अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/धुमसता तंबाखू
तंबाखूसेवनाचा सिगरेट हा एकमेव प्रकार नव्हे. भारतात सिगरेटपेक्षा विडी पिणाऱ्यांचे प्रमाण अधिकच असेल आणि गुटखा-जर्दा खाणाऱ्यांचे प्रमाणही तेवढेच किंवा कदाचित त्याहून जास्तही असू शकेल. तपकीर ह्या स्वरूपात किंवा नुसताच तंबाखू खाणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. सुमारे तीन-चारशे वर्षांपूर्वी युरोपियन व्यापाऱ्यांनी लॅटिन अमेरिकेतून हे पीक भारतात आणले असे म्हणतात. आज तंबाखूच्या उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. सुमारे चाळीस लाख शेतकरी कुटुंबांचे पोट आजही ह्या पिकावर अवलंबून आहे; त्यांमध्ये विड्या वळण्याचे काम करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे.
पूर्वीच्या काळी तर विडी उद्योगाचे महत्त्व खूपच होते. जिथे शेती पूर्णतः पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे त्या भागात पाऊस कमी झाला, तर शेतकऱ्यांची अगदी अन्नान्नदशा होते. अशा वेळी विडी उद्योग हाच त्यांचा आधार असायचा; ग्रामीण भागात इतर उद्योगधंदे जवळजवळ नव्हतेच. विड्या वळण्याचे काम कोणालाही, कुठेही करता येते, अगदी घरीही. त्यासाठी शिक्षणाची काही पूर्वअट नाही. महिलाही हे काम करू शकतात; किंबहुना, विडीकामगार बव्हंशी महिलाच असतात. ह्या उद्योगाची रोजगारक्षमता खूप असल्याने त्याची वाढही देशात अनेक ठिकाणी झाली. 'गरिबाचे व्यसन' म्हणून विड्यांचा प्रसारही खूप झाला. अनेक समाजांत महिलाही विडी ओढत असत; हे प्रमाण पूर्वी तर अधिकच होते. ग्रामीण भागात जेव्हा साम्यवाद्यांनी कामगार संघटना उभारायला सुरुवात केली, तेव्हा बहुतेकदा ही सुरुवात विडीकामगारांपासूनच होत असे.
मुख्यतः गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्रात तंबाखूचे पीक निघते. कर्नाटकातील तंबाखू सर्वोत्तम मानला जातो. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी, हुक्केरी आणि गोकाक हे तीन तालुके म्हणजे या दर्जेदार तंबाखूचे आगर. कर्नाटकात होणाऱ्या एकूण तंबाखूपैकी सुमारे ८० टक्के ह्याच तीन तालुक्यांत होतो. निपाणी शहर चिकोडी तालुक्यात आहे. हे इथले व्यापाराचे मुख्य केंद्र. देशभरातले व्यापारी निपाणीला हजेरी लावतात.
निपाणी परिसरातील जमीन खूप सुपीक आहे. कोणतेही पीक इथे उत्तम येऊ शकते. पण ऊस व तंबाखू हीच दोन पिके इथे प्रमुख आहेत. त्यातही उसापेक्षा तंबाखूच अधिक. ऑगस्ट ते फेब्रुवारी ह्या कालावधीत साधारण पाच महिन्यांत हे पीक येते.
निपाणीत पूर्वी ज्वारी, हरभरा, उडीद, भुईमूग ही पिके घेतली जात. पुढे सरकारनेच स्वतःला कराच्या स्वरूपात अधिक प्राप्ती व्हावी म्हणून तंबाखूसारख्या व्यापारी पिकाची लागवड करायला उत्तेजन दिले. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रातदेखील उसाच्या बाबतीत हाच प्रकार घडला होता. आज जरी अपुऱ्या पाण्यामुळे 'साखर की भाकर' असा प्रश्न अनेक विचारवंत उपस्थित करत असले, तरी एकेकाळी नाशिक-नगर भागात भंडारदरा धरणाचे पाणी वापरले जावे व पाणीपट्टीतून धरणाचा खर्च थोडाफार तरी भरून निघावा, ह्या उद्देशाने तत्कालीन ब्रिटिश सरकारनेच अधिक पाणी लागणाऱ्या उसाची लागवड करायला तेथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले होते! निपाणी येथेही असाच प्रकार झालेला दिसतो. सरकारी प्रोत्साहनाने सुमारे १८९०च्या आसपास इथे तंबाखूची लागवड सुरू झाली.
निपाणीपुरता विचार केला. तर देवचंद शहा यांचे पूर्वज इथले तंबाखूचे पहिले व्यापारी. सर्वांत मोठे आणि प्रतिष्ठित. मूळचे अकोळ गावचे. १९८०च्या सुमारास 'टोबॅको किंग' म्हणूनच देवचंद शेट ओळखले जात. अनेक घरांमधून त्यांच्या फोटोची पूजाही होत असे; आपले अन्नदाता म्हणूनच सामान्य शेतकरी ह्या कुटुंबाकडे पाहत असे.
व्यापारी देतील तेवढे पैसे गुपचूप घ्यायचे आणि त्यातच भागवायचे हे शेतकऱ्याच्या अगदी अंगवळणी पडले होते. व्यापारी सांगतील त्या कागदावर, कधी कधी तर कोऱ्या कागदावरही, आपला अंगठा उमटवायचा हे इथे सर्रास व्हायचे. व्यापाऱ्यांची दहशत प्रचंड असे. इतकी, की व्यापाऱ्यांच्या पेढ्यांसमोरून वा बंगल्यांसमोरून जाताना शेतकरी आपल्या चपला उचलून डोक्यावर घेत व मग पुढे चालू लागत.
शेतकरी जेव्हा तंबाखू विकायला बाजारपेठेत घेऊन यायचा, तेव्हा तंबाखूच्या एकूण वजनातून अनेक प्रकारची घट (जिला इथे 'सूट' म्हटले जाई) वजा करून उरलेल्या वजनाचेच पैसे शेतकऱ्याला दिले जात.
तंबाखूत पानांचे देठ, बारीक काड्या, शेतातील माती आलेली आहे असे कारण सांगून काडीमाती सूट घेतली जाई. ही पहिली सूट. हवेचा तंबाखूच्या वजनावर परिणाम होतो, असे सांगून हवा सूट घेतली जाई. तंबाखू पोत्यांत भरून आणला जाई. त्या पोत्याला बोद म्हणत. एका बोदामध्ये साधारण साठ किलो तंबाखू असायचा. ह्या पोत्याचे वजन एकूण वजनातून वजा केले जाई. त्याला बारदान सूट म्हणत. खूपदा वजन करायचा काटा नीट नाही, म्हणून काटा सूट घेतली जाई. सूट म्हणून नेमके किती वजन कमी पकडायचे ह्याचे काही गणित नव्हते- व्यापारी ठरवेल, तोच आकडा स्वीकारण्यावाचून शेतकऱ्याला गत्यंतरच नसे. सरासरी एक बोद तंबाखूमागे सुमारे दहा किलो सूट म्हणून वजनातून कमी केले जात. म्हणजे शेतकऱ्याचे साधारण एक षष्ठांश किवा १६% नुकसान हे या पहिल्या पायरीतच व्हायचे.
विक्रीचा कागदोपत्री काहीच पुरावा शेतकऱ्याकडे नसे, व्यापारी आपल्या वहीत लिहून ठेवत तोच हिशेब गृहीत धरला जाई. विक्रीचे पैसेही शेतकऱ्याला लगेच कधी मिळत नसत; त्यासाठी निदान सहा महिने थांबावे लागे आणि चार-पाच चकरा माराव्या लागत. त्याआधी जर शेतकऱ्याला पैसे हवे असतील, तर ते त्याचेच पैसे व्यापारी त्याला व्याजावर देई; म्हणजे शेतकऱ्याला देय असलेल्या व मुळातच खूप तुटपुंज्या असलेल्या रकमेवरही त्यालाच व्याज द्यावे लागे! अर्थात सगळेच व्यापारी तसे होते असे म्हणणे गैर ठरेल; काही व्यापारी सरळ मार्गाने व्यवहार करणारेही असत.
तंबाखूच्या व्यापाऱ्यांच्या वखारी असत. तंबाखू नीट जमा करून घेणे, तो साठवणे, नंतर ठरलेल्या जागी रवाना करणे वगैरे कामांसाठी ह्या वखारी असत. तिथे मुख्यतः महिला काम करत. तंबाखूवर प्रक्रिया करून जर्दा बनवण्याचे कामही महिला कामगारच करत. त्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती. कोंदट, अपुरी, अस्वच्छ जागा, कामासाठी बसायचीदेखील गैरसोय, तरीही एकाच जागी तासन्तास बसायची सक्ती, सर्वत्र दरवळणारा तंबाखूचा वास, अंगावर अगदी नखशिखान्त जाऊन बसणारा बारीक तंबाखूचा थर. मग्रूर मालक, सकाळी नऊ वाजता महिला कामाला आल्या, की वखारीचा दरवाजा बंद केला जाई. दुपारी दोन वाजता त्यांना अर्धा तास जेवणाची सुट्टी असायची. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात, ते अगदी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत. त्या दरम्यान अगदी देहविधीसाठीदेखील बाहेर पडायची परवानगी नसायची. त्यातून मजुरी अत्यंत कमी. कोणी फार आवाज उठवला तर त्याला सरळ करायला वखारमालकांनी पोसलेले गुंडही सज्ज असत.
निपाणी व आसपासच्या भागात अशा पंधरा-वीस हजार तरी महिला तंबाखू कामगार होत्या. त्याशिवाय प्रत्यक्ष विडी बनवणारे कारखाने असत. आश्चर्य म्हणजे इतकी मोठी कामगारसंख्या असूनही निपाणीत सरकारी लेबर ऑफिस नव्हते. कुठलीही तक्रार करायची म्हटली तर चिकोडी ह्या तालुक्याच्या गावी जावे लागे. तिथे जायचे म्हणजे कामगारांचा त्या दिवसाचा रोजगार बुडायचा. शिवाय, गेल्यावरदेखील तो विशिष्ट ऑफिसर भेटेलच अशी खात्री नसायची. तो नसला तर दुसरे कोणीही कामगारांचे काम करत नसे. त्यामुळे अन्यायाविरुद्ध दाद मागायची तरी कशी आणि कोणापुढे?
सुभाष जोशी हे निपाणीच्या तंबाखू आंदोलनातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व. मध्यम बांधा, शांत चेहरा, विचारी वृत्ती आणि तरीही कृतिशील असलेले जोशी व्यवसायाने प्राध्यापक होते, पण अध्यापनाच्या जोडीनेच सामाजिक कार्यात त्यांचा खूप सहभाग असे. आपल्या समाजकार्यामुळे एकदा त्यांना नोकरीही गमवावी लागली होती, पण संघर्ष करून त्यांनी ती परत मिळवला. १९७३-७४च्या सुमारास त्यांना अकोळ युवक संघ नावाची स्थानिक तरुणांची एक संघटना उभी केली व तिच्यामार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवायला सुरुवात केली. पत्नी सुनीताअक्का याही सर्व कामात पतीला पुरेपूर साथ देणाऱ्या होत्या. 'सहते चरामि' हे व्रत खऱ्या अर्थाने जपणाऱ्या. घर हेच जोशींचे कार्यालयदेखील असल्याने माणसांचा राबता सतत असे. कधी कधी वीस-वीस लोकांचे जेवणखाणही सुनीताअक्कांना करावे लागे; पण त्यांची कधीही तक्रार नसे. त्यांच्याप्रमाणेच संध्या व शमा या त्यांच्या दोन धाकट्या बहिणीदेखील सुभाष जोशींना त्यांच्या कामात जास्तीत जास्त मदत करत.
