Jump to content

अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/प्रास्ताविक

विकिस्रोत कडून

प्रास्ताविक


 शरद जोशी आणि त्यांनी उभारलेली शेतकरी चळवळ हा एक अभूतपूर्व झंझावात होता.
 १९८० सालच्या ऊस आंदोलनात एकट्या नाशिक जिल्ह्यात ३०,००० शेतकरी एका वेळी तुरुंगात होते, तर १९८६ सालच्या कापूस आंदोलनात विदर्भ व मराठवाड्यात मिळून ९०,००० शेतकरी एका वेळी तुरुंगात होते. लोकांचा इतका प्रचंड सहभाग लाभलेली चळवळ स्वातंत्र्योत्तर भारतात दुसरी कुठलीच झालेली नाही.
 असे असूनही ह्या झंझावाताची योग्य ती नोंद बुद्धिजीवींच्या वर्तुळात घेतली गेलेली नाही. जोशींचे समग्र असे जीवनचरित्रही उपलब्ध नाही. ती उणीव भरून काढण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे ही ह्या चरित्रामागची पहिली प्रेरणा आहे.
 त्याचबरोबर जोशींनी मांडणी केलेले अनेक प्रश्न आजही आपल्यासमोर उभे आहेत; मग तो प्रश्न शेतीच्या भवितव्याचा प्रश्न असो अथवा समाजातील वाढती विषमता अधोरेखित करणाऱ्या 'इंडिया' विरुद्ध 'भारत' या द्वंद्वाचा असो. जोशींचा वैचारिक वारसा आणि त्यांचा एकूणच जीवनसंघर्ष या प्रश्नांना सामोरे जाताना आपल्याला खूप उपयुक्त ठरू शकेल व म्हणून तो वाचकांपुढे आणणे ही ह्या चरित्रलेखनामागची दुसरी प्रेरणा आहे.

 शरद जोशी व त्यांचे शेतकरी आंदोलन यांच्याशी माझा परिचय तसा उशिरा झाला. आयुष्यातील पहिली ४१ वर्षे माझे वास्तव्य मुंबईत झाले आणि आचार्य अत्रे, जॉर्ज फर्नाडिस किंवा बाळासाहेब ठाकरे हे ज्या अर्थाने मुंबईकरांचे 'हिरो' बनले, त्या अर्थाने कधी मुंबईने जोशींची कदर केली नव्हती. जेव्हा माणूस साप्ताहिकामधून विजय परुळकरांची योद्धा शेतकरी ही मालिका प्रकाशित होत होती, तेव्हा ती आम्ही वाचत असू, नाही असे नाही; पण त्यापूर्वी काही वर्षे वि. ग. कानिटकर यांची नाझी भस्मासुराचा उदयास्त ही मालिका जेव्हा 'माणूस'मधून प्रकाशित होत होती, तेव्हा तिची आम्ही जशी विलक्षण आतुरतेने वाट बघायचो, तसे 'योद्धा शेतकरी'च्या बाबतीत होत नव्हते. जवळच्या जोशींपेक्षा दूरचा हिटलर शहरी मध्यमवर्गाला अधिक रोचक वाटत होता हे दुर्दैवी असले तरी सत्य होते. वृत्तपत्रे वाचून मनावर ठसणारी जोशींची अधीमुर्धी प्रतिमाही ते बड्या शेतकऱ्यांचे, म्हणजेच कुलक या वर्गाचे नेते आहेत अशी व म्हणून बहूंशी नकारात्मकच होती.

