Jump to content

अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/अटकेपार

विकिस्रोत कडून

१०

अटकेपार


 २५ नोव्हेंबर २०१४. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे पाचवे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची तिसावी पुण्यतिथी. संध्याकाळी सहाची वेळ.
 मुंबईतल्या नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाचे सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरले होते. त्या समारंभात शरद जोशी यांना शरद पवार यांच्या हस्ते मानाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार दिला गेला. श्री. पवार मे २००४ ते मे २०१४ अशी सलग दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. त्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरची एक आठवण सांगताना ते म्हणाले,

कृषिमंत्री म्हणून पंजाबमध्ये गेल्यानंतर ठिकठिकाणी माझं स्वागत व्हायचं. आणि मला आठवतंय, की अनेक ठिकाणी शेतकरी मेळाव्यात गेल्यानंतर स्वागत करणारा वक्ता 'आज के मेहमान शरद जोशी' असं म्हणूनच माझं स्वागत करायचा! नंतर स्वतःची चूक त्याच्या लक्षात आल्यानंतर, 'नही, नही, शरद पवार' असं तो म्हणायचा! याचा अर्थ पंजाबमधल्या त्या कष्टकरी शेतकऱ्यांमध्ये ज्यांनी महत्त्वाची कामगिरी केली, त्या शरद जोशींचं नाव तिथल्या घराघरामध्ये पोचलं होतं. हे मी पंजाबात अनेकदा पाहिलंय.

(राष्ट्रवादी, डिसेंबर २०१४, पृष्ठ ५३)

 त्या कार्यक्रमात प्रस्तुत लेखक मंचावर हजर होता व पवार यांचे हे उद्गार ऐकल्यावर सर्व श्रोत्यांप्रमाणे जोशी यांच्याही चेहऱ्यावर विलसणारे हास्य आणि आनंद यांचे मिश्रण बघताना 'आज इतक्या वर्षांनी का होईना, पण जोशींच्या पंजाबमधील महत्त्वाच्या कार्याची महाराष्ट्रात दखल घेतली जात आहे हे जाणवून डोळे पाणावत होते. अर्थात जोशींचा हा जवळजवळ शेवटचाच मोठा असा जाहीर कार्यक्रम असेल याची त्यावेळी कोणालाच कल्पनाही नव्हती.

 अखंड पंजाबचे भारतातील ऐतिहासिक स्थान एकमेवाद्वितीय असेच आहे. सीमेवरचा प्रांत असल्याने परकीयांची आक्रमणे पंजाबने सततच झेलली आहेत. 'मार्शल रेस' म्हणता येईल तसे इथले लोक. शरीराने भरभक्कम आणि वृत्तीनेही आक्रमक. बहुतेक शीख कुटुंबांत एक मुलगा शेतीत तर दुसरा लष्करात ही परंपरा. 'जय जवान, जय किसान' घोषणा देताना तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ह्यांच्या डोळ्यांपुढे कदाचित पंजाबच असू शकेल. इथली माणसे कष्टाळू, स्वतःच्या पायावर उभी राहणारी. गुरुबाणी ऐकण्याइतकीच भांगडा करण्यातही रमणारी. 'माझ्या रक्ताने ही सगळी भूमी न्हाऊन निघू दे' असा आशय व्यक्त करणारे 'मेरा रंग दे बसंती चोला' हे भगतसिंगांचे गीत इथले सर्वाधिक लोकप्रिय गीत.
 आपल्या महाराष्ट्राशी शिखांचे नाते विशेष सौहार्दाचे आहे. त्यांचे दहावे व शेवटचे गुरू गोबिंदसिंग ह्यांच्या समाधीमुळे नांदेडला शीख तीर्थक्षेत्रच मानतात. अमृतसरहून येणारी सचखंड एक्स्प्रेस नांदेडला पोचते किंवा तिथून सुटते, तेव्हा गाडीतील व प्लॅटफॉर्मवरील सगळ्यांनाच रुचकर असा तुपाळ मुगाच्या हलव्याचा प्रसाद आवर्जून दिला जातो; कधीकधी संपूर्ण जेवणही दिले जाते.
 इथली शेतीही खूप महत्त्वाची. दुथडी भरून वाहणाऱ्या झेलम, सतलज, रावी, चिनाब आणि बियास ह्या पाच नद्यांवरून ह्या प्रांताला पंजाब हे नाव पडले. त्यांच्या वर्षानुवर्षे वाहून आलेल्या गाळामुळे सुपीक बनलेली इथली भूमी. हवामान अनुकूल, पाणीही भरपूर. डोंगराळ भाग जवळपास नाहीच, सगळी भूमी सपाट व शेतीयोग्य. ट्रॅक्टरसारख्या अनेक आधुनिक अवजारांचा शेतीत सर्रास वापर. त्यामुळे सुजल सुफल बनलेला हा प्रदेश. भारताचे धान्याचे कोठार' हा लौकिक सार्थ ठरवणारी इथली शेती.
 दुर्दैवाने फाळणी झाली त्यावेळी बहुतेक कालवे पश्चिम पंजाबात होते व ते पाकिस्तानात समाविष्ट झाले. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात इथे बरीचशी शेती पाण्याअभावी उजाड झाली होती. पण पुढे भाक्रा-नांगल धरणाने इथली शेती पुन्हा एकदा बहरली. जमिनीत झिरपणाऱ्या मुबलक पाण्यामुळे कूपनलिका कोपऱ्याकोपऱ्यात खणल्या गेल्या. सत्तर टक्के शेतजमीन पाण्याखाली आली. इथल्या शेतकऱ्याने नवे तंत्रज्ञान अहमहमिकेने स्वीकारले. गव्हाप्रमाणे इथला बासमती तांदूळही जगभर जाऊन पोचला. सर्वच शेतकरी वर्षातून दोन पिके घेत - एक गव्हाचे, दुसरे भाताचे. साठ व सत्तरच्या दशकात झालेल्या हरितक्रांतीची फळे देशात सर्वाधिक इथेच पाहायला मिळत. आजदेखील संपूर्ण देशातून केंद्र सरकारच्या कोठारात जेवढा गहू जमा होतो, त्यापैकी सत्तर टक्के गहू हा एकट्या पंजाबातून जमा होतो. शेतीतील समृद्धीतूनच जालंदर, लुधियाना यांसारख्या शहरांत असंख्य छोटे-मोठे उद्योगधंदे उभे राहिले. बघता बघता पंजाब पुन्हा एकदा समृद्ध बनला. ज्याला शेतीच्या संदर्भात भारतात काही काम करायचे आहे, तो पंजाबकडे दुर्लक्ष करूच शकणार नाही.
 पण पंजाब अखंड होता त्या काळापासूनच इथल्या शेतकऱ्यांना नेहमीच कर्ज काढावे लागे; पिके चांगली आली तरीही. अशी विचित्र परिस्थिती नेमकी कशामुळे येते त्याची शास्त्रशुद्ध कारणमीमांसा त्यावेळी फारशी कोणाला करता आली नाही तरी तिची झळ मात्र सर्वच शेतकऱ्यांना पोचत असे.
 शेतकऱ्यांची स्थिती सुधारली पाहिजे, ह्याची मागील शतकात पहिली जाणीव अखंड पंजाब प्रांतातील सर छोटूराम ह्या जाट नेत्यांना झाली. ते स्वतः मोठे शेतकरी होते. शासनदरबारी त्यांना फार मान होता. 'अजगर' ह्या काहीशा विचित्र नावाची एक संघटना त्यांनी स्थापन केली. अहिर, जाट, गुजर आणि रजपूत ह्या शेती करणाऱ्या तत्कालीन अखंड पंजाबातील चार जमाती त्यांच्या डोळ्यांपुढे होत्या व त्यांची आद्याक्षरे एकत्र करून 'अजगर' नाव बनले होते. त्या मूळ संघटनेचा अधिक विस्तार करत पुढे त्यांनी 'जमीनदारा खेतीबाडी युनियन' स्थापन केली. ही घटना साधारण १९२५ सालची. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा थोडा सुसह्य व्हावा म्हणून छोटूरामनी त्यावेळी पंजाब विधिमंडळात एक बिल आणले होते. ते असे होते, 'शेती उत्तम पिकत असूनही शेतकरी कर्जात बुडतो आहे. त्यामुळे सावकार जप्ती आणून त्यांच्या जमिनी काढून घेत आहेत. अशा प्रकारे सावकारांनी जमिनीवर जप्ती आणू नये म्हणून त्याविरुद्ध सरकारने कायदा करावा.' तत्कालीन काँग्रेस सरकारने ह्या बिलाला कडाडून विरोध केला होता. काँग्रेसचे म्हणणे असे होते, की 'सावकारांनी जमिनी जप्त केल्या नाहीत, तर त्यांना धंदा बंद करावा लागेल व तसे झाले तर अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना कर्ज कसे मिळणार?' गव्हाला अधिक भाव मिळावा म्हणूनही छोटूराम सतत प्रयत्न करत असत. 'इतकाइतका भाव दिल्याशिवाय आम्ही गहू विकणार नाही असे त्यांनी एकदा ब्रिटिश गव्हर्नरलादेखील सुनावले होते. हिंदू, मुसलमान व शीख ह्या तिन्ही धर्मांचे शेतकरी छोटूरामना अगदी देवासमान मानत. सर छोटूराम १९४६ साली वारले; पण त्यांची युनियन इतकी ताकदवान होती, की १९४६ सालापर्यंत मुस्लिम लीगचे प्रमुख महमद अली जिनांना त्या प्रांतात पाऊलसद्धा ठेवता आले नाही. धार्मिक भेदांच्या पलीकडे जाऊन निखळ आर्थिक प्रश्नावर शेतकऱ्यांना एका राजकारणविरहित झेंड्याखाली एकत्र आणणारा नेता म्हणून सर छोटूराम ह्यांच्याविषयी जोशींना खूप आदर होता.

