Jump to content

अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/डोंगरकुशीतल्या नंदनवनात

विकिस्रोत कडून


डोंगरकुशीतल्या नंदनवनात


 १ मे, १९६८.
 स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा इंटरनॅशनल विमानतळावर ३३ वर्षांच्या शरद जोशींनी पाऊल ठेवले. तसे ते पूर्वी दोन वेळा ह्या देशात आले होते, पण ते भारतीय पोस्टखात्यातील एक अधिकारी म्हणून - चारआठ दिवसांसाठी आणि अधिकृत कामासाठी. इथेच नोकरी पत्करून सहकुटुंब वास्तव्यासाठी येणे उत्कंठा वाढवणारे होते आणि रोमांचकही. सोबत २५ वर्षांची पत्नी लीला व अनुक्रमे सहा व साडेचार वर्षांच्या श्रेया व गौरी ह्या दोन मुली. लगेचच स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथील युनिव्हर्सल पोस्टल युनियन ऊर्फ युपीयुच्या मुख्यालयात ते दाखल झाले.
 आंतरराष्ट्रीय पोस्टव्यवहाराचे नियमन करणारी संस्था म्हणजे युनिव्हर्सल पोस्टल युनियन (युपीयु). १८७४मध्ये ही स्थापन झाली. जगातली ही दुसरी आंतरराष्ट्रीय संस्था. पहिली आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे इंटरनॅशनल टेलेग्राफ युनियन. ती १८६५मध्ये स्थापन झाली. परस्परांतील संदेशवहन हा परस्परसंबंधांचा पायाच आहे आणि त्यासाठी आधी पोस्ट व नंतर टेलेग्राफ ही दोनच साधने त्या काळात उपलब्ध होती; साहजिकच त्यांचे महत्त्व खुप होते. सुरुवातीची अनेक वर्षे दोन्ही संस्थांचे मुख्य कार्यालय बर्न हेच होते.
 पुढे १९४७ साली ह्या युनायटेड नेशन्सच्या (संयुक्त राष्ट्रसंघाच्या) घटक संस्था बनल्या. त्यानंतर इंटरनॅशनल टेलेग्राफ युनियनचे नाव बदलून इंटरनॅशनल टेलेकम्युनिकेशन्स युनियन ठेवले गेले व तिचे मुख्यालय बर्नहून जिनिव्हा येथे नेण्यात आले; युपीयु मात्र बर्नमध्येच राहिली.
 युपीयुमध्ये एक संख्याशास्त्राचा विभाग असावा अशी कल्पना मांडण्यात आली होती. जोशी यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि भारतातील दहा वर्षांचा अनुभव ही पात्रता ह्या पदासाठी अगदी योग्य अशीच होती. त्यामुळे पूर्वी ओळख झालेल्या युपीयुच्या एका असिस्टंट डायरेक्टर जनरलने 'ह्या संस्थेत तुम्ही नोकरी स्वीकाराल का?' अशी विचारणा जोशी यांच्याकडे ते प्रशिक्षणार्थ फ्रान्समध्ये गेले असताना केली होती.

 जोशी यांनाही त्यावेळी असा बदल अगदी हवाच होता. त्यांनी लगेच होकार दिला. मागील प्रकरणात हा भाग आलाच आहे.

 “Please sit down. Be comfortable. What drink can I offer you?" आपल्या कार्यालयात त्यांचे हस्तांदोलन करून स्वागत करताना असिस्टंट डायरेक्टर जनरलनी आपुलकीने विचारले आणि त्या पहिल्या प्रश्नातच आपण आता एका अगदी नव्या विश्वात प्रवेश केला आहे हे जोशींना जाणवले. भारतीय पोस्टखात्यातील दहा वर्षांच्या नोकरीत कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांचे असे मित्रत्वाच्या व बरोबरीच्या नात्याने स्वागत केले नव्हते.
 समोरासमोर असलेल्या कोचावर बसून दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला अनौपचारिक पण दोन-चार मिनिटांतच प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपाविषयी.
 त्याच दिवशी जोशींनी कामाला सुरुवात केली. राहायला घर घेणे, मुलींसाठी शाळेत प्रवेश घेणे वगैरे सर्व सोपस्कारही थोड्याच दिवसांत पार पडले.
 इंटरनॅशनल ब्युरो (आयबी) हा युपीयुचा एक विभाग होता व ह्याच विभागात जोशींची नेमणूक झाली होती. त्यांचे अधिकृत पद होते 'थर्ड सेक्रेटरी'. आपण वापरतो त्या अर्थाने इथे सेक्रेटरी हा शब्द नाही. युपीयुतील अधिकाऱ्यांच्या एकूण सात श्रेणी होत्या - सुरुवातीची श्रेणी 'थर्ड सेक्रेटरी', मग 'सेकंड सेक्रेटरी', त्यानंतर 'सेक्रेटरी', त्यानंतर 'काउन्सेलर', त्यानंतर 'डायरेक्टर' व त्यानंतर 'असिस्टंट डायरेक्टर जनरल'. शेवटी मग अशा वेगवेगळ्या विभागांच्या असिस्टंट डायरेक्टर जनरल्समधून एकाची नेमणूक डायरेक्टर जनरल म्हणून होत असे. एकूण कर्मचाऱ्यांचा विचार केला तर अर्थातच स्विस नागरिक हे तिथे बहुसंख्य होते, पण अधिकारीवर्ग मात्र जगातल्या वेगवेगळ्या देशांतून आलेला असे.

 आल्प्स पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला स्वित्झर्लंड हा छोटासा देश पृथ्वीतलावरील नंदनवन म्हणूनच जगभर ओळखला जातो. लांबवर पसरत गेलेल्या गगनस्पर्शी बर्फाच्छादित पर्वतरांगा, उंच उंच वृक्ष, हिरवीगार कुरणे, त्यात मनसोक्त चरणाऱ्या धष्टपुष्ट गायी, त्यांच्या गळ्यातील घंटांचा खुळावून टाकणारा मंजूळ नाद, निळेभोर आकाश, स्वच्छ गुळगुळीत रस्ते, प्रत्येक घरासमोर व गॅलरीत बहरलेली रंगीबेरंगी फुले. सगळे अगदी एखाद्या पिक्चर पोस्टकार्डाप्रमाणे!
 पण निसर्गसौंदर्यापलीकडेही ह्या देशात खूप काही आहे. दरडोई उत्पन्नामध्ये ह्या देशाचा क्रमांक सातत्याने जगात जवळजवळ पहिला असतो. ही संपत्तीदेखील हक्काने शोषण करायला उपलब्ध होईल अशी स्वतःची कुठलीही वसाहत नसताना. रोश वा नोव्हार्तिस यांसारख्या जगातील सर्वांत मोठ्या औषधकंपन्या इथल्याच. खते-रसायने बनवणाऱ्या सिन्जेन्टा वा सिबा, घड्याळे बनवणाऱ्या रोलेक्स वा फावर लुबा, कापडगिरण्यांना लागणारी यंत्रे बनवणारी सुलत्झर, एलेव्हेटर बनवणारी शिंडलर, सिमेंट बनवणारी होल्सिम, वीजनिर्मिती व पुरवठा करणारी एबीबी, कच्च्या मालाचा घाऊक व्यापार करणारी ग्लेनकोर, दुग्धपदार्थ वा चॉकलेट बनवणारी नेसले अशा अनेक आघाडीच्या बहराष्ट्रीय कंपन्या स्वीस आहेत. युबीएससारख्या इथल्या बँका आपल्या संपूर्ण सुरक्षित व्यवहारासाठी जगभर विश्वासार्ह म्हणून प्रसिद्ध आहेत; जगभरातून त्यांच्याकडे सोन्याचा व पैशाचा ओघ वाहत असतो.
 पण ह्या उद्योगांपुरती व संपत्तीपुरती ह्या देशाची ख्याती सीमित नाही. गेली सात-आठशे वर्षे ह्या देशात लोकशाही अखंड टिकून आहे. ह्या देशावर त्या प्रदीर्घ कालावधीत अन्य कुठल्याही देशाने राज्य केलेले नाही. इथला सर्वसामान्य नागरिकही कमालीचा लढवय्या व स्वातंत्र्याचा भोक्ता आहे. अठरा वर्षांवरील प्रत्येकाला लष्करी शिक्षण घेणे व किमान दोन वर्षे लष्करात काम करणे सक्तीचे आहे. शिवाय, आवश्यक ती शस्त्रे त्याच्या घरीच असतात व अवघ्या चोवीस तासांच्या अवधीत तो लष्करी कामासाठी सुसज्ज होऊ शकतो. सगळा युरोप पादाक्रांत करणाऱ्या हिटलरलाही ह्या टीचभर देशावर आक्रमण करायची कधी हिंमत झाली नव्हती. स्वित्झर्लंड देश बहुतांशी डोंगराळ. त्यात पुन्हा थंडी कडाक्याची. स्वतःकडे खनिजसंपत्ती अशी जवळजवळ अजिबात नाही. असे असूनही आज हा देश इतका समृद्ध बनला आहे कारण काटक कष्टाळू समाज व प्रगतिपूरक शासकीय धोरणे. विशेष म्हणजे जनता शस्त्रसुसज्ज असूनही या देशाने कधीच अन्य कुठल्या देशावर आक्रमण केलेले नाही.
 आपली अलिप्ततादेखील ह्या देशाने कटाक्षाने जपली आहे. त्यामुळेच युनायटेड नेशन्सच्या रेड क्रॉस, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वगैरे तब्बल २५ संस्थांची मुख्यालये आज ह्या देशात आहेत. लीग ऑफ नेशन्स ही पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली संस्था म्हणजे आजच्या युएनचे मूळ रूप: तिचेही मुख्यालय जिनिव्हा हेच होते. जिनिव्हा हे स्वित्झर्लंडमधील सर्वांत आंतरराष्ट्रीय शहर मानले जाते; पण देशाची राजधानी मात्र बर्न ही आहे.
 स्वित्झर्लंडची विभागणी वेगवेगळ्या २६ कँटोन्समध्ये झालेली आहे व प्रत्येक कँटोन बऱ्यापैकी स्वायत्त आहे. देशात ६४ टक्के जर्मनभाषक व सुमारे २३ टक्के फ्रेंचभाषक आहेत. ह्याशिवाय छोट्या प्रमाणात ८ टक्के इटालियन व अगदी छोट्या प्रमाणात रोमांश ह्या दोन भाषाही बोलल्या जातात. जिनिव्हा फ्रेंचभाषक आहे, तर राजधानी बर्नमध्ये जर्मन भाषा बोलली जाते. पण आश्चर्य म्हणजे, सर्व युएन संस्थांमध्ये दैनंदिन व्यवहाराची भाषा फ्रेंच हीच त्यावेळी होती. जोशींना फ्रेंच चांगले येत होते व ही नोकरी त्यांना मिळण्यामागे ती एक जमेची बाजू मानली गेली होती.

 १९६८ ते १९७६ ही आठ वर्षे जोशींनी इथे काढली. पण त्या काळाबद्दल अनेकदा प्रश्न विचारूनही जोशी विशेष काही माहिती पुरवू शकले नव्हते. तो सारा काळ जणू आता त्यांच्या विस्मृतीतच गेला होता. त्याकाळातील तुमचा कोणी सहकारी आज मला भेटू शकेल का?' ह्या प्रश्नालाही त्यांचे उत्तर सुरुवातीला नकारार्थीच होते.
 तेवढ्यात एक अनपेक्षित घटना घडली. त्यांची मोठी मुलगी श्रेया सहकुटुंब स्वित्झर्लंडला जाणार होती व त्या भेटीत ते सर्व जोशी यांच्या तेथील एका जुन्या सहकाऱ्याकडे व शेजाऱ्याकडे राहणार होते. ह्या सहकाऱ्याबरोबर सर्व जोशी कुटुंबीयांचेच एकेकाळी खूप जवळचे संबंध होते, असेही त्यांच्या बोलण्यात आले. “मी त्या सहकाऱ्यांना भेटू शकतो का?" मी विचारले. कारण योगायोगाने एका सामाजिक संस्थेच्या परिषदेसाठी मला त्यानंतर महिन्याभरातच स्वित्झर्लंडमध्ये जायचे होते. जोशींना ती कल्पना आवडली व त्यानुसार त्याच दिवशी जोशींनी आपल्या त्या एकेकाळच्या सहकाऱ्याला इमेलवरून कळवले व चरित्रलेखनासाठी मला शक्य ती माहिती देण्याची विनंती केली.
 नंतर त्यांच्याशी माझा इमेलवर संपर्क झाला व भेटीचे नक्की झाले. ते बर्न येथे राहत होते. आमचे बाझलजवळ राहणारे एक स्नेही डॉ. अविनाश जगताप हेही मी व माझी पत्नी वर्षा यांच्याबरोबर आले. आपल्या सँडोझमधील नोकरीमुळे ते स्वित्झर्लंडमध्येच स्थायिक झाले असले, तरी जगताप मूळचे पुण्याचे. बहुजनसमाजात शिक्षणप्रसाराचे मोठे काम करणारे त्यांचे वडील प्राचार्य बाबुराव जगताप एकेकाळी पुण्याचे महापौरदेखील होते. आम्ही तिघेही एकत्रच बर्नला गेलो. तिथे जोशी यांच्या त्या माजी सहकाऱ्याला भेटणे ह्या लेखनासाठी महत्त्वाचे ठरले. कारण ह्या आठ वर्षांच्या कालखंडाबद्दल त्यांनी भरपूर माहिती दिली व ती त्यांच्याइतकी खात्रीपूर्वक दुसरा कोणीच देऊ शकला नसता. त्यांचे नाव टोनी डेर होवसेपियां (Tony Der Hovesepian). सोयीसाठी म्हणून यापुढे त्यांचा उल्लेख टोनी असा करत आहे.

 गुरुवार, १२ जुलै २०१२. साधारण सकाळची नऊची वेळ.

 बर्न रेल्वेस्टेशनवरून आम्ही ट्राम पकडली व Weltpost ह्या स्टॉपवर उतरलो. ह्या जर्मन शब्दाचा अर्थ जागतिक पोस्टऑफिस. ठरल्याप्रमाणे टोनी आमची तिथे वाटच पाहत होते. पुढला सगळा प्रवास आम्ही त्यांच्याच मोटारीने केला.
 इथेच युपीयुचे प्रचंड मुख्यालय आहे. ते आम्ही आधी बघितले. युपीयुचे व पूर्वी बर्नमध्येच असलेल्या इंटरनॅशनल टेलेकम्युनिकेशन्स युनियनचे प्रतीक म्हणून स्विस सरकारने सुमारे शंभर वर्षांपूर्वी उभारलेली धातूची दोन अप्रतिम शिल्पे बघितली. ही दोन्ही शिल्पे दोन स्वतंत्र चौकांत असून आपल्या मुंबईतील हुतात्मा स्मारकाच्या साधारण चौपट आकाराची आहेत. त्यानंतर आम्ही नॉयेनेग (Neuenegg) ह्या बर्नचे उपनगर म्हणता येईल अशा छोट्या गावात गेलो. इथेच टुल्पेनवेग (Tulpenweg) या रस्त्यावर असलेल्या एका प्रशस्त व सुंदर इमारतीत जोशी आपल्या आठ वर्षांच्या वास्तव्यापैकी सुमारे सात वर्षे राहिले. टोनी यांचा फ्लॅटदेखील त्यांच्या शेजारीच होता. जोशींचा फ्लॅट क्रमांक होता 3C, तर टोनी ह्यांचा 3D तीही जागा आम्ही बघितली.
 टोनी साधारण जोशी यांच्याच वयाचे; कदाचित दोन-चार वर्षांनी लहान असू शकतील. शिडशिडीत आणि उंच. मूळचे आर्मेनिया ह्या युरोप व आशिया यांच्या सीमेवरच्या प्राचीन व पुढे सोविएत संघराज्याचा एक भाग बनलेल्या देशातले. अधिकृत धर्म म्हणून ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करणारे हे जगातले पहिलेच राष्ट्र. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे सुमारे शंभर वर्षांपूर्वी, तुर्की आक्रमकांनी, जवळ जवळ १५ लाख आर्मेनिअन लोकांची अत्यंत क्रूरपणे कत्तल केली. बायका-मुलांनाही त्यांनी सोडले नाही. कसाबसा जीव मुठीत धरून टोनी ह्यांचे आई-वडील लेबनॉनला पळाले. तिथेच टोनी ह्यांचा जन्म झाला. तिथून ते कुवेतला गेले व तेथील पोस्टात नोकरीला लागले. कुवेत त्यावेळी ब्रिटिश नियंत्रणाखाली होता व तेथील पोस्टखाते ब्रिटिश पोस्टखात्याशी जोडलेले होते. तिथूनच त्यांना युपीयुमध्ये १९६५ साली नोकरी लागली. शरद जोशी तिथे यायच्या आधी तीन वर्षे. दोघेही 'थर्ड सेक्रेटरी' ह्याच श्रेणीत होते. आपल्या पत्नीसह टोनी आजही त्याच घरात राहतात; जिथे सात वर्षे जोशी त्यांचे शेजारी होते. टोनी म्हणत होते,
 "आम्ही दोघेही पहिल्या-दुसऱ्या दिवसापासूनच एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारू लागलो. शरद कामावर रुजू झाला तेव्हा त्याची बसायची केबिन व माझी केबिन शेजारीशेजारीच होती. मी ह्या नव्या इमारतीत फ्लॅट घेतल्याचं ऐकल्यावर त्यानेही ह्याच इमारतीत फ्लॅट घ्यायचं ठरवलं. अगदी शेजारचाच फ्लॅट. आम्ही साधारण एकाच वेळी तिथे शिफ्ट झालो.
 "शरद अतिशय हुशार व कर्तबगार होता. सुमार बुद्धिमत्तेची माणसं त्याला आवडत नाहीत असा साधारण समज ऑफिसात रूढ होता. शिष्ट म्हणूनच त्याची ख्याती होती. याचं कारण थोड्या दिवसांतच मला समजलं. युपीयुमधले अनेक कर्मचारी निम्नस्तरीय श्रेणीतून चढत चढत वर आले होते तर, शरद मात्र इंडिअन पोस्टल सर्विस ह्या उच्च श्रेणीतच प्रथमपासून राहिला होता. साहजिकच तो इतर सहकाऱ्यांच्या तुलनेत उठून दिसे. पण सुदैवाने आमचे राहायचे फ्लॅट शेजारी शेजारी व कामावर बसायची जागाही शेजारी म्हटल्यावर साहजिकच आमच्यात चांगली मैत्री झाली. आमचं घर ऑफिसपासून मोटारने जेमतेम पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं. ऑफिसात जाता-येताना व दुपारी जेवायला जाता-येताना आम्ही एकत्र जात अस. कधी त्याच्या मोटारीने तर कधी माझ्या मोटारीने.
 "शरद जॉईन झाला त्याच वर्षी आमच्या ऑफिसात एक स्टाफ असोसिएशन सुरू झाली. मी तिचा एक कमिटी मेंबर होतो. बरेच उपक्रम आम्ही राबवत असू. त्या कमिटीत यायची शरदची फार इच्छा होती. पुढल्या वर्षी कमिटीच्या निवडणुकीला तो व मी असे दोन उमेदवार उभे होतो. पडणाऱ्या मतांनुसार पॉइंट्स मोजले जात. एकूण शंभर पॉइंट्स असत. गंमत म्हणजे दोघांनाही सारखी मतं पडली. नियमानुसार पुन्हा एकदा मतदान घेतलं गेलं. त्यावेळी त्याला ५१ व मला ४९ पॉइंट्स मिळाले; कारण माझं स्वतःचं मत मी त्याला दिलं होतं!

 "ऑफिसात आम्ही ब्रेकमध्ये टेबल टेनिस खेळायचो. मला हा गेम खूप आवडायचा व चांगला यायचाही. १९७४च्या सुरुवातीला लोझान येथे युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस भरली होती. तिला मोठं चायनीज डेलेगेशन आलं होतं. प्रथमच. त्यांच्यात व आमच्या आयबी खात्यात शरदने एक टेबल टेनिस स्पर्धा आयोजित केली होती. आम्ही ती जिंकावी अशी त्याची फार इच्छा होती. किसिंजरच्या चायनाभेटीतील पिंगपाँग डिप्लोमसीमुळे त्यावेळी टेबल टेनिस खूप लोकप्रिय झालं होतं. आम्ही स्वतःला चांगलं खेळणारे समजत होतो व आम्ही बऱ्यापैकी प्रॅक्टिसही केली होती, पण चायनीज प्रतिनिधींपुढे आमचा अगदी धुव्वा उडाला! शरद खट्टू झाला होता; त्याला हरणं आवडत नसे."

 जोशींचे कौटुंबिक जीवन कसे होते, हे विचारल्यावर टोनी सांगू लागले,
 "माझी पत्नी थेरेसा व लीला चांगल्या मैत्रिणी झाल्या. थेरेसा ४८ सालची, म्हणजे दोघींचं वयही साधारण सारखं होतं. थेरेसा एका लहान मुलांच्या शाळेत शिकवायची व पुढे तिने स्वतःच एक शाळा सुरू केला. आजही ती तेच काम करते. मुख्यतः वेगवेगळ्य कॉन्स्युलेट्समध्ये काम करणाऱ्यांची मुलं तिथे येतात. लीला मात्र घरीच असे. दोन मुलींना सांभाळणं हेच तिचं पूर्णवेळचं काम होतं. कधी कधी तिला घरी बसून कंटाळा यायचा हे खरं आहे, पण संस्थेच्या नियमानुसार तिला कुठल्याही प्रकारची नोकरी वा व्यवसाय करण्याची परवानगी नव्हती. माझी पूर्वीची नोकरी ब्रिटिश पोस्टखात्यातली होती व मी मूळचा आर्मेनियाचा; ह्या देशात अधिकृत निर्वासित मानला गेलेला. त्यामुळे आम्हाला स्विस नागरिकत्व लगेचच मिळून गेलं व साहजिकच थेरेसाला अर्थार्जन करायची मुभा मिळाली होती. शरदचं नागरिकत्व मात्र भारतीयच होतं. अर्थात युएन संस्थांमध्ये पगार उत्तम मिळायचे; इतर स्विस कंपन्यांपेक्षा व सरकारपेक्षा आमचा पगार निदान ३० टक्के अधिक होता. शिवाय इतरही फायदे खप मिळत. त्यामळे एकाच्याच पगारात घर चालवणं कठीण नव्हतं.
 "जोशींना दोन मुली होत्या, तर आम्हाला लौकरच आमचा पहिला मुलगा झाला. एप्रिल ६९मध्ये झालेला पॅट्रिक, पुढे जोशींच्या दोन मुली व आमचा मुलगा अशी तिघं एकत्र खेळू लागली, एकत्र शाळेत जाऊ लागली. सगळ्यांची शाळा एकच – तेथील इंटरनॅशनल स्कूल. त्यांना शाळेत सोडायचं कामदेखील आम्ही वाटून घ्यायचो; कधी आम्ही तर कधी ते सोडायचे. फिरायला, नाटक-सिनेमा बघायला आम्ही एकत्रच जायचो.
 "शरद ऑफिसात खूप गंभीर व अबोल असे, पण लहान मुलांशी खेळताना तो अगदी लहान होऊन जाई. ऑक्टोबर ७०मधला एक प्रसंग मला आठवतो. आमचे डायरेक्टर जनरल त्यावेळी एक इजिप्शिअन गृहस्थ होते. त्यांनी एकदा मला व थेरेसाला त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. शरद व लीलाला मात्र आमंत्रण नव्हतं. कदाचित मी आर्मेनियन असल्याने, म्हणजे त्यांच्या एकेकाळच्या शेजारी देशातील असल्याने, मला इजिप्शिअन जेवण आवडेल असं त्यांना वाटलं असावं. तेव्हा आमचा पॅट्रिक दीड वर्षांचा होता. डिनरपार्टीला त्याला कुठे नेणार, म्हणून आम्ही त्याला जोशींच्या घरी ठेवायचं ठरवलं. अर्थात त्यांच्या संमतीने. आधी तो खूप रडत होता, त्यामुळे जावं की जाऊ नये अशा संभ्रमात थेरेसा होती. पण शरद व लीला 'अगदी खुशाल जा' असं दोन-तीनदा म्हणाल्यामुळे आम्ही त्याला त्यांच्या घरी ठेवून गेलो. तो राहील की नाही ह्याविषयी आम्हाला खूप धास्ती होती; त्याला असं सोडून जायची ही पहिलीच वेळ. रात्री उशिरा घरी परतलो व काहीशा धाकधुकीतच शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवली. आधी वाटलं होतं, पॅट्रिक झोपला असेल, मग वाटलं तो रडून रडून बेजार झाला असेल आणि शरद-लीलालादेखील त्याने खूप त्रास दिला असेल. पण प्रत्यक्षात लीलाने दार उघडलं, तेव्हा पॅट्रिक चक्क जागा होता व शरद त्याच्याशी अगदी मजेत, हसत हसत खेळत होता. खूप रात्र झाली होती तरी दोघं खेळण्यात इतके दंग झाले होते, पॅट्रिकला त्याने इतका लळा लावला होता, की नंतर आमच्या फ्लॅटमध्ये त्याला परत नेताना तो रडू लागला! शरदचं एक वेगळंच रूप त्या दिवशी मला दिसलं!
 "खूप मजेत गेली ती वर्षं. आमच्या इमारतीतली इतरही बहुतेक सर्व कुटुंबं युएनबरोबरच काम करणारी होती. बऱ्यापैकी समवयस्क होती. आमची छान गट्टी जमली. संध्याकाळी तळमजल्यावरच्या पार्किंग लॉटवर आम्ही एक बॅडमिंटन कोर्ट तयार केलं होतं. टेबलटेनिसचीपण सोय होती. जवळ जवळ रोजच संध्याकाळी जेवल्यानंतर सगळे एकत्र खेळायचो. तिथेच एका कोपऱ्यात बार्बेक्यू होता व दुसऱ्या कोपऱ्यात बार. शरद स्वतः बहुतांशी शाकाहारी होता, पण लीला व मुली मात्र सगळं खात. शरदला ड्रिंक घेणं आवडायचं. खूपदा आम्ही एकत्र जेवायला जायचो, पण त्याला ड्रिंक चढलं आहे असं मात्र इतक्या वर्षांत मी कधीही पाहिलं नाही. तसं त्याचं वागणं अगदी संयमी होतं. पाश्चात्त्य रीतीरिवाज, खाणंपिणं, कपडे हे सारं इथे आल्यावर अगदी थोड्याच दिवसांत जोशी कुटुंबीयांच्या पूर्ण अंगवळणी पडलं होतं. ते सारे उत्तम फ्रेंच बोलत. आमच्या घरापासून जवळच प्रसिद्ध गानटू (Gantu) डोंगराची सुरुवात होती. बहुतेक रविवारी आम्ही डोंगरावर जायचो. स्कीइंग आणि डोंगर चढणं हे आमचे जणू राष्ट्रीय खेळच आहेत. पुढे शरदलाही डोंगरांमधून मनसोक्त भटकणं आवडू लागलं. बाहेर खूप थंडी व पाऊस असेल तर मात्र घरात राहावं लागे.
 "अशावेळी शरदला बुद्धिबळ खेळायला आवडायचं. अर्थात मला स्वतःला बुद्धिबळ फारसं येत नसे. त्यामळे प्रत्येक वेळी तोच जिंकायचा. एकदा दपारी मी त्यांच्या घरी गेलो असताना समोर टेबलावर ठेवलेलं How to play Chess नावाचं एक पुस्तक मला दिसलं. सहज म्हणून मी ते वाचायला लागलो. आवडलं म्हणून घरी घेऊन गेलो व पूर्ण वाचून काढलं. योगायोग म्हणजे त्या रात्री आम्ही बुद्धिबळ खेळायला बसल्यावर सगळे डाव तो हरला! हे मोठंच आश्चर्य होतं. 'टोनीने तुला चेकमेट करणं म्हणजे अगदी नवलच आहे! असं कसं झालं?' लीलाने विचारलं. 'कारण तो माझ्यापेक्षा चांगला खेळला म्हणून' एवढंच त्यावर शरद म्हणाला, मला स्वतःलाही मी कसा जिंकू शकलो ह्याचं नवल वाटलं. कदाचित त्या पुस्तकाचा तो परिणाम असेल! पण त्यानंतर एक गोष्ट घडली, जिचं स्पष्टीकरण मी आजही देऊ शकणार नाही. ती म्हणजे त्या रात्रीनंतर शरदने माझ्याशी बुद्धिबळ खेळणं पूर्ण बंद केलं. दोन-तीनदा 'चल, एक डाव टाकू' असं मी सुचवलं, पण त्याने स्पष्ट नकार दिला. न खेळण्याचं कारणही त्याने काहीच सांगितलं नाही."
   आपले ऑफिसमधील काम सुरुवातीला जोशी यांना खूप आवडत होते. अर्थात त्यात प्रत्यक्ष कामापेक्षा ऑफिसातील अत्याधुनिक सुखसोयी, आंतरराष्ट्रीय वातावरण, कार्यसंस्कृती ह्यांचा वाटा अधिक होता. कामात कसलाही ताण नसे. शनिवार-रविवार सुट्टी असे. त्यामुळे वाचनासाठी भरपूर वेळ उपलब्ध असे. युपीयुचे सुसज्ज ग्रंथालय होते व शिवाय स्वतःच्या कामाला उपयुक्त अशी पुस्तके विकत घेण्याची अधिकाऱ्यांना मुभा होती. कामाच्या निमित्ताने जिनिव्हाला सारखे जावे लागे. तिथे पुस्तकांची मोठी मोठी दुकाने होती. जिनिव्हातले अधिकृत काम आटोपले, की तासन्तास या दुकानांत जोशी रमत. “किंमत किती आहे ह्याचा जराही विचार न करता पुस्तकं विकत घेण्यातला आनंद मी तिथे भरपूर उपभोगला. प्रचंड वाचन केलं," ते एकदा सांगत होते.

  "इतकी वर्षं तुम्ही दोघांनी एकत्र काम केलं; ह्या कालावधीतील ऑफिसमधल्या काही आठवणी तुम्ही सांगू शकाल का?" ह्या प्रश्नाला उत्तर देताना टोनी म्हणाले,
 "आठवायला लागलं तर अशा बऱ्याच आठवणी आहेत. आपल्या कामात शरद खूप हुशार होता. एका परिषदेतील त्याच्या सादरीकरणाने प्रभावित होऊन युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (UNDP) ह्या एजन्सीने ती युपीयुच्या टेक्निकल असिस्टन्स प्रोग्रॅमला देत असलेल्या निधीत लगेचच मोठी वाढ केली होती. अनेकांनी शरदची त्यावेळी स्तुती केली, पण तेवढ्यापुरतीच; नंतर सगळे त्याला विसरून गेले! त्याला अपेक्षित होती ती नोकरीतली बढती काही शरदला मिळत नव्हती. एकूणच आपल्याला आपल्या कामाचं उचित श्रेय कधी मिळत नाही असं त्याला नेहमीच वाटत असे व हा त्याच्या कमनशिबाचाच एक भाग आहे असं तो म्हणायचा. मला आठवतं, एकदा एका खात्यात चांगली सिस्टिम लावून देण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. तिथून त्याची लौकरच दुसऱ्या खात्यात बदली होणार होती हे त्याला ठाऊक होतं, पण तरीसुद्धा त्याने हे परिश्रम घेतले होते. मी त्याला विचारलं, 'तू तर आता इथून जाणार. मग ह्या सगळ्याचा तुला काय फायदा होणार? कशासाठी हे श्रम घेतलेस तू?' त्याचं उत्तर माझ्या आजही लक्षात आहे. तो म्हणाला होता, 'आपण लावलेल्या झाडाची फळं आपल्याला खायला मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं.'
 “मग त्याने मला येशू ख्रिस्ताच्या चौथ्या शिष्याची एक गोष्ट सांगितली होती. ती साधारण अशी होती. बेथलेहेममध्ये ज्या दिवशी ख्रिस्तजन्म झाला त्या दिवशी आकाशात एक खूप तेजस्वी तारा दिसला होता – ज्याचं प्रतीक म्हणून आम्ही ताऱ्याचा आकार असलेले कंदील नाताळच्या दिवशी लावतो. त्यावेळी असे तीन संत होते, ज्यांना तो तारा बघून कळलं, की येशूचा, देवाच्या मुलाचा जन्म होतो आहे व ते तिघे जण येशूचं स्वागत करायला बेथलेहेमकडे निघाले. यथावकाश ते तिथे पोहोचले व त्यांनी लहानग्या येशूचं कोडकौतुक केलं. तीन संतांची ही कथा प्रसिद्ध आहे, पण दुसरा एक भाग त्यात आलेला नाही. तो म्हणजे सामिरतान (समॅरिटन) नावाच्या तशाच एका चौथ्या संताची कथा. पुढे कुठल्यातरी एका इंग्रजी लेखकाने ती लिहिली होती व शरदच्या वाचनात आली होती म्हणे. हा संतदेखील तो तारा पाहन इतर तीन संतांच्या आधीच युरोपातून मध्यपूर्वेत बेथलेहेमला यायला निघाला होता; पण वाटेतल्या एका जंगलात काही लुटारूंनी त्याला पकडलं. त्याचं सगळं सामान लुटलं; अगदी त्याचे कपडेसुद्धा काढून घेतले आणि समुद्रकिनाऱ्यावर एका गुलामांचा व्यापार करणाऱ्याला विकलं. ख्रिस्ताचा पहिला संत बनण्यासाठी जो निघाला होता, तो अशाप्रकारे गुलाम बनला. त्या व्यापाऱ्याने सामिरतानला बोटीत भरलं व आफ्रिकेला नेऊन गुलाम म्हणून विकलं. गुलामगिरीच्या नरकयातना सोसत, चाबकाचे फटके खातखात त्याने अनेक वर्ष कशीबशी काढली. एक दिवस अचानक कशीतरी संधी मिळाली व तो मालकाच्या घरून पळाला. मनात ख्रिस्ताची भक्ती होतीच. पुन्हा त्याने बेथलेहेमची वाट पकडली. ख्रिस्तजन्माच्या वेळी आपण बेथलेहेमला पोचू शकलो नाही, पण आतातरी आपण तिथे जाऊ व त्याचं दर्शन घेऊ, ह्या आशेवर. शेवटी एकदाचा तो बेथलेहेमला पोचला. पण नेमक्या त्याच दिवशी ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आलं होतं. ख्रिस्ताचा पहिला शिष्य बनण्याऐवजी सुळी दिलेल्या ख्रिस्ताला सुळावरून उतरवण्याचं काम त्याच्या नशिबी आलं! 'मी ख्रिस्ताच्या त्या चौथ्या शिष्याप्रमाणे आहे, माझ्या कष्टांचं फळ मला कधीच मिळणार नाही आणि लहानपणापासूनच मी हे ओळखून आहे,' असं शरद तेव्हा म्हणाला होता."
 श्रेयविहीनतेची ही जाणीव जोशींच्या भावी आयुष्यातही पुनःपुन्हा डोकावते.

 शरद जोशी यांनी नंतर केलेल्या लेखनात स्वित्झर्लंडबद्दल तुरळक असे काही उल्लेख आहेत. एकूणच तो देश इतका समृद्ध आणि विशेष म्हणजे सुशासित असा आहे, की अडचणी अशा फारशा काहीच येत नाहीत; क्वचित कधी एखादी अडचण आली, तर किती तत्परतेने शासन आपत्तिनियोजन करते हे सांगताना जोशी लिहितात :

एकदा स्वित्झर्लंडमध्ये भर उन्हाळ्यात तीन आठवडे (या मोसमात एरव्ही तिथे पडणारा) पाऊस पडला नाही. लगेच सगळ्या माध्यमांतून धोक्याच्या सूचना खणखणू लागल्या – 'जंगलाजंगलातील गवत सुकेसुके, कोरडे झाले आहे; आगीचा धोका आहे. सिगारेटचे थोटूक प्रवासात इकडेतिकडे टाकू नका. एकदा आल्प्समधील एक शिखर सर करण्यासाठी आठ लोकांची टोळी गेली होती. बर्फाच्या वर्षावामुळे ती अडकून पडली. त्यांना सोडविण्यासाठी अवघ्या तासाभरात helicopters अपघातस्थळी जाऊन पोचली. अडकलेल्या गिर्यारोहकांच्या सुटकेचा तो सारा प्रचंड खटाटोप घरोघर लोकांनी टेलेव्हिजनवर प्रत्यक्ष पाहिला. असेच एकदा लष्करी सुरुंग पेरण्याच्या प्रदेशात एकदा एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लू चुकून शिरले, तर त्याच्या सुटकेच्या प्रयत्नांवर सगळ्या देशाचे लक्ष वेधले गेले.

(शेतकरी संघटक, २१ ऑक्टोबर १९९३)

 तेथील सरकार किती संवेदनशील व तत्पर आहे हे ह्यातून जाणवते.
 ह्याच लेखात पुढे जोशी यांनी केलेले एका भेटीचे वर्णन वाचनीय आहे. बर्न शहरातील एका नागरी सुरक्षेच्या केंद्रास त्यांनी दिलेली ही भेट होती. सर्वसामान्य प्रवासी अशा गोष्टी सहसा कधी बघू शकणार नाही; पण युनायटेड नेशन्समध्ये काम करताना ज्या सवलती मिळतात, त्याचा बहुधा हा फायदा होता.
 कधीकाळी कोणा शत्रूचे आक्रमण झालेच, तर त्याला रोखण्यासाठी अनेक मार्ग सरकारने तयार ठेवले होते. त्यांतला एक महामार्गांचे पट्टेच्या पट्टे बाजूला काढण्याचा व शत्रूची वाहतकच अशक्य करून सोडायचा होता. महामार्गांचा वापर लष्करी विमानांसाठी धावपट्टीसारखा करण्याचीही एक आपत्कालीन योजना होती. हे सारे ठाऊक असूनही त्या दिवशी जे पाहिले, त्यावर त्यांचा विश्वासही बसेना. बर्नच्या एक लाख लोकवस्तीसाठी हजारो लोकांना पुरेसा असा अवाढव्य सुरक्षा निवारा जमिनीखाली १०० मीटर इतक्या खोलीवर एका प्रचंड बोगद्यात केला होता. एखादा अणुबॉम्ब ह्या बोगद्याच्या डोक्यावरच पडला तर गोष्ट वेगळी; अन्यथा हे आश्रयस्थान अगदी पक्के सुरक्षित राहिले असते. जमिनीच्या इतक्या खोलवरही हवा खेळती राहण्याची व्यवस्था होती. लोकांकरिता झोपण्याची व्यवस्था होती. कोणत्याही संकटकाळी जेमतेम तासाभराच्या सूचनेवरून ही सारी यंत्रणा मदतीसाठी उपलब्ध होऊ शकत होती. मोठे सुसज्ज हॉस्पिटल कायम चकचकीत अवस्थेत तयार असते. कोठे संकट आले, तर सगळी तयारी सुसज्जपणे वाट पाहते आहे.

 इथे लीला जोशी यांनी लिहिलेल्या एका विस्तृत लेखातील थोडा भाग उद्धृत करावासा वाटतो. स्वित्झर्लंडबद्दलची काही मार्मिक निरीक्षणे त्यांनी नोंदलेली आहेत. त्यांनी लिहिलेला व प्रकाशित झालेला हा एकमेव लेख आहे. आधी तो अंबाजोगाई येथून श्रीरंगनाना मोरे प्रसिद्ध करत असलेल्या 'भूमिसेवक' ह्या पाक्षिकात प्रसिद्ध झाला. पुढे तो अलिबागहून अरविंद वामन कुळकर्णी प्रसिद्ध करत असलेल्या 'राष्ट्रतेज' ह्या साप्ताहिकात पुनर्मुद्रित केला गेला. आणि त्यानंतर तो 'शेतकरी संघटक'च्या २१ ऑक्टोबर १९८३च्या अंकात पुनर्मुद्रित केला गेला. लीलाताईंच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली म्हणून. पण 'वारकरी' ह्या शेतकरी संघटनेच्या पहिल्या मुखपत्रात मात्र तो प्रकाशित झाला नव्हता; तसेच कुठल्या पुस्तकातही तो समाविष्ट झालेला नाही व त्यामुळे फारशा वाचकांपर्यंत पोचला नसावा. लेखात त्या लिहितात :

 ह्या देशाने जी सधनता प्राप्त करून घेतली त्यामागचे कारण काय? आम्ही स्वित्झर्लंडमध्ये असताना भारतातले एक उद्योगपती आमच्याकडे आले होते. भारतातील उच्चमध्यमवर्गीयाइतके असलेले तेथील सामान्य कामगारांचे राहणीमान पाहून ते म्हणाले – 'त्यांच्याकडे पैसा आहे ना, म्हणून ते एवढं वेतन देऊ शकतात.' हे अनुमान साफ चूक! त्यांनी पैसा निर्माण केला. साठ वर्षांपूर्वी शेतीप्रधान, पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामोद्योग व शेती आणि आज एक औद्योगिक राष्ट्र अशी ह्या देशाची वाटचाल आहे.

 त्यांना स्वतःला स्वित्झर्लंडमध्ये गेल्यावर सर्वांत पहिली गोष्ट जाणवली, ती म्हणजे तेथील 'अन्नक्रांती'. सुपरमार्केटमध्ये खाण्यापिण्याच्या पदार्थांची लयलूट होती. नुसता दुग्धजन्य पदार्थांचा विभाग बघितला तरी माणूस थक्क होऊन जाई. असंख्य प्रकारचे चीज. विविध कंपन्यांचे, विविध स्वादांचे, चवींचे दही. चक्का, लोणी व त्यांपासून केलेले असंख्य पदार्थ. विशेष म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत कुठली असमानता नाही; तुम्ही गरीब असा वा श्रीमंत, सर्व लोक सर्व खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकतात. असमानता चालू होते ती स्थावर व जंगम मालमत्ता आणि तशा बाबतीत. औद्योगिक मालाकडे पाहिले तरी तेच. कपडे, खेळणी यांपासून ते टीव्ही, फ्रीज, मोटार ह्या सर्व वस्तू सर्वांच्या आवाक्यात येतात; अशा बाबतीत आपल्यासारखी कमालीची विषमता तिथे नाही. अगदी सामान्य शेतकऱ्यालाही या सर्व गोष्टी परवडतात.
 हे कशामुळे घडते याचा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की याचे कारण म्हणजे शेतकऱ्याला शेतीमालाच्या विक्रीतून चांगले पैसे मिळतात व त्यामुळे तो विकून औद्योगिक माल विकत घेणे त्याला परवडते. पुढे त्यांनी शेतीमाल व औद्योगिक माल यांच्या दोन्ही देशांतील किमतींचा तुलनात्मक आढावा घेतला आहे.
 उदाहरणार्थ, तिथे एक लिटर दुधाची किंमत १ फ्रँक तर एका रेफ्रिजरेटरची किंमत ५०० फ्रँक आहे; याउलट भारतात मात्र एक लिटर दुधाची किंमत २ रुपये तर एका रेफ्रिजरेटरची किंमत मात्र तब्बल ५००० रुपये आहे. ह्याचाच अर्थ, एक रेफ्रिजरेटर विकत घेण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये ५०० लिटर दूध विकावे लागते, तर त्यासाठी भारतात मात्र त्यासाठी २५०० लिटर दूध विकावे लागते. याचाच अर्थ भारतात एक रेफ्रिजरेटर विकत घेण्यासाठी स्वित्झर्लंडपेक्षा पाचपट शेतमाल विकावा लागतो. अशीच तुलना पुढे लेखात टीव्ही, मोटार ह्या गोष्टी विकत घेण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये व भारतात किती गहू वा तांदूळ विकावा लागेल ह्याबाबत केली आहे.
 शेतीमालाला उत्तम किंमत मिळत असल्यानेच स्विस शेतकरी भारतीय शेतकऱ्यापेक्षा खूप अधिक सहजगत्या औद्योगिक माल घेऊ शकतो हे त्यावरून स्पष्ट होत होते.
 स्वित्झर्लंडचा जास्तीत जास्त भू-प्रदेश शेतीखाली आणायचा म्हटला, तरी केवळ तीन पंचमांश लोकसंख्येला तो स्वतः अन्नधान्य पुरवू शकतो. उरलेले धान्य, तसेच मांस, मासे,अंडी त्यांना आयात करावी लागतात. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना परदेशातील स्वस्त खाद्यपदार्थांशी प्रचंड सामना करावा लागतो. त्याचवेळी डोंगरावरची शेती, लहान जमीनधारणा व छोटे गोठे यांमुळे स्वीस शेतीमालाचा उत्पादनखर्च मात्र जास्त असतो. यावर तेथे तोडगा कसा काढला याविषयी पुढे लीला जोशी यांनी लिहिले आहे,

औद्योगिक प्रसारामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी व लढाईच्या वेळेस काही अंशाने तरी खाद्यपदार्थांच्या बाबतीत स्वयंपूर्णता असावी म्हणून शेती जगवलीच पाहिजे व शेतीखालील क्षेत्र कमी होता कामा नये असे स्वीस सरकारचे धोरण आहे. त्यामुळे १९३० सालापासूनच स्वीस सरकारने शेतकऱ्यांचा माल उत्पादनखर्चावर आधारित उत्तम किमती देऊन विकत घेण्याचा निर्णय घेतला व तो माल बाजारात आयात केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्पर्धेत तोंड देईल एवढ्या कमी किमतीत ते विकू लागले. याचे पुढील २५ वर्षांत खालीलप्रमाणे फायदे झाले :

  1. मिळालेल्या नफ्यातून प्रत्येक शेतकऱ्याने शेतीचे यांत्रिकीकरण केले.
  2. भाज्या, फळे व धान्य शक्यतो प्रक्रिया करून व हवाबंद डब्यांतच विकण्यासाठी पाठवले जाऊ लागले.
  3. प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांच्या ग्रामोद्योगाचे एक प्रचंड जाळे तयार झाले.

अशा उपायांतून काही वर्षांतच स्विस शेतकरी स्वयंपूर्ण झाले व त्यामुळे गेल्या दोन पिढ्या सरकारी खरेदीची आवश्यकता तेथे राहिलेली नाही. तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या हिताकडे सरकार डोळ्यांत तेल घालून पाहत असते. भाव खूप पडले व शेतकऱ्याचे नुकसान होईल असे वाटले, तर पुन्हा बाजारात उतरून स्वतः मालाची खरेदी करायचे व मागणी वाढवून भावही वाढवायचे सरकारचे धोरण कायम आहे.

 स्वित्झर्लंडमध्ये असताना तेथील एका मोठ्या सहकारी संस्थेचे जोशी सदस्य बनले होते. त्या निमित्ताने तेथील सहकारी संस्था कशा काम करतात हे त्यांना नीट बघता आले. त्या संस्थेची किरकोळ विक्री करणाऱ्या शेकडो दुकानांची साखळी होती. शेतकऱ्याकडून थेट माल विकत घ्यायचा व ग्राहकाला या साखळीमार्फत विकायचा. अशा अनेक संस्था तिथे आहेत. यांतून शेतकऱ्याचीही सोय व्हायची व ग्राहकाचीही. शिवाय त्या सहकारी संस्थेलाही नफा व्हायचा व एक भागधारक या नात्याने लाभांशाच्या स्वरूपात तो जोशींनाही मिळायचा. अनेक वर्षांनी भारतात आल्यावर 'शिवार अॅग्रो' नावाने अशीच एक साखळी उभारायचा जोशींनी प्रयत्न केला होता; पण तो यशस्वी झाला नाही. त्याबद्दल पंधराव्या प्रकरणात येणारच आहे.

 चाकण परिसरात जेव्हा जोशींनी स्वतःच्या शेतीला प्रारंभ केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की तिथे भुईमुगाचे पीक भरपूर यायचे; पण त्याला भाव मात्र अगदी कमी मिळायचा. भुईमुगाचा दर्जाही खूप कमी होता व तो सुधारण्याचा फारसा प्रयत्नही कोणी करत नव्हते. जे काही पीक निघेल, ते तेथील तेलाच्या घाणी अगदी स्वस्त दरात विकत घेत व त्याचे तेल काढून ते भरपूर भावाने विकून स्वतः गब्बर होत. उरणारी पेंडदेखील चांगल्या किमतीला जाई. त्याऐवजी शेतकऱ्यांनी शेंगदाण्यापासून स्वतःच तेल काढले किंवा लोणी, खारवलेले दाणे, तळलेले दाणे वा इतर स्नॅक फूड तयार केले, तर त्यात खूप फायदा होता. पण तसा प्रक्रियाउद्योग त्या परिसरात उभारणे बरीच पाहणी करूनही जोशींना जमण्यातले दिसेना.
 दुसरा पर्याय होता, निर्यातीचा. परदेशातही शेंगदाण्याला भरपूर मागणी होती हे जोशींना ठाऊक होते. स्विस मार्केटमध्ये जोशींनी आपल्या ओळखीत एके ठिकाणी चौकशी केली. हा माणूस मदत मागत नाहीये, तर व्यापाराबद्दल बोलतो आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनीही मनापासून बोलणी करून सहकार्य दिले. त्यांची वार्षिक मागणी तब्बल तीनशे टनांची होती! पण त्यात एक अडचण होती; जगभरच्या भुईमुगाच्या शेतीचा त्यांनी अभ्यास केला होता व चाकण परिसरात होणाऱ्या शेंगदाण्यात अफ्लाटॉक्सिन (Aflatoxin) नावाचा एक विषारी पदार्थ खूप असतो हे त्यांच्या लक्षात आले होते.
 खरे तर, हे अफ्लाटॉक्सिन सर्वच शेंगदाण्यांत असते; ज्याला आपण खवटपणा म्हणतो, तो ह्याच अफ्लाटॉक्सिनमुळे येतो. पण भारतातील त्याचे प्रमाण आंतरराष्ट्रीय मानकापेक्षा पाच ते दहा पट अधिक असते. या विषामुळे यकृताचा व पोटाचा कॅन्सर होतो असे सिद्ध झाले आहे. आपल्या शरीराला कदाचित अशा जंतूंची व विषाची सवय झाली असल्याने आपल्या देशात आपण असल्या बाबींचा फारसा विचार करत नाही, पण तेथे शुद्धतेचे निकष खूप काटेकोरपणे पाळले जातात. म्हणूनच त्यांनी इस्राएल व दक्षिण आफ्रिकेतून हे शेंगदाणे मागवायला सुरुवात केली होती. “पण तुम्ही जर हे (अफ्लाटॉक्सिनचे) प्रमाण आंतरराष्ट्रीय मानकाएवढे कमी केलेत, तर आम्ही तुमच्याकडूनही माल घ्यायचा विचार करू," असे आश्वासन त्यांनी दिले.
 हे प्रमाण कमी करता येईल का, याविषयी जोशींनी खूप शेतकऱ्यांशी व तज्ज्ञांशी चर्चा केली; पण ते जमेना. शेतकऱ्यांनाही पारंपारिक पद्धतीने पीक काढणे व येईल त्या भावात तेलाच्या घाणींना विकून टाकणे, याचीच सवय झाली होती. आपण पिकाची गुणवत्ता सुधारली तर आपले उत्पन्न खूप वाढू शकेल, हा जोशींचा मुद्दा काही स्थानिक मंडळींना फारसा पटला नाही; किंवा पेलला नाही असे म्हणू या. हे अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण आंतरराष्ट्रीय मानकापेक्षाही खूप कमी असलेल्या भुईमुगाचे बियाणे तयार करण्यात पुढे बऱ्याच वर्षांनी, दोन हजार सालानंतर, कच्छमधील भूज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यश आले. असो.

 अशा समृद्ध देशात राहत असतानाही भारतात परतायचे की परदेशातच कायम राहायचे ह्याविषयी जोशीची मन:स्थिती सारखी दोलायमान होत असे. सुरुवातीचे वर्षभर ते तिथे रमले तरी केव्हातरी भारतात परत जावे हा विचारही त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी असायचाच. १९७०मध्ये त्यांचे वडील वारले. त्यावेळी तीन महिन्यांची रजा काढून ते भारतात सहकुटुंब आले होते. भारतात परत जाण्याच्या दृष्टीने थोडी चाचपणी करायचाही त्यांचा उद्देश होता. त्या अनुभवाबद्दल जोशींनी लिहिले आहे. प्रत्यक्ष भेटीतही ते त्याबद्दल बोलले होते. ते म्हणाले,
 "आधी आम्ही साहजिकच पुण्याला गेलो. कारण वडील सेवानिवत्त झाल्यानंतर पुण्यातच सेटल झाले होते आणि तिथेच वारले होते. वडलांचे सगळे दिवसवार वगैरे उरकल्यावर आम्ही प्रवासाला बाहेर पडलो. मुलींना जरा भारत दाखवावा व त्यातून भारताबद्दल त्यांचं चांगलं मत व्हावं, अशी आमची इच्छा होती. कारण कधीतरी भारतात परतायचं अशीच त्यावेळी आमची कल्पना होती. पण मुलींना भारत अजिबात आवडला नाही. दिल्ली, सिमला, आग्रा असा दौरा आम्ही आखला होता. ओळखीच्या एका लष्करी अधिकाऱ्यामळे राहायची उत्तम सोयदेखील करून ठेवली होती. दिल्लीहन सिमल्याला जाताना आम्ही खास डिलक्स बस घेतली होती. पण वाटेत जोराचा पाऊस सुरू झाला व त्या बसचं छत गळू लागलं. वरून अगदी धो धो पाणी पडू लागलं. थेट अंगावर. आम्ही सगळे भिजून चिंब झालो. थंडी जोराची. अगदी काकडून गेलो. चंडीगढची तेव्हा खूप चर्चा होती. नवी वसवलेली राजधानी. तीही कोर्बुसिए ह्या प्रख्यात फ्रेंच-स्विस आर्किटेक्टने. चंडीगढ मुलींना आवडेल अशी आमची कल्पना. पण प्रत्यक्षात त्यांना ते अजिबात आवडलं नाही. एक-दोनदा तेथील बसस्टॉपवरचं टॉयलेट वापरायचा प्रसंग आला. ते इतकं गलिच्छ होतं, की काही बोलून सोय नाही. ते स्वच्छतागृह मुलींनी पाहिलं आणि त्यांचा जीव घाबरा झाल्याचं मला जाणवलं. शक्य असतं, तर त्याच दिवशी विमान पकडून त्या परत बर्नला गेल्या असत्या."

 १९७० साली त्या दौऱ्यावर असताना स्वित्झर्लंडची व भारताची जोशी यांच्या मनात सतत तुलना होत असे, कुटुंबीयांशीदेखील सतत ह्या विषयावर चर्चा होत असे. भारतात परतावे हे जोशींच्या मनात अधिक असे, पत्नी व मुलींचा मात्र त्याला प्रथमपासूनच कडवा विरोध होता. शेवटी सहकुटंब जेव्हा ते बर्नला परतले, तेव्हा यापुढे स्वित्झर्लंडमध्येच राहायचा निर्णय त्यांनी काहीशा नाइलाजाने घेतला.
 बघता बघता आणखी दोन वर्षे गेली. मुली तेथील फ्रेंच शाळेत रमल्या होत्या, नोकरी उत्तम होती, स्वतःचे घर झाले होते; कमी असे काही नव्हतेच. पण तरीही पुन्हा एकदा मनात असमाधान खदखदू लागले.

 ह्या असमाधानामागे काय कारणे होती? त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांना त्यांच्या वागण्यात तसे काही जाणवत होते का? ह्याबद्दलची आपली निरीक्षणे मांडताना टोनी म्हणाले -
 "असं नेमकं काही सांगणं अवघड आहे, कारण दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे ह्याची कल्पना बाहेरून बघणाऱ्याला कशी येणार? पण एक-दोन गोष्टींचा उल्लेख करायला हरकत नाही.
 “एक म्हणजे, आपल्या नोकरीत शरदची स्थिती काहीशी साचलेल्या पाण्यासारखी झाली होती. आपल्याला प्रमोशन मिळायला हवं, आपली नक्कीच ती पात्रता आहे असं त्याला सतत वाटत होतं आणि ते प्रमोशन काही त्याला मिळत नव्हतं. ह्यावरून एकदा तो माझ्यावरही चिडला होता. आम्ही ऑफिसमधून घरी परतत होतो. ह्यावेळी गाडी त्याची होती. मी शेजारी बसलो होतो. गाडी चालवताना नेहमीप्रमाणे तो गप्पा मारत नव्हता. काहीसा घुश्श्यातच दिसत होता. मी त्याबद्दल काहीतरी बोललो. त्यासरशी माझ्याकडे कटाक्ष टाकत तो म्हणाला, 'लोकांनी तुझ्या घरावर दगड मारायला नको असतील, तर तूही दुसऱ्यांच्या घरावर दगड मारणं थांबव.' नंतरच्या बोलण्यात उलगडलं, की त्याला प्रमोशन मिळू नये म्हणून, मी त्याच्या बॉसपाशी काही कागाळ्या केल्या होत्या, असं त्याला वाटत होतं. हे सगळं त्याच्या मनात कोणी भरवलं होतं कोण जाणे, पण ते अर्थातच खोटं होतं. नंतर मी खुलासा केल्यावर मात्र त्याला तो पटला आणि आमच्यातला तो दुरावा दूर झाला.
 "आपल्याला अपेक्षित ते प्रमोशन मिळत नाही ह्याबद्दलचा शरदचा राग वाढायला आणखी एक कारण घडलं. आमचे डायरेक्टर जनरल त्यावेळी एक इजिप्शियन मुस्लिम गृहस्थ होते व जोशींना डावलून त्यांनी काँगो देशातील दुसऱ्या एका मुस्लिम कर्मचाऱ्याला ते प्रमोशन दिलं. त्यामुळे चिडलेला शरद मला म्हणाला, 'आपल्या या इंटरनॅशनल ब्यूरोत आता कामातल्या हुशारीला काहीच स्थान उरलेलं नाही. पूर्वी बढती देताना ती व्यक्ती कुठल्या खंडातून आलेली आहे याचा विचार व्हायचा. मग देशाचा विचार व्हायचा. मग राष्ट्रीयत्वाचा विचार व्हायचा. मग वर्णाचा विचार व्हायचा. आणि आता आणखी एका गुणाचा विचार होतो - तो म्हणजे त्या व्यक्तीच्या धर्माचा!' ह्याविरुद्ध तक्रार करायचं त्याने ठरवलं.
 "जिनिव्हाला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं एक अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आहे. युएनच्या कुठल्याही शाखेतील कर्मचाऱ्यावर काही अन्याय होत असेल तर तो तिथे दाद मागू शकतो. आपल्याला पात्रता असूनही प्रमोशनसाठी डावललं जात आहे अशा प्रकारचं निवेदन त्याने ह्या ट्रायब्युनलपाशी दिलं होतं. त्या संदर्भात त्याला ट्रायब्युनलने त्याची बाजू ऐकून घ्यायला बोलावलंही होतं. पण दुर्दैवाने त्याची बाजू ट्रायब्युनलला पटली नाही व ती केस डिसमिस केली गेली.
 "आज मागे वळून बघताना मला वाटतं, की त्याने जर अजून थोडा धीर धरला असता, तर त्याला प्रमोशन नक्की मिळालं असतं; जसं ते रुटीनमध्ये मलाही मिळत गेलं. इथे राहिला असता, तर तो माझ्याही वर, अगदी असिस्टंट डायरेक्टर जनरलच्या लेव्हलपर्यंत गेला असता. पण त्याने नोकरी सोडायचाच निर्णय घेतला.
 "दुसरी एक घटना इथे नमूद करावीशी वाटते. शरद काही खूप चांगला ड्रायव्हर नव्हता; मी म्हणेन तो अॅव्हरेज ड्रायव्हर होता. एकदा गाडी चालवत असताना त्याच्या गाडीला गंभीर अपघात झाला होता. सुदैवाने त्याला स्वतःला काही दुखापत झाली नव्हती, पण त्याच्या मोटारीचं जबरदस्त नुकसान झालं होतं. माझ्या आठवणीप्रमाणे ती दुरुस्त करायचं गराजचं बिल ७००० स्विस फ्रैंक्स की असंच काहीतरी आलं होतं. तेवढे पैसे इन्शुरन्स कंपनी देणं शक्यच नव्हतं. 'माझं सगळं सेव्हिंग ह्यात गेलं' असं तो मला म्हणाल्याचं आठवतं. ह्या अपघातामुळे तो चांगलाच हादरला होता आणि ते तसं स्वाभाविकच होतं.
 “एकूणच युएनच्या कामाबद्दल तो असमाधानी होता. आमचं बरचसं बजेट हे आमचे पगार, सल्लागारांचा मेहेनताना, प्रवास, हॉटेल, भव्य कार्यालय, डामडौल वगैरेवरच खर्च होतं; त्यातून गरीब देशांचं काहीच कल्याण होत नाही, अशी त्याची धारणा बनत चालली होती व त्यात तथ्यही होतंच.
 "तरीही त्याने ही नोकरी सोडून भारतात जाऊ नये, इथेच त्याचा व त्याच्या कुटुंबीयांचाही उत्तम व्यक्तिगत विकास होऊ शकेल असं त्याला मी समजावलं. युएनमधील नोकरीमुळे काळाच्या ओघात त्याला स्वीस नागरिकत्वदेखील मिळू शकलं असतं. पण तसा तो निश्चयाचा पक्का होता व शेवटी त्याच्या मनाप्रमाणेच तो भारतात परत गेला."

 जोशींच्या बर्नमधील कामाचे स्वरूप जुलै १९६९नंतर अधिक व्यापक झाले होते. युपीयुमधील नेहमीचे काम होतेच; पण त्याशिवाय युएनच्या विविध शाखा विकासासाठी जे कार्यक्रम जगभर राबवत होत्या, त्या कार्यक्रमांच्या आखणीसाठी आवश्यक त्या सामाजिक-आर्थिक पाहण्या करणे, त्यांना संख्याशास्त्रीय मदत करणे हाही आता त्यांच्या कामाचा एक भाग होता. त्यासाठी जगभर प्रवासही करावा लागे. हे सारे करताना जे त्यांच्या लक्षात येत होते ते युएनविषयी असलेल्या सर्वसामान्य कल्पनांना मुळापासूनच आव्हान देणारे होते.

 ह्या साऱ्याची थोडी पार्श्वभूमी समजून घेणे जरुरीचे आहे. जगातील वाढत्या विषमतेची खंत पाश्चात्त्य जगातील अनेक नेत्यांना व जनतेलाही वाटत असे. त्यांच्या भावना प्रामाणिक होत्या. वसाहतवादातून आपल्यापैकी अनेक राष्टांनी तिसऱ्या जगातील देशांचे शोषण केले आहे व त्याची काहीतरी भरपाई म्हणून आपण त्यांना मदत केली पाहिजे ही त्यांची धारणा होती. युएनच्या सर्वच संस्थांचा भर त्यावेळी गरीब-श्रीमंत राष्ट्रांमधली अनुल्लंघनीय वाटणारी दरी कशी मिटवता येईल ह्यावर होता. जोशींच्या ऑफिसमध्येही गरीब देशांमधील पोस्टल सेवा कशी सुधारता येईल, त्यासाठी श्रीमंत देश कुठल्या स्वरूपात साहाय्य करू शकतील ह्याची चर्चा सतत होत असे.
 डिसेंबर १९६१मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यूयॉर्क येथे भरलेल्या अधिवेशनात अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी 'साठचे दशक हे विकासाचे दशक असेल' असे जाहीर केले. जगातील विषमता कमी व्हावी हा त्यामागचा उद्देश. त्याला 'फर्स्ट डेव्हेलपमेंट डिकेड' असे म्हटले गेले. त्या दशकात अविकसित देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी ५ % वाढ व्हावी असे ठरवले गेले. मात्र प्रत्यक्षात ही वाढ अवघी २% एवढीच झाल्याचे १९७०मध्ये लक्षात आले. त्याचवेळी विकसित देशांचे उत्पन्न मात्र ह्याच्यापेक्षा खूपच अधिक वेगाने वाढले होते; म्हणजेच विषमता कमी होण्याऐवजी वाढलेली होती.
 त्यानंतर १९७०मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या पंचविसाव्या अधिवेशनात ही विषमता कमी करण्याच्या दृष्टीने सत्तरचे दशक हे 'सेकंड डेव्हलपमेंट डिकेड' म्हणून जाहीर केले. त्या दरम्यान अविकसित देशांचे उत्पन्न पाचऐवजी सहा टक्क्यांनी दरवर्षी वाढावे असे लक्ष्य ठरवण्यात आले. हे शक्य व्हावे, म्हणून सर्व विकसित देशांनी आपल्या उत्पन्नाचा एक टक्का इतका भाग हा अविकसित देशांना मदत म्हणून द्यावा असाही एक ठराव त्याच अधिवेशनात संयुक्त राष्ट्र संघाने संमत केला. गरीब देशच फार मोठ्या बहुसंख्येने असल्याने अधिवेशनातील मतदानात तो संमत होणे अगदी सोपे होते. अर्थात श्रीमंत (म्हणजेच मुख्यतः पाश्चात्त्य) राष्ट्रांचाही त्याला विरोध नव्हता.
 पण तरीही विषमता कमी होण्याऐवजी सतत वाढतच होती. १९७५ साली विकसित देशांचे दरडोई उत्पन्न अविकसित देशांच्या उत्पन्नापेक्षा वीस पट झाले होते!

 ह्या सुमारास जेव्हा 'मदत विरुद्ध व्यापार' ('aid versus trade') ह्याबद्दल जागतिक स्वरूपाची चर्चा सुरू झाली, तेव्हा 'मदत देण्यामागच्या अटी' आणि अविकसित देशांना नुकसान पोचवणाऱ्या व्यापाराच्या अटी' यांमागचे भयानक सत्य प्रकाशात येऊ लागले. जोशींच्या लक्षात आले, की मदत म्हणून जेव्हा काही निधी श्रीमंत राष्ट्रे देत, तेव्हा त्यासोबत अनेक अटीही असत. उदाहरणार्थ, ह्या रकमेतून तुम्ही आम्ही बनवलेला अमुकअमुक इतका माल खरेदी केला पाहिजे. म्हणजे प्रत्यक्षात श्रीमंत राष्ट्रांची बाजारपेठ वाढवण्यासाठीच ह्या तथाकथित मदतीचा उपयोग होत होता. हे काही प्रमाणात अपरिहार्यही होते. कारण मुळात कुठल्याही राष्ट्राला विकास करण्यासाठी ज्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज होती व नंतर ज्या प्रकारच्या उद्योगांची गरज होती, ते उभारण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री व तंत्रज्ञान हे श्रीमंत राष्ट्रांकडेच उपलब्ध होते. गरीब देशांतून येणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कायम कमी व श्रीमंत देशांतून निर्यात होणाऱ्या पक्क्या मालाच्या किमती कायम जास्त हे व्यापारातले वास्तव विदारक होते. 'मदत' या शब्दाला त्यामुळे काही अर्थच उरत नव्हता.
 याचवेळी आपण देत असलेल्या मदतीची रक्कम अविकसित देशांतील अभिजनवर्ग स्वतःच खाऊन टाकतो व खऱ्या गरजू लोकांना काहीच मिळत नाही हे मत त्यावेळी अनेक पाश्चात्त्य वृत्तपत्रांमधून अधोरेखित होत असे. एखाद्या आफ्रिकन देशातील राजा आपल्या अल्सेशिअन कुत्र्याला चिकन भरवतो आहे व त्याचवेळी त्याच्या देशातील हजारो सामान्य लोक उपाशी मरत आहेत अशा प्रकारची व्यंग्यचित्रे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत होती. पाश्चात्त्य समाजात त्यामुळे गरीब देशांना 'मदत' द्यायला विरोध वाढू लागला.

 स्वतः जोशी यांचा अनुभवही या मताला दुजोरा देणारा होता. ते जेव्हा आपल्या कामाचा भाग म्हणून वेगवेगळ्या अविकसित देशांमध्ये जात, त्यावेळी त्यांनीही त्या देशांतील वाढती अंतर्गत विषमता बघितली होती व जागतिक पातळीवरील गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील विषमतेपेक्षा ती अधिक भयावह होती. विशेषतः आफ्रिकेतील नायजेर ह्या देशामधील अनुभव त्यांना बराच अंतर्मुख करून गेला. तिथे त्यांनी बघितले, की देशाच्या राजधानीचा थोडासा भाग खूप श्रीमंत दिसतो, तिथे बडी बडी हॉटेल्स आहेत, विदेशी मोटारी, सौंदर्यप्रसाधने, अत्याधुनिक उपकरणे, कपडे हे सर्व काही ठरावीक दुकानांतून उपलब्ध आहे व एकूणच राज्यकर्ता वर्ग व इतर सत्ताधारी ऐषारामात जगत आहेत. अगदी युरोपातील उच्चवर्गीयांप्रमाणेच त्यांची जीवनशैली आहे. पण त्याचवेळी त्या देशातील बहुसंख्य जनता मात्र भीषण दारिद्र्यात सडत आहे.
 जोशींनी हेही बघितले होते, की वेगवेगळ्या अविकसित देशांची मोठी मोठी शिष्टमंडळे युएनच्या परिषदांसाठी वा अन्य कार्यक्रमांसाठी युरोप-अमेरिकेत जातात तेव्हा त्यांचा एकूण दृष्टिकोन हा केवळ सरकारी पैशावर परदेशात मजा मारणे हाच असतो; प्रत्यक्षात संयुक्त राष्ट्रांकडे भीक मागण्याच्या पलीकडे ती काहीच करत नाहीत आणि मुख्य म्हणजे आपल्या देशाचा विकास व्हावा अशी तळमळही ह्या बड्या मंडळींना नसते; ते केवळ स्वतःची चैन आणि स्वार्थ एवढेच पाहत असतात.
 त्यांचे एक निरीक्षण असे होते, की ह्या गरीब देशांतील नेते एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी गेले, की नेहमी आलिशान गाड्यांमधूनच फिरायचे व त्याउलट श्रीमंत देशांतील नेते मात्र तुलनेने साध्या गाड्या वापरत. हाच फरक कपडे, खाणेपिणे, दैनंदिन राहणी ह्या सगळ्यातच उघड दिसायचा. म्हणजे बोलताना आपण गरीब देशांच्या जनतेचा आवाज उठवतो आहोत असा आविर्भाव आणायचा, पण स्वतःच्या दैनंदिन जगण्यात मात्र अगदी चैनीत राहायचे! ह्या सर्व ढोंगबाजीची जोशींना घृणा वाटू लागली.
 सुरुवातीला खूप मानाच्या आणि महत्त्वाच्या वाटलेल्या युएनमधील नोकरीत पुढे आपल्याला वैयर्थ्य का जाणवू लागले याची काही कारणे स्वतः जोशी यांनी योद्धा शेतकरी या पुस्तकात उद्धृत केलेल्या संभाषणात व इतरत्रही नमूद केली आहेत. त्यांच्या मते बाहेरून पाहणाऱ्याला असे वाटत असते, की या संयुक्त राष्ट्रसंघात फार महत्त्वाचे असे काही काम चालले आहे. पगारवगैरे उत्तमच असतो. पण संयुक्त राष्ट्रसंघाला प्रत्यक्ष अधिकार असे फारसे नसतात. वेगवेगळ्या देशांचे धोरण शेवटी ते ते देशच ठरवत असतात. संयुक्त राष्ट्रांमध्ये जेव्हा 'सेकंड डेव्हेलपमेंट डिकेड'चे काम सुरू झाले – म्हणजे 'विकासाच्या दुसऱ्या दशकाची' आखणी सुरू झाली – तेव्हा ह्या संघटनेतून बाहेर पडावे, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. 'विकासाचे दुसरे दशक' म्हणजे नेमके काय? विकासाचे पहिले दशक' तरी कुठे नीट पार पडले आहे? मग लगेच हे दुसरे दशक सुरू करायची भाषा कुठून आली? – असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले.
 युएनतर्फे राबवला जाणारा 'विश्वव्यापी तांत्रिक साहाय्य' किंवा 'टेक्निकल असिस्टन्स' नावाचा जो कार्यक्रम आहे. तो म्हणजे एक फार मोठी बनवाबनवी आहे. खोटेपणा आहे हेही त्यांना कळून चुकले. ह्या तांत्रिक' साहाय्यातील फार मोठी रक्कम ह्या सल्लागारांच्या भरमसाट पगारातच जाते, आणि प्रत्यक्षात ज्यांना फायदा व्हावा म्हणून हा निधी उभा केला जातो, त्यांना जे हवे ते कधीच मिळत नाही.
 ह्याशिवाय, आणखीही एक भयानक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे हे सारे वास्तव उघडउघड दिसत असूनही गरीब देशांतले सारे अर्थतज्ज्ञ, राज्यकर्ते, विचारवंत त्याकडे पूर्ण डोळेझाक करतात व जी भूमिका घेण्याने स्वतःचा फायदा होईल, स्वतःला आंतरराष्ट्रीय परिषदांचे आमंत्रण येईल, पुरस्कार मिळतील तीच भूमिका घेतात. स्वार्थापोटी आपली बुद्धी त्यांनी चक्क गहाण टाकलेली असते. आपली सध्याची नोकरी म्हणजेदेखील अप्रत्यक्षरीत्या ह्याच सगळ्या भ्रष्ट यंत्रणेचा एक भाग आहे, असेही त्यांना वाटू लागले.

 एकीकडे त्यांचे वाचन व चिंतन सतत चालूच होते; भारतातील गरिबीचा प्रश्न हा शेतीमालाला मिळणाऱ्या अत्यंत अपुऱ्या किमतीशी निगडित आहे हे त्यांच्या लक्षात आले होते; पण त्यावर युएनमध्ये काहीच चर्चा होत नव्हती. ह्या सगळ्याचा जोशींना अगदी उबग आला. जोशी म्हणतात,
 "दारिद्र्याच्या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा खराखुरा प्रयत्न कुणी केलेलाच नाही, हेदेखील माझ्या ध्यानात यायला लागलं! मी वेगवेगळे अहवाल आणि ग्रंथ वाचू लागलो, तेव्हा ह्या दारिद्र्याच्या प्रश्नाचं मूळ टाळून development techniques, linear programming equations वगैरे जडजंबाल शब्दांमध्ये जे काही लिहिलं जायचं, वाचायला मिळायचं, ते अगदी खोटं आहे हे प्रकर्षाने जाणवू लागलं. असे अहवाल आणि पुस्तकं लिहिणारे विशेषज्ञ हे दारिद्रयाच्या मढ्यावर चरणारे लोक आहेत, ह्याबद्दल माझ्या मनात काहीही शंका उरली नाही! १९७२च्या सुमारास माझ्या मनात भारतामध्ये परतायचं हा विचार पक्का झाला आणि भारतात जाऊन काय करायचं, तर कोरडवाहू शेती - हेदेखील मी पक्कं ठरवलं! सगळ्या देशातील दारिद्र्याचं मूळ हे ह्या कोरडवाहू शेतीमध्ये आहे, अशी माझ्या मनाची खात्री पटली होती."

 हळूहळू व्यक्तिगत पातळीवरही जोशींच्या मनात बरीच कटुता जमा होत होती. याची काही कल्पना टोनी यांच्या बोलण्यावरून येते. शिवाय जोशींचा युपीयुमधील स्टाफ असोसिएशनचा व एकूण सामाजिक वर्तुळाचा अनुभवही फारसा चांगला नव्हता. ते एकदा म्हणत होते,
 "तिथल्या बहुतेक लोकांच्या मनात भारतीय माणूस म्हटल्यावर एक विशिष्ट प्रतिमा असते. देवभोळा, हिंदू परंपरा पाळणारा वगैरे. किंवा मग भांडवलदारांवर, उद्योगक्षेत्रावर, आधुनिक तंत्रज्ञानावर सतत टीका करणारा वगैरे. मी या दोन्ही प्रकारांत बसणारा कधीच नव्हतो. भारतीय म्हणून एखाद्याने जी भूमिका घ्यावी असं त्यांना वाटायचं, तसं वागणारे, किंवा वरकरणी तशीच भूमिका घेणारे, इतर अनेक उच्चभ्रू भारतीय तिथे यायचे. ह्या उच्चभ्रूचं ते प्रतिमा जपणं मला ढोंगीपणाचं वाटे. मी कधीच तो प्रकार केला नाही. दुसरं म्हणजे, भारतासारख्या मागासलेल्या देशातील माणसाला परदेशी खरी प्रतिष्ठा, खरं बरोबरीचं स्थान हे कधीच मिळत नाही.
 म्हणजे वरकरणी सगळं नॉर्मल असतं, तुमचा अपमान वगैरे कोणी करत नाही, कायदेही सगळे सर्वांना समान असतात; पण त्यांच्या मनात एक दुरावा कायम असतोच. त्यांच्या समाजाचा एक घटक म्हणून ते तुमचा कधीच स्वीकार करत नाहीत. शिवाय तुम्ही व्यक्तिशः कितीही कर्तबगार असला, तरी तुमच्या देशाच्या एकूण मागासलेपणाचं ओझं तुमच्या खांद्यावर असतंच. तुमचं मूल्यमापन करताना तुम्ही शेवटी एक भारतीय आहात, मागासलेल्या देशातले आहात, ह्याचा त्यांना सहसा कधी विसर पडत नाही."
 जोशींसारख्या मानी माणसाला हे सारे सहन होत नसे.
 बांगलादेशातील यादवी युद्ध, भारतात आलेल्या बांगला निर्वासितांच्या छावण्या, भारतातील दुष्काळ, उपासमार, भ्रष्टाचार आणि त्याचवेळी काही जण मात्र श्रीमंत राष्ट्रांतील श्रीमंत वर्गानही हेवा करावा अशा विलासी थाटात मजा मारत आहेत अशी चित्रे त्यावेळी पाश्चात्त्य टीव्हीवरून जवळजवळ रोजच दाखवली जात होती. साधारण त्याच काळात सिक्कीमचे भारतात विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्या प्रकरणातदेखील भारत सरकार एका छोट्या पण स्वायत्त देशाशी दांडगाई करत आहे असे मानणारा एक मोठा वर्ग पाश्चात्त्य जगात होता. "हे सारं तुमच्या देशात होत असताना तुमच्यासारख्या कर्तृत्ववान भारतीयाने इथे युरोपात राहावं हे तुमच्या सरकारला परवडतं तरी कसं काय?" असा प्रश्न जोशींना एका इंग्रज अधिकाऱ्याने विचारलाही होता.

 प्रश्नाचा गर्भितार्थ अगदी स्पष्ट होता; त्यांना असे म्हणायचे होते की – तुम्ही तुमच्या देशात जाऊन तिथले प्रश्न सोडवायच्याऐवजी इथे युरोपात काय मजा मारत बसला आहात?

 व्यक्तिगत पातळीवरील आणखी एक निरीक्षण त्यांना चीड आणत असे. आपल्या इतर युरोपियन सहकाऱ्यांपेक्षा आपण अधिक कर्तबगार आहोत अशी जोशी यांची खात्री होती. पण त्याचवेळी भारतीय म्हणजे गरीब लोक, हा मागासलेला देश, आपण ह्यांना मदत केली पाहिजे, त्यांचा विकास करायला पाहिजे अशा प्रकारची एक वडिलकीची (patronizing) भावना पाश्चात्त्य समाजात त्यांना खूपदा आढळायची. व्यक्तिशः आपल्याकडे बघण्याची पाश्चात्त्यांची दृष्टीही तशीच अहंगंडातून आलेली आहे असे त्यांना जाणवायचे. ह्या भावनेतून येणारा पाश्चात्त्यांचा दातृत्वाचा आविर्भाव त्यांना चीड आणायचा; त्यांच्यातील प्रखर आत्मभानाला म्हणा किंवा अस्मितेला म्हणा तो कुठेतरी डंख करणारा होता.
 मागे लिहिल्याप्रमाणे आपण कोणीतरी मोठे व्हावे, जगावेगळे काहीतरी करून दाखवावे अशी एक महत्त्वाकांक्षा जोशी ह्यांच्या मनात लहानपणापासून होतीच. भारतातील पोस्टखात्यात उच्चपदी असतानाही ह्या महत्त्वाकांक्षेने त्यांची पाठ सोडली नव्हती. स्वित्झर्लंडमध्ये राहताना बाकी सगळे असूनही ह्या मूलगामी महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेच्या दृष्टीने काहीच घडत नव्हते, घडणे शक्यही वाटत नव्हते. शेवटी भारत हीच आपली कर्मभूमी असायला हवी, इथे आपले आयुष्य फुकट चालले आहे, ही जाणीव त्यांच्या मनात त्यावेळी निर्माण झाली असणे सहजशक्य आहे.
 टोनी म्हणाले,
 "एक दिवस आपला मालकीचा फ्लॅट विकून टाकायचा व बर्नमध्ये भाड्याचं घर घेऊन राहायचा निर्णय त्याने घेतला. हे त्याने जेव्हा मला सांगितलं, तेव्हाच भारतात परतायचा त्याचा निर्णय पक्का झाला आहे, हे माझ्या लक्षात आलं. आणि एकदा त्याच्या मनानं एखादी गोष्ट घेतली, की त्याचं मन वळवणं अवघड नव्हे तर अशक्य आहे, हे आठ वर्षांच्या सहवासात मला कळून चुकलं होतं."

 भारतात प्रत्यक्ष परतायच्या काही वर्षे पूर्वीच तसे करायचा सुस्पष्ट विचार जोशी यांच्या मनात आकाराला आला होता हे स्पष्ट करणारी काही कागदपत्रे उपलब्ध आहेत.
 उदाहरणार्थ, मार्च १९७४ मध्ये हैद्राबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट या संस्थेच्या संचालकांबरोबर झालेला त्यांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यानुसार त्या संस्थेने स्वत:च्या जर्नलच्या वर्गणीचे म्हणून पाठवलेले सहा पौंडांचे बिलही उपलब्ध आहे. आपल्या पत्रात १५ जुलै ते ३१ डिसेंबर १९७४ या कालावधीत संस्थेचा कोर्स करायची इच्छाही जोशींनी व्यक्त केली आहे.
 राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एम. एस. ऊर्फ नानासाहेब पवार यांना जोशींनी लिहिलेले पत्र व त्याला नानासाहेब पवार यांनी दिलेले उत्तरही उपलब्ध आहे. त्या पत्रात भारतातील शेतीचा अभ्यास करायची इच्छा जोशींनी व्यक्त केली आहे व उत्तरात पवार यांनी त्यांना मार्गदर्शनही केलेले आहे. "आमचे एक प्राध्यापक डॉ एस. एस. थोरात पुणे कृषी महाविद्यालयात आहेत व त्यांच्याबरोबर १५ जुलै ते ३१ डिसेंबर या कालावधीत तुम्ही काम करू शकता. ते तुम्हाला पुण्याभोवतीच्या खेड्यांमधून घेऊन जातील, तेथील शेतकऱ्यांमधील आमचे काम तुम्ही पाहू शकाल," असेही त्यात लिहिले आहे.
 त्यानंतर दोन वर्षांनी, २६ मार्च १९७६ रोजी, दिल्लीत प्रधानमंत्री कार्यालयातील सचिवांना जोशींनी बर्नहून एक महत्त्वाचे पत्र लिहिले आहे. त्या पत्रात भारतात परतायचा व शेतीविषयक काम करायचा आपला निर्णय त्यांनी कळवला आहे. सोबत आपल्या मनातील प्रकल्पाचा आराखडाही पाठवला आहे. त्यासाठी शासनाकडून पडीक जमीन उपलब्ध होईल का' अशी विचारणा केली आहे. असेच पत्र आपण महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले असल्याचा पत्रात उल्लेख आहे. "ही जमीन मी रोख पैसे देऊन विकत घेईन. शासनाकडून कुठल्याही प्रकारच्या साहाय्याची मला अपेक्षा नाही," हेही पत्रात स्पष्ट केलेले आहे हे मुद्दाम नमूद करण्यासारखे आहे.
 प्रस्तुत पत्राला सहसचिव, प्रधानमंत्री सचिवालय, यांनी लिहिलेले ५ एप्रिल १९७६ तारखेचे उत्तर उपलब्ध आहे. त्यात लिहिले आहे,
 "तुमचे पत्र व सोबतचा तुम्ही बनवलेला कमीत कमी भांडवल वापरून शेती करायच्या पायलट प्रोजेक्टचा आराखडा मिळाला. या महत्त्वाच्या विषयात तुम्ही स्वारस्य घेत आहात याचे कौतुक वाटते. आपल्याला हे पटेलच की केवळ कच्च्या आराखड्याच्या आधारावर विस्ताराने काही प्रतिसाद देणे आम्हाला अवघड आहे, पण महाराष्ट्रात परतल्यावर तुम्ही तेथील शासनाशी चर्चा करणार असल्याचे तुम्ही पत्रात लिहिलेच आहे. महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला नक्कीच सर्व अपेक्षित उत्तरे मिळतील."
 पत्रासोबत आपल्या योजनेचा कच्चा आराखडा जोडला असल्याचा उल्लेख जोशींनी केला आहे, व तो मिळाल्याचा उल्लेख सहसचिवांच्या उत्तरात आहे, पण दुर्दैवाने त्या आराखड्याची प्रत मात्र जोशी यांच्या कागदपत्रांत उपलब्ध झाली नाही. ती उपलब्ध असती, तर तो एक महत्त्वाचा दस्तावेज ठरला असता.
 या सर्व पत्रव्यवहारावरून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे भारतात प्रत्यक्ष परतायच्या निदान दोन वर्षे आधी भारतात परतायचे व परतल्यावर कोरडवाहू शेतीविषयक प्रयोग करायचे जोशी यांचे ठरले होते व त्यादृष्टीने बरेचसे नियोजनही त्यांनी केले होते.

 १ मे १९७६ रोजी, म्हणजे युपीयुमध्ये दाखल झाल्यानंतर बरोबर आठ वर्षांनी, जोशी भारतात परतले. तिथेच राहिले असते तर २००१पर्यंत त्यांना नोकरी करता आली असती पण त्यांचा निश्चय अविचल होता. टोनी म्हणाले,
 "त्यानंतर त्याचा व माझा काहीच संबंध राहिला नाही. आमच्यात पत्रव्यवहारदेखील कधी झाला नाही. तो भारतात शेतकऱ्यांना वाजवी भाव मिळावा यासाठी काही काम करतो, एवढं फक्त मला कुठूनतरी ऐकून कळलं होतं. अशीच जवळजवळ दोन वर्षं गेली. मग साधारण १९७८च्या सुमारास अचानक त्याचं मला पत्र आलं. त्याला झुरिकजवळ स्प्रायटेनबाख (Spritenbach) नावाच्या गावी असलेली झ्वीबाख (Zwibach) पोटॅटो चिप्स फॅक्टरी नावाची एक वेफर्स बनवायची फॅक्टरी बघायची होती. त्यानुसार तो स्वित्झर्लंडला आला, ठरल्याप्रमाणे बर्नला माझ्याच घरी राहिला. मी त्यापूर्वीच तिथल्या मॅनेजमेंटला फोन करून अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. दुसऱ्या दिवशी मीच त्याला त्या फॅक्टरीत घेऊन गेलो. पूर्ण दिवस आम्ही त्या फॅक्टरांमध्ये घालवला. सगळं बघण्यात आणि चर्चा करण्यात. तिथल्या अधिकाऱ्यांनी आमचं चांगलं स्वागत केलं. विशिष्ट प्रकारचे बटाटे कसे व कुठून मिळवले जातात, ते भरपूर पाण्याने कसे धुतले जातात, नंतर ते कसे सोलले व कापले जातात, कसे तळले जातात, त्यांची चव कशी तपासली जाते, दर्जा कसा कायम राखला जातो. तयार वेफर्सचं पॅकिंग कसं केलं जातं, त्यावरचा मजकूर कसा छापला जातो, तो तयार माल कसा वितरीत केला जातो हे सगळं त्यांनी आम्हाला दाखवलं. शरदला असं काहीतरी भारतात सुरू करायचं होतं. पण प्रत्यक्षात असं काही करणं त्याच्या परिस्थितीत अशक्य आहे असा निष्कर्ष त्याने शेवटी काढला."
 पुढे टोनी म्हणाले,
 "१९७८ सालातील त्याच्या त्या भेटीनंतर पुन्हा पुढली ३४ वर्ष आमचा काहीच संबंध आला नाही. त्याच्या मुली मात्र अधूनमधून आमच्या संपर्कात होत्या. मग गेल्या महिन्यात अगदी अचानक त्याची इमेल आली व तुम्ही त्याचं चरित्र लिहीत आहात व त्या संदर्भात मला भेटू इच्छिता हे त्यानी कळवलं. तुमच्याशी झालेल्या ह्या चर्चेमुळे आज इतक्या वर्षांनी त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एका उमद्या, बुद्धिमान मित्राबरोबर आठ वर्षं मी काम केलं, त्यांतील सात वर्षंतर त्याचा अगदी जवळचा शेजारी म्हणूनही राहिलो, त्याचा व त्याच्या सगळ्या कुटुंबाचा भरपूर सहवास मिळाला ह्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो."
 ह्या भेटीच्या वेळी व नंतरदेखील टोनी यांनी जे मनःपूर्वक सहकार्य दिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच होतील. आमच्या भेटीची मी लिहिलेली टिपणांची १८ पानेदेखील त्यांनी कंटाळा न करता व्यवस्थित तपासून दिली. शरद जोशी यांच्या जीवनातील हे बहुतांशी अज्ञात राहिलेले पर्व त्यांच्यामुळेच माझ्यापुढे साकार झाले.

 आयुष्याच्या ऐन उमेदीत स्वित्झर्लंडसारख्या एखाद्या देशात आठ वर्षे सहकुटुंब राहताना, वरिष्ठपदी काम करताना जोशींच्या संवेदनशील मनावर अनेक संस्कार होणे अगदी स्वाभाविक आहे. असे कुठले वैचारिक संस्कार ह्या कालावधीत त्यांच्यावर झाले असतील, ह्याचा विचार करताना व त्यांचा भावी जीवनातील वाटचालीशी संबंध जोडताना चार मुद्दे सर्वाधिक महत्त्वाचे वाटतात.
 इथल्या वास्तव्यात पटलेला व भावी जीवनावर प्रभाव टाकणारा पहिला मुद्दा म्हणजे आर्थिक समृद्धीचे मानवी जीवनातील सर्वस्पर्शी महत्त्व.
 इथली डोळे दिपवणारी समृद्धी ही केवळ आर्थिक नव्हती; तिचे पडसाद जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत उमटताना दिसत होते. शिस्तबद्ध वाहतूक, लोकांचे एकमेकांशी असलेले समंजस वागणे, कसलाच तुटवडा नसल्याने आणि म्हातारपणाची उत्तम सोय सरकारने केलेली असल्यामुळे वागण्यात सहजतःच आलेले औदार्य, व्यक्तिस्वातंत्र्याची पराकोटीची जपणूक, लोकांचे निसर्गप्रेम, त्यांचे क्रीडाप्रेम, सर्व सोयींनी युक्त अशी मैदाने, प्रशस्त तरणतलाव, घराघरातून फुललेली रंगीबेरंगी फुले, सुदृढ व टवटवीत चेहऱ्यांचे नागरिक हे सारेच खूप आनंददायी होते. इथे आठ वर्षे काढल्यावर आर्थिक समृद्धीचे सर्वंकष महत्त्व त्यांना पूर्ण पटले. उर्वरित आयुष्यात व्यक्तिगत पातळीवर ते बहुतेकदा साधेपणेच राहिले; पण त्यांनी अर्थवादाचे महत्त्व कायम अधोरेखित केले व कधीही दारिद्र्याचे उदात्तीकरण केले नाही.
 मनावर ठसलेला दुसरा मुद्दा म्हणजे देशाच्या या एकूण समृद्धीत समृद्ध शेतीचे असलेले पायाभूत महत्त्व.
 स्वित्झर्लंडच्या समृद्धीमागे अनेक घटक आहेत हे नक्की, पण शेतीतील समृद्धी हा त्यांतील सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. शेतीतील फायद्यातूनच तिथे आधी शेतमालावर प्रक्रिया करणारे छोटे कारखाने उभे राहिले, त्यातून इतर ग्रामोद्योग, विकसित अशी ग्रामीण बाजारपेठ, ग्रामीण समृद्धी व त्यातून मग मोठाले उद्योग असा तेथील विकासाचा क्रम आहे. त्याच्या मुळाशी आजही शेती हीच आहे. ह्याची स्पष्ट कल्पना असल्यामुळेच तेथील सरकार शेतीला सर्व प्रकारे उत्तेजन देते. शेतीत वापरता येतील अशी अत्याधुनिक उपकरणे शेतकऱ्याला उपलब्ध असतात. शेतीमालाची साठवणक करण्यासाठी गदामे, शीतगहे वाहतूक करण्यासाठी वाहने व रस्ते, विक्रीसाठी सुसज्ज बाजारपेठ, भांडवली खर्चासाठी अत्यल्प व्याजदरात कर्जाची उपलब्धता, वीज व पाणी ह्यांचा अनिर्बंध पुरवठा या व अशा इतरही अनेक कारणांमुळे तेथील शेती आजही अतिशय किफायतशीर आहे – विशेषतः दूध शेती (Dairy Farming). या छोट्याशा देशामध्ये, ज्याची लोकवस्ती जेमतेम ८० लाख, म्हणजे आपल्या मुंबईच्या निम्म्याहून कमी आहे अशा देशात, आज २६,००० सहकारी दूध संस्था आहेत व त्यातील बहुतेक सर्व चांगल्या चालतात. इथे गायींना कोणीही गोमाता म्हणून पूजत नाही, पण इथल्या गायी धष्टपुष्ट असतात, उत्तम काळजी घेऊन निरोगी राखल्या जातात आणि रोज सरासरी तीस-चाळीस लिटर दूध देतात. ह्या दुधापासून दही, लोणी, चीज, दूध पावडर वगैरे अनेक उत्पादने मोठ्या प्रमाणावर तयार होतात व त्याला जगभरातून प्रचंड मागणी आहे. ह्या समृद्ध शेतीतूनच पुढे त्यांनी देशाचा औद्योगिक विकासदेखील केला; पण औद्योगिकीकरण करताना त्यांनी शेतीकडे कधीच दर्लक्ष केले नाही. हे सारे जोशी यांना तिथे जवळून बघता आले, अभ्यासता आले.
 तिसरा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानाचे मानवी विकासातील पायाभूत महत्त्व.
 इथल्या वास्तव्यात जोशी यांना स्वतःला तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली. कदाचित ती उपजतदेखील असू शकेल, पण इथे तिला भरपूर वाव मिळाला असेही म्हणता येईल. टोनी सांगत होते,
 "ऑफिसात कुठलंही नवं उपकरण आलं, की ते कसं वापरायचं हे शिकून घेण्यात तो आघाडीवर असायचा. कॉम्प्युटरचा वापर त्यावेळी बराच मर्यादित होता, पण तरीही जिनिव्हाला जाऊन कॉम्प्युटर व टेलेकम्युनिकेशन्स शिक्षणाचा एक तीन महिन्यांचा कोर्स करायची त्याची इच्छा होती. त्यासाठी बरीच धडपड करून त्याने ऑफिसची परवानगी मिळवली व तो कोर्स पूर्णही केला. हा कोर्स करणारे त्यावेळी आमच्या ऑफिसात अगदी थोडे लोक होते. संध्याकाळी घरी गेल्यावरदेखील तो वेगवेगळे पार्ट्स जोडून इलेक्ट्रॉनिकची ट्रेन तयार करायचा खेळ खेळण्यात रंगन जायचा. त्यासाठी त्याने बरीच महागडी साधनंही खरेदी केली होती."
 जोशींची तंत्रज्ञानाची ही आवड पुढे आयुष्यभर कायम राहिली. म्हातारपणी ज्यावेळी हात कापत असल्यामुळे संगणकावर अक्षरलेखन करणे त्यांना जमेना त्यावेळी नुकतेच बाजारात आलेले Dragon Naturally Speaking या नावाचे एक आवाज ओळखून कळफलक वापरणारे सॉफ्टवेअर त्यांनी कुठूनतरी मिळवले, ते आत्मसात केले व पुढची तीन-चार वर्षे त्याचा वापर करून आपले इंग्रजी लेखन केले. पुढे पुढे मात्र अर्धांगवायूच्या झटक्यानंतर त्यांच्या आवाजात संदिग्धता आली व त्यानंतर मात्र त्यांना इंग्रजी लेखनासाठीही लेखनिकावर अवलंबून राहावे लागले.
 १९७२-७३ या कालावधीत लोझान ह्या मोठ्या स्विस शैक्षणिक शहरात शनिवार-रविवार जाऊन-येऊन त्यांनी एक कोर्सही केला होता – Diploma in Data Processing, Computer Programming and SystemsAnalysis. यानंतर ऑफिसात 'हेड. डेटा प्रोसेसिंग सेंटर' या पदावर त्यांची नेमणूक झाली. नोकरी सोडली, तेव्हा ते ह्याच पदावर होते.
 जिनिव्हा येथे राहणारे मोरेश्वर ऊर्फ बाळ संत नावाचे एक इंजिनिअर मला तिथे भेटले. जोशींना ते चांगले ओळखत होते. इंटरनॅशनल टेलेकम्युनिकेशन्स युनियन ह्या युएनच्या घटकसंस्थेत ते नोकरी करत होते. जोशी यांनी जिनिव्हाला जाऊन जो कोर्स केला होता, तो संत ह्यांच्या संस्थेनेच युएनच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणून खास तयार केला होता. जोशी तो कोर्स करण्यात किती रमले होते, बाजारात येणाऱ्या कुठल्याही नव्या संशोधनाबद्दल ते किती उत्साहाने चौकशी करत ह्याबद्दल संतदेखील सांगत होते. "मी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचा विद्यार्थी, जोशी मात्र अर्थशास्त्राचे विद्यार्थी; पण आमच्या गप्पा नेहेमी तंत्रज्ञानाबद्दल असत," ते म्हणाले. युपीयुच्या कामासाठी जोशी यांना जिनिव्हाला वारंवार यावे लागे व त्यामुळे दोघांच्या भेटीही वरचेवर होत.

 तंत्रज्ञानाचे व्यापक सामाजिक महत्त्व कोणाच्याही सहज लक्षात यावे अशीच स्वित्झर्लंडमधली परिस्थिती होती. उदाहरणार्थ, वर उल्लेख केलेल्या दूधशेतीत तंत्रज्ञानाचा वापर पावलोपावली होत होता. एका प्लॅटफॉर्मवर गाय उभी राहायची, तिच्या आचळांभोवती यांत्रिक दुग्धशोषक (suckers) जोडले जायचे, ठराविक वेळात दूध काढले गेले की ते आपोआप मोकळे व्हायचे, सरकत्या प्लॅटफॉर्मवरून ती गाय पुढे जायची व तिच्या जागी पुढची गाय यायची. पुढे हे दूध पाइपलाइनीतून एकत्र करणे, ह्या दुधावर प्रक्रिया करणे, त्याचे गुणवत्तेनुसार वर्गीकरण करणे, ते साठवणे, त्याचे पॅकिंग, वितरण इत्यादी सर्व प्रक्रियांमध्ये मानवी हस्तस्पर्श अजिबात नाही.

 शेती, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यांची उत्तम सांगड स्वित्झर्लंडने कशी घातली आहे ह्याचे तेथील नेसले (Nestle) कंपनी हे उत्तम उदाहरण आहे. शेतकरी भरणा करत असलेल्या दुधाला त्यांनी उत्तम भाव दिला, त्याच्या समृद्धीला हातभार लावला. त्याशिवाय नुसते दूध वा दुधापासून तयार होणारे लोणी, दही वा चीज तुम्ही किती विकू शकता ह्याला मर्यादा आहे, हे ओळखून नेसले कंपनीने बेबीफूड, चॉकोलेट्स व 'मॅगी'सारखे 'फास्ट फूड' बनवायला सुरुवात केली, त्यांची निर्यात सुरू केली आणि आज त्या क्षेत्रांत ती जगातील एक अग्रगण्य कंपनी मानली जाते.
 इतक्या मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यालय जिनिव्हा, झुरिक, बर्न अथवा बाझल यांसारख्या कुठल्याच मोठ्या स्वीस शहरात नाही, तर वेवेसारख्या एका अगदी छोट्या गावात आहे हे आपण लक्षात घेणेही खूप महत्त्वाचे आहे.
 चौथा मुद्दा म्हणजे मानवी जीवनातील स्वातंत्र्य ह्या मूल्याचे पायाभूत महत्त्व.
 स्वीस लोकांनी व्यक्तिस्वातंत्र्याची जपणूक इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक जागरूकतेने केली आहे. ह्या देशात सार्वजनिक बसेसचा रंग कोणता असावा यावरसुद्धा (referendum) घेतले गेले आहे! खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जतन केलेला हा देश आहे. आपापला कारभार चालवण्यात प्रत्येक काउंटीला भरपूर स्वातंत्र्य आहे व तेच स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीलाही दिले गेले आहे. ह्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेभोवतीच ह्या देशाचे अस्तित्व गंफलेले आहे.
 आपल्या सर्व भावी आयुष्यात स्वातंत्र्य हे मूल्य जोशींनी कायम सर्वाधिक महत्त्वाचे मानले. एक गंमत म्हणजे डोंगर चढण्याचा छंद हाही कुठेतरी ह्या स्वातंत्र्यप्रेमाशी जोडलेला असावा. स्वित्झर्लंडमध्ये हे डोंगरांचे प्रेम सार्वत्रिक आहे. हा देश डोंगरांचाच बनलेला आहे; देशात कुठेही जा, डोंगर तुमच्यापासून लांब नसतात. जोशींना लहानपणापासून डोंगरांचे आकर्षण होतेच, पण भारतात डोंगर चढायला फारसा वाव नव्हता; नोकरी मुख्यतः शहरांतच होती. स्वित्झर्लंडमध्ये मात्र ह्या गिर्यारोहणाला भरपूर वाव मिळाला. आपली बरीचशी बंधने ही भूमीशी निगडित असतात व डोंगर चढताना माणस जसजसा वर चढत जातो, तसतसा मानसिक पातळीवरतरी तो ह्या बंधनांपासून दूर होत जातो. 'As we elevate ourselves, we become freer and freer' असे कोणीसे म्हटले आहे. जोशींचे स्वातंत्र्यप्रेम हा आयन रँडसारख्यांचा प्रभाव असेल, इतरही काही संस्कारांचा प्रभाव असेल, पण कुठेतरी स्वित्झर्लंडचाही एक वारसा असू शकेल.

 आर्थिक समृद्धीचे जीवनातील महत्त्व, देशात ती यावी यासाठी शेतीला द्यावयाची प्राथमिकता, तंत्रज्ञानाचा परिपूर्ण वापर आणि स्वातंत्र्याची दुर्दम्य लालसा ह्या चतुःसूत्रीला जोशींच्या भावी जीवनातही बरेच महत्त्व आहे व या चतुःसूत्रीचा पाया बळकट व्हायला स्वित्झर्लंडमधली आठ वर्षे बऱ्यापैकी कारणीभूत झाली असावीत.