टेलिफोनचीही सोय करून घेतली. त्या परिसरातले ते पहिले टेलिफोन कनेक्शन, शून्यातूनच सगळी सुरुवात करायची म्हटल्यावर एकूण प्रकरण तसे अवघडच होते; विशेषतः यावेळी जोशींची चाळिशी उलटलेली असल्यामुळे. पण ते चिकाटीने एकेक करत कामे मार्गी लावू लागले.
 सुरुंग लावणे, मोठाले खडक उकरून बाहेर काढणे, पिकांसाठी प्लॉट पाडणे, बांध घालणे, पाइप लाइन्स टाकणे, अंतर्गत कच्चे रस्ते तयार करणे, कुंपण घालणे, अशी अगणित कामे होती. सर्वात आधी गरज कामगारांची होती. निदान शे-दीडशे माणसे रोज कामाला लागणार होती. मोठे मोठे खडक उकरून जमीन सारखी करताना आणि विहिरी खणताना त्या खडकांखाली दडलेले लांब लांब, मनगटाएवढे जाड साप चवताळून बाहेर पडत. त्यांच्या पुरातन घरांवरतीच इथे आक्रमण होत होते. साप सापडला नाही असा एक दिवस जात नसे. मजुरांना काम करताना सापांची भीती वाटायची. नाथा भेगडे नावाचा एक माणूस जोशींनी शेतीकामासाठी मुकादम म्हणून नेमला होता. तो रोज फटाफट साप मारत असे.
 शक्यतो पुढच्या चार-पाच महिन्यांत जास्तीत जास्त कामे संपवावीत असे जोशींनी ठरवले होते, कारण नंतर मजुरीला माणसे मिळतीलच अशी खात्री नव्हती. खुद्द आंबेठाणमध्ये भूमिहीन मजूर असे जवळजवळ कोणीच नव्हते; प्रत्येकाची थोडीफार तरी शेती होतीच. पण तरीही स्वतःचे शेतीकाम संपल्यावर अधिकच्या कमाईसाठी सगळेच कुठे ना कुठे मजुरीवर जात. पण आपल्याला गरज असेल तेव्हा ते मजुरीसाठी उपलब्ध असतील याची शाश्वती नव्हती. सुदैवाने रब्बी पिकांचे काम झाल्यावर बहुतेक गावकऱ्यांना फारसे काही काम नसायचेच व त्यामुळे त्या कालावधीत पुरेसे मजूर उपलब्ध झाले. बरेचसे लांब लांब राहणारे कातकरी होते.

 त्यावेळी मुक्काम करता येईल असा शेतावर आडोसा नव्हता. स्वित्झर्लंडहून आणलेली एक स्लिपिंग बॅग जोशींनी इथे आणून ठेवली होती; तशीच वेळ आली तर काहीतरी सोय असावी म्हणून. पण पुण्यातही कामे असायचीच; त्यामुळे जोशी शक्यतो झोपायला औंधला जात. अर्थात रोज न चुकता सकाळी सातच्या आत शेतावर हजर असत. वीजजोडणी, प्लंबिंग, सुतारकाम, गवंडीकाम अशी काही कामे कंत्राटावर दिलेली होती. ती मंडळी आपापले सामान घेऊन येत, आपापले काम करत; पण त्यांच्यावरही लक्ष ठेवावे लागे. बाकी कामे जोशी स्वतःच सांभाळत. एकाच वेळी चारपाच ठिकाणी कामे सुरू असत. जोशी जरा वेळ एका कामावर जायचे, तर जरा वेळाने दुसऱ्या कामावर. प्रत्येक ठिकाणी पाळीपाळीने स्वतः रांगेत उभे राहत, घमेली उचलत, दगडगोटे इकडून तिकडे टाकायचे काम करत. विहीर खणण्याच्या कष्टाच्या कामातही ते हाफ पँट घालून स्वतः खड्ड्यात, चिखलात उतरत. इतरांनाही कामाला हुरूप यावा, ही भावना त्यामागे होतीच; पण आठ वर्षे युरोपात काढल्यावर स्वतःच्या हाताने काम करायची तशी त्यांना सवयही झाली होती. इतर अनेक शहरी सुशिक्षित भारतीयांना वाटते तशी शरीरश्रमांची त्यांना लाज वाटत नसे; आणि शिवाय एकदा एखादे काम स्वतःच्या इच्छेने अंगावर घेतल्यावर सर्व ताकदीनिशी त्याला भिडायचे हा त्यांचा स्वभावच होता. स्वतः मजुरांच्या बरोबरीने काम करण्यात त्यांचा आणखीही एक उद्देश होता. तो म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारणे व त्यातून गावकऱ्यांचे जगणे अधिक चांगले समजून घेणे.

 सुरुवातीला गावकऱ्यांशी जोशींचा जरा वाद झाला. बाहेरून येणाऱ्या या कातकऱ्यांना मजुरी म्हणून किमान वेतन कायद्याप्रमाणे रोजचे तीन रुपये द्यायचे आणि स्त्री व पुरुष दोघांनाही सारखेच पैसे द्यायचे असे जोशींनी ठरवले होते. त्यांना स्वतःला ही मजुरी अगदी नगण्य वाटत होती. परदेशात काही वर्षे राहिलेल्या व तिथल्या किमतीची सवय झालेल्या माणसाला भारतात आल्यावर इथल्या सर्वच किमती, विशेषतः मानवी श्रमांचे इथले मूल्य, अगदीच नगण्य वाटते, तसाच हा प्रकार होता. पण मजुरीच्या ह्या दरामुळे गावकऱ्यांमध्ये मात्र खळबळ माजली, कारण ते स्वतः त्यांच्या शेतीच्या कामासाठी रोजी फक्त दीड रुपया मजुरी देत होते. "तुम्ही लोकांना इतकी मजुरी देऊन लाडावून ठेवलं, तर आम्हाला आमच्या कामासाठी मजूर कसे मिळणार? तुम्हाला ते परवडत असेल; पण आम्हाला नाही ना परवडणार!" असे त्यांचे म्हणणे होते.
 "मी बाहेरून आलेला माणूस आहे. कायद्याने ठरवून दिली आहे त्यापेक्षा कमी मजुरी मी दिली तर तो गुन्हा होईल. मला ते करणं कसं शक्य आहे?" जोशी त्यांना समजावू लागले.
 गावकऱ्यांना ते पटले नाही, पण त्यांनीही मग तो मुद्दा फारसा रेटून धरला नाही. कारण त्यांच्यातले जे जोशींच्या शेतावर मजुरीला जायचे, त्यांना स्वतःलाही ही वाढीव मजुरी मिळतच होती व हवीच होती. जोशींचे काम संपले, की पुन्हा मजुरीचे दर आपोआपच खाली येतील, अशीही त्यांची अटकळ असावी.
 इथे एक मुद्दा स्पष्ट करायला हवा - शेतकरी व शेतमजूर असा काहीच भेद त्या मजुरांमध्ये नव्हता. ते स्वतः शेतकरीही होते व त्याचवेळी अधिकचे चार पैसे हाती पडावेत म्हणून शेतमजुरीही करत होते. जे फक्त मजुरी करत तेही एकेकाळी शेतकरी होतेच; पुढे कधीतरी त्यांच्या जमिनी कर्जापोटी गहाण तरी पडल्या होत्या किंवा विकल्या गेल्या होत्या. आयुष्यात पुढे जेव्हा काही विचारवंत 'तुम्ही फक्त शेतकऱ्यांचा विचार करता, शेतमजुरांचा नाही' असा आरोप करत, तेव्हा आपल्या शेतावरचे हे मजूर त्यांच्या डोळ्यांपुढे उभे राहत व असल्या निव्वळ पुस्तकी आरोपातील स्वानुभवावरून कळलेला फोलपणा त्यांना प्रकर्षाने जाणवे.
 गावकऱ्यांना मजुरीचे इतके कमी असलेले दरही परवडत नव्हते ह्याचे कारणही अर्थातच जोशींना साधारण ठाऊक होते आणि येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष अनुभवानेही ते अधिक चांगले कळणार होते - ते कारण म्हणजे गावकरी विकत असलेल्या ज्वारीचा त्यांच्या हाती पडणारा दर त्यावेळी क्विटलला (१०० किलोना) फक्त सत्तर रुपये होता आणि कांद्याचा भाव फक्त वीस रुपये होता!
  ह्या मजुरांचे, विशेषतः कातकरी मजुरांचे दारिद्र्य हृदय हेलावून टाकणारे होते. इथल्या आदिवासींत कातकरी व ठाकर असे दोन समाज मुख्य होते. सगळे तसे विस्थापित. वेगवेगळ्या धरणयोजनांमुळे कोकणातून बाहेर पडून वांद्रेमार्गे इथे आलेले. साधारण निम्मे मजूर पुरुष होते तर निम्म्या बायका. सगळ्यांचीच शरीरयष्टी कृश. लहानपणापासून आबाळ झालेली. पुरेसा पोषक आहार न मिळाल्याने मुळातच अवयवांची नीट वाढ न झालेली. (आदिवासी स्त्रिया व पुरुष यांच्या आकारमानात फारसा फरक का नसतो, हा भविष्यात जोशींच्या एका अभ्यासाचा विषय होता.) अंगारमळ्यात येण्यासाठी यांतल्या अनेकांना पाचपाच, दहा-दहा किलोमीटर चालावे लागे. रणरणत्या उन्हात. काट्याकुट्यांतून, जवळजवळ कोणाच्याही पायात चपला नसायच्या. संध्याकाळी घरी जाताना पुन्हा तोच प्रकार. जोशी लिहितात,

निसर्गाने बुडवलेल्या, चोरांनी लुटलेल्या, सावकारांनी नाडलेल्या, सुलतानांनी पिडलेल्या, धर्मजातींनी गांजलेल्या या मंडळींच्या जवळ जाण्याचा मी प्रयत्न करीत होतो; पण कुणी खुलेपणाने बोलत नव्हते. त्यांच्यात माझ्यात अंतर किती? ते उल्लंघावे कसे? पुढे पुढे मला एक युक्ती कळली - निबंधवार उत्तरे द्यावी लागतील असे प्रश्न विचारायचेच नाहीत. वस्तुनिष्ठ प्रश्न विचारायचे. उत्तरे आपण सुचवायची. उत्तर काय दिले जाते, यापेक्षा उत्तर देतानाची चेहऱ्यावरची मुद्रा बारकाईने न्याहाळायची.