२४ ऑक्टोबर २०१२ रोजी निपाणीतील त्यांच्या घरी प्रस्तुत लेखकाची व त्यांची प्रथम भेट झाली. सोबत बद्रीनाथ देवकर हेही होते. आमच्या भेटीपूर्वी काही वर्षे त्यांचा शरद जोशींशी व शेतकरी संघटनेशी फारसा संबंध राहिला नव्हता; पण तरीही संयत शब्दांत, जराही आवाज चढू न देता, त्यांनी सर्व कहाणी ऐकवली.
पूर्वी सुभाष जोशी समाजवादी पक्षात होते. पण त्या पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यानंतर नाव मोठे आणि लक्षण खोटे असाच अनुभव त्यांना आला. 'एक गाव, एक पाणवठा' आंदोलनाच्या वेळी कोकणात मालवण येथे भरलेल्या एका अधिवेशनाला ते मुद्दाम रजा काढून हजर राहिले होते. त्या अधिवेशनातील भाषणात एका वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केले की, 'एक गाव, एक पाणवठा कार्यक्रमाला आपण संपूर्ण एक वर्ष वाहून घेणार.' पण प्रत्यक्षात त्यानंतर ते ह्या आंदोलनात कुठेच दिसेनात, म्हणून जोशींनी त्यांना पत्र लिहिले की, 'अधिवेशन संपून सहा महिने झाले, पण तुम्ही आश्वासन पूर्ण केलेले दिसत नाही. तुम्ही एकाही पाणवठ्यावर गेल्याचं ऐकिवात नाही.' अपेक्षेप्रमाणे पत्राला काहीच उत्तर आले नाही!
इतरही अनेक मोठ्या समाजवादी नेत्यांच्या बाबतीत हाच अनुभव आला. भाषणे मोठी मोठी करायची, पण प्रत्यक्ष कृती शून्य. इतर लोहियावादी, मार्क्सवादी नेत्यांचाही असाच अनुभव त्यांना आला. मोहन धारियांचे बंधू गोपीनाथ धारिया ऊर्फ भाई हेही सुभाष जोशींच्या नियमित संपर्कात होते. त्यांची स्वतःची निपाणीजवळ मोठी वडिलोपार्जित शेती होती. १९७७ साली केंद्रातील जनता पक्षाच्या राजवटीत मोहन धारिया व्यापारमंत्री बनले. पण इथल्या तंबाखू कामगारांचे प्रश्न सोडवण्यात त्यांची काहीच मदत झाली नाही. ज्यांना आपण 'आपले' समजतो तेही सत्तेवर आल्यावर मात्र 'आपले' राहत नाहीत हा पुन्हा पुन्हा येणारा अनुभव कुठल्याही ध्येयवादी कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होईल असाच होता. मग त्यांनी ठरवले, कुठल्याच मोठ्या नावाला भुलायचे नाही; आंधळेपणे कोणाच्या पाठीमागे जायचे नाही.
निपाणीतील तंबाखू कामगार स्त्रिया कुठल्या नरकयातना भोगत असतात, कशा परिस्थितीत काम करत असतात ह्याची पूर्ण कल्पना असल्याने सुभाष जोशींनी लौकरच या तंबाखू कामगार स्त्रियांना संघटित करायला सुरुवात केली. सुरुवातीला ते मदतीसाठी मुंबईपुण्याहून काही लेखकांना, पत्रकारांना, पुढाऱ्यांना आवर्जून आमंत्रित करत असत. त्यांना या महिलांची केविलवाणी परिस्थिती दाखवत. त्यांच्या भेटीगाठी, आसपासच्या खेड्यांतील दौरे वगैरे आयोजित करत. काहींनी तिथल्या प्रश्नांबद्दल लेखन वगैरे केले, भाषणे दिली. त्यामुळे बड्या शहरांतील सुशिक्षितांच्या वर्तुळात निपाणीतील महिला तंबाखू कामगारांचे शोषण हा काही दिवस चर्चेचा विषय झालाही; पण त्यामुळे प्रत्यक्षात निपाणीतील शोषणावर काहीही परिणाम झाला नाही.
पुण्याच्या एक समाजकार्यकर्त्या बाई निपाणीत आल्या होत्या. त्यांना देवदासींची एक सभा तिथे घ्यायची होती. त्यांच्या विनंतीवरून सुभाष जोशींनी सभा आयोजित केली; पण 'मला सभेत बोलायचा आग्रह करू नका' असे त्यांनी ह्या विदुषींना वारंवार बजावले होते. बाईंना मात्र ते भाषण करत आहेत आणि अध्यक्षस्थानी त्या स्वतः आहेत असा फोटो काढून घ्यायची फार हौस होती. त्यासाठी त्यांनी एक फोटोग्राफरदेखील मुक्रर केला होता. जोशी तसे स्पष्टवक्ते होते. आपल्या भाषणात ते म्हणाले,
"वर्षाकाठी एक-दोनदा इथे येऊन आणि मग मुंबई-पुण्यात भाषणं देऊन देवदासींची मुक्ती होणार नाही, देवदासींचा कुठलाच प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी इथे येऊन दीर्घकाळासाठी काम करावं लागेल. यल्लम्माच्या यात्रेला एकदातरी स्वतः जावं लागेल, पाच घरी जोगवा मागत फिरावं लागेल, स्वतः जोगतीण बनून त्यांच्या वाट्याला काय येतं ते अनुभवावं लागेल. तरच त्यांना हा प्रश्न किमान समजेल तरी."
पण ह्या सगळ्या स्पष्टवक्तेपणाचा त्या बाईंवर काहीही परिणाम झाला नाही! आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या, "मी आता पुण्याला जाऊन एक पत्रकार परिषद घेते, मुंबईला जाऊनहीं एक पत्रकार परिषद घेते, बंगलोरलाही मी जाणार आहे," वगैरे वगैरे. अशा बोलघेवड्या आणि प्रत्यक्ष कामापेक्षा स्वतःच्या प्रसिद्धीतच रस असलेल्या विद्वानांचाही सुभाष जोशींना राजकारण्यांइतकाच तिटकारा होता. हे त्यांचे शरद जोशींबरोबर असलेले एक साम्य म्हणता येईल.
सुभाष जोशी व त्यांचे तरुण सहकारी सायकलवरून सर्व खेड्यांमधून हिंडत, शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशी पत्रके वाटत, लहान लहान सभा घेऊन शेतकऱ्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करत; पण त्या साऱ्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नव्हते. तंबाखू शेतकऱ्यांच्या मनातील व्यापाऱ्यांची दहशत कमी होत नव्हती. तशातच राजकारणी मंडळी वरचेवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न उपस्थित करून व कानडी-मराठी वाद निर्माण करून आपापले नेतृत्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करत व त्यामुळे तंबाखूचा प्रश्न मात्र प्रत्येक वेळी मागे पडत असे. या साऱ्या परिस्थितीवर मात करून चालू असलेल्या सुभाष जोशी यांच्या अविरत प्रयत्नांमुळे निपाणीत एका अर्थाने जमीन नांगरून तयार होती, पण लढ्याचे बीज मात्र अजून पडले नव्हते. तो क्षणही लौकरच आला. नाशिकच्या ऊस आंदोलनावर योद्धा शेतकरी' लिहिणारे विजय परुळकर हे त्यासाठी निमित्त ठरले.
एका स्वयंसेवी संस्थेच्या विनंतीवरून निपाणीत देवदासींच्या मुलींसाठी एखादे वसतिगृह उभारता येईल का याची पाहणी करण्यासाठी परुळकर इथे आले होते. देवदासींचे हे माहेरघरच. तंबाखू कामगार स्त्रियांमध्येही अनेक देवदासी असतात. यल्लम्मा देवीच्या यात्रेला हजारो देवदासी व काही इतर महिलाही इथे देशभरातून येत. वसतिगृह स्थापन करण्यासाठीची आवश्यक ती माहिती त्यांनी तीन-चार दिवसांत मिळवलीदेखील. त्याचदरम्यान सुभाष जोशी त्यांना भेटले व तंबाखूप्रश्नाशी परुळकरांचा परिचय झाला. दोघांमध्ये नाशिकच्या ऊस आंदोलनाबद्दलही बरीच चर्चा झाली. भाई धारियाही तिथे हजर होते. शरद जोशींची कीर्ती त्यांच्यापर्यंत पूर्वीच पोचली होती. त्यांचे नेतृत्व इथल्या मरगळलेल्या शेतकऱ्याला एक नवे चैतन्य देईल हे जाणवले होते, पण शरद जोशींशी त्यांनी पूर्वी कधी थेट असा संपर्कही साधला नव्हता. परुळकरांमुळे आता त्यांना तो मार्ग उपलब्ध झाला. 'निपाणीला या' हे एका जोशींचे आमंत्रण परुळकरांनीच दुसऱ्या जोशींपर्यंत पोचवले.
त्यानंतर अनेकदा परुळकर निपाणीला आले व इथल्या आंदोलनावर 'रक्तसूट' ह्या नावाने त्यांनी 'माणूस' साप्ताहिकात मे-जून-जुलै १९८१मध्ये एक उत्कृष्ट लेखमाला लिहिली. पण का कोण जाणे, 'योद्धा शेतकरी इतकी ही लेखमाला गाजली नाही आणि पुढे पुस्तकरूपात प्रकाशितही झाली नाही.
परुळकरांनी आपले काम चोख बजावले. पुण्याला परतताच त्यांनी शरद जोशींची भेट घेतली. सुभाष जोशी आणि गोपीनाथ धारिया ह्यांचे आमंत्रण त्यांच्यापर्यंत पोचवले. तंबाखू कामगार व शेतकरी ह्यांच्या एकूण परिस्थितीबद्दल सगळी माहिती दिली. निपाणीत घेतलेल्या काही मुलाखतींच्या टेप्स ऐकवल्या. परिणामस्वरूप शरद जोशी विजय व सरोजा परुळकर ह्यांच्यासह ३० जानेवारी १९८१ रोजी पुण्याहून निपाणीला आले. लीलाताईंचे काही नातेवाईक बेळगावात राहात, पण यापूर्वी कधी शरद जोशी निपाणीला आले नव्हते.
आल्या आल्या सगळे सुभाष जोशी ह्यांच्याच घरी गेले. कार्यकर्त्यांची मोठीच गर्दी तिथे उसळली होती. निपाणीत शरद जोशी दाखल झाल्यामुळे सर्वांनाच एकदम नवा उत्साह आला होता. रात्री उशिरापर्यंत सर्वांची चर्चा झाली, काय काय करता येईल याची प्राथमिक आखणीही झाली.