 शरद जोशी यांचे पंजाबमधील सर्वांत जवळचे सहकारी सरदार भूपिंदर सिंग मान यांच्याविषयी इथे लिहायला हवे. भारती किसान युनियन (बीकेयु) या पंजाबातील सर्वांत मोठ्या शेतकरी संघटनेचे १९८० सालापासून ते सदस्यांनी निवडून दिलेले अध्यक्ष आहेत. यातील 'भारती' शब्द पंजाबी नावात आहे; अन्यत्र बऱ्याचदा त्याऐवजी 'भारतीय' हा शब्द वापरला आहे. मान यांची व प्रस्तुत लेखकाची पहिली भेट ३० जुलै २०१२ रोजी बुंदेलखंडातील बांदा ह्या गावी किसान को-ऑर्डिनेशन कमिटी (केसीसी)च्या एका बैठकीच्या वेळी झाली होती. जोशींच्या आमंत्रणावरून तिथे त्यांच्याबरोबर गेलो होतो. त्यावेळी मान यांच्याबरोबर थोड्याफार गप्पा झाल्या होत्या, पण त्या पुरेशा नव्हत्या. तो योग आमच्या पुढील भेटीत आला. ८ मार्च २०१६ रोजी चंडीगढ येथील त्यांच्या घरात. शरद जोशींच्या चळवळीतील पंजाबपर्व समजून घेण्यासाठी तिथे गेलो असताना. पुढे त्यांच्याबरोबर केलेल्या मुक्कामात व बटाला, अमृतसर, वाघा इथे त्यांच्यासमवेत केलेल्या प्रवासात.
मान यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३९चा. उंच शिडशिडीत शरीरयष्टी व झपाझप चालणे यामुळे त्यांच्या वयाचा पटकन अंदाज येत नाही. ते सांगत होते,
 "माझं जन्मगाव आता पाकिस्तानात आहे. घरची खूप मोठी शेतीवाडी होती, संपन्न घरदार होतं. वडील अकालीच वारले. मी एकुलता एक मुलगा. दोन बहिणी. फाळणीनंतर आम्ही निर्वासित म्हणून इथे आलो. अगदी नेसत्या कपड्यानिशी. तेव्हाच्या जखमा भरून निघायला बरीच वर्षं लागली."
 पंजाबातील शेतकरी चळवळीच्या पार्श्वभूमीबद्दल पुढे मान म्हणाले,
 "छोटूराम ह्यांची जमीनदारा युनियन हेच आमच्या आजच्या बीकेयुचे मूळ रूप आहे. पंजाबात शेतकरी छोटा असला तरी त्याला 'जमीनदार' (म्हणजे जमीन असणारा) म्हणत. पुढे काळाच्या ओघात 'जमीनदार' ह्या शब्दाला एक वेगळा, तिरस्करणीय असा अर्थ प्राप्त झाला व संघटनेच्या नावातील 'जमीनदार' शब्द गळून १९७२ साली 'खेतीबाडी युनियन' अस्तित्वात आली."
 आणीबाणीच्या काळात कित्येक महिने मान व त्यांचे अनेक शेतकरी कार्यकर्ते तुरुंगात होते. पण तेव्हा आणि नंतरची अनेक वर्षे ते तसे कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडलेले नव्हते. अकाली दल हा खरे तर पंजाबातील शेतकऱ्यांचा व म्हणून बहुसंख्य शिखांचा पारंपरिक पक्ष, पण मान ह्यांच्या मते तो खूप भ्रष्ट आहे व म्हणून २००२ पासून त्यांनी अधिकृतरीत्या काँग्रेसला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री व पतियाळाचे माजी महाराज कॅप्टन अमरिंदर सिंग ह्यांनाही अनेक शेतकरी आंदोलनांत त्यांनी सामील करून घेतले. त्यांचे चिरंजीव गुरपरतापसिंग मान उच्चशिक्षित इंजिनिअर व एमबीए आहेत. Punjab Infrastructure Development Limited ह्या महत्त्वाच्या शासकीय आस्थापनेचे ते प्रमुख होते. पण विशिष्ट कंत्राटदारांनाच कामे दिली जावीत ह्यासाठी सत्तेवर असलेल्या अकाली नेत्यांकडून जो दबाव येत होता, त्याला वैतागून त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. सध्या ते पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आहेत. ते सहकुटुंब चंडीगढमध्ये राहतात. त्यांच्या पत्नी दंतवैद्य (dentist) असून पुण्यातील दंत महाविद्यालयात शिकलेल्या आहेत.
 "सगळ्या देशाला तुम्ही धान्य पुरवता; मग तुमच्या शेतकऱ्यांसमोर अडचण कसली असू शकते?" असा प्रश्न मी मान यांचे चिरंजीव गुरपरतापसिंग यांना आमच्या चंडीगढमधील पहिल्याच जेवणाच्या वेळी विचारला.
 "तीच तर खरी अडचण आहे! सगळ्या देशाला आम्ही धान्य पुरवतो हेच आमच्या समस्येचं मूळ आहे!" काहीशा कोड्यात बोलल्याप्रमाणे ते म्हणाले. मग पुढल्या अर्ध्या-एक तासात त्यांनी त्यांचा मुद्दा स्पष्ट केला. "शेती ही तोट्यातच असल्यामुळे जेवढी शेती अधिक, तेवढा तोटा अधिक, असं हे साधं गणित आहे. जास्त उत्पादन म्हणजेच जास्त तोटा. आमचं उत्पादन अधिक, म्हणून आमचा कर्जबाजारीपणाही अधिक," ते म्हणाले.
 हरितक्रांती झाली त्यावेळी मुख्यतः सुधारित बियाणे व खतांचा भरपूर वापर ह्यांमुळे भरघोस पिके निघू लागली. सुरुवातीला सगळे खूश होते. पण नंतर इतके पीक काढूनही आपले कर्जबाजारीपण कमी होत नाही, ही गोष्ट पंजाबातील सर्वच शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागली. बियाणे, खते, डिझेल, वीज, शेतमजुरी वगैरे सर्व खर्च सतत वाढत गेले व त्याप्रमाणात शेतीमालाच्या किमती मात्र फारशा वाढल्या नाहीत. वर्षानुवर्षे त्या किमती केंद्र सरकारच ठरवत आले आहे. परिणामतः खर्च आणि आमदनी ह्याचा मेळ बसेना. खतांच्या अतिरिक्त वापरामुळे झालेली जमिनीची हानी, कूपनलिका अधिकाधिक खोल जात राहिल्याने खालचे क्षार वर यायचे प्रचंड प्रमाण, पाण्याचा अनिर्बंध वापर व ह्या सगळ्यातून होणारी एकूणच पर्यावरणाची हानी हाही प्रकार लोकांच्या लक्षात येत गेला. शेतकऱ्यांमधला असंतोष वाढतच गेला. ह्या असंतोषातूनच पुढे खलिस्तानवाद्यांना उत्तेजन मिळत गेले. शीख शेतकरी तो ग्रामीण, हिंदू व्यापारी तो शहरी; शीख तो शोषित, हिंदू तो शोषक अशा प्रकारे एकूण आर्थिक वास्तवाचे विकृत असे सुलभीकरण केले गेले. मतांच्या राजकारणासाठी काही नेत्यांनी आगीत तेल ओतायचे काम केले. शेती किफायतशीर राहिली नाही, ह्या मूळ आर्थिक प्रश्नाला हिंदू-शीख धार्मिक तेढीचे स्वरूप प्राप्त झाले.
 १९९० ते १९९६ भूपिंदरसिंग मान राज्यसभेचे सदस्य होते. तिथे मान यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी एक महत्त्वाची कबुली दिली होती. पंतप्रधान म्हणाले होते, "भारतातील शेतकऱ्याला शेतीमालाचा भाव देताना ७२% उणे सबसिडी दिली जाते." म्हणजेच त्याला सरकारतर्फे अनुदान स्वरूपात खरेतर काहीच दिले जात नाही, उलट त्याचे उत्पन्न १०० रुपये असले, तर सरकारने त्याच्याकडून शेतीमालाच्या वाजवी भावापेक्षा कमी भाव देऊन ७२ रुपये मिळवलेले असतात.
 सरकार शेतकऱ्यांच्या विकासाला कशी बाधा घालते ह्याचे एक उदाहरण मान यांनी दिले. भात भरडून तांदूळ करण्याचे एक छोटेसे मशीन (हलर) परदेशात जेमतेम तीन-चार हजार रुपयांत उपलब्ध होते. ते भारतात आणायचे व तशीच यंत्रे इथे बनवून ती विकायची योजना एका कल्पक शीख तरुणाने मांडली. मान म्हणाले, "पण लायसन्स-परमिटराजच्या त्या जमान्यात सरकारने त्याला परवानगी नाकारली. खूप इच्छा असूनही शेवटी ती योजना त्याला गुंडाळून ठेवावी लागली. पावलोपावली होणारा सरकारी हस्तक्षेप शेतकरीहिताची कायमच अशी गळचेपी करतो. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिलं असतं तर इतर देशांत घडलं ते इथेही घडलं असतं; शेतकऱ्यांनी स्वतःच कितीतरी उपयुक्त यंत्रं शोधून काढली असती. कारण पंजाबी शेतकरी तसा खूप हिकमती आहे, टेक-सॅव्ही म्हणतात तसा आहे."

 सुदैवाने आज मान यांची सांपत्तिक स्थिती चांगली आहे, दोन्ही मुले सुस्थित आहेत. एक अमेरिकेत, दुसरा चंडीगढला. तरीही सकाळपासून रात्रीपर्यंत मान सतत कामात असतात. शेतीचे बरेचसे काम त्यांच्या पत्नी – ज्यांना सगळे भाभीजी म्हणतात – सांभाळतात. त्यामुळे आपल्या सामाजिक कामासाठी मान यांना पुरेसा वेळ मिळतो. देशभरच्या शेतकरी नेत्यांच्या ते संपर्कात असतात; खूप प्रवास करतात. महाराष्ट्रातही ते पंधरा-वीस वेळा सहज आले असतील. शेतकऱ्यांच्या अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे ते तीन वेळा अध्यक्ष होते. त्यांचा व्यासंगही दांडगा आहे. शेतकरी आंदोलनाबाबतची सर्व कात्रणे त्यांनी आपल्या बटाला येथील घरातील कार्यालयात, चार गोदरेजच्या कपाटांत व्यवस्थित विभागणी करून, फायलींमध्ये लावून ठेवली आहेत.
 मान यांच्याशी मैत्री व्हायच्या पूर्वीच जोशी मनानेतरी पंजाबशी जोडले गेले होते. नाशिक येथील १९८० सालच्या ऊस आंदोलनाच्या वेळीच. 'एक दिवस तुम्ही पंजाबातदेखील या, कारण असाच अन्याय आमच्यावरही होतोय' असे अनेक शीख ड्रायव्हर्स त्यावेळी म्हणाले होते. तो भाग पूर्वी आलेलाच आहे. साधारण दोन वर्षांनी तोही योग आला.
 २३ एप्रिल १९८२ रोजी धुळे येथे शेतकरी संघटनेने दूध उत्पादक मेळावा घेतला. त्याला इतरही राज्यांतले काही शेतकरी नेते आवर्जून उपस्थित होते. त्यांच्यापैकीच एक होते बलबीरसिंग राजेवाल. मेळाव्यात त्यांनी जोशींना सांगितले,
 "पंजाबमधील खन्ना ह्या गावी आम्ही २८, २९ व ३० मे १९८२ रोजी एक बैठक आयोजित केली आहे. अखिल भारतीय किसान युनियनची लिखित घटना निश्चित करण्यासाठी. त्या बैठकीला तुम्ही व तुमच्या काही निकटच्या सहकाऱ्यांनी अवश्य यायला हवं. बैठकीनंतर पंजाबात इतर चार ठिकाणी शेतकरी मेळावेही आयोजित केले आहेत. ३१ मेला मानसा (जिल्हा भटिंडा), १ जूनला नवा शहर (जिल्हा जालंदर), २ जूनला फिरोजपूर व ३ जूनला गोविंदबालसाहिबा (जिल्हा लुधियाना) इथे. ह्या सर्व मेळाव्यांनाही तुम्ही आमचे पाहुणे म्हणून हजर राहावं."
 जोशींना ती कल्पना खूप आवडली. एकतर निपाणीनंतर इतरही राज्यांत प्रवेश करण्याची ही एक सुवर्णसंधी होती. सर्व आयोजन पंजाबचे शेतकरीनेते करणार होते व तो काहीच त्रास नव्हता. शिवाय सर्व मेळावे ग्रामीण भागात भरणार असल्याने आपोआपच पंजाबातील शेतकऱ्यांशी अगदी थेट असा परिचय होणार होता. लगेचच त्यांनी आमंत्रणाचा स्वीकार केला. त्यानुसार २६ मे रोजी झेलम एक्स्प्रेसने जोशींनी पुण्याहून प्रस्थान केले. भास्करराव बोरावके हे सहकारी पुढे मनमाडला त्यांच्याच डब्यात चढले. विजय जावंधिया आणि श्रीकांत तराळ हे दोन सहकारी आदल्याच दिवशी नागपूरहून दिल्लीला जाऊन पोचले होते.
 अलिबागचे प्रा. अरविंद वामन कुळकर्णी हे मात्र पुण्यापासूनच जोशींबरोबर होते. नाशिक आंदोलनावर त्यांनी 'सोबत'मध्ये लिहिलेला लेख जोशींना आवडला होता व त्यानंतर त्यांनी आपणहूनच कुळकर्णीशी तारेने संपर्क साधला होता. पुढे निपाणीला दोघांची पहिली भेट झाली होती व त्यानंतर निपाणी आंदोलनावर त्यांनी 'सोबत'मध्ये लिहिलेले चार लेखही जोशींनी वाचले होते. शेतकरी संघटनेने प्रकाशन विभाग सुरू करावा असे कुळकर्णीचे मत होते व त्याबद्दल जोशींशी चर्चा करण्यासाठी ते व त्यांचे प्राध्यापक सहकारी सुरेशचंद्र म्हात्रे पुण्याला २१ मे रोजी आले होते. जोशींना त्यांची योजना पटली व आंदोलनाच्या धामधुमीत जमेल तसे काम यथावकाश सुरूही झाले. 'आता आलाच आहात तर माझ्याबरोबर पंजाबातही चला,' असा जोशींचा खूप आग्रह होता. कुळकर्णी तयार नव्हते, कारण तसा हा दहा दिवसांचा लांबचा प्रवास होता आणि त्यांनी ना घरी काही त्याबद्दल कळवले होते ना त्यांच्याकडे पुरेसे सामान होते. 'सामानाची वगैरे काही काळजी करू नका, अगदी नेसत्या कपड्यांनिशी चला,' जोशी सांगत होते. शेवटी जोशींच्या या अगदी अनपेक्षित आग्रहापुढे त्यांनी मान तुकवली.
सेलू (जिल्हा वर्धा) येथून चंडीगढ़ येथे सायकलवरून गेलेला उत्साही 'परभणी पागल' तरुणांचा चमू, १२ मार्च १९८४
चंडीगढ़ येथे राजभवनाला वेढा घालण्यासाठी तिथे मोर्चा नेताना शरद जोशी. शेजारी भूपिंदर सिंग मान व अन्य शेतकरी नेते, १२ मार्च १९८४
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 'जेल भरो': चंडीगढ राजभवनजवळ अटक करून घेणारे वेगवेगळ्या राज्यांतून आलेले शेतकरी, १५ मे १९९१
चांदवड येथील पहिले शेतकरी महिला अधिवेशन : तीन लाख स्त्रियांचा विराट मेळावा, १० नोव्हेंबर १९८६
"आता घरात बसून चालायचं न्हाई." बैलगाडीतन सभेसाठी जाणाऱ्या शेतकरी महिला. सुरेगाव, जिल्हा परभणी. जानेवारी १९८७.

शेतकरी संघटनेच्या सभेतील महिलांचा अभूतपूर्व सहभाग, चंद्रपूर अधिवेशन, २०१३.
लक्ष्मीमुक्ती अभियान, प्रमाणपत्र नमुना

राजीवस्त्रविरोधी आंदोलन : हुतात्मा बाबू गेनू यांच्या महाळुंगे-पडवळ ह्या पुणे जिल्ह्यातील जन्मगावी भावजय कासाबाई सैद मुंबईला मिरवणुकीने नेण्यासाठी क्रांती ज्योती प्रज्वलित करताना, सोबत शंकरराव वाघ. डावीकडे घोषणा देणारे भास्करराव बोरावके व उजवीकडे स्वेटर घातलेले बाबूलाल परदेशी. १२ डिसेंबर १९८५. (सौजन्य : सरोजा परुळकर)
शिवाजी पार्क, मुंबई, येथील सभेत कामगारनेते दत्ता सामंत यांच्या सोबत. १२ डिसेंबर १९८५. (सौजन्य : सरोजा परुळकर)

राहुरी ऊस परिषद, ६ ऑक्टोबर १९८५. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, प्रमोद महाजन, शरद पवार इत्यादी नेत्यांनी ह्या सभेत भाषण केले.
'न्याय नही, हिसाब दो' अशी घोषणा देत दिल्ली येथे बोट क्लबवर शेतकऱ्यांनी काढलेला विराट आर्थिक मुक्ती मोर्चा. ३१ मार्च १९९३. मागे इंडिया गेट दिसत आहे.

कल्पक व लक्षवेधी पोस्टर्स...

... संघटनेचे एक कायम वैशिष्ट्य होते


वीजदरवाढीविरुद्ध आंदोलन, गुजरात, १४ ऑगस्ट २००३ पोलिसांचा अघोरी लाठीमार


तहानलेल्याला पाणी देणे हा गुन्हा असेल तर...' नर्मदा जनआंदोलन, केवाडिया कॉलोनी येथे सरदार सरोवर धरणापाशी. डोक्यावर कळशीभर पाणी घेतलेले शरद जोशी. शेजारी चालणारे बद्रीनाथ देवकर.


२००२मधील तीन महिन्यांची नर्मदा परिक्रमा : ओळखू न येणारे दाढी वाढवलेले शरद जोशी

 कुळकर्णीसारखे विचारवंत आपल्यात असावेत असे जोशींना वाटत असावे. २६ मे ते ५ जून १९८२ या कालावधीतील ह्या दौऱ्यात आलेल्या अनुभवांवर कुलकर्णी यांनी पुढे लौकरच 'शरद जोशींबरोबर... पंजाबात' ह्या शीर्षकाखाली माणूस साप्ताहिकात एक लेखमालाही लिहिली व पुढे एप्रिल १९८३मध्ये शेतकरी प्रकाशन', अलिबाग, यांच्यातर्फे ती पुस्तकरूपाने प्रकाशितही झाली. एक गमतीचा भाग म्हणजे पंजाबात पोचल्यावर प्रत्येक प्रसंगी जोशी त्यांची ओळख 'प्राध्यापक' म्हणून करून देत व तेव्हा सर्वच उपस्थित पंजाबी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे आश्चर्य उमटायचे. नंतर केव्हातरी त्याचा खुलासा झाला - पंजाबीत 'प्राध्यापक' हा शब्द 'कुंभार' ह्या अर्थाने वापरला जातो!
 'माणूस'चे संपादक श्री. ग. माजगावकर यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले होते,

एक महाराष्ट्रीय नेता परप्रांतात जाऊन, आपल्या विचारांचा, चळवळीचा तेथे प्रसार करतो, ही घटनाच नवीन होती. आज सगळी क्षितिजे लहान होत आहेत, संकुचितपणा वाढतो आहे. जो तो आपल्या प्रांतापुरता, पक्षापुरता होतो आहे. शरद जोशींची कृती नेमकी ह्याविरुद्ध होती. क्षितिजे विस्तारण्यासाठी ते पंजाबला चालले होते.