 दुपारी जोशी दोन तास सुट्टी देत. ज्या गावकऱ्यांना घरी जाऊन जेवायचे असेल, इतर काही कामे उरकायची असतील त्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून. लांब राहणारे मजूर अर्थात तिथेच थांबत. पण बरेच गाववासी मजूरही शेतावरच थांबत, सावलीत बसून बरोबर आणलेला भाकरतुकडा खात. "दुपारची आपण भजनं म्हटली तर?" एक दिवस जोशींनी सुचवले. सर्वांनाच ती कल्पना आवडली. भजने म्हणणे हा तिथल्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग होता.
 ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मजूर मृदंग-झांजा घेऊन हजर झाले. जेवण उरकल्यावर भजनांना सुरुवात करायचे ठरले होते. जोशींनी भजनाचे सुचवले त्यामागे दोन कारणे होती. एक म्हणजे, मजुरांच्या अधिक जवळ जायचा हा एक मार्ग होता. दुसरे कारण अधिक व्यक्तिगत होते. काही महिने शेतीकामात काढल्यावर जोशी स्वतःही, नाही म्हटले तरी, काहीसे उदास झाले होते. 'परवापरवापर्यंत जिनिव्हा-न्यूयॉर्कमधल्या आलिशान सभागृहांत चर्चा करणारा मी, आज कुठे इथल्या वैराण, ओसाड कातळावर दगडांचे ढीग टाकण्याचे काम करत बसलोय? आपण धरलेला हा रस्ता योग्य आहे ना? आपण स्वतःचीच फसवणूक तर नाही ना करत आहोत?' अशा प्रकारचे विचार अलीकडे त्यांच्या मनात येत असत. विशेषतः दुपारची निवांत वेळ त्यांना अधिक अस्वस्थ करणारी वाटे. एकत्र भजने म्हटल्याने आपल्यालाही थोडेसे उल्हसित वाटेल, असा त्यांनी विचार केला होता.
 गावातली भजने नेहमीच 'केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा... ह्या भजनाने सुरू होत. पण त्या दिवशी मजुरांनी सुरुवात केली ते भजन होते, "हरिश्चंद्र राजा, तारामती राणी... डोंबाघरी भरी पाणी, डोंबाघरी पाणी..." जोशी दाम्पत्याची मनःस्थिती त्या मजुरांनी अगदी अचूक ओळखली होती, विशेषतः जोशींच्या मनातील विचार त्यांना नेमके कळले होते व त्यांना चपखल लागू पडेल, असेच भजन त्यांनी फारशी चर्चा न करताच निवडले होते. जोशी लिहितात,

या निरक्षर अडाण्यांनी, मी त्यांच्या चेहऱ्यावर वाचले नव्हते इतके भाव माझ्या चेहऱ्यावर वाचले होते. मृदंग-झांजांचा कल्लोळ आणि गाणाऱ्यांची सामूहिक बेसूरता ओलांडून भजनाचा अर्थ असा काही भिडला, की गळ्यातला आवंढा गिळवेना.

 या प्रसंगानंतर ह्या गरीब बिचाऱ्या मजुरांसाठी आपण ठोस काहीतरी केलेच पाहिजे असे त्यांनी ठरवले. भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचा अधिक बारकाईने शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांची निरीक्षणे अतिशय अस्वस्थ करणारी होती. पुण्यासारख्या महाराष्ट्राच्या तथाकथित सांस्कृतिक राजधानीपासून आणि झपाट्याने वाढत चाललेल्या उद्योगनगरीपासून अवघ्या चाळीस किलोमीटरवर असलेल्या आंबेठाणसारख्या गावात अशी परिस्थिती असावी, देश स्वतंत्र होऊन तीस वर्षे उलटल्यावरही ती तशीच राहिलेली असावी, हे खूप विषण्ण करणारे होते.
 आंबेठाण गावात वीज जवळ जवळ कुठेच नव्हती आणि जिथे होती तिथेही ती वरचेवर खंडित व्हायची. त्यामुळे सूर्यास्तानंतर सगळे व्यवहार ठप्प व्हायचे. घरातही एखाददुसरा मिणमिणता कंदील. करमणूक अशी कुठलीच नाही. शिवाय, वीज नसली की शेतीला पाणी कुठून आणणार? जिथे विहीर असायची तिथे पंप चालवले जात. शेतीला पाणी मिळावे म्हणून. पण डिझेलचाही प्रचंड तुटवडा. खुल्या बाजारात ते कधीच उपलब्ध नसे. मामलेदाराकडे जाऊन खूप खटपट केल्यावर परवाना मिळायचा पण तोही महिन्याला फक्त वीस लिटरचा. म्हणजे रोजचे साधारण ७०० मिलीलिटर. पंप धुवायलाही ते अपुरे पडायचे! मग त्यात रॉकेलची भेसळ करणे आलेच. खरे तर तेही पुरेसे कधीच मिळत नसे; त्यालाही रेशन कार्ड लागायचे. फारच थोड्या जणांकडे ते असायचे. बाकीच्यांना जादा पैसे देऊन ते मिळेल तिथून खरेदी करावे लागे. या भेसळीत इंजिनची नासाडी व्हायची; दुरुस्तीचा खर्च बोकांडी बसायचा. पण पंप चालवला नाही तर कांद्याला पाणी देणे अशक्य आणि मग तयार पीकही जळून जायची भीती.
 गावात एकाच्याही घरी संडास नव्हता: बायाबापड्यांनाही उघड्यावरच बसावे लागे. कुठल्याच घरात नळ नव्हते. पिण्यासाठी साधारण शुद्ध असेही पाणी उपलब्ध नव्हते. कुठूनतरी घमेल्यातून मिळेल ते पाणी आणायचे, तोंडाला पदर लावून तेच प्यायचे; त्यातून गाळले जाईल तेवढे जाईल. त्यामुळे रोगराई प्रचंड. खरे तर बरेचसे रोग हे स्वच्छतेच्या साध्यासुध्या सवयी लावल्या तरी दूर होऊ शकणारे. जेवणापूर्वी हातपाय स्वच्छ धुणे, धुतलेले कपडे घालणे, रोज अंघोळ करणे, भांडीकुंडी नीट घासून घेणे, केरकचरा व्यवस्थित गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे ह्या सगळ्या, म्हटले तर अगदी साध्या गोष्टी. पण इथे कोणीही यांतले काहीच करत नसे. त्यामुळे गावात बहुतेक सर्वांना खरूज झालेली असे. कॉलरा, हगवण, नायटा हे रोगही घरोघर. बहुतेक सर्व आजार अशुद्ध पाणी, अपुरा आहार आणि जंतांमुळे होणारे.
 गावात शाळा एकच. चावडीवर भरणारी. शिक्षक हजर असला तर ती भरणार. गळके छप्पर, भेगाळलेल्या भिंती. तुटकी दारे. पावसाळ्यात खूपदा ती बंदच असे. एकूण मुलांचा शाळेत जाण्यापेक्षा न जाण्याकडे कल अधिक. 'शिकन काय करायचं?' ही आईवडलांची भूमिका. ते स्वतःही निरक्षरच. त्यामुळे एकूण अनास्था खूप. शेतावर काम असले तर मुले ते नाखुशीने का होईना पण थोडेफार करायची; नाहीतर दिवसभर अशीच उनाडक्या करत भटकायची.
 ह्या एकूण मागासलेपणाला कंटाळून अनेक तरुण मग शेती सोडून एमआयडीसीसारख्या जागी नोकरी शोधायला जात. असाच एक तरुण एकदा जोशींना भेटायला आला. म्हणाला,
 "साहेब, पूर्वी मी तुमच्या शेतावर मजुरी करायचो. दिवसभर उन्हातान्हात घाम गाळल्यावर मला संध्याकाळी तीन रुपये भेटायचे. आज एका कारखान्यात लागलो आहे. मशिनच्या मागे आरामात उभं राहून विड्या फुकत काम करतो. पण गेल्या महिन्यात मला नऊशे रुपये पगार मिळाला. रोजचे तीस रुपये. शेतीकामात मिळत होते त्याच्या दसपट! तेही भरपूर आरामाचं काम करून!"
 हे सांगताना त्या तरुणाचे डोळे जुन्या श्रमांच्या आठवणीने पाणावले होते. शेतातील श्रम व कारखान्यातील श्रम यांचे बाजारात जे मोल केले जाते, त्यातील ही जबरदस्त तफावत जोशींनाही अस्वस्थ करून गेली. अर्थात कारखान्यात अशी नोकरी मिळायचे भाग्यही शंभरात एखाद्यालाच लाभणार.
 स्वतःची शेती सुरू करता करता जेवढे शक्य होते तेवढे ग्रामविकासाचे प्रयत्न त्या सुरुवातीच्या काळात जोशींनी केले. रोगराई कमी व्हावी म्हणून स्वच्छता मोहिमा काढल्या. गाव हागणदारीमुक्त व्हावे म्हणून चराचे संडास खणले. श्रमदानाने कच्चे का होईना पण रस्ते बांधले. विहिरीत साठलेला गाळ उपसून काढायची योजना राबवली. शाळेचा दर्जा सुधारावा म्हणून ग्रामपंचायतीकडे साकडे घातले. साक्षरता वर्ग चालवले. वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती गावकऱ्यांना व्हावी म्हणून अधिकाऱ्यांना गावात बोलावून आणले. पारंपरिक समाजसेवेच्या सगळ्या वाटा चोखाळून झाल्या; पण असल्या प्रयत्नांच्या मर्यादाही हळूहळू त्यांच्या लक्षात येत गेल्या. मागासलेपणाचे सर्वांत मोठे कारण गरिबी हे आहे. ती जोवर दर होत नाही तोवर इतर कुठल्याच उपायांना अपेक्षित ते यश मिळणार नाही, आणि त्यासाठी शेतीमालाला अधिक भाव मिळायला हवा हे उघड होत गेले.
 जोशी सांगत होते,
 “एक साधं उदाहरण देतो. आंबेठाणमध्ये सुरुवातीच्या काळात साफसफाईचं खूप काम मी केलं, पण तरीही आमच्या आंबेठाणपेक्षा शेजारचं भोसे गाव अधिक स्वच्छ होतं. तिथली जमीन खडकाळ नव्हती व अधिक सुपीक होती, फळं व भाजीपाला तिथे खूप यायचा, हे खरंच आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या गावचा कांदा अधिक चांगल्या दर्ज्याचा होता व त्याला अधिक चांगला भाव मिळत असे. हाती चार पैसे शिल्लक राहू लागले की माणसाला आपोआपच टापटीपीने राहावं असं वाटू लागतं. आर्थिक प्रगती झाल्यानंतरच इतर प्रगती शक्य होती.”