निपाणीत शरद जोशींची प्रतिमा उजळवणारी एक घटना योगायोगाने त्याच दिवशी घडली. शेतकरी संघटनेच्या नाशिक येथील आंदोलनाला इंग्लंडच्या बीबीसी टेलेव्हिजनने बरेच कव्हरेज दिले होते व शरद जोशींची प्रत्यक्ष मुलाखत घ्यायची त्यांची इच्छा होती. भारतीय शेतकऱ्यांचा अन्यायाविरुद्ध उठाव ही त्यांच्या दृष्टीने खूप मोठी घटना होती. त्या दृष्टीने त्यांनी जोशींशी पुण्यात संपर्कदेखील साधला होता. त्यावेळी बीबीसी टेलेव्हिजनची तीन-चार इंग्रज छायाचित्रणकारांची व पत्रकारांची टीम दिल्लीत आली होती; राजीव गांधी ह्यांची मुलाखत घेण्यासाठी. ती संपवून ही टीम पुण्याला येणार होती. पण जोशी निपाणीत असणार म्हटल्यावर तेही इथे आले होते. जोशी आणि परुळकरांच्या पाठोपाठ दोन-तीन तासांतच बीबीसी टेलेव्हिजनची व्हॅन तिथे पोचली. जोशींनी फोनवर सांगितल्यानुसार सरळ सुभाष जोशींच्या घरी ती इंग्रज टीम आली. शरद जोशींच्या पाठोपाठ हा परदेशी टेलेव्हिजनवाल्यांचा ताफा आलेला पाहून निपाणीतील प्रतिष्ठित मंडळी चांगलीच अवाक् झाली होती! त्यांच्या नजरेत शरद जोशींचा भाव त्यामुळे वधारला होता! या टीमने शरद जोशींची तिथेच मुलाखत घेतली व नंतर तिचा समावेश असलेला एक माहितीपटही बीबीसी टेलेव्हिजनवर दाखवला गेला.
दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १ फेब्रुवारी १९८१ रोजी, निपाणीतल्या नेहरू चौकात शरद जोशींची निपाणीमधली पहिली जाहीर सभा झाली. तुडुंब गर्दी झाली होती. आठ-दहा हजार विडी व तंबाखू कामगार स्त्रिया हजर होत्या व सुमारे दोन हजार तंबाखू शेतकरीदेखील.
आपल्या निपाणीतल्या त्या पहिल्या भाषणात शरद जोशी म्हणाले :
"शेतकरी आंदोलनाचं किंवा तुमच्या येथील तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचं मी नेतृत्व करावं असा माझा अट्टहास मुळीच नाही. ह्याउलट मी तुम्हाला असं सांगू इच्छितो, की कुणी जर अशा प्रकारे नेतृत्व करतो म्हणू लागला, तर सर्वप्रथम त्याला नीट तपासून खात्री करून घ्या व ती पटल्यावर मगच त्याच्यावर विश्वास ठेवा."
ह्यानंतर नेहमीप्रमाणे गरिबीचे मूळ शेतीमालाच्या अपुऱ्या किमतीत कसे आहे, शेतीमालाला योग्य किंमत मिळाली की बाकीचे प्रश्न कसे सुटतील, उत्पादनखर्च कसा काढायचा, इंडिया विरुद्ध भारत, दारिद्र्यामुळे त्याच्या आयुष्यात येणारी लाचारी वगैरे आपले मुद्दे त्यांनी मांडले. सगळे श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन त्यांचा शब्दन्शब्द कानात साठवत होते. टाळ्यांच्या प्रचंड गजराने श्रोत्यांनी त्यांना अभिवादन केले व एकप्रकारे त्यांच्या नेतृत्वावर ह्या पहिल्या सभेतच शिक्कामोर्तब झाले.
सुभाष जोशींना निपाणीत किती आदराचे स्थान आहे हे निपाणीत पाऊल टाकल्यापासूनच शरद जोशींना जाणवले होते. म्हणूनच आपण सुभाष जोशींना त्यांच्या स्थानावरून दूर करून शेतकऱ्यांचे नेतृत्व स्वतःकडे घेत आहोत, ती आपली महत्त्वाकांक्षा आहे हे चित्र त्यांना निर्माण होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळेच त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नेतृत्वाचा मुद्दा विस्ताराने स्पष्ट केला होता.
पण तरीही ह्या पहिल्या सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद शरद जोशींना सुखावून गेला व मुख्य म्हणजे स्वतः सुभाष जोशींनीसुद्धा त्यांचा वडील भाऊ म्हणूनच जणू स्वीकार केला. अनौपचारिक गप्पांमध्ये दोघांना एकमेकांची अधिक जवळून ओळख पटत गेली, कौटुंबिक पातळीवरचा परिचयही दृढ होत गेला.
नंतरचे काही दिवस शरद जोशींचा मुक्काम सुभाष जोशींच्या घरीच होता. दोघांनी एकत्रित सगळ्या परिसरात दौरे केले. चिकोडी तालुक्यातील ५१ खेड्यांमध्ये तसेच हुक्केरी व गोकाक ह्या तालुक्यांमध्ये, आणि बेळगाव व कोल्हापूर ह्या शहरांमध्येही त्यांनी शेतकरी व शेतमजूर यांचे अनेक मेळावे घेतले.
ह्या सगळ्यामागे शरद जोशींचा हेतू अगदी स्वच्छ होता आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार प्रत्यक्ष आंदोलन सुरू करण्यापूर्वी ह्या पिकाचा त्यांना शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा होता. तंबाखूवर ब्रिटिश काळापासून, म्हणजे साधारण १९४३ सालापासून, अबकारी कर (एक्साइज) लागू आहे व त्यामुळे तंबाखू पिकाची विस्तृत नोंद अबकारी खाते करत असते. एकूण किती जमिनीवर तंबाखू लावला आहे व विशिष्ट शेतात एकूण किती तंबाखूची झाडे आहेत, ह्याची नेमकी नोंद तलाठ्याकडे करावी लागते. एकूण किती किलो तंबाखू पिकला ह्याचीही नोंद होते. इतर पिके शेतकरी कितीही काळ स्वतःकडे ठेवू शकतो, पण तंबाखूचे पीक ठराविक काळापेक्षा अधिक तो स्वतःकडे ठेवू शकत नाही, ते बाजारात आणून विकावेच लागते. एकूण किती तंबाखू विकला ह्याचीही नोंद होई. अबकारी खात्याकडील व तलाठ्यांकडील या नोंदींचाही जोशींना उपयोग झाला. त्यांच्या अभ्यासानुसार चिकोडी तालुक्यातील सुमारे साठ हजार एकर जमीन तंबाखूखाली होती व तेथील ९५ टक्क्यांहून अधिक भूधारक पाच एकरांहून कमी जमिनीचे मालक होते. म्हणजेच अनेकांना वाटायचे त्याप्रमाणे तंबाखूचा शेतकरी हा बडा शेतकरी आहे हा भ्रमच होता, प्रत्यक्षात ९५ टक्के शेतकरी हे अल्पभूधारकच होते.
जोशींनी प्रथम शेतीवरील खर्चाचा व्यवस्थित हिशेब काढला. एका एकरात सरासरी २७० किलो तंबाखू निघत होता व त्यावर एकूण सरासरी खर्च रुपये ३०८० इतका होता. म्हणजेच किलोमागे उत्पादनखर्च होता अकरा रुपये चाळीस पैसे. त्याच्या विक्रीचे मात्र सध्या किलोमागे सरासरी साडेसहा रुपये ह्या दराने जेमतेम रुपये १७५५ मिळत होते. म्हणजेच त्याला प्रत्येक किलोच्या विक्रीमागे चार रुपये नव्वद पैसे किंवा एका एकरामागे रुपये १३२५ नुकसान होत होते. तो कायमच कर्जबाजारी असण्याचे तेच प्रमुख कारण होते. पण उत्पादनखर्च कसा काढायचा ह्याची त्या शेतकऱ्याला कल्पनाच नसल्याने आपण प्रत्यक्षात ह्या सौद्यात किती नुकसानीत जातो आहोत ह्याची त्याला जाणीवच नव्हती. जोशी यांनी उत्पादनखर्च कसा काढायचा हे आधी शेतकऱ्यांना दाखवून दिले.
याहूनही अधिक भाव देणे व्यापाऱ्यांना अगदी सहज परवडण्यासारखे होते हेही त्यांच्या लक्षात आले होते. एक किलो तंबाखूपासून ५००० विड्या तयार होत होत्या व दर एक हजार विड्यांमागे एक रुपया अबकारी कर होता. म्हणजेच एक किलो तंबाखूपासून सरकारला पाच रुपये अबकारी कर म्हणून मिळत, तर शेतकऱ्याला मात्र ह्या एक किलो तंबाखूच्या विक्रीतून फक्त साडेसहा रुपये मिळत. पुढे तर सरकारने विडीवरचा अबकारी कर दुप्पट केला, म्हणजेच एक हजार विड्यांमागे दोन रुपये एवढा केला. त्यामुळे सरकारला दर किलो तंबाखूमागे दहा रुपये मिळू लागले! शेतकऱ्याला मिळणारा तंबाखूचा भाव मात्र तेवढाच, म्हणजे किलोला साडेसहा रुपये, राहिला! म्हणजेच तंबाखू शेतीचा खरा फायदा राबणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा अबकारी कर गोळा करणाऱ्या सरकारलाच होत होता!
केंद्र सरकारला १९७९-८० या सालात एक्साइज ड्युटी म्हणून ह्या भागातून २१ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते व शेतकऱ्यांना मात्र उत्पादनखर्चापेक्षाही खूप कमी भाव मिळत असल्याने त्यांचे त्या वर्षी बारा कोटी रुपये नुकसान झाले होते.
जोशींनी केलेले एकूण हिशेब हे इतके शास्त्रशुद्ध होते, की व्यापाऱ्यांनी व सरकारी अधिकाऱ्यांनी वा अन्य कोणीही त्याला आंदोलनापूर्वी वा नंतरही कधी आक्षेप घेतला नव्हता. आपली वैचारिक बैठक अशा प्रकारे पक्की झाल्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी निपाणीला तंबाखू शेतकरी व कामगार यांचा एक मोठा संयुक्त मेळावा शरद जोशींनी घेतला. त्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून २१, २२ व २३ फेब्रुवारी ह्या तीन दिवसांत त्यांनी बेळगाव व कोल्हापूर ह्या जिल्ह्यांचाही दौरा केला होता; एकूण १५ सभा घेतल्या होत्या. त्यात एका स्थानिक कृतिसमितीची स्थापना केली गेली. कृतिसमितीचे अध्यक्ष होते कर्नाटकचे वरिष्ठ गांधीवादी नेते अण्णू गुरुजी. इतर सदस्य होते कोल्हापूरचे एस. के. पाटील, संकेश्वरचे बसगौंडा पाटील, अकोळचे आय. एन. बेग आणि सातप्पा शेटके, गळतग्याचे एस. टी. चौगुले, एकसंब्याचे दत्ता पांगम, कापशीचे शामराव देसाई, निपाणीचे गोपीनाथ धारिया ऊर्फ भाई आणि आयेशा दिवाण ऊर्फ चाची.
जोशींनी सर्वांच्या वतीने शासनाला पुढील मागण्या सादर केल्या :
- तंबाखूला सध्या दिला जाणारा किलोमागे सहा ते सात रुपये हा दर अत्यंत कमी असून त्यात शेतकऱ्याचे वर्षानुवर्षे प्रचंड नुकसान होत आले आहे. तंबाखूच्या दर्ज्यानुसार एका किलोमागे किमान १० रुपये, १२ रुपये किंवा १५ रुपये एवढा उत्पादनखर्चावर आधारित असा भाव मिळायलाच हवा. हा भावदेखील खूप कमीच आहे, पण त्यामुळे फायदा नाही झाला तरी निदान त्याचा उत्पादनखर्चतरी बह्वंशी भरून निघेल. तो भाव द्यायलाही जर व्यापारी तयार झाले नाहीत, तर सरकारने तंबाखूची खरेदी करावी व एवढा भाव तरी शेतकऱ्याला मिळवून द्यावा.