 पुढे पुण्यात आल्यावर आणि अंतर्नाद मासिक सुरू केल्यावर आमची पहिली भेट झाली व तेव्हाच ती प्रतिमा हळूहळू बदलू लागली. त्या भेटीचे कारण होते १९९९च्या अंतर्नाद दिवाळी अंकातील बस करा हे समाजसेवेचे ढोंग! हा त्यांचा प्रक्षोभक ठरलेला प्रदीर्घ लेख. पुण्यातल्या सेनापती बापट रोडवरील बिना अपार्टमेंट्स'मध्ये ते तेव्हा राहत होते. तिथेच आमच्या दोन-तीन प्रदीर्घ मुलाखती झाल्या. त्यांच्या आधारे, व त्यांनी दिलेल्या त्यांच्या इतर साहित्याच्या आधारे, मी त्या लेखाचे शब्दांकन केले होते - विचार अर्थातच त्यांचेच होते व लेख छापण्यापूर्वी त्यांनी तो तपासून आणि थोडाफार बदलूनही दिला होता. पुढे फेब्रुवारी २००७च्या अंतर्नादमध्ये 'समाजसेवेची दुकानदारी नको!' या शीर्षकाखाली, त्यांनी केलेल्या आणखी काही बदलांसह व टीका थोडीशी सौम्य करून, तो पुनर्मुद्रितही झाला.
 त्यानंतरही आमच्या भेटी अधूनमधून होत राहिल्या – प्रत्येक भेट पुनर्भेटीची ओढ लावणारी होती. त्यांच्यावर काहीतरी लिहावे असे खूपदा वाटले; पण प्रत्येक वेळी जाणवले, की हा तर एखाद्या कादंबरीचा विषय आहे; लेखात तो कसा हाताळणार? पण एखाद्या जीवित व्यक्तीवर कादंबरी लिहिणे तसे अवघडच! चरित्र लिहावे म्हटले तर त्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकेन असे वाटत नव्हते. ३ सप्टेंबर २००९ रोजी ते पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करणार होते व त्याचा उल्लेख त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या बोलण्यात झाला होता. त्या निमित्ताने मग त्यांच्यावर अंतर्नादचा एखादा विशेषांकच काढावा असे ठरले व मग त्या अंकासाठी मीही एक लेख लिहायचे ठरवले.
 त्या अंकाच्या पूर्वतयारीसाठी म्हणून मुद्दाम आंबेठाण येथील अंगारमळ्यात जाऊन आलो. ते जोशींचे अधिकृत निवासस्थान आणि शेतकरी संघटनेचे मुख्य कार्यालय. तिथे जायचा तो पहिलाच प्रसंग. आंबेठाणला जाण्यासाठी चाकण बसस्टँडवर उतरावे लागते. संघटनेचे पहिले आंदोलन तीस वर्षांपूर्वी इथेच लढवले गेले. त्या दिवशी मात्र त्या क्रांतिकारी आंदोलनाची कुठलीही खूण त्या परिसरात दिसली नाही.
 अंगारमळ्यात पोहोचल्यावर बघितले तर अगदी शुकशुकाट होता – जिथे शूटिंग होणे केव्हाच बंद झाले आहे अशा एखाद्या मुंबईतल्या जुनाट स्टुडिओत असावा तसा. राज्यसभा सदस्य असल्याने जोशींचा मुक्काम तेव्हा बहुतेक वेळ दिल्लीतच असायचा. त्यांचे एक निकटचे सहकारी प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे तिथेच एका खोलीत राहत होते; आजही तीच परिस्थिती आहे. बबन शेलार हे जोशींचे सारथी-सचिव-सहकारीदेखील तिथेच एका आउटहाउससारख्या जागेत आपल्या कुटुंबीयांसह राहत होते; पण मी गेलो तेव्हा ते तिथे नव्हते. एका नि:शब्द उदासीचे सावट अंगारमळ्यावर जाणवत होते. एकेकाळी इथून सुरू झालेल्या आणि बघता बघता लक्षावधी लोकांना आपल्या कवेत घेणाऱ्या शरद जोशी नामक वादळाचे ते विस्मृतीच्या अथांग पोकळीत विरून जायच्या आत शब्दांकन व्हायला हवे, ही जाणीव त्या क्षणी मला प्रकर्षाने झाली.