 गावातील स्थिती सुधारावी म्हणून जोशींनी अगदी सुरुवातीच्या काळात केलेल्या एका गंभीर प्रयत्नाविषयी थोडे विस्ताराने लिहिले पाहिजे. स्वतः जोशींनीही त्याविषयी लिहिले आहे.

 सर्व भूमिहीनांना प्रत्येकी दोन-अडीच एकर जमीन मिळावी अशी एक सरकारी योजना होती. आंबेठाणच्या आजूबाजूलादेखील काही जणांना तशा जमिनी मिळाल्या होत्या. पण त्या नुसत्याच पडून होत्या. म्हाळुगे गावातील शिवळे पाटील यांच्या जमिनीचा बराच भागही कित्येक आदिवासींना वाटला गेला होता. पण त्या जमिनीही तशाच पडून होत्या. कॉलेजात शिकलेल्या पुस्तकांत आणि अनेक पुरोगामी विचारवंतांच्या लेखनात बड्या जमीनदारांकडून अतिरिक्त जमिनी सरकारने ताब्यात घ्यायला हव्यात, भूमिहीनांना त्यांचे वाटप व्हायला हवे, तसे झाले, की मग ते ती जमीन कसायला लागतील, स्वतःचे पोट भरू शकतील आणि त्यातूनच ग्रामीण दारिद्र्याचा प्रश्न मिटेल अशी मांडणी केल्याचे जोशींनी वाचले होते; त्यांचेही मत पूर्वी साधारण तसेच होते.

 पण इथे त्यांच्या डोळ्यांसमोर मात्र वेगळेच काहीतरी घडत होते. जमीन हातात येऊनसुद्धा त्यांच्यापैकी कोणीही हातपाय हलवत नव्हते. प्रत्येकाची काही ना काही अडचण होती; नुसती जमीन मिळून त्यांचे भागणार नव्हते. कोणाला अवजारे हवी होती, कोणाला बैल हवे होते, कोणाला बियाणे हवे होते, खते हवी होती. त्याशिवाय ते काहीच करू शकत नव्हते, किंवा करायला तयार नव्हते.

 खेडमधील प्रांत अधिकाऱ्यांशी एक दिवस जोशींनी विस्तृत चर्चा केली. सामूहिक शेती करण्याबद्दल. तो एक उत्तम तोडगा असल्याचे जाणवत होते. सुदैवाने अधिकारी सज्जन होते, त्यांनी दावडी गावातील काही नवभूधारकांशी गाठ घालून दिली. जमिनीचा जुना मालक थोडा कटकट करत होता. पण सरकारपुढे त्याचे काहीच चालणार नव्हते. शिवाय, आणीबाणीच्या त्या दिवसांत सरकारी अधिकाऱ्यांची खेड्यापाड्यांतून बरीच भीतीदेखील होती. मामलेदार स्वतः दावडीला आले व त्यांनी जमिनीच्या सीमा आखून दिल्या. एकूण अकरा भूमिहीनांना तिथे सलग अशा जमिनी मिळाल्या. शेती सामूहिक करायचे ठरले. नाहीतर ज्याच्या जमिनीच्या तुकड्यात विहीर लागेल तो इतरांना पाणी देणारच नाही! सगळ्यांना ती अट मान्य होती. त्या सामूहिक शेतीला 'अकरा भूमिपुत्र' असे नाव दिले गेले.

 जसजसे दिवस जात गेले तसतशा एकेक गोष्टी जोशींच्या लक्षात यायला लागल्या. एकतर त्यांपैकी खरे भूमिहीन असे फक्त तिघे होते. त्यांच्या घरची माणसे पुण्या-मुंबईत नोकरीला होती व त्यावर त्यांचे घर चालत होते. आपल्या नावावर शेती व्हावी ह्याच्यात त्यांना खचितच आनंद होता, त्यासाठी वेगवेगळ्या पुढाऱ्यांना भेटून त्यांनी थोडाफार पैसाही खर्च केला होता; पण प्रत्यक्ष जमीन कसण्यात मात्र त्यांना जराही उत्साह नव्हता. जोशींसमोर आणि सरकारी अधिकाऱ्यांसमोर ते उत्साहाचे केवळ नाटक व तेही अगदी अहमहमिकेने करत होते. बँकेकडून कर्ज मिळावे म्हणून स्वतः जोशी यांनीच खेड या तालुक्याच्या गावी अनेक खेटे घातले. त्यांच्याबरोबर अकरापैकी फक्त एकच भूमिपुत्र सोबत म्हणून बँकेत आला; बाकीच्या सगळ्यांनी घरी काही ना काही काम आहे अशी सबब सांगून स्वतः येणे टाळले. पण तरीही जोशींनी मनात कटुता येऊ दिली नाही. 'आपल्यावर त्यांनी विश्वास ठेवावा असे आपण प्रत्यक्षात काय करून दाखवले आहे? त्यांचा निरुत्साह अगदी समजण्यासारखा आहे. जसजसे काम उभे राहील तसतसा त्यांचा विश्वास वाढेल' - असे जोशी स्वतःला समजावत राहिले. त्यांनी लिहिले आहे, एकोणिसाव्या शतकातील मिशनऱ्यांच्या धाटणीवर मी स्वतःलाच धीर देत होतो." (मिशनऱ्यांच्या मनोभूमिकेचे त्यांनी इतके चपखल बसणारे उदाहरण द्यावे हे नवलच आहे. कदाचित त्यांनी केलेल्या सॉमरसेट मॉमच्या वाचनाचा हा प्रभाव असावा.)

 जमीन डोंगरकपारीत उतारावर होती; त्यामुळे बांधबंदिस्तीचे बरेच काम करणे आवश्यक होते. त्यासाठी ह्या भूमिहीनांकडे पैसे नव्हते. ह्या प्रकरणात जोशी घेत असलेल्या पुढाकारामुळे स्थानिक सरकारी अधिकारी बरेच प्रभावित झाले होते. एव्हाना जोशी यांची पार्श्वभूमी त्यांच्याही कानावर आली होती. ते म्हणाले, “सामानाचा सगळा खर्च कुठल्यातरी शासकीय योजनेखाली आम्ही करू. पण आमची एक अट आहे. मजुरीचा बंदोबस्त मात्र नवभूधारकांनी केला पाहिजे."

 जोशी आनंदाने तयार झाले. लगेच दावडीला आले. सगळ्यांना गोळा केले व त्यांच्यापुढे त्यांनी ही योजना मांडली - तीन दिवसांनी सगळ्यांनी शेतीवर राहायलाच जायचे. बांधबंदिस्तीचे काम पूर्ण होईस्तोवर तिथेच राहायचे. प्रत्येक घरातून निदान दोन जण तरी आले पाहिजेत. आपले महत्त्वाचे काम त्यामुळे होऊन जाईल. प्रारंभीची एक मोठी अडचण दूर होईल. शिवाय, विशेष इन्सेंटिव्ह म्हणून, जे हजर राहतील त्यांना सध्याच्या दराप्रमाणे मजुरीही मिळेल. आणि जे गैरहजर राहतील त्यांना मात्र दंड केला जाईल.'

 व्यवस्थापनशास्त्राप्रमाणे ह्यात चांगले काम करणाऱ्याला गाजर आणि कामात हयगय करणाऱ्याला छडी' अशी तजवीज जोशींनी केली होती. सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या.

 ठरलेल्या दिवशी सकाळी उजाडता उजाडताच जोशी पुण्याहून निघून दावडीला गेले. तिथे एकही व्यक्ती हजर नव्हती! तास-दोन तास बरीच खटपट केल्यावर आणि निरोपानिरोपी केल्यावर चार घरांमधली मिळून एकूण नऊ माणसे हाती लागली. त्यांना आपल्या जीपमध्ये घालून जोशी शेतावर घेऊन गेले. मिळतील तेवढे दगडगोटे गोळा करून रात्रीच्या आडोशासाठी भिंती उभ्या करायला सुरुवात केली. जोशी स्वतःही अंग मोडून कामाला लागले. संध्याकाळी सगळ्यांनी कंदिलाच्या उजेडात भाकऱ्या खाल्ल्या.

 तो सगळाच अनुभव जोशींना विलक्षण रोमांचक वाटत होता. भारतात परतल्यावर प्रथमच आपण थोडेफार अर्थपूर्ण जगतो आहोत असे वाटत होते. जेवण झाल्यावर दोघे जण काहीतरी अडचण सांगून आपल्या घरी निघून गेले. दुसरे दोघे "आम्ही आत्ता गावात जातो, प्रत्येक घरात फिरतो आणि उद्या सकाळी घरटी दोन जण तरी शंभर टक्के घेऊन येतो' असे वचन देत आपल्या गावी गेले. उरलेले पाच जण आणि जोशी स्वतः अशा सहा जणांनी दगड रचून तयार केलेल्या भिंतींच्या आडोशाला, डोंगरातून वाहणारे भणभणते वारे अंगावर झेलत, कुडकुडत कशीबशी ती रात्र काढली.
 सकाळी उठून जोशी पुन्हा कामाला लागले. या सहा जणांसह. इतर जण येतील तेव्हा येतील, असा विचार करत. पण प्रत्यक्षात दपारपर्यंत एकही नवा माणस आला नाही. गावात कोणीतरी मेल्याची बातमी तेवढ्यात कानावर आली आणि उरलेले पाच भूमिपुत्रही लगबगा गावाला निघून गेले. त्यांच्या त्या सामूहिक शेतावर आता घाम गाळायला एकटे जोशीच उरले!