- सूट म्हणून वेगवेगळ्या प्रकारांनी वजनात कपात न करता एक बोद (म्हणजे ६० किलो) तंबाखूमागे फक्त दोन किलो सूट पकडावी.
- मार्केट सेस व एन्ट्री फी मार्केट ॲक्टनुसार व्यापाऱ्यांनीच भरायची असते. पण सध्या शेतकऱ्याकडून ती जुलमाने वसूल केली जाते. तसे न करता यापुढे तो कर व्यापाऱ्यांनीच भरावा.
- वाहतुकीचा खर्च शेतकऱ्याकडून वसूल केला जाऊ नये. साखर कारखाने ज्याप्रमाणे उसाच्या वाहतुकीचा खर्च स्वतः उचलतात, त्याचप्रमाणे इथेही वाहतुकीचा खर्च तंबाखू विकत घेणाऱ्या विडीकारखानदारांनी उचलावा.
- खरेदी-विक्रीचा करार लेखी व्हावा व त्याची एक प्रत शेतकऱ्यालाही दिली जावी.
- माल बाजारात आणल्यानंतर सात दिवसांच्या आत त्याचे वजन केले जावे.
- झालेल्या हिशेबाचे पैसे वजन केल्यानंतर लगेचच शेतकऱ्याला दिले जावेत व ते शक्य नसेल तर निदान पुढील सात दिवसांच्या आत ते हमखास दिले जावेत.
सभेत एकमताने मंजूर झालेल्या ह्या मागणीपत्राची प्रत त्याच दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी, अन्नमंत्री राव बिरेंद्र सिंग, व्यापारमंत्री प्रणवकुमार मुखर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री गुंडू राव व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले यांना रजिस्टर्ड पोस्टाने रवाना केली गेली.
खरे तर ह्यांतील कुठलीच मागणी अवास्तव अशी नव्हती, पण तरीही सरकारी यंत्रणा इतकी मुर्दाड बनली होती, की १४ मार्चपर्यंत ह्यांपैकी एकाकडूनही त्या पत्राची साधी पोचसुद्धा आली नाही; काही कृती करणे तर दूरच राहिले.
सरकारकडून ठोस असे काहीच घडत नाहीए हे बघितल्यावर शेवटी ठरल्याप्रमाणे १४ मार्च १९८१ रोजी दुपारी तीन वाजता रास्ता रोकोला सुरुवात झाली. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग चारवर निपाणीला वळसा घालून जाणारा बायपास आणि निपाणी गावात जाणारा रस्ता ह्यांच्या नाक्यावर शेतकरी ठिय्या देऊन बसले. हे स्थळ निपाणीपासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर होते.
'शेतकरी संघटनेचा विजय असो', 'शरद जोशी झिंदाबाद' अशा घोषणा तारस्वरात दिल्या जात होत्या. हळूहळू चिकोडी तालुक्यातील ५१ छोट्यामोठ्या खेड्यांतील शेतकरी वेगवेगळ्या मिरवणुकांनी रास्ता रोको चालू होते तिथे येऊ लागले. त्यांच्यासोबत सातशे बैलगाड्यादेखील होत्या. हुक्केरी व गोकाक तालुक्यांतील गावांमधील शेतकरी, तसेच निपाणीतील तंबाखू कामगार व विडी कामगार हेदेखील रास्ता रोकोत सामील झाले. त्यांची एकूण संख्या पहिल्याच दिवशी पंधरा हजारावर गेली. महामार्गावर या साऱ्यांनी आपापल्या राहुट्या उभारल्या. तिथे कदाचित अनेक दिवस राहावे लागेल ह्या बेताने आपापले सामानसुमान घेऊनच हे सगळे आले होते. त्याशिवाय, दिवसभर आंदोलनात सहभागी होणारे, पण रात्री झोपायला तेवढे आपापल्या घरी जाणारे, असेही अनेक लोक तिथे येऊन दाखल होऊ लागले.
ही सर्व मंडळी आपापली शेतीची कामे सोडून इथे आली होती. त्यात जे शेतमजूर होते ते आपली रोजची पाच रुपयांची मजुरी बुडवून आंदोलनात सामील झाले होते. पैसे देऊन एखाद्या आंदोलनासाठी माणसे गोळा करायची प्रथा त्यावेळीही होतीच; स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन लोक आंदोलनात येत आहेत हे दृश्य खूप दुर्मिळच होते.
त्याच दिवशी रात्री कृतिसमितीचे अध्यक्ष अण्णू गुरुजी ह्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बंगलोरला मुख्यमंत्री गुंडू राव यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी रवाना झाले. दुसऱ्या दिवशी गुंडू राव त्यांना भेटले. "तुम्ही अतिशय शांतपणे हे आंदोलन सुरू केले आहे ही फार चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. मी ह्याबद्दल केंद्र सरकारशी बोलतो, कारण ह्याबाबतचे निर्णय शेवटी केंद्र सरकारच घेऊ शकते," असे मुख्यमंत्री शिष्टमंडळाला म्हणाले. पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी तसे काहीच केले नाही. इकडे 'रास्ता रोको'तील वातावरण तापत गेले होते. पुढल्या तीन-चार दिवसांत दिवसभरच्या आंदोलनात सामील होणाऱ्यांची संख्या चाळीस हजारांवर जाऊन पोचली. ह्या परिसराला 'आंदोलन नगरी' असेच सार्थ नाव पडले होते. काही शेतकरीतर अगदी वाजत गाजत आणि हत्तीने मिरवणूक काढून आंदोलन नगरीत येऊन पोचले होते. शेतकरी आंदोलनात हत्तींचा सहभाग हा प्रकार इथे प्रथमच बघायला मिळाला! महामार्गाचा दोन-तीन किलोमीटर लांबीचा पट्टा या जनसमुदायाने व्यापला होता.
शरद जोशींचा रात्री झोपण्यापुरता मुक्काम तसा निपाणीत सुभाष जोशी यांच्या घरी होता, पण प्रत्यक्षात जवळजवळ सगळा दिवस ते ह्याच महामार्गावर स्वतःसाठी उभारलेल्या एक छोट्या झोपडीतच राहत होते; कधी कधी रात्रीही त्यांचा मुक्काम ह्या झोपडीतच असे. आपला नेता आपल्याबरोबरच राहतो आहे हे दृश्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने अगदी अपरिचित व मनोधैर्य वाढवणारे होते. अधूनमधून सभांसाठी इतर गावांमध्ये जोशी जात, पण एरव्ही मात्र ते आंदोलनाचे पुढले सर्व तेवीस दिवस इथेच होते. रोज सकाळ-संध्याकाळ ते महामार्गावर फेऱ्या मारत. अधिकाधिक शेतकऱ्यांशी स्वतः बोलत. त्यांना धीर देत.
सकाळी लौकर उठून आंदोलक प्रातर्विधी उरकत. त्यासाठी बऱ्यापैकी सोय महामार्गाच्या दुतर्फा केली होती. आंघोळीचीही सोय होती. शेतकऱ्यांनी स्वतःच अंतराअंतरावर आडोसे उभे करून शौचकूप व न्हाणीघरांची तात्पुरती सोय केली होती. रस्त्यात कठेही खरकट्या पत्रावळ्यांचे ढीग, कागदाचे बोळे वा माणसांची विष्ठा दिसत नव्हती; कुठेही माशा घोंघावत नव्हत्या. ही स्वच्छता म्हणजे मोठे नवलच होते; एरव्ही आपापल्या घरांतही कदाचित ते गरीब शेतकरी इतकी स्वच्छता पाळू शकत नसतील.
जरा उजाडले की आसपासच्या गावांतील लोकही आंदोलनात सामील होण्यासाठी तिथे दाखल होत. आपल्याबरोबर ते महामार्गावरील राहुट्यांत राहणाऱ्या अन्य आंदोलकांसाठी भाकऱ्या- चटणी- कांदा- पिठले वगैरे पदार्थ गाड्या भरभरून घेऊन येत. शिवाय पिंपेच्या पिंपे भरून आंबील आणली जाई. ज्वारी अथवा नाचणीच्या पिठात ठेचलेली लसूण घालून बनवलेले हे पेय ह्या भागात खूप लोकप्रिय. आंदोलननगरीत पाण्याचे काही नळही आले होते व काही ठिकाणी विजेची कनेक्शन्सदेखील मिळवली गेली होती; त्यामुळे काही ठिकाणी झाडांना ट्यूब लाइट्स लटकत होत्या.
सुरुवातीला आंदोलकांना वाटले होते, की आपली एकजूट बघून दोन-तीन दिवसांत सरकार नरम येईल व आपल्या मागण्या मान्य करेल; तशाही त्या अगदी न्याय्य व साध्याच आहेत. पण प्रत्यक्षात सरकार इतके कोडगे बनले होते, की त्याच्याकडून काहीच हालचाल होत नव्हती. महात्मा गांधी सत्याग्रह हे अस्त्र प्रभावीपणे ब्रिटिश सरकारविरुद्ध वापरू शकले, कारण ते सरकार अधिक जनताभिमुख होते व जनतेतील असंतोषाची लगेच दखल घेण्याइतके संवेदनशील होते. पण इथले सरकार मुळातच जनताभिमुख व संवेदनशील नसल्याने सत्याग्रहाचे तेच हत्यार इथे मात्र अगदीच बोथट ठरत होते; किंबहुना गेंड्याच्या कातडीच्या सरकारवर त्या अस्त्राचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता. अशा स्थितीत आंदोलनकर्त्यांचा उत्साह कायम टिकवणे हे नेत्यांपुढचे एक मोठे आव्हान होते. त्यासाठी रोज काही ना काही उपक्रम राबवले जात. उदाहरणार्थ, १८ मार्च रोजी आंदोलन नगरीत ३००० शेतकऱ्यांनी एक दिवसाचे सांघिक उपोषण केले. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेले उपोषण ह्यापूर्वी कधी कोणी बघितले नसेल. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास खूप वाढवणारी ही घटना होती.
त्याशिवाय नेत्यांची, मुख्यतः शरद जोशींची, रोज संध्याकाळी होणारी भाषणे हेही एक मोठे आकर्षण असे. एका ट्रेलरवर पाण्याची रिकामी टाकी ठेवून स्टेज बनवले जाई. त्या टाकीवर उभे राहून, हातात माइक घेऊन जोशी भाषण करत. निपाणीतील एक व्यापारी म्हणाले होते, "या जोश्यांचे भाषण रोज ऐकावेसे वाटते. कधी कंटाळा म्हणून येत नाही." रोज संध्याकाळी पाचच्या सुमारास ते आपले दुकान बंद करत व स्वतःतर भाषणाला येऊन बसतच, पण शिवाय आपल्या सर्व नोकरांनाही भाषण ऐकायला पाठवत. निपाणीतील अनेक दुकानदारांच्या बाबतीत हे खरे होते.