 आंदोलनाच्या साऱ्या मंतरलेल्या दिवसांचे म्हात्रे साक्षीदार होते व जोशींची निवासाची खोली, त्यांचा ग्रंथसंग्रह, एकेकाळच्या लीलाताईंच्या पोल्ट्रीत थाटलेली प्रबोधिनीची शिबिरे घ्यायची जागा, भिंतींवरची पोस्टर्स, फोटो वगैरे सगळा इतिहास - खरे तर अवशेष - ते दाखवत होते; भूतकाळ जिवंत करत होते. अंतर्नादसाठी कोणाकोणाकडून लेख मागवावे याचीही नंतर चर्चा झाली. म्हात्रेनी सुचवलेली नावेच नक्की केली. विद्युत भागवत आणि इंद्रजित भालेराव यांनी लगेच होकार दिला व त्यांचे लेखही लौकरच मिळाले. विनय हर्डीकर यांनी मात्र नकार दिला; स्वतःऐवजी राजीव बसर्गेकर यांचे नाव त्यांनी सुचवले व पुढे बसर्गेकरांचा लेख मिळालाही.
 २७ जून २००९ रोजी त्या लेखाला अंतिम रूप देण्यापूर्वी काही शंकांचे निरसन करावे, म्हणून जोशींची एक विशेष भेट घेतली. माझ्याच विनंतीला मान देऊन ते आमच्या घरी आले होते. सकाळी त्यांच्या एका शाळकरी मित्राच्या घरचे लग्नकार्य होते आणि संध्याकाळी डॉक्टरची अपॉइंटमेंट, "आता हे मधले पाच-सहा तास मी अगदी पूर्ण मोकळा आहे. विचारा काय ते," औपचारिक गप्पा संपताच त्यांनी सुरुवात केली. त्या प्रदीर्घ भेटीत आम्ही खरे जवळ आलो. परिणामतः तो राजहंस एक या शीर्षकाचा तो लेख बराच मोठा झाला.
 ऑक्टोबर २००९च्या त्या शरद जोशी विशेषांकाचे प्रकाशन २५ सप्टेंबर रोजी पुण्यातल्या एसेम जोशी हॉलमध्ये पार पडले. सभागृह तुडुंब भरले होते. त्या प्रसंगी रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही केला गेला. (आमचे शेजारी बद्रीनाथ देवकर म्हणजे रावसाहेब शिंदे यांचे जावई आणि शरद जोशींचे अगदी राम-हनुमान शोभावे इतके परमभक्त - ह्या दोन मोठ्या व्यक्तींशी आम्हांला जोडणारा हा दुवा.) समारंभाच्या शेवटी शेतकरी आंदोलनाचे प्रथमपासून साक्षीदार असलेले व 'साप्ताहिक सकाळ'चे संपादक म्हणून नुकतेच निवृत्त झालेले सदा डुंबरे यांनी त्यांची प्रकट मुलाखतही घेतली. मुलाखतीच्या शेवटी जोशींनी काहीसा दुःखद सूर लावला होता. त्यांचे शेवटचे वाक्य होते – “This is my private hell. But I must tell you, I am so proud of my private hell.” त्या एका प्रसिद्ध अमेरिकन गाण्यातील ओळींत त्यांची त्यावेळची एकूण मनःस्थिती प्रतिबिंबित झाली असावी. मुलाखतीचा तो शेवट मनाला चटका लावून गेला.
 अंतर्नादने काढलेल्या विशेषांकाबद्दल जोशींना समाधान वाटले होते. अंकाबद्दलच्या अनेक चांगल्या प्रतिक्रिया त्यांच्यापाशी येत होत्या. “यामुळे मी चांगल्या वाचकांच्या एका वर्तुळात गेलो. तुमच्यासारख्या राजवाड्यांची आम्ही वाटच पाहत होतो," असे ते मला म्हणाले. ते ऐकून खरे तर मला धक्काच बसला. कारण त्यापूर्वी कधीही त्यांनी माझी किंवा अंतर्नादची एका शब्दानेही स्तुती केली नव्हती; कधीच काही कुतूहलही दाखवले नव्हते. योगायोगाने त्याच वर्षी त्यांच्या अंगारमळा पुस्तकाला राज्यशासनाचा आत्मकथन विभागासाठीचा प्रथम पुरस्कार मिळाला. इतरही काही पुरस्कार लगोलग मिळाले. पुढच्याच वर्षी त्यांना चतुरंग ह्या मुंबईतील प्रख्यात सांस्कृतिक संस्थेचा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला.