 असा प्रकार वरचेवर घडू लागला. एक दिवस जोशींनी सगळ्यांना स्पष्टच विचारले,
 "तुमची अडचण काय आहे? तुम्हाला शेती करायची आहे की नाही? नसेल करायची तर तसं सरळ सांगून टाका आणि मला याच्यातून मोकळं करा."
 त्यांच्या या स्पष्टोक्तीनंतर सगळे जरा गांगरले. "असं नका हो करू. तुम्ही गेलात तर सगळंच कोसळेल. आमचं नाक कापलं जाईल आणि तो मूळ जमीन मालक आम्हाला जगूही देणार नाही. जरा बेताबेताने घेऊ या." वगैरे म्हणत सारवासारव करू लागले. पण त्यात फारसा काही अर्थ नव्हता हे एव्हाना जोशींना कळून चुकले होते. या प्रकरणात त्यांच्या स्वतःच्या पदरचे दोन हजार रुपये खर्च करून झाले होते. ते बुडीत खाती गेले आहेत हे स्पष्ट होते.
 या अकरा जणांपैकी एकालाही जमीन कसण्याची आणि कष्ट करण्याची इच्छा नव्हती. बिगरशेती उत्पन्नाचे साधन असतानाही भूमिहीन म्हणून नावे नोंदवून त्यांनी जमीन मिळवली होती. जोशींसारख्या शहरी माणसापुढे भूमिहीनतेचे करुण नाटक त्यांनी उत्तम वठवले होते; पण गावकऱ्यांसमोर त्यांचे नाटक चालत नव्हते.
 मुळात त्यांना स्वतः कष्ट करून जमीन कसायचीच नव्हती; पुढेमागे एखादा खरीददार सापडला तर त्या जमिनी विकून दोन पैसे करायचे एवढेच त्यांचे उद्दिष्ट होते. तसे केल्यानंतर पुन्हा नव्याने एखाद्या सरकारी योजनेत जमीन मिळवायला ते मोकळे होणार होते! ह्या कहाणीचा समारोप करताना जोशी लिहितात,

पण ह्यात त्यांचे कुठेच चुकत नव्हते. चुकत माझेच होते. बँकेच्या कर्जाचे प्रकरण करतानाच माझ्या लक्षात आले होते, की विहिरीचा खर्च करून, पाण्याची सोय करून, शेती करायची म्हटले, तर कोणतेही पीक काढले तरी बँकेच्या कर्जाची परतफेड यावज्जन्म शक्य नव्हती. दरवर्षी चांगले पीक येईल असा हिशेब केला, तरी खर्च फिटत नव्हता. ही काय गंमत आहे याचा उलगडा मला त्यावेळी झाला नव्हता. गावकऱ्यांना ते कळले होते, भूमिपुत्रांनाही ते कळले होते; पण ते मला सांगत नव्हते. हे सर्व समाजव्यवस्थेचे गुह्यतम गुह्य आणखां उग्र तपस्येने माझे मलाच शोधावे लागणार होते.
'तुमची सगळ्यांची जमिनीवर राहायला जायची तयारी झाली, म्हणजे मला निरोप द्या,' असे म्हणून मी भूमिपुत्रांचा निरोप घेतला. एक धडा शिकून. यापुढे लोकांचे भले करण्याचे प्रयत्न बंद. भिकेच्या आणि मदतीच्या प्रकल्पांतून गरिबीचा प्रश्न सुटत नाही. वर्षानुवर्षे गावागावातील गरिबी संपवण्याबद्दल जो मार्ग मनात शंकासुद्धा न आणता मी मानला होता, त्याबद्दलच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पुन्हा एकदा शून्यावर आलो होतो. स्वित्झर्लंडला परत जाण्याचा मोह मी कसा टाळला कुणास ठाऊक!

(अंगारमळा, पृष्ठ १४-५)

 ग्रामविकासाचे हे प्रयत्न चालू असतानाच दुसरीकडे जोशींची शेतीदेखील चालूच होती. भारतातील शेती बव्हंशी कोरडवाहू आहे; पण अशा कोरडवाहू शेतीतही पुरेसा पैसा गुंतवला, उपलब्ध तंत्रज्ञान वापरले, आपल्या शिक्षणाचा उपयोग करून चांगले व्यवस्थापन केले तर ती शेती फायदेशीर होऊ शकते का ह्याचा त्यांना शोध घ्यायचा होता. किंबहुना, शेतीत पडण्यामागे त्यांचा तोच खरा उद्देश होता. त्या दृष्टीने सतत काही ना काही नवे प्रयोग ते करत असत. शेतीतील कामाबद्दल जे काही वाचनात यायचे, कानावर पडायचे त्याचा अवलंब स्वतःच्या शेतीत करून बघत. कधी हे बियाणे वापर, कधी त्या कंपनीचे बियाणे घे; कधी हे खत, कधी ते औषध. कधी असे पाणी द्या, कधी तसे द्या. सारखे काहीतरी नवे करून बघायचे, आपला अनुभव हाच आपला गुरू मानायचा असे त्यांनी ठरवले होते.
 लौकर येणारे आणि रोख पैसे देऊ शकणारे पीक म्हणून खरिपाच्या पहिल्याच हंगामात जोशींनी खीरा जातीच्या काकडीचे पीक घेतले. तीन-एक महिन्यांत पाच-सहा पोती काकडी निघाली, ती अडत्याकडे पाठवून दिली. विक्रीचा खर्च वजा जाता १८३ रुपये मिळाले. शेतीतली ती पहिली कमाई. नाही म्हटले तरी जोशींना आनंद झाला. दुसऱ्या वेळीही असेच काहीतरी दीड-दोनशे रुपये आले. पण तिसऱ्या वेळी त्यांना वेगळाच अनुभव आला. ह्यावेळी त्यांनी लागवडीचे क्षेत्र वाढवले होते. दहा पोती काकडी आली, ती पुण्याला अडत्याकडे पाठवून दिली. तीन-चार दिवसांनी, आता यात निदान तीनशे रुपये तरी फायदा होईल या अपेक्षेने ते पुण्यातील अडत्याच्या (दलालाच्या) ऑफिसात गेले. जरा वेळाने तेथील कारकुनाने त्यांच्या हातात एक लिफाफा कोंबला आणि ३२ रुपयांची मागणी केली. "हे कसले पैसे द्यायचे?" त्यांनी आश्चर्याने विचारले.
 "लिफाफा उघडा म्हणजे कळेल." कारकुनाने उत्तर दिले.
 उभ्याउभ्याच जोशींनी लिफाफा उघडला व आतला कागद बाहेर काढला. त्यावर जो हिशेब खरडला होता, त्याचा सारांश होता : 'वाहतूक, हमाली, दलाली, वजनकाटा, मार्केट कमिटीचा चार्ज आणि मुख्यमंत्री फंडाला द्यायचे पैसे हे पकडून एकूण खर्च इतका इतका; काकडी विकून आलेले पैसे इतके इतके; तुमच्याकडून येणे रुपये ३२.'
 जोशींनी कपाळावर हात मारून घेतला. शेतावर तीन महिने राबून काढलेल्या काकडीचे बाजारमूल्य, माल तयार झाल्यापासून विकला जाईपर्यंतचा (पोस्ट-हार्वेस्ट) खर्च भरून निघेल इतकेदेखील नव्हते. ती तूट भरून काढायलाच खिशातले ३२ रुपये द्यावे लागणार होते! शेतकऱ्यांच्या परिभाषेत यालाच 'उलटी पट्टी' म्हणतात. बियाणे, मजुरी, खते, औषधे, पाणी वगैरे (प्री-हार्वेस्ट) खर्चाचा यात कुठे समावेशही नव्हता! जमिनीवरील इतर खर्च, बँकेचे व्याज, स्वतःच्या श्रमाचे मूल्य व इतर ओव्हरहेड्स यांची गोष्ट तर दूरच राहिली! या सर्व व्यवहारात बियाणे विकणारा, खते-औषधे विकणारा, टेम्पोवाला, दलाल, वजन करणारा मापारी, हमाल, मार्केट कमिटी आणि अगदी मुख्यमंत्री फंड या इतर सर्व घटकांना आपापला वाटा मिळाला होता; नागवला गेला होता तो फक्त मालाचा प्रत्यक्ष उत्पादक, म्हणजेच शेतकरी.
 सगळीच व्यवस्था (सिस्टिम) शेतकऱ्याच्या विरोधात काम करत होती. कुठल्याही विद्यापीठात न शिकवला जाणारा, किंवा कुठल्याही पुस्तकात न नोंदवलेला हा महत्त्वाचा धडा स्वतःचा घाम शेतात जिरवून जोशी शिकत होते.
 असाच दुसरा अनुभव होता परावलंबित्वाचा; बेभरवशी निसर्गावर शेतकरी किती अवलंबून असतो याचा. तो आला बटाट्याच्या पिकाबाबत. भामनेरच्या खोऱ्यात बटाट्याचे पीक मुबलक येते. बटाट्यासाठी चाकणची बाजारपेठ खप प्रसिद्ध आहे. 'तळेगाव बटाटा या नावाने जो बटाटा बाजारात विकला जातो, तो बराचसा ह्याच परिसरात तयार होतो. जोशींनी लावलेले सुरुवातीचे बटाट्याचे पीक उत्तम आले. सगळीकडे खूप कौतुक झाले. खेड येथील सरकारच्या बटाटा संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांनी मुद्दाम येऊन त्या शेतीची पाहणी केली. जोशी खूष झाले. शेतीवर आतापर्यंत गुंतवलेले चार लाख रुपये अशा किती हंगामांत सुटतील याची गणिते मांडू लागले. पुढच्या वेळी हौसेने पुन्हा बटाटा लावला. पण नेमका त्यावर्षी कसलातरी रोग आला आणि बटाट्याचे सगळे पीक नष्ट झाले! ही अस्मानी सुलतानी सर्वसामान्य भारतीय शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेली असते; पण जोशींना हा अनुभव नवाच होता. बऱ्याच वर्षांनी ह्या अनुभवाकडे वळून पाहताना जोशी म्हणाले,
 "मी बटाटा लावला होता ती जमीन आदली अनेक वर्षे पडीक होती व म्हणूनच केवळ पहिले पीक उत्तम आले होते! त्यात माझ्या प्रयत्नाचा भाग नगण्यच होता. माती, पाऊस अशा वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांवर आपला शतक घडले असेल हे सांगणे त्यालाही शक्य नसते. हळूहळू माझे शेतीतले सगळेच नियोजन अयशस्वी ठरू लागले."
 पण तरीही जेव्हा इतर शेतकऱ्यांबरोबर ते बाजारपेठेत वा चावडीवर गप्पा मारायला बसत तेव्हा बाकीच्या शेतकऱ्यांना मात्र नफा होतो आहे असे संभाषणात कानावर पडत असे. हे काय गौडबंगाल आहे त्यांना कळेना. एकदा त्यांनी इतर गावकऱ्यांना गप्पा मारता मारता विचारले,
 "मघापासून मी ऐकतोय, कोणी म्हणतात, यंदा ज्वारी चांगली दहा-बारा पोती आली, कोणी म्हणतात, इतका इतका मूग आला, इतका कांदा आला. म्हणजे सगळ्यांचंच एकूण चांगलं चाललेलं दिसतंय. मग मला हे समजत नाही की मी इतका शिकलेला असूनही आणि सगळा वेळ ह्या शेतीतच राबत असूनही मला का प्रत्येक वेळी तोटा येतोय? माझं नेमकं कुठे चुकतंय?"
 गप्पा संपल्यावर त्यांना बाजूला घेऊन एक म्हातारा सांगू लागला, “साहेब, हे सगळे लोक थापा मारताहेत. हे जर असं काही सगळ्यांसमोर बोलले नाहीत, तर ह्यांच्या घरच्या मुलींची लग्नं होणार कशी? तुमचा अनुभव हाच खरा अनुभव आहे. आपण सगळेच शेतकरी तोट्यातच आहोत."
 शेतकऱ्यांची आत्मवंचना किती भयाण आहे हे त्यादिवशी जोशींच्या लक्षात आले. सरकार शेतकऱ्याकडून लेव्हीची ज्वारी फक्त सत्तर पैसे किलो दराने खरेदी करत असतानाही, हे शेतकरी दीड रुपये किलो दराने खुल्या बाजारातन ज्वारी खरेदी करतात आणि ती बैलगाडीवर लादून सरकारी गोदामात आपली अपुरी भरलेली लेव्ही पूर्ण करायला जातात तेव्हा मात्र बँडबाजा लावून, वाजतगाजत जातात, ह्या मुर्खपणाचे कोडे त्यांना उलगडले. मुळात फारच थोडे शेतकरी आपला नेमका उत्पादनखर्च काढतात, त्यात काय काय पकडायचे ते खूपदा त्यांच्या लक्षातही येत नाही हा एक भाग होताच; पण शिवाय, आपली इभ्रत कायम राहावी म्हणून इतरांपुढे करायचे नाटकही त्यात होते.
 शेतीमालावर प्रक्रिया केल्याशिवाय त्याची बाजारातील किंमत वाढणार नाही हे त्यांच्यातील अर्थतज्ज्ञाला सहज समजण्यासारखे होते. त्या दृष्टीनेही जोशींनी वेगवेगळे प्रयोग करून बघितले. चाकण परिसरात पूर्वी कोणीतरी बटाट्याचे वेफर्स करायचा छोटा कारखाना सुरू केला होता, पण लौकरच तो बंद पडला होता. त्याचे आपण पुनरुज्जीवन करू शकू का, किंवा तसाच एखादा कारखाना आपण उत्तमप्रकारे नव्याने उभारू शकू का, ह्याचा त्यांनी खोलात जाऊन विचार केला होता. बरीच आकडेमोड केली होती. त्यासाठी त्यांनी एकदा स्वित्झर्लंडला भेटही दिली होती. शेंगदाण्यावर आधारित प्रक्रियाउद्योग सुरू करण्याचा आणि चांगल्या दर्थ्यांचे शेंगदाणे पिकवून ते परदेशी निर्यात करायचा प्रयत्नही त्यांनी केला होता. कारण त्या भागात भुईमुगाचे पीक भरपूर यायचे. ह्या दोन्ही पुढाकारांबद्दल मागील प्रकरणात लिहिलेच आहे.
 अशा वेगवेगळ्या प्रयोगांसाठी जोशींनी स्वतःची सारी पुंजी पणाला लावली होती. युपीयुमधील नोकरी सोडून ते भारतात परतले तेव्हा त्यांना पाच-सहा लाख रुपये फंड, ग्रॅच्युइटी वगैरेचे मिळाले होते, ते सर्व घर आणि शेती घेण्यात आणि नंतर ती शेती सुधारण्यात जवळजवळ संपले. त्याशिवाय त्यांनी कर्जही काढले होते. 'इथे शेती करणं म्हणजे वाळूत मुतल्यासारखं आहे. सगळे पैसे संपवून लौकरच हा भिकारी बनणार,' असे एकदोघांनी म्हटले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करून जोशींनी आपले काम अगदी निष्ठेने चालू ठेवले. जोशी सांगत होते,