बहुसंख्य आंदोलक हे कानडीभाषक होते, पण अल्पसंख्य असलेल्या मराठी शेतकऱ्यांबरोबर ते अतिशय खेळीमेळीने वागत होते. आंदोलकांमध्ये स्त्रियांचे प्रमाणही भरपूर होते. रात्री जेवणानंतर तर एखाद्या जत्रेसारखे आनंदाचे वातावरण तिथे तयार होई. सुरुवातीला एखादा वक्ता आज संध्याकाळी भाषणांत कोण काय बोलले ते थोडक्यात कानडीत सांगे. त्यानंतर सगळे आंदोलक रात्री उशिरापर्यंत चांदण्यांच्या उजेडात तालासुरात भजने म्हणत. गौळणी व भारुडेही म्हणत. आपापली वाद्ये त्यांच्याकडे होती. अशी भजने म्हणण्याची परंपरा उत्तर कर्नाटकात पूर्वापार चालत आलेली आहे. अर्थात मराठी भजनेही होत. कानडी शेतकरीदेखील उत्साहाने मराठी भजने म्हणत व मराठी शेतकरीही तितक्याच उत्साहाने कानडी भजने म्हणत. भाषेची अडचण जराही जाणवत नसे. सर्व शेतकऱ्यांच्या छातीवरील बिल्ले, तसेच राहुट्यांवरील फलक हे मराठीतच होते व शरद जोशींची आंदोलन नगरीत रोज संध्याकाळी होणारी भाषणेही मराठीतच होत होती. पण त्याला कोणाही कानडी बोलणाऱ्याचा विरोध नव्हता.
आपल्या एका जाहीर भाषणात जोशी म्हणाले, "आमच्या शेतीमालाला योग्य भाव द्यायला जर गुंड्र राव तयार असतील, तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात घालायला शेतकऱ्यांच्या वतीने मी तयार आहे आणि तसा भाव जर अंतुले देणार असतील, तर अख्खा कर्नाटक महाराष्ट्रात घालायलाही मी तयार आहे." हे उद्गार त्यांनी निपाणीतल्याच नव्हे, तर हसन येथील भाषणातही काढले होते व सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत केले होते. राजकारण्यांनी ज्याचे वर्षानुवर्षे इतके भांडवल केले होते, तो महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद किंवा मराठी- कन्नड भाषावाद ह्यांचा ह्या आंदोलनात मागमूसही नव्हता.
आंदोलननगरीत एक सामुदायिक उपाहारगृह चालवले जात होते व नाममात्र किमतीत तिथे खाद्यपदार्थ उपलब्ध होते. त्याशिवाय निपाणीतील असंख्य फेरीवालेही तिथे लोकांच्या गरजा भागवायला हजर झाले होते. निपाणीतील छोट्या छोट्या दुकानदारांनीही आपापले स्टॉल्स तिथे उभारले होते. प्रत्येक गोष्ट स्वस्तात उपलब्ध होती. निपाणीत एक कप चहाला पंचवीस पैसे पडत, तर इथे वीस पैसे. कलिंगडाची फोड निपाणीत तीस पैसे, तर इथे दहा पैसे. सगळे स्टॉल्स स्वच्छ होते, मालातही भेसळ अजिबात नव्हती. चोरीमारीचा तर एकही प्रकार संपूर्ण आंदोलनकाळात एकदाही घडला नाही. किसान मेळावे हा प्रकार आता देशात नवीन राहिलेला नाही. खूपदा राजकीय पक्ष आपल्या शक्तिप्रदर्शनासाठी असे मेळावे भरवत असतात. त्यासाठी पैसे देऊन ट्रक भरभरून शेतकरी आणले जातात. दिल्ली हे तर अशा किसान मेळाव्यांचे प्रथम पसंतीचे शहर असते. शेतकरी आणि खाद्यपदार्थ विकणारे स्थानिक फेरीवाले यांच्यात अशा सर्वच किसान मेळाव्यांत नेहमीच हाणामाऱ्या होत असतात. किसान मेळावा कोणत्याही पक्षाचा असो, स्टॉल्स हमखास लुटले जातात. रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या विक्रेत्यांना तर हा अनुभव नेहमीच येतो. म्हणूनच किसान मेळावा म्हटले की फेरीवाले तिथे फिरकतच नाहीत. पण इथला अनुभव मात्र अगदी वेगळा होता. इथे जवळ जवळ दीडशे स्टॉल्स होते व सर्व उत्तम चालले होते.
१८ मार्चला सांघिक उपोषणाच्या आदल्या रात्री सगळे फेरीवाले म्हणाले, "उद्या तुमचे उपोषण असल्याने आमचे काहीच पदार्थ विकले जाणार नाहीत. तेव्हा आमचे स्टॉल्स आम्ही उद्या बंद ठेवतो व मालही इथेच ठेवून आम्ही निपाणीला जातो. कारण तो निपाणीला परत नेणे ह्या गर्दीत अशक्य आहे." त्यावर आंदोलक म्हणाले, "पण मालाची जबाबदारी आम्ही कशी घेणार?" ह्यावर फेरीवाल्यांचे म्हणणे होते, "आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे." आणि त्याप्रमाणे सगळे स्टॉल्स १८ मार्चला बंद होते; त्यांच्यातील माल तिथेच होता, फेरीवाले मात्र सगळे तसेच ठेवून एक दिवसासाठी निपाणीला गेले होते.
आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी फेरीवाले परत आले. तेव्हा एकाही फेरीवाल्याचा स्टॉल लुटला गेला नव्हता, कोणाच्याही मालाला शेतकऱ्यांनी हातसुद्धा लावला नव्हता! आंदोलन नगरीत हे जे घडले, ते कुठल्याही गावात घडणे अशक्य होते. परुळकरांना एक फेरीवाला म्हणाला,
"यल्लमाच्या जत्रेत आम्ही जेव्हा दुकान उघडतो, तेव्हा देवीच्या दर्शनाला आलेली अनेक माणसे आमचे पैसे बुडवतात, माल पळवतात. पण इथे तंबाखूदेवीच्या यात्रेला जमलेल्या ह्या शेतकऱ्यांनी आमची एक पैसुद्धा बुडवली नाही."
चाकणच्या कांदा आंदोलनाप्रमाणे इथेही जोशींनी आंदोलकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती. निपाणीच्या डॉक्टरांनी एक खास तंबू उभारला होता व तिथे ते औषधोपचार करत असत. भोज ह्या गावचे तरुण सरपंच डॉ. अद्गौंडा पाटील आपला गावात जोरात चालणारा दवाखाना सोडून इथे १४ मार्चपासून संपूर्ण वेळ हजर होते. त्याच गावचे डॉ. माने व डॉ. सदलगे यांचीही त्यांना मदत होत होती. डॉ. ध्रुव मंकड हा मुंबईतील एक उमदा तरुण डॉक्टर संपूर्ण आंदोलनकाळात तिथेच तळ ठोकून होता. दुर्गम व कुठलाच डॉक्टर नसलेल्या खेड्यांत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही विनामूल्य वैद्यकसेवा म्हणजे एक पर्वणीच होती.
गुरुवार, दोन एप्रिलला आंदोलन नगरीपासून निपाणी शहरापर्यंत, तिथून शहराची मुख्य बाजारपेठ व इतर महत्त्वाचा भाग, आणि तिथून मग परत आंदोलन नगरीत असा एक भव्य मोर्चा शेतकऱ्यांनी काढला. मोर्च्यात सुमारे ४०,००० शेतकरी हजर होते; पण सगळा मोर्चा इतका शिस्तबद्ध होता, की आपल्या लाठ्या हलवत रस्त्याच्या कडेला उभे राहण्यापलीकडे पोलिसांना काहीच काम नव्हते. एरव्ही मोर्चा म्हणजे काही ना काही गडबड व्हायचीच, पण हा मोर्चा इतका मोठा असूनही इतका सुनियोजित व शांत कसा, ह्याचे पोलिसांनाच नव्हे तर सगळ्या निपाणी गावालाच खूप आश्चर्य वाटले होते. ज्याच्यात्याच्या तोंडी त्यादिवशी तोच एक विषय होता.
वयोवृद्ध गोपीनाथ धारिया ऊर्फ भाई हेही ह्या मोर्च्यात आवर्जून सामील झाले होते. चालताना एकदा ठेच लागून ते पडले. हातापायाला जबर मार लागला, डोके दगडावर आपटून रक्त येऊ लागले. 'भाई, तुम्ही एखाद्या खुर्चीत बाजूला बसून राहिलात तरी चालेल, असे सांगत अनेक नेत्यांनी त्यांना थोडा आराम घ्यायचा सल्ला दिला. पण भाईंचा उत्साह कायम होता. तशाही परिस्थितीत ते शेवटपर्यंत त्या सुमारे आठ किलोमीटरच्या मोर्ध्यात कडक उन्हाची पर्वा न करता चालत होते. खरेतर ते एक बडे बागाइतदार होते, प्रतिष्ठित कुटुंबातले होते; पण एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच वावरत होते. स्वतःसाठी कुठलीही खास सवलत त्यांना नको होती.
पुण्याच्या माणूस साप्ताहिकाचे संपादक श्रीभाऊ माजगावकर त्या दिवशी निपाणीत हजर झाले. नाशिक आंदोलनाच्या वेळीही ते हजर होते. त्यांच्याच आग्रहावरून परुळकरांनी 'योद्धा शेतकरी' व पुढे 'रक्तसूट' या लेखमाला लिहिल्या. मोर्चा पाहून ते अतिशय प्रभावित झाले होते. म्हणाले, "हा विराट मोर्चा म्हणजे सत्याग्रही शेतकऱ्यांचा अजस्त्र आणि पवित्र असा जणू गंगौघ. नुसत्या दर्शनानेदेखील पावन व्हावे अशी ही आगळी गंगा!"
योगायोग म्हणजे 'सोबत'कार ग. वा. बेहेरे हेही त्या दिवशी निपाणीला येऊन आंदोलनाची पाहणी करून गेले.
शुक्रवार, तीन एप्रिलला निपाणी गावात मूठभर व्यापारी आणि त्यांच्या चेल्यांनी एक मोर्चा काढला होता. आदल्या दिवशीच्या शेतकऱ्यांच्या मोर्च्याला उत्तर म्हणून. निपाणीतील गावकऱ्यांचा ह्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा नाहीए हे दाखवणे हा त्यामागचा उद्देश. मोर्च्यात तशी दीड-दोनशेच माणसे होती, पण त्यांनी जाता जाता सुभाष जोशी यांच्या गावातील घरावर दगडफेक केली, घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या मोटार सायकलची व रस्त्यात उभ्या केलेल्या इतरही अनेक मोटार सायकलींची नासधूस केली. शेतकरीनेत्यांच्याविरुद्ध नालस्ती करणाऱ्या घोषणा दिल्या. अनेक घरांवर दगडफेक केली. गोपीनाथभाईंच्या घराच्या तर सगळ्याच खिडक्या दगडफेक करून फोडल्या गेल्या. नंतर गावात मोर्च्याचे रूपांतर एका सभेत झाले. सभेत मात्र काही स्थानिक नेत्यांनी अनपेक्षितपणे शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. व्यापाऱ्यांची तशी थोडीशी फजितीच झाली.