 दरम्यान त्यांचे चरित्र लिहायचा विचार पिच्छा सोडेना. त्यांच्या स्वत:च्या लेखनात त्यांचे अथपासून इतिपर्यंतचे चरित्र असे कुठेच उभे राहत नव्हते; इतरही कोणी तसे चरित्र लिहिलेले नसल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांनी जे कार्य केले, ते खूप ऐतिहासिक महत्त्वाचे आहे याची एव्हाना खात्री पटली होती, पण तरीही त्यांच्याविषयी पुरेशी माहिती अनेक विचारवंतांना नाही हेही जाणवत होते.

 Everybody loves a good drought हे मॅगसेसे पुरस्कारप्राप्त पी. साईनाथ यांचे गाजलेले पुस्तक मुख्यतः भारतीय शेतकऱ्याच्या दुर्दशेबद्दल आहे. पण १९९६ साली प्रकाशित झालेल्या या ४७० पानी पुस्तकात याच क्षेत्रात आपले सर्वस्व ओतून अनेक वर्षे काम करणारे शरद जोशी आणि शेतकरी आंदोलन यांच्याविषयी काहीही नाही. India after Gandhi या रामचंद्र गुहा यांच्या सुप्रसिद्ध पुस्तकातही जोशी व त्यांचे शेतकरी आंदोलन यांची अवघ्या आठ ओळींत बोळवण केलेली आहे व तीही महेंद्रसिंग टिकैत यांच्यासह त्यांना एकत्र गुंफून. ती अगदी अन्यायकारक आहे असे मला वाटले. आपल्या या बहुचर्चित ८९८ पानी ग्रंथात गुहांनी काढलेला निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहे : जोशी आणि टिकैत या दोघांचाही आपण ग्रामीण जनतेसाठी बोलत आहोत असा दावा होता. वस्तुतः ते दोघेही ट्रॅक्टर आणि विजेचे पंप वापरणाऱ्या मध्यम व सधन शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होते. गरीब शेतकरी त्यांच्या कक्षेत नव्हतेच. (गांधीनंतरचा भारत, मराठी अनुवाद : शारदा साठे, मॅजेस्टिक प्रकाशन, मार्च २०११, पृष्ठ ६८४) शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या असंख्य शेतकऱ्यांना मी स्वतः भेटलो होतो. त्यांच्यापैकी अगदी क्वचितच कोणी टॅक्टर बाळगणारे होते. गहांच्या पुस्तकातील मजकूर उघड उघड चुकीचा होता. अशाच स्वरूपाच्या उल्लेखांनी, किंवा अनुल्लेखांनी, जर भावी पिढ्यांसाठी इतिहास लिहिला जाणार असेल, तर तो सत्याचा मोठा विपर्यास असणार होता.
 अशा गैरसमजांची कारणे अनेक असणार, पण त्यांतील एक मोठे कारण म्हणजे शरद जोशींच्या जीवनाचे व एकूणच शेतकरी संघटनेच्या इतिहासाचे समग्र व विश्वासार्ह दस्तावेजीकरण करणाऱ्या पुस्तकाचा अभाव. त्यांचे चरित्र जाणून घ्यावे असे ज्यांना वाटेल त्यांच्यासाठी तो पर्याय उपलब्ध व्हायला हवा या भूमिकेतून मी हे चरित्र लिहायला प्रवृत्त झालो.
 यावर चार-पाच वेळा झालेल्या चर्चेत जोशींनी सुचवल्याप्रमाणे मी त्यांना २१ मे २०१२ रोजी चरित्रलेखनाचा एक तीन-पानी प्रस्ताव दिला व त्यावर विस्ताराने चर्चा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या देवी ऑर्किंडमधल्या फ्लॅटवर प्रमुख सहकाऱ्यांची बैठकही बोलावली. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली बैठक जेवणानंतर संपली. शैलजा देशपांडे, गुणवंत पाटील हंगरगेकर, अजित नरदे, श्रीकांत अनंत उमरीकर, डॉ. मानवेंद्र काचोळे, अनंत गणेश देशपांडे, संजय सुरेंद्र कोले, वामनराव चटप, रवी देवांग, जगदीश ज. बोंडे, अनिल ज. धनवट, सुरेशचंद्र म्हात्रे, दर्शिनी भट्टजी, बद्रीनाथ देवकर (ज्यांचे नाव पुढे प्रकल्प समन्वयक म्हणून छापले गेले) आणि इतरही काही प्रमुख सहकारी हजर होते. जोशींच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येकाला प्रस्तावाची प्रत दिली व बैठकीत चर्चाही झाली. ह्या प्रकल्पात त्या सगळ्यांचा सहभाग जोशींना हवा होता. जोशींनी आणखी एक केले. शेतकरी संघटक या संघटनेच्या मुखपत्राच्या पुढच्याच, म्हणजे, ६ जून २०१२च्या अंकात ह्या संकल्पित चरित्राविषयी एक पूर्ण पान निवेदन त्यांनी प्रसिद्ध करवले. त्यात एकूण चरित्रप्रकल्पाची माहिती होती व सर्वांनी त्यात सहकार्य द्यावे असे कार्यकारिणीसदस्यांच्या नावाने एक आवाहनही होते. त्यामुळे उपरोक्त सहकाऱ्यांप्रमाणे जागोजागी विखुरलेल्या त्यांच्या इतरही सहकाऱ्यांचे हार्दिक सहकार्य मिळाले. अनेकांनी त्यानंतर माझ्याशी संपर्क साधला व स्वतःजवळची शक्य ती माहिती पुरवली.
 ह्या चरित्रासाठी जोशींनी खूप वेळदेखील दिला. यापूर्वीच्या धावपळीच्या आयुष्यात ते जमले असते असे वाटत नाही. त्या काळात शेतकरी लढ्यांमध्ये जोशींचा प्रत्यक्ष सहभाग असा फारसा राहिला नव्हता; महत्त्वाच्या सभांना ते हजर राहत, आपले विचार मांडत, मार्गदर्शन करत, एवढेच. बहुधा त्यामुळेच ते चरित्रासाठी पुरेसा वेळ देऊ शकले, न कंटाळता निवांतपणे जुन्या आठवणी सांगू शकले, शक्य तेव्हा मी बरोबर प्रवासात यावे अशी व्यवस्था करू शकले. तसे करताना शेतकरी चळवळीच्या बाहेरचा एक माणूस म्हणून मला खूपदा अवघडल्यासारखे वाटे, कारण आमच्यातील तशा प्रकारच्या जवळीकीमुळे त्यांच्या जुन्या निष्ठावान सहकाऱ्यांना काय वाटू शकेल असा विचार मनात यायचा; पण जोशींचे आमंत्रण आग्रहाचे असे.
 दर शुक्रवारी सकाळी दहा वाजता आम्ही भेटायचो. दोन-तीन तास बोलणे व्हायचे. प्रत्यक्षात काम खूपच लांबत गेले. एक मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे फारशी काही मूळ कागदपत्रे नव्हती आणि पूर्ण शहानिशा करून घेतल्याशिवाय कुठलाही मजकूर मला चरित्रात घ्यायचा नव्हता. 'एकदा उद्वेगाच्या भरात त्यांनी त्यांचे बरेचसे व्यक्तिगत कागदपत्र नष्ट केले,' असे नंतर मला म्हात्रेनी सांगितले. अशा परिस्थितीत चाकणपासून स्वित्झर्लंडपर्यंत आणि निपाणीपासून चंडीगढपर्यंत विखुरलेल्या त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी माझे आपल्या घरात आणि भावविश्वात स्वागत केले, आपला किमती वेळ दिला, आपल्याजवळचे कागदपत्र दिले, कडूगोड आठवणी सांगितल्या व या साऱ्या अमूल्य सहकार्यामुळेच पूर्वी कधीच लोकांसमोर न आलेली बरीच माहिती उजेडात आली आणि एकूणच ह्या लेखनाला स्मरणरंजनाच्या पलीकडे जाणाऱ्या दस्तावेजाचे स्वरूप देता आले.

 हे चरित्र लिहिताना ज्यांच्याकडून वेगवेगळी माहिती उपलब्ध झाली, त्यांचा उल्लेख शक्यतो प्रत्यक्ष लेखनात त्या-त्या जागी केलेला आहे; वेगवेगळ्या उद्धृतांचे मूळ स्रोतही नोंदवलेले आहेत. वारकरी, आठवड्याचा ग्यानबा आणि शेतकरी संघटक या अधिकृत मुखपत्रांचे जुने अंक आणि शरद जोशींचे पूर्वप्रकाशित साहित्य हा अर्थातच एक महत्त्वाचा स्रोत होता. पुस्तकात वापरलेली अनेक छायाचित्रे सरोजा परुळकर यांनी पुरवली व स्वतंत्र श्रेय नोंदवलेले नाही ती छायाचित्रे सुरेशचंद्र म्हात्रे यांच्या सौजन्याने प्राप्त झाली. त्यांचे आभार मानतो. जेव्हा जेव्हा मी जोशींना भेटायला त्यांच्याकडे जात असे, तेव्हा तेव्हा ज्यांनी माझा कधीही न कंटाळता मनापासून पाहुणचार केला, त्या दर्शिनी भट्टजी ऊर्फ दीदी यांचे आभार मानतो. सुरेशचंद्र म्हात्रे यांचे सहकार्य तर अगदी शब्दातीत आहे. गेल्या पाच वर्षांत असा एकही आठवडा गेला नसेल, जेव्हा मी काही ना काही माहितीसाठी त्यांना फोन केला नाही वा भेटलो नाही. सर्व लेखन पूर्ण झाल्यानंतर शेतकरी संघटनेच्या वतीने म्हणून त्यांनीच प्रत्येक पान नीट तपासून दिले ह्याबद्दलही त्यांचे आभार मानायला हवेत.

 शरद जोशींनी ज्यांना ह्या चरित्रासाठी प्रकल्प समन्वयक म्हणून नेमले होते त्या बद्रीनाथ देवकर यांचाही उल्लेख इथे करणे अपरिहार्य आहे; त्यांच्याबरोबर इतक्या ठिकाणी फिरलो आणि इतक्या साऱ्या लोकांशी त्यांनी माझी भेट घडवून आणली, की त्या साऱ्यांचा उल्लेख करणेही अवघड आहे. आपली सगळी इतर व्यक्तिगत कामे बाजूला सारून त्यांनी यासाठी वेळ दिला. अनंतराव देशपांडे यांचेही इथे आभार मानायला हवेत; अनेक भेटींचे आयोजन त्यांनी केले होते. महाराष्ट्राबाहेरील सहकाऱ्यांबद्दल लिहायचे तर स्वित्झर्लंड येथील बर्नमधले जोशींचे एकेकाळचे शेजारी आणि कार्यालयातील सहकारी टोनी डेर होवसेपियां, पंजाबातील बटाला येथील शेतकरीनेते व जोशींचे निकटचे स्नेही भूपिंदर सिंग मान, कर्नाटकातल्या निपाणी येथील तंबाखू आंदोलनातील सहकारी प्रा. सुभाष जोशी, कर्नाटक रयत संघाचे बंगलोरस्थित हेमंत कुमार पांचाल आणि सुरतमधील बांधकाम व्यावसायिक, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते परिमल देसाई यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. शरद जोशी यांच्या कॅनडास्थित कन्या सौ. श्रेया शहाणे यांचेही आभार. आमच्या दोन भेटींमध्ये त्यांनी दिलेली माहिती बरीच उपयुक्त होती. पुस्तकासाठी ज्यांनी आर्थिक सहाय्य दिले त्या प्रमोद चौधरी यांचे व त्यांच्या प्राज फाऊंडेशनचे आभार मानतो.
 पुस्तकाची सर्व मुद्रिते, वयपरत्वे येणाऱ्या अडचणींवर मात करून, ज्यांनी खूप आपलकीने तपासन दिली त्या अंतर्नादच्या व्याकरण सल्लागार प्रा. यास्मिन शेख यांनाही मनापासून धन्यवाद. अक्षरजुळणीकार हरिश घाटपांडे, मुखपृष्ठकार श्याम देशपांडे, मुद्रक आनंद लाटकर आणि या साऱ्यांचे कुशल सहकारी यांचेही आभार मानायला हवेत.
 ऋणनिर्देशाची ही यादी खरे तर खूपच लांब होईल. कितीही नावे घेतली तरी काही वगळली जायची शक्यता आहेच. प्रत्यक्ष नामोल्लेख केला नाही तरीही त्या साऱ्यांविषयी मनात कृतज्ञभाव आहेच. त्यांच्याविना हे चरित्र लिहूनच झाले नसते असे म्हटले, तरी त्यात अतिशयोक्ती होणार नाही. वाचकांच्या हाती हे चरित्र देताना लेखकाची मनःस्थिती काहीशी संमिश्र आहे. हे काम व्हावे अशी ज्यांची खूप इच्छा होती, ते चरित्रनायक शरद जोशी आज आपल्यात नाहीत याची बोचरी खंत मनात आहे आणि त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांतील बहुतेक वेळ ज्या प्रकल्पासाठी दिला त्याला मूर्त रूप लाभले याचे समाधानही आहे.
 शरद जोशींसारखा एक अनन्यसाधारण कृतिशील विचारवंत आपल्यात होऊन गेला. त्यांचा जीवनपट आणि त्यांचा वैचारिक वारसा ह्या चरित्रातून वाचकांपुढे अल्पस्वल्प जरी साकार झाला तरी हे श्रम सार्थकी लागले असे म्हणता येईल. आपल्या टेबलावरचे रोजचे जेवणाचे ताट ज्याच्या श्रमांतून येते त्या शेतकऱ्याचे विश्न, त्याच्या अडचणी, त्याचे संघर्ष, त्याच्या आशा, त्याच्या निराशा ह्यांची थोडीफार ओळख ह्या चरित्रलेखनातून लेखकाला झाली आणि तशीच ती या चरित्रवाचनातून वाचकालाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो.

- भानू काळे