 "हा एवढा सगळा पैसा शेतीत गुंतवण्यामागे आणखी एक विचार होता – तो म्हणजे शेतीतून बाहेर पडायचा आपल्याला कधीच मोह होऊ नये!"
 हे सारे करत असताना भोवतालच्या इतर स्थानिक मंडळींशी जोशींचे संबंध कसे होते? सुरुवातीला ते अर्थातच अगदी परके होते, पण जसजसे दिवस जात होते, तसतसे त्यांचे स्थानिक परिचितांचे वर्तुळ वाढू लागले.
 ७ ऑगस्ट २०१५ रोजी सुरेशचंद्र म्हात्रे ह्यांच्या सौजन्याने चाकण येथे एक सुखद योग घडून आला. म्हाळुंगे येथील एक हॉटेलमालक श्याम पवार, चाकणमधील एक जुने डॉक्टर अविनाश अरगडे, मांडव कॉट्रॅक्टर गोपालशेठ मारुती जगनाडे (संत तुकारामांच्या अभंगांचे लेखनिक म्हणून ज्यांनी एकेकाळी काम केले होते त्या संताजी महाराजांचे हे वंशज), राष्ट्र सेवा दलाचे शाखाप्रमुख रामराव मिंडे, ऑइल इंजिन दुरुस्ती करणारे मधुकर रघुनाथ शेटे, आप्पासाहेब ऊर्फ प्रल्हाद रंगनाथ देशमुख, मामा शिंदे वगैरे जोशींच्या त्यावेळच्या काही निवडक सहकाऱ्यांबरोबर त्यादिवशी प्रस्तुत लेखकाला मनसोक्त गप्पा मारता आल्या आणि त्यावेळचे जोशींच्या सहकारी वर्तुळाचे चित्र डोळ्यापुढे आपोआपच उभे राहत गेले.
 आप्पासाहेब ऊर्फ प्रल्हाद रंगनाथ देशमुख आणि बाबुभाई शहा यांच्यापासून बहुधा ह्या स्थानिक वर्तुळाची सुरुवात झाली. ह्या दोघांचीही त्याकाळी चाकण परिसरात सायकल दुरुस्त करायची दुकाने होती. ग्रामीण भागात त्यावेळी सायकल हेच वाहतुकीचे प्रमुख साधन होते. दोघांच्याही व्यावसायिक जीवनाची ती सुरुवात होती. अप्पा देशमुखांनी पुढे डिझेल पंपाची निर्मिती व दुरुस्ती करायचे केंद्र काढले. ते स्वतः कुशल फिटर होते व देशमुख फिटर म्हणूनच त्यांना सगळे हाक मारत. जोशींच्या शेतातील विहिरीवर बसवलेला पहिला डिझेल पंप त्यांनी देशमुखांकडूनच खरेदी केला होता. पुढे फॅब्रिकेशनचा व्यवसायदेखील ते उत्तम करू लागले. शेतातील गोबर गॅस प्लांट, शेड हे सारेही त्यांनीच उभारून दिले होते. बाबुभाईंनीतर पुढे आणखी व्यावसायिक प्रगती केली. एक पेट्रोल पंप काढला आणि मोटर गाड्यांचे सर्व्हिसिंग सेंटरही काढले. शेतीमालाच्या साठवणुकीसाठी त्यांनी एक हिमराज कोल्ड स्टोरेजदेखील काढले. पुढे जोशींनी बटाट्याचे पीक काढायला सुरुवात केली तेव्हा आपल्या शेतातले बटाटे विक्री होईस्तोवर ते हिमराज कोल्ड स्टोरेजमध्येच ठेवत असत.
 अशाप्रकारेच पुढे एकेक करत उपरोक्त सगळ्या स्थानिक मंडळींशी जोशींचे संबंध जडले. सुरुवातीला ते व्यावसायिक संबंध होते, पण पुढे त्याचे स्नेहात रूपांतर झाले. ही मंडळी नंतर त्यांच्या शेतकरी आंदोलनातही यथाशक्ति सामील झाली. जगनाडे यांनी पंढरपूर येथील मेळाव्याचा तसेच परभणी अधिवेशनाच्या वेळचा सगळा मांडव अत्यल्प खर्चात उभारून दिला होता. श्याम पवार, डॉ. अविनाश अरगडे वगैरे सगळेही आंदोलनात जमेल तसा सहयोग देत राहिले. त्र्याण्णव वर्षांचे मधुकर शेटे प्रस्तुत लेखकाला सांगत होते,
 "आम्ही तशी आपापला छोटा व्यवसाय करणारी माणसं. चळवळ वगैरे आमचं क्षेत्र कधीच नव्हतं. पण जोशीसाहेबांचा प्रभाव आमच्यावर असा काही पडला, की आम्ही आपोआपच त्यांच्या आंदोलनात खेचले गेलो. खरं तर पूर्वी आम्हाला शेतकऱ्यांबद्दल काहीच प्रेम वगैरे नव्हतं. आमचं गि-हाईक म्हणूनच आम्ही या शेतकऱ्यांकडे बघायचो; खूपदा त्यांच्याशी भांडायचोही. पण जोशीसाहेबांमुळे आमची त्यांच्याकडे बघायची सगळी दृष्टीच बदलून गेला. त्यांच्यावर किती अन्याय होत आहे याची आम्हाला प्रथमच जाणीव झाली. मी स्वतः तीन वेळा शेतकरी आंदोलनात तुरुंगात गेलो. दोनदा येरवडा तुरुंगात व एकदा औरंगाबाद तुरुंगात."

 बाबुभाई शहा यांनी जोशींची दुसऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर ओळख करून दिली. शेतीच्या काही कामासाठी जोशी शहांकडे गेले होते. त्यांच्या चाकणमधील कार्यालयात. काम झाल्यावर ते जाण्यासाठी उठले तशी, "थांबा दोन मिनिटं. तुमची एका भल्या माणसाबरोबर ओळख करून देतो," असे म्हणत शहांनी त्यांना थांबवून घेतले. तेवढ्यातच हे भले गृहस्थ त्या दुकानात आले. कदाचित जोशींबरोबर परिचय करून देण्याच्या उद्देशाने शहांनीच त्यांना तिथे बोलावून घेतले असेल. ते होते दत्तात्रेय भिकोबा ऊर्फ मामा शिंदे. त्यांनी जोशींच्या चाकणमधील सुरुवातीच्या दिवसांत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्याविषयी इथे थोडे विस्ताराने लिहायला हवे.
 दुसरे सानेगुरुजी' म्हणूनच चाकण परिसरात आजही मामा ओळखले जातात. हे साम्य केवळ दिसण्यापुरते नव्हते, तर वृत्तीतही होते. राष्ट्र सेवा दलाचे ते प्रथमपासून निष्ठावान सेवक. १९४७ साली देश स्वतंत्र झाला तेव्हा सर्व पोलीस स्टेशनांनी आपापल्या आवारात झेंडावंदन करावे असे सरकारचे आदेश निघाले. पण चाकण पोलिसांना झेंडावंदन कसे करतात तेच ठाऊक नव्हते. मामा राष्ट्र सेवा दलाची शाखा गावात चालवतात हे मात्र त्यांना ठाऊक होते. त्यांनी मामांनाच पोलीस ठाण्यात पाचारण केले. खांब उभारणे, झेंड्याला दोरी लावून तो वर सरकवणे व मग तो फडकवणे या सगळ्याची रंगीत तालीम केली आणि मग १५ ऑगस्टला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांनी पहिले झेंडावंदन केले.
 बाबुभाई पक्के काँग्रेसवाले असूनही मामांना इतके मानतात याचे जोशींना कौतुक वाटले. विरोधी पक्षातील लोकांनाही आपले मोठेपण मान्य असणे हे आपल्याकडे तसे दुर्मिळच. लौकरच जोशींना कळले, की चाकणमध्ये सर्वच नेत्यांना मामांचे मोठेपण मान्य आहे.

 जोशींनी शेतीला सुरुवात केली त्याच महिन्यात, २३ जानेवारी १९७७ रोजी, दिल्लीत एक अगदी अनपेक्षित घटना घडली. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना इंदिरा गांधींनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. ठरल्याप्रमाणे २० मार्चच्या संध्याकाळी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसचा अभूतपूर्व असा पराभव करून केंद्रात जनता पक्षाचे राज्य आले. काँग्रेसेतर सरकार केंद्रात सत्तेवर यायचा हा देशाच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग. जोशी तसे प्रत्यक्ष राजकारणापासून दूरच होते, पण भोवताली काय चालले आहे हे बारकाईने पाहत असत. आणीबाणीची दहशत असल्याने लोक तसे शांत आहेत हे ठाऊक असले, तरी विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबणे, त्यांचा छळ करणे, विशेषतः सक्तीची नसबंदी वगैरेबाबत लोकांत खूप असंतोष आहे हे त्यांनी हेरले होते. इंदिराजी हरल्या ह्याचा त्यांनाही इतरांप्रमाणेच आनंद झाला होता. त्या आधीच्या १८ महिन्यांत आणीबाणीमुळे राजकीय मंचावर सारे कसे शांत शांत होते. आता एकदम सगळीकडे राजकारणाची चर्चा सुरू झाली. लोक जणू आपल्या दबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देत होते.
 त्यानंतर पुढल्याच वर्षी, मार्च १९७८मध्ये, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याचे जाहीर झाले. मामा खेड मतदारसंघातून जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुका लढवणार व जिंकणार ह्याविषयी सगळ्या चाकणची खात्री होती. पण अचानक कुठेतरी चावी फिरली आणि जनता पक्षाने मामा शिंदे यांना तिकीट नाकारले. त्यांना मानणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शेवटी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचे ठरवले. त्यांचे चिन्ह होते सायकल.
 आपल्या लढतीची पूर्वतयारी साधारण ७८च्या जानेवारी महिन्यातच मामांनी सुरू केली व त्याचवेळी जोशी आपण होऊन त्यांना म्हणाले, "मामा, ह्या संपूर्ण प्रचारात मी माझ्या डिझेल भरलेल्या जीप गाडीसह तुमच्या सेवेला हजर राहीन. तुम्ही जिथे जिथे जाल, तिथे तिथे मी तुमच्याबरोबर येईन." मामांना ह्या अनपेक्षित ऑफरचे खूप अप्रूप वाटले. गाडी, डिझेल आणि ड्रायव्हर ह्या सगळ्याचीच एकदम सोय झाली होती! शिवाय त्या काळात जोशींच्या भोवतीचे आयएएसचे व स्वित्झर्लंडचे वलय कायम होते. गावात कुठेही गेले तरी ते आपली छाप हमखास पाडत. अशी व्यक्ती दिमतीला असणे ही मामांच्या दृष्टीने मोठीच जमेची बाजू होती.
 जोशी म्हणतात,
 "मामांच्या निवडणूक प्रचाराच्या काळात मी रोज माझी मोडकीतोडकी जीप गाडी घेऊन, त्यात डिझेल भरून, मामांच्या घरासमोर उभा राहत असे. आमची निघण्याची वेळ अगदी पक्की ठरलेली असे. ते निवडून आले, तर त्यांच्या मतदारसंघात काय काय करता येईल याची आखणी आम्ही प्रवासात करत असू."
 अपक्ष असूनही मामांनी चांगलीच लढत दिली. तालुक्यातील प्रत्येक गावात 'ही सायकल कोणाची, गरीब आपल्या मामांची' ही घोषणा दुमदुमत होती. ते निवडून येतील असे जोशींसकट सगळ्यांनाच वाटले होते, पण प्रत्यक्षात त्यांना सुमारे १२.००० मते पडली व आणीबाणीची पार्श्वभूमी असतानाही त्यांच्यापेक्षा दुप्पट म्हणजे २३,००० मते मिळवून काँग्रेसचे राम जनार्दन कांडगे निवडून आले. तसे व्यक्तिशः तेही मामांना गुरुस्थानी मानत. लोकभावना ओळखण्यात आपण कसे चुकतो व प्रत्यक्षात निवडणुकांची गणिते किती वेगळी असतात याची जोशींना ह्या काळात थोडीफार जाणीव झाली.

 अर्थात, जोशींच्या दृष्टीने निवडणुकीतील हारजीत तशी कमी महत्वाची होती. मामांच्या प्रचाराच्या पलीकडे जाऊन काहीतरी साधायचे त्यांचे उद्दिष्ट होते. किंबहुना ते उद्दिष्ट समोर ठेवूनच ते ह्या प्रचारकार्यात सामील झाले होते. मतदारसंघातील जवळ जवळ प्रत्येक गावात ते गेले. शेतकरी प्रश्न समजून घेण्यासाठी व पुढे सोडवण्याच्या दृष्टीने उपयुक्त असे संपर्क जोशी साधत होते. मामांचे भाषण चालू असताना मागे उभे राहून वा गर्दीत मिसळून ते सगळे निरखून पाहत. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव, अपेक्षा व अडचणी ऐकून घेत. 'हा माणूस इतर शहरी सुशिक्षित लोकांपेक्षा वेगळा आहे' असे त्या भागातील शेतकऱ्यांच्या मनावर ठसू लागले. त्यावेळी मामा म्हणत, "आम्ही राजकारणी चाकणहून दिल्लीला जाण्यासाठी धडपडतो आणि शरद जोशी मात्र परदेशातून येतात आणि चाकणहून टोकाच्या वांद्रे गावाला जाण्याचा ध्यास धरतात."
 जोशी म्हणतात, “या त्यांच्या शेऱ्यामध्ये माझ्या पुढच्या सगळ्या शेतकरी चळवळीच्या इतिहासाचे बीज आहे."

 पुढे कांदा आंदोलनात मामा शिंदे सर्व ताकदीनिशी सामील झाले. ते स्वतः आयुष्यभर समाजवादी पक्षाचे काम करत आलेले; त्या पक्षाच्या विचारसरणीला जोशी यांचा अगदी मुलभूत असा विरोध. तरीही दोघे एकत्र काम कसे करू शकतात याचे अनेकांना आश्चर्य वाटे. पण "शरद जोशींचा विचार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार आहे व आजवर तो तसा कोणीही मांडला नव्हता. अशा वेळी त्यांना साथ देणं हे माझं एक शेतकरी म्हणून कर्तव्य आहे," असे मामा म्हणत. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय नेते एसेम जोशी व नानासाहेब गोरे यांनी आणि शरद जोशी यांनी व्यापक शेतकरीहित विचारात घेऊन एकत्रितपणे काही कृती करावी अशी त्यांची फार इच्छा होती व त्यादृष्टीने त्यांनी खूपदा प्रयत्नही केले होते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे शेतकरी संघटनेच्या चाकणमधील एक-दोन सभांना नानासाहेब गोरे व जॉर्ज फर्नांडीस हजर राहिले होते. पण जोशींबरोबर समाजवाद्यांचे, किंवा खरे तर कुठल्याच पक्षाचे, फारसे कधी जुळले नाही.

 प्रचारसभांच्या धामधुमीतून मोकळे झाल्यावर एप्रिल १९७८पासून जोशी पुन्हा एकदा आपल्या शेतीवर लक्ष केंद्रित करू लागले. एकूण परिस्थिती आता खूप गंभीर झाली होती. आर्थिक टंचाई होतीच, काही कौटुंबिक ताणतणावही होते. जोशी आपल्या शेतीतील प्रयोगांत पूर्ण रमले असतानाच लीलाताईंनी गुलाबाची रोपे विकणारी रोपवाटिका सुरू केली होती. मुख्य म्हणजे स्वतःची एक पोल्ट्री सुरू केली होती. काहीतरी स्वतंत्र व्यवसाय उभा करण्याची त्यांची जिद्द होती. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण त्यांनी खडकी येथील शासकीय कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्रातून घेतले होते. खूप मनापासून त्या हा व्यवसाय करत होत्या. अंड्यांचे आहारातील वाढते महत्त्व म्हणजे मोठीच व्यावसायिक संधी होती. पुणे-तळेगाव हे कुक्कुटपालनाचे एक मोठे केंद्र म्हणून विकसित होत होते. सुरुवात त्यांनी मृद्गंध बंगल्यातूनच केली होती, पण नंतर व्याप वाढू लागल्यावर व त्या निवासी जागेत व्यवसाय वाढवणे शक्य नसल्याने त्यांनी कोंबड्यांचे सगळे पिंजरे अंगारमळ्यात नेले. चाकणच्या अप्पा देशमुखांनीच हे पिंजरे तयार केले होते व ते ठेवण्यासाठी पत्र्याच्या शेडदेखील त्यांनीच उभारून दिल्या होत्या.

 पण दुर्दैवाने प्रथमपासूनच पोल्ट्रीच्या या व्यवसायात अनेक अडचणी येत गेल्या. एकदा वीज गेल्यामुळे शीतगृह बंद पडले व त्यात साठवून ठेवलेला माल नष्ट झाला. शीतगृहमालकाने वस्तुरूपात थोडी भरपाई दिली, पण तरीही नुकसान बरेच झाले. एकदा मुंगुसांनी कसातरी पिंजऱ्यात प्रवेश केला आणि दोन-अडीच हजार कोंबड्यांपैकी पाचेकशे खाऊन फस्त केल्या. असे एकापाठोपाठ एक धक्के बसत गेले. दरम्यान कर्जाचा बोजा वाढतच चालला. शेतीतही कर्ज साठत होते आणि पोल्ट्रीतही साठत होते.

 साधारण ह्याच सुमाराची एक घटना. जोशी यांच्या वैचारिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी त्या दिवशी गाठला.
 पुण्यातील पाषाण विभाग, आणि विशेषतः आज ज्याला नेकलेस रोड म्हणतात तो त्यातला भाग, त्या काळी आत्तापेक्षाही अधिक निवांत होता. स्वच्छ रस्ते, ओळीनी लावलेले वृक्ष, मागे दिसणाऱ्या डोंगररांगा. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, डीआरडीओ यांसारख्या काही नामांकित संस्थांची भव्य आवारे इथेच आहेत. त्यांच्याआधीच लागते सेंट जोसेफ शाळा. शाळेच्या प्रशस्त आवारात जोशींची गाडी शिरली, तेव्हा दुपारचे साधारण तीन वाजले होते. सोबत लीलाताई आणि श्रेया व गौरीही होत्या. दोघी ह्याच शाळेत शिकत होत्या आणि शाळेच्याच वार्षिक स्नेहसंमेलनासाठी म्हणून जोशी कुटुंब तिथे आले होते. ही शाळा मुलींची. त्याच मिशनची मुलांसाठीची शाळा, लॉयोला हायस्कूल, शेजारीच आहे.
 ख्रिस्ती मिशनऱ्यांनी कोणे एके काळी गरीब विद्यार्थ्यांसाठी म्हणून अनेक देशांत शाळा सुरू केल्या. जगभरातून देणग्या मिळवून उत्कृष्ट इमारती उभारल्या. ग्रंथालये, प्रयोगशाळा, क्रीडांगणे, वसतिगृहे, भरपूर मोकळी जागा यांची तजवीज केली. देशोदेशींच्या मिशनरी स्त्रिया व पुरुष अतिशय कळकळीने व सेवावृत्तीने शिकवण्याचे काम करीत. साहजिकच बघता बघता या शाळांचा खूप दर्जेदार म्हणून सर्वत्र लौकिक पसरला. पण म्हणूनच अहमहमिकेने अभिजनवर्ग आपली मुले इथेच घालू लागला आणि त्यामुळे मूळ गरिबांसाठीच्या या शाळा काळाच्या ओघात उच्चभ्रूच्या शाळा म्हणूनच स्थिरावल्या. विशिष्ट परिस्थितीमुळे संस्थांना मूळ उद्देशापासून अगदी वेगळे स्वरूप कसे प्राप्त होत जाते ह्याचे हे एक ठळक उदाहरण आहे.
 शाळेच्या आवारात पार्किंगसाठी भरपूर जागा असूनही गाड्यांची गचडी झाली होती. इथल्या बहतेक विद्यार्थिनी गाडीवाल्या! त्यात पुन्हा आज खास दिवस. कशीबशी आपली गाडी पार्क करून जोशी कुटुंब सजवलेल्या मांडवात शिरले. सगळीकडे अगदी सणासुदीचे वातावरण होते. सगळ्या मुली फॅशनेबल कपड्यांत आलेल्या. त्यांचे पालक तसेच नटूनथटून आलेले. त्यांनी तसे यावे, हा आग्रह प्रत्येक मुलीचा असायचाच! आपल्या आईवडलांमुळे इतर मुलींसमोर आपली 'पोझिशन डाऊन' होऊ नये यासाठीची ही त्यांची खबरदारी! सगळीकडे पताका, झिरमिळ्या, फुगे. नाच, गाणी, करमणुकीचे कार्यक्रम. बाजूला ओळीने उभारलेले वेगवेगळे खाद्यपदार्थ व इतर वस्तू विकणाऱ्यांचे स्टॉल्स. त्यांच्याभोवती उडालेली मुलींची झुंबड. आपल्याला हवे ते विकत घेण्यासाठी त्या पर्समधून वा खिशातून पन्नास शंभरच्या नोटा अगदी सहज काढत होत्या. त्यांच्या गोंगाटाने आणि हसण्याखिदळण्याने, इकडेतिकडे बागडण्याने तो सगळा परिसर भरून गेला होता. एरव्ही अशा शाळांमधली शिस्त मोठी कडक. पण आज तिथल्या शिक्षकांनी मुलींना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले. वातावरणात उत्साह, उल्हास दाटलेला. पालकही गप्पांमध्ये रंगलेले.
 जोशी स्वतः त्या सगळ्यापासून अलिप्त होते, नुसतेच आजूबाजूला पाहत होते. तसे सरकारी नोकरीत व परदेशात त्यांनी वैभव भरपूर उपभोगले होते; पैशाचे त्यांना अप्रूप नव्हते. पण आज मात्र त्यांना हे सारे बघताना वैषम्य वाटत होते. वाटले, 'ह्या सगळ्या मंडळींमध्ये बहुधा आपणच सर्वांत गरीब असू. आपल्या मुली म्हणजे श्रीमंत शाळेतल्या गरीब मुली!'
 त्यांना असे वाटण्याचे बरेच प्रसंग गेल्या काही दिवसांत आले होते. नुकतेच मोठ्या श्रेयाला काश्मीरला ट्रीपला जायचे होते, वर्गातल्या सगळ्याच मुली जाणार होत्या. पण त्यासाठी लागणारे पाचशे रुपये त्यावेळी जोशींकडे नव्हते. 'तुला यंदा ट्रीपला पाठवणं नाही झेपणार मला' असे तिला सांगताना त्यांच्या हृदयाला जणू सहस्र इंगळ्या डसल्या होत्या. स्वित्झर्लंडमध्ये असताना असा प्रसंग कधीच आला नव्हता; मुलींची प्रत्येक हौस पुरी करणे तिथल्या पगारात त्यांना सहज शक्य झाले होते.
 वडलांच्या हट्टामुळे मुलींना भारतात यावे लागले होते आणि मग त्यांचे सगळे जीवनच एकदम बदलून गेले होते. इथली शाळा, शिक्षक, मैत्रिणी, शेजारी, हवापाणी, रस्ते, रहदारी, इथले एकूण सामाजिक वातावरण सगळे तिथल्यापेक्षा खूप वेगळे होते. बर्नमध्ये शिकत असताना दोन वर्षांपूर्वीच श्रेयाने कोपर्निकसवर फ्रेंचमध्ये निबंध लिहिला होता; इथल्या शाळेत मात्र तिला गमभन गिरवायला लागले होते! होणाऱ्या खर्चावरून, वाढणाऱ्या कर्जावरून घरी खूपदा भांडणे व्हायची. तशा दोघीही मुली समजूतदार होत्या, आईवडलांची परिस्थिती त्यांना समजत होती. शक्यतो त्या काही मागतच नसत. त्यांच्या चेहऱ्यावर अकालीच उमटलेल्या त्या गांभीर्याच्या छटा जोशींना अधिकच बोचायच्या. घरातल्या प्रत्येकालाच खरे तर वातावरणातला तणाव जाणवत होता. आपला अनेक वर्षे कष्ट घेऊन केलेला स्टॅम्प्सचा संग्रहही त्यांना विकावा लागला होता व ते तर जोशींना खूपच जिव्हारी लागले होते. लीलाताईंची स्थिती काही वेगळी नव्हती. त्याही बदललेल्या प्रापंचिक परिस्थितीशी जुळवून घ्यायचा आटोकाट प्रयत्न करत होत्या. पण सगळे तसे जडच होते. आपल्या तत्कालीन मानसिकतेचे नेमके वर्णन जोशींनी केले आहे. ते लिहितात :

तिच्या मनात खरोखरच काय चाललं होतं कोण जाणे! माझी ही उडी खरं म्हटलं तर तिच्यावरही अन्यायच होता. आयएएस पास झालेल्या, हुशार, कर्तबगार समजल्या जाणाऱ्या नवऱ्याच्या हाती तिने हात दिला, तो सुखासमाधानाच्या चौकोनी कुटुंबाच्या राज्यात चिरकाल राज्य करण्यासाठी. पुढे हे असं काही घडेल याची तिला तरी काय कल्पना होती? ... झोपी जाताना चिंतांची तोटी बंद करून झोपी जायचं, ही माझी फार जुनी कला आहे. झोप लागताना सगळ्या चिंतांचा आणि तणावांचा काही त्रास व्हायचा नाही. रात्री अडीचतीन वाजता मात्र झोप खाडकन खुले. पुढे झोपणंच अशक्य होई. कपाळाला हात लावून मी स्वतःलाच विचारी, 'मी पाहतो आहे ते खरं की स्वप्न?' आसपास शांतपणे झोपलेल्या लीला, श्रेया, गौरीकडे पाहून पोटात गलबलून यायचं. यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा मला काय अधिकार होता?

(अंगारमळा, पृष्ठ ८-१०)

  शाळेतील तो कार्यक्रम संपवून घरी परतेस्तोवर रात्र झाली होती. तिथेच इतके सगळे खाणेपिणे झाले होते, की आता घरी गेल्यावर जेवायचा काही प्रश्नच नव्हता. आज कधी नव्हे ती मुलींची बडबड सारखी चालू होती; संध्याकाळच्या आठवणी काढून त्या सारख्या खिदळत होत्या. खूप दिवसांनी त्यांचा असा चिवचिवाट ऐकताना, त्यांचे असे फुललेले चेहरे पाहताना आईवडलांनाही खुप आनंद होत होता. जोशींना तर वाटत होते, ह्यांना इतक्या आनंदात असलेले आपण भारतात परतल्यावर आज प्रथमच पाहतो आहोत! आज इतक्या दिवसांनी प्रथमच त्यांना एक वडील म्हणून इतके समाधान वाटत होते.
  एका तृप्तीतच ते पलंगावर आडवे झाले, शेजारचा बेडलँप मालवला. जरा वेळ त्यांना पेंग आली. पण मग अचानक खडबडन जाग आल्यासारखे झाले. डोळ्यासमोर कालची ती लहान मुलगी उभी राहिली. शेतमजुराची मुलगी. अलीकडे शेतीच्या कामामुळे त्यांना खूपदा आंबेठाणला अंगारमळ्यात रात्रीही मुक्काम करावा लागे. तिथल्या त्या छोट्या तकलादू घरात. घरासमोरच्या पडवीत आपल्या शेतावर काम करणाऱ्या शेतमजुरांच्या मुलांसाठी ते रात्री सगळी कामे उरकल्यावर शिकवणी घेत. त्यांना लिहायला वाचायला शिकवत. खरेतर दिवसभराच्या श्रमांमुळे ते तोवर अगदी गळून गेलेले असत, पण तरीही ह्या मुलांनी शिकले पाहिजे असे त्यांना खूप वाटे. म्हणूनच त्यांची ही धडपड असे. त्या मुलीच्या हातात पाटी व पेन्सील होती. जोशींनी भिंतीवरच्या फळ्यावर काढलेली अक्षरे ती आपल्या पाटीवर अलगद लिहीत होती, पुन्हा पुन्हा गिरवत होती. तिची एकाग्रता, तन्मयता, शिकण्याची हौस ह्या सगळ्याचे प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. ते पाहून जोशींना अगदी गहिवरून आले. खूप वेळ ते तिच्याकडे रोखून पाहत होते.
  आत्ता पुन्हा एकदा तिचा तो चेहरा त्यांच्या डोळ्यांपुढे उभा राहिला. बघता बघता मनात विचारचक्र फिरू लागले. आंबेठाणमधले ते शेतमजुरांचे जग आणि इथले जग यांची मन तुलना करू लागले.

  इथली गुटगुटीत, गोरीगोमटी, नवेकोरे कपडे घातलेली, बोर्नव्हीटा-हॉर्लिक्सच्या जाहिरातीतल्यासारखी दिसणारी गोंडस मुले आणि तिथली रोगजर्जर, किडकिडीत, खरजेने भरलेली, ढगळ फाटकेतुटके कपडे घातलेली मुले.

  इथली ती सेंट जोसेफसारखी भव्य शाळा आणि तिथली ती अर्धमोडल्या भिंतींची, गळकी, एकमास्तरी चावडीवरची शाळा.

 इथल्या शाळेतला तो मोठा थोरला स्विमिंग पूल आणि तिथल्या कोरड्या पडलेल्या विहिरी.
 इथला तो शाळेसमोरचा रस्ता; विद्यापीठ चौकापासून थेट एनडीएपर्यंत गेलेला वीसएक किलोमीटरचा रस्ता. गेल्याच वर्षी केवळ एक दिवसाकरिता राष्ट्रपती येणार होते, म्हणून तो उत्तम असतानाही पुन्हा एकदा डांबर ओतून, काही लाख रुपये खर्चुन अधिक गुळगुळीत करण्यात आला होता. आणि गावातला तो दहा-बारा वर्षांपूर्वी दुष्काळाच्या वेळी श्रमदानाने बांधलेला खडीचा कच्चा रस्ता; ज्याच्यावरून चालताना घोटे बुडतील इतका चिखल प्रत्येक मोठ्या पावसानंतर हमखास साचायचा.
 वाटले, पुणे आणि आंबेठाण म्हणजे जणू दोन वेगवेगळे देश आहेत – एकमेकांपासून इतके वेगळे, की त्यांच्यात काही नातेच नसावे.
 स्वित्झर्लंडसारख्या अत्यंत प्रगत देशात राहून भारतात परतल्यावर आपला देश आणि तो देश यांच्यातील तफावत किती प्रचंड आहे, याची जोशींना कल्पना होतीच, पण आंबेठाणसारख्या ग्रामीण भागात गेले वर्षभर शेती केल्यानंतर, तिथली परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर, जोशींच्या लक्षात आले, की पुण्यासारखा शहरी भारत आणि तिथून अवघ्या चाळीस किलोमीटरवरचा आंबेठाणसारखा ग्रामीण भारत यांच्यातील दरी ही स्वित्झर्लंड आणि भारत यांच्यातल्या दरीपेक्षाही कितीतरी जास्त भीषण आहे.
 झेंडा एकच आहे, राष्ट्रपती एकच आहेत, राष्ट्रगीत एकच आहे - वरवरच्या खुणा सगळ्या एकच आहेत; परंतु आर्थिकदृष्ट्या ह्या देशाचे दोन भाग पडले आहेत. एक भाग हा दुसऱ्या भागाच्या शोषणावरच जगतो आहे, आणि सतत जास्तीतजास्त शोषण करत चालला आहे आणि दुसऱ्या भागाचे मात्र शोषणच होत आहे.
 शोषक म्हणजे 'इंडिया' आणि शोषित म्हणजे 'भारत'.

 'इंडिया' आणि 'भारत' यांच्यातील या जमीनअस्मानाच्या फरकाचे मूळ कारणही त्यांच्या लक्षात आले होते. किंबहुना, ते सतत मनात सलतच होते. ते होते त्यांची आणि त्यांच्यासारख्या सर्वच शेतकऱ्यांची नुकसानीतली शेती. महिन्यापूर्वीच त्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेला कांदा विकला होता. अवघ्या २० रुपये क्विटल या भावाने. त्यांच्या चारपाच महिन्यांच्या घामाचा बाजारपेठेतला भाव तेवढाच होता-२० पैसे किलो! आणि इथल्या आजच्या समारंभात तर केवळ खाण्यापिण्यावर शंभराची नोट उडाली होती!
 तसे पाहिले तर भारतातल्या आत्यंतिक विषमतेची असली मांडणी त्यांना अपरिचित नव्हती. कम्युनिस्ट विचारवंत ती वर्षानुवर्षे करत आले होते. मुंबईत मलबारहिलवर १९६५च्या सुमारास जेव्हा उषाकिरण ही भारतातील पहिली सव्वीस मजली गगनचुंबी इमारत बांधली गेली, तेव्हा ते मुंबईतच नोकरी करत होते आणि उषाकिरण बिल्डिंग आणि शेजारीच मलबारहिलच्या डोंगरउतारावर असलेल्या झोपड्या ह्यांची एकत्रित छायाचित्रे अनेक ठिकाणी प्रकाशित झालेली त्यांनी पाहिली होती. पण जोशींना त्यावेळी तो केवळ एक 'प्रचार' (प्रपोगंडा) वाटला होता. त्यानंतर कोल्हापूर येथे एक वर्ष शिकवत असताना सिडनममधले आपले सहाध्यायी आणि कोल्हापूरमधले आपले विद्यार्थी यांच्यातील फरकही त्यांनी बघितला होता. पण त्यावेळीही ते द्वंद्व त्यांच्या मनाला तितकेसे भिडले नव्हते; किंबहुना त्यांच्यात काही द्वंद्व आहे हे बुद्धीला तितकेसे पटलेही नव्हते.
 याचे कारण त्यावेळी ते स्वतः त्या 'इंडिया'चाच एक भाग होते आणि जे मत आपल्याला फायदेशीर आहे, तेच मत आपोआपच मनोमन ग्राह्य मानणे आणि जे मत आपल्या हितसंबंधांना बाधा आणणारे आहे, ते दुर्लक्षित करणे हे एकूणच मनुष्यस्वभावाला धरून होते.
 पण आताची परिस्थिती अगदी वेगळी होती. स्वतःच घेतलेल्या निर्णयामुळे ते पूर्वीच्या सुखासीन अशा 'इंडिया'तून दरिद्री 'भारता'त फेकले गेले होते. आपल्या आताच्या दुःखाला दुसरा कोणीतरी 'शोषक' इंडिया जबाबदार आहे, ही जाणीव त्यांच्या हृदयात काट्याप्रमाणे सलत होती. शहरात आहे तो 'त्यांचा इंडिया' आणि गावात आहे तो 'आपला भारत'.
 देशातील एकूण गरिबीचे मूळ शेतकऱ्याला मिळणाऱ्या अत्यल्प भावातच आहे हेही उघडच होते. शहरात झोपड्यांमधून राहणारे ते दुर्दैवी जीव – किंवा त्यांचे पूर्वज - हेही एकेकाळी आपल्यासारखेच शेतकरी असले पाहिजेत आणि शेतीत होणारी उपासमार टाळण्यासाठी त्यांना शहरात स्थलांतर करावे लागले असले पाहिजे हेही स्पष्टच होते.
 'इंडिया विरुद्ध भारत' या त्यांच्या मनात घोळू लागलेल्या द्वंद्वाला आणखीही एक महत्त्वाचा व्यक्तिगत पदर असणे शक्य होते. गेल्या दीड वर्षात पदोपदी त्यांना अगदी किरकोळ लोकांपुढे बाबापुता करावे लागले होते, अगदी क्षुल्लक कारणासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागले होते, समोरच्या माणसाशी अजिजीने बोलावे लागले होते. घर घेणे, जमीन घेणे, त्यासाठी लागणारे असंख्य कागदपत्र मिळवणे, गॅस-टेलिफोनचे कनेक्शन मिळवणे, विजेचे मीटर स्वतःच्या नावावर करून घेणे, मुलींसाठी शाळेत प्रवेश मिळवणे, त्यासाठी तहेत-हेचे दाखले मिळवणे - एक ना दोन, अशा असंख्य प्रसंगी गेल्या दीड वर्षांत त्यांच्या वाट्याला असे अपमान आले होते. आपल्या शेतातले कांदे, बटाटे, काकड्या विकण्यासाठी जेव्हा ते चाकणच्या बाजारसमितीत जात होते, तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांच्याकडून, व्यापाऱ्यांकडून, अगदी हमालांकडूनही त्यांच्या आत्मसन्मानाला प्रत्येक वेळी अशीच ठेच पोचत होती. आपल्या मालाची किंमत किंवा आपल्या श्रमाचे मूल्य हा समोरचा फालतू माणूस ठरवणार आणि ते मुकाटपणे मान्य केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, ही जाणीव त्यांचे विलक्षण संवेदनशील मन पोळणारी होती.
 त्यांच्यासारख्या उच्च शासकीय सेवेत दहा वर्षे काढलेल्या व्यक्तीला ह्यातला प्रत्येक प्रसंग अगदी जिवावर धोंडा ठेवून निभवावा लागला होता. आत्मसन्मानाची अतिशय प्रखर जाणीव असलेल्या त्यांच्यासारख्या व्यक्तीच्या दृष्टीनेतर यांतल्या प्रत्येक प्रसंगाची दाहकता अधिकच असह्य होती.
 'इंडिया विरुद्ध भारत' या संकल्पनेत त्यांना उमगलेले तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब तर होतेच, पण त्यांच्या स्वतःच्या तत्कालीन मानसिक संघर्षाचे प्रतिबिंबही त्या संकल्पनेत नेमके उतरले होते. त्यात केवळ वैचारिक पातळीवरचे आकलन नव्हते; भावनांचे उत्कट गहिरेपणही होते. त्यात व्यक्तिशः आपल्या होत असलेल्या अवहेलनेचा दंशही होता; त्या 'इंडिया'वासींमुळे आपल्यासारख्या 'भारत'वासींना सोसाव्या लागणाऱ्या लाचारीविषयीचा संतापही होता.
 म्हणूनच त्यांची नेहमीची हुकमी झोप आज त्यांना सोडून गेली होती. 'इंडिया विरुद्ध भारत'चे वादळ डोक्यात सतत घोंघावू लागले होते.