दगडफेकीची व मोटार सायकलींची नासधूस केल्याची बातमी आंदोलननगरीत पोचताच अकोळ व निपाणीमधले दीड-दोन हजार चिडलेले तरुण शेतकरी लगेच प्रतिमोर्चा घेऊन निपाणीत जायला निघाले. प्रत्येकाच्या हातात झेंडे लावलेल्या लाठ्या होत्या. व्यापाऱ्यांच्या चेल्यांना चांगला धडा शिकवायचा त्यांचा निर्धार होता. काही स्थानिक नेत्यांनी उत्साहाच्या भरात त्यांना तसे करायला प्रोत्साहनही दिले, पण जोशींनी आपल्या भाषणात त्यांना थोपवले. 'कुठल्याही प्रकारे आपण दुसऱ्यांवर हात उगारायचा नाही. एकही काठी आंदोलनात दिसता कामा नये. समोरचा कसाही वागो, आपण मात्र संयम, शिस्त आणि शांतता पाळायची.' असा जोशींचा आदेश होता. त्याचबरोबर आजच्या निपाणीतील हिंसक मोर्च्याला जबाबदार असलेल्या वीस व्यापाऱ्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची एक यादीही त्यांनी आपल्या भाषणात दोन वेळा वाचून दाखवली व सहा एप्रिलपर्यंत त्यांना पोलिसांनी अटक केली नाही, तर त्यानंतर ५०,००० शेतकरी सत्याग्रहासाठी निपाणी गावात प्रवेश करतील असेही त्यांनी जाहीर केले.
'सहा एप्रिलच्या दुपारपर्यंत सगळ्या आंदोलकांना आम्ही इथून हुसकावून लावणार आहोत,' असे आश्वासन एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यापाऱ्यांना दिल्याची बातमी शेतकरीनेत्यांच्या कानावर आली होती, पण त्यांनी त्याची फारशा गांभीर्याने दखल घेतली नाही.
अलिबागचे एक प्राध्यापक व समीक्षक अरविंद वामन कुळकर्णी यांच्याविषयी इथे लिहायला हवे. साहित्यक्षेत्रातील ज्या फार थोड्या व्यक्तींनी त्या काळात शरद जोशींच्या आंदोलनाची आस्थेने दखल घेतली त्यांच्यातले हे एक. त्याआधी पाच महिने, गेल्या नोव्हेंबरमध्ये, त्यांनी ऊस आंदोलन जवळून पाहण्यासाठी नाशिकचा दौराही केला होता; पण त्यावेळी जोशी तुरुंगात असल्याने दोघांची गाठ पडली नव्हती. पुढे कुळकर्णीनी शेतकरी
त्याच रात्री उशिरा त्यांची शरद जोशींबरोबर गाठ पडली. जोशींना प्रत्यक्ष भेटण्याचा त्यांचा तो पहिलाच प्रसंग. "मुख्यमंत्र्यांच्या गावचे तुम्ही! आम्हाला वाटलं हेलिकॉप्टरनेच याल!" असे म्हणत, थट्टामस्करी करतच जोशींनी दोघांचे स्वागत केले. प्रत्यक्ष रास्ता रोको जिथे चालू होते तिथेच एका छोट्या झोपडीत स्वतः जोशी यांनीही त्या रात्री मुक्काम केला होता. हे अगदी अनपेक्षित होते. बहुतेकदा नेते मंडळी दूर कुठेतरी सरकारी डाक बंगल्यात किंवा एखाद्या चांगल्या हॉटेलात मुक्काम करत असत. जोशींचा साधेपणा सर्वांनाच भावणारा होता. ज्या अनौपचारिकपणे जोशी सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर मिळूनमिसळून वागत होते त्याचेही दोघांना खूप आश्चर्य वाटले.
आपली मोटरसायकल ह्या दोघांनी शरद जोशींच्या झोपडीच्या बाहेर ठेवली होती व पुढले जवळजवळ चार तास गप्पांच्या ओघात ते तिथे फिरकलेही नाहीत. मोटरसायकलवर आपल्या दोघांचे सामान ठेवलेले आहे हे ते पार विसरूनही गेले होते. पण त्यांनी ठेवलेले त्यांचे सर्व सामान तसेच्या तसे सुरक्षित राहिले होते, ही गोष्ट कुळकर्णी यांनी नंतर आपल्या लेखात आवर्जून नमूद केली होती. रात्री अकरा वाजता सगळ्यांचे एकत्रच जेवण झाले. पिठले, भाकरी, चटणी, आंबील व शेवटी दहीबुत्ती. हजारो आंदोलक शेतकऱ्यांसोबत उघड्यावरती एकत्र जेवणे हा खूप रोमांचक अनुभव होता. जेवताना दिवसभर काय घडले व उद्या काय करायचे आहे ह्याचीच चर्चा सुरू होती.
ह्या आंदोलनात कुळकर्णी व म्हात्रे यांना जोशी यांचे व शेतकरी संघटनेचे जे दर्शन घडले त्यामुळे दोघेही अतिशय प्रभावित झाले. दोघांनीही पुढे आंदोलनात सक्रिय भाग घेतला. आंदोलनाविषयी कुळकर्णीनी सोबत साप्ताहिकात व इतरत्रही बरेच लेखन केले. म्हात्रे यांनीतर त्यानंतर आपले सगळे जीवनच शेतकरी संघटनेला अर्पण केले.
दोन आणि तीन एप्रिलच्या सभा विशेष महत्त्वाच्या होत्या. कारण निपाणीतील शेतकऱ्यांनी काढलेल्या व नंतरच्या व्यापाऱ्यांनी प्रायोजित केलेल्या प्रतिमोर्च्यामुळे वातावरण बरेच तंग झाले होते. इतके दिवस रास्ता रोको करून शेतकरीही आता काहीसे इरेस पेटले होते. संयम कमी होत चालला होता. ह्या सभांमधून वेगवेगळ्या नेत्यांनी मांडलेले काही विचार इथे संक्षेपाने मांडणे उपयुक्त ठरेल. परुळकर यांनी आपल्या लेखमालेत उद्धृत केलेल्या भाषणांमधील हे अंश आहेत.
तंबाखू कामगार महिलांच्या नेत्या अक्काताई कांबळे म्हणाल्या :
"माझ्या शेतकरी बांधवांनो, डीएसपी काय, पण त्याचा बाप आला तरी तुम्ही रस्त्यावरून उठू नका! ज्यावेळेला हे दलाल शेतकऱ्यांच्या पाया पडतील, तेव्हाच हे आंदोलन संपणार, त्याआधी नाही. आमच्या तंबाखूला योग्य भाव मिळाल्याशिवाय आम्ही हलणार नाही, आम्हाला खुशाल अटक कर, असं डीएसपीला सांगायचं.... तुमच्यासाठी आम्ही आमच्या रोजगाराची, मुला-बाळांचीसुद्धा फिकीर करायची नाही असं ठरवलंय. वखारीतील आमचं काम बंद पडलं तर आम्ही दगड फोडून पोट भरू, पण आता ह्या दलालांना सोडणार नाही. आम्ही आमच्या नवऱ्यांनापण सांगितलंय, की जरी आम्ही तुमच्या लग्नाच्या बायका असलो, तरी आंदोलन चालू आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या कोणी नव्हेत. आम्ही फक्त आंदोलनातल्या सत्याग्रही आहोत!" अकोळ युवक संघाचे नेते आय. एन. बेग म्हणाले :
"सगळ्या तंबाखू शेतकऱ्यांच्या वतीने आमच्या ह्या वाघिणींना, ह्या कामगारभगिनींना मी सर्वांत प्रथम लवून मानाचा मुजरा करतो. शेतकऱ्यांना त्यांनी जो अभूतपूर्व पाठिंबा दिला आहे, त्याला इतिहासात तोड नाही.... काल संध्याकाळपासून निपाणांमध्ये जाणूनबुजून दहशतीचं वातावरण निर्माण करण्यात येत आहे. तंबाखू व्यापाऱ्यांनी व त्यांच्या पैशावर निवडून आलेल्या आमच्या आमदार मंडळींनी इथून पुढं सत्याग्रही शेतकऱ्यांना निपाणीत पाय ठेवू द्यायचा नाही असा चंग बांधला होता. पण त्यांचा हा प्रयत्न कामगार स्त्रियांनी उधळून लावला... आमच्या निपाणीमध्ये मुसलमानांचे पाच मोहल्ले आहेत; त्यांतील बागवानांचा मोहल्ला व्यापाऱ्यांच्या बाजूला आणि इतर चार मोहल्ले सर्वसामान्य जनतेच्या बाजुला, असं चित्र आहे. ह्या बागवान मुसलमानांच्यातील काही व्यापारी आहेत, काहींचा ट्रकचा व्यवसाय आहे. माझ्या ह्या बागवान बांधवांना मी एक इशारा देऊ इच्छितो- त्यांनी वेळीच सावध होऊन व्यापाऱ्यांचा नाद सोडावा आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं. ... आज सकाळपासून निपाणीत 'शरद जोशी ब्राह्मण आहेत, सुभाष जोशी ब्राह्मण आहेत, ह्या ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली जनसंघाचे एजंट घुसले आहेत' वगैरे अतिशय खालच्या पातळीवरचा प्रचार व्यापाऱ्यांच्या चमच्यांनी सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या वतीने मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, की हा लढा कुणा ब्राह्मणासाठी, हरिजनासाठी, मराठ्यासाठी, लिंगायतासाठी किंवा मुसलमानासाठी चाललेला नाही. इथं जातीचा, धर्माचा, भाषेचा कुठलाच प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. मी स्वतः मुसलमान आहे. ह्या भागातील मुसलमान शेतकऱ्यांच्या वतीनं मी सांगतो, की शरद जोशी हे आम्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने किसानांच्या क्रांतीचे पैगंबर आहेत!"
ह्यानंतर सुभाष जोशी ह्यांचेही भाषण झाले. आंदोलन काळातील त्यांचे हे एकमेव भाषण. स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे आंदोलनाचे सूत्रसंचालन करणारे हे हाडाचे कार्यकर्ते भाषणबाजीसाठी कधीच प्रसिद्ध नव्हते. पण त्यांची कळकळ त्यांच्या देहबोलीतूनच व्यक्त व्हायची. आज सगळ्यांनी खूपच आग्रह धरला म्हणून केवळ ते भाषणासाठी उभे राहिले. ते उभे राहताच सर्व शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले:
"शेतकऱ्यांनी मोर्चा काढला, तेव्हा निपाणीतील घराघरातील भगिनींनी बाहेर येऊन शरद जोशींच्या पायावर घागरीने पाणी घातलं. याउलट आज व्यापाऱ्यांचा मोर्चा घरावरून जाताना ह्याच भगिनींनी दारंखिडक्या बंद करून घेतल्या! शेतकऱ्यांचा मोर्चा आणि व्यापाऱ्यांचा मोर्चा ह्याला निपाणीच्या नागरिकांनी दिलेला हा वेगवेगळा प्रतिसाद फार अर्थपूर्ण आहे. आज ह्या व्यापाऱ्यांनी एक डाव रचला होता. त्यांना वाटलं होतं, की धारियांच्या आणि माझ्या घरावर दगडफेक केली, की आंदोलन नगरीतले शेतकरी चिडून गावात घुसतील; त्यांची आणि भाडोत्री गुंडांची मारामारी सुरू होईल. तसं झालं की पोलीस त्याचं निमित्त करून बळाचा वापर करतील व आंदोलन नगरी उधळून रस्ता खुला करतील. पण सत्याग्रही शेतकऱ्यांनी संयम पाळला. व्यापाऱ्यांच्या ह्या कारस्थानाला ते बळी पडले नाहीत... इथं आलेला प्रत्येक शेतकरी घरातून येताना बायकोचा आणि मुलाबाळांचा निरोप घेऊन आला आहे. प्राण गेला तरी बेहत्तर, तुरुंगात जावं लागलं तरी हरकत नाही; पण दर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही अशी प्रत्येक शेतकऱ्यानं शपथ घेतली आहे."