 खन्ना गावाला पंजाबातील शेतीजीवनात महत्त्वाचे स्थान आहे व खरेदी-विक्री संघाच्या आवारात पाऊल टाकताच त्याचे कारणही स्पष्ट होत होते. पंजाबातील हा सर्वांत मोठा खरेदीविक्री संघ. प्रत्यक्ष बाजारपेठ एका मोठ्या एक मजली इमारतीत आहे व तिच्या चारी बाजूंना मोकळे मैदान आहे. मैदानाच्या त्या प्रचंड आवारात नजर पोचेल तिथपर्यंत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या गव्हाच्या पोत्यांचे अवाढव्य ढीगच्या ढीग पसरले होते. सगळीकडे असंख्य ट्रॅक्टर्स उभे होते व तेही गव्हाच्या पोत्यांनी शिगोशीग भरलेले होते. पंजाबात खरेदी होणाऱ्या एकूण गव्हापैकी एक तृतीयांश गहू ह्या एकाच मंडीत खरेदी केला जातो. ह्याच जागी अखिल भारतीय किसान युनियनची बैठक बोलावण्यात मोठेच औचित्य होते.
 बैठकीत सर्वांत जास्त उपस्थिती साहजिकच पंजाबमधील शेतकरीनेत्यांची होती. त्याशिवाय हरयाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार येथून प्रतिनिधी आले होते. युनियनच्या घटनेचा लिखित मसुदा तयार करणे हा बैठकीचा मुख्य अजेंडा होता. त्यानंतरचा वेळ युनियनचे नाव, झेंडा, वर्गणी, निधिसंचय, पदाधिकारी, अंतर्गत निवडणुका वगैरे संघटनात्मक बाबींवरील चर्चेत आणि शासनाकडे कुठल्या मागण्या मागायच्या ते निश्चित करण्यात जाणार होता, हे पहिल्याच सत्रात स्पष्ट झाले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी युनियनच्या हरयाणा शाखेचे अध्यक्ष मांगीराम मलिक हे होते. युनियनचे अखिल भारतीय सरचिटणीस राजेवाल यांनी सर्वांचे स्वागत केले, तर पंजाब शाखेचे अध्यक्ष भूपिंदरसिंग मान यांनी युनियनची जन्मकथा सांगणारे प्रास्ताविक केले.
 पहिल्या सत्रात हरयाणाचे ॲडव्होकेट करमसिंग, पंजाबचे अजमेरसिंग लोखोवाल, उत्तरप्रदेशातील मीरतचे सुखबीरसिंग आर्य, झाशीचे गांधीवादी प्राध्यापक डॉक्टर रामनाथन कृष्ण गांधी व मध्यप्रदेशचे विनयचंद्र मुनीमजी यांची भाषणे झाली. महाराष्ट्रातर्फे विजय जावंधिया बोलले. नागपूरचे असल्याने त्यांचे हिंदी उत्तम होते. स्वतः जोशी मात्र ह्या पहिल्या सत्रात काहीच बोलले नाहीत. बैठकीतील इतरांच्या मनात, बैठकीचा मुख्य विषय असलेल्या घटनानिश्चितीविषयी जोशींची भूमिका काय असेल ह्याविषयी बरीच शंका होती. जोशींचे नाव जरी सर्वांनी ऐकले असले, तरी उपस्थितांपैकी एक राजेवाल सोडले तर इतर कोणीही जोशींना पूर्वी कधीच भेटलेलेही नव्हते. स्वतः जोशींनाही ह्या बैठकीत इतरांपेक्षा आपण वेगळे पडत चाललो आहोत ह्याची पहिल्याच सत्रात कल्पना आली होती. कदाचित त्यामुळेच तेही तसे गप्पगप्पच होते.
 हैदराबाद येथे १९८० मध्ये अखिल भारतीय किसान युनियनची स्थापना झाली, त्याच वेळी 'पुढच्या बैठकीत घटना निश्चित करायची' असे ठरले होते. पण अनेक कारणांनी ही पुढली बैठक मधली दीड-दोन वर्षे होऊ शकली नव्हती. शेवटी खन्ना येथे त्या बैठकीचा योग आला होता व घटनानिश्चिती हा तिचा अजेंडा पूर्वीच ठरला होता. दुसऱ्या सत्रात सर्वांनी घटनेची मुख्य कलमे काय असावी ह्यावर मते मांडली. त्याचबरोबर शासनाकडे सादर करण्यासाठी आपापल्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा मागण्या मांडल्या गेल्या. मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजांत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी राखीव जागा ठेवाव्यात इथपासून ते सरकारने कीटकनाशकांचा पुरवठा स्वस्त दरात करावा इथपर्यंत अनेक मागण्या पुढे आल्या. सगळ्यांचे बोलणे बराच वेळ शांतपणे ऐकून घेतल्यानंतर जोशी बोलण्यासाठी उभे राहिले. अतिशय नम्रपणे त्यांनी भाषणाला सुरुवात केली.
 "घटनेचा मसुदा निश्चित करण्यासाठी बोलावलेली ही बैठक आहे व तिला आम्ही आपले अतिथी म्हणून हजर राहिलो आहोत. अशावेळी आम्ही काही मूलभूत मुद्दे उपस्थित करणं गैर वाटेल. लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी वधूवर बदलायची सूचना करावी असंच काहीसं ते वाटेल! पण अशा अखिल भारतीय युनियनची उद्दिष्टं नक्की करताना अधिक मूलगामी विचार व्हायला हवा व तो झाल्यावर मगच घटनेचा मुद्दा विचारात घेता येईल. आधी उद्दिष्टं स्पष्ट असावीत व मग ती साध्य करण्यासाठी कुठली घटना उपयुक्त ठरेल, ते बघता येईल. त्या दृष्टीने माझे विचार मांडण्यासाठी मला जरा अधिक वेळ लागेल व तो अध्यक्षांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो."
 तसा वेळ सुदैवाने अध्यक्षांनी दिला व त्यानंतर स्वतःची पार्श्वभूमी, शेतकरी प्रश्नाची ऐतिहासिक मीमांसा, शेतीमालाच्या जाणीवपूर्वक कमी राखलेल्या किंमती, गोऱ्या इंग्रजाचेच धोरण चालू ठेवणारे काळे इंग्रज, स्वतःचे आंबेठाणमधील शेतीचे अनुभव हे सारे जोशींनी विस्ताराने मांडले. “शेतीमालाला रास्त भाव हाच एक-कलमी कार्यक्रम आपण समोर ठेवावा व तसा भाव मिळाला, तर अन्य कुठल्याही अनुदानाची वा सवलतीची आपल्याला गरजच राहणार नाही; त्या एका मागणीमागे देशभरातील शेतकरी उभा करता येईल, त्यासाठी लिखित घटना वगैरे बाबींची गरज नाही; अगदी अत्यावश्यक असेल तेवढेच बांधीव रूप आपण स्वीकारावे व बाकी बाबतीत लवचीक धोरण ठेवावे," असे ते म्हणाले.

 त्यांच्या ह्या विस्तृत भाषणानंतर चमत्कार घडावा, तसे बैठकीतील वातावरण बदलले. 'स्वतः जोशींच्या तोंडून हे सारं ऐकणं हा एक अविस्मरणीय असा अनुभव होता, असे मत नंतर बोलणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाने व्यक्त केले. 'साधी जीन्स आणि बुशशर्ट घालणारा, शेतकरी अजिबात न दिसणारा हा माणूस जे म्हणाला, ते आम्हाला पूर्वी कधीच कोणी सांगितलं नव्हतं', 'तुम्ही महाराष्ट्रातले शेतकरी भाग्यवान आहात, म्हणून तुम्हाला असा नेता मिळाला', 'अनेक शेतकरी नेते आजवर बघितले, पण इतका अभ्यासू नेता नव्हता बघितला' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.
 पुढील सर्वच सत्रांवर आता जोशींची निर्विवाद पकड बसली. युनियनचे आता जणू ते अलिखित अध्यक्षच बनले. बैठकीच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजे रविवार ३० मे रोजी, संमत झालेल्या ठरावांवरही जोशींच्या अर्थमूलक विचारसरणीची छाप उघड होती. 'शेतकऱ्याला रास्त भाव न देण्याच्या शासनाच्या धोरणाचा ही युनियन निषेध करते' हा पहिलाच ठराव होता. आणखीही एक महत्त्वाचा ठराव होता, 'शेतीमालाचा साठा, प्रक्रिया, व्यापार व निर्यात यांसंबंधीचे सर्व निबंध शासनाने दूर करावेत. यांसंबंधी परदेशात झालेल्या तांत्रिक सुधारणांच्या स्वीकाराबद्दल शेतकऱ्यावर कुठलीही बंधने असू नयेत. त्यासाठी आवश्यक अशी यंत्रसामग्री परदेशातून आयात करण्याची शेतकऱ्याला मुक्त परवानगी असावी.'

 बैठकीच्या औपचारिक सांगतेनंतर किसान युनियनने खन्ना गावातून एक मोठी शोभायात्रा काढली. आर्य हायस्कूलच्या मैदानावर भरलेल्या एका मोठ्या सभेत शोभायात्रेचे स्वागत केले गेले. साधारण तीसेक हजार शेतकरी हजर होते. जोशी व्यासपीठावर पोचताच त्यावेळी चालू असलेले भाषण थांबवून जोशींचे आगमन माइकवरून जाहीर केले गेले व 'किसान युनियन झिंदाबाद'च्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला. जाहीर सभेतील आपले पहिले हिंदी भाषण जोशींनी याच खन्नातील सभेत केले. सुरुवातीलाच जोशींनी शहीद भगतसिंगांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, “माझी शेती जिथे आहे तिथून जवळच राजगुरूनगर आहे. ह्याच राजगुरूने क्रांतिकार्यात भगतसिंगाला मृत्यूच्या घटकेपर्यंत साथ दिली होती. तेव्हा पंजाब आम्हाला किंवा आम्ही पंजाबला नवखे नाही. आमचा रिश्ता पुराना आहे व त्याला उजाळा देण्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. पंजाब म्हणजे आमचा वडील बंधू आहे." आपल्या पस्तीस मिनिटांच्या भाषणाच्या या भावस्पर्शी सुरुवातीपासूनच जोशींनी सभेतील प्रत्येकाला भारावून टाकले.
 यानंतरच्या मानसा, नवा शहर, फिरोजपूर व गोविंदबालसाहिबा येथील चार सभाही अशाच गाजल्या. स्थानिक पंजाबी वृत्तपत्रांतील बातम्यांमध्येही जोशींनाच सर्वाधिक प्राधान्य दिले गेले. मानसा आणि नवा शहर ह्यांच्या दरम्यान लुधियाना शहराजवळ सुप्रसिद्ध पंजाब कृषी विद्यापीठ आहे. संपूर्ण आशिया खंडात ते नामांकित आहे; विशेषतः तेथील ग्रंथालय. तिथे जायची जोशींची खूप जुनी इच्छा ह्या दौऱ्यात पूर्ण झाली. योगायोग म्हणजे, ते ह्या ग्रंथालयात असतानाच त्या दिवशीचा 'इंडियन एक्स्प्रेस'चा अंक (चंडीगढ आवृत्ती) कोणीतरी त्यांना आणून दाखवला व त्यात पहिल्याच पानावर त्यांचा मोठा फोटो व खन्ना येथील भाषणाची बातमी छापली होती. महाराष्ट्रातील त्यांच्या कुठल्याच भाषणाला अशी प्रसिद्धी पूर्वी मिळाली नव्हती.
 दुसऱ्या दिवशी इंडियन एक्स्प्रेसचे चंडीगढ येथील प्रमुख वार्ताहर विनोद मिश्रा यांनी जोशींची विस्तृत मुलाखत घेतली व ती पुढल्या दिवशी पेपरात छापूनही आली. मिश्रा हे जेमतेम तिशीतले, परदेशात शिकून आलेले, खूप हुशार असे पत्रकार होते व त्यांचे प्रश्न मोठे मार्मिक होते. “शहरातील दारिद्र्य हाही नुकसानीतील शेतीचाच एक परिणाम आहे व ग्रामीण भागातील भांडवलसंचय हाच देशातील दारिद्र्यावरचा एकमेव उपाय आहे," असे जोशी यांनी मुलाखतीत म्हणताच, "पण उद्या हाच शेतकरी इतरांचे शोषण करू लागला तर?" असा प्रतिप्रश्न मिश्रांनी विचारला. उत्तरादाखल जोशी म्हणाले, “तर मग शेतकऱ्यांशीही लढावं लागेल आणि संघटना तशी मोर्चेबंदी करायला कचरणार नाही. कारण मुळात हा लढा शेतकऱ्यांसाठी नसून दारिद्र्याविरुद्ध व शोषणाविरुद्ध आहे."
 उपरोक्त पुस्तकातील कुळकर्णी यांची अनेक निरीक्षणे वेधक आहेत. अगदी सुरुवातीला पुणे स्टेशनात गाडी लागली, तेव्हा दोन हातांत दोन बॅगा घेऊन, धक्काबुक्की करत, कसेबसे डब्यात शिरणारे शरद जोशी पाहूनच कुळकर्णी काहीसे चमकले. नेता म्हटल्यावर तो नेहमी झोकातच राहतो, आपल्या व्यक्तिगत सुखसोयींकडे कधीच दुर्लक्ष होऊ देत नाही, ह्या रूढ अनुभवाला छेद देणारे ते दृश्य होते. कुळकर्णी म्हणतात, "ज्याची प्रतिमा महाराष्ट्रात 'श्रीमंत शेतकऱ्यांचा कैवारी' म्हणून जाणीवपूर्वक मलिन केली जात होती, असा हा शरद जोशी दोन्ही हात सामानात गुंतवून, रेल्वे स्टेशनचे दादर चढून-उतरून, दुसऱ्या वर्गाच्या डब्यात शिरत होता!"
 शेतकरीनेता म्हणून जोशींनी केलेला हा पंजाबचा पहिलाच दौरा. पंजाबबरोबर तेव्हा जडलेले नाते पुढे काळाच्या ओघात अधिकाधिक दृढ होत गेले.

 १९८२ मधील ह्या दौऱ्यानंतर १७,१८ व १९ फेब्रुवारी १९८४ रोजी मराठवाड्यात परभणी येथे भरलेल्या शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या अधिवेशनात पुन्हा एकदा पंजाबचा विषय निघाला. तिथे पंजाबातून आलेले प्रतिनिधीही होते. त्यांनी चंडीगढ येथे पुढील महिन्यात ते वीजमंडळाविरुद्ध करणार असलेल्या आंदोलनाविषयी माहिती दिली. जोशींनी त्यांना लगेचच जोरदार पाठिंबा दिला. 'शेतकरी तितुका एक एक' ही घोषणा मूर्त स्वरूपात आणण्यासाठी 'पंजाबमधील शेतकऱ्यांच्या ह्या आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी बांधवदेखील त्यांना साथ देतील व त्यासाठी महाराष्ट्रातील निदान १००० शेतकरी चंडीगढला जातील' असे जोशींनी जाहीर केले.
 'जाना है, जाना है, चंडीगढ जाना है' अशा घोषणाही तेव्हा दिल्या गेल्या. कार्ल मार्क्सने ज्याप्रमाणे 'जगातल्या कामगारांनो, एक व्हा' असा नारा दिला होता व त्याद्वारे वर्गजाणीव (class consciousness) निर्माण करायचा प्रयत्न केला होता, तसाच काहीसा हा जोशींचा प्रयास होता. शेतकरी, मग तो महाराष्ट्रातील असो की पंजाबातील, हा शेवटी एकाच आर्थिकसामाजिक वर्गातला आहे, आपली सुखदुःखे परस्परांशी जोडली गेलेली आहेत, ही जाणीव संघटनेच्या कार्यकर्त्यांत निर्माण होणे गरजेचे होते. त्यातून त्यांचे स्वतःचे क्षितिज खूप रुंदावणार होते.

 १२ मार्च १९८४पासून चंडीगढ येथे सुरू झालेले हे आंदोलन म्हणजे केवळ पंजाबमधील शेती आंदोलनातीलच नव्हे, तर एकूणच शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील एक मानबिंदू आहे. पुढचे सलग सहा दिवस चंडीगढ येथील पंजाबच्या राजभवनला जवळजवळ एक लाख शेतकऱ्यांनी घेराव घातला होता. त्यात हिंदू आणि शीख आपले सगळे मतभेद विसरून सामील झाले होते. त्यावेळी पंजाबात उफाळलेल्या धार्मिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ह्या आंदोलनाचे अनन्यसाधारणत्व अधिकच उठून दिसते.
 मुख्यतः हे आंदोलन विजेच्या दरवाढीविरुद्ध होते. अर्थात विजेव्यतिरिक्त इतरही मागण्या होत्याच. शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळावा, शेतीमालाच्या विक्रीवरची झोनबंदीसारखी बंधने उठवावीत, आपल्या विकासाला योग्य असे आधुनिक बियाणे, यंत्रे, तंत्रज्ञान वापरण्याचे किंवा आयात करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य शेतकऱ्याला असावे वगैरे.
 पंजाबी शेतकऱ्याच्या दृष्टीने वीजपुरवठा ही एक कायमची डोकेदुखी बनून राहिली होती. शेतीतील कूपनलिका, पंप, मोटारी, थ्रेशरसारखी इतर उपकरणे यांचा वापर तिथे भरपूर. त्यासाठी वीज ही अत्यावश्यक. पण वीजपुरवठा मात्र कमालीचा अनियमित. त्यातून ग्रामीण भागातील वीज ही बहुतेकदा रात्री पुरवली जायची. कधीही ती खंडित व्हायची. काळोखात शेतात काम करणे अशक्य होई. साप, अन्य जीवाणू चावायची भीती असे. याउलट शहरी भागात वीज दिवसा पुरवली जाई; ते शहरवासीयांना व मुख्यतः कारखान्यांना सोयीचे असे. पण त्यांची सोय पाहणारे सरकार ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांची सोय मात्र पाहत नाही याचाही राग शेतकऱ्यांच्या मनात होता. विजेचे दरही कमी करावेत म्हणून आदले दीड वर्ष शेतकरी मागणी करत होते, पण पंजाब शासन दाद देत नव्हते; उलट सरकारने ते दर वाढवायचा निर्णय घेतला होता. त्या विरोधात शेवटी राजभवनला घेराव घालायचे ठरले होते.
 पंजाबात ह्या घडामोडी चालू असताना इकडे महाराष्ट्रात परभणीतील आवाहनाला साद म्हणून झपाट्याने शेतकरी पुढे येऊ लागले. 'पंजाबात सगळीकडे आग पेटली आहे, तिथे जाऊन उगाच कशाला जीव धोक्यात घालता?' असा सल्ला देणारेही बरेच होते, पण त्यांना न जुमानता, स्वखर्चाने, जाणाऱ्यांची संख्या बघता बघता अकराशेवर जाऊन पोचली.
 शेवटी एकदाचा दीर्घकाळ प्रतीक्षा असलेला १२ मार्चचा दिवस उजाडला. सकाळी नऊच्या सुमारास सारे मराठी शेतकरी चंडीगढला परेड ग्राउंडवर जाऊन पोचले. तोवर इतरही शेतकरी मोठ्या प्रमाणावर येऊन पोचले होते. सकाळी सहा वाजल्यापासूनच तिथे शेतकऱ्यांचे लोंढेच्या लोंढे दाखल होऊ लागले होते.
 चंडीगढला पोचल्यावर मराठी शेतकऱ्यांना संगरूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गटात समाविष्ट केले गेले. ह्या गटाचे नेतृत्व महाराष्ट्राशी बऱ्यापैकी परिचित असलेले बलबीरसिंग राजेवाल ह्यांच्याकडे होते. त्यांच्यासोबत भास्करराव बोरावके, रामचंद्रबापू पाटील, शेषराव मोहिते, नरेंद्र अहिरे, भाऊसाहेब इंगळे, बद्रीनाथ देवकर, चंद्रकांत वानखेडे व विजय जावंधिया हे होते. त्याशिवाय ताराबाई तानाजी पवार (पिंपळगाव दबडे), पार्वतीबाई यादव नाईकवाडे (येवला) व प्रभावतीबाई महादेव केळकर (पाथर्डी) या महिला कार्यकर्त्याही होत्या. विशेष म्हणजे सतत १३ दिवस सायकलने प्रवास करीत वर्धा जिल्ह्यातील नऊ तरुणही ह्या आंदोलनासाठी जवळपास दीड हजार किलोमीटर्सचा प्रवास करून आले होते. जमलेल्या सर्वच आंदोलकांनी त्यांचे भरपूर कौतुक केले. 'पंजाब का बुलावा है, महाराष्ट्र आज आया है' असे लिहिलेले स्वागतपर फलक रस्त्यावर जागोजागी लावले होते. महाराष्ट्रातून आलेल्या जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांचा पंजाबात यायचा, किंबहुना महाराष्ट्राबाहेर पाय ठेवायचा हा पहिलाच प्रसंग होता. साहजिकच सगळ्यांचा उत्साह दांडगा होता. चंडीगढच्या दर्शनाने सगळे अगदी भारावून गेले होते.
 चंडीगढ आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग असलेले शेतकरी संघटनेचे विदर्भातील एक नेते चंद्रकांत वानखडे यांनी शेतकरी संघटक (६ एप्रिल १९८४)मध्ये चक्षुर्वैसत्यम हकीकत नोंदवलेली आहे. त्यानुसार राजभवनापर्यंत शेतकऱ्यांना पोचताच येऊ नये म्हणून लांबलांबून येणाऱ्या शेतकऱ्यांना चंडीगढच्या वेशीवरच रोखण्याचा पोलिसांनी आधी प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांची संख्या प्रचंड होती, त्यांच्या लाटाच्या लाटा चंडीगढमध्ये शिरत होत्या व एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या शेतकऱ्यांना अडवणे अशक्य आहे हे लक्षात आल्यावर पोलिसांनी तो प्रयत्न सोडून दिला. वेगवेगळ्या मोर्च्यांनी शेतकरी राजभवनसमोरच सेक्टर सतरामध्ये असलेल्या विशाल परेड ग्राउंडवर जमू लागले. त्यांची संख्या दुपारी दोनपर्यंत जवळपास एक लाखावर गेली होती. बहुसंख्य शेतकरी अर्थातच पंजाबमधील होते; पण हरयाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान येथील शेतकऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. त्यांच्यासोबत आलेले जवळजवळ दोन हजार ट्रॅक्टर्स व ट्रेलर्स परेड ग्राउंडच्या भोवताली पसरले होते. अधूनमधून माइकवरून पंजाबी गीते सादर केली जात होती. काही जण रेडियो ऐकत होते. काहींजवळ टेपरेकॉर्डर होते; त्यांवरून गुरुबाणी ऐकवली जात होती. खाण्यासाठी आंदोलकांनी बरोबर कायकाय आणले होते! त्याचाही समाचार घेणे सुरू होते. वेगवेगळे गटनेते आपापल्या अनुयायांसमोर छोटी-छोटी भाषणेही करत होते.
 १० ऑक्टोबर १९८३ ते २९ सप्टेंबर १९८५ या कालावधीत पंजाबात अस्थिरतेमुळे राष्ट्रपतींची राजवट होती. राज्यपाल बी. डी. पांडे हेच सर्व निर्णय घेत होते. त्या दिवशी दुपारी तीनच्या सुमारास ते फिल्लूरमधील आपला पूर्वनियोजित कार्यक्रम आटोपून खास विमानाने चंडीगढमध्ये दाखल झाले व मोटारने थेट राजभवनमध्ये जाऊन पोचले. एकूण परिस्थिती त्यांच्या लक्षात आली होती. काही उच्च अधिकाऱ्यांची तातडीची बैठकही त्यांनी लगेचच बोलावली. नंतर मान व जोशींसह प्रमुख शेतकरीनेत्यांनाही त्या बैठकीत बोलावले व वाटाघाटींनी प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न स्वतःच्या पुढाकारातून केला. पण आंदोलन मागे घ्यायला शेतकरीनेत्यांनी नकार दिला. संध्याकाळपासून राजभवनाला वेढा पडणार हे आता नक्की झाले. 'वेढ्याच्या कालावधीत आपण राजभवन सोडून कुठेही बाहेर जाणार नाही' असे आश्वासन राज्यपालांनी त्यावेळी शेतकरीनेत्यांना दिले.
 सगळे नेते घाईघाईने पुन्हा परेड ग्राउंडवर आले. शेतकऱ्यांच्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला होता. लोकांचा उत्साह आता अगदी शिगेला पोचला होता. इतक्या लोकांना दीर्घकाळ शांत ठेवणे अवघड होते; काही ना काही घडत राहणे आवश्यक होते. काही मिनिटांतच सभेला सुरुवात झाली. सभेत पंजाबमधील नेते अजमेरसिंग लोखोवाल, बलबिरसिंग राजेवाल, भूपेंद्रसिंग मान, हरयाणाचे नेते मांगीराम मलिक, मध्यप्रदेशचे विनयचंद्र मुनीमजी, उत्तरप्रदेशचे डॉ. रघुवंशमणि पांडे व समन्वय समितीचे संयोजक विजय जावंधिया यांची भाषणे आधी झाली. सर्वात शेवटी जोशी बोलले. "आम्ही आपल्या मदतीसाठी आलेलो नाही. लहान भाऊ मोठ्या भावाला काय मदत करणार? पण आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी करायला आम्ही इथे आलो आहोत. ज्यांच्या हाती सेनेकडे असलेल्या हत्यारांपेक्षाही प्रभावी असं गव्हासारखं हत्यार आहे, त्यांना कोणाच्याही मदतीची गरज नाही." त्यांचा शब्दन्शब्द सगळे श्रोते विलक्षण शांततेत ऐकत होते. प्रत्येकाच्या काळजाला भिडणारे ते भाषण होते.
 परेड मैदानावरची सभा संपल्यावर साधारण सहाच्या सुमारास सर्व शेतकरी सहा वेगवेगळ्या गटांत विभागले गेले व शिस्तबद्ध रांगा करून अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या राजभवनकडे घोषणा देत चालू लागले. पूर्वी ठरल्याप्रमाणे राजभवनकडे जाणाऱ्या सहाही रस्त्यांवर जाऊन नियोजित जागी त्यांनी धरणे धरले. पहिला गट सेक्टर सात आणि आठ यांच्यामधून राजभवनवर गेला. सगळ्यात मोठा गट गोल्फ क्लबच्या समोरून राजभवनवर गेला. ह्या गटात जोशी व मान होते. शेवटचा गट लेक क्लबच्या समोरून राजभवनवर गेला, चारी बाजूंनी आता राजभवनाला शेतकऱ्यांचा वेढा पडला होता. तोवर संध्याकाळचे सात वाजले होते. तसे हे सहाही रस्ते सकाळी नऊपासुनच पंजाब पोलिसांनी लोखंडी खांब जाळ्या लावून बंद केले होते. त्या अडथळ्यांच्या अलीकडे शेतकऱ्यांनी रस्त्यांवरच मांडी ठोकली होती आणि अडथळ्यांच्या पलीकडे, राजभवनाच्या भिंतीपर्यंत हजारोंच्या संख्येने पोलीस हजर होते. चंडीगढ़ प्रशासनाने पंजाब व हरयाणा सरकारव्यतिरिक्त केंद्राकडूनही सुरक्षारक्षकांची कुमक मागवली होती. सुमारे १५,००० पोलीस, एसआरपी व बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवान राजभवन परिसरात सुसज्ज उभे होते. चंडीगढ ही पंजाब व हरयाणा ह्या दोन्ही राज्यांची राजधानी. ती केंद्रशासित आहे. दोन्ही राज्यांची स्वतंत्र राजभवने आहेत. हा वेढा पंजाबच्या राजभवनला होता.
 तेरा मार्च, वेढ्याचा दुसरा दिवस. राजभवनासमोरच एक मोक्याची जागा शोधून दुपारी तिथे सभा झाली व त्या सभेत महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांना निरोप देण्यात आला. त्यांना पुन्हा लांबचा प्रवास करून आपापल्या घरी परतायचे असल्याने दुसऱ्या दिवशी त्यांना परतायची परवानगी द्यायची हे पूर्वीच ठरले होते. काही कार्यकर्ते मात्र तिथेच राहणार होते. ह्या लढ्यातला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सहभाग खूप वाखाणला गेला. मुळात त्यांचा सहभाग हाच पंजाबच्या शेतकऱ्यांना फार मोठा आधार वाटला. 'देशातील शेतकरी सारे एक आहेत' ही भावना त्यातून अधोरेखित होत होती व तेच त्यांच्या सहभागाचे मुख्य कारण होते. 'महाराष्ट्रात जेव्हा असे आंदोलन होईल, तेव्हा आम्हीही तुमच्यामागे असेच उभे राहू' असे आश्वासन जवळजवळ प्रत्येक वक्त्याने मंचावरून दिले.
 चौदा मार्च. वेढ्याचा तिसरा दिवस. वातावरणातील चुळबुळ आता वाढली होती. पण पंजाब शासन दाद देईना; शेतकरीनेत्यांशी बोलणी करण्यासाठी पुढे येईना. सरकारला कदाचित वाटले असावे, की आपण दोन-तीन दिवस दुर्लक्ष केले, तर कंटाळून शेतकरी आपोआपच वेढा उठवून आपापल्या गावी परततील. पण मागण्या मान्य झाल्याखेरीज वेढा उठवायचा नाही हा शेतकऱ्यांचा निर्धार कायम होता. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली. आसपासच्या गावांतून शिदोरी जमवायला सुरुवात झाली. दूध येऊ लागले. फळे येऊ लागली. ट्रॅक्टर्स भरभरून खाद्यपदार्थ येऊ लागले. शेतकऱ्यांनी मिळतील त्या लाकडी फळकुटांचा व कार्डबोडींचा वापर करत आपापल्या कच्च्या झोपड्या उभ्या केल्या. एक किसाननगरच तिथे उभे राहिले.
 पंधरा मार्च. वेढ्याचा चौथा दिवस. आज सकाळपासूनच वातावरण एकदम तंग झाले. वेढ्याच्या कालावधीत राजभवन न सोडण्याचे आश्वासन राज्यपालांनी पाळले नाही. त्या पहाटे अचानक ते गुपचूप बाहेर पडले. लुधियानामधील एका कार्यक्रमासाठी ते गेले होते. रेडियोवरील बातम्या ऐकताना ही बातमी आंदोलकांना कळली. ते खूपच चिडले. तीन-चार तासांनी राज्यपाल परत आले. त्या दोन्ही वेळी राज्यपालांच्या अनुपस्थितीत राजभवनावरील ध्वज उतरवून ठेवणे, त्यांच्या मोटारीवर राष्ट्रध्वज व लाल दिवा लावणे, पुढ्यात सायरन वाजवत जाणारी गाडी असणे, राजभवनाच्या मुख्य प्रवेशदारावर राज्यपाल आत नाहीत हे सूचित करणारी नेहमीची पाटी लावणे वगैरे सोपस्कार पाळले गेले नव्हते. दरम्यानच्या काळातील तणाव तोवर खूप वाढला होता. पण जोशी व इतर नेत्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. आपल्या भाषणात जोशी म्हणाले,
 “राज्यपाल उंदरासारखे बिळातून बाहेर आले असले आणि परत बिळात घुसले असले तरी आपण काही मांजर नाही. आपल्याला उंदीर-मांजराचा खेळ खेळायचा नाही, त्यांचा पाठलाग करायचा नाही. आपले आश्वासन त्यांनी पाळले नाही, उंदरासारख्ने पळून गेले, तरी आपण आपली पायरी सोडायची नाही. शेवटी राज्यपाल हा थेट राष्ट्रपतींचा प्रतिनिधी आहे ह्याची जाणीव ठेवून आपण संयम पाळू या."
 अतिशय कौशल्याने जोशींनी ती परिस्थिती हाताळली व शांतता कायम राखली.

 सोळा मार्च. वेढ्याचा पाचवा दिवस. आता रोज आसपासच्या गावांतून नवे नवे शेतकरी मोर्च्याने येऊन वेढ्यात सामील होऊ लागले. स्त्रियाही मोठ्या संख्येने येऊ लागल्या. शेजारच्या हरयाणातील पंधरा-वीस हजार शेतकरी लवकरच तिथे येऊन दाखल होत आहेत अशीही बातमी होता. सरकारचे हेलिकॉप्टर रोज सकाळी किसाननगराची हवाई पाहणी करायचे. त्यांनीही शेतकऱ्यांचा उत्साह वाढता आहे हे सरकारपर्यंत पोचवले असणार. वृत्तपत्रे तर रोजच पानभर बातम्या छापत होती.

 ही सारी परिस्थिती विचारात घेऊन शेवटी पंजाब सरकारने सतरा तारखेला, म्हणजे सहाव्या दिवशी, शेतकरीनेत्यांशी बोलणी सुरू केली. उभय बाजूंच्या संमतीने लुधियाना येथील सुप्रसिद्ध पंजाब कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एस. एस. जोल ह्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील पंधरा दिवसांत एक तज्ज्ञ समिती नेमायचा निर्णय सरकारने घेतला. डॉ. जोल हे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले एक कृषिशास्त्रज्ञ होते. पुढे त्यांना पद्मभूषण पुरस्कारही दिला गेला. त्यांना मदत करण्यासाठी म्हणन समितीचे इतरही तीन सदस्य असणार होते; ते तिघे वरिष्ठ सरकारी अधिकारी होते. समितीने आपला अहवाल तीन महिन्यांत द्यायचा असेही ठरले. या तज्ज्ञ समितीने वीजदर ठरवताना वीज उत्पादनाचा खर्च विचारात घ्यायचा, पण त्याचबरोबर शेतीमालाची किंमत ठरवतानाही तोच वाढीव वीजदर विचारात घ्यायचा व त्या आधारावर शेतीमालाची किंमत ठरवायची असे ठरले. शेतीमालाची किंमत ठरवण्याची ही पद्धत अधिक शास्त्रशुद्ध होती व तीच देशभर सर्वत्र लागू झाली तर शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा त्यात होणार होता. किंबहुना, शेतीमालाची रास्त किंमत ठरवण्याची योग्य यंत्रणा उभारणे ह्या मागणीवर जोशींचा प्रथमपासूनच खूप भर होता व त्या दिशेनेच टाकलेले हे पाऊल होते. आधी आंदोलनाकडे पूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या सरकारने एवढी तयारी दर्शवली हाही मोठा विजय होता.
 त्यानंतर शेतकऱ्यांनी वेढा उठवायचे ठरवले. ज्या परेड ग्राउंडवरून आंदोलनाला सुरुवात झाली त्याच परेड ग्राउंडवर १८ मार्चला प्रचंड जल्लोषात विजयोत्सव साजरा झाला.

 ह्या सहा दिवसांत जे कार्यकर्ते तिथे प्रत्यक्ष हजर होते, त्यांच्या दृष्टीने हा आयुष्यातील एक अविस्मरणीय असा अनुभव होता. त्यांच्या निरीक्षणांतुन व आठवणींतुन आंदोलनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतो. किसाननगरमध्ये पहिल्या दोन दिवसांतच शेतकऱ्यांनी आपापल्या कामचलाऊ झोपड्या उभारल्या याचा उल्लेख मागे झालाच आहे. त्या घटनेला चंद्रकांत वानखडे यांनी आपल्या उपरोक्त लेखात लिहिल्याप्रमाणे विनोदाची झालरही होती. प्रत्येक झोपडीसमोर एक पुठ्याचा बोर्ड लटकत होता. त्यावर त्या झोपडीचे नाव, घर क्रमांक व टेलिफोन क्रमांक गुरुमुखीत लिहिलेले असायचे. वर एक शोभेचा टीव्ही अँटेनादेखील लटकत होता! चंडीगढमधील इतर उच्चभ्रू बंगल्यांची ही नक्कल होती! 'हा टेलिफोन नंबर कुठला? इथे तर टेलीफोनच नाहीये,' असे विचारले, तर उत्तर यायचे, 'टेलिफोनसाठी अर्ज केला आहे, नंबरदेखील मिळाला आहे. टेलिफोन मात्र अजून मिळालेला नाही. सरकारी कामांना किती उशीर लागतो हे माहिती आहे ना तुम्हाला!'
 सत्याग्रहींमध्ये सहभागी असलेले कोपरगावचे भास्करराव बोरावके म्हणतात,
 "त्या काळात खलिस्तानचा प्रश्न अगदी पेटून उठलेला. पण या आंदोलनात तथाकथित हिंदू-शीख वैर किती फसवं आहे, धर्मभेद हा खोटा वाद कसा आहे, हे कोणालाही दिसेल इतकं स्पष्ट झालं. आणखी एक गोष्ट – जोशीसाहेबांनी कधीही शिखांचं लांगूलचालन केलं नाही. तिथल्या शिखांमध्ये दारू प्यायचं प्रमाण प्रचंड. पहिल्याच दिवशी बरेच शीख बांधव दारू पिऊन आले होते. साहेबांनी त्यांना अगदी स्पष्ट शब्दांत त्याच दिवशी व्यासपीठावरून जाहीर तंबी दिली. म्हणाले, 'ज्यांना दारू प्यायची असेल, त्यांनी इथून ताबडतोब चालतं व्हावं.' आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवसापासून एकही शीख बांधव घेराओत दारू पिऊन आला नाही! इतका स्पष्टवक्तेपणा दाखवूनही लोकांवर इतका जबरदस्त होल्ड असलेला दुसरा कोणीही नेता आम्ही आजपर्यंत कधी पाहिलेला नाही."
 कोपरगावचेच दुसरे एक शेतकरी बद्रीनाथ देवकर जोशींच्या खास विश्वासातले, त्यांचा भरपूर व्यक्तिगत सहवास लाभलेले. तरुणपणापासूनच संघटनेचे पूर्णवेळ काम करू लागलेले. ते म्हणतात,
 "किसाननगरातून फेरफटका मारताना मला जाणवत होतं, की पंजाबी शेतकरी किती हरहुन्नरी आहे. त्याने तीन दगड गोळा करून त्यांची चूल बनवली. शेजारच्या झाडाझुडपांतून वाळलेला लाकूडफाटा गोळा केला. काही पन्हाळी पत्र्यांचे तुकडे मिळवले, ते दगडांनी ठेचून सरळ केले आणि त्यांचे तवे आणि पोळपाट बनवले. मोठ्या बाटल्यांचं केलं लाटणं! कुठेही हा शेतकरी अडला नाही. शिवाय आल्यागेल्याला अगदी आग्रहाने बोलावून जेवायला द्यायचे. तिसऱ्या दिवसापासून जवळच्या खेड्यांमधून इतके ट्रॅक्टर यायला लागले की मोजणं मुश्किल! प्रत्येक ट्रॅक्टरवर एक चालक पुरुष व बाकी सर्व स्त्रिया. त्यांनी वेढ्यात बसलेल्या सर्व पुरुषांना सांगितलं, 'तुम्ही घराची चिंता करू नका. आंदोलनात राहा. आम्ही सर्व पुरवठ्याची जबाबदारी घेतो.' दुधाचे कॅन, भाजीपाला, पीठ, फळफळावळ, खाण्याचे तयार पदार्थ ट्रॅक्टर भरभरून आले व दररोज येतच राहिले. खाण्याची अगदी रेलचेल झाली. आंदोलन संपल्यावर हे आलेलं धान्य, पीठ, शिधा वगैरे मोठ्या प्रमाणावर उरलं होतं. ते सगळं मंडईत नेऊन त्याचा लिलाव केला गेला व त्याचे लाख, दीड लाख रुपये जमा झाले!"
 चंडीगढच्या प्रशासनाचेही शेतकरीनेत्यांनी जाहीर कौतुक केले. खरेतर शेतकऱ्यांचे भांडण हे पंजाब सरकारशी होते, चंडीगढ प्रशासनाशी नव्हे. चंडीगढ प्रशासनाच्या दृष्टीने तो केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा होता. आवश्यकता भासल्यास पोलिसांचे बळ वापरून वेढा उधळून टाकायची प्रशासनाची तयारी होती; पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे आंदोलन अगदी शांततापूर्ण चालले आहे हे लक्षात आल्यावर प्रशासनानेही बळाचा वापर टाळला. शेतकरीनेत्यांबरोबर चर्चा करून शेतकरी कुठल्या कुठल्या रस्त्यांवर धरणे धरतील हे निश्चित केले. त्या ठिकाणी स्वच्छता, दिवे, पाणीपुरवठा यांचीही चांगली व्यवस्था केली. सरकारशी बोलणी सुरू व्हावी म्हणूनही पुढाकार घेतला. शेतकऱ्यांनी शांतता पाळली आणि प्रशासनानेही संयम राखला. आंदोलन कसे हाताळावे ह्याचा हा एक आदर्शच होता.

 चंडीगढमधून प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच इंग्रजी, हिंदी व पंजाबी वृत्तपत्रांनी ह्या आंदोलनाला भरपूर प्रसिद्धी दिली. जवळजवळ रोजच पहिल्या पानावर सचित्र बातमी येत होती. शरद जोशींचा सभेत भाषण करतानाचा तीन कॉलमी फोटो पहिल्याच दिवशी सगळ्या वृत्तपत्रांनी छापला होता. सगळ्यांनी संपादकीय लिहूनही आंदोलनाची दखल घेतली. ह्या पत्रकारांकडून त्यावेळी अनेक महत्त्वाचे मुद्दे पुढे आले; त्यांतले काहीतर असे होते, की जे स्वतः शेतकरीनेत्यांनीही नोंदवलेले नव्हते किंवा 'शेतकरी संघटक'सारख्या संघटनेच्या मुखपत्रातही कुठे लिहिले गेलेले नाहीत.
 उदाहरणार्थ, १३ मार्च १९८४च्या 'दि ट्रिब्यून'मधील एक बातमी. राजभवनसमोरचा गोल्फ क्लब हा पंजाबातील सर्वांत उच्चभ्रू क्लब. एरव्ही तिथे पाय ठेवायला मिळणेही सर्वसामान्यांना अवघड. पण ह्या आंदोलनात असंख्य शेतकऱ्यांनी रात्री झोपताना आपापल्या पथारी खुशाल तिथल्या खास राखलेल्या विस्तीर्ण हिरवळीवर पसरून दिल्या होत्या. सुखना लेकमध्ये बोटिंग करणे किंवा सेक्टर १७मधील श्रीमंती शॉपिंग सेंटरमध्ये भटकणे हाही अप्राप्य असा आनंद शेतकऱ्यांनी घेतला. चंडीगढमधील राजेशाही हवेल्याही अनेक शेतकरी बाहेरून न्याहाळत असत. ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांना शहरी चंडीगढमध्ये आल्यावर काय काय वाटत असेल ह्याची ह्यावरून काहीशी कल्पना येते. 'दि ट्रिब्यून'ने याची आवर्जून नोंद केली आहे.
 ह्याच पेपराचे १५ मार्चचे 'The March on Chandigarh' हे संपादकीय या आंदोलनाचा 'unprecedented in numbers and also qualitatively different from other demonstrations' ('संख्येचा विचार करता अभूतपूर्व आणि शिवाय इतर निदर्शनांपेक्षा वेगळ्याच गुणवत्तेचे') म्हणून गौरव करते व शेवटी म्हटते,

Half a century ago Sir Chhotu Ram aroused the farmers of the Punjab of that time to a sense of wrong at the hands of the moneylender and the consumer of agricultural products. This resulted in a major revolution in thought and a re-evaluation of roles. Mr. Sharad Joshi is using a much bigger platform to propagate his philosophy of social equality and economic justice. His campaign could well become an important well become an important determining factor in shaping the country's political scenario, especially on the eve of the general elections for Parliament and several State Assemblies.

(अर्धशतकापूर्वी सर छोटू राम यांनी तत्कालीन पंजाबातील शेतकऱ्यांना त्यांच्यावर सावकार व शेतीमालाच्या ग्राहकाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध जागृत केले. त्याचा परिणाम म्हणून एक मोठी वैचारिक क्रांती घडून आली व आपापल्या भूमिकांचे पुनर्मूल्यांकन केले गेले. सामाजिक समता व आर्थिक न्याय यांबाबतच्या आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आज श्री शरद जोशी त्यापेक्षा अधिक मोठे व्यासपीठ वापरत आहेत. त्यांचे हे आंदोलन देशातील राजकीय परिस्थितीला आकार देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णायक घटक ठरू शकेल - विशेषतः लोकसभेच्या व अनेक राज्यांतील आगामी निवडणुकांच्या पूर्वसंध्येला.)

आपल्या २० मार्चच्या अंकात या आंदोलनाचे राजकीय महत्त्व विशद करताना 'इंडियन एक्स्प्रेस'चे एक पत्रकार देविंदर शर्मा यांनी आपल्या लेखात म्हटले,
That the Bharatiya Kisan Union has emerged as a major force to reckon with in Punjab becomes evident from the manner in which the Akali Dal felt perturbed over the massive show of strength. Since the BKU had politely turned down Akali Dal's offer of support, the Dal had to issue a statement supporting the farmers' movement 'unilaterally'. Whether the farmers' movement has eroded the Akali rural base is still not clear but it is certain that the state's peasantry is more concerned about their own economic problems than the political and religious demands. The farmers' leaders, unlike politicians, stayed along with the farmers during the picketing of Raj Bhavan. This itself is enough to seek mass support from the ruralites. Most of those who camped at Chandigarh were young farmers and not the old generation which participated in the Akali morcha. "The Akalis are fighting a dharam yudh and we are waging a karam yudh,' said a young farmer aptly summing up the difference in approach

(भारतीय किसान युनियन ही पंजाबमधील एक मोठी दखलपात्र शक्ती म्हणून उदयाला आली आहे. युनियनने केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे ज्याप्रकारे अकाली दल पक्ष अस्वस्थ झाल्याचे दिसते, त्यावरून ही बाब अगदी स्पष्ट आहे. अकाली दलाने देऊ केलेला पाठिंबा बीकेयुने नम्रपणे नाकारला होता व त्यामुळे अकाली दलाला आंदोलनासाठी आपला 'एकतर्फी' पाठिंबा जाहीर करावा लागला. शेतकरी आंदोलनामुळे अकाली दलाचा ग्रामीण भागातील पाया पोखरला गेला आहे का, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, राज्यातील शेतकऱ्यांना धार्मिक अथवा राजकीय मागण्यांपेक्षा स्वतःचे आर्थिक प्रश्न अधिक जवळचे वाटतात हे नक्की झाले आहे. राजभवनवरील निदर्शनांच्या वेळी शेतकरीनेते स्वतःही शेतकऱ्यांबरोबरच मुक्काम ठोकून होते; जे राजकीय नेते कधीच करत नाहीत. ग्रामीण जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी ही एक कृतीदेखील पुरेशी आहे. चंडीगढ आंदोलनात भाग घेणारे बहुसंख्य हे तरुण शेतकरी होते; अकालींच्या मोर्च्यात सामील झालेल्या शेतकऱ्यांप्रमाणे वृद्ध नव्हते. एका तरुण शेतकऱ्याने मार्मिक शब्दांत म्हटल्याप्रमाणे, "अकाली हे धर्मयुद्ध लढत आहेत, तर आम्ही कर्मयुद्ध लढत आहोत.' अकाली दल व शेतकरीनेते यांच्या भूमिकांतील फरक यातून स्पष्ट होतो.)

 हे आंदोलन किती शांतिपूर्ण होते, हिंसेचा एकही प्रकार कसा घडला नाही याचेही याच लेखात शेवटी शर्मा यांनी खूप कौतुक केले आहे. ते म्हणतात,

नेत्यांची इच्छा असेल तर लोक शांतता पाळतात हे यातून सिद्ध होते. अनेकांनी चिथावणी देऊनही शेतकऱ्यांनी कायम संयम पाळला. किंबहुना शेतकरी संघटनेच्या स्वयंसेवकांनी – जे स्वतःला किसान रिझर्व्ह पोलीस (KRP) म्हणवतात त्यांनी - स्वतःच जवळजवळ शंभरएक गुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

 इथे एक मुद्दा नमूद करायला हवा. इतर शेतकरीनेत्यांचे मत कदाचित वेगळे असू शकेल, पण व्यक्तिशः जोशींचा वीजदर वाढवायला काहीच विरोध नव्हता; सरकारने तोट्यात वीज विकावी हे त्यांना अमान्यच होते. त्यांचे म्हणणे एवढेच होते, की विजेचा जो काही खर्च प्रत्यक्षात येतो तेवढा सगळा खर्च तुम्ही शेतीमालाची किंमत काढतानाही हिशेबात धरा; म्हणजे मग तो वाढीव वीजदर शेतकरी आनंदाने देईल. कुठल्याही प्रकारची सवलत (सबसिडी) त्यांना तत्त्वशः अमान्य होती. पण प्रत्यक्षात विजेचा खर्च हेक्टरी १५३ रुपये येत असताना सरकार मात्र धान्याची किंमत ठरवताना तो वीजखर्च फक्त हेक्टरी ७८ रुपये पकडत असे. इतरही सर्व इनपुट्स असेच खूप कमी खर्चाचे दाखवले जात व त्यामुळे शेतीमालाचा उत्पादनखर्च आपोआपच कमी धरला जाई व पर्यायाने शेतीमालाची किंमतही कमीच पकडली जाई. नेमका हाच अन्याय जोशी दूर करू पाहत होते.

 सोमवार, १६ एप्रिल, १९८४च्या 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये स्वामिनाथन एस. अय्यर यांचा 'Harvesting Hindu-Sikh amity' ह्या शीर्षकाचा एक विस्तृत लेख संपादकीयालगतच प्रसिद्ध झाला आहे. तोही काही वेगळे विचार मांडणारा आहे. साररूपाने त्यांचे विचार असे आहेत :
 पंजाबमधील शीख असंतोषाचा विचार करताना शिखांनीही काही तथ्ये विचारात घ्यायला हवीत. पंजाबमधील दोन तृतीयांश शेतकरी हे शीख आहेत व ते भरपूर पिके काढतात हे खरे असले, तरी त्यामागे बिहारसारख्या राज्यातून येणाऱ्या लक्षावधी हिंदू शेतमजुरांचाही मोठा वाटा आहे. किंबहुना ह्या शेतमजुरांशिवाय पंजाबातील शेती होऊच शकणार नाही. इतरही अनेक बाबतीत शिखांना इतर राज्यांवर अवलंबून राहावे लागते. पंजाबमधील नद्या आणि कालवे यांतील पाणी मुख्यतः हिमाचल प्रदेशातून येते व तिथल्या विजेसाठी लागणारा कोळसा मध्यप्रदेशातून येतो. बाहेरून येणाऱ्या या वीज व पाण्याअभावी पंजाबची अर्थव्यवस्था कोसळून पडेल. जवळजवळ २० लाख शीख पंजाबबाहेर राहतात व त्यांनाही आपापल्या व्यवसायासाठी तेथील बव्हंशी हिंदूंवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शीख व हिंदू ह्यांच्यातील ऐक्यातच पंजाबचे व तेथील शिखांचे कल्याण सामावलेले आहे. दुर्दैवाने भावनेच्या भरात शीख हे परस्परावलंबित्व विसरतात. हिंदू-शीख ऐक्य वाढवण्याची म्हणूनच आज सर्वाधिक गरज आहे.
 हाच धागा घेऊन चंडीगढ आंदोलनाच्या संदर्भात अय्यर पुढे लिहितात,

There is reason to be optimistic on this score because of the close co-operation between Sikhs and Hindus in the recent farmers' agitation in Punjab. The president of the Kisan Union, Mr. Bhupinder Singh Mann, and many other office-bearers are Sikhs. But they speak for Hindu as well as Sikh farmers and inducted the services of Mr. Sharad Joshi, a Hindu from Maharashtra, for pressing their demands. They gheraoed Raj Bhavan in Chandigarh and given the trouble in Punjab, the predominantly Hindu population of Chandigarh was initially alarmed by the invasion of the city by farmers, who pitched camps on public places. But it rapidly became clear that the farmers were a highly disciplined lot who took great precaution to ensure that the agitation was non-violent, thanks in part to Mr. Sharad Joshi's organizational abilities. They were soon playing with the children of the Hindu parents and there were warm hugs and embraces between members of the two communities. It was an education for both sides to chat and leam of each other's problems. Not even Holi revelry with all its unpredictability, affected the show of comraderie. The farmers, used to informal ways of dropping in on neighbours, soon won the hearts of Chandigarh urbanites.

(पंजाबमधील अलीकडच्या शेतकरी आंदोलनात हिंदू व शीख ह्यांच्यात जे निकटचे सहकार्य दिसले, त्यामुळे ह्या आघाडीवर आशावादी राहणे सयुक्तिक ठरेल. किसान युनियनचे अध्यक्ष श्री. भूपिंदरसिंग मान व इतर अनेक पदाधिकारी शीख आहेत. पण ते शिखांप्रमाणेच हिंदूंच्याही वतीने बोलत आहेत व आपल्या मागण्या पुढे रेटण्यासाठी त्यांनी श्री. शरद जोशी यांच्यासारख्या महाराष्ट्रातील एका हिंदूचे सहकार्यही घेतले आहे. त्यांनी चंडीगढमधील राजभवनला घेराव घातला, तेथील मोकळ्या सार्वजनिक जागांवर आपले तंबू ठोकले, त्यावेळी चंडीगढमधील बव्हंशी हिंदू नागरिक आपल्या शहरावर झालेल्या ह्या शेतकऱ्यांच्या आक्रमणाने सुरुवातीला घाबरून गेले. पंजाबमधील सध्याची परिस्थिती पाहता हे स्वाभाविकच होते. पण हे शेतकरी अतिशय शिस्तबद्ध आहेत व आपले आंदोलन त्यांनी अतिशय दक्षतापूर्वक अहिंसक ठेवले आहे ही गोष्ट लौकरच स्पष्ट झाली. ह्याचे काही श्रेय शरद जोशी यांच्या संघटनकौशल्याला द्यायला हवे. लौकरच हे शेतकरी हिंदू आईबापांच्या मुलांशी खेळू लागले आणि दोन्ही समाजाच्या लोकांनी लौकरच एकमेकांची गळाभेट घ्यायला सुरुवात केली. एकमेकांशी गप्पा मारणे आणि त्यातून एकमेकांच्या अडचणी समजून घेणे हे दोन्ही समुदायांसाठी एक प्रबोधनच होते. होळीचा सण जल्लोषाने साजरा करताना खूपदा अवचित काहीतरी घडू शकते, पण इथल्या परस्परप्रेमाच्या त्या वातावरणात होळीमुळेही काही बाधा आली नाही. शेजाऱ्यांच्या घरात अगदी सहज, अनौपचारिकपणे जायची सवय असलेल्या ह्या शेतकऱ्यांनी लौकरच शहरी चंडीगढवासीयांची अंतःकरणे काबीज केली.)

 हा ग्रामीण शीख शेतकरी व शहरी पांढरपेशा हिंदू यांच्यातील फरक बद्रीनाथ देवकर यांच्या निरीक्षणातही आला होता. ते म्हणतात,
 “सुरुवातीला जेव्हा शेतकऱ्यांचे हे लोंढेच्या लोंढे चंडीगढमध्ये येऊ लागले, तेव्हा स्थानिक नागरिक काहीसे घाबरूनच गेले. हे शेतकरी मुख्यतः शीख होते, बऱ्यापैकी राकट होते व चंडीगढसारख्या पॉश शहरातील सोफिस्टिकेटेड लोकांपेक्षा ते अगदी वेगळे आहेत हे लगेचच कळत होतं. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सर्व शहरवासीयांनी आपापल्या बायकामुलांना आत घेऊन घरांची दारं-खिडक्या घट्ट लावूनच घेतली. काहीशा भेदरलेल्या नजरेनेच ते ह्या शेतकऱ्यांकडे बघत होते. अगदी पाणी मागण्यासाठी कोणी शेतकऱ्याने दार ठोठावलं तरी दार उघडत नव्हते. न जाणो, हे कोणी अतिरेकी असले तर, अशी भीती त्यांना वाटत होती. पंजाबातील त्यावेळची परिस्थितीच तशी होती. पण हळूहळू त्यांची भीड चेपली. दुपारी ह्या शेतकऱ्यांनी बरोबर बांधून आणलेल्या भाकऱ्या खाल्ल्या व नंतर ती सगळी जागा पुन्हा व्यवस्थित साफ केली हे शहरी माणसांनी बघितलं. त्यानंतर मात्र त्यांनी ह्या शेतकऱ्यांना पाणी द्यायला सुरुवात केली. रात्री शेतकऱ्यांनी आपापल्या घोळक्यात करमणुकीचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. तेव्हातर बंगल्यातली मंडळी बिनधास्त बाहेर येऊन त्या कार्यक्रमात. नाच-गाण्यात भाग घेऊ लागली. हे कोणी अतिरेकी वगैरे नसून ही आपल्यासारखीच सरळमार्गी माणसं आहेत, हा विश्वास त्यांना वाटू लागला. पुढल्या पाच-सहा दिवसांत तर ह्या शेतकऱ्यांची व शहरी मंडळींची चांगलीच दोस्ती झाली."

 ऐतिहासिक अशा या चंडीगढ वेढ्यानंतर जे घडत गेले ते मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडणारेच होते. पंजाब शासनाने स्थापन केलेल्या जोल समितीने आपला अहवाल ठरलेल्या तीन महिन्यांपूर्वीच सादर केला, पण शासनाने तो स्वीकारला नाही. वाढीव वीजदर देणे शेतकऱ्यांना परवडावे म्हणून १९० रुपये प्रती क्विंटल असा भाव गव्हासाठी द्यावा असे समितीने सांगितल्याचे कानावर आले, पण प्रत्यक्षात शासनाने तो अहवाल जाहीरच केला नाही. खरेतर भारतीय किसान युनियन ही संघर्षातील एक संबंधित घटकसंस्था होती व तिला त्या अहवालाची प्रत देणे शासनाचे कर्तव्य होते, पण शासनाने ते केले नाही. उलट वीजबिलांची थकबाकी धाकदपटशा दाखवून वसूल करायला सुरुवात केली, अनेकांचे वीजप्रवाह खंडितही केले.
 त्यामुळे आंदोलनाची पुढची पायरी म्हणून शेतकऱ्यांनी १ मे ८४पासून आपापला गहू विक्रीसाठी बाजारात आणायचाच नाही असे ठरवले. चंडीगढमधील आपल्या भाषणात जोशी म्हणाले होते, "देशात विक्रीसाठी येणाऱ्या गव्हाच्या एकूण पिकापैकी ७० टक्के गहू एकट्या पंजाबात पिकतो. गव्हाच्या त्या प्रचंड ढिगावर तुम्ही बसून आहात. एखाद्या ॲटमबॉम्बपेक्षा अधिक प्रभावी असे ते शस्त्र आहे. तुम्ही ते वापरायचे ठरवले, आपला गहू बाजारात आणायचाच नाही असे ठरवले, तर कुठल्याही सरकारला तुमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील."
 त्याचाच आधार घेऊन पंजाबी शेतकऱ्यांनी ते 'कनकबंद आंदोलन' जाहीर केले. सलग एक आठवडा, म्हणजे ८ मेपर्यंत, गव्हाचा एक दाणाही बाजारात विक्रीसाठी आला नाही. नेहमी गव्हाने ओसंडून वाहणाऱ्या खन्नासारख्या बाजारपेठा अक्षरशः ओस पडल्या. दुर्दैवाने त्यानंतर मात्र शेतकऱ्यांचा धीर सुटला; त्याहून जास्त थांबायची त्यांच्यात क्षमताच नव्हती. त्यामुळे मग ते आंदोलन मागे घ्यावे लागले.

 अर्थात शेतकऱ्यांच्या मनात संताप धुमसतच राहिला. त्याचाच एक आविष्कार म्हणजे, २० जुलैला चंडीगढला एक मोठा शेतकरी मेळावा भरवायचे ठरले. याही वेळी महाराष्ट्रातून काही जणांनी जावे असे ठरले. पण ह्या वेळेला संख्या मर्यादित, फक्त दहा, ठेवायची होती. मागच्या राजभवनच्या घेरावसारखाच प्रकार ह्या वेळेलाही होईल, त्यामुळे शेतकरी संघटनेला अधिकच प्रसिद्धी मिळेल अशी बहुधा पंजाब सरकारला भीती होती. अराजकीय अशा शेतकरी संघटनेची ताकद वाढणे म्हणजे राजकीय पक्षांची ताकद कमी होण्यासारखेच होते. त्यामुळे ह्यावेळी सरकारने असा मेळावा होऊच द्यायचा नाही असा निश्चय केला होता. शक्यतो आंदोलकांनी चंडीगढला पोचूच नये ह्या दृष्टीने बहुतेक गाड्या दिल्लीलाच अडवण्यात येत होत्या. जोशींची गाडीही दिल्लीतच थांबवली गेली. बसने कशीतरी मजल दरमजल करत जोशी व त्यांचे सहकारी चंडीगढला पोचले. तोही प्रवास त्यांना तीन-चार गटांमध्ये व लपतछपतच करावा लागला होता. सरकारच्या असल्या दडपशाहीमुळे ह्या होऊ घातलेल्या मेळाव्याला अतोनात प्रसिद्धी मात्र आपोआपच मिळत गेली! जे घडू द्यायचे नाही असा चंग पंजाब सरकारने बांधला होता, तेच नेमके घडत गेले! चंडीगढमधील पंचायतभवनपासून शेतकऱ्यांचा मोर्चा सुरू झाला. भूपिंदरसिंग मान, विजय जावंधिया, शरद जोशी हे मोर्च्याच्या अग्रभागी होते. पण राजभवनपर्यंत पोचायच्या आतच पोलिसांनी त्यांना पकडले व सरळ कोर्टात हजर केले. न्यायाधीशांनी एकदम १६ दिवसांचा रिमांड दिला.
 जोशींबरोबर महाराष्ट्रातून गेलेल्या दहा जणांमध्ये परभणीचे एक प्रसिद्ध वकील अनंत उमरीकर हेही होते. शेतकरी संघटनेचे ते हितचिंतक होते, शिवाय सामाजिक व सांस्कृतिक कार्यात रमणारे होते. अशा एखाद्या आंदोलनात सामील व्हायचा त्यांचा हा पहिलाच अनुभव होता. पंजाबभेटीतील आपल्या या अनुभवांवर त्यांनी 'आंदोलन' नावाचे एक ८८ पानांचे पुस्तकच लिहिले आहे. परभणीच्या रेणुका प्रकाशनाने ऑगस्ट १९९२ मध्ये ते प्रकाशित केले आहे. 'वेडेपीर' या आपल्या २२३ पानांच्या पुस्तकात त्यांनी शेतकरी संघटनेच्या चौदा कार्यकर्त्यांची रसाळ अशी व्यक्तिचित्रेही रेखाटली आहेत. इतरही बरीच पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
 दुर्दैवाने त्या कारावासात असतानाच एक ऑगस्ट रोजी शरद जोशी यांच्या छातीत एकाएकी जोरात दुखायला लागले. तुरुंगात एकच धावपळ सुरू झाली. त्यांना रुग्णालयात हलवावे लागले. तो अंजायनाचा त्रास होता असे निदान झाले. सुदैवाने वेळीच चांगली वैद्यकसेवा मिळाली म्हणून बरे झाले; नाहीतर गंभीर प्रसंग ओढवू शकला असता. हृदयविकाराचा जोशींना झालेला तो आयुष्यातील पहिलाच त्रास. उर्वरित आयुष्यात ह्या दुखण्याने त्यांचा बराच पाठपुरावा केला.

 एक व्यक्तिगत आठवण इथे नमूद करायला हवी. बटाला इथे मान यांच्या घरी गेलो असताना त्यांच्या पत्नी, भाभीजी, यांनी ती सांगितली. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी शीख सुरक्षारक्षकांकडून इंदिराहत्या झाली त्यावेळी त्यांचे यजमान व इतरही काही शीख शेतकरीनेते महाराष्ट्रात होते; टेहेरे येथे त्याचवेळी चालू असलेल्या शेतकरी संघटनेच्या विशाल सभेत हजर होते. देशभर शीखविरोधी भयानक दंगली सुरू झाल्या होत्या; तशा बातम्या कानावर येत होत्या. त्या दिवसांचे वर्णन करताना भाभीजी गहिवरलेल्या आवाजात म्हणाल्या,
 "बद्रीनाथ देवकर आणि भास्करराव बोरावके अशा वेळी मोठ्या धाडसाने पुढे झाले व शीख बांधवांच्या सुरक्षिततेची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. माझे पती त्यांच्यातच होते. सर्व शिखांना तीन-चार मोटारींमध्ये बसवून ते कोपरगावला स्वतःच्या घरी घेऊन गेले. तिथे त्यांनी शिखांना लपवून ठेवलं. आजूबाजूच्या काही विघ्नसंतोषी लोकांना ह्याची कुणकुण लागली असावी. ते सारखे दाराशी येऊन 'इथे कोणी शीख लपलेले आहेत का,' ते बघत होते. पण बद्रींनी व भाऊंनी कोणाला दाद लागू दिली नाही. देशभर शिखांची हत्या सुरू होती व अशा वातावरणात ट्रेनने पंजाबात परत जाणं अशक्यच होतं. दहाबारा दिवस सगळ्यांनी तिथेच लपून काढले. मग वातावरण जरा निवळलं असं बघून त्यांनी शिख बांधवांना परत पंजाबात पाठवलं. सगळे आपापल्या घरी सुरक्षित पोचले, तेव्हाच त्यांनी व आम्हीही सुटकेचा निःश्वास टाकला. त्याप्रसंगी खरोखरच ह्या दोन कुटुंबांनी आमचे प्राण वाचवले. नाहीतर काय झालं असतं ह्या विचारानेही अंगावर काटा उभा राहतो. पुढे सगळं शांत झाल्यावर मी व माझे यजमान मुद्दाम कोपरगावला जाऊन बद्रीनाथ व भाऊ बोरावके यांच्या घरच्यांना भेटलो व त्यांचे आभार मानले. त्यांच्याविषयीची कृतज्ञता आजही आमच्या मनात कायम आहे. शेवटी त्यांनीच तर माझ्या पतीला दुसरी जिंदगी दिली."

 पंजाबातील शेतकऱ्यांच्या हृदयात जोशींना एक खास जिव्हाळ्याचे असे स्थान प्राप्त झाले ह्याचे एक कारण त्यांचे हृदयाला हात घालणारे वक्तृत्व हेही आहे. उदाहरणार्थ, भारत-पाक सीमेलगत असलेल्या भगतसिंग, सुखदेव व राजगुरू ह्यांच्या स्मारकापाशी झालेली एक सभा. नेहमी गुन्हेगारांना सूर्योदयाच्या वेळी फाशी द्यायची पद्धत. पण आदले काही दिवस लाहोरमध्ये धुमसत असलेला असंतोष विचारात घेऊन इंग्रज शासनाने फाशीसाठी सूर्यास्ताची वेळ निवडली होती. त्यावेळी घडलेल्या एका प्रसंगाच्या ऐकीव माहितीचा उपयोग करत जोशी सभेत म्हणाले होते,
 "हे तिघेही क्रांतिकारक फाशीच्या क्षणाची वाट पाहत, टाचा उंचावलेल्या व हात मागे बांधलेल्या अवस्थेत उभे होते. भगतसिंग त्या तिघांत उंच. त्यांना राजगुरूंनी विचारलं, 'समोर तुला काय दिसतं आहे?' भगतसिंग उत्तरले, 'मला ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य अस्ताला जाताना दिसतो आहे!' ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही अशी ख्याती होती, त्या साम्राज्यावरचा सूर्य अस्ताला जाताना त्या द्रष्ट्या क्रांतिकारकाला दिसत होता. मलासुद्धा आज इथे 'भारता'वरील 'इंडिया'चा सूर्य अस्ताला जाताना दिसत आहे!"
 ह्यावर समोरच्या विराट सभेतील हजारो श्रोत्यांची मने उचंबळून आली नसती तरच नवल. खरेतर जोशींचे हिंदी फारसे चांगले नव्हते; पण तरीही पंजाबात त्यांची हिंदी भाषणे अधिकाधिक उत्तम होत गेली. विचार सुस्पष्ट असले व बोलणे अंतःकरणपूर्वक असले, तर भाषा आड येत नाही ह्याचे ते ज्वलंत उदाहरण होते.
 जोशींप्रमाणे इतर सर्वच कार्यकर्ते पंजाबात रमले. इथले आदरातिथ्य खूपदा महाराष्ट्रातील पाहुण्यांना काहीसे लाजवणारे असे. 'आप हमारे मेहमान है,' म्हणत इथले यजमान महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना कधीही खिशात हात घालू देत नसत. इथला नाश्ता म्हणजे अगदी जेवणाच्या वरताण! भरपूर मख्खन चोपडलेले परोठे, दाट लस्सी वगैरे! त्यात पुन्हा आग्रह करकरून खाऊ घालणे. साधी सकाळची अंघोळ, पण तीही इथल्या अंगणामध्ये संस्मरणीय असे. अंघोळीपूर्वी शरीराला रगडून मोहरीच्या तेलाचे मालिश करून देणारा कोणीतरी असायचा. बटन दाबले, की तीन इंच व्यासाच्या लोखंडी पाइपातून पाण्याचा भलामोठा लोट अंगावर कोसळू लागे! 'पाच हॉर्सपॉवरची अंघोळ' हा शब्दप्रयोग महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय झाला होता. पंजाबातील भारतीय किसान युनियन एक बळकट संघटना होती. तिचे नोंदणीकृत असे लाखाच्यावर सदस्य होते व साहजिकच सर्व कार्यक्रम उत्तमप्रकारे पार पाडण्यासाठी आवश्यक ते आर्थिक व कार्यकर्त्यांचे बळ युनियनकडे होते.
शरद जोशींसारखा एकही मोठा नेता त्यांच्याकडे नव्हता, पण सामूहिक नेतृत्वाचा एक आदर्श यांनी प्रस्थापित केला होता. ह्या संदर्भात परभणी अधिवेशनातला एक प्रसंग बोलका होता. 'शरद जोशी झिंदाबाद' ह्या अधूनमधून दिल्या जाणाऱ्या घोषणेला पंजाबहून आलेले बलबीरसिंग राजेवाल ह्यांनी विरोध केला होता. स्वतः शरद जोशी यांनी 'माझ्या नावाच्या घोषणा देऊ नयेत' असे व्यासपीठावरून सांगितले. पण तरीही कार्यकर्त्यांना ते पटले नाही व त्या घोषणा चालूच राहिल्या. 'हा कदाचित तुमच्या आमच्या धर्मातला फरक आहे. तुमच्याकडे कुठल्याच एका देवाची पूजा अशी होत नाही. तुमच्याकडे मूर्तीपूजाही नाही. गुरूही दहा आहेत व त्यानंतर तुम्ही कोणाला गुरू म्हणून स्वीकारलेच नाही. आमच्याकडे मात्र असंख्य देव आहेत व असंख्य संतपुरुषही आहेत, ज्यांना देवासारखा मान दिला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जयजयकार हा आम्हाला खटकत नाही, उलट आवश्यक वाटतो. कारण मूर्ती जसे देवाचे प्रतीक बनते तशीच ती व्यक्ती एक विचारांचे प्रतीक बनते व इतरांना एकत्र यायला कारणीभूत ठरते.' - असे स्पष्टीकरण त्यावेळी महाराष्ट्रातील काही शेतकरीनेत्यांनी राजेवाल ह्यांना दिले होते. राजेवाल ह्यांना काही ते पटले नव्हते, पण मग त्याकडे त्यांनी शेतकरी एकजुटीचे व्यापक महत्त्व विचारात घेऊन दुर्लक्ष केले.

 हिंदू-शीख तेढ हा एक महत्त्वाचा मुद्दा पंजाबच्या संदर्भात नेहमी पुढे येतो; निदान त्या काळात तरी यायचा. साताऱ्याचे डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेल्या एका लेखात ह्या संदर्भात काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. देशान्तरवास या आपल्या एका लेखात ते लिहितात,

सरदारांचा प्रश्न उग्र होणार हे १९८२ साली एशियाड झाले त्याच वेळी नक्की झाले होते. एशियाडच्या वेळी मी खूप भटकलो होतो. प्रचंड किंमत मोजून जगमोहन यांनी एशियाड फत्ते करून दाखवले. त्यावेळी अतिरेकी नव्हते असे नाही, सरदार आपल्यावर अन्याय होतो म्हणून चिडलेले नव्हते असेही नव्हे; पण काट्याचा नायटा झालेला नव्हता. जगमोहन यांनी ते सहजपणे करून दाखवले. सरदार मुळातच खेळप्रेमी आणि उत्सवप्रेमी. ट्रॅक्स आणि बसेस भरभरून खेळ पाहण्यासाठी खेड्यापाड्यांतून सरदार येत होते आणि हरियाणाच्या सीमेवरून, ते फक्त सरदार आहेत म्हणून, त्यांना परत पाठवले जात होते. प्रत्येक स्टेडीयमवर कडक तपासणी होत होती. चुकूनसुद्धा एकही सरदार ह्या तपासणीतून सुटत नव्हता. तो केवळ सरदार आहे म्हणून पागोट्यापासून सारे काही सोडून तपासले जात होते!प्रत्येक सरदार फक्त सरदार आहे म्हणून स्वतःच्या देशात गुन्हेगार ठरत होता! पूर्वी गावात रामोशी ठरत असत, तसा! सरदारांना ह्यावेळी काय यातना झाल्या असतील, हे दलितांनासुद्धा समजणार नाही. दलित आपल्या तोंडावर आपण दलित आहोत, असा शिक्का मारून फिरत नाहीत. मी महाराष्ट्रीयन आहे; पण मी बसमधून हिंडताना मी मराठी आहे, हे काही बाकीच्यांना ओळखता येत नाही. समजा, उद्या शिवसेनेने मुंबईत काही गडबड केली आणि दिल्लीत मराठी माणसांवर लोक चिडले, तरी मी मराठीच आहे ह्याची जाहिरात नेहमी माझ्याबरोबर नसते. मी दिल्लीमधून त्यावेळीसुद्धा निर्धास्तपणे हिंडू शकतो. शिखांबाबत हे संभवत नाही. बाकी समाजाच्या नजरा आपणाकडे संशयाने पाहताहेत असे त्यांना दरक्षणी जाणवत राहते. अधिक अगतिक आणि म्हणून अधिक अतिरेकी बनत ते इतरांच्यापासून दूरदूर जातात आणि एकमेकांच्या अधिक जवळ येतात. सरदारांचे आजचे आक्रस्ताळी, आततायी वागणे हे असहायतेतून, अगतिकतेतून निर्माण झालेले आहे.
खेड्यापाड्यांतून सारे शीख संतापलेले आहेत हे तर खरेच. पण त्यांचे प्रश्न साधे आहेत. हा मुख्यत्वेकरून शेतीचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न आहे. त्यांना लागणाऱ्या विजेचा प्रश्न आहे. शेतीमालाला मिळणाऱ्या कमी किंमतीचा प्रश्न आहे. शहरातील माणूस कमी कष्टांत अधिक आरामात राहतो हे त्यांना दरक्षणी जाणवते. त्यातून त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांत शहरातील माणसांना, म्हणजे पर्यायाने हिंदूंना, फारसा रस नसल्याने पंजाबमधील आणि भारतातील सारे हिंदू त्यांच्या पिळवणूकीत सामील आहेत असे त्यांना वाटते.
हा प्रश्न या देशातील साध्या-भोळ्या, पिळवणूक होणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळेच पंजाबमध्ये आग पेटलेली असताना, मानाचे मुजरे घेत शरद जोशी आणि त्यांचे साथीदार पंजाबमधून हिंडलेत. शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांविरुद्ध काही करायची हिंमत अकाली दलाचीच काय, पण भिंद्रनवालेचीसुद्धा नव्हती!

(माणूस दिवाळी अंक १९८४)


 शरद जोशी यांनी मांडलेला 'इंडिया विरुद्ध भारत' हा सिद्धांत पंजाबच्या संदर्भात लागू करून पाहिले, तर ह्या तेढीचे स्वरूप बऱ्यापैकी स्पष्ट होते. पंजाबी म्हटले, की बहुतेकदा आपल्यापुढे शीख उभे राहतात, पण पंजाबात शिखांचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे तर हिंदू व इतर मिळून ४० टक्के असतील. शीख हे मुख्यतः शेतकरी आहेत, तर हिंदू समाज व्यापारउदीम करणारा व नोकरीपेशातला आहे. एकूण शेतकऱ्यांमध्ये ७० टक्के शीख आहेत व ते ग्रामीण भागात राहतात. ते सामान्यतः राकट, अल्पशिक्षित समजले जातात. आपल्याला वाटते त्याप्रमाणे सगळेच शीख श्रीमंत नसतात. हिंदू बव्हंशी शहरांमधून राहतात. कायम नुकसानीत राहिलेल्या शेतीमुळे 'भारत'वासी शीख शेतकरी गरीब राहिले, तर 'इंडिया'वासी हिंदू नागर समाज तुलनेने समृद्ध झाला. मुळात चंडीगढ हे एक खूप आधुनिक शहर. रस्ते, फुटपाथ, चौक, उद्याने, दुकाने, घरे सगळेच अगदी चकाचक. पुण्या-मुंबईसारख्या शहरांतून आलेलाही इथे काहीसा दबून जातो, मग ग्रामीण पंजाबातून आलेल्या शेतकऱ्याला हे शहर म्हणजे परदेशासारखेच वाटले तर नवल नाही. चंडीगढमध्ये आंदोलक शेतकरी आल्यावर ही तेढ लगेचच त्यांच्या नजरेत ठसठसू लागली होत
 पंजाबमधील परिस्थिती इतकी स्फोटक बनली ह्याबद्दल अनेक जण इंदिरा गांधींना दोषी ठरवतात. त्यांनीच अकाली दलात फूट पडावी म्हणून जर्नेलसिंग भिंद्रनवालेसारख्या अतिरेक्यांना उभे केले; असेही म्हटले जायचे. जोशी हे अमान्य करतात. ते म्हणतात,

 या म्हणण्याइतके सत्यापासून ढळणारे काही असू शकत नाही. मलातर पंतप्रधानांच्या जागी, स्वतंत्र व्यक्तिमत्व नसलेल्या निर्बुद्धांच्या गराड्यात सापडलेली, आपल्या नेतृत्वाखालील देश भयानक वेगाने विनाशाकडे वाहत आहे हे पाहणारी आणि ते थांबवण्यास आपण असमर्थ आहोत या जाणिवेने भयग्रस्त झालेली एक एकाकी, असहाय स्त्री दिसते. इतका उत्पात घडवण्याइतकी अफाट शक्ती एका व्यक्तीच्या हाती बहाल करून सर्व दोष पंतप्रधानांच्या माथी मारणे म्हणजे केवळ राजकीय डावपेच आहे.

परीकथा ऐकण्यात रमणाऱ्या बालकाप्रमाणेच कोणत्याही प्रश्नामागे एखादे खलनायकी व्यक्तिमत्त्व कारणीभूत आहे असा विश्वास ठेवणे आपल्याला पसंत पडते – मग तो खलनायक कधी एखादा रावण, कंस, जीना, इंदिरा, झैलसिंग तर कधी भिंद्रनवाले यांच्या रूपाने जन्मलेला असतो! गोष्टीत खलनायक दूर झाला, की तो प्रश्न दूर होऊन सगळीकडे आनंदीआनंद होतो. किती सुटसुटीत आणि सोयीस्कर! मग किचकट आर्थिक व सामाजिक कारणांचा विचार करण्याची गरजच उरत नाही.
नोव्हेंबर ८२पर्यंत पंजाबमध्ये कुठेही जातीय स्वरूपात ध्रुवीकरण झालेले नव्हते हे मी अनुभवले आहे. हे मी ठामपणे म्हणू शकतो. तेथे जातीजातीत अजिबात अर्धवट शीख शेतकऱ्यांना उपकार केल्यासारखे वागवीत आणि शीख शेतकऱ्यांनाही या शहरी व्यापाऱ्यांच्या खोटेपणाबद्दल व कपटीपणाबद्दल स्वाभाविक तिरस्कार होता. हरियानातील जाट-लाला संबंध किंवा महाराष्ट्रातील मराठे-ब्राह्मण संबंध यासारखेच पंजाबमधील शीख-हिंदू संबंधांचे स्वरूप होते. संपूर्ण देशभर ग्रामीण शेतकरी आणि शहरी नागरिक यांचे संबंध याच प्रकारचे राहिले आहेत. त्यांचे परस्पर आर्थिक हितसंबंध तत्त्वतः संघर्षात्मकच राहिले आहेत.
उद्योगधंद्यासाठी लागणारे भांडवल जमा करण्यासाठी मुख्यत्वे शेतीमालाच्या किमती कमी ठेवून वरकड उत्पन्न निर्माण करणारे शासनाचे जे धोरण आहे, तेच पंजाबमधील असंतोषाचे मूळ कारण आहे. पंजाबमधील असंतोष हे केवळ इंडियाभारत दरीचे पूर्ण प्रतिबिंब आहे.

(शेतकरी संघटक, २७ जुलै १९८४)

 भविष्यातही पंजाबातील शेतकरी आंदोलनात शरद जोशींचा नेहमीच सहभाग राहिला. उदाहरणार्थ, अन्नधान्याचा व्यापार खुला असावा यासाठी वाघा येथील भारत-पाकिस्तान सीमेवरील सत्याग्रह किंवा भारतीय शेतकऱ्यांची कर्जे अनैतिक आहेत व म्हणून त्यांतून शेतकऱ्यांना मुक्त करायला हवे यासाठी ॲड. राम जेठमलानी यांच्या सहकार्याने त्यांनी पंजाबमधील हायकोर्टात दिलेला प्रदीर्घ लढा. याविषयी नंतर विस्ताराने लिहिलेलेच आहे. या साऱ्यांतून जोशींचा पंजाबमधील शेतकऱ्यांशी असलेला स्नेह वृद्धिंगत होत गेला.
 बाबा आमटे यांनी काही वर्षांनंतर पंजाबात शांतियात्रा काढली होती; अगदी अलीकडे २०१५ साली पंजाबात घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते; आणि ह्या दोन्ही प्रसंगी पंजाबच्या आतिथ्यशीलतेचा उत्तम अनुभव आला होता. पण जोशी यांना पंजाबात मिळालेला प्रतिसाद हा खूपच अधिक व्यापक होता; अक्षरशः लक्षावधी शेतकरी त्यांचे भक्त बनले होते. पंजाबात त्यांना जे स्थान मिळाले ते अन्य कठल्याही मराठी माणसाला त्या पूर्वी वा नंतर कधीच मिळालेले नाही; संत नामदेव हा अपवाद मानावा लागेल, कारण त्यांचे माहात्म्य मुख्यतः धार्मिक स्वरूपाचे आहे.
 महाराष्ट्राबाहेर आंदोलन पसरणे ही शरद जोशींची ज्या काळात नितांत गरज होती, त्याच काळात सुदैवाने हे पंजाब प्रकरण घडले. बाजीरावाने ज्याप्रमाणे थेट अटकेपार झेंडा रोवला, तशीच जोशींनी ही एक महाराष्ट्राबाहेर मोठीच उडी घेतली. शेतकरी संघटनेच्या विस्तारालाही एक नवीच दिशा त्यामुळे मिळाली. त्यांचे आंदोलन आता स्थानिक राहिले नव्हते. दिल्लीपासून, आणि म्हणून राष्ट्रीय मंचापासून, ते अगदी जवळ जाऊन पोचले होते. अर्थात नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
 पंजाबसारख्या शेतीप्रधान प्रांतात शेतकरी संघटनेचे आंदोलन पसरणे हा भाग महत्त्वाचा आहेच, पण व्यक्तिशःदेखील पंजाबमधले अनेक शेतकरी आजही जोशींना खूप मानतात. स्वतः भूपिंदर सिंग यांची तर जोशींवर श्रद्धाच आहे. त्यांच्या बटाला येथील घरात डायनिंग टेबलाच्या बाजूच्या भिंतीवर दोनच फोटो आहेत – एक फोटो आहे अमृतसर येथील पवित्र सुवर्णमंदिराचा, आणि त्याला जोडूनच असलेला दुसरा फोटो आहे शरद जोशी यांचा.