ह्या सर्वच भाषणांना जोरदार प्रतिसाद मिळत होता. आंदोलकांमधील जिगर इतके दिवस थांबूनही कायम होती. सरकारला वाटले होते, आपण दुर्लक्ष करत राहिलो तर एक दिवस सगळे शेतकरी थकून जातील, आपापली घरची व शेतावरची तुंबलेली कामे करायला आपापल्या गावी परत जातील. पण प्रत्यक्षात तसे घडले नव्हते.
शनिवार, चार एप्रिलला वातावरण बरेच तापू लागल्याचे जाणवत होते. त्या दिवशी शरद जोशींच्या आदेशानुसार निपाणीतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सोमवार, सहा एप्रिलपासून निपाणीतील सर्व बँका बंद ठेवायचा आदेश शरद जोशींनी दिला होता. त्यामुळे सामान्य माणसाचीही काही गैरसोय नक्कीच होणार होती, पण खरी गैरसोय होणार होती ती रोज लाखोंचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांची व तोच आंदोलकांचा उद्देश होता.
सोमवारपासून आंदोलननगरीला समांतर असलेल्या एका पर्यायी मार्गावरही रास्ता रोको करायचा निर्णय शरद जोशींनी शनिवारीच जाहीर केला होता. चिकोडीमार्गे जाणारा हा रस्ता महामार्गाला पर्याय म्हणून वाहने वापरत असत व ते आवश्यकही होते. कारण अन्यथा सगळा पुणे-बंगलोर महामार्गच ठप्प झाला असता. सगळ्यांचीच फार गैरसोय होऊ नये म्हणून हेतुतःच जोशींनी हा पर्यायी रस्ता चालू ठेवला होता. पण आता तीन आठवडे शांततापूर्ण सत्याग्रह करूनही सरकार अजिबात दाद देत नाहीए, हे बघितल्यावर नाइलाजाने सोमवारपासून तो पर्यायी रस्ताही बंद ठेवायचे ठरले होते. बहुधा त्यामुळेच त्या रात्री पोलिसांच्या हालचाली एकाएकी खूप वाढल्याचे दिसत होते. संकेश्वर, बेळगाव, चिकोडी इथून बऱ्याच एसटी बसेस मागवल्या गेल्या होत्या. एसआरपींच्या अनेक पलटणीदेखील आंदोलन नगरीच्या आसपास येऊन दाखल झाल्या होत्या. स्वतः डीएसपी निपाणीच्या डाकबंगल्यात मुक्काम ठोकून होते.
रविवार, पाच एप्रिलचा दिवस उजाडला.
त्या दिवशी गुढी पाडव्याचा सण होता. आंदोलन नगरी उत्साहाने वाहून निघाली होती. गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. तसा कर्नाटकच्या ग्रामीण भागात सणांचा प्रभाव जास्तच असतो; आंदोलनाच्या ह्या वातावरणात तो अधिकच होता. खूप लौकर उठून सर्वांनी मोठ्या हौसेने आपापल्या राहुट्या झाडून काढल्या. भोवताली पाण्याचा शिडकावा केला. दारावर आंब्याच्या पानांची तोरणे लटकवली. स्वच्छ धुतलेल्या काठीवर आकर्षक अशा इरकली किंवा धारवाडी खणाची कुंची चढवून लख्ख धुतलेला पितळी गडू त्यावर उलटा ठेवला. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या सगळ्या ओळीने उभारलेल्या गुढ्या मोठ्या सुरेख दिसत होत्या, सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. सगळे शेतकरी आणि त्यांच्या बायका अंघोळी उरकून, ठेवणीतले कपडे घालून इकडेतिकडे वावरत होते. आंदोलनाचा उन्माद आणि सणासुदीचा उल्हास ह्यांचे हे मिश्रण अगदी वेधक दिसत होते. तो सगळा दिवस आंदोलन नगरीत चैतन्य अगदी ओसंडून वाहत होते.
त्या दिवशी सकाळी शरद जोशी यांनी कृश शरीराचे पण लढवय्ये म्हणून प्रख्यात असलेले दत्ता पांगम व इतर शेतकरीनेते यांच्यासमवेत पर्यायी रस्ता जिथून जायचा त्या परिसराची पाहणी केली. विजय आणि सरोजा परुळकर हेही त्यांच्यासोबत होते. त्यांना असे दिसले, की ह्या रास्ता रोकोला तेथील स्थानिक मंडळी फारशी तयार नाहीत. तेथील कार्यकर्त्यांमध्ये ह्या प्रश्नावर बरेच मतभेद होते व एक प्रकारची भीतीही होती. अशा परिस्थितीत पर्यायी रस्ता बंद करणे अशक्य होते. आपला निर्णय स्थानिक लोकांवर बळजबरीने लादायची शरद जोशींची मुळीच इच्छा नव्हती. दुपारी तीनच्या सुमारास ही मंडळी आंदोलन नगरीत परतली. त्यानंतर संध्याकाळच्या सभेत त्यांनी उद्यापासून पर्यायी रस्ता बंद करायचा बेत स्थगित केल्याचे जाहीर केले. आंदोलकांचा काहीसा अपेक्षाभंग झाला, पण आपले नेते आपल्या हिताचाच निर्णय घेतील ह्यावर सगळ्यांची श्रद्धा होती. त्यामुळे सगळे पुन्हा आपापल्या जागी बसायला गेले. महामार्गावरचा हा सत्याग्रह चालूच राहणार होता. पुन्हा एकदा घोषणा सुरू झाल्या. दुसऱ्याच दिवशी काय भयानक प्रकार घडणार आहे याची कुठल्याच आंदोलकाला त्यावेळी काही कल्पना नव्हती.
पुढला दिवस उजाडला. सोमवार, सहा एप्रिल.
भल्या सकाळी साधारण सहाच्या सुमारास, अगदी अनपेक्षितपणे पोलिसांच्या धडाकेबंद कारवाईला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने पोलीस आंदोलन नगरीत घुसले. रस्त्यावर उभारलेल्या राहुट्या त्यांनी धडाधड पाडून टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला आंदोलकांना धक्काच बसला. त्यांची स्वाभाविक भावना पोलिसांना प्रतिकार करायची होती; पण शरद जोशींनी त्यांना तत्काळ थोपवले. त्यांच्या आदेशानुसार मग आंदोलकांनी पोलिसांना विरोध केला नाही. कसलाही वावगा प्रकार होऊ देऊ नका, असे जोशींचे निक्षून सांगणे होते. "आधी बाकी साऱ्यांना अटक करा व नंतर अर्थात मलाही अटक करा, पण मी बाहेर असलो तर आंदोलकांना नक्की शांत ठेवेन," असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
पण त्यांचा कुठलाही सल्ला ऐकायच्या मनःस्थितीत पोलीस नव्हते. त्यांनी सर्वप्रथम शरद जोशी, सुभाष जोशी, रमेश शिपुरकर व शुभा शिपुरकर ह्या चौघांना अटक केली आणि त्यांना तत्काळ जीपमध्ये बसवून आंदोलनस्थळापासून दूर नेले. आधी खडकलाट येथील पाऊणशे वर्षांच्या मामी दिवाण, शिर्प्याची वाडी येथील मालतीबाई शिंदे, निपाणीच्या अक्काताई कांबळे वगैरे महिलानेत्यांनी व त्यांच्यापाठोपाठ लगेचच सुमारे दोन-अडीचशे स्त्रियांनी स्वतःला अटक करवून घेतली. साडेसातपर्यंत सत्तरएक बसगाड्या भरून आंदोलक तेथून दूरवर कुठेतरी रवाना झाले होते. पण त्याच्या अनेक पट आंदोलक अटकेची वाट पाहत शांतपणे रस्त्यावर बसून होते.
दहा वाजेपर्यंत अटक झालेल्यांच्या दीडशे गाड्या तिथून रवाना झाल्या होत्या. डॉक्टर ध्रुव मंकड स्टेथोस्कोप व पांढरा अॅप्रन बाजूला ठेवून टेलिफोन सांभाळत होते, ठिकठिकाणचे निरोप घेत होते. आंदोलन नगरीत सतत घोषणा चालूच होत्या व त्याचवेळी एकेक बस येत होती, आंदोलकांना घेऊन दूर कुठेतरी रवाना होत होती. मॅजिस्ट्रेट सर्वांना सरसकट १४ दिवसांची कस्टडी देत होते, पण त्यामुळे आंदोलकांचे मनोधैर्य कणभरही कमी झाले नव्हते. पुरुषांना बेल्लारी व गुलबर्गा येथील तुरुंगात व स्त्रियांना विजापूर येथील तुरुंगात रवाना केले जात असल्याची बातमीही नंतर आली.
दहा-साडेदहाच्या सुमारास रोजच्याप्रमाणे आजूबाजूच्या खेड्यांतून पिठले-भाकऱ्याआंबील भरलेल्या बैलगाड्या घेऊन आसपासचे शेतकरी आंदोलन नगरीत येऊ लागले. एकूण परिस्थिती पाहून तेही लगोलग ह्या सत्याग्रहात सामील होऊ लागले.
आंदोलक दबत नाही आहेत हे बघून मग शेवटी पोलिसांनी पूर्वीच ठरवलेले आपले अस्त्र बाहेर काढले. अनुचित असे एकही कृत्य शेतकऱ्यांनी केले नसताना व साधी बोलाचालीही कुठे झाली नसताना पोलिसांनी एकदम आक्रमक भूमिका घेतली. सर्व शेतकरी अटक करण्यासाठी येणाऱ्या बसेसची वाट पाहत रांगेत उभे असताना काही पोलीस पुढे झाले आणि त्यांनी त्या शेतकऱ्यांना लाठ्यांनी मारायला सुरुवात केली. 'बस खाली, बस खाली, असे ते मारताना कानडीत म्हणत होते. त्यामुळे बावरलेले शेतकरी खाली बसू लागले. पण खाली बसलेल्या शेतकऱ्यांनाही पुन्हा मारायला पोलिसांनी सुरुवात केली. मारताना 'गप बस, गप बस' असे पोलीस म्हणत होते. काही शेतकऱ्यांनी उभे राहून पोलिसांना 'आम्ही तुमच्याच आदेशांचे पालन करत आहोत' असे सांगायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या तोंडावरच पोलिसी लाठ्यांचे तडाखे बसू लागले. हा लाठीमार इतका जोरदार होता, की अनेक शेतकरी अक्षरशः रक्तबंबाळ झाले. त्यातलेच एक होते मालतीबाई शिंदे ह्यांचे वृद्ध पती. तिथेच हजर असलेल्या एका सेवाभावी डॉक्टरांनी तातडीचे उपचार करून रक्तस्त्राव तात्पुरता थांबवला, पण कवटीला टाके घालणे अत्यावश्यक होते व त्यासाठी निपाणीतल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यासाठी धावपळ सुरू झाली.
हे सगळे काय चालले आहे, एकाएकी पोलीस आपल्यावर असे तुटून का पडले आहेत आणि आपला गुन्हा तरी काय आहे हेच शेतकऱ्यांना कळेना. इतका वेळ पोलिसांचा बराच मार निमुटपणे खाल्लेले काही तरुण शेतकरी आता मात्र खुपच चिडले व काहीतरी प्रतिकार करण्याची स्वाभाविक प्रेरणा म्हणून त्यांच्यातील काही जणांनी रस्त्याकडेला पडलेले काही दगड पोलिसांवर फेकून मारले.
नेमक्या ह्याच क्षणाची जणू पोलीस वाट पाहत होते. 'जमाव हाताबाहेर चालला आहे' असे जाहीर करत त्यांनी अश्रुधुराची नळकांडी फोडायला सुरुवात केली. पण वारा जोराचा असल्याने शेतकरी तो अश्रुधूर सहन करू शकले. आजूबाजूच्या शेतात पडणाऱ्या नळकांड्यांवर खेड्यांतल्या बायकांनी ओंजळीने माती टाकायला सुरुवात केली व ती नळकांडी त्यांनी निष्प्रभ करून टाकली. हे तंत्रही त्यांचे त्यांनीच, कोणीही न शिकवता, शोधले. मग तीनएकशे पोलिसांच्या नव्या तुकडीने पुन्हा एकदा जोरदार लाठीमार करायला सुरुवात केली. जमावातील काही जणांनी चिडून त्यांच्यावर दगडफेक केली. काही पोलिसांना ते दगड लागले. त्याबरोबर पोलिसांची ती तुकडी मागे हटली व बंदूकधारी पोलिसांची एक तुकडी पुढे झाली. त्यांनी सरळ गोळीबारच सुरू केला. फटाफट अनेक शेतकरी घायाळ होऊन जमिनीवर कोसळू लागले.
आता मात्र शेतकऱ्यांचा धीर सुटला. जीव वाचवण्यासाठी ते दुतर्फा असलेल्या शेतांमधून पळू लागले. लाठीधारी पोलिसांनी त्या निःशस्त्र शेतकऱ्यांचा पाठलाग सुरू केला व एकेक करत शेतकऱ्याला पकडून झोडपायला सुरुवात केली! आंदोलन नगरीच्या परिसरात चार-पाच मैलांपर्यंत असा पाठलाग व लाठीमार सुरू होता.
बाहेरून आलेल्या काही सत्याग्रहींनी चिडून गावाबाहेर असलेली एक वखार पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे कोणाकडेच आग लावायची काही साधने नव्हती; हे काही धंदेवाईक आंदोलक नव्हतेच. बहुतेकांच्या आयुष्यातील अशा प्रकारच्या आंदोलनाचा हा पहिलाच प्रसंग होता. साध्या काडीपेटीचा वापर करून त्यांनी जमा केलेला थोडासा कडबा पेटवला आणि तो त्या वखारीवर टाकला. झाले! पोलिसांना जणू आणखी एक निमित्तच मिळाले! खरेतर वखारीचे नुकसान काहीच झाले नव्हते, कारण घमेलेभर कडबा घेऊन फारशी आग भडकणे शक्यही नव्हते. पण त्याचा फायदा घेऊन पोलिसांनी जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या शेतकऱ्यांवरही सरळ गोळीबार सुरू केला व त्यात दोन शेतकऱ्यांचा जीव गेला. अनेक जण गोळ्या लागून जखमीही झाले. आंदोलकांपैकी स्त्रियांनाही जबरदस्त लाठीमार झेलावा लागला.
थोड्याच वेळात संपूर्ण आंदोलन नगरी उद्ध्वस्त झाली. सोमवार, सहा एप्रिलच्या त्या गोळीबारात एकूण बारा शेतकरी हुतात्मा झाले होते. जखमींची संख्या तर खूपच जास्त होती.
निपाणीत ह्या सगळ्या बातम्या पोचत होत्या व गावामध्ये एकच हलकल्लोळ माजला होता. निपाणीतील सर्वसामान्य नागरिकांची सहानुभूती उघडउघड आंदोलकांना होती; कारण आंदोलकांच्या मागण्या अगदी न्याय्य आहेत आणि सरकारने केवळ दुष्टपणे त्यांच्याकडे दर्लक्ष केले आहे. सरकार त्यांचा अगदी अंतच पाहत आहे आणि गरीब शेतकऱ्यांना असे क्रूरपणे वागवणे कुठल्याच लोकशाही शासनाला शोभणारे नाही असेच नागरिकांचे मत होते. स्वतः व्यापारीदेखील पोलीस कारवाईने स्तंभित झाले होते; ती इतकी कठोर असेल अशी त्यांना कल्पना नव्हती.
अटक केलेल्या सत्याग्रहींना पुढचे बारा दिवस तुरुंगात डांबून ठेवले गेले. स्वतः शरद जोशी बेल्लारी येथील तुरुंगात होते. तिथे डांबलेल्या इतर शेतकऱ्यांपुढे रोज जोशी प्रबोधनपर भाषणे करत. एका अर्थाने त्यांना मिळणारी ही सक्तीची विश्रांतीच होती व तिचा त्यांनी आंदोलनाच्या दृष्टीने पूर्ण उपयोग करून घेतला. आधी त्यांचे भाषण व मग त्यावर उपस्थितांमध्ये चर्चा असे काहीसे प्रशिक्षणात्मक स्वरूप ह्या सभांना लाभले. इथल्याच एका सभेत 'भीक नको, हवे घामाचे दाम' ह्या शेतकरी संघटनेच्या सुप्रसिद्ध घोषणेचा जन्म झाला.
बारा दिवसांच्या कारावासानंतर शेतकऱ्यांना सोडून देण्यात आले, पण सर्व नेत्यांना मात्र आणखी सात दिवस हिंडलगा येथील तुरुंगात डांबण्यात आले. शेवटी २५ एप्रिल रोजी शरद जोशींची व इतर नेत्यांची सुटका झाली.
या आंदोलनाचे फलित म्हणजे २० एप्रिल १९८१ रोजी कर्नाटक शासनाने तंबाखूच्या खरेदी-विक्रीसाठी एक सहकारी संस्था स्थापन करायची घोषणा केली. तंबाखू व्यापाऱ्यांचे महत्त्व त्यामुळे अगदी नाहीसे झाले असे म्हणता येणार नाही, पण शेतकऱ्यांच्या जीवनावरची त्यांची घट्ट व जाचक अशी पकड त्यामुळे थोडीफार सैल झाली.
यानंतरचा एक प्रसंग नोंदवण्याजोगा आहे. १ मे हा विजयदिन म्हणून साजरा करायचे सर्व स्थानिक शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ठरवले. शरद जोशींची उपस्थिती साहजिकच अपरिहार्य होती, पण इथेच शासनाने खोडा घातला; शरद जोशींनी तालुक्यात येण्यावरच सरकारने बंदी घातली. विजयसभा घ्यायची तरी कुठे, असा आता प्रश्न उभा राहिला. बराच खल केल्यावर त्यावर एक तोडगा काढला गेला. निपाणीच्या अर्जुन नगर भागात एक कॉलेज होते व ते नेमके महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर होते. कॉलेजची इमारत महाराष्ट्रात तर कंपाउंडची भिंत कर्नाटकात! त्याच जागी एका शेतात मग ही विजयसभा झाली! कर्नाटकच्या हद्दीत प्रचंड पोलीस बंदोबस्त होता, पण शरद जोशी भाषण करत होते ते व्यासपीठ महाराष्ट्रात असल्याने कर्नाटक पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत! शरद जोशी महाराष्ट्रात तर श्रोते कर्नाटकात! प्रसंग म्हटले तर गमतीदार आणि म्हटले तर राज्या-राज्यांतील सीमा किती तकलादू आहेत हेही दाखवणारा.
केवळ शेतकरी संघटनेच्याच नव्हे तर एकूणच भारतातील सामाजिक चळवळीच्या इतिहासात निपाणीच्या ह्या तंबाखू आंदोलनाचे खूप महत्त्व आहे. तेवीस दिवस शेतकरी शांततापूर्वक एका जागी बसून सत्याग्रह करू शकतात ही घटनाच अगदी आगळी होती.
या आंदोलनातील दोन हजाराहून अधिक तंबाखू कामगार स्त्रियांचा रोजचा सहभाग खूप उल्लेखनीय होता. त्यांची पूर्वीची अगतिक आणि लाचार अशी अवस्था ज्यांनी पहिली होती, त्यांच्या दृष्टीने तर ह्या स्त्रियांनी असे धीटपणे पुढे येणे, आंदोलनात सहभागी होणे हा एक चमत्कारच होता.
शेतकरी आणि कामगार इथे एकत्र लढा देत होते हेही एक अनोखेपण होते.
शेतकरी आंदोलन हे बड्या बागाइतदारांचे आंदोलन नक्की नाही हेही इथे पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते; कारण ९५ टक्के तंबाखू शेतकरी हे अल्पभूधारकच होते.
प्रांतवाद, सीमावाद हे सगळे राजकीय नेत्यांनी स्वतःच्या प्रतिमानिर्मितिसाठी निर्माण केलेले क्षुद्रवाद आहेत; खरा प्रश्न हा आर्थिक आहे, शेतकऱ्याच्या व म्हणून एकूण देशाच्या दारिद्र्याचा आहे; सामान्य माणसाच्या मनात हे भेदभाव नसतात, ते हेतुतः निर्माण केले जातात हे शरद जोशींचे मत इथे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते.
एक शेतकरी सांगत होते, “पूर्वी आम्ही निपाणीला एखाद्या हॉटेलात किंवा सलूनमध्ये किंवा दुकानात गेलो, तर मालक आमच्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नसे. पण आता लाल बिल्ला लावलेला कोणी शेतकरी आला तर मालक लगेच अदबीने त्याचं स्वागत करतो, त्याला काय हवं-नको ते विचारतो."
'तंबाखूला भाव मिळो वा न मिळो, निदान शेतकऱ्याला तरी ह्या आंदोलनामुळे भाव मिळायला लागला' ही एक सार्वत्रिक प्रतिक्रिया होती. शेतकऱ्यांचा आत्मसन्मान जागवणे हे ह्या आंदोलनाचे एक महत्त्वाचे फलित होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर ऊस व कांदा आंदोलनापेक्षा या आंदोलनाला अधिक प्रसिद्धी मिळाली होती. बीबीसीचा उल्लेख मागे केलेलाच आहे. शरद जोशी यांनी नंतर निपाणीत पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची माहिती देणारे एक पत्र आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेलादेखील लिहिले होते.
त्या मानाने भारतीय वृत्तपत्रांनी मात्र ह्या अभूतपूर्व आंदोलनाची फारशी दखल घेतली नाही; मुंबईच्या झुंजार पत्रकार ओल्गा टेलिस ह्या एक सम्माननीय अपवाद. त्यांनी निपाणीला येऊन मुक्कामच केला होता व आंदोलनाविषयी लिहिलेही.
शरद जोशींचा आत्मविश्वास ह्या आंदोलनानंतर बराच वाढला. कांदा व ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याप्रमाणे तंबाखू पिकवणारा शेतकरीदेखील पिढ्यानपिढ्यांची लाचारी दूर करून अन्यायाविरुद्ध उभा राहू शकतो, पोलिसांना न घाबरता आंदोलन करू शकतो हे आता सिद्ध झाले होते. तेवीस दिवस आंदोलनाची तीव्रता कायम ठेवणे सोपे नव्हते.
शिवाय या खेपेला महाराष्ट्राच्या सीमेबाहेर प्रथमच त्यांनी आंदोलन केले होते. चाकण व नाशिक ह्यांच्यापुढची ही पायरी होती. आंदोलनाने घेतलेली ही एक मोठीच झेप होती.